अजूनकाही
१९०९ साली मराठीतला पहिला दिवाळी अंक मासिक मनोरंजनचे संपादक का. र. मित्र यांनी प्रकाशित केला. तो व्यक्तिचित्र विशेषांक होता. अमेरिकेतील नाताळ विशेषांकांवरून त्यांना ही कल्पना सुचली. तो त्यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिला होता. सलग तीन वर्षं का. र. मित्र यांनी तो विनामूल्य उपलब्ध करून दिला.
हळूहळू इतरही मासिकांनी दिवाळी अंक काढायला सुरूवात झाली. १९३२ पर्यंत बऱ्याचशा मासिकांनी दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. त्या पूर्वी मराठी मासिकांतून कादंबऱ्या क्रमश: प्रकाशित होत असत. मग त्या दिवाळी अंकांतून प्रकाशित होऊ लागल्या. कथा, कविता, कादंबऱ्या, व्यक्तिचित्रं, प्रवासवर्णन, आत्मचरित्र असं विविध प्रकारचं लेखन दिवाळी अंकांतून प्रकाशित होऊ लागलं. सुरुवातीला सर्व दिवाळी अंक साहित्यविषयक मजकूर प्राधान्यानं प्रकाशित करायचे. हळूहळू त्यात इतर विषयांचाही समावेश होऊ लागला.
दिवाळी अंकांनी साहित्याला काही प्रमाणात लोकाभिमुख करण्याचं काम केलं. इतकं की, मान्यवर लेखकांनाही दिवाळी अंक काढून पाहण्याचा वा ते संपादित करण्याचा मोह आवरला नाही.
दीनानाथ दलालांचा ‘दीपावली’, रॉय किणीकरांचा ‘गुलमोहोर’, राम शेवाळकरांचा ‘श्रीवत्स’, चंद्रकांत खोतांचा ‘अबकडइ’, शांता शेळके-अरुणा ढेरे यांचा ‘सेतुबंध’, विजय तेंडुलकरांचा ‘जाहीरनामा’, वसंत गोवारीकरांचा ‘अक्षर संक्रमण’, ग. का. रायकरांचा ‘श्री दीपलक्ष्मी’, श्री. पु. भागवत-राम पटवर्धन यांचा ‘मौज’, ग. वा. बेहेरेंचा ‘सोबत’, अनंत अंतरकरांचे ‘हंस’, ‘नवल’, ‘मोहिनी’, अशी कितीतरी नावं सांगता येतील. ना. सी. फडके आणि चंद्रकांत काकोडकर फक्त त्यांच्या लेखनाचेच अंक काढायचे. अशी अनेक उदाहरणं सांगता येण्यासारखी आहेत.
सर्व दिवाळी अंक दिवाळीच्या आगेमागे बाजारात येतात, पण दै. सामनाचा दिवाळी अंक मात्र दसऱ्यालाच बाजारात येतो. दिवाळी अंकांच्या आगमनाची नांदी ‘सामना’च्या अंकानं होते. दिवाळी अंकांसाठी मराठीतील झाडून सगळे लेखक जून-जुलैपासूनच लिहायला लागतात. एकेकाळी जयवंत दळवींसारखे लेखक एका वर्षी ४०-५० अंकांसाठी लिहायचे. आताही अनिल अवचट, ह. मो. मराठे, राजन खान, निरंजन घाटे, राजन गवस, रत्नाकर मतकरी, नंदिनी आत्मसिद्ध, मंगला गोडबोले, मुकुंद टाकसाळे, मधू मंगेश कर्णिक, शिरीष कणेकर, महेश केळुस्कर, सुबोध जावडेकर, अरुणा ढेरे, आशा बगे, बाळ फोंडके हे लेखक १५-२० अंकांसाठी लिहितात. भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, मिलिंद बोकील, विंदा करंदीकर, किरण नगरकर, नामदेव ढसाळ, विलास सारंग, मल्लिका अमरशेख, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, शफाअत खान, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, ग्रेस, रा. चिं. ढेरे यांपैकी काही लेखक दिवाळी अंकासाठी अजिबात लिहित नाहीत वा काही ठराविक अंकासाठीच लिहितात.
दैनिकं, साप्ताहिकं, पाक्षिकं, मासिकं, द्वैमासिकं, त्रैमासिकं, षण्मासिकं, अर्धवार्षिकं आणि वार्षिकं अशी सर्व नियतकालिकं दिवाळी अंक काढतात. मौज, श्रीदीपलक्ष्मी, हंस, दीपावली ही पूर्वीची साप्ताहिकं-मासिकं आता बंद पडली असली तरी आता त्यांचे दिवाळी अंक मात्र काढले जातात.
दिवाळी अंक ही पुढे वर्षभर मराठीत प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची एक प्रकारची रंगीत तालीम असते. मराठीत दरवर्षी जवळपास ५००० हजार पुस्तकं प्रकाशित होतात. म्हणजे महिन्याला किमान ४०० पुस्तकं प्रकाशित होतात, ती कमी-अधिक प्रमाणात विकलीही जातात. पण नोव्हें-डिसें महिन्यात मात्र फक्त दिवाळी अंकांचीच विक्री होते. आणि साधारणपणे ४००च्या आसपासच दिवाळी अंक प्रकाशित होतात. महाराष्ट्राबाहेर बडोदा, इंदूर, हैद्राबाद, कोलकाता, दिल्ली या ठिकाणांहूनही अंक प्रकाशित होतात. भारताबाहेरही काही दिवाळी अंक प्रकाशित होतात. लंडन, अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळं हे दिवाळी अंक काढतात....लंडन मंडळाच्या अंकाला तर २०हून अधिक वर्षं झाली आहेत. मुंबई-पुण्यातून एकूण दिवाळी अंकांच्या जवळपास ५० टक्के अंक प्रकाशित होतात.
साहित्य-विनोद-रहस्यकथा-कादंबऱ्या, भविष्य-ज्योतिष, पाकशास्त्र, आरोग्य, कामजीवन, प्रवास, अर्थ-व्यापार-उद्योग, शिक्षण, शेती-पर्यावरण, धार्मिक, महिला, वैचारिक, समाजकल्याण, बाल-कुमार, कायदा-सहकार अशा विविध विषयांवर दिवाळी अंक असतात. शतायुषी, ग्रहांकित, आवाज, छात्रप्रबोधन, किशोर, बाल-कुमार हे सर्वाधिक विकले जाणारे अंक आहेत.
मॅजेस्टिक बुक डेपो, मॅजेस्टिक एजन्सी, आयडिअल बुक डेपो, रसिक साहित्य, शब्द प्रकाशन या संस्था दिवाळी अंकांच्या वेगवेगळ्या योजना राबवतात. पुण्या-मुंबईतील अनेक ग्रंथालयं १००-१५० रूपयांत त्यांच्या वाचकांना सर्व दिवाळी अंक वाचण्यासाठी उपलब्ध करून देतात. त्याला नोव्हेंपासून मार्च-एप्रिलपर्यंत चांगला प्रतिसाद मिळतो. तोपर्यंत दिवाळी अंकांचं वाचन, त्यावरील चर्चा चालू राहतात. ....आणि जून-जुलैमध्ये नवीन दिवाळी अंकांचे वेध लागतात.
दिवाळी अंकांसाठी अनेक कंपन्या, बँका, साखर कारखाने,सरकारी प्रसिद्धी खातं विशिष्ट अशी रक्कम दरवर्षी जाहिरातींवर खर्च करतात. कासवछाप अगरबत्ती, महाराष्ट्र बँक, कॉसमॉस बँक, विको वज्रदंती, कॅम्लिन, कालनिर्णय, अशा अनेक कंपन्या २५ लाखांपर्यत जाहिराती दिवाळी अंकांना देतात. दीनानाथ दलाल जाहिरातींना ‘दिवाळी अंकांचा गॅस’ म्हणत. पण हल्ली बरेचसे अंक केवळ जाहिराती मिळतात म्हणूनही काढले जातात. वर्तमानपत्रांच्या दिवाली अंकांचा त्यात प्राधान्यायने समावेश होतो.
दिवाळी अंकांच्या निमित्तानं प्रिंटर, बाइंडर, प्रूफरिडर, कंपोझिटर, चित्रकार, ग्राफिक आर्टिस्ट, वेब डिझायनर, अनुवादक, वितरक, अशा अनेकांना रोजगार मिळतो. छापखाने तर पाच-सहा महिने अहोरात्र धडधडत राहतात.
दिवाळी अंकांची मुखपृष्ठ, रेखाटनं या कामात चंद्रमोहन कुलकर्णी, रविमुकुल, बाळ ठाकूर, षांताराम पवार, प्रशांत कुलकर्णी, वसंत सरवटे, सुभाष अवचट, धनंजय गोवर्धने, मंगेश तेंडुलकर, भ. मा. परसवाळे, सतीश भावसार, कमल शेडगे, असे चित्रकार आणि शि. द. फडणीस, मंगेश तेंडुलकर, प्रशांत कुलकर्णी असे व्यंगचित्रकार बिझी चित्रकार असतात.
मासिक मनोरंजनचा विनामूल्य अंक ते २५०-३०० रुपये किंमतीचा एक अंक असा दिवाळी अंकांच्या किमतींचा आलेख आहे. (काही वर्षांपूर्वी अभिधानंतरच्या अंकाची किंमत हेमंत दिवटे यांनी चक्क १० रूपये ठेवली होती. पण नंतर हा अंक ब्लॅकनं १०० रूपयांना विकला गेला आणि अनेकांनी तो विकतही घेतला.)
मात्र, गेल्या काही वर्षांतल्या दिवाळी अंकांवर नजर टाकल्यावर काय लक्षात येतं? अगदी स्पष्टपणे सांगायचं तर अलीकडच्या काही वर्षांमध्ये दिवाळी अंकांमध्ये प्रचंड साचलेपण आलं आहे. याची जाणीव काहींना आहेही; नाही असं नाही. वर्तमानपत्रांच्या दिवाळी अंकांत तर, जाहिरातींचंच नावीन्य दिसतं आणि मजकुराचा दर्जा त्यांच्या रविवार पुरवण्यांतील लेखांपेक्षा फार वेगळा नसतो. एखाद-दुसरा वाचनीय वा चांगला लेख, इतकंच त्यांच्या गुणवत्तेचं प्रमाण उरलं आहे.
एक मात्र खरं की, दिवाळी अंक काढण्यामागे अनेक उद्देश/हेतू असतात. त्यातही सुष्ट कमी, दुष्टच जास्त! मासिकांपुढे पर्याय नसतो. वर्षाच्या शेवटी वाचकांना काहीतरी भरगच्च द्यावंच लागतं. तो एक वाङ्मयीन परंपरेचा शिरस्ता झाला आहे. दैनिकं-साप्ताहिकं यांना जाहिरातींतून पैसा मिळतो. ज्योतिष, भविष्य, आरोग्य, वास्तुशास्त्र, पाककला ही लोकांची गरज असते. त्यामुळे याविषयांवरील अंक हमखास विकले जातात. दिवाळी अंक ही दोन-अडीच महिन्यांपुरती का होईना, पण काहींची ‘दुभती गाय’ झाली आहे. आपल्या हितसंबंधांचा वापर करून जाहिराती मिळवायच्या, मध्ये मध्ये मजकूर पेरायचा आणि दोन-चार लाखांची बेगमी करायची, असा ‘साइड बिझनेस’या काळात भलताच फोफावतो. हे अंक बाजारात कधीच येत नाहीत. ते थेट जाहिरातदारांकडे जातात अन् उरलेले रद्दीत! राजकीय हेतूपोटी निघणाऱ्या अंकांची संख्याही बऱ्यापैकी मोठी होत आहे. आता तर काळा पैसा ‘पांढरा’करण्यासाठीही दिवाळी अंकांचा वापर होऊ लागला आहे, अशी कुजबूज कानावर येते. थोडक्यात काय तर परंपरा, अपरिहार्यता, स्पर्धा, चढाओढ, अहमहमिका आणि उद्दिष्टपूर्ती अशा काही कारणांवर दिवाळी अंकांचा डोलारा दरवर्षी उभा राहतो आहे.
त्यामुळे दिवाळी अंकांची अवस्था केविलवाणी झाली आहे. ही स्थिती सुधारायला हवी हे तर खरंच! पण ते होणार कसं?
दिवाळी अंकांच्या परंपरेला यंदा १०८ वर्षं झाली. शतक पार केलेल्या दिवाळी अंकांचा इतिहास कुणाला जाणून घ्यायचा झाला तर त्याविषयी मराठीमध्ये किती पुस्तकं उपलब्ध आहेत? जून २०१२पर्यंत जवळपास एकही पुस्तक उपलब्ध नव्हतं. या वर्षी अनिल बळेल यांचं ‘दिवाळी अंक – नाबाद शंभर’ हे छोटंसं पुस्तक प्रकाशित झालं. ते बहुधा दिवाळी अंकांविषयीचं मराठीतलं एकमेव पुस्तक असावं. २००८ साली दिवाळी अंकांना १०० वर्षं पूर्ण झाली त्यानिमित्ताने त्यांनी वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये लिहिलेल्या १४ लेखांचा हा संग्रह आहे. यात दिवाळी अंकांचा पद्धतशीर, सूत्रबद्ध आढावा घेतलेला आहे असं नाही, पण दिवाळी अंकांचे काही महत्त्वाचे टप्पे सांगत अनेक दिवाळी अंकांच्या आठवणी सांगितल्या आहेत. दिवाळी अंकांच्या पार्श्वभूमीवर ‘ललित’ या मासिकात ‘यंदाच्या दिवाळी अंकांत काय वाचाल?’ असा दिवाळी अंकांचा ट्रेलर दाखवणारा लेख बळेल तीसेक वर्षं लिहीत होते. (अलीकडच्या काळात हा लेख रविप्रकाश कुलकर्णी लिहितात.) त्यामुळे त्यांच्याकडे अनेक दिवाळी अंकांच्या आठवणी होत्या. त्यातून हे पुस्तक आकाराला आलं आहे. पण यापलीकडे दिवाळी अंकांच्या परंपरेचा सविस्तर अभ्यास इतर कुणीही केलेला नाही.
‘मराठीमध्ये दिवाळी अंकांची अतिशय समृद्ध परंपरा आहे’, ‘इतर कुठल्याही भारतीय भाषेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर दिवाळी अंक प्रकाशित होत नाहीत,’ असे दाखले दिले जातात. पण त्या परंपरेची सध्याची अवस्था मात्र कशी आहे, याचं वस्तुनिष्ठ चित्रण कुणीही करत नाही. निदान दरवर्षी नेमके किती दिवाळी अंक प्रकाशित होतात, त्यात यंदा नवे कुठले आले, जुने कुठले गळाले याची विश्वसनीय आकडेवारीही मिळण्याचीही सोय इतक्या वर्षांत होऊ शकलेली नाही. तिथं इतर गोष्टींबद्दल न बोललेलंच बरं!
कवी दासू वैद्य यांची ‘पोयट मिलेनियमचं गाणं लिवतो तव्हा…’ या नावाची एक कविता आहे. या कवितेत ते शेवटी म्हणतात –
‘…संस्कृती म्हातारी झाली म्हणून
तिला खाटकाला इकणार का?
बसू दे बिचारीला कोपऱ्यात
लई दिवसाची सोबती नाही
कव्हा-बव्हा चापाणी देत जा तिला’.
परंपरा हे संस्कृतीचं बायप्रॉडक्ट असतं. त्यामुळे संस्कृती धोक्यात येऊ लागली की, त्याचा उपसर्ग परंपरेला होतच असतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीची हल्ली वैद्य म्हणतात तशी काहीशी अवस्था झाली आहे. परिणामी दिवाळी अंकांच्या परंपरेचीही.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ashok Thorat
Thu , 03 November 2016
मी अमरावती विद्यापीठात एका विद्यार्थिनीला * अबकडइ दिवाळी अंकाचे वाङमयीन कार्य * असा विषय दिला आहे . तिचे काम प्रगती पथावर आहे .