ज्याला नाही कोणी, त्याला विखे पाटलांची लोणी
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • विठ्ठलराव, बाळासाहेब, राधाकृष्ण आणि सुजय विखे पाटील
  • Wed , 12 July 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar विठ्ठलराव विखे पाटील Vithalrao Vikhe Patil बाळासाहेब विखे पाटील Balasaheb Vikhe Patil राधाकृष्ण विखे पाटील Radhakrishna Vikhe Patil सुजय विखे पाटील Sujay Vikhe Patil

शिर्डी (जि. अहमदनगर) येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची गोडीगुलाबी जाहीर झाली. त्यानंतर विखे भारतीय जनता पक्षात जातील याविषयी चर्चा, तर्क-वितर्क, विश्लेषणं आणि कुचाळक्या यांचं पेव फुटलं. सोशल मीडियावर तर भाजप समर्थकांकडून ‘से नो विखे’ इथपर्यंत कॉमेंटबाजी झाली. खुद्द काँग्रेस समर्थकांनी विखे यांच्यावर टीकेची झोड उठवली. विखे पाटील यांनी ‘मी काँग्रेस पक्षात खुश असून भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही,’ असं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. आणि भाजपकडूनही अशा चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न झाला.

विखे भाजपमध्ये जातील की नाही? मग काँग्रेसचं काय होईल? अहमदनगर जिल्ह्यातल्या राजकारणात काय उलथापालथ होईल? याविषयी घनघोर चर्चांचं वादळ उठलं असताना खुद्द विखे पाटील मनातल्या मनात खुदुखुदु हसत असतील. विखे पाटलांच्या राजकारणाचा पॅटर्न ज्यांना माहीत आहे, त्यांनाही या गोष्टीचं काही विशेष वाटणार नाही.

महाराष्ट्रात ज्या राजकीय घराण्यांनी, नेत्यांनी राजकारणाची स्वत:ची खास शैली निर्माण केली, त्यात विखे पाटील यांचं घराणं महत्त्वाचं मानलं जातं. या राजकारणाच्या शैलीला किंवा पॅटर्नला ‘लोणी पॅटर्न’ म्हटलं जातं. अशीच राजकारणाची वेगळी शैली शरद पवार यांच्या घराण्याने निर्माण केली. त्याला ‘बारामती पॅटर्न’ म्हणता येईल.

‘लोणी पॅटर्न’ला ‘बारामती पॅटर्न’पेक्षा जुनी पार्श्वभूमी आहे किंवा ‘बारामती पॅटर्न’ हा ‘लोणी पॅटर्न’मधूनच विकसित झालेला आहे, असंही म्हणता येईल.

‘लोणी पॅटर्न’ची सुरुवात राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी केली. आशिया खंडातला पहिला शेतकरी सहकारी साखर कारखाना लोणीमध्ये सुरू झाला. त्यात पुण्याचे धनंजयराव गाडगीळ आणि विठ्ठलराव विखे पाटील यांनी पुढाकार घेतला होता. विठ्ठलराव हे लोणी गावचे पाटील. ते उत्तम कार्यकर्ते आणि संघटकही. धोतर, पागोटे आणि बंडी असा त्यांचा पोशाख. शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाऱ्यांमध्ये उठबस. अवघी चौथीच शिकलेले, पण व्यवहारज्ञान बख्खळ. चतुराई पुष्कळ. गावकीतल्या शहाणपणाच्या जोरावर ते सहकारी चळवळीचे नेते बनले. कारखाना कसा चालवावा याचे धडे त्यांच्याकडून इतर शेतकरी नेत्यांनी घेतले. त्यांचं बघून महाराष्ट्रात इतर सहकारी साखर कारखाने सुरू झाले. वाटचाल करू लागले.

आतापर्यंत महाराष्ट्राचा ग्रामीण भाग तीन महत्त्वाच्या गोष्टींनी बदललाय. त्यात शेतीत झालेली हरित क्रांती, गावागावात झालेली सहकारी संस्थांची उभारणी, दुधाच्या उत्पादनाची धवल क्रांती हे महत्त्वाचे टप्पे मानता येतील. त्यातली सहकारी चळवळीतल्या साखर कारखान्यांची भूमिका क्रांतिकारक आहे. साखर कारखान्यांभोवतीच्या परिसरात कशी कृषी औद्योगिक क्रांती होते, त्यातून शिक्षण, आरोग्य आणि लोकांचं जीवनमान कसं उंचावतं याची उदाहरणं लोणी, बारामती इथं जाऊन अभ्यासली पाहिजेत.

विजय तेंडुलकरांच्या ‘सामना’ चित्रपटात निळू फुले यांनी रंगवलेला साखर सम्राट आणि डॉ. श्रीराम लागूंचा भाबडा, आदर्शवादी शिक्षक हे दोन्ही नगर जिल्ह्यातलेच. तेंडुलकरांचा साखर सम्राट हा अपवाद म्हणता येईल. पण विठ्ठलरावांकडे बघून या जिल्ह्यात भाऊसाहेब थोरात, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे अशी कर्तबगार शेतकरी नेते पुढे आले. या नेत्यांच्या राजकारणावर ‘लोणी पॅटर्न’ची छाप दिसते. ‘लोणी पॅटर्न’ छाप राजकारणाची शैली खरी विकसित केली ती विठ्ठलरावांचे सुपुत्र आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांनी. टोपी, शर्ट, पायजमा. तिन्ही पांढरे. गळ्यात मफलर. दाढीचे खुंट वाढलेले. अंतर्बाह्य गावातल्या माणसासारखं व्यक्तिमत्त्व. लोणी ते दिल्ली कुठेही जावो, भाषा गावरान बोलणार. त्यांनी प्रवरा साखर कारखाना फुलवला. खासदार म्हणून त्यांची कारकीर्द बहरली. त्याचा फायदा करून घेऊन त्यांनी लोणीत प्रवरा मेडिकल ट्रस्ट उभारला. या दवाखान्यात दररोज हजारो सामान्य माणसं मोफत उपचार घेतात. मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, इतर उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम, बँका, शिक्षणसंस्था, विविध सहकारी संस्था यांचं जाळं उभारून बाळासाहेबांनी जिल्ह्यात गावोगाव स्वत:चे समर्थक निर्माण केले. ते होते काँग्रेस पक्षात. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना लोक काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणत नसत. त्यांचा उल्लेख ‘विखे समर्थक’ असाच केला जाई.

‘लोणी पॅटर्न’च्या राजकारणाला पक्ष, पार्टी, झेंडा, विशिष्ट विचार यांचं वावडं असावं. कारण बाळासाहेब विखे शिवसेनेत गेले. केंद्रात अर्थराज्यमंत्री झाले. राज्यात राधाकृष्ण विखे कृषीमंत्री झाले. पण लोणी, राहता, शिर्डी या विखे पाटलांच्या प्रभाव क्षेत्रात ना सेनेचा भगवा झेंडा कुठे दिसला, ना मराठी माणसाच्या हक्कासाठी अशी पाटी कुणी पाहिली. ना सेनेच्या डरकाळ्या फोडणाऱ्या वाघाचं चित्र कुणी लावलं. राज्यातून युती शासन हटलं. विखे घराणं पुन्हा काँग्रेसमध्ये वापस आलं.

तेव्हाही अनेकांना विखेंच्या या पक्षबदलाचं आश्चर्य वाटलं होतं, पण बाळासाहेब बोलण्यात मोठे चतुर. ते म्हणत – ‘आपलं राजकारण विकासाचं. यात पार्टीबाजीला फार महत्त्व नको.’ बाळासाहेब बोलण्यात खूप परखड. सतत लोकांच्या बाजूनं राहणं हे त्यांचं वैशिष्ट्य. अण्णा हजारे आणि त्यांची खास मैत्री. अण्णांवर दिल्लीतल्या काँग्रेस पुढाऱ्यांनी टोकाची टीका केली. ऐन भ्रष्टाचार विरोधी आंदोलन उंचीवर असताना हे घडलं. बाळासाहेब पक्षनेतृत्वाविरुद्ध भडकले. म्हणाले, ‘या काँग्रेसवाल्यांना अकला नाहीत. अण्णा हे लोकांच्या मनातलं बोलणारे. ते ओळखून काही करा. अन्यथा काँग्रेसचं काही खरं नाही.’

या बाळासाहेबांनी शरद पवारांना कधी जुमानलं नाही. पवार विरोधाची पुरेपूर किंमत त्यांनी मोजली. पण विरोध म्हणजे विरोध. पवारांनी जंग जंग पछाडून बाळासाहेबांचं राजकारण उखडून टाकायचा प्रयत्न केला. पण ते जमलं नाही. महाराष्ट्रातल्या साऱ्या काँग्रेसवाल्यांनी पवारांशी सलगी केली, पण बाळासाहेबांनी नाही. बाळासाहेब खाजगीत बोलत, ‘शरद पवारांचे मोठे भाऊ माझ्या कारखान्यात कामाला होते. शरद पवार माझ्या गावात शाळा शिकले.’ पवार घराण्यांची असं ‘लोणी कनेक्शन’ आहे.

लोणी विरुद्ध बारामती असे राजकारणातले संघर्ष अनेकदा भडकले, पण बाळासाहेबांचा तोरा शेवटपर्यंत ठाम राहिला. त्यांची आपला समर्थक घडवण्याची खुबी त्यांच्या खास व्यक्तिमत्त्वातून आली होती. गावातले नवनवे कार्यकर्ते ते हेरत. एखाद्याला म्हणत – ‘ए पोरा, काय करतोस? जर्सी गाय घे एखादी, डेरीला दूध घाल. बँकेचं कर्ज देतो तुला. उनाडक्या काय करतोस?’ पोराच्या बापाला आनंद होई. कर्ज मिळे. दुभती जर्सी गाय दारात येई. पोरगं मोटार सायकलवर सकाळी डेरीत दूध घाली. दर महिन्याला घरात पैसे येऊ लागत. घरात अच्छे दिन येत आणि पोरगं विखेंचा समर्थक कसं होई याचं त्याचं त्यालाही कळत नसे. साखर कारखाना, शैक्षणिक संस्था, आरोग्य केंद्र, सहकारी संस्था, बँका यांच्या उभारणीच्या प्रक्रियेत अशी लाखो माणसं लोणी परिसरात विखेंनी उभी केली. त्यातून या परिसरात ‘ज्याला नाही कोणी, त्याला विखे पाटलांची लोणी’ ही म्हण उदयाला आली.

लोणीत माणसला रोजगार मिळतो, स्वत:च्या पायावर उभं राहता येतं, अशी अर्थसाखळी तयार झाली. त्यातून ही व्यवहारी म्हण तयार झाली असावी. या साखळीच्या जोरावर लोणी ग्रामपंचायतीपासून नगर जिल्हा परिषदेवर विखेंची सत्ताबाजी चालत आहे.

सत्ता ताब्यात ठेवणं, त्यातून लोकांच्या स्वार्थाचं नियोजन करणं, अशा चक्रामुळे विखे पाटलांचं राजकारण पुढे जात राहिलं. या चक्रामुळे अहमदनगर जिल्ह्यात गावोगाव विखे समर्थक तयार झाले. बाळासाहेबांनंतर राधाकृष्ण त्या चक्रावर स्वार झाले. आता त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे या चक्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत.

लोकांची गरज ओळखण्याचं चतुरपण हे या राजकीय नेत्यांचं कसब. ती गरज सत्तेतून पूर्ण करता येते, म्हणून सत्तेवर मांड ठोकायची. राधाकृष्ण हे ज्या राहता तालुक्याचे आमदार आहेत, त्या तालुक्यात लोणी, राहता, शिर्डी ही तीन शहरं विकसित होताहेत. शिर्डीला साईबाबांच्या स्मृतिशताब्दी सोहळा या वर्षी होतोय. केंद्र, राज्याची हजारो कोटी रुपयांची मदत येतेय. शिर्डीत विमानतळ होतंय. या परिसराच्या पाण्याच्या प्रश्न निळवंडे धरण, चाऱ्या, कॅनॉल झाले तर मार्गी लागेल. यासाठी शिर्डी संस्थानने ५०० कोटींची मदत दिलीय. त्यासाठी फडणवीसांनी रदबदली केलीय.

फडणवीसांची मदत, शिर्डी-लोणी परिसराची अर्थसाखळी लाभदायी होणं, याचं मोल राधाकृष्ण विखे यांना जास्तच कळतं. म्हणून ते म्हणाले की, ‘मला भाजप सरकारचे मंत्री घरच्यासारखे वाटतात. भाजपच्या मंचावर घरी आल्यासारखं वाटतं.’ यात उद्या काय घडेल यापेक्षा आज आपला फायदा काय झाला, हे शहाणपण जमेस धरून विखे पाटील बोलले. त्यांचं हे बोलणं, वागणं राजकारणाच्या ‘लोणी पॅटर्न’ला धरूनच आहे!

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......