Behanboxच्या ‘लिंगभाव आणि कर्करोग मालिके’तील या तिसऱ्या लेखामध्ये आपण स्त्रियांना कर्करोगाचे निदान झाल्यावर कोणत्या आवाहनांना तोंड द्यावे लागते आणि या प्रवासात त्या रुग्ण आणि कुटुंबाची देखभाल करणाऱ्या प्रमुख अशा दोन्ही भूमिका कशाप्रकारे निभावतात याचा आढावा घेणार आहोत.
Pulitzer Centre Grant supported series
मुंबईतील गाडगे महाराज धर्मशाळेमध्ये राहणारी ३८ वर्षीय तुलसी छायाचित्र काढण्यासाठी तयार होताना. पश्चिम बंगालमधील छोट्याश्या शहरात राहणाऱ्या तुलसीने एकटीनेच मुंबईत राहून केमोथेरपी आणि रेडिएशन पूर्ण केली. छायाचित्र - अफजल आदिब खान
तुलसी सिंग आजूबाजूला असली की, कोणताही क्षण कंटाळवाणा नसतो. मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयाजवळील कर्करोगबाधित रुग्णांसाठींच्या अनुदानित तत्त्वावरील गाडगे महाराज धर्मशाळेतील पाचव्या मजल्यावरील स्त्रियाचा विभाग गप्पा आणि हसण्याने भरून राहील, याची काळजी तुलसी नेहमी घेत असते.
तुलसी पश्चिम बंगालमधील जलपाइगुडीची. ती कशीतरी चौथीपर्यत शिकली. तिच्याशी गप्पा मारताना ती मला चहा घ्यायला आग्रह करते आणि म्हणते, “मी अनेक गोष्टींमध्ये हुशार होती, परंतु अभ्यास हा त्यापैकी एक नव्हता.” थोडं गमतीने आणि थोडं गंभीरपणे ती पुढे सांगते, “मी इथली ‘बिग बॉस’ आहे. मी लोकांना काय करायचं ते सांगते आणि ते ऐकतात. सगळे जण आनंदी राहावेत म्हणून मी हे करते, कारण तेव्हाच तुम्ही कर्करोगाला हरवू शकता.”
स्तनाच्या कर्करोगाचे निदान झालेली तुलसी या धर्मशाळेमध्ये मागील आठ महिन्यांपासून राहत आहे आणि संपूर्ण उपचार घेण्यासाठी ती एकटीच झगडत आहे. तिचं २२व्या वर्षी लग्न झालं आणि काहीच महिन्यांत मुलगा पोटात असताना ती माहेरी परतली. नवरा आणि तिच्यात अनेक वादविवाद होते. ते मिटण्याची शक्यता नसल्याने ती परत कधीच नवऱ्याच्या घरी गेली नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
दार्जिलिंगमधील नक्सलबारीमध्ये राहणाऱ्या तिच्या ‘मोठे पप्पा आणि मोठी आई’ म्हणजेच काका आणि काकूंकडे ती राहायला लागली. ती त्यांच्या घरात काम करायची आणि त्या बदल्यात ते तिची व तिच्या १५ वर्षांच्या मुलाची काळजी घ्यायचे. टाटा मेमोरियल रुग्णालयात प्रत्येक केमोथेरपीच्या वेळेस रुग्णाचे नातेवाईक सोबत असणे गरजेचे असते. परंतु तुलसी एकटीच असल्याने ती इतर रुग्णांच्या नातेवाईकांना तिचे नातेवाईक म्हणून सोबत राहण्याची विनंती करायची. तिला केमोथेरपीचे फारसे दुष्परिणाम झाले नाहीत. उलट तीच इतर रुग्णांना आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णालयात घेऊन जाते, असं तिने मला सांगितलं.
ती पहिल्यांदा मुंबईत टाटा मेमोरियल रुग्णालयात उपचारासाठी आली, तेव्हा तिची चुलत बहीण सोबत आली होती, परंतु २० दिवसांनी ती परत गेली. त्यानंतर तिचा भाऊ आला. उपचारादरम्यान त्याने सोबत राहावे, असा आग्रह तिने केल्यावर तो अनेक कारणं सांगू लागला. त्यामुळे त्यालाही तुलसीने परत पाठवले. ती म्हणते, एकटेच राहणे अधिक चांगले आहे. मुंबई शहरामध्ये ती तिचे मार्ग शोधायला लागली होती.
स्त्रियांची भूमिका कुटुंबामध्ये देखभाल करणारी प्रमुख्य व्यक्ती अशी असते, परंतु जेव्हा त्यांना कर्करोगाचे निदान होते, तेव्हा आपण कुटुंबावर ओझे बनत असल्याची लाज आणि संकोच त्यांना वाटतो. खरं तर स्त्रिया स्वयंपाक करणे, घर स्वच्छ ठेवणे, मुलांना वाढवणे, घरातील वृद्धांची काळजी घेणे, असे कुटुंबासाठी अविरत कष्ट घेत असतात, परंतु कर्करोग निदान झाल्यानंतर मात्र अनेकींना कुटुंबाकडून दुर्लक्ष होणे किंवा एकटे सोडून देणे, यांसारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो.
देखभाल करण्याचे ओझे
२१ वर्षांची शकुंतला यादव, आई मथुराची काळजी मागील सहा वर्षांपासून घेतेय. तिला शिक्षिका व्हायचं होतं, परंतु बारावीनंतर शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. छायाचित्र – अफजल आदिब खान
२१ वर्षांची शकुंतला यादव मागील सहा वर्षांपासून तिची ४८ वर्षीय आई, मथुराची काळजी घेत आहे. मथुराला आठ वर्षांपूर्वी स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले. छत्तीसगढमधील कानकेर गावात हे कुटुंब राहते. सुरुवातीला मथुराने जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले, परंतु कर्करोगाने आता पुन्हा डोके वर काढले असून, तो तिच्या मेंदू आणि मज्जारज्जूमध्ये पसरला आहे. डॉक्टरांनी तिला रेडिएशन घेण्याचा सल्ला दिला. त्यासाठी तिला नया रायपूरमधल्या कर्करोग उपचारांची सुविधा असलेल्या वेदांत मेडिकल रिसर्च फाऊंडेशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या बाल्को मेडिकल सेंटरमध्ये जावे लागले.
या रुग्णालयाजवळच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची सुविधा असलेल्या केंद्रामध्ये आम्ही या मायलेकींना भेटलो. शकुंतला तिच्या आईच्या समोर बसली होती. तिची आई खूपच अशक्त दिसत होती आणि थोडंसंच बोलू शकत होती. शकुंतलाने तिला डाळिंब सोलून दिले, ती ते हळूहळू खाऊ लागली.
शकुंतला तिच्या आईसोबत सात महिन्यांपासून राहतेय. शकुंतला त्यांची एकुलती मुलगी. ती सांगते, “माझे वडील गावामध्ये शेतीसाठी थांबले आहेत.” गावाबाहेर एकटी राहणे तिला सुरुवातीला भीतीदायक वाटत होते, परंतु आता ती सक्षम असून याचा तिला अभिमान वाटतो. ती पुढे सांगते, काही दिवसांपूर्वी तिच्या आईला झटका आला, तेव्हा ती एकटीच तिच्यासोबत होती आणि तिनेच तिला आपत्कालीन विभागामध्ये नेले.
एवढेच नव्हे, तर घरातील सर्व कामांची जबाबदारी शकुंतलावर असून तिने बारावीतून शिक्षण अर्धवट सोडले. तिची आई ताकदवान होती. घरातील आणि शेतातील कामांची जबाबदारी ती सांभाळायची. शंकुतला सांगते, “शिक्षण आणि आईची तब्बेत या दोन्ही जबाबादाऱ्या मी काही वेळ सांभाळल्या. परंतु आईला कर्करोग पुन्हा उद्भवल्यानंतर ती फारच कमजोर झाली.”
शकुंतलाला शिक्षक व्हायचे आहे, परंतु आईच्या तब्बेतीमुळे तिने तिची स्वप्ने गुंडाळून ठेवली आहेत. ती म्हणते, “अगर मैं अपना देखू, तो मम्मी को खो दूंगी.”
मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयाजवळील कर्करोगबाधित रुग्णांसाठी अनुदान तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या गाडगे महाराज धर्मशाळेमध्ये नवरा-बायको एकत्र जेवण करत असताना. छायाचित्र – अफजल आदिब खान
कुटुंबामध्ये वृद्ध, गंभीर आजारी असलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या व्यक्तींची देखभाल करण्याची जबाबदारी बहुतांशपणे स्त्रियांवरच असते. जगभरात कोणताही मोबदला न मिळणाऱ्या कामांमध्ये स्त्रियांचा वाटा हा तीन चतुर्थांश असतो. भारतामध्ये मोबदला न मिळणाऱ्या कामांमध्ये पुरुष आणि स्त्रियांवरील कामाच्या जबाबदारींमधील अंतर खूप जास्त असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. स्त्रिया मोबदला न मिळणाऱ्या घरकामासाठी २६५ मिनिटे किंवा ४ तास ४० मिनिटे घालवतात, तर या उलट पुरुष अशी कामे केवळ ३१ मिनिटे करतात.
कोलंबिया, घाना, मेक्सिको, भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये केलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ‘ग्लोबल एजिंग अँड अडल्ट हेल्थ’ अभ्यासामध्ये विनामूल्य देखभाल करण्याच्या कामांच्या मूल्यांचा अंदाज व्यक्त केला आहे. विनामूल्य देखभाल करण्याची किंमत ही ‘राष्ट्रीय आरोग्य देखभाल खर्चा’च्या २.५३ टक्के इतकी आहे. ती या पाच देशांमध्ये सर्वाधिक आहे. कर्करोगामध्ये देखभाल करणाऱ्या कामांचे आर्थिक मूल्य निश्चित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता.
आरटीआय इंटरनॅशनलच्या (सेंटर फॉर ग्लोबल नॉनकम्युनिकेबल डिसिजेस वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य संशोधक आणि लॅन्सेट कमिशनच्या लेखिका इशु कटारिया सांगतात, “देखभाल करण्यामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पण त्यांना याचे योग्य मूल्य कधीही मिळत नाही. पण ते मिळण्याची आवश्यकता या अभ्यासातून अधोरेखित झाली आहे.”
जेव्हा महिलांना कर्करोगाचे निदान होते, तेव्हा कुटुंबासमोर सर्वांत मोठा प्रश्न असतो की, आता घरातील कामांची जबाबदारी कोण घेणार, असे आम्हाला आढळले. कर्करोगमुक्त आणि ‘पॅलिएटिव्ह केअर’ समुपदेशक वंदना महाजन Behanboxशी बोलताना म्हणाल्या की, केमोथेरपी सुरू असली, तरी अनेक महिला घरकाम करत असल्याचे त्यांनी पाहिले आहे.
त्या सांगतात, “स्तनाचा कर्करोग झालेल्या ६० वर्षीय महिलेला गंभीर स्वरूपाची केमोथेरपी सुरू होती, परंतु आपल्या ७० वर्षांच्या नवऱ्यासाठी पोळ्या बनवल्यानंतरच ती रुग्णालयात यायची.” सुनेच्या हातचा स्वयंपाक खाण्यास नवऱ्याने नकार दिल्याने तिला कामे करावी लागत होती. आणखी काही घटनांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, अनेकदा नवरा कर्करोग असलेल्या आपल्या बायकोला ओरडत असतो. उदा., “तू इंजेक्शनला इतकी काय घाबरतेस, इतका गोंधळ का करतेस?”
महाजन सांगतात की, पितृसत्ताक पद्धतीमध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये स्त्रियांना वापरण्याची वस्तू म्हणूनच वागणूक दिली जाते. महाजन म्हणाल्या, “स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृतीच्या कार्यक्रमामध्ये बहुतांश महिला माझ्याजवळ येतात आणि विचारतात, ‘बिमारी का कुछ नहीं, ये बताईए की, हम हमारे पती के साथ सो सकते हैं की नहीं”. स्त्रियांना असं वाटतं की, घरात जोपर्यत त्या त्यांच्या नवऱ्याकरिता ‘उपयोगी’ आहेत आणि संभोगासाठी उपलब्ध आहेत, तोपर्यतच घरामध्ये त्यांचे स्थान सुरक्षित आहे.”
गंभीर आजाराने बाधित महिलांना एकटे सोडून देण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत सहापट अधिक
टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या आवारात महिला आपल्या सामानासह थोडा काळ विश्रांती घेताना. छायाचित्र – अफजल आदिब खान
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या जर्नलमध्ये गंभीर आजार झाल्याने जोडीदाराला सोडून दिले जाते का, या विषयावर २००९ साली एक अभ्यासलेख प्रकाशित झाला आहे. या अभ्यासामध्ये असे आढळले आहे की, स्त्रियांना सोडण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत सहापटीने (२०.८ टक्के विरुद्ध २.९ टक्के) अधिक आहे. ज्या रुग्णांना त्यांच्या जोडीदाराने सोडून दिले आहे, त्यांची स्थिती अधिकच खालावते. त्यांना जास्त प्रमाणात नैराश्यावरील औषधांची गरज भासते, वैद्यकीय चाचण्यांमध्ये सहभाग कमी असतो, वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागते आणि रेडिओथेरपी पूर्ण करण्याची किंवा घरीच मृत्यू होण्याची शक्यता फार कमी असते, असेही या अभ्यासात आढळले आहे.
बाल्को मेडिकल सेंटरच्या वैद्यकीय संचालक आणि आतड्याच्या आणि स्तनाच्या कर्करोगाच्या तज्ज्ञ भावना सिरोही सांगतात की, त्यांच्या तीन दशकांच्या अनुभवामध्ये त्यांनी, स्त्रियांना कर्करोगाच्या उपचारादरम्यान किंवा उपचारानंतर त्यांच्या नवऱ्यांनी सोडल्याचे भारत आणि ब्रिटनमध्येही दुर्दैवाने पाहिले आहे. याउलट पुरुषांच्या कर्करोग उपचारामध्ये स्त्रिया खंबीरपणे त्यांना साथ देतात. एका शीख महिलेला पूर्णपणे बरा होणारा स्तनाचा कर्करोग झालेला असताना, आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्या, दुबईमध्ये काम करणाऱ्या तिच्या नवऱ्याने तिच्या आजारासाठी खर्च करण्याचे कसे नाकारले, अशी आठवणही त्या सांगतात. तिचा नवरा म्हणाला की, “इतने में तो दुसरी लुगाई आ जाएगी”.
पुढे म्हणाल्या की, या महिलेला मदत करण्यासाठी रुग्णालयाला उपचारांचा खर्च माफ करावा लागला. ही वृत्ती आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या खालच्या वर्गामध्ये सामान्यपणे आढळून येते. कारण तिथे कर्करोगाचे निदान झाल्यावर स्वयंपाकासाठी, मुलांची देखभाल करण्यासाठी कोणीही उपलब्ध नसते. परिणामी आणि स्त्रियांच्या उपचारामध्ये विलंब किंवा दुर्लक्ष केले जाते, असे ही त्या
पारंपरिक उपचारांचे आमिष
२०२२मध्ये तुलसीला सर्वप्रथम आंघोळ करताना स्तनावरील पांढरा डाग दिसला होता. तो वाढत होता. दोन महिन्यांनी तिला अशक्तपणा वाटायला लागला, म्हणून मग तिने गावातील होमियोपॅथीचा सल्ला घेतला. त्यांनी तिला हे सर्वसामान्य असल्याचे सांगत सहा महिन्यांची औषधे दिली. या दरम्यान स्तनामधील गाठ वाढून लिंबू एवढ्या आकाराची झाली. तिच्या काकीच्या घरी विहिरीतून पाणी काढताना तिला छातीमध्ये तीव्र वेदना जाणवायला लागल्या, तेव्हा तिने अॅलोपॅथी डॉक्टरांना दाखवले. एवढ्या उशीरा का आली, असे डॉक्टरांनी तिला विचारले आणि लगेचच बायोप्सी करण्यास सांगितले. त्यात तिला स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले.
तुलसीला कर्करोगाचे निदान आणि उपचार वेळेत मिळाले असते, तर तिचा आजार एवढा वाढला नसता. २००९मध्ये दिल्लीतील खासगी आणि सरकारी रुग्णालयातील ८२५ रुग्णांवर केलेल्या अभ्यासामध्ये असे आढळले की, ३४.३ टक्के कर्करोगबाधित रुग्ण पारंपरिक, पूरक आणि पर्यायी औषधे घेतली होती आणि यातील बहुतांश रुग्णांनी वैद्यकीय उपचार खूप उशिराने घेतले होते.
पारंपरिकसह इतर प्रकारची औषधे घेणाऱ्या रुग्णांपैकी केवळ एक तृतीयांश रुग्णांनी लक्षणे दिसून आल्यावर तातडीने उपचार घेतल्याचे आढळले. यातील १२ टक्के रुग्णांनी कर्करोगाची लक्षणे आढळल्यानंतरही सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ उपचार घेतले नव्हते, तर या उलट अशा प्रकारे इतर औषधे न घेणाऱ्या रुग्णांपैकी केवळ २.१ टक्के रुग्णांनी इतक्या उशीरापर्यत उपचार घेतले नव्हते. तसेच अलोपॅथी उपचार घेणाऱ्या जवळपास निम्म्या रुग्णांनी लक्षणे दिसल्यानंतर त्वरित उपचार घेतल्याचे अभ्यासात निर्दशनास आले.
इतर अभ्यासांमध्ये असेही दिसून आले आहे की, महिलांमध्ये आणि कमी शिक्षित (प्राथमिक शिक्षणापेक्षा कमी) लोकांचा पर्यायी उपचारांवर अधिक विश्वास असतो.
रायपूरमधील नयागावात बाल्को मेडिकल सेंटर आयोजित कर्करोग निदान शिबिरादरम्यान भावना सिरोही गावातल्या व्यक्तींची तपासणी करताना. छायाचित्र – अफजल आदिब खान
भावना सिरोही सांगतात अनेक रुग्ण हे त्यांचे कुटुंबीय किंवा मित्रपरिवार यांच्या सल्ल्याने पर्यायी उपचारांकडे वळतात. त्या सांगतात, “रेडिएशनने त्वचा जळते, केमोथेरपीमुळे त्वचा काळी पडते, अशा अनेक बाबी लोक सांगत असतात. त्यामुळे ते अलोपॅथी घ्यायला तयार होत नाहीत आणि जेव्हा ते पुन्हा आमच्याकडे परत येतात, तोपर्यत कर्करोग उपचारांपलीकडे गेलेला असतो.”
भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये दर्जेदार उपचारांचा अभाव, वैद्यकीय उपचारांचा अतोनात खर्च, सार्वजनिक रुग्णालयांमधील गर्दी, यामुळेदेखील रुग्ण उपचारांसाठी लवकर येत नाहीत. मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयातील कम्युनिटी फिजिशियन आणि सार्वजनिक आरोग्य संशोधक पार्थ शर्मा सांगतात, रुग्ण रुग्णालयात उशीरा येण्याचे एक कारण म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये त्यांना मिळणारी वागणूक. रुग्णालयातील सुरक्षा सेवकापासून ते डॉक्टरांपर्यत सर्वजण त्यांच्याशी फटकून बोलतात. “ ‘मैंने बोला था क्या तंबाकू खाने को? असं अनेक डॉक्टरांना बोलताना मी ऐकलंय” असे पार्थ सांगतात.
ते पुढे सांगतात, रुग्णाला त्याच्या आजाराबाबत योग्य प्रकारे माहितीच न दिल्याने रुग्णाचा उपचार करणाऱ्याबाबत विश्वासच निर्माण होत नाही. अशा काही बाबी उपचारामध्ये अडथळा निर्माण करतात. मग रुग्ण अवैद्यकीय उपचार करणारे किंवा आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी सेवा देणाऱ्याकडे जातात, कारण ते त्यांना सन्मानपूर्वक पद्धतीने उपचार देत असतात.
मृत्यूला सामोरे जातानाही स्वअधिकारांचा अभाव
स्त्रियांना त्यांच्या आरोग्याबद्दल निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य किवा सक्षमता नाही, कारण त्यांच्याबाबतचे निर्णय वडील, नवरा किंवा भाऊ घेतात. बाल्को मेडिकल सेंटरच्या भावना सिरोही सांगतात, “स्तन पूर्णपणे काढून टाकायचे की, स्तन सुरक्षित ठेवणारी शस्त्रक्रिया करायची, असा साधा प्रश्न विचारला, तरी स्त्रिया निर्णय घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील पुरुषांकडे नजर वळवतात.” त्या पुढे म्हणतात, “दोन्ही शस्त्रक्रियांचा खर्च सारखाच आहे. स्तन सुरक्षित राहिल्यास तिचा आत्मविश्वास वाढेल आणि पुन्हा सामान्य आयुष्य जगण्यासाठी मदत होईल असे मी सांगते. मात्र तरीही निर्णय घेण्यासाठी त्या पुरुषांवरच अवलंबून असतात.” डॉक्टरांनी वृद्ध महिलांना स्तन सुरक्षित ठेवणारी शस्त्रक्रिया करण्याचे सुचवले, तर त्यांच्या कुटुंबातील पुरुष कधीकधी यासाठी नकार देतात, या वास्तव बाबींकडेही त्या लक्ष वेधतात.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
वंदना महाजन म्हणतात, “स्त्रियांना मृत्यूला सामोरे जातानाही स्वअधिकार नसतात. त्यांना त्यांचा कर्करोग हा अंतिम टप्प्यातील असल्याचे सांगितले जात नाही, का तर म्हणे, त्या हा धक्का सहन करू शकणार नाहीत.” कर्करोग अंतिम स्थितीमध्ये असलेल्या एका वृद्ध महिलेबाबतची आठवण त्या सांगत होत्या. तिच्या मुलाने आजाराच्या या अवस्थेबद्दल तिच्याशी चर्चा करण्यासाठी महाजन यांना किंवा पॅलिएटिव्ह फिजिशियनला साफ नकार दिला होता. कारण ती जगण्याची आशा गमावून बसेल, असे त्याला वाटत होते.
महाजन विचारतात, “ती मृत्यूला सामोरे जात असल्याचे तिला समजण्याचा अधिकार नाही का? काही अर्धवट राहिलेल्या इच्छा जसे की, मृत्यूपत्र लिहून ठेवणे, तिच्या संपत्तीचे वाटप करणे आणि कुटुंबियांचा निरोप घेणे, अशा काही बाबी पूर्ण करण्याचा अधिकार तिला नाही का?” त्या महिलेचा मृत्यू आयसीयूमध्ये झाला आणि मरण्याआधी त्या महिलेने महाजन यांना सांगितले की, मृत्यू आणि वारशाबद्दलच्या कोणत्याही चर्चा करायला लागली की तिचा मुलगा की, तिला थांबवायचा आणि म्हणायचा की ‘याबाबत बोलू नकोस, तू बरी होणार’.
स्त्रिया अशा प्रकरणांमध्ये पुरुषांइतक्याच कणखर किंवा कमजोर असतात. सुरुवातीला त्यांना धक्का बसतो, परंतु काही काळाने त्या शांतपणे मृत्यूला सामोऱ्या जातात, असे महाजन सांगतात. त्या एका अविवाहित दंतरोग तज्ज्ञ महिलेचे उदाहरण देतात. तिला फुप्फुसाचा कर्करोग होता. कर्करोग अंतिम टप्प्यात असल्याचे समजले, तेव्हा तिने केमोथेरपी थांबवण्याचा निर्णय घेतला. तिचे आयुष्यभराचे स्वप्न म्हणजे ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ला जाऊन ट्रेक करणे. त्यासाठीचे सामर्थ्य एकवटण्याचा निर्णय तिने घेतला.
कठीण काळातही चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवणारी तुलसी
मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात मार्च २०२४मध्ये महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये नृत्य सादर केल्यानंतर स्तनाच्या कर्करोगातून बऱ्या झालेल्या इतर महिलांसोबत तुलसी सिंग (उजवीकडून पहिली). छायाचित्र - तुलसी सिंग
तुलसी गाडगे महाराज धर्मशाळेमध्ये तिचे उपचार पूर्ण होईपर्यत म्हणजेच जुलै २०२४पर्यंत राहिली. मी तिच्याशी शेवटचं बोलले, तेव्हा नुकतेच तिचे उपचार पूर्ण झाले होते आणि ती खूप खुश होती.
ती म्हणाली, “अखेर मी घरी जाण्यासाठी मोकळी झाली आहे. मला आता जानेवारी २०२५मध्ये पुढच्या तपासणीसाठी रुग्णालयात बोलावले आहे.” तुलसी एक सव्वावर्षापासून तिच्या घरी गेली नव्हती, परंतु धर्मशाळेतील स्त्रियांचा विभाग हेच तिचे घर बनले होते. कर्करोगबाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हेच तिचे कुटुंबीय झाले होते. ती त्यांच्यासोबत मजामस्ती करायची, त्यांचे समुपदेशन करायची आणि शहरामध्ये त्यांच्यासोबत भटकायचीसुद्धा. तिला या प्रवासामध्ये भेटणाऱ्या परिचारिका, समाजसेवक, सुरक्षारक्षक प्रत्येकाशी ती प्रेमाने बोलायची आणि त्यांच्यामुळेच तिला कामही मिळाले होते.
इंडियन कॅन्सर सोसायटीच्या व्यावसायिक कामांच्या प्रकल्पाअतंर्गत तुलसीने जवळपास एक महिन्याहून अधिक काळ सकाळी १० ते संध्याकाळी ६पर्यंत दिवे रंगवण्याचे काम केले होते. या मेहनतीतून मिळवलेल्या कमाईचा तिला अभिमान वाटतो.
लिहिता-वाचतासुद्धा येत नसूनही विविध सामाजिक संस्थाच्या मदतीने तिने जवळपास ९० हजार रुपये जमा केले होते. त्यातून तिच्या उपचारांचा बहुतांश खर्च भागला होता. ती तिच्या कुटुंबियांकडे खाणेपिणे आणि राहण्यासाठीचे फक्त पैसै मागायची. ती मला सांगते, “कुछ भी मुश्कील नहीं, पूछ पूछ कर सब कर सकते हैं.”
तुलसीने घरी जाण्याआधी इतर कर्करोग बाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासोबत काही ठिकाणी फिरायला जायचे नियोजन केले होते. महाराष्ट्रातील शनि शिंगणापूरच्या मंदिरामध्ये जायला ती निघत होती. ती मला म्हणते, “चलती का नाम जिंदगी हैं, दिदी!”
.................................................................................................................................................................
‘जेंडर आणि कर्करोग’ या लेखमालिकेमधील हा पहिला लेख यापूर्वी Behanboxमध्ये प्रसिद्ध झाला आहे. मूळ इंग्रजी लेखासाठी पहा :
https://behanbox.com/2024/08/09/when-women-have-cancer-navigating-families-society-and-medicine/
या मालिकेतील पहिला लेख येथे आणि दुसरा लेख येथे वाचता येईल.
मराठी अनुवाद - शैलजा तिवले
.................................................................................................................................................................
लेखिका स्वागता यादवर या अहमदाबादस्थित मुक्त-पत्रकार आहेत.
swagatayadavar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment