'काय रे रास्कला' : खमंग विनोदाचा तडका
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • 'काय रे रास्कला'ची पोस्टर्स
  • Mon , 17 July 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie काय रे रास्कला Kaay Re Rascala गिरिधरन स्वामी Giridharan Swami गौरव घाटणेकर Gaurav Ghatnekar

'व्हेंटिलेटर' या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री प्रियांका चोपडा हिच्या 'पर्पल पेबल पिक्चर्स' या कंपनीतर्फे 'काय रे रास्कला' या दुसऱ्या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटामध्येच कुतुहूल आहे. 'रास्कल' या मूळ इंग्रजी शब्दाचा अर्थ 'लुच्चा', 'लफंगा' असा होतो. त्यानुसार चित्रपटाची कथाही 'लुच्चेगिरी'वर आधारित आहे. अर्थात ती नायकाकडून होणारी 'लुच्चेगिरी' आहे. त्यामुळे तिला प्रेक्षकांची सहानुभूती मिळणार हे गृहीत धरून कथेची मांडणी करण्यात आली आहे. शिवाय कथेला रहस्याची जोड असली तरी मांडणी करताना तिला पूर्णपणे विनोदाची डूब देण्यात आली आहे. त्यामुळे 'काय रे रास्कला' विनोदाची चांगली मेजवानी देत छान करमणूक करतो.

वास्तविक 'काय रे रास्कला' या चित्रपटाची कथा एका दाक्षिणात्य चित्रपटावरून बेतली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरिधरन स्वामी हेही दाक्षिणात्य छायालेखक आहेत. यापूर्वी काही मराठी चित्रपटांचं त्यांनी छाया-दिग्दर्शन केलं आहे. मात्र 'काय रे रास्कला'चं दिग्दर्शन करताना त्यांनी मूळ दाक्षिणात्य चित्रपटाच्या कथेला मराठीचा विनोदी तडका देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा चित्रपट विनोदाच्या दृष्टीनं 'खमंग' झाला असला तरी त्याची मूळ 'रेसिपी' हे दाक्षिणात्य आहे, हे चित्रपट पाहताना लक्षात येतं. (कदाचित चित्रपटात काही दाक्षिणात्य पात्रं असल्याचाही हा परिणाम असावा.)

'काय रे रास्कला'चा नायक 'राजा' हा एक बेकार आणि खुशालचेंडू तरुण असतो. खिशात दमडी नसल्यामुळे गोड बोलून कोणाची तरी फसवणूक करून आपला चरितार्थ चालवणं हाच त्याचा रोजचा उद्योग. शशिकांत पाटील नावाच्या चाळमालकाच्या चाळीतील एका खोलीत राजा भाडेकरू म्हणून राहत असतो. आता हा चाळमालक पाटील मराठी, पण त्याची बायको मात्र तमिळी. (या दोघांचं लग्न कसं जमतं ते दाखवणारा खास दाक्षिणात्य स्टाईल प्रसंग चित्रपटात मजा आणतो!) त्यांना वैजयंती ही एकुलती एक मुलगी. या वैजूचं लग्न 'मुत्थु' या ‘रजनीकांत’वेड्या तमिळ तरुणाशी व्हावं ही पाटील यांच्या बायकोची इच्छा असते, मात्र पाटील यांचा त्याला विरोध असतो. योगायोगानं राजा आणि वैजूची गाठ पडते आणि दोघेही प्रेमात पडतात. मात्र पाटील कुटुंबाला याचा थांग लागत नाही.

एकदा फसवणुकीच्या मोहिमेवर निघालेल्या राजाला 'चांदणी' या आत्महत्या केलेल्या बारगर्लचं 'रहस्य' कळतं. या 'चांदणी'चे राजकीय नेता (जो नंतर राज्याचा मुख्यमंत्री होतो) असलेल्या गावकर आणि उद्योजक असलेल्या शशांक सुभेदाराशी संबंध असतात. त्याचा गैरफायदा घेऊन या दोघांनाही ब्लॅकमेल करण्याचं राजा ठरवतो. 'चांदणीला एक मुलगा आहे आणि तो तुमचाच आहे' असं या दोघांनाही सांगून राजा त्यांना ब्लॅकमेल करतो. त्यासाठी 'गुड्डू' या अनाथ असलेल्या मुलाची मदत  घेतो. राजाने सुरू केलेल्या या ब्लॅकमेल खेळाच्या चक्रव्यूहात सगळे कसे अडकत जातात आणि पुढे नेमकं काय होतं हे पडद्यावर पाहणेच इष्ट ठरेल.

मूळ चित्रपटाच्या कथेचा 'प्लॉट' चांगला आहे आणि त्यावर मराठीची इमारत उभी करताना चांगली काळजीही घेतली आहे. मात्र पटकथेतील प्रमुख त्रुटी लगेच जाणवतात. चाळमालक शशिकांत पाटील आणि मुख्यमंत्री गावकर यांची 'घनिष्ट मैत्री' कशी असू शकते (केवळ एका वाक्यात ही मैत्री असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे!) आणि मुख्यमंत्री ब्लॅकमेलरला पैसे नेऊन देण्यासाठी पाटील यांनाच का पाठवतात? तसेच 'मुख्यमंत्रीपद' भूषवणारा माणूस आपल्या हाताशी एवढी यंत्रणा असताना 'ब्लॅकमेलर' नेमका कोण आहे? याचा शोध का घेत नाहीत याचं कोडं उलगडत नाही. आणि सर्वांत मुख्य म्हणजे मुख्यमंत्री गावकर हे एका राज्याचे मुख्यमंत्री वाटत नाहीत, तर ते एका गल्लीचे मुख्यमंत्री वाटतात. (मुख्यमंत्रीपदाऐवजी त्यांना इतर कोणतंही व्यावसायिक 'पद' चाललं असतं.) याशिवाय 'रजनी' वेडा दाखवलेला 'मुत्थु' हे श्रीकांत म्हसे यांनी रंगवलेलं पात्र खास विनोदनिर्मितीसाठी घेतलं आहे हे सुरुवातीपासून जाणवतं, मात्र त्यामानानं त्यांच्याकडून झालेली विनोदनिर्मिती ही फार मजा आणत नाही (अर्थात रजनीकांतची नक्कल करणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही म्हणा!)

शेवटच्या प्रसंगात हॉटेलमध्ये एकमेकांच्या मागे लागलेल्या 'संशयग्रस्त' पात्रांनी करमणुकीचं छान दर्शन घडवलं आहे. शिवाय इतर वेगवेगळ्या प्रसंगातही मजा आणली आहे. मार्मिक संवादाचा देखील त्यामध्ये मोलाचा वाटा आहे. फसवणुकीसाठी राजाने योजलेल्या वेगवेगळ्या क्लृप्त्या देखील 'योग्य' वाटतात. रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी श्रवणीय झाली आहेत. सोनू निगम यांनी गायलेल्या 'चेहरा तुझा कोहिनुर, कोहिनुर...' या गाण्याचं टेकिंगही उत्तम जमलं आहे.

गौरव घाटणेकर याने राजाच्या भूमिकेत 'कमाल' केली आहे, तर निहार गीते याने 'गुड्डू'च्या भूमिकेत 'धमाल' आणली आहे. फसवणुकीच्या प्रसंगात दोघांचीही केमिस्ट्री छान जुळली आहे. चाळमालक झालेले निखिल रत्नपारखी, त्यांच्या बायकोच्या भूमिकेतील सुप्रिया पाठारे यांनी विनोदनिर्मितीमध्ये चांगली भर घातली आहे. याशिवाय मुख्यमंत्री झालेले नागेश भोसले, शशांक सुभेदार झालेले अक्षर कोठारी यांच्याही भूमिका चांगल्या वठल्या आहेत. त्यामानाने वैजू झालेली भाग्यश्री मोटे आणि सुभेदाराच्या पत्नीची भूमिका करणारी ऐश्वर्या सोनार यांचं नवखेपण जाणवत राहतं.

…तरी विनोदाचा तडका असलेली ही 'लफंगेगिरी' पाहण्यासारखी आहे!

लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख