अजूनकाही
देशात मॉब लिचिंग विरोधात सर्वधर्मीय रस्त्यावर उतरले आहेत. ज्या मुस्लीम समाजासाठी हे आंदोलन सुरू आहे, तोच यातून गायब होता. चळवळीचे कार्यकर्ते वगळता इतर मुस्लीम समुदाय 'अल्लाह मालिक' म्हणत दैनांदिन कामात व्यस्त आहे. वक्तने करवट घेताच व्हर्च्युअल तरुणांसह घरात तसबिरी घेऊन बसलेले सर्वजण ‘इस्लाम खतरे में’ म्हणत बशीरहाटच्या रस्त्यावर आले. कारण नेहमीसारखंच होतं. पवित्र धार्मिक स्थळाची व्हर्च्युअल बदनामी केल्याने पुन्हा एकदा हजारोच्या संख्येनं पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम रस्त्यावर आले. परिस्थिती इतकी बिघडली की, १२ तासांतच कर्फ्यू लावण्यात आला. त्या उलट गो-गुंडाकडून मुस्लीम मुलांच्या कत्तली होत असताना, हीच मंडळी माजघरात टीव्हीसमोर बातमीपुरती संवेदना व्यक्त करत होती. तर काहीजण ‘अपने यहाँ तो अमन हैं ना’ म्हणत धंद्यात मग्न होते.
गेल्या तीन वर्षांत गोमांस बाळगल्याच्या संशयातून मुस्लिमांच्या हत्यांचं सत्र सुरू आहे. या मॉब लिचिंगवर बुद्धिजीवी वर्गाने लिखाणातून सहवेदना व्यक्त केल्या. नोकरदार पांढरपेशा वर्गाला राजकीय आणि सामाजिक प्रश्नांबद्दल तसंही काही देणंघेणं नसतंच, त्यामुळे यांच्याकडून तशाही फारशा अपेक्षा नसतात. मध्यमर्गीय समुदायाने या झुंडशाहीविरोधात किमानपक्षी आवाज उठवणं अपेक्षित होतं. मात्र हा वर्ग अल्लाहकडे ‘रहमतची भीक’ मागत होता. मोहसीन, अखलाकपासून ते अलीमुद्दीनपर्यंत तीन वर्षांत ८६ मुस्लिमांचा शिरच्छेद करण्यात आला. या काळात मुस्लीम समाजातील दांभिक आणि जमातवाद्यांनी साधा निषेधही नोंदवला नाही. तसंच कुणीही रस्त्यावर आलं नाही. अजूनही या प्रकरणावर हा वर्ग ‘तूर’ गिळून गप्प आहे. उलट झुंडशाहीविरोधात रस्त्यावर येणाऱ्या गटांवर हा वर्ग बोट उगारत आहे. मात्र, प्रेषितांचा कथित व्हर्च्युअल अवमान होताच अचानक ‘इस्लाम खतरे में’ आला. आणि भावना दुखावल्याचा ठपका ठेवत तोडफोड सुरू झाली. ज्या धर्मानं अवघ्या जगाला शांती, अहिंसा आणि असहिष्णूतेचा संदेश दिला, त्याचेच अनुयायी भावना दुखावल्याचा पोकळ आव आणत हिंसा करत सुटले आहेत.
दंगलीत कमी मुस्लीम मारले गेले असतील, पण त्यापेक्षा जास्त संख्येनं मुस्लिमांच्या कथित जिहादी कारवाईत मारले गेले आहेत, हे कडवं सत्य आहे. जगभरात हा अधर्म सुरू आहे. कधी आयएसचं नेतृत्व स्वीकारून तर कधी शिया-सुन्नीच्या वादातून निष्पापांना मारलं जात आहे. अल्लाहच नाव घेत अल्लाहच्याच घरात अर्थात मस्जिदीमध्ये स्फोट घडवले जात आहेत. पाकिस्तान, बांग्लादेश, इराक, सिरीया, इराणमध्ये इस्लामचं नाव घेऊन रक्तपात सुरू आहे. शेजारी राष्ट्रं पार आणि बांग्लादेशमध्ये इशनिंदेचा ठपका ठेवून लोकांना चिरडणं सुरू आहे. जगभरात इस्लामच्या नावानं दहशतीचं वातावरण तयार झालंय. दर महिन्या दोन महिन्याला हल्ले होत आहेत. अलिकडच्या काही घटना पाहता इस्लामच्या कट्टरतावाद्यांनी हल्ल्यांचं मॉडेल बदलल्याचं जाणवतं. सार्वजनिक कार्यक्रम आणि रस्त्यावरील पादाचाऱ्यावर गाड्या टाकून हल्ले केले जात आहेत. नुकताच लंडन आणि इराणमध्ये असा हल्ला झालाय. लंडनच्या हल्ल्यानंतर जगात सामान्य मुस्लीम पुन्हा एकदा अस्थीर झालाय. 9/11 च्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या धक्क्यातून तिथला मुस्लीम समुदाय सावरत असताना, ब्रिटन आणि युरोपमध्ये हल्ले झाले. यामुळे सामान्य आणि लिबरल मुस्लीम चौकशाच्या फेऱ्यात अडकलाय. मुस्लीम समुदायाविरोधात ‘हेटनेस’चं वातावरण तयार झालं आहे. या ‘हेटनेस’मधूनच जून महिन्यात ब्रिटनमध्ये मस्जिदीच्या बाहेर हल्ले करण्यात आले. जगभरात सुरू असलेल्या या हिंसाचारविरोधात मुस्लीम समुदायाला एकत्र येण्याची गरज आहे. असे न होता मुस्लीम समाज पंथाच्या वादात अडकलाय.
‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या हल्ल्यानंतर भारतात कट्टरतावाद बोकाळलाय. ओसामाच्या पतनानंतर जगात इस्लाम जाणून घेण्याचा कल वाढला. या अभ्यासानंतर अर्थातच ‘निगेटिव्ह’ इस्लामचा प्रचार वाढला. ‘तारेक फतह’सारख्या अॅण्टी इस्लामिस्ट विचारवंतांना घेऊन जगात इस्लामची प्रतिमा मलिन करण्याचं काम काहींनी केलं. याच वेळी जगातील इस्लामच्या अभ्यासकांना अहिंसावादी इस्लामची मांडणी करण्याची संधी चालून आली होती. परंतु जगातील इस्लामविद ‘अमेरिका पुरस्कृत’ दहशतवादाला दूषणं देत होती. भारतात याकाळात ‘टीव्ही’ आणि ‘यूट्यूब’च्या माध्यमातून ‘कट्टर इस्लाम’चा प्रचार सुरू झाला. अफगाण, इराकच्या हल्यानंतर ‘इस्लाम खतरे में’ची जागतिक आरोळी सुरू झाली. इस्लामला वाचवण्यासाठी जगात ‘अघोषित धर्मयुद्ध’ छेडण्यात आलं. जगभरात ‘जमातवाद’ आणि ‘कट्टरतावादा’चा प्रचार सुरू झाला. यात ‘वांशिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या’ वेगळे असलेले भारतीय मुसलमान भरडले. अफगाण आणि इराक युद्धाचे पडसाद भारतातही बघायला मिळाले. अमेरिकेनं इराकविरोधात पुकारलेल्या युद्धाला भारतानं प्रखर विरोध केला. राजनायिक पातळीवर भारत इराकसोबत राहिला. भारतात युद्धविरोधात निदर्शनं झाली. मात्र, युद्धात इराकचा पाडाव होताच भारतात अचानक ‘सद्दाम निषेधा’च्या रॅली निघाल्या. मुळात या रॅल्या अमेरिकेचं अभिनंदन करणाऱ्या नसून भारतातील मुस्लीम समाजाला डिवचण्यासाठी ठराविक वर्गाची खेळी होती. या षडयंत्राला भलून मुस्लिमांनी अमेरिकाविरोधात निषेध सभा घेतल्या होत्या.
‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ नंतर भारतात गुजरातची दंगल घडली. हीच घटना इस्लामच्या परकीय विचारसरणी भारतात शिरण्यास ‘पोषक’ ठरली. मुस्लिमांच्या अमानूष कत्तलीचे व्हिडिओ दाखवून संधीसाधूंनी माथी भडकवण्याचं काम केलं. याचा परिपाक म्हणून सरकार आणि गृहमंत्रालयाचा निषेध करणारी टोळी जन्माला आली. ‘दुजाभाव, हिणकस दृष्टिकोन आणि पक्षपातीपणा’तून मुस्लीम समुदायात अतिरेकी विचार वाढला. यातून मुस्लीम समाजात अविचारी पिढी पोसली गेली. नंतरच्या काळात घडलेल्या कोक्राझार आणि मुजझ्झफरनगरच्या दंगलीनं ‘कट्टरतावाद’ आणखीन दृढ झाला. या दंगली जरी एक कारण असलं तरी अजूनही बरीच कारणं याला जोडली गेली आहेत.
‘धार्मिकता आणि अस्तित्ववाद’ जोपासला गेल्याने समाज शिक्षणापासून काही प्रमाणात लांब गेला. एकिकडे ‘वर्ल्ड ट्रेड’ नंतर जागतिक पटलावर मुस्लीम तरुणात शिक्षणाचं प्रमाण वाढलं असलं तरी भारतात हे प्रमाण घटल्याचे सर्वेक्षणातून समोर आलं. शिक्षण आणि रोजगार नसल्यानं जमातवादाचे ‘घेटो’ अर्थातच कंपू भारतात मोठ्या प्रमाणात तयार झाले. या ‘कंपूशाही’मुळे भारतीय मुस्लीम समाजात ‘सिलेक्टिव्हझम’ वाढीस लागला. हा ‘सिलेक्टिव्हझम’ अर्थातच धार्मिक प्रवृतीचा होता. इजतेमा, कॉर्नर बैठका, मदरसा, मस्जिदींच्या प्रवचनातून धार्मिक शिक्षणाचं प्रसार सुरु झाला. “इहलोकात शांततेसाठी धर्म आणि आचरणं महत्त्वाची असल्याची मांडणी वाढली, शिक्षण हे रोजगाराचं साधन आहे, पण जन्नतचा मार्ग कदापी नाही” या विचारानं तरुण पिढीचं ‘माइंड हायजॅकीकरण’ झालं. परिणामी ‘धार्मिक आस्था’ तरुणाईत बोकाळली.
कॅनडामध्ये २०१२ साली प्रेषितांचा कार्टूनमधून ‘कथित’ अवमान करण्यात आला. भारतात धार्मिक आस्थेचं बळकटीकरण झालेली पिढी लाखोंच्या संख्येनं निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरली. दुसरीकडे अरब राष्ट्रात तरुण पिढी हुकूमशाही राज्यकर्त्यांविरोधात रस्त्यावर होती. ‘सोशल मीडिया’च्या वापरातून इजिप्तच्या ‘तहरीर’ चौकात सरकारविरोधात लाखोंच्या संख्येनं जमली होती. २०००-१२ साली अरब राष्ट्रात ‘क्रांतीचं आंदोलन’ पीकवर होतं. भारतात मात्र ‘सोशल मीडिया’चा वापर धार्मिक प्रवचनं आणि अफवांसाठी सुरू होता. गेल्या १७ वर्षांपासून ‘सोशल मीडिया’तून कथित धार्मिक क्रांतीचे बीजं पेरली गेली. यातून १० टक्के पिढीनेही इस्लामी आचरण पूर्णत: स्वीकारलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ‘इस्लाम खतरे में’ म्हणत लाखोंचा जमाव रस्त्यावर आणण्यास हे कंपू यशस्वी ठरले आहेत. हाशीमपुरा, गोध्रा, कोक्राझार आणि मुजझ्झफरनगरच्या दंगलीविरोधात हे कंपू रस्त्यावर आले नाहीत. दंगलीनंतर निघालेल्या शांतता रॅलीत हा मॉब कुठेच नव्हता.
गेल्या वर्षी गो-गुंडांनी गुजरातच्या उनामध्ये मेलेल्या जनावरांची कातडी काढणाऱ्या दलित तरुणांना मारहाण केली. याविरोधात दलितांनी देशभर निदर्शनं आंदोलनं केली. मोहसीन, अखलाकनंतरही कुणी मुस्लीम व्यक्ती स्वतंत्ररीत्या रस्त्यावर आल्याचं पाहण्यात किंवा ऐकिवात नाही. मात्र, तोंडी तलाक रद्दीकरणातून सरकारवर व्यक्तिगत कायद्यात हस्तक्षेपाचा आरोप करत, देशभर मुस्लीम समुदाय ‘बीवी-बच्चे’ घेऊन रस्त्यावर आला. ‘इस्लाम खतरे में’ म्हणत दाढी-टोपी, बुरखाधारकांनी सरकारचा निषेध नोंदवला. याआधी राजकारण्यांनी फूस लावली म्हणून ‘आरक्षणा’ची अतार्किक मागणी रेटली. हा एक अपवाद वगळता ‘सामाजिक सुरक्षा आणि प्रश्नां’साठी भारतात मुस्लीम रस्त्यावर उतरल्याचे मी तरी पाहिलं नाहीये.
मागच्या सोमवारपासून पश्चिम बंगालमध्ये दहशतीचं वातावरण आहे. फेसबुकवरून प्रेषित आणि पवित्र धार्मिक स्थळाच्या अवमानाच्या मुद्यावरून धुमाकूळ सुरू आहे. समाजविघातकी मंडळींनी ‘व्हर्च्युअली’ काही प्रतीकांची आक्षेपार्ह मांडणी केली म्हणून भावना दुखावणं ही मुळातच हास्यास्पद बाब आहे. हेच का प्रेषित आणि असहिष्णू इस्लामचं महत्त्व? इतक्या क्षुल्लक आहेत का तुमच्या भावना? याची पुनर्तपासणी इस्लामच्या अनुयायांनीच करायला हवी. पश्चिम बंगाल पोलिसांनी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. तरीही अविवेकी तरुणांनी दहशत पसरवलीय. ‘२४ परगणा’ जिल्हा छावनी बनलाय.
गेल्या वर्षीही बंगालच्या मालदामध्ये याच मुद्यावरून मुस्लीम तरुणांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. आता याच मुद्यावरून हिंसा सुरू आहे. या संधीचा फायदा घेत संघानं राज्यात हिंदुत्ववादी राजकारण सुरू केलंय. राज्यात सत्ता काबीज करण्यासाठी संघ व भाजपनं ‘गोरखालंड’ला मुद्दा लावून धरलाय. हे आंदोलन शमताच ‘धार्मिक ध्रुवीकरण’ सुरू झालं आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीआधी विधानसभा बरखास्त करण्याची ही खेळी आहे. पण हा डावपेच समजण्याची बौद्धिक कुवत मुस्लिमात नाहीये. परिणामी ‘इस्लाम खतरे में’ येणारच…
अखलाक आणि पहलू खानची हत्या सबंध मानवजातीला हादरवणारी होती. या घटनांविरोधात मुस्लीम समुदायाकडून अहिंसक मार्गानं निदर्शनं व्हायला पाहिजे होती. प्रेषितांनी जगाला सर्वांत प्रथम अहिंसेचा मार्ग दिला. याचा अवलंब करून अरबस्तानात अनेक क्रांत्या झाल्या. भारतात गांधींनी हा मार्ग स्वीकारून स्वातंत्र्य मिळवून घेतलं. मात्र, मुस्लीमच प्रेषितांच्या मार्ग विसरले. अन्यायाविरोधात कुरआनचं एक प्रसिद्ध कडवं आहे- “हे लोक काय करतील त्या दिवशी जेव्हा त्यांचा पालनकर्ता त्यांना म्हणेल की, हाक मारा त्या विभूतींना ज्यांना तुम्ही माझे भागीदार समजून बसला होता. हे त्यांचा धावा करतील परंतु ते त्यांच्या मदतीला येणार नाहीत आणि आम्ही त्यांच्या दरम्यान विनाशाचा एकच खड्डा सामाईक करून टाकू. सर्व अपराधी त्या दिवशी अग्नी पाहतील आणि समजून घेतील की, आता त्यात त्यांचे पतन आहे आणि त्यांना त्यापासून वाचविण्यासाठी कोणतेही आश्रयस्थान मिळणार नाही.” (सूरह अलकहेफ, ५२-५३)
आज देशात जे मॉब लिचिंग सुरू आहे, कदाचित ती एका भयान वादळाची चाहूल असू शकते. त्यामुळे वेळीच जागं होणं गरजेचं आहे. अशा वेळी घरात बसून शोक करणं हा मार्ग असू शकत नाही. मुस्लीम म्हणून नव्हे तर माणूस म्हणून रस्त्यावर या. कारण देशात माणुसकीची हत्या होतेय. रस्त्यावर येऊन अहिसंक मार्गानं घटनांचा निषेध नोंदवा. अशा वातावरणात अ-मुस्लिमांची मनं जिंकण्याची गरज आहे. मुस्लीम द्वेषापासून परावलंबित करा, त्यांना घरी येण्याची निमंत्रणं द्या. एकत्र चहा-पान करा, प्रेमपूर्वक त्यांची मनं जिंका.. आज प्रतिगामी शक्तीविरोधात लढणारे बरीच मंडली रस्त्यावर उतरत आहे, त्यांचा सोबती बना. त्यांचे हात बळकट करा. #NotInMyName कॅम्पेनवर टीका करण्याऐवजी त्याचा भाग बना. खरंच प्रेषितांचा आदर मनात असेल तर सामाजिक प्रश्नांची उत्तरं अहिंसक मार्गानं मिळवून दाखवा. अन्यथा तुम्ही इस्लामधर्मीय आहेत, हे म्हणण्याआधी थोडीशी लाज बाळगावी. जाता जाता कुरआनमधील एका आयात उदधृत करतो आणि थांबतो - “प्रत्येकासाठी एक दिशा आहे जिकडे तो वळतो. तेव्हा तुम्ही सत्कर्मात एकमेकांपेक्षा अग्रेसर व्हा. जिथे कुठे तुम्ही असाल तिथे अल्लाह तुम्हाला एकत्रित करेल.” (सूरह बकराह, १४८)
.............................................................................................................................................
लेखक कलीम अजीम ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.
ट्विटर हँडल - Twitter @kalimajeem
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment