“मी शीतल व्यंकट वायाळ, अशी चिठ्ठी लिहिते की, माझे वडील मराठा-कुणबी कुटुंबात जन्मले आहेत. शेतात सलग पाच वर्षांच्या नापिकीमुळं आमच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि नाजूक झाली आहे. माझ्या दोन बहिणींची लग्नं छोटेखानी पद्धतीनं करण्यात आली. पण माझं लग्न करण्यासाठी दोन वर्षांपासून बापाची दरिद्री संपत नव्हती. कुठल्याही बँकेचं किंवा सावकाराचं कर्ज माझ्या बापाला न मिळाल्यानं दोन वर्षांपासून माझं लग्न खोळंबलं होतं. त्यामुळं मी माझ्या बापावरील वजन कमी करण्यासाठी आणि मराठा समाजातील रूढी, परंपरा, देवाणघेवाण कमी करण्यासाठी स्वखुशीने आत्महत्या करत आहे. मला व माझ्या कुटुंबाला समाजाने कुठलाही दोष देऊ नये.”
……………………………………………………………………………………………
लातूर जिल्ह्याच्या भिसे वाघोली येथील शीतल या २१ वर्षीय तरुणीनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिनं हे पाऊल उचलायला भाग पाडलेल्या दु:खाची करुण कहाणी या चिठ्ठीतून मांडली आहे. तिची ही चिठ्ठी प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारी आहे. अनेक वर्षं हे दु:ख घेऊन जगत असलेल्या शीतलनं या चिठ्ठीतून एकाच वेळी अनेक मुद्द्यांना वाचा फोडली आहे. निसर्गावर अवलंबून असलेली शेती, वडिलांचं कर्जबाजारीपण, घरातील गरिबी, हुंड्यापायी खोळंबलेलं लग्न, लग्नासाठी कर्ज काढण्यासाठी वडिलांची होत असलेली ससेहोलपट, समाजातील रूढीपरंपरा अन् बरंच काही... शीतलनं अनेक मुद्दे उपस्थित केले असले, तरी या सर्व मुद्द्यांच्या केंद्रस्थानी लग्न आणि लग्नाभोवतीच्या रूढी, प्रथा, परंपरा आहेत. त्यातच शीतलनं चिठ्ठीत मराठा-कुणबी समाजाचा उल्लेख केल्यानं या समाजातच हुंडा, प्रथापरंपरा किती घट्टपणे रुतल्या आहेत, यावर चर्चा होऊ लागली. नुसती चर्चाच नव्हे, तर मराठा समाजालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याइतपत टीका होऊ लागली. मराठा-कुणबी हा समाज मोठ्या प्रमाणात शेती आणि शेतीवर आधारित व्यवसायांत गुंतलेला आहे. मोठ्या प्रमाणात जमीनमालकी या समाजाकडं आहे. राजकीय वाटाही या समाजाकडंच सर्वाधिक एकवटला आहे. त्यामुळे, हुंडा आणि प्रथा परंपरा या समाजात नक्कीच खोलवर रुजल्या आहेत. परंतु, शीतलनं मांडलेल्या दु:खाची झळ ही कोण्या एका समाजापुरती मर्यादित नाही. आज सर्वच समाज या लग्नाच्या रूढी, प्रथा, परंपरांत गुरफटला आहे. हुंडा ही सर्वच समाजाला लागलेली कीड आहे, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती स्वीकारल्याशिवाय आपल्याला त्याची दाहकता कळणार नाही. या सर्व पोर्शभूमीवर शीतलनं उचललेलं पाऊल चूक की बरोबर, हे सांगणं योग्याअयोग्यतेच्या पलीकडचं आहे. इतकी वर्षं समाजात सर्रासपणे सुरू असलेल्या या प्रथापरंपरेबद्दल उघडपणे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दुर्दैवानं त्यासाठी आणखी एका शीतलचा बळी गेला. परंतु, आता सुरू झालेली चर्चा ही केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता, त्यातून काही तरी ठोस मार्ग निघायला हवा, तरच आपण अशा अनेक शीतलना न्याय देऊ शकू.
प्रथा, परंपरा... की खोट्या प्रतिष्ठेचा बडेजाव?
खरं तर, या चर्चेच्या केंद्रस्थानी लग्न समारंभच आहे. लग्न हा प्रकार अनेक अर्थांनी परंपरेशी जोडला गेला आहे. त्यापैकीच अदृश्य स्वरूपात असलेली गोष्ट म्हणजेच हुंडा होय. लग्नात उपस्थित असलेल्यांसाठी हुंडा ही अदृश्य असली, तरी त्याचा हिशेब अगदी सरळ असतो. सारा काही देण्या-घेण्याचा व्यवहार. त्याशिवाय लग्नाची बोलणीच पुढं सरकत नाहीत. रोख रक्कम आणि तोळ्यांच्या हिशेबातील सोनं या चर्चेचा केंद्रबिंदू. (अलीकडं फोर व्हीलर, फ्लॅट, नोकरी लावून देणे याचीही त्यात भर पडत आहे.) त्यावर चर्चा होते. फुगवून सांगितलेला आकडा असल्यानं मुलीच्या नातेवाइकांकडून सुरुवातीला आडंवाकडं घेतलं जातं. बोलणी फिसकटतात. पुन्हा बोलणी सुरू होतात. काही प्रमाणात तडजोड होते. अन्यथा, आहे तो आकडा स्वीकारावा लागतो. अखेर एक आकडा निश्चित होतो अन् लग्न या नावाखाली रोकड आणि तोळ्यांचा बाजार मांडला जातो. समाजातील प्रतिष्ठितांनी, बुजुर्गांनी ही व्यवस्थाच तशी निर्माण करून ठेवली आहे. आजही अनेक ठिकाणी त्या व्यवस्थेला नाकारता येत नाही किंवा ओलांडता येत नाही, अशीच परिस्थिती. ही व्यवस्था केवळ एका समाजांत नाही, ती कमी-अधिक प्रमाणात सर्वच समाजात दिसून येते.
मग प्रश्न पडतो, खरंच हुंडा दिल्या-घेतल्याशिवाय लग्न होऊ शकत नाही का? तर, त्याचं उत्तर निश्चितच ‘होतं’ असं येईल. पण, तरीही हुंड्याबाबत इतका अट्टहास का? तर, त्याचं उत्तर आपल्याला परंपरेत सापडतं. त्यातलं पहिलं उत्तर म्हणजे, आतापर्यंत चालत आलंय म्हणून... त्यानंतर मुलाची किंवा त्याच्या वडिलांची संपत्ती, मुलाची नोकरी, त्याची किंवा त्याच्या कुटुंबाची समाजातील प्रतिष्ठा, आपल्या मुलीचा संसार सुखाने व्हावा, तिला सासुरवास भोगावा लागू नये, ही मुलीच्या आई-वडिलांची अपेक्षा वगैरे... अशी कारणं या परंपरेला बळकटी देणारी असल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणजे हा सारा काही असलेल्या किंवा नसलेल्या प्रतिष्ठेचा खेळ अन् त्यातून सुरू असलेला व्यवहार होय. पण, मुळात दोन जीवांच्या एकत्र येण्यात आर्थिक व्यवहार होणं हाच सामाजिक भ्रष्टाचार आहे. तरीही या भ्रष्टाचाराला खतपाणी घातलंच जातं. कधी वडिलांची इच्छा आहे म्हणून, कधी मुलाची इच्छा आहे म्हणून कधी मुलाच्या आईची इच्छा आहे म्हणून तर कधी मुलीच्या आई-वडिलांची द्यायची ताकद आहे म्हणून... त्यामुळं हुंडा ही एक परंपरा म्हणून आतापर्यंत चालत आलेली बाब आहे. हुंडा ही परंपरा म्हणून चालत आलेली बाब असेल, तर जितकं हौसेनं दिलं जातं, तिचा आनंदानं स्वीकार व्हावा, पण; तसं होताना दिसत नाही. त्यामध्ये अधिक हटवादीपणा दिसून येतो. जणू काही एक प्रकारे लिलावात सुरू असलेल्या बोलीप्रमाणंच हुंड्याची बोली लावली जाते. यात तथाकथित मुलाची वडिलांची कर्तबगारी, गावातील प्रतिष्ठा जितकी अधिक तितकी हुंड्याची बोली अधिक, असा हा सारा मामला अनुभवास मिळतो.
हे झालं हुंड्याबाबत. पण, सारं काही इथंच थांबतं, असं नाही. हुंड्याला मुलीच्या वडिलांची संमती मिळणं म्हणजे लग्नाच्या वाटचालीतील केवळ एक टप्पा पूर्ण झाला, असं म्हणता येईल. त्यानंतर सुरू होतं मानपाननाट्य. यातून दोन कुटुंबांत जणू काही बांधावरचा संघर्षच दिसून येतो. मानपानात काय असावं, यापेक्षा, मिळतंय ना आता, तर घ्या दणकून हीच प्रवृत्ती अधिक. त्यानंतर ठरतो तो बस्ता बांधण्याचा बेत. लग्नातील मुलाचे कपडे मुलीकडच्यांकडून आणि मुलीचे कपडे मुलाकडच्यांकडून घेतले जातात. दोन्हीकडच्या महिला मंडळींच्या मानाच्या साड्याही याच प्रकारे घेतल्या जातात. त्यात आजीची वेगळी, आईची वेगळी वगैरे वगैरे... या कपडेखरेदीलाच दिलं गेलेलं नाव म्हणजे बस्ता... बहुतांश लग्नांचा बस्ता बांधणं ही मुलीच्या बापाच्या हृदयाचे ठोके चुकवणारी प्रक्रिया असते. नव्याने एकमेकांशी जोडल्या जाणाऱ्या या कुटुंबांमध्ये एक प्रकारची स्पर्धाच लागलेली असते. मुलीकडच्यांनी किती रुपयांची साडी काढली, त्यावर मुलाचा ड्रेस ठरतो. मग मुलाचा भाऊ वरदेव असतो, त्याला मुलीकडचे कपडे घेतात. मुलीचा भाऊ कान पिळणारा असतो, त्याला मुलाकडचे कपडे घेतात. त्यातही आवडीपेक्षा किमतीची बरोबरी किंवा बरोबरीहून अधिक करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे, कोणाला किती आवडणारे कपडे आनंदाने घेतले, यापेक्षा कुणाची किती लूट झाली याच्या कथा अधिक चवीने चर्चिल्या जातात.
हे नक्कीच परंपरेशी नातं सांगणारं नाही. त्यात आहे तो म्हणजे बडेजाव... पण, या बडेजावापोटी घेतलेले कपडे निदान नंतरच्या आनंदाच्या प्रसंगी तरी वापरता यावेत, ही अपेक्षा करायला काय हरकत आहे, पण तसं काही होताना दिसत नाही. खरं, तर हा विचार मुलाने आणि मुलीनेही आपल्या आई-वडिलांच्या पैशांची लूट होत असताना करायला हवा. पण नाही... मुलाने सूट किंवा शेरवानी घ्यायची, जी लग्नानंतर कधी वापरलीच जात नाही. मुलीने महागाची साडी घेतली, तरी ती निदान अनेक कार्यक्रमांत परिधान तरी करू शकते. पण मुलांचं तसं होत नाही. केवळ लग्नासाठी म्हणून मिरवण्यासाठी केलेली, ही खोट्या प्रतिष्ठेपायीची लूटच नव्हे का?
हुंडा, मानपान, बस्ता याशिवाय आहेर, सप्रेम भेट आणि कन्यादानाच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या वस्तू, याही तथाकथित परंपरेतच मोडतात. खरं तर यामागचा मूळ पारंपरिक उद्देश काय, तर मुलीचा प्रपंच उभा करून देणे... तिला दैनंदिन वापराच्या वस्तू देणे वगैरे... वगैरे... पण या परंपरेच्या नावाचा बाजार मांडताना वस्तूंचा अवघा बाजारच मांडवात उभा केला जात आहे. अशा वस्तू देण्याची जबाबदारी ही जवळच्या नातेवाइकांवर... मग त्यांनी जितकी मोठी वस्तू घ्यायची तितका त्यांना भाव... मग आपल्या लाडकीच्या लग्नात या वस्तू देण्यास काका-मावशी, मामा-मामी, आत्याही तयार होतात. यातला सगळा व्यवहार देवाण-घेवाणीच्या भाषेवर आकार घेत जातो. त्यात मुलाच्या घरच्यांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या जातात. मोठ्या मुलाचं लग्न असेल, तर ज्या वस्तू नाहीत त्या यायला हव्यात, असं म्हणायचं. दोन नंबरचा मुलगा असेल, तर पहिल्या मुलाला आलेल्या वस्तूंपेक्षा चांगल्या आणि जास्त वस्तू यायला हव्यात, असं म्हणायचं... मग काय, मुलीला ‘काय दिलं तुझ्या माहेरच्यांनी?’ असे टोमणे ऐकावे लागू नयेत म्हणून मुलीचे आई-वडील, नातेवाईक सारं काही मांडवात आणून ठेवतात. त्यातही गरजेच्या किती आणि प्रतिष्ठेच्या वस्तू किती, याचा हिशेब केल्यास प्रतिष्ठेचंच पारडं जड होतं. म्हणजे, आपली मुलगी खेड्यात नांदणारी असली, तरी तिला फ्रीज, वॉशिंग मशीन अशा वस्तू द्यायच्याच.
मग, तिच्या गावात त्या चालवण्यासाठी वीज का नसेना, वस्तू ठेवण्यासाठी जागा का नसेना... आपल्याला मिळालेलं आणि सासरच्यांना दिलेलं समाधान महत्त्वाचं... केवळ मोठेपणा आणि चुकीच्या अपेक्षापूर्तीतून हे केलं जातं... अलीकडच्या काळात नातेवाइकांकडून अगोदरच पैसे घेऊन काही मोजक्या पण चांगल्या वस्तू देण्याचा प्रयत्न होतही आहे, परंतु हे बोटावर मोजण्याइतपतच...
प्रथापरंपरेच्या नावाखाली सर्रासपणे सुरू असलेल्या या काही गोष्टी पाहिल्यास शीतलसारख्या वडिलांचे होत असलेले हाल निश्चितपणे समजतील. लग्न हा समारंभ आनंदाचा बनण्यापेक्षा प्रतिष्ठेचा बनत आहे, मुलीच्या वडिलांना मुलीचं लग्न झाल्याचा आनंद देण्यापेक्षा त्याला दु:खाच्या-कर्जबाजारीपणाच्या खाईत लोटलं जात आहे, हे मुलाकडच्यांना कळत नाही, असं नाही... ते त्यांनाही कळतं... सासरी जाणाऱ्या मुलीलाही कळतं... प्रसंगी ही मुलगी हुंडा न घेणार्याशीच लग्न करण्याचा निश्चय करते... पण त्यातून लग्न रेंगाळण्याशिवाय तिच्या पदरी काहीच पडत नाही. म्हणून तिला आणि प्रसंगी वडिलांनाही माघार घ्यावी लागते, हे वास्तव आहे. या बेड्या तोडण्याची जबाबदारी पुरुषांची आहे. एका बाजूला पुरुषसत्ताक थाटाच्या बाजेत वावरणार्या पुरुषांना आपण हुंड्यासारख्या प्रथांना बळकटी देत आपला स्वाभिमान विकत आहोत, याची जाणीव का होत नाही? किमान स्वाभिमान बाळगणाऱ्यांनी तरी याची सुरुवात केल्यास ती नक्कीच दिशादर्शक ठरेल, यात काही शंका नाही.
सामाजिक बाजू
लग्न आणि भोवतालचे व्यवहार ही कीड काय आहे, हे नीट समजून घ्यावे लागेल. ज्यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली आहे, त्यांना आपली संपत्ती दाखवण्याचे निमित्त म्हणजे उत्सव! त्यापैकी लग्न हा एक प्रमुख. ग्रामीण समाजात मात्र परिस्थिती तेवढी चांगली नसली, तरी हौस म्हणून किंवा कुणाची तरी बरोबरी म्हणून लग्नाचे न परवडणारे अनेक व्यवहार केले जातात. हे व्यवहार लग्न ठरवण्याच्या विचारापासून असतात. यामध्ये मुळात पुरुषसत्ताक मानसिकता असते. ही मानसिकता फक्त पुरुषातच असते असं नाही, तर ती महिला वर्गातदेखील आहे. त्यात पुरुषी प्रतिष्ठा हा केंद्रबिंदू असतो. आपल्या मुलीला जितकं दिलं आहे, तितकं मुलाच्या लग्नात वसूल व्हायलाच हवं-ही मानसिकता असते. मात्र, या प्रतिष्ठेच्या कल्पनेत परंपरा नावाचं भरीव अज्ञान असतं. सगळ्या मुलींच्या बापांना असं वाटत असतं की, आपली मुलगी चांगल्या घरात द्यायची. पण असं असूनदेखील मग अनेक मुलींचं ग्रामीण भाषेत ‘वाट्टोळे’ का होतं? लग्न ठरवण्याच्या किंवा जोडीदार शोधण्याच्या प्रक्रियेत ज्यांचं लग्न ठरत असतं, त्यांच्यात किती संवाद होऊ दिला जातो? असा संवाद ‘चांगला’ नसतो, अशी समजूत आहे आणि हीच परंपरा आहे.. इथं पहिली गडबड आहे.. अर्थातच लग्नापूर्वी अजिबात संवाद न झालेल्या अनेक जोडप्यांचं आयुष्य देखील चांगलं गेलेलं आहे. पण ते पर्याय नसल्यामुळे... किंवा किमान अंगभूत समजूत असल्याने. त्यामध्ये नातं, त्यातली जबाबदारी या गोष्टींना कितपत स्थान असतं, हा एक संशोधनाचा विषय आहे. त्याला कारणीभूत हाच समाज आहे.
लग्न भव्यदिव्य झालं पाहिजे, असं लोकांना का वाटतं? उत्सव साजरे व्हावेत, त्यातून आनंद मिळतो. पण जे उत्सव प्रत्येक वेळी कुठल्या तरी एका कुटुंबासाठी दीर्घकालीन पेच अन् संघर्ष वाढवणारे आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. बडेजाव करणं ही रीत असू शकत नाही. त्यातच ती परिस्थितीला परवडणारी नसताना साजरी होत असेल, तर हा मानसिक आजार आहे. लग्नात खूप सगळा खर्च होऊन अंतिमतः दोन्ही बाजू फार खूष असतातच असं नाही. अगदी बारीक गोष्टींवरून नाराजीनाट्य असतंच. त्यात स्वयंपाकात कमी-जास्त झालं तरी असतं किंवा अगदी लग्न लागण्यापूर्वी नवरदेवासमोर बेधुंद अवस्थेत नाचणाऱ्यांना मुलीकडचं कुणी आवरायला गेलं, तरी नाराजीनाट्य होतं. म्हणजे एवढं करून त्यात आनंद मिळत नसेल, समाधान लाभत नसेल तर हे का करायचं? ज्यांना खूश करायचं ते खूश नाहीत, ज्या संसाराला उभं करायचं त्यातल्या वस्तू नीट नाहीत; मग तरी हे का करायच? यासाठी लागणारे पैसे कर्जाऊ आणायचे? पैसे नसताना हे करायचं आनंद नाही, खोटा मोठेपणा मिळवून ही लूट होत आहे... कुणाचं नुकसान आणि कुणाचा फायदा? हे का लक्षात घेतलं जात नाही... समाज म्हणून या तळातील वास्तवावर आपण कधी बोलणार आहोत? बड्या मंत्र्यांची बडी लग्नं माध्यमांना चर्चेचा विषय बनवता येतात.. पण परिस्थिती नसताना हे होतंय अन् हे सगळं स्पष्ट दिसत आहे... याच काय करायचं?
लग्न ही संस्कृती आहे लग्न हा धार्मिक सोहळा आहे आणि लग्न हा आजच्या काळातील हिंदू धर्मातील मोठा आजार आहे. लग्न साधी झाल्याने हिंदू धर्म संपणार नाही.. कारण लग्नाच्या सव्यापसव्याने पाश्चिमात्य समाजात काळजी करण्यासारखी परिस्थिती ओढवल्याचे ऐकिवात नाही. मग हे जर मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मात होत असेल, तर हिंदू धर्माची रात्रंदिन काळजी करणार्यांनी ‘आपले’ लोक या रीती-रिवाजांमुळे खचून जात आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. धर्माची नव्हे, तर धर्माच्या नावाने जगणार्रा लोकांची काळजी केंद्रस्थानी असली पाहिजे. यामध्ये धर्माला आव्हान नाहीच; मुळात चुकीचे जे व्यवहार आकाराला येत आहेत, ते थांबले तरी मोठ परिवर्तन होऊ शकतं. कारण लग्नासाठी कर्ज काढून पैसा लावला जातो, एवढीच यातली अडचण नाही; तर मुलीच्या जन्मापासून कैक आई-वडील नियमित जगण्याच्या आवश्यक गोष्टी बाजूला करून पैसा वाचवतात. याला ग्रामीण भागात ‘पोटाला चिमटा घेऊन जगणं’ म्हणतात. त्यामध्ये अगदी मुलींचं- मुलांचं शिक्षण लवकर थांबवणे, आवश्यक कपडे व आवश्यक आहाराच्या आणि एकूणच आवडीच्या जगण्याला तिलांजली देत हे केलं जातं...
सणवार आनंदाने केले जात नाहीत. प्रवास केला जात नाही. मग जर लग्न हे मुलीच्या आई-बापाचा इतका जीवघेणा संघर्ष घडवत असेल, तर ते थांबायला नको का? लग्नापूर्वी पैसे वाचवत जगायचं आणि लग्नानंतर उरलेलं आयुष्य कर्ज फेडण्यात घालवायचं.. हे असं किती दिवस चालणार? जगण्यातील जिवंतपण हरवून हा लढा चालतो अन् चालत आला आहे. ज्या मुलीच्या आई-बापांनी ते केलंय त्यांची मुलगी पुढे तेच करते. हे चक्र आहे. ते फिरत आहे आणि आपण सगळे पाहत आहोत. त्या लुटीत आपलाही सहभाग आहेच! या एकदिवसीर मोठेपणाचा आप्तस्वकीयांसह लुटारू उत्सव साजरा होत आहे आणि आपण पाहत आहोत. अर्थात हे सगळं होऊन मुलगी सुखानं नांदवली गेली, तर जग जिंकलं. नाही तर आजकाल ग्रामीणच काय, शहरी भागातदेखील मुलींची लग्नानंतरची पिळवणूक थांबलेली नसते. जग बदलतंय असं म्हणत असताना हे जग का बदलत नाही, असा बधिर करणारा प्रश्न मात्र सतावत राहतो.
राजकीय बाजू
आपल्या समाजात आजही अनेक प्रश्न असे आहेत, जे शैक्षणिक-सामाजिक मागासलेपणाशी निगडित आहेत. त्यावर सरकारचे धोरण अपेक्षित नाही. मात्र, त्यावरचा तोडगा सामाजिक-राजकिय नेतृत्वाच्या हातात निश्चित आहे. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे लग्न आणि लग्नाभोवतीचे व्यवहार! विशेष म्हणजे, याबाबतीत समाजाची आधुनिक विचार आणि व्यवहाराशी सांगड घालण्याचा प्रयत्न घडवून आणला, तरी त्यातून प्रगतीचं एक पाऊल समाज टाकू शकतो... खरं तर हे राजकीय नेतृत्वाला अधिक प्रमाणात शक्य आहे. कारण आजही ग्रामीण भागात अंत्यविधीपासून विवाह समारंभापर्यंत सगळीकडं राजकीय नेत्यांच्या उपस्थितीला खूप महत्त्व असतं. एका बाजूला राजकीय नेत्यांना आणि राजकारण्यांना लोक कितीही नावं ठेवत असले, तरी नेत्यांची उपस्थिती त्रात प्रतिष्ठेचीच ठरते. म्हणजे जनमानासात जर नेत्यांना एवढं अढळ स्थान असेल, तर अशा मागासलेल्या मानसिकतेचं प्रबोधन राजकीय नेतेच करू शकतात. पण जनमताचा रेटा आपल्यावर नाराज होईल म्हणून मागासलेपण पुसण्याचे प्रयत्न राजकीय नेतेमंडळी करताना दिसत नाहीत. त्यात दुसरी बाजू अशीदेखील असते की, स्थानिक पुढाऱ्यांना आपले नाव लोकांच्या मनात ठसवण्याला लोकांची लग्नं हातभार लावतात. अवघ्या उपस्थितीच्या किमतीत त्यांना आपलं नाव काही प्रमाणात पोचवण्यात यश मिळतं. अनेक लग्नांत अलीकडच्या काळात सत्काराला फाटा देऊन ते पैसे सामाजिक किंवा धार्मिक कामाला वळवले जातात. असं असलं तरी पुढाऱ्यांची नावं तिथं घेतली जातात. सत्काराला फाटा देणारे लग्नाचे आयोजक असले, तर सत्कार स्वीकारण्याला फाटा दिलेले पुढारी दिसत नाहीत. त्यामुळे राजकीय नुकसानी या भीतीपोटी लग्नातील प्रथा-परंपरा मोडीत काढण्याची भाषा राजकीय नेतृत्व करत नाही. अशा दुहेरी भानगडीत लग्न नावाचा सामाजिक-धार्मिक व्यवहार अडकलेला आहे. त्यामध्ये फक्त हुंडा देणे-घेणे वाईट नसून त्याभोवतीचे असंख्य व्यवहार मुळात वाईट आहेत.
लग्नपरंपरेत एकाएकी बदल घडवणं अवघड असलं, तरी त्यावर सामाजिक व्यवहाराच्या अपेक्षित प्रवाहात त्याला परावर्तित करणं मुळीच अशक्य नाही. सामाजिक आव्हान म्हणून आणि बदलत्या आर्थिक-सामाजिक गरजा लक्षात घेत एक राजकीय आव्हान म्हणून याकडे पाहिलं जावं. अलीकडील काही नेत्यांच्या घरचे विवाह समारंभ पाहिल्यास ते कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारे असतात. शाही थाटात होणारे हे लग्न राजकीय नेतृत्वांना परवडणारे असले, तरी लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना समाजात आदर्श निर्माण करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. परिस्थिती असतानाही साधेपणानं लग्न करणे हे राजकीय नेत्यांना ‘शोभणारे’ नसते, पण विवाह समारंभात पैशांची अशी उधळपट्टी राजकीय नेत्यांकडून होणे नक्कीच शोभनीय नाही. काही राजकीय नेते सामुदायिक विवाह समारंभात विवाहबद्ध होत आहेत, काही जण स्वत:च्या विवाह समारंभात अनेक जोडप्यांना विवाहबद्ध करीत आहेत, हे निश्चितच स्वागतार्ह पाऊल आहे; परंतु, या संख्येत वाढ व्हायला हवी. तर, परिवर्तन निश्चित आकार घेऊ शकेल, याबाबत तिळमात्र शंका नाही.
आर्थिक प्रश्न
लग्नातील सगळ्या ‘थोर’ परंपरा अर्थकारणाभोवती पिंगा घालत आहेत. यात ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना तो कुठे-कुठे खर्च करायचा असा प्रश्न असतो; त्यांना या परंपरा सेलिब्रेट करण्याचं निमित्त मिळतं. त्या निमित्तातूनच स्वतःची तथाकथित सुबत्ता दाखवण्याची संधी असते. पण ज्यांच्यासाठी नियमित सर्वसाधारण जगणं हेच एक संकट असतं, त्यांच्यासाठी या परंपरा नियमित संघर्षाच्या जगण्याला अधिक अडचणीत आणणार्रा आहेत अन् असतात. लग्नात हुंडा आणि सगळीच देवाण-घेवाण, परंपरा, मानपान या सगळ्याच गोष्टी अर्थकारणाशी निगडित आहेत. धोक्याच्या आणि संकटाच्या बाजूनं पाहिलं, तर जो व्यवहार यामध्ये होतो तो मुळात परिस्थितीजन्य असत नाही. फक्त खूष करण्याच्या नावाखाली आपलीच फसवणूक करून घेण्याचा हा प्रकार असतो. खरं तर ज्या अज्ञानाच्या सावटाखाली आणि परंपरानामक गुंफ्यात लग्न नावाची भानगड पार पडते, तोच एक घोर सामाजिक फसवणुकीचा प्रकार आहे. आपल्या आर्थिक परिस्थितीला काय पेलू शकतं याचा विचार व्हावा, असं सर्वांना वाटत असतं. पण जे काही आपण करत आहोत त्यात केवळ वरवर खूश करण्याच्या नावाखाली आपण किती बुडत चाललो आहोत, हे लक्षात घेतलं जात नाही. हौसेच्या बाबतीत कपडे नवीन घ्यायला हवेत, हा मुद्दा काही अंशी वगळला, तर बाकी हौस म्हणजे लूट घडवण्याचा प्रकार आहे. तो कसा, तर लग्नात बँड लावला जातो... तो असावा की, नसावा इथपासून प्रश्न आहेत. त्यात अलीकडे प्रचंड ध्वनिप्रदूषण करणारा डी. जे. लावला जातो. त्याचा आनंद कमी आणि त्रासच जास्त असतो. जेवढा डी.जे. मोठा तेवढे पैसे जास्त.. जेवढे पैसे जास्त तेवढाच त्या लग्नात ‘नाच’ जास्त असतो.. हे नाचणारे कोण असतात? ते काय करतात? अलीकडे नाचायला अल्कोहल लागतं. अल्कोहल जास्त झालं की, अनेकदा वादावादीचं रूप येतं. त्यातच अशा हौशी नाचणार्यांमुळे उपस्थितांचा वेळ जातो.. त्या वेळेची किंमत काढली जात नाही. लग्नात नेमके, लोक येतील किती हे ढोबळ मानानं गृहीत धरलं जात.. गृहीत धरलेल्या लोकांपेक्षा थोडा जास्त स्वयंपाक केला जातो.. त्याचं कारण कमी पडू नये, हे असतं.. पण अनेकदा स्वयंपाक उरतो आणि तो वाया जातो. लग्न वेळेवर लावलं जात नाही. लग्न उशिरा लागतं लोकांची भूकमोड होते त्यामुळं देखील स्वंयपाक वाया जातो. हे नियोजनाच्या अभावाचं नाही, तर हट्टी मागासलेपणांच लक्षण आहे. लग्नात वाया जाणार्रा क्रयशक्तीचा हिशेब लावण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात येईल की, किती मोठे नुकसान आपला समाज या सगळ्या प्रक्रियेत करत असतो. मात्र त्यावर कोणीही विचारसुद्धा करायला तयार नाही. परंपरांविषयी आदर असायला हरकत नाही, पण काळाच्या तुलनेत केवळ चालत आलंय म्हणून करत राहणं बरोबर नाही...
काय व्हायला हवं?
खरं तर कोणताही सामाजिक प्रश्न आपल्यासमोर येतो तेव्हा या बाबत प्रबोधन व्हायला हवं. समाजाची मानसिकता बदलली पाहिजे, अशी चर्चा तावातावाने केली जाते. याचा परिणाम असा होतो, त्यातून अनेकदा दीर्घकालीन उपाय आणि मार्ग जरा दूर राहतात अन् तोवर मूळ प्रश्न मात्र अधिक वाढत जातो. प्रबोधन हा पर्याय आहे. मात्र, काही पर्याय त्यापलीकडे आहेत. त्यामध्ये ज्यांनी हुंडा नाकारला, ज्यांनी या खर्चाला आणि रीती-रिवाजाला फाटा दिला, ज्यांनी रजिस्ट्रर मॅरेज केले, ज्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न केले, ज्यांनी लग्नाचा खर्च वाचवून सामाजिक कामाला मदत केली अशा लोकांनी पुढे येऊन आम्ही हे का केल; हे सांगितलं पाहिजे. त्यांचं अनुकरण करू शकतील, असे लोक प्रेरित केले पाहिजेत. ‘रोल मॉडेल’ परिचित असेल, तर त्याच अनुकरण लवकर होत असतं. त्याचबरोबर सगळ्याच गोष्टी एकदम घडाव्यात असा आग्रह धरू नये. एक- एक गोष्ट हळूहळू नाकारली जावी. यामध्ये मुलाचा पुढाकार असावा. मुलींचा असायला हरकत नाही, पण त्यांनी पुढाकार घेतला तर ते त्यांनाच ऐकवलं जातं. त्यात अडचणी निर्माण होतात. मुलाचा पुढाकार पहिल्या टप्प्यावर समजून सांगणे, नंतर त्याचा शांत मार्गाने आग्रह धरणे, असे काही मार्ग आहेत. अर्थात हे तत्कालीन मार्ग आहेत. हुंडा व मानपान नाकारल्याच्या अतिशय नेमकेपणाने आणि जाणीवपूर्वक लिहिलेल्या कथागोष्टी अभ्यासक्रमात आणणे, हा एक दीर्घकालीन उपाय ठरू शकतो. प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यापासून प्रत्येक टप्प्यावर अभ्यासक्रमात हे मांडलं गेलं, तर यात काही प्रमाणात बदल होऊ शकतात. आई-वडील, शिक्षक, पोलीस, पत्रकार, लेखक ,विचारवंत या सर्वांनी दीर्घकालीन उपयांवर विचार करावा. त्यातच कोणत्याही दीर्घकालीन बदलांसाठी अगोदर विचार द्यायला हवा आणि तात्कालिक बदलासाठी रोल मॉडेल समोर असावे. अर्थात, या सगळ्या गोष्टी करत असताना समाजाला आपण जे करत आहोत ते अधिक खोलात जाऊन त्यातील विरोधाभास स्वतःला सुशिक्षित मानणाऱ्यांनी लक्षात आणून द्यायला हवेत. ते लक्षात आणून देण्यापूर्वी कुणाचं घर खचतंय आणि कुणाचं भरलं जातंय, हे समजून घ्यायला हवं.. यात शिक्षकांनी स्वतः हुंडा घेतला असला, तरी आपल्या मुला-मुलींना देऊ-घेऊ नये आणि आपल्या विद्यार्थांना तसे घडवण्याची शपथ द्यावी. कारण जी पिढी तुम्ही शिक्षक तयार करणार आहात, तोच उद्याचा समाज असतो. शिक्षकांसोबत पोलिसांची पण यात मोठी जबाबदारी आहे. त्यांनी सर्वप्रथम हुंडा आणि त्याच्या भोवतालचा व्यवहार नाकारावा, तरच हुंडाबंदीचा कायदा त्यांना लादता येईल.. आणि ते त्यांच्यासमोर येणार्रा केसेस स्वाभिमानाने हाताळू शकतील. यात शिक्षक आणि पोलीस या दोन्ही घटकांना खूप सरकारी कामं असतात, हे मान्यच आहे. पण हे सगळ अनिष्ट आहे, हे पटलं तर तुम्ही ठरवू शकता आणि ठरवलं तर तुम्ही अंमलबजावणीही करू शकता. ग्रामीण किंवा अगदी शहरी समाजातसुद्धा लग्न हा मानसिक आजार आहे. तो दूर करणं व्यापक सामाजिक जबाबदारी आहे. प्रसिद्धीमाध्यमांपासून ओपिनियन मेकरपर्यंत सर्वांची यात मोठी जबाबदारी आहे. लग्न या एका भानगडीत खूप अंतर्गत आजार आहेत.. त्यातला कुठलाही एक सोडवण्याला आपला हात लागला तरी बदल घडू शकतात... ते घडायला हवेत.
त्यासाठी आपण पुढाकार घेण्याची गरज आहे. मी स्वत: असा पुढाकार घेतला आहे. विनाहुंड्याचं, विनामानपानाचं, विनाबँडचं लग्नही आनंदसोहळा ठरतो, हा अनुभव मी घेतला आहे. त्यामुळेच, हुंड्याविरोधात बोलण्याचा मला अधिकार आहे. असा अधिकार आपणालाही मिळायला हवा, त्यासाठीच हा अट्टहास....
(‘साधना’ साप्ताहिकाच्या २७ मे २०१७च्या अंकातील लेखाचे लेखकाच्या परवानगीने पुनर्प्रकाशन)
……………………………………………………………………………………………
लेखक ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.
kdraktate@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
rupali chougule
Fri , 26 May 2017
aajachya kalatahi jwalant asanarya samasyevaril udbodhak lekh.