मी नरहर कुरुंदकरांकडे कसं पाहतो! (उत्तरार्ध)
संकीर्ण - श्रद्धांजली
पंकज घाटे
  • नरहर कुरुंदकर आणि त्यांची काही पुस्तकं
  • Wed , 12 July 2017
  • संकीर्ण श्रद्धांजली नरहर कुरुंदकर Narhar Kurundkar लोकशाही Democracy हुकूमशाही Authoritarian फॅसिझम Fascism

ज्यांना पुरेशा गांभीर्याने ‘विचारवंत’ हे विशेषण लावता येईल असे महाराष्ट्रातील लेखक म्हणजे नरहर कुरुंदकर. १५ जुलै हा कुुरुंदकरांचा जन्मदिन. त्यांच्या निधनाला १० फेब्रुवारी रोजी ३५ वर्षं झाली. त्यानिमित्तानं कुरुंदकरांकडे कसं पाहावं, आजच्या परिस्थितीत कुरुंदकर कसे आणि किती समकालीन ठरतात, याचा उहापोह करणारा हा दोन भागांतला लेख. काल पहिला भाग प्रकाशित झाला होता. आज हा दुसरा भाग.

.............................................................................................................................................

इतिहास विषयात बी.ए. करण्याचे ठरवल्यावर साधारण भारताचा प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक असा दीड-दोन हजार वर्षांचा इतिहास; युरोप आणि महाराष्ट्राचा विशेषतः आधुनिक काळ अभ्यासक्रमात अभ्यासावा लागला. मध्ययुगीन भारत विशेषतः मराठ्यांचा इतिहासाचा एक पेपर तिसऱ्या वर्षी आणि एम.ए.ला मला होता. मराठीत या विषयावर मोठी अभ्यासाची परंपरा ब्रिटिश काळापासून सुरू असल्यामुळे पुस्तकांना तोटा नव्हता. रियासतकार सरदेसाई, वि. का. राजवाडे यांची ‘राधामाधवविलासचंपू’साठी लिहिलेली प्रस्तावना, मराठेशाहीची मूलगामी मीमांसा करणारे माझे आवडते इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर, ज्यांचा ‘औरंगजेब’ मराठीतून वाचला ते सर जदुनाथ सरकार,  ‘Rise of the Maratha Power’ हे महादेव गोविंद रानड्यांचे पुस्तक, ‘मराठे व इंग्रज’ या पुस्तकाला वासुदेवशास्त्री खरे यांनी लिहिलेली प्रस्तावना यांतून मला दक्खन आणि सतरावे-अठरावे शतक समजून घेता आले. कुरुंदकरांचे या काळासंबंधीचे आकलन मुख्यतः ‘श्रीमान योगी’ला लिहिलेली प्रस्तावना, ‘मागोवा’मध्ये शेजवलकरांना वाहिलेली श्रद्धांजली आणि वा. सी. बेंद्रे यांच्या छत्रपती संभाजीवरील ‘बेंद्रे यांचा संभाजी’ हा लेख आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज जीवन – रहस्य’ ही छोटेखानी पुस्तिका यांतून समजते. इतिहास विषयाला जन्मभर वाहून घेणाऱ्या वर उल्लेख केलेल्या व्यक्तींविषयी कुरुंदकरांना मोठी आस्था होती. डोळस श्रद्धा ठेवून त्यांनी या सर्वांच्या ग्रंथांचे परिशीलन केले होते. कुरुंदकर आणि हे इतिहासकार यांची तुलना होऊ शकत नाही. कुरुंदकरांची भूमिका अभ्यासकाची होती; इतिहासकाराची नव्हती. मराठेशाहीच्या माझ्या आकलनात उलट विचार करून इतिहासकाराची चिकित्सा कशा प्रकारे करावी, तो इतिहासकाळ नेमका कसा होता ते कसे उलगडावे, इतिहास घडवणारे महापुरुष आणि त्यांचे इतिहासातील स्थान यांचा विचार कसा करता येईल हा वस्तुपाठ मला कुरुंदकरांच्या लिखाणात मिळाला.

कुरुंदकर लिहितात, “आमचे विचारवंत एक तर शिवाजीला हिंदू महासभेचा सभासद करून प्रत्येक मुसलमानाचा द्वेष करावयास लावतात किंवा त्याच्या माथ्यावर आधुनिक ‘सेक्युलरिझम’ लादतात. छत्रपतींच्या थोरवीला सतराव्या शतकातील हिंदू मनाची मर्यादा होती, हे शेजवलकर कधी विसरले नाहीत. हा त्यांचा इतिहासाशी असणारा प्रामाणिकपणा मला स्तुत्य वाटतो.” इतिहासकार शेजवलकरांची रियासतकार सरदेसाई यांच्या ‘नानासाहेब पेशवे’ या ग्रंथाची भिन्न मत असणारी आणि ‘ग्रंथकारापेक्षा जरा जास्त उंचीवर चढून व जरा खोल बुडी मारून मराठ्यांच्या इतिहासाचा पट डोळ्यासमोर आणणे आणि त्याचा ठाव घेणे’ हा उद्देश मनात ठेवून लिहिलेली छत्तीस पानी प्रस्तावना तसेच ‘श्रीशिवछत्रपती’ या दुर्दैवाने अपुऱ्या राहिलेल्या संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना मराठेशाहीची नवीन संगती, नवे दर्शन अचानकपणे भूतकाळाचा जबडा उघडून विजेप्रमाणे घडवते. त्या प्रज्ञावंत इतिहासकाराविषयी कुरुंदकरांनी खऱ्या जिज्ञासूला अशा प्रज्ञावंतांचा आदर वाटला पाहिजे, असे लिहिले आहे. विसाव्या शतकात राहून सतराव्या शतकाची पार्श्वभूमी असलेल्या छत्रपती शिवाजींवर आम्ही आजच्या कल्पना लादून ऐतिहासिक सत्याचा विपर्यास करतो. हे असे लादण्यामुळे शिवाजी मोठा होणार नसतो. त्यांचे महत्त्व त्या काळाच्या चौकटीतच राहून तपासण्याची दृष्टी मला या सर्व वाचनातून मिळाली. मला तो पट उलगडून दाखवणाऱ्या इतिहासकाराविषयी आणि त्याच्या पुढील पिढीत असलेल्या या विचक्षण अभ्यासकाविषयीही मोठा आदर आहे. मराठी लोकांचे या काळाविषयी किंवा मराठेशाहीविषयी असणारे आकलन वर उल्लेख केलेल्यांपेक्षा – एखादा अपवाद सोडल्यास - एक इंचभरही पुढे गेलेले नाही.

कुरुंदकरांच्या अभ्यासाचा एक विषय म्हणजे महाभारत. महाभारत माझ्या अभ्यासाचा विषय नाही; पण आवडीचा जरूर आहे. या विषयावर कुरुंदकरांनी एखादे सलग पुस्तक लिहिलेले नाही. काही लेख, पुस्तक परीक्षणे यांचा संग्रह ‘व्यासांचे शिल्प’ नावाने देशमुख आणि कंपनीने प्रसिद्ध केला आहे. खरं तर कुरुंदकर हे नाव मी ‘महाभारत – एक सूडाचा प्रवास’ या दाजी पणशीकर यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच पहिल्यांदा वाचले होते. बुद्धिनिष्ठ आणि श्रद्धानिष्ठ अभ्यासातून महाभारताकडे इतर अभ्यासकांनी कसे पाहिले हे वाचण्यासाठी ‘व्यासांचे शिल्प’ हे पुस्तक उपयोगी आहे. कुरुंदकर लिहितात, ‘हे महाभारत वाचावे तरी कसे? मी ते इतिहास शोधण्यासाठीही वाचतो, संस्कृतीची रूपे व विविधता शोधण्यासाठीही वाचतो, संस्कृतीची परिवर्तने शोधण्यासाठीही वाचतो; मला फक्त धर्मश्रद्धेने अजून महाभारत वाचणे जमले नाही. पण कोट्यवधी भारतीय हा ग्रंथ श्रद्धेने वाचतात, तेव्हा याही भूमिकेवरून होणारा अभ्यास मी वर्ज्य मानू इच्छित नाही.’ ऐतिहासिक चिकित्सेची भूमिका समोर ठेवून महाभारताकडे पाहणारे कुरुंदकर आणि परंपरागत विद्या परंपरेचा अभ्यास ज्या पद्धतीने करते ती पद्धत वापरणारे दाजी पणशीकर महाभारताचे आपले आकलन नक्कीच वाढवू पाहतात. या दोघांचे म्हणणे आपल्याला पटावे अशी दोघांची अपेक्षा नाही; चिकित्सा हाच याचा प्राण आहे.

महाभारतातील शंभर गोष्टी आणि तीन-चारशे पानांचं रामायण ही माझ्या लहानपणीची आवडती पुस्तकं! त्यानंतर दुर्गा भागवत यांचं ‘व्यासपर्व’, इरावती कर्वे यांचं ‘युगान्त’ ही महाभारतावरील पुस्तकं वाचली. या पुस्तकाचं आणि ‘व्यासांचे शिल्प’ या पुस्तकाचंही असं असतं की, ही पुस्तकं एकाच बैठकीत वाचून संपली आणि तुम्हाला पूर्ण समजली असं होत नाही. महाभारतातील मला आवडणारी व्यक्तिरेखा भीष्म. ‘भीष्म – एक चिंतन’ या लेखातून त्या व्यक्तिरेखेकडे कसे पाहावे याचा वस्तुपाठ मिळतो. तो शोकात्म नायक नाही; जवळपास महाभारताच्या संघर्षात सर्वांत दुर्दैवी व्यक्ती म्हणून तो आपल्या समोर येतो; अगदी आरंभापासून युद्ध संपेपर्यंत तो जिवंत असतो. कुरुंदकर यांचा महाभारताकडे पाहण्याचा चिकित्सक दृष्टिकोन पूर्णपणे योग्य वाटतो असे नाही. त्यांनी महाभारताच्या आर्थिक बाजूकडे फारसे लक्ष दिलेले नाही. त्यांचा मुख्य भर हा ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक, तात्त्विक आणि नैतिक बाजूंवर राहिला आहे.

महाभारतातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा म्हणजे कर्ण. शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’मधील कर्णासंबंधीचे विचार अनेकदा आमच्या मित्रांमधल्या वादाचे कारण होत असत. मला ती ऐतिहासिक कादंबरी फारशी आवडली नाही. मूळ महाभारत संपूर्ण न वाचताही माझी ती प्रतिक्रिया असे. ती कादंबरी नंतर मी मोठ्या नेटाने वाचून पूर्ण केली होती. कर्णाला मोठा करण्यासाठी इतर पात्रांना उगाच वेठीला धरले आहे असे वाचताना कायम जाणवत होते. कर्ण दुर्दैवी असेल (भीष्माइतका नक्कीच नाही!), त्याच्यावर अन्याय झाला असेल, तो दानशूरही असेल पण कर्ण हा काही महाभारताचा मुख्य वर्ण्य विषय नव्हे तसेच तो त्या शोकनाट्याचा नायकही नाही. ते एक उपकथानक आहे. आधुनिक मूल्ये भूतकाळात शोधण्याची धडपड, न्याय-अन्यायाच्या आधुनिक कल्पना, नीतिकल्पना, इत्यादी समोर ठेवून आपल्याला हवा तसा कर्ण उभा करणे समर्थनीय नाही हा माझा विचार होता. कुरुंदकरांच्या लिखाणात मला याचे नेमके स्पष्टीकरण मिळाले. (व्यासांचे शिल्प पृ. २०१-२१२)

कुरुंदकर यांचे लेखन जसजसे आपण वाचत जातो तसे विचार करायला विषय मिळत जातात. मनुस्मृती, ब्राह्मणी वर्चस्वाचे स्वरूप आणि हिंदू समाजाची टिकून राहण्याची वृत्ती या विषयांवर सध्या वाचन करण्याचा संकल्प आहे. मी मनुस्मृती वाचली ती मूळ संहिता वाचावी म्हणून! अनेकदा वाचनात त्याचे उल्लेख येत. त्यामुळे शक्यतो मूळ संहिता वाचली असली की, विषय समजण्याच्या दृष्टीने फार अडथळे येत नाहीत. कुरुंदकरांनी ‘मनुस्मृती’वर दिलेली व्याख्याने पुस्तकरूपाने लगोलग वाचून काढली. मी मनूचा चाहता / मनुवादी नाही. त्याला केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्याविषयीच प्रेम होते, हे त्याच्या अनेक उल्लेखांवरून सांगता येते. कुरुंदकर लिहितात, “ब्राह्मणवर्ग वर्णव्यवस्थेचा अभिमानी व समर्थक राहिला हे खरेच आहे. या व्यवस्थेचा त्यांनी लाभ घेतला, तिचे समर्थन केले, ती व्यवस्था राबविली, ती बळकट करण्याचा प्रयत्न केला, टिकवण्याचा प्रयत्न केला हे सारे खरेच. पण हे सारे मान्य केले तरी वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था ब्राह्मणांनी निर्माण केली असा मात्र याचा अर्थ होत नाही. समाजव्यवस्था निर्माण करण्याचे, टिकवण्याचे सामर्थ्य ब्राह्मणांच्याजवळ कधीच नव्हते. ती व्यवस्था व्यवहारात ब्राह्मणांना पुष्कळ सवलती देणारी असली तरी वाटते तितकी हिताची नव्हती.” (नरहर कुरुंदकर, मनुस्मृती, पृ. १६५-१७०) एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात साधारण चार-पाच टक्के असणारा ब्राह्मण वर्ग, धन, संपत्ती, व्यापार वैश्यांच्या / व्यापाऱ्यांच्या हाती सत्ता, राज्य आणि शस्त्र क्षत्रियांच्या हाती असे असताना एका ग्रंथाच्या आधारे एवढ्या मोठ्या समाजावर इतका काळ कसे वर्चस्व गाजवू शकतो? मी असे जग बनवेन, मी जग निर्माण केले, मी हे जग मोडेन असे म्हणून अथवा लिहून जग निर्माण होत नसते. समाजाची रचना मुख्यतः आर्थिक मुद्द्यांवर ठरत असते. कुरुंदकरांनी हे असे प्रश्न निर्माण करून मला अधिक वाचनाला आणि स्वतःची समज अजून वाढवण्याला प्रोत्साहन दिले आहे. 

‘हिंदू समाजाची टिकून राहण्याची वृत्ती’ हा विषयही मला असाच सुचला आहे. अर्थात या विषयावर अनेकांनी लिहिले आहे. मुद्दा तो नाही. “जगाच्या इतिहासात हिंदूंच्या इतकी चिवट अशी जमात आढळणार नाही. काही प्रमाणात ज्यूंशी त्याची तुलना करून पाहता येईल... हा चिवटपणा हिंदू समाजाला एक वरदान ठरलेले आहे. बाहेरून जितका आघात होतो; तितका हिंदूंचा कर्मठपणा वाढत जातो... हिंदूंची टिकून राहण्याची शक्ती एवढी प्रचंड आहे की, कत्तली, विध्वंस  अत्याचार आणि शतकानुशतकांच्या पराभवानंतरसुद्धा हा समाज टिकून राहिलेला आढळतो... सगळे सुधारक, सगळे विचारवंत पचवून, आत्मसात करून पुन्हा जसेच्या तसे शिल्लक राहण्याची हिंदू समाजाची शक्ती फार अफाट आहे... एवढा चिवट असलेला हिंदू समाज कमालीचा असहिष्णू आणि तितकाच कमालीचा निर्दय व क्रूर असूनही उदारमतवादी व सहिष्णू म्हणून ओळखला जातो!” (जागर पृ. १७१-१७६) अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती जर या चिवटपणामुळे झाली असेल; जाचक ठरणारे अनेक सांस्कृतिक बंध जर याच्याशी संबंधित असतील आणि मी विसाव्या शतकातील सामाजिक समस्या अभ्यासत असेन तर मला हिंदूंच्या या चिवटपणाची बीजे शोधावी लागतील. ती शक्यतो मी रेडिमेड न स्वीकारता स्वतः अभ्यासून शोधेन. विचार करण्यासाठी नवे विषय आणि अभ्यासाची एकाकी वाट चालण्याची प्रेरणा मला अशा प्रकारे कुरुंदकर देतात.

सौंदर्यशास्त्र, साहित्य-समीक्षा, भाषाशास्त्र, काव्य, नाट्य, भारतीय संगीत, व्याकरण, मार्क्सवाद-समाजवाद, राज्यशास्त्र-राजकारण, इतिहास, धर्म, संस्कृती, इत्यादी अनेक अभ्यासविषय कुरुंदकरांनी हाताळलेले दिसतात. ‘धार आणि काठ’ हा मराठी साहित्याचा आढावा घेणारा प्रबंध, ‘रंगशाळा’ हे भरताच्या नाट्यशास्त्रावरील भाषणांचे पुस्तक, ‘रूपवेध’ ही त्यांची अन्य महत्त्वाची पुस्तके. कुरुंदकरांच्या पुस्तकाची शीर्षकेही मर्मवेधी आहेत. उदाहरणार्थ, ‘शिवरात्र’ या शीर्षकाविषयी ते लिहितात, ‘शिवरात्र ही रात्रच असते, पण ती झोपण्याची रात्र नाही. शिवाच्या आराधनेत ही रात्र जागून काढावयाची असते. असले जागरण करताना जीवनातील शिव या मूल्यावर पुरेशी श्रद्धा असणे आवश्यक असते... देशाच्या उज्ज्वल भवितव्यावर माझी श्रद्धा आहे आणि अशा श्रद्धा कोणत्याही तर्कशास्त्रावर आधारलेल्या नसतात, याची मला जाणीव आहे.” एका नास्तिक म्हणवून घेणाऱ्या सश्रद्ध माणसाचे हे उद्गार आहेत! रूढ चाकोरी मोडण्यात कुरुंदकरांना रस आहे असे प्रथमदर्शनी वाटते. परंतु ते अनेक बाबतीत जुन्या चाकोरीचे भक्त आढळतात.

कुरुंदकरांच्या अभ्यास पद्धतीचे मला आकर्षण आहे. ती पूर्ण निर्दोष आहे असे नाही. त्यांची भूमिका आपला मुद्दा पटवून देऊन थांबणाऱ्या चतुर अभ्यासकाची नाही तर ती नाकारता न येणाऱ्या ढोबळ सत्यापर्यंत जाण्याचा मार्ग शोधणाऱ्या विचक्षण अभ्यासकाची आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने प्रकाशित केलेल्या ‘गोदातटीचे कैलासलेणे’ कै. नरहर कुरुंदकर स्मृतिग्रंथात डॉ. न. गो. राजूरकर यांनी ‘नरहर कुरुंदकर यांचे राजकीय चिंतन’ या लेखात (पृ. ६८-११७) त्यांच्या राजकीय चिंतनाच्या काही मर्यादा दाखवल्या आहेत. नीटपणे वाचले की काही मर्यादा लक्षात आपल्याही येतात. उदाहरणार्थ, बंगालमधील लुटीच्या पायावर इंग्लंडचे औद्योगीकरण आणि आधुनिकीकरण निर्माण झाले (मागोवा पृ. १७५) असा कुरुंदकरांचा विचार होता. आणखी एके ठिकाणी ते लिहितात, ‘इंग्रजांनी सक्तीने आपल्या राजसत्तेच्या जोरावर भारताचे रुपांतर कच्चा माल निर्यात करणाऱ्या देशात केले. ही घटना सक्तीने घडवून आणल्याशिवाय भारताच्या शोषणावर इंग्लंडच्या औद्योगीकरणाची उभारणी शक्य नव्हते. (जागर पृ. ४०) वस्तुतः इंग्लंडमधला औद्योगिक विकास हा येथील भांडवल तिकडे जाण्याच्या आधीपासून सुरू झाला होता. अठराव्या शतकाच्या तिसऱ्या दशकानंतर त्या देशात उत्पादनाची मोठी वाढ झाली. प्लासीच्या लढाईच्या १८-२० वर्षे आधीच इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली होती.

नव्या चिंतनाला प्रेरणा देण्याचे, नवीन दिशा दाखवण्याचे वि. का. राजवाडे, केतकर किंवा शेजवलकर यांचे जे सामर्थ्य होते ते कुरुंदकरांकडे नाही. त्यांचा पिंड त्या नवीन दिशेच्या आधारे पुढे जात त्याची कक्षा रूंदावणाऱ्या अभ्यासकाचा आहे. त्यांच्याविषयीची एक खंत त्यांचे स्नेही यदुनाथ थत्ते यांनी एके ठिकाणी मांडली आहे. ते लिहितात, ‘त्यांचे विचारधन मराठी भाषेच्या सीमा ओलांडून बाहेर जात नाही!’ इंग्रजीबाबतच्या न्युनगंडामुळे व मराठीमुळे आलेली प्रादेशिकता यांमुळे त्यांचे वैश्विक स्वरूपाचे ज्ञान अन्य लोकांपर्यंत पोहोचले नाही. मराठी विचारविश्वाला या सांस्कृतिक/भाषिक न्युनगंडाने ग्रासले आहेच. १९-२०व्या शतकातल्या जांभेकर, लोकहितवादी, टिळक, आगरकर, गोखले, भांडारकर, राजवाडे, केतकर हे इंग्रजी शिक्षण घेतलेले विद्वान मराठी-इंग्रजी दोनही भाषांत लिहीत असत. राजवाडे मात्र नंतर हट्टाने केवळ मराठीत लिहू लागले. त्यांच्या ज्ञानाचा फायदा मराठी भाषेला मिळाला असला तरी ज्ञानमार्गाचे नुकसानच झाले.

............................................................................................................................................

नरहर कुरुंदकरांच्या उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/search/?search=Narhar+kurundkar&search_type=Authors&doSearch=1

............................................................................................................................................

अनेकांनी कुरुंदकरांना ‘विचारवंत’ म्हटले आहे. शिक्षक-प्राध्यापक, विश्लेषक-भाष्यकार, आधीची मांडणी नाकारून, सुधारणा करून नवी मांडणी करणारा संशोधक, त्यानंतर विचारवंत आणि शेवटी तत्त्वज्ञ अशी चढण विचारविश्वात असताना आपण कुरुंदकरांना एकदम वरच्या टोकावर नेऊन बसवणे योग्य नाही. यात त्यांचे महत्त्व कमी करण्याचा हेतू नाही. समाजाला चांगले विश्लेषक-समीक्षक-भाष्यकार हवेच असतात. कुरुंदकरांनी हाताळलेला कोणताही विषय घ्या; त्यांत त्यांनी चिकाटीने शोधलेला एखादा मोठा सिद्धान्त मांडला असे दिसणार नाही. परंतु किचकट, क्लिष्ट विषयही भेदण्याची कणखर वृत्ती सातत्याने समोर येते. सिद्धांताची अनेक दृष्टीने चिकित्सा करण्याचे कौशल्य व ते मांडण्याचा बौद्धिक आवेश त्यांच्यात दिसतो. एखादा प्रज्ञावंत विजेप्रमाणे एखादे दार उघडून दाखवतो त्या मार्गावर येणाऱ्या वाचक-अभ्यासकांना त्यावरून नेण्याचे काम – तो मार्ग सुस्थिर करण्याचे काम कुरुंदकरांसारखे पंडित करत असतात. या संदर्भात कुरुंदकरांनी लिहिलेला ‘बुद्धिजीवी वर्गातील वैफल्य’ (जागर पृ. १-२०) आणि विनय हर्डीकर यांनी लिहिलेला ‘सुमारांची सद्दी’ (विठोबाची आंगी पृ. २११-२२८) हे लेख मुळातून वाचण्यासारखा आहेत. भारताच्या संदर्भात ज्ञानमार्गाची सद्यस्थिती यातून कळू शकेल.

आक्रमक भाषाशैली, खंडन–मंडन / पूर्वपक्ष-उत्तरपक्ष पद्धतीने विषयाची नव्याने केलेली मांडणी, टीका-प्रतिटीका, अव्वल निबंधकाराच्या दमदार वृत्तीने त्यांनी आपले लिखाण केले. कोणाचे अंतिम मत मानता येत नाही; काही काळ मानले तरी नंतर ते कोणीतरी नाकारतोच ही श्रद्धा ठेवणारा बुद्धिश्रद्ध माणूस याच स्वरुपात कुरुंदकर माझ्यापुढे उभे राहतात. एका पत्रात ते लिहितात, ‘‘माझ्या विवेचनाचे महत्त्व वाचकांना पटेल. जर पटले तर माझ्यावर कठोर टीका होईल...माझी इच्छा पण कठोर टीका होऊन सर्वांनी मला मुर्खात काढावे ही आहे. कारण त्यासाठी माझ्यापेक्षा खोलात उतरावे लागून मराठी समीक्षा अधिक खोल करावी लागेल. व तेच मला हवे आहे.’’ आपल्या काळाच्या मर्यादेत राहणारा अभिजात ज्ञान परंपरेवर निष्ठा असणारा हा आधुनिक ऋषी तसं पाहायला गेले तर लवकर गेला. आज कुरुंदकर असते तर ८५ वर्षांचे झाले असते; अधिक आयुष्य लाभले असते तर त्यांनी काय मांडले असते याचा विचारही स्तिमित करणारा आहे.

तत्त्वज्ञ, विचारवंत यांच्या छटा त्यांच्या लिखाणात दिसत असल्या तरी मी त्यांना एक महत्त्वाचा समीक्षक-भाष्यकार-संशोधक मानतो. त्यांना गुरू मानून पूजा करण्याची माझी इच्छा नाही. त्यांच्या विवेचनाच्या काही मर्यादांची मला जाणीव आहे. तरीही मला पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे वळणे भाग आहे. ज्या ज्ञानमार्गावर मला जाण्याची इच्छा आहे त्या मार्गावर खूप पुढे गेलेला ‘बुद्धिश्रद्ध ज्ञानमार्गी’ असाच मी त्यांचाकडे पाहतो आहे!

.............................................................................................................................................

मी नरहर कुरुंदकरांकडे कसं पाहतो! (पूर्वार्ध)

.............................................................................................................................................

लेखक रत्नागिरीच्या गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत.

pankajghate89@gmail.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Wed , 12 July 2017

या लेखासाठी कौतुक नक्कीच.... परत एकदा "गुरुजींवर"काही वाचायला मिळाले म्हणुन... (गुरुजी हा,शब्द बर्दापुरकरांकडुन, त्यांच्याशी साधी तोंडओळख सुध्दा नसताना ,उसना घेतलेला) आपल्याला," गुरुजी", चिकित्सक, संशोधक आणखीन बरंच काही म्हणुन पटतात हे जसं दर 10ओळींमागे येतं, तसंच किंवा त्याहुन थोडे जास्त (आपला कुठलाही अनादर करायचा हेतु नाही....), त्यांच्या मर्यादा दाखवण्याचा किंवा आपण त्यांना काही पुर्णपणे मानत नाही, असं दाखवण्याचा खटाटोप खुप येतो... काळाची मर्यादा, असा उल्लेख, आपण एके ठिकाणी केलेला आहे, पण मग त्याचा वास्तविक अर्थ नेहमी लावावयास नको का?त्या अर्थाने तरी "गुरुजींना"परिपुर्ण मानवंदना देण्यात काय हरकत असावी? कालातीत वगैरे असं काही खरंच असतं का ह्यावर पण मग आपण थोडे मार्गदर्शन करणे आवश्यक ठरेल... असो... उदय देव (एक देव-माणुस)


Praveen Bardapurkar

Wed , 12 July 2017

लेख आवडले . कुरुंदकरांचा सहवास लाभलेल्यापैकी मी एक आहे . त्यांना आम्ही गुरुजी म्हणत असूत . पत्रकारितेच्या निमित्ताने मी १९७८पासून मराठवाड्याबाहेर होतो आणि त्यांची अखंड भटकंती सुरु असे . या भटकंतीत कोल्हापूर , सातारा , वणी , नागपूर आदी ठिकाणी त्यांच्या अनेकदा भेटी झाल्या ; त्यांच्यासोबत अनेक रात्री जागत्या झाल्या . ते बोलत आम्ही ऐकत असूत ; ज्ञानाचे लक्ष लक्ष दिवे उजाळले आहेत ,असा तो अनुभव असे . वयानी मी लहान पण, ते बरोबरीने वागवत असत ; अर्थात हा त्यांचा मोठेपणा ! वडील गेले तेव्हा डोळ्यात टिपूसही आलं नव्हतं पण , गुरुजी गेल्याची बातमी वाचल्यावर ढसाढसा रडू आलं . महाबाप होता तो माणूस ! - www.praveenbardapurkar.com blog.praveenbardapurkar.com


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......