टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • रामदास आठवले, नरेंद्र मोदी, रुपा गांगुली, ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी
  • Tue , 18 July 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या रामदास आठवले Ramdas Aathavle नरेंद्र मोदी Narendra Modi रूपा गांगुली Roopa Ganguly ममता बॅनर्जी Mamta Banerjee सोनिया गांधी Soniya Gandhi

१. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरुद्ध (एनडीए) पूर्ण क्षमतेनिशी लढण्याचे आवाहन केले. या निवडणुकीत संख्याबळ आपल्याविरोधात असले तरी आपण लढलेच पाहिजे. विरोधी पक्षांनी फुटीच्या आणि जातीय राजकारणाविरोधात लढलेच पाहिजे. आपण देशाला अशा शक्तींच्या ताब्यात जाऊन देता कामा नये. त्यासाठी विरोधी पक्षांनी संख्याबळाची पर्वा न करता कडवी लढत दिली पाहिजे, असे सोनिया गांधी यांनी सांगितले.

आपण धर्मनिरपेक्ष राजकारण करत होतो आणि आता फुटीचं, जातीय राजकारण सुरू आहे, असं काँग्रेसने मानणं ही आत्मवंचनाच आहे. ‘मुँह में राम और बगल में छुरी’ अशी आजच्या सत्ताधाऱ्यांची स्थिती असेल, तर कालचे सत्ताधारी ‘मुँह में धर्मनिरपेक्षता और बगल में धर्मवाद, जातीवाद’ असेच होते. घोष मात्र कायम लोकशाही मूल्यांचा करायचा. त्यामुळे देश धर्मवादी शक्तींच्या हातात जाऊ नये, म्हणून ही ६० वर्षं जुनी टेप लावून लोक काँग्रेसकडे वळतील, या भ्रमातून काँग्रेसने बाहेर पडायला हवं.

.............................................................................................................................................

२. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या आगीत भाजप खासदार रूपा गांगुली यांनी तेल ओतलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देशभरातून समर्थन देणाऱ्यांवर टीका करताना त्या म्हणाल्या, हिंमत असेल तर ममता समर्थकांनी आणि देशभरातल्या नेत्यांनी ममताबाईंच्या पाठबळाशिवाय आपल्या घरातल्या बहिणीला, मुलीला, वहिनीला किंवा पत्नीला पश्चिम बंगालमध्ये पाठवून बघावं, १५ दिवसांच्या आत त्यांच्यावर बलात्कार होईल. तेथील दंगलीच्या काळात बंगालमधल्या हिंदू जनतेच्या रक्ताचं पाणी झालं आहे का? तुम्हीही शस्त्र उचला नाहीतर तुमची अवस्था काश्मीरी पंडितांप्रमाणे होईल, अशी ट्वीट रूपा गांगुली यांनी केली होती.

आपण ममता बॅनर्जी यांना विरोध करण्याच्या नादात आपल्याच राज्याबद्दल, इथल्या जनतेबद्दल उर्वरित देशाची, जगाची काय कल्पना करून देतो आहोत, किती नालस्ती करतो आहोत, याचं या बाईंचं भान पुरतं सुटलं आहे का? हाच पश्चिम बंगाल भाजपची सत्ता येताच, सभ्य आणी सुसंस्कृत बनेल, यातही शंका नाही. पश्चिम बंगालमध्ये सध्या सुरक्षित असलेल्या सगळ्या बायकांना ममता बॅनर्जी यांचं पाठबळ लाभलं असेल, तर त्या रजनीकांतपेक्षाही शक्तिमान आहेत म्हणायच्या.

.............................................................................................................................................

३. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही कथित गोरक्षकांना खडे बोल सुनावले आहेत. प्रत्येकालाच बीफ खाण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे एखाद्याला मरेस्तोवर मारहाण करणाऱ्या गोरक्षकांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असे आठवले यांनी सांगितले. गोरक्षणाच्या नावाखाली भक्षक होणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

रामदासजी, आपलं माननीय पंतप्रधानांशी या विषयावर काही बोलणं झालंय का हो? त्यांच्या आणि तुमच्या भूमिकेत फारच मोठा फरक आहे. ते म्हणतात, गोमातेचं रक्षण व्हावं, असं सर्वांनाच वाटतं. तुम्ही म्हणता, बीफ खाण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. आता बीफ खायचं तर गोमातेचं रक्षण कसं होणार? तुम्हा दोघांचे ‘सर्व’जण इतके वेगवेगळे, अगदी परस्परविरोधी कसे आहेत?

.............................................................................................................................................

४. देशभरात गोमांस, गोवंश, गोहत्या यामुळे वातावरण तापले असताना गुजरातमध्ये धार्मिक सलोख्याचे अत्यंत उत्तम उदाहरण समोर आले आहे. गुजरातमधील एका मुस्लिम व्यक्तीच्या शरीरात यापुढे एका हिंदू व्यक्तीचे हृदय धडधडणार आहे. धार्मिक सौहार्दाचा प्रत्यय देणारी ही हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अहमदाबादमधील रुग्णालयात पार पडली आहे. सूरतच्या अमितचे हृदय आणंदमध्ये राहणाऱ्या सोहेलच्या शरीरात धडधडणार आहे. अहमदाबादमध्ये ग्रीन कॉरिडॉर करून ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. ३६ वर्षीय सोहेल वोरा गेल्या अनेक वर्षांपासून केवळ १५ टक्के धडधडणाऱ्या हृदयासोबत जगत होता. आता नवे हृदय मिळाल्याने त्याच्या आयुष्याला नवी उमेद मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी अपघातात ब्रेन डेड झालेल्या अमितच्या शरीरातील कार्यरत असलेले काही अवयव गरजूंना दिल्यास त्यामुळे त्यांना नवे आयुष्य मिळेल, असा विचार अमितच्या कुटुंबीयांच्या मनात आला. त्यामुळे अमितचे हृदय, किडनी आणि डोळे दान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.

‘क्रांतिवीर’मधल्या नाना पाटेकरची आठवण करून देणारी ही घटना आहे. तो हिंदू आणि मुस्लिमाचं रक्त एकत्र करून आता यातलं आपापलं रक्त ओळखा म्हणून सांगतो... धर्म ही माणसाने स्वत:वर आरोपित केलेली बाह्य ओळख आहे, तिच्याआतला माणूस एकच आहे, याची जाणीव यानिमित्ताने काहीजणांना झाली तरी पुष्कळ. ही घटना गुजरातमध्ये घडावी, हा योगायोगही बोलका आहे.

.............................................................................................................................................

५. सणासुदीला पाश्चात्त्य धाटणीचे कपडे नकोत. पुरुषांनी कुर्ता-पायजमा व महिलांनी साडी परिधान करावी, वाढदिवशी केक कापून मेणबत्त्या कसल्या विझवता; ती आपली संस्कृती नाही, घरी कुटुंबातील सगळे सदस्य मिळून गप्पा मारत असतील तर राजकारण, चित्रपट, क्रिकेट असले विषय वर्ज्यच करणे उत्तम... असे जनसामान्यांचे प्रबोधन करण्याची मोहीम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हाती घेतली असून, कुटुंबांतील संवाद वाढवण्याचा उद्देश त्यामागे असल्याचा दावा करण्यात येत आहे. भारतीय संस्कृती व देशी मूल्ये देशवासीयांमध्ये रुजावीत, या हेतूने संघाने कुटुंब प्रबोधन नामक मोहीम हाती घेतली आहे. सन २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. नागपूर व इतर काही ठिकाणी या मोहिमेला अनुसरून संघाचे स्वयंसेवक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे आहार-विहाराबाबत प्रबोधन करत आहेत. ‘विदेशी संस्कृतीच्या आहारी न जाता शाकाहाराचा अवलंब करावा,’ असे आर्जवही स्वयंसेवक करीत आहेत. मुस्लिम, तसेच ख्रिश्चनधर्मीय कुटुंबांचेही प्रबोधन करण्याचा संघाचा हेतू आहे.

लोकांनी कोणते कपडे परिधान करावे, काय खावे, काय प्यावे, हे सांगताना काय करू नये, हेही सांगितलं जातंय. त्याला संस्कृतीचा आधार दिला जातोय. ही संस्कृतीही मजेशीर आहे. शुद्ध शाकाहार ही कोणाची संस्कृती आहे? भारताची संस्कृती? कशी काय ठरली ही संस्कृती? कोणी ठरवली? या देशात काही अपवाद वगळता सर्व जातीधर्मांमध्ये मांसाहाराची समृद्ध परंपरा आहे. तिचा या देशाच्या संस्कृतीत समावेश न करण्याचा अधिकार या ऊटपटांगांना कोणी दिला. मुस्लिम आणि ख्रिश्चनांचं असंच प्रबोधन केलं जाणार आहे, ही तर सरळसरळ धमकीच आहे. तालिबान टप्प्याटप्प्याने फॉर्मात येऊ लागले आहेत!

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......