अजूनकाही
१. मी चीनच्या राजदूतांची भेट घेतल्याने केंद्र सरकारला चिंता वाटत असेल तर सीमेवर तणाव असताना त्यांचे तीन मंत्री चीनमध्ये पाहुणचार का झोडत होते, यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. चीनचे राजदूत ल्यूओ झाओहुई यांनी राहुल यांची भेट घेतली.
कमाल झाली राहुल तुमची? तुमच्यासारख्या अर्ध-इटालियन, ख्रिस्तीधर्मीयाने चिनी राजदूताची भेट घेण्याची भारतीय जनता पक्षाच्या देशभक्त मंत्र्यांच्या दौऱ्याशी तुलना तरी होऊ शकते का? त्या मंत्र्यांनी चीनमध्ये पाहुणचार झोडला म्हणजे हे मंत्री चिन्यांना दरडावत होते, धमकावत होते, हा २०१४नंतरचा सर्वशक्तिमान भारत आहे, याची त्यांना आठवण करून देत होते आणि चिनी लोक घाबरून त्यांची सरबराई करत होते, हे तुमच्या देशद्रोही डोस्क्यात कसं शिरायचं?
.............................................................................................................................................
२. सीबीआयने गेल्या काही दिवसांत विविध घोटाळ्यांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांभोवतीचे चौकशीचे फास आवळले आहेत. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार राजदपासून फारकत घेऊ इच्छितात. मात्र, राजदची साथ सोडल्यास सरकार कोसळण्याच्या शक्यतेमुळे ते हे धाडस करायला कचरत आहेत. अशा वेळी सोमवारी भारतीय जनता पक्षाने नितीश यांना बाहेरून पाठिंबा देण्याचे संकेत दिले. नीतीश महाआघाडीतून बाहेर पडल्यास राज्याच्या कल्याणासाठी भाजप त्यांना बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहे, असे बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी म्हटले आहे.
नीतीश यांनी सदाशुचिर्भूत भाजपचा पाठिंबा घेऊन भ्रष्ट लालूंना उघडं पाडलं पाहिजे. त्यामुळे, त्यांना पडद्यामागे भाजपबरोबर चुंबाचुंबी करून उघडपणे तोंड लपवण्याची जी कसरत करावी लागते आहे, ती बंद होईल. शिवाय पुढच्या निवडणुकीपर्यंत हा तंबूत शिरलेला उंट नीतीश यांना राज्याच्या ‘कल्याणा’साठी तंबूतून बाहेर ढकलूनही मोकळा होईल. मग त्यांना लालूंबरोबर कुठेतरी एकत्र गुजगोष्टी करता येतील.
.............................................................................................................................................
३. जम्मू- काश्मीरमध्ये दगडफेकीतून बचाव करण्यासाठी ‘मानवी ढाल’ म्हणून जीपला बांधलेल्या तरुणाला १० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जम्मू- काश्मीरच्या राज्य मानवाधिकार आयोगाने दिले आहेत. फारुख दार असे या जीपला बांधलेल्या तरुणाचे नाव असून तो शालविक्रेता आहे. श्रीनगर मतदारसंघात पोटनिवडणुकीदरम्यान सैन्याच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीपासून बचाव करण्यासाठी जवानांनी लष्करी जीपच्या पुढील भागावर एका युवकाला बांधून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
या फारुख दारची बाजू घेणाऱ्या विचारवंतांना जीपला बांधायला निघालेले देशभक्त आता ही नुकसानभरपाईची रक्कम ऐकल्यावर आळीपाळीने स्वत:ला जीपला बांधून घ्यायला तयार होतील. देशाच्या इतर भागांमधले काही तरबेज पोलिस अधिकारी तर दंगलकाळात जीपला बांधून फिरवण्याचं एक वेगळं रेटकार्ड जाहीर करतील आणि भरपाईची रक्कम ‘बळी’बरोबर वाटून खातील.
.............................................................................................................................................
४. देशातील व्हीआयपी कल्चर हद्दपार करण्यासाठी सरकारने काही दिवसांपूर्वीच केंद्र आणि राज्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरून लाल दिवे काढून टाकले असले तरी सत्ताधारी भाजपचे नेतेच व्हीआयपीगिरी करण्यात आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशातील सांरगपूरमध्ये गृहमंत्री उमाशंकर गुप्ता एका ट्रॅफ्रिक जॅममध्ये अडकले होते. तब्बल पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असताना वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी संपवण्याऐवजी मंत्री महाशयांना कार्यक्रमाला जाण्यास उशीर होऊ नये म्हणून त्यांच्यापुरता रस्ता मोकळा करून घेतला.
निव्वळ गाड्यांवरचे लाल दिवे हटवल्याने व्हीआयपी संस्कृती संपते, ही संकल्पना या सरकारच्या उथळपणाला साजेशीच आहे. पंतप्रधानांसारख्या शीर्षस्थ नेत्यांनी आपल्या उदाहरणातून हे धडे घालून द्यायचे असतात. इथं पंतप्रधान संसदेच्या डोक्यावरून जनतेशी संवाद साधतात, कोणत्याही प्रकारचं उत्तरदायित्व पाळत नाहीत, मंत्रिमंडळालाही ते मांडलिकांप्रमाणे वागवण्यात धन्यता मानतात. ते सुपरव्हीव्हीआयपी आहेत, यावर त्यांचा आणि त्यांच्या भक्तगणांचा प्रगाढ विश्वास असताना देशातलं व्हीआयपी कल्चर आपोआप कसं संपुष्टात येईल.
.............................................................................................................................................
५. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित गुरू महोत्सव कार्यक्रमात झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी महिलांकडून पाय धुऊन घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री दास एका मोठ्या ताटात उभे राहिलेले दिसत असून दोन महिला जमिनीवर बसून त्यांचे पाय धुवत आहेत. त्या मुख्यमंत्र्यांच्या पायावर गुलाबाच्या पाकळ्या आणि पाणी टाकून त्यांचे पाय धुवत असल्याचे व्हीडिओत दिसत आहे. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री रघुबर दास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीची जराही माहिती नसलेल्या मूर्ख मीडियाने उभं केलेलं हे भूत आहे. बायकांनी पुरुषांचे पाय धुतले, तर त्यात एवढा गदारोळ माजवण्यासारखं काय आहे? शिवाय ते मुख्यमंत्री आहेत म्हणजे पुरुष नाहीत, महापुरुष आहेत, राज्यातल्या जनतेचे परात्पर गुरू आहेत. गुरूचे पाय शिष्यांनी धुतले, तर त्यात बिघडलं काय? या देशातल्या बहुतेक गुरूंच्या शिष्या त्यांची अशीच आणि यापेक्षाही वेगवेगळ्या प्रकारची सेवा करत असतात. ही आपली महान परंपरा आहे. त्या महिलांनी गुरूंच्या पायाचं तीर्थ भक्तिभावानं प्राशन केलं असलं, तरी त्यात काही आश्चर्य वाटून घ्यायला नको.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment