अजूनकाही
१. बंगळुरुच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या अण्णाद्रमुक पक्षाच्या मुख्य सचिव शशिकला यांना तुरुंगात व्हीआयपी सुविधा दिल्या जात आहेत. शशिकला यांच्या जेवणासाठी तुरुंगात विशेष स्वयंपाकगृहाची निर्मिती करण्यात आली असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षकांच्या (तुरुंग) अहवालातून उघड झाले आहे. यासाठी शशिकला यांनी तुरुंगातील अधिकाऱ्यांना तब्बल दोन कोटींची लाच दिल्याची माहितीदेखील अहवालात आहे. स्वत: पोलीस महासंचालकदेखील यामध्ये सामील आहेत, असे पोलीस उपमहानिरीक्षक (तुरुंग) डी. रुपा यांनी वरिष्ठांना दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. शशिकला यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणात चार वर्षांची शिक्षा झाली आहे.
उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती नसती तर या बाईंना या सगळ्या सुविधांसाठी पैसे मोजणं परवडलं असतं का? लाचेच्या लाभधारकांमध्ये पोलिस महासंचालकांचाही समावेश आहे, यातही आश्चर्य काय? एवढ्या हाय प्रोफाइल कैद्याच्या संदर्भात इतके महत्त्वाचे निर्णय अतिवरिष्ठ पातळीवरूनच होत असतात. जिथं रस्त्यात वाहतूक पोलिस करतात, त्या वाटमारीतलाही वाटा सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचतो, तिथं एवढी मोठी लाच त्यांना वगळून कशी घेता येईल?
.............................................................................................................................................
२. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांची मानसोपचार तज्ज्ञांद्वारे तपासणी करण्याचा अजब निर्णय सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना वेडे ठरवण्याचा हा राज्य सरकारचा घाट आहे. सत्ताधारी ज्या प्रकारे निर्णय घेत आहेत, त्यावरून शेतकऱ्यांना नव्हे तर, सरकारलाच मानसोपचार तज्ज्ञांद्वारे तपासणी करण्याची गरज आहे, असं टीकास्त्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोडलं आहे.
शेतकऱ्यांवरच्या मानसिक ताणतणावांचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्यांना समुपदेशन देण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय योग्यच आहे. शेतकऱ्यांइतक्याच हलाखीच्या परिस्थितीत असलेले सगळेच समाजघटक आत्महत्येचा मार्ग पत्करत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवं. त्यात शेतकऱ्यांना वेडे ठरवण्याचाच डाव शोधणाऱ्यांना मानसोपचार तज्ज्ञाची अधिक गरज आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांआधी या विरोधी पक्षाच्या नेत्यांची तपासणी करून घेणं अधिक योग्य ठरेल.
.............................................................................................................................................
३. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर तोफ डागली असून काँग्रेसला पक्ष वाचवायचा असेल तर त्यांनी नितीशकुमार यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रं सोपवावीत, असा अजब सल्ला दिला आहे. काँग्रेसला नेतृत्व नाही आणि नितीशकुमार यांना पक्ष नाही, असं एकंदर चित्र आहे. या स्थितीत नितीश यांना काँग्रेस अध्यक्ष बनवणंच काँग्रेसच्या हिताचं ठरेल, असे गुहा म्हणाले.
हे असं मागून घास घेण्याचा उद्योग करण्यापेक्षा काँग्रेसने अमित शाह यांना पक्षाध्यक्ष बनवलं तर ते हमखास निवडणुका जिंकून देतील. त्यांच्याकडे एकावर एक फ्री पद्धतीनं सर्वांत लोकप्रिय पंतप्रधानही आहेत. तेही काँग्रेसला लाभतील आणि काँग्रेसच्या योजना नाव बदलून, साफसूफ करून राबवण्यात त्यांनाही फारसं काही लाजिरवाणं वाटणार नाही... आताही वाटत असेल, असं वाटत नाही म्हणा. काँग्रेस भाजपमध्येच विलिन करून टाकली म्हणजे देशापुढचे सगळेच प्रश्न शंभरेक वर्षांसाठी तरी नक्कीच सुटून जातील.
.............................................................................................................................................
४. कर्णधार विराट कोहलीच्या हट्टापायीच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ रवी शास्त्रींच्या गळ्यात पडल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात असताना, शास्त्रीबुवांनी एक 'सत्यवचन' सांगत त्यावर शिक्कामोर्तबच केलं आहे. कुठलाही संघ हा कर्णधाराचा असतो, हे अगदी जाहीर सत्य आहे. कारण तोच प्रत्यक्ष मैदानावर संघाचं नेतृत्व करत असतो. प्रशिक्षकाचं काम हे पडद्यामागचं असतं, असं सांगत विराट कोहलीच टीम इंडियाचा 'बॉस' असेल असे स्पष्ट संकेत रवी शास्त्री यांनी दिलेत.
शास्त्री यांच्या निवडीतूनच त्यांचा बॉस विराट असणार, हे स्पष्ट झालेलं आहे. संघाच्या गोलंदाजीसाठी एक प्रशिक्षक, फलंदाजीसाठी दुसरा प्रशिक्षक असताना शास्त्री प्रशिक्षक म्हणून काय करतील, हा एक प्रश्नच आहे. क्षेत्ररक्षणाचं प्रशिक्षण शास्त्री देत आहेत, अशी कल्पना खुद्द तेही स्वप्नातसुद्धा करू शकणार नाहीत. विराटच्या हाताला हात लावून त्याच्या प्रत्येक निर्णयाला ‘मम’ म्हणण्याचंच काम शास्त्री यांना दिलं गेलं आहे, यात मुळात कोणाला शंका आहे?
.............................................................................................................................................
५. भारतीय हवामान खात्याने पावसाचा चुकीचा अंदाज वर्तवल्यानं लाखोंचं नुकसान झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी या खात्याविरोधातच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बियाणं आणि कीटकनाशक उत्पादक कंपन्यांशी हवामान खात्यानं संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी या तक्रारीत केला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंडरुड येथील पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांनी हवामान खात्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या वर्षी जूनमध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्यानं शेतकऱ्यांना दिली होती. त्या आधारावर पेरणी केली, बियाणं, खतं, कीटकनाशकं आणि मजुरांवर लाखो रुपये खर्च केले. मात्र, त्यानंतर पाऊस काही पडला नाही. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं, असंही या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
या शेतकऱ्यांना अजिबात, अगदी पाच पैशांचीही नुकसानभरपाई देता कामा नये. यांना भरपाई मिळाली, तर कुणाकुणाला किती ठिकाणी भरपाई द्यावी लागेल, याचा विचार करा. विरोधी पक्षात असताना भरमसाट आश्वासनं देऊन सत्तेत येणाऱ्या आणि नंतर त्या आश्वासनांना चुना लावणाऱ्या राजकीय पक्षांवर खंक होण्याची पाळी येईल. रस्ते बनवणारे, खड्डे बुजवणारे कंत्राटदार आणि इतके रोजगार तयार करू, हे स्वस्त करू, ते फुकट देऊ, खात्यात इतके पैसे भरू, वगैरे गाजरं दाखवणारे नेते साफ रस्त्यावर येतील आणि आयुष्यभरासाठी तुरुंगात जातील.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment