अजूनकाही
२८ मे हा जगभर मासिक पाळीविषयक जागृतीचा दिन म्हणून साजरा केला जातो. WASH या संघटनेतर्फे सर्वांत पहिल्यांदा २०१४ साली हा दिवस साजरा केला गेला. मासिक पाळीच्या काळात घेण्याची काळजी, स्वच्छताविषयक खबरदारी याबाबत जागृती करण्यासाठीचा हा एक वैश्विक मंच आहे. बिगरसरकारी संघटना, एनजीओज अशा सगळ्यांच्या सहकार्याने या दिवशी जगभरात अनेक उपक्रम आयोजित केले जातात. मुलींना मासिक पाळीच्या दरम्यान खासगीपण, सुरक्षितता आणि सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न करत राहणे हा यामागचा हेतू आहे.
एकाच रंगातल्या ‘संस्कृती’चं अवडंबर माजवल्या गेलेल्या भारत देशात ‘मासिक पाळी’ ही नैसर्गिक शरीरधर्माची गोष्टही सांस्कृतिक राजकारणाची होऊन जाते. मूळ भारतीय असलेली एक किरण गांधी मासिक पाळीबाबतचे समाजातले भयगंड हटवण्यासाठी लंडन मॅरेथॉनमध्ये पाळीच्या काळात कुठलीच खबरदारी न घेता धावते. लाल रक्त वाहू देते. तिची ही कृती समाजमाध्यमांवर प्रचंड ‘व्हायरल’ होते. जगभरातली माध्यमं तिची दाखल घेतात. शबरीमलामध्ये कुणी एक भोंदू पुजारी महिलांच्या मासिक पाळीबाबत सनातन टिप्पणी करतो, तेव्हा सोशल मीडियावर ‘हॅप्पी टू ब्लीड’ असा विधायक संताप प्रकटतो.
पण भारतातला बहुसंख्य समाज आजही या ‘व्हर्च्युअल’ जगाच्या हजेरीपटावर अनुपस्थित आहे. कारण या जगाच्या पत्त्यावर त्याला पोचताच येत नाही. मग आजच्या मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त या जगातल्या वस्त्या, तांडे यांच्यातलं पोरी, बायांचं ‘अर्धं जग’ ब्लीड करताना हॅप्पी आहे का हे जाणून घ्यावंसं वाटलं. तसं नसेल तर त्यांच्या या आनंदात नक्की कुठले अडथळे उभे आहेत? ते अपरिहार्य आहेत का? हे आपण एकमेकांना विचारत, शोधत राहूयात असं वाटलं.
संध्याकाळी चारची वेळ होती. औरंगाबादच्या आंबेडकरनगरातल्या दोन आज्या गप्पा मारत निवांत बसल्या होत्या. मांडाबाई कांबळे आणि रुक्मनबाई खोतकर. त्यांना तुमच्यात बसू का जरा वेळ असं म्हणाल्यावर म्हणाल्या, ‘ये, बस की पोरी!’ ‘तू कुठली, काय करती?’ असं जरा झाल्यावर मी हळूच प्रश्न टाकला, ‘तुम्हाला पाहिलं न्हाण आलतं तेव्हाचं आठवतं का?’ माझ्या असं विचारण्यावर जरा पोक्त हसल्या अन म्हणल्या, ‘आमचं लगीन आधी झालं, आन मग दोनेक वर्षानं न्हाण आलं. आता एवढ्या सालाआधीचं कोण काय सांगाव? पर पाच रोज बाजूला बसाय लागायचं. भांडे घासणं, झाडझूड, धुणं हे मात्र कराय लागायचं. त्रास व्हायला लागला तर तो सासूला सांगायचीही सोय नसायची. बोललोच तर, ‘तूच एक नाजूक लागून गेली का!’ असे टोमणे ऐकाय लागायचे. नवऱ्याला तर डोळा उचलून बघायचीही लाज यायची. त्या रोजातही निवांत बसाय मिळायचं नाही. दुष्काळात जन्मलो आन वाढलो आमी. आमच्या कशाचंच काय कवतिक नवतं कुणाला.’
आज्या बोलत होत्या तशी एक पन्नाशीची काकू आली. मालताबाई खंदारे. चर्चा ऐकून म्हणाली, ‘आता काय मुली हुशार झाल्यात. आम्हाला तर शानं झाल्यावरपन काय झालं ते कळायचं नाही. आम्ही कपडाच वापरला. हे नेपकिन आम्हाला कुठले मिळायला? कपडे वापरायचे. ते धुवायला निरमा आणि सोडा. पोट दुखलं तर काळं मीठ घ्यायचं तेवढंच. काय जास्त दुखलं-खुपलं तरी अंगावरच काढाया लागायचं.’
तेवढ्यात पंचविशीच्या आतबाहेरची मुलगी आली. कडेवर बाळ. तिलाही मी तेच विचारलं तर जरा आढेवेढे घेत बोलली, ‘मला पहिल्यांदा पाळी आली तेव्हा आईनं समजावून सांगितलं असं का होतं ते. मग भीती जरा कमी झाली. लग्न झालं तेव्हापासून मिस्टर पाच दिवस माझी काळजी घेतात. मिस्टर मेडिकलवर जाऊन नॅपकिनसुद्धा आणतात. मला मात्र मेडिकलवर जाऊन आणायला संकोच वाटतो. आता माझ्या मुलीला मी ती वयात येण्याआधीच सगळं समजावून सांगणार आहे.’
तिथंच एक जीन्स शर्टचा युनिफॉर्म घातलेली चुणचुणीत मुलगी बसली होती. वंदन जाधव. सध्या बी.कॉम. करते. छान स्पष्ट बोलली, ‘सातव्या वर्गात अभ्यासक्रमात धडा होता. स्त्रीची आणि पुरुषाची प्रजननयंत्रणा त्यात शिकवली जायची. पण आमचे शिक्षक ती शिकवताना संकोचले. मी पाळीच्या काळात कधी शाळा-कॉलेज बुडवलं नाही. आई नवरात्राच्या काळात नऊ दिवस मला बाहेर बसायला सांगते. मला ते आवडत नाही. सॅनिटरी नॅपकिन आणण्यासाठीचे पैसे मी आईकडे मागते.’
मासिक पाळीविषयीची मराठी पुस्तके ऑनलाइन खरेदीसाठी पुढील लिंक्स वर क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3490
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3488
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3489
……………………………………………………………………………………………
बाजूला एक किराणा दुकानांचं छोटंसं खोपटं होतं. एक पन्नाशी ओलांडलेल्या चाची तिथं लहान पोरांना खेळवत खुर्चीवर बसल्या होत्या. आलं-गेलं गिऱ्हाईक बघत होत्या. नाव विचारल्यावर म्हणाल्या, ‘आस्मा शेख’. जरा लाजत हळू आवाजात सांगायला लागल्या, ‘हम मां बापके साथ खेतमेंच रहते थे. मैं १५ साल की थी तबीच शादी बना डाले मेरी. हमारे में इसको ‘गोदी आना’ बोलते. कुछ समझता नहीं था. अब क्या टीवी, मोबाईलकी वजेसे लडका-लडकी बहोत होशियार हो जाते. हमको तो रेडीओ पे गाने सुनने की भी इजाजत नहीं देती थी अम्मी! फिर क्या खाक समझेंगा हमको?’
तिथूनच मध्ये एक चिंचोळ्या गल्लीत काही बैठी घरं होती. मी गल्लीत शिरले तर समोरच दोन-तीन पोरी वेणीफणी करत बसलेल्या. रेश्मा शेख महानगरपालिका शाळेत आठव्या वर्गात शिकते. यास्मिन अवघ्या वीस वर्षांची. एक मुलगा आणि एक मुलगी आहे तिला. आरेफाचं लग्न ती १६ वर्षांची असताना झालंय. तिला तीन मुलं आहेत. यास्मिन सांगते, ‘पहिला पिरीयड मैं १३ साल की थी तब आया. सोलवे साल में शादी बना डाले. मुझे गये १ साल से पिरीयड आयाच नहीं.’ मी विचारलं, ‘फिर डॉक्टर को क्यू नहीं दिखाया?’ त्यावर तिचं उत्तर, ‘अब बच्चे तो हो गये. इसलिये नहीं दिखाया.’ आरेफा म्हणते, ‘हमारे में लडकी सयानी हुई तो उसको बुरखा पहनाते. जो पैसेवाला रहता वो लडकी की रोजा खुलाई करते. उसको नये कपडे, हरी चुडीयां पहनाते. फलों से गोद भरते. मंडप डाल के लोगों को खाना खिलाते. ‘अब हमारी लडकी को रिश्ते आयेंगे’ इस खुशी में ये जश्न मनाया जाता. उसको दरवाजे के अंदर रहने को बोलते. फिर जल्दी शादी कर डालते उसकी. जादा पढाना-लिखाना कुछ नहीं. आपका अच्छा है.’
तिच्या डोळ्यात हलकीशी उदासी दिसते. रेश्मा सांगते, ‘हम सॅनिटरी नॅपकिन युज करते. घर से कॅरी बेग लेकर मेडिकल को जाते. मोहल्ले के मेडिकलवाले की घरवाली अंदर रहती. उसको जाकर हम नेपकिन दो बोलते. नहीं तो किसी छोटे लडके को भेजते. पर बडे भाई को कभी नहीं. स्कूल में एक बार लडकियों को अलग बिठाकर एक डॉक्टर मेडमने सब बातें बताई थी. ये ऐसा होगया तबसे महिनेके पांच दिन स्कूल नहीं जाते. दाग लगा तो?’ तेवढ्यात रेश्माचा भाऊ अझीम बाहेरून आला. ती एकदम बोलायचं थांबली. शामिमबी म्हणजे या सगळ्याजणींच्या खाला, म्हणजे मावशी. पन्नाशी ओलांडलेल्या. म्हणाल्या, ‘ये पांच दिन कुराने पाक को छुने की इजाजत नहीं रहती. पर हमारे में बाहर नही बिठाते. हजरी आनेवाले लोग इन पांच दिनों में लडकियों के हाथ का खाते-पिते नई.’ मी विचारलं ‘हजरी आना याने?’ त्या म्हणाल्या, ‘वो आंग में आता नई क्या.’
हे वस्तीतलं चित्र. लाल रंगाच्या स्त्रावाला केवढ्या तरी वेगवेगळ्या रंगात बघणारं. मी या मुलींना विचारलं की ‘एक पॅड सहा तासांहून जास्त काळ वापरायचं नसतं. नसता त्यापासून संसर्ग होऊ शकतो. हे माहीत आहे का?’ यावर सगळ्यांचाच नकार आला. एकच पॅड दिवसच्या दिवस वापरत राहण्याकडे या सगळ्या जणींचा कल होता. कारण तसं करणंच आर्थिकदृष्ट्या परवडतं. सोबतच या काळात एखादं डेटॉलसारखं जंतूनाशक वापरणंही त्यांना परवडत नसल्याचं त्या म्हणाल्या. घरात पुरुष असताना टीव्हीवर सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती लागल्या की त्यांना संकोच वाटतो.
कलाताई राठोड मोतीराम राठोड यांच्या सहचारिणी. सरांसह नामांतराच्या चळवळीतही सक्रीय होत्या. पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते बुद्धप्रिय कबीर यांच्यासोबत त्यांच्या घरी गेले. बंजारा समाज. मासिक पाळीबाबत त्यांच्यातल्या प्रथा-परंपरा, बदलत्या धारणा याबाबत कलाताई अगदी प्रगल्भपणे आणि न संकोचता बोलल्या. म्हणाल्या, ‘पोरी, आम्ही लहानाच्या मोठ्या झालो ते तांड्यावर. पूर्वी तर तांडे अगदीच नागरी वस्त्यांपासून तुटलेले असायचे. बंजारा हा निसर्गाला देव मानणारा. त्यामुळं मुलगी वयात आल्यावर त्याचा इतका बाऊ करणं, विटाळ मानणं असं काही आमच्यात इतकं नव्हतंच कधी. मुलीच्या लग्नानंतर सासरच्या घरीही क्वचितच तिला त्या पाच दिवसात बाहेर बसवतात. मला माझ्या सासूनं कधी असं सांगितलं नाही. मीपण माझ्या सुनांना कधी असं म्हणले नाही. मला आठवतं, आमच्या तांड्याच्या बाजूला वडार वस्ती होती. त्यांच्यात मुलीला पहिल्यांदा पाळी आल्यावर पाच दिवस तिचे केस बांधत नाहीत. ती कुणाच्या नजरेला पडण्याआधी पहाटेच तिला न्हाऊ घालतात. खारीक-खोबरं खाऊ घालतात. आमच्यात मात्र मुलगी मोठी झाल्याचा गाजावाजा नसतो. तसा केला तर समाजाकडून तिच्या लग्नासाठी अजून तीव्रतेनं दबाव येईल अशी भीती असावी. पूर्वी हे होतं. आता चित्र बदलायलंय. वयात आल्यानंतरही मुली शिकायल्यात, डॉक्टर-वकील बनायल्यात. माझी नात तेजल सध्या लॉ करते. मला तर पहिली पाळीही आली नव्हती, तेव्हाच लग्न करून दिलं. आमचा पारंपरिक पोशाख चोळी-लहेंगा. सोबत ओढणी, आटी, चोटला, टोपली घुगरी असे सगळे अलंकार बायका अंगाखांद्यावर वागवतात. त्या चार-पाच दिवसात तर बाई त्रासून जाते. जास्त रक्तस्त्राव झाला की, ‘पगर लागली’ म्हणतात त्याला. मग असंच वैदू-जडीबुटीवाल्याकडे जायचं. कधी ‘बाहेरची बाधा’ म्हणत मांत्रिक गाठायचा. यातून बायका अॅनिमिक व्हायच्या. माझी एक बहीण आणि एक मेहुणी तर या त्रासातच वारली. आमच्या काळात तर बायका एकमेकांशीही हे सगळं बोलायला संकोचायच्या. आता मुली मोकळ्या झाल्यात. बोलतात, विचारतात आणि सांगतातही. अगदी नवऱ्याशीही त्या या विषयांवर हळूहळू बोलायला लागल्यात.’ कलाताईंचे चिरंजीव शंतनू राठोड माध्यमक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचं निरीक्षण नोंदवताना ते सांगतात, ‘मी लहान असताना माझ्या वयाच्या तांड्यावरच्या मुला-मुलींची देहबोली आजइतकी खुली नव्हती. आज वागण्यात मोकळेपणा आलाय. मात्र हेही एक आहे की, पूर्वी ‘पोरीला जरा सोड रे शाळेपर्यंत’ असं म्हणून कुणाही जुजबी ओळख असलेल्याच्या हाती पोरीला सोपवताना काही वाटायचं नाही कुणाला. आज मात्र असा बिनधास्त विश्वास कुणावर टाकण्याचे दिवस राहिले नाहीत. खुल्या होत जाणाऱ्या वातावरणातच हा एक विरोधाभास ठळक व्हायलाय.’
पूजा बायस सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करते. ती रजपूत आहे. मूळची जालना जिल्ह्यातल्या घुन्गर्डे हदगाव या लहानशा गावातली. ती सांगते, ‘आमचं एकत्र कुटुंब आहे. बायका बोलायच्या, ‘कावळा शिवला’ आणि बाहेर बसायच्या. मोठ्या बहिणीला जेव्हा पहिल्यांदा पाळी आली, तेव्हा मला सांगण्यात आलं, ‘आता काही काळात तुलापण या सगळ्याला सामोरं जायचं आहे.’ मला जेव्हा पाळी आली त्यावेळी आई गावी गेलेली होती. घरी माझ्या काकी होत्या. मला त्यांनी बाहेर बसवलं नाही. पण ‘देवाकडे जाऊ नको’ हे मात्र आवर्जून सांगितलं. नवरात्र असेल किंवा इतर सणाच्या काळात पाच दिवस बाहेर बसवलं जातं. सगळं खूप कडक पाळलं जातं. गावाकडे मैत्रिणी या विषयावर कधीच बोलायच्या नाहीत. मुलीमुलींमध्येही या विषयावर बोलायला त्या खूप संकोच करायच्या.
‘त्या चार दिवसांच्या काळात आई अगदी शत्रूच वाटायची. सगळेच रक्ताचे नातेवाईक अगदी विचित्रच वागायचे. घरातल्या सगळ्या माझ्या आधीच्या पिढीच्या स्त्रियांना त्या चार दिवसांबाबत नकळत्या वयापासूनच निक्षून सांगितलं गेलं होतं. त्यांच्या धारणा पक्क्या घडलेल्या आहेत. मी काकू, मोठ्या बहिणी यांना समजावण्याचा, बदलण्याचा प्रयत्नही केला. पण त्यांची मानसिकता बदलण्याच्या कुठल्याच शक्यता मला दिसल्या नाहीत. आईला जेव्हा मेनोपॉज आला तेव्हापासून तर ती या काळात पाळायच्या नियमांबाबत अजूनच कठोर बनली. इतरांवर खूप कडकपणे लक्ष ठेवू लागली. आमच्यात तर तीन दिवस आंघोळही करू देत नाहीत मुलीला. ‘त्या काळात पाठीवरून पाणी घ्यायचं नसतं’ असं त्यामागचं कारण सांगतात. पण मी खूप भांडून ती गोष्ट नाकारली. मग अंघोळ करायला पहाटे चार वाजता उठायला लागायचं. तेव्हाच कुणाच्याही नजरेला न पडता स्वत:चे कपडे धुवून टाकायचे. हे सगळं खूप नकोसं व्हायचं.
‘पुढे मी शिक्षणासाठी शहरात, औरंगाबादला आले. तरी बराच काळ मी ‘त्या’ दिवसांत देवदर्शनाला जायचे नाही. कारण गावाकडे याबाबत बोललं जायचं की, त्या काळात देवदर्शन घेतलं की घरात साप निघतो, घरातले लोणचे-पापड खराब होतात, कुणाचं डोकं दुखतं असं बरंच काय काय... पण एकदा मी गावी त्या काळात देवाला गेले आणि मग निरीक्षण केलं, की असं काही होतंय का. तर, तसं काही झालं नाही. मी गावी अशीही काही घरं पाहिलीत जिथं बाईला त्या काळात प्रचंड त्रास होतो, पण तरीही तिला कुणीच स्पर्श करत नाही. गोळ्या-औषधंही तिला दुरूनच देतात. हे पाहून तर या सगळ्यातली निरर्थकता अजूनच कळाली.
‘या काळात घरातल्या पुरुषांचं वागणंसुद्धा पूर्णत: या सगळ्याला सहमती देणारं आणि बऱ्याचदा बळकटी देणारं असतं. दैनंदिन व्यवहारात त्याचं प्रतिबिंब उमटताना दिसतं. याबाबत माझा मोठा भाऊ, दोघे-तिघे काका, वडील हे सगळे एकसारखेच सनातन आहेत. फक्त माझा एक भाऊ अजित बायस हा तेवढा खुल्या विचारांचा असल्याने त्याच्याशी या विषयावर मैत्रीचा संवाद होऊ शकतो. या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या सगळ्या प्रश्नांची आम्ही एकत्र चर्चा करतो. त्याला मी मेडिकलमधून सॅनिटरी नॅपकिन आणायलाही सांगू शकते.’
मासिक पाळी हा या सगळ्या बायकापोरींचा खासगी अवकाश. स्त्रीमुक्ती चळवळ सांगते, ‘जे जे खासगी, ते ते राजकीय’. मासिक पाळीसोबत जोडलेल्या खासगीपणाच्या अवगुंठनात केलं जाणारं राजकारण या स्त्रियांना उमगायला अजून किती काळ जावा लागेल?
हा लेख लिहीत असतानाच केंद्र शासनाने लागू केलेल्या वस्तू व सेवा करात (जीएसटी) जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून सॅनिटरी नेपकिन्सना वगळून त्यावर बारा टक्के कर लावल्याने सोशल मीडियावर रोष व्यक्त होतो आहे. त्यातही हा ज्यांच्या शरीराचा, आरोग्याचा विषय आहे, त्या महिलाच बहुतांशी भरभरून लिहीत आहेत. अनेक पुरुषही संवेदनशीलपणे कळीचे मुद्दे मांडताना दिसताहेत. मात्र बहुतेक जण ‘हे असं काहीबाही इथं चव्हाट्यावर लिहिणं-बोलणं शोभतं का’ असा सूर आळवताहेत. एकूणच, या एका निमित्ताने ‘मासिक पाळी’ या संकल्पनेभोवती लपेटलेल्या सांस्कृतिक धारणा अगदी अनेकरंगात प्रकट होताहेत.
लेखिका मुक्त पत्रकार आहेत.
sharmishtha.2011@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Alka Gadgil
Tue , 28 May 2019
Great reportage from ground zero, very insightful