अजूनकाही
‘पळशीकरांच्या निमित्ताने... एक टीजर’ हा लघुपट बघायचा म्हणून पहिला टीजरचा डिक्शनरीतला अर्थ शोधून काढला. डिक्शनरी सांगते की, नवीन उत्पादनांविषयी लोकांची उत्सुकता वाढवण्याकरता प्रसिद्ध केलेली जाहिरात. माझ्या माहितीप्रमाणे हे जे टीजर असतात, ते १५ सेकंदापासून जास्तीत जास्त तीन मिनिटांपर्यंत असतात.
इथं हा दिग्दर्शक दीड तासाचा टीजर बनवतोय? काय करतोय काय हा माणूस? लोकांना बोअर करणार की काय? असे प्रश्न डोक्यात पटापट उगवणं नैसर्गिक आहे. आपल्यापैकी कोणाच्याही डोक्यात येतील ते.
पण हे प्रकरण झटपट प्रश्न विचारण्यासारखं सोपं नाही. आपण जरा याची पार्श्वभूमी बघू. वसंत पळशीकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत होते. त्यांनी साहित्य, समाजकारण, राजकारण, अर्थशास्त्र, धर्म, परंपरा, पर्यावरण आदी अनेक विषयांवर रूढ चौकटीत न मावणारं सखोल लिखाण केलं. परखड चिकित्सा करतानाही त्यांनी सहृदयता कायम ठेवली. आपल्याला सर्वांमध्येच परिवर्तन करायचं असल्यानं संवादाचे आणि चर्चेचे मार्ग कायम मोकळे ठेवले. त्यांच्या प्रदीर्घ लेखांची संख्या सुमारे सातशेच्या आसपास आहे. त्याचबरोबर अंदाजे चाळीस वर्षं त्यांनी महाराष्ट्र आणि देशातील विविध ठिकाणच्या समाज कार्यकर्त्यांचं वैचारिक पोषण करण्याचं मोठं काम केलं. नुकतंच काही महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं.
अशा या आवाक्यात न मावणाऱ्या माणसावर लघुपट बनवण्याचं आव्हान समीर शिपूरकरने उचललं, याचं कारण पळशीकर यांच्या विचारांचं त्याला पटलेलं महत्त्व. आज ते विचार कसे पोचवायचे, हा प्रश्न त्याला पडला असणारच...
समीर शिपूरकरने सुरुवातीला दोन कामं केली. पळशीकरांचं लेख गोळा करून वाचलं आणि स्कॅन केलं. त्यांच्या विचाराचा गगनाला गवसणी घालणारा आवाका लक्षात आला आणि आता हे मांडायलाच हवं असं त्याच्या मनानं घेतलं. स्कॅन केलेले साडेचारशे लेख हे एक वेगळंच प्रकरण आहे. तो झाला या लघुपटाचा तिसरा भाग. (यातील काही लेख वाचण्यासाठी पहा - http://www.arvindguptatoys.com/)
यातून समीर शिपूरकरची कोंडी नक्कीच वाढली. मग त्यानं पळशीकरांचं विचारदर्शन मांडणाऱ्या मुलाखती घेतल्या. महाराष्ट्र आणि देशातील दिग्गज विचारवंतांच्या सविस्तर मुलाखाती झाल्या. हा झाला या लघुपटाचा दुसरा भाग.
हे सगळं झालं तरी शिपूरकरांचा अस्वस्थपणा संपेना. त्याची मानसिक घुसमट वाढत गेली. मला जे प्रश्न सतावत आहेत, डोक्याला धक्के देत आहेत, त्या त्रासातून माझ्या डोक्यातल्या प्रश्नांची व्याप्ती माझ्या व्यक्तीगत पातळीपासून समाजापर्यंत भिडते. या प्रश्नांतून माझ्या परंपरागत धारणांना तडे जात आहेत. नव्या संकल्पना स्वीकारायला धाडस करायला लागत आहे. हे सर्व पळशीकरांचे लेख वाचून होत आहे, हा अनुभव मला येत आहे. ते सर्व मी आता सर्जकतेनं दृकश्राव्य माध्यमातून कसं मांडू ही खरी घुसमट आहे. या सगळ्या प्रचंड घुसळणीतून निर्माण झाला हा टीजर.
टीजरच्या सुरुवातीला एक गोष्ट सुरू होते. काय चाललंय हे सगळं असं आपण खळबळलेल्या डोक्यानं त्रासिकपणे बोलतो. पण हळूहळू डोकं शांत होत जातं आणि आपण स्वस्थपणे पुढचं बघायला तयार होतो. त्यानंतर वसंत पळशीकर, त्यांचं लिखाण आणि त्यांची विचार मांडण्याची पद्धती याबद्दल थोडक्यात माहिती देण्यात येते. नंतर सुरू होते पळशीकरांच्या विचारावर आधारित वेगवेगळ्या गोष्टींची मालिका. आपल्याच आसपासच्या जगण्यातल्या, राष्ट्रीय प्रश्नांच्या, भाषेच्या, देशाभिमानाच्या, शहरांच्या या गोष्टी रंजक आहेत, काळजाला चिरणाऱ्या आहेत, भयानक वास्तव उघडं करणाऱ्या आहेत.
या गोष्टींची भाषा आजची आहे. फेसबुक, व्हॉटसअप, स्मायलींची. केबीसीच्या प्रश्नांची. रेडिओ जॉकी मधाळ गोड भाषेत बोलते, तर प्रसन्न झालेली भारतमाता राष्ट्रवादाची चर्चा करते. असं खूप काही सोप्या भाषेतून होतं. कुठल्याही वैचारिक बाजाशिवाय. गोष्टींतून तुम्ही प्रश्नांपर्यंत कधी पोचता ते समजत नाही. हे सगळे प्रश्न तुमच्या डोक्यातल्या संकल्पनांबद्दल पुन्हा एकदा विचार करायला लावतात. शेवटी समीर शिपूरकर त्याच्या मनातली घुसमट तुमच्या डोक्यात सोडतो. तुम्ही अस्वस्थ होता. थोडक्यात, तुम्ही पळशीकर वाचावेत याची मशागत करायचं काम समीर शिपूरकर करतो.
अरे हो, पण या लघुपटामध्ये लोक कुठे दिसत नाहीत, भरपूर दृश्यं नाहीत, मग ही फिल्म कसली यार? प्रश्न बरोबर आहे, पण कशाला हवेत सारखे लोक आणि दृश्यं. किती ताण द्यायचा डोळ्यांना? डोक्याला स्थिरता देऊन तजेला आणायला जेवढी आवश्यक असतील, तेवढीच मोजकी दृश्यं आहेत. गोष्टी सांगणारा बोलत असतो. त्याच्या सोबत काही आकृत्या आणि चित्र दिसतात आपल्याला. नेमकी आणि पुरेशी दृश्यात्मकता हे या लघुपटाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. ही दृश्यात्मकता तुम्हाला शांततेचा अनुभव देते. विचाराला प्रवृत्त करते. त्याच वेळी डोक्यातल्या प्रगती आणि समृद्धीच्या गोड गुळगुळीत पाटीवर प्रश्नांचे चरे उमटतात.
हा तासाभराचा टीजर लघुपट चांगला की वाईट, कॅमेरा, ध्वनी कसा वापरलाय, शॉट्स कसे घेतलेत वगैरेपेक्षा खूप वेगळा आहे. सोप्या, रसाळ शैलीत सर्जकतेनं विचारवंताच्या विचारांची ओळख करून देतानाच प्रेक्षकाला वास्तवाबाबत भानावर कसं आणावं याचा हा वस्तुपाठ आहे.
आपण संवेदनाशील आहात, आसपास घडणारं नीट उघड्या डोळ्यांनी बघत आहात. अस्वस्थ आहात. मात्र तुम्हाला या सगळ्याचं भावनेच्या आहारी न जाता योग्य विश्लेषण करायचं असेल, जग अधिकाधिक समग्र भावनेनं समजून घेत प्रगल्भ व्हायचं असेल तर या कामात समीर शिपूरकर दिग्दर्शित ‘पळशीकरांच्या निमित्ताने... एक टीजर’ तुम्हाला नक्कीच मदत करेल.
लेखक कथाकार आहेत.
vtambe@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment