अजूनकाही
कोलकात्यामध्ये ट्रेनी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे भारतभरात संताप उफाळून आला आहे. या मुलीच्या वडिलांना आठवते, ती तिची दुसऱ्यांना मदत करण्याची प्रबळ इच्छा आणि तिच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी दिलेला लढा.
तिचे वडील तिच्या डॉक्टरी व्यवसायावर असलेल्या निष्ठेची आठवण देतात. तिचं पूर्ण कुटुंब डॉक्टरकीसाठी तिच्या पाठीमागे कसं उभं होतं, हेही ते सांगतात.
‘आम्ही काही एवढे श्रीमंत नाही... खूप अडचणींना तोंड देऊन आम्ही तिला वाढवलं. डॉक्टर बनण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. ती फक्त एवढंच करायची : अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास...’
‘एका रात्रीत आमची सगळी स्वप्नं उद्धवस्त झाली. आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी पाठवलं आणि हॉस्पिटलने आम्हाला काय दिलं? तर तिचा मृतदेह. आमच्यासाठी सगळं संपलं आहे आता.’
‘माझी मुलगी परत येणार नाही आता. मला तिचा आवाज, तिचं हसणं कधीच ऐकता येणार नाही. आता मी फक्त काय करू शकतो, तर तिला न्याय मिळवून देण्यासाठी लढू शकतो.’
३१ वर्षांच्या या मुलीने सगळ्या अडथळ्यांना तोंड देऊन भारतभरातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या तब्बल एक लाख सात हजार जागांमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली. तिला पश्चिम बंगालमधल्या कल्याणीमध्ये जेएनएम हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळाला. तिच्या पालकांनी थोड्याथोडक्या कमाईतून तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
तिचे वडील टेलरिंगचं काम करतात. त्यांना आठवतं, ‘तिने पहिल्यांदा डॉक्टर होण्याची इच्छा बोलून दाखवली होती - ‘बाबा, मला डॉक्टर बनून सगळ्यांना मदत करायची आहे. तुम्हाला काय वाटतं?’ मी म्हणालो, ‘हो. नक्की हो डॉक्टर. आम्ही आहोत तुझ्यासोबत.’ आणि आता बघा काय झालं...’
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
मुलीला डॉक्टर करण्यासाठी तिच्या वडिलांनी त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय आणखी वाढवला. कोलकात्याच्या गर्दीतून धक्के खात बसने प्रवास करावा लागू नये, म्हणून त्यांनी तिला कार घेऊन द्यायचं ठरवलं.
ती म्हणाली. ‘थोडं थांबूया बाबा. आपल्याला कारचे हप्ते परवडणार नाहीत.’ पण नंतर बसने प्रवास करून तिला थकायला व्हायला लागलं, तेव्हा कुठे कार घेण्यासाठी राजी झाली…
ती जिथे वाढली त्याच कोलकात्याच्या एका छोट्याशा उपनगरात ते अजूनही राहतात. तिने एवढी प्रगती केली, याचं इथल्या प्रत्येकाला कौतुक आहे. आता तर त्यांनी त्यांचं घरही सुधारलं होतं आणि घरावर तिच्या नावाची, ‘डॉ....’ असं लिहिलेली ब्रासची पाटीही लावली होती.
अशा बुद्धिमान मुलीचं असं काहीतरी झालं आहे, यावर अजूनही कुणाचा विश्वास बसत नाहीये...
कोलकात्याच्या ज्या हॉस्पिटलमध्ये बलात्कार होऊन तिची हत्या झाली, ते तिच्यासाठी सगळ्यात सुरक्षित ठिकाण आहे, असं तिला आणि तिच्या आईवडिलांना वाटत होतं. आणि तिथेच ३६ तासांची ड्युटी करत असताना हे सगळं घडलं..
‘ती जेव्हा प्रवास करायची, तेव्हा सगळ्याच पालकांप्रमाणे आम्हालाही चिंता वाटायची. पण एकदा का ती हॉस्पिटलला पोहोचली की, आम्ही निर्धास्त व्हायचो. ती एकदम सुरक्षित आहे, असं आम्हाला वाटायचं. आम्ही तिला शाळेत सोडत असू, तेव्हाही शाळेचं गेट ओलांडून ती आत गेली की, आम्हाला तिची काळजी वाटायची नाही.’ तिचे वडील सांगतात.
तिचे सहकारी आणि शेजारी या सगळ्यांसाठीच ती एक अत्यंत सेवाभावी डॉक्टर आहे. तिने तिच्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज केलं. आता तिच्यामुळे त्यांच्या घरी पुन्हा सुख आलं होतं, असं तिच्या शेजाऱ्यांना वाटतं.
तिचे एक शिक्षक अर्णव बिस्वास सांगतात, ‘काही तरुण मुलं पैसे कमवण्यासाठी डॉक्टरी पेशा निवडतात. पण ती मात्र तसा विचार करत नव्हती. रुग्णांची सेवा करायची म्हणून ती डॉक्टर झाली होती.’
‘कोविडच्या साथीमध्ये अनेकांना श्वसनाचे विकार झाले होते. ते पाहून तिने स्पेशलायझेशनसाठी रेस्पिरेटरी मेडिसीनची निवड केली.
तिचे आईवडील या घटनेमुळे पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. ‘माझी एकुलती एक मुलगी गेली... मी आता कधीच सुखात राहू शकणार नाही...’ तिच्या आईने शेजाऱ्यांशी बोलताना आपल्या दु:खाला वाट करून दिली...
‘आम्हाला तिच्या कामाचं कौतुक आहे. ती माणसांची सेवा तर करायचीच, पण भटक्या कुत्र्यांना खाऊ घालायची... वेळ मिळाला की, बागकाम करण्यात रमून जायची...’
‘मुलगी तर गेली आहे आता... पण आम्ही तिच्या कुटुंबियांना साथ देणार आहोत. या कसोटीच्या काळात त्यांना एकटं वाटू नये, म्हणून आम्ही खंबीरपणे त्यांच्यासोबत राहणार आहोत.’ तिचे शेजारी कळकळीने सांगतात.
.................................................................................................................................................................
हा मूळ वृत्तलेख ‘द गार्डियन’ या वर्तमानपत्राच्या २० ऑगस्ट २०२४च्या अंकात आला आहे. मूळ लेखासाठी पहा -
अंशत: अनुवाद - आरती कुलकर्णी
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment