टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • पी. चिदंबरम, नितेश राणे, काऊ मिट डिटेक्शन किट, गाय आणि प. बंगालमधील हिंसाचार
  • Mon , 10 July 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या पी. चिदंबरम P. Chidambaram नितेश राणे Nitesh Rane काऊ मिट डिटेक्शन किट Cow meat detection kit गाय Cow प. बंगालमधील हिंसाचार Communal riots

१. संघटना आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागली, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नुकतीच दिली. दिल्लीतील एका कार्यक्रमात ते म्हणाले, यूपीए १ आणि यूपीए २ सरकारच्या काळात कार्यकर्ते आणि संघटनेची उपेक्षा झाली. काँग्रेस पक्ष बघताबघता जिल्हा आणि प्रदेश पातळीवर दुबळा होता गेला आणि आम्ही काहीच करू शकलो नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. १९७७च्या पराभवानंतर इंदिरा गांधी यांचा सामना काही माजी काँग्रेसी आणि थकलेल्या समाजवाद्यांशी होता. पण आज काँग्रेसची लढत आरएसएससारख्या शक्तिशाली संघटनेशी आहे, याची त्यांनी आठवण करून दिली.

काँग्रेसचे कार्यकर्ते स्वातंत्र्योत्तर काळात नेमकं कुठे आणि काय काम करत होते, कसलं संघटन करत होते? तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या नावावर आणि स्वातंत्र्यलढ्याच्या पुण्याईवर मतं मिळवणाऱ्या या पक्षाने इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली यश संपादन करतानाच कार्यकर्त्यांचा सफाया करून चमच्यांच्या फौजा उभ्या केल्या होत्या. काहीही केलं न केलं तरी सत्ता मिळत असल्याने तथाकथित कार्यकर्ते हे नेते बनून तुस्त झाले होते आणि अजूनही ही सुस्ती पळालेली नाही. रा. स्व. संघाशी लढाई करण्याचा आपला वकूब राहिलेला आहे, असा भ्रम चिदूकाकांना कुठून झाला असेल, असा प्रश्न राहुलबाबांनाही पडला असेल हे वाचल्यावर.

.............................................................................................................................................

२. परप्रांतीय मच्छीमार बंदीच्या काळातही मासेमारी कसे करतात, याचा जाब विचारून सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या अंगावर मासे फेकल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत. सहाय्यक मत्स्य आयुक्त वन्स यांनी राणे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परप्रांतीय लोकांना मच्छीमारी करू दिली जाते, असा नितेश यांचा आरोप होता.

राणे कुटुंबातील कोणाहीपुढे सिंधुदुर्गात कोणी सरकारी अधिकारी ‘उर्मट’पणा करायला धजत असेल, यावर विश्वास बसणं कठीण आहे. बरोबरी करणं शक्य तरी आहे का? बोटी पाण्यात जात नसल्याने आधीच मत्स्याहारींना सुक्या मासळीच्या पाणीदार कालवणाशी कसंबसं जेवावं लागत असताना काही बांगडे (भले कोणीही का पकडलेले असेनात) असे फेकाफेकीत वाया घालवणं कोकणच्या सुपुत्रांक शोभत नाही, हे नितेश यांना कोणीतरी सांगा. ते वन्स म्हणे, लगेच बांगडे उचलून किसमूर करायला घरी घेऊन गेले. याबद्दल त्यांचा सत्कार करायला हवा.

.............................................................................................................................................

३. हरियाणातल्या मथाना गावात असलेल्या एका सरकारी गोशाळेत मुसळधार पावसामुळे पाणी साठून चिखल आणि गाळ जमा झाला आणि त्यातच रूतून २५ गायींचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर येते आहे. या गोशाळेत या गायींसाठी पुरेसा चारा आणि पाण्याचीही व्यवस्था नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. इतर काही गायीही अत्यवस्थ झाल्या आहेत.

काहीही असलं तरी गोभक्तांच्या निगराणीत असतानाच या गोमातांना मृत्यू लाभलेला असल्याने त्यांना सद्गती लाभणार यात शंका नाही. मुसलमान कसायाने कापल्या तरच ती गोहत्या होते, हे लक्षात ठेवा. हे तथाकथित गोभक्त गायीला ‘माता’ मानतात. त्यातल्या काहींना पाहिल्यावर त्यावर विश्वासही बसतो. हे लोक आईला ‘देवी’ बनवून मखरात ठेवतात आणि प्रत्यक्षात तिच्यावर टाचा घासून मरण्याची पाळी आणतात. तीच परंपरा गायींच्या बाबतीत चालवली आहे, म्हणजे तिला खरोखरच मातेचा ‘सन्मान’ दिला आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

.............................................................................................................................................

३. पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी सोशल मीडियावरून बनावट छायाचित्र व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला कोलकाता पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले. या पार्श्वभूमीवर आता भाजपप्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी नवा प्रताप केला आहे. या दंगलप्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर शनिवारी निषेध आंदोलनाचे आवाहन करताना त्यांनी ट्विटरवर चक्क २००२ मध्ये गुजरात दंगलींच्या छायाचित्राचा वापर केला आहे.

भाजपच्या कोणाही पदाधिकाऱ्याला इतर कोणी दंगलींबद्दल ग्यान देणं योग्य नाही. किमान या बाबतीतला त्यांचा अधिकार मान्य करायला हरकत काय? सतत विरोधासाठी विरोध बरोबर नाही. कोणत्याही दंगलीत जमाव काय करतो? गाड्या पेटवतो, माणसं मारतो. गुजरातेत काय आणि बंगालमध्ये काय, सगळं एकसारखंच घडतं. त्याचं प्रातिनिधिक दर्शन घडवण्यासाठी त्यांनी आपल्या परिचयाच्या, हृदयाच्या जवळच्या दंगलीतल्या छायाचित्राचा वापर केला, तर त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे?

.............................................................................................................................................

५. महाराष्ट्र राज्यातील न्यायवैदक विज्ञान प्रयोगशाळा संचलनालयाने मांसामध्ये गोमांस आहे का, याचा तपास करणाऱ्या पोर्टेबल किटची निर्मिती केली आहे. बेकायदा वाहतुकीच्या काळात पकडले जाणारे मांस गोमांस आहे का, याचा तपास करण्यासाठी या पोर्टेबल किटची निर्मिती करण्यात आली आहे. या किटच्या निर्मितीमुळे पोलिसांना मोठी मदत होणार आहे. या नव्या किटमुळे केवळ गोमांसाच्या संशयामुळे होणारी कारवाईदेखील टळणार आहे. ‘गोमांस शोधणाऱ्या इलिसा किटमुळे अवघ्या अर्ध्या तासात मांस हे गोमांस आहे का, ते समजू शकेल’, अशी माहिती न्यायवैदक विज्ञान प्रयोगशाळा संचलनालयाचे संचालक के. वाय. कुलकर्णी यांनी दिली.

महाराष्ट्राच्या पोलिसांकडे एकवेळ व्हीआयपी ताफ्यांच्या पलीकडे सर्वसामान्य माणसांना संरक्षण द्यायला पोलिस नसतील; जे आहेत त्यांच्यासाठी साध्या स्वच्छतागृहं आणि स्नानगृहांसारख्या सोयीसुविधा नसतील; दंगलीच्या, अतिरेकी हल्ल्यांच्या काळात संरक्षणासाठी चांगली बुलेटप्रूफ जाकिटं नसतील; त्यांना राहायला घरं नसतील; ३६ तास सलग ड्युटीमध्ये विश्रांतीची सोयही नसेल; पण गोमांस ओळखणारं किट आहे, ही काहीच्या काहीच अभिमानाची गोष्ट आहे.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......