भारतात दर सातव्या मिनिटाला एका महिलेचा ‘गर्भाशय मुखा’चा कॅन्सर म्हणजेच ‘कर्करोगा’ने का मृत्यू होतो? 
अर्धेजग - कळीचे प्रश्न
स्वागता यादवार
  • छत्तीसगढच्या रायपूरमध्ये बालको मेडिकल सेंटरने आयोजित केलेल्या कर्करोग तपासणी शिबिरात एनएमसोबत आलेल्या नयागावातील महिला. छायाचित्र - अफजल आदिब खान
  • Sat , 29 June 2024
  • अर्धेजग कळीचे प्रश्न गर्भाशय मुखाचा कर्करोग Cervical Cancer

Pulitzer Centre Grant supported series

अहमदाबाद, गुजरातच्या कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट (जीसीआरआय) रुग्णालयाच्या ओपीडी विभागात रुग्णांची रीघ लागली होती. या रुग्णालयात राज्यासह राजस्थान, मध्य प्रदेश राज्यांमधील सुमारे २५ हजार रुग्ण दरवर्षी उपचारासाठी येतात. येथे बहुतांश उपचार विविध सरकारी योजनांअतर्गत कमी खर्चामध्ये केले जातात.

तळमजल्यावरील स्त्रीरोग विभागाच्या ओपीडीमध्ये परिचारिका रुग्णांना आत घेत असे आणि दोन डॉक्टरांची टीम रुग्णांना तपासत होती. रुग्ण तपासत असतानाच स्त्री-कर्करोग विभागाच्या प्राध्यापिका डॉ. चेतना पारेख सांगतात, “इतर कर्करोगांच्या तुलनेत गर्भाशयाच्या मुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगाचा प्रतिबंध करून हा आजार उपचारांनी बरा होणे शक्य आहे, मात्र तरीही भारतामध्ये या आजाराची स्थिती अत्यंत वाईट आहे.”

“आमच्याकडे येणारे बहुतांश रुग्ण कर्करोगाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यापर्यंत पोहचेलेले असतात. त्यामुळे उपचार सुरू झाले, तरी निदान उशीरा झाल्याने पुढील सहा महिने किंवा वर्षभरात त्यांचा मृत्यू होतो” असे त्यांनी Behanboxशी बोलताना सांगितले.

खरे तर हे मृत्यू टाळणे शक्य आहे, कारण गर्भाशय मुखाचा कर्करोग हा ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ (एचपीव्ही)मुळे होतो, हे ज्ञात आहे. तसेच यावर प्रतिबंधात्मक लसही उपलब्ध आहे. मात्र तरीही २०२३मध्ये भारतात १ लाख २३ हजार महिलांना हा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि यातील सुमारे ८० हजार महिलांचा मृत्यू झाला आहे. जगभरात आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या रुग्णांपैकी एक पंचमांश रुग्ण भारतात आढळतात आणि सर्वांत जास्त मृत्यूदेखील भारतामध्येच नोंदवले जात आहेत.

भारतामध्ये दर सातव्या मिनिटाला एका महिलेचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू होत आहे. मात्र तरीही याचे निदान करणाऱ्या चाचण्यांचे शुल्क सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. दोन दशकांहून अधिक काळ प्रतिबंधात्मक एचपीव्ही लस उपलब्ध असूनही भारताच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात याचा समावेश केलेला नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे या आजाराबाबतची जनजागृतीदेखील फारशी झालेली नाही.

कॅन्सर अवेरनेस, प्रिव्हेनशन अ‍ॅण्ड अर्ली डिटेक्शन( सीएपीईडी) संस्थेच्या प्रमुख मृदू गुप्ता यांच्या मते, या आजाराकडे आत्तापर्यत करण्यात आलेल्या दुर्लक्षतेमध्ये ‘लिंगभाव असमानता’ (जेंडर) हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जर अशा प्रकारच्या कर्करोगाने दर सातव्या मिनिटाला एका पुरुषांचा मृत्यू होत असता, तर एचपीव्ही लस आणि निदान चाचण्या उपलब्ध होण्यासाठी खरंच इतकी वर्षं लागली असती का, असा प्रश्न त्या उपस्थित करतात.

त्या म्हणतात, “स्त्रियांच्या आरोग्याला राजकीय पटलावर फारसे महत्त्व दिले गेले नाही आणि त्यामुळेच या आजाराच्या नियंत्रणासाठी वेळेत पावले उचलली गेली नाहीत.”

समाजामध्ये पुरुषांच्या तुलनेत कर्करोग झालेल्या महिलांबाबत अधिक ‘स्टिग्मा’ म्हणजे अढी असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे, त्यांची जबाबदारी झटकून देण्याचे प्रकार सर्रास घडतात. कर्करोगाच्या उपचारांमध्ये ‘जेंडर’ची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे स्त्रियांना कोणत्या अडचणीचा सामाना करावा लागतो, याचा आढावा या मालिकेमध्ये Behanbox घेत आहे.  

लहान वयात लग्न, अधिक मुले, तंबाखूचे सेवन : जोखमीचे घटक

जीसीआरआय रुग्णालयात भारताच्या ग्रामीण भागातील गर्भाशय मुखाच्या कर्करोग झालेल्या ४० ते ६० वयोगटातील अनेक महिलांना मी भेटले. यातील सुमारे ८० टक्के महिलांमध्ये आजाराचे निदान हे तिसऱ्या टप्प्यामध्ये झाले होते. जस्सुबेन ही त्यापैकीच एक.

अहमदाबादपासून २७० किमीवरील अमरेली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील ३० वर्षांची जस्सुबेन डॉ. पारेख यांच्या खोलीबाहेरील एका भिंतीला टेकून तिच्या नवऱ्यासोबत बसली होती. तिला तिसऱ्या टप्प्यातील गर्भाशय मुखाचा कर्करोग असून तिची प्रकृती फारशी ठीक नव्हती. दोन वर्षांपूर्वी तिच्या आजाराचे निदान झाले आणि उपचारदेखील सुरू झाले. परंतु या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिच्या शरीरात कर्करोग पसरत असल्याचे समजले. तिचा आजार आता बरा होणारा नाही, अशीच चिन्हे असल्याने ‘पॅलिएटिव्ह केअर’ म्हणजेच तिची काळजी घेऊन तिला कमीत कमी त्रास होईल, यावर अधिक भर दिला जाणार आहे.

एचआयव्हीसारख्या रुग्णांमध्ये आढळणारी कमकुवत रोगप्रतिकारशक्ती, लैंगिक संबंधाद्वारे प्रसार होणारे आजार, एचपीव्हीमुळे होणारे इतर संसर्गजन्य आजार, अधिक बालकांना दिला जाणारा जन्म, लहान वयात लग्न, संप्रेरकयुक्त (हार्मोन्स) गर्भनिरोधक साधनांचा वापर आणि धुम्रपान, असे काही जोखमीचे घटक गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी कारणीभूत आहेत.

“आमच्याकडे येईपर्यत रुग्णामध्ये कर्करोग मोठ्या प्रमाणावर पसरलेला असतो. काही रुग्णांमध्ये तर मूत्रपिंडासारख्या इतर अवयवांपर्यंतदेखील पोहचलेला असतो. अशा रुग्णांमध्ये उपचार करणेही शक्य नसते. परिणामी या रुग्णांना मृत्यूपर्यंत असह्य वेदनादायी त्रासांना सामोरे जावे लागते”, असे जीसीआरआयच्या चेतना पारेख सांगतात.

अगदी पुढच्या टप्प्यांमध्ये हा कर्करोग मूत्रवाहिनीत पसरतो. त्यामुळे मूत्रपिंडांवर दबाव येतो आणि कालांतराने मूत्रपिंडे निकामी होतात. अशा रुग्णांमध्ये मूत्रविसर्जनासाठी कृत्रिम स्टेंट बसवले जातात आणि डायलिसिस करावे लागते. काही रुग्णांमध्ये हा कर्करोग गुदद्वारात पसरतो. त्यामुळे मल गळती, दुर्गंधी आणि इतर संसर्ग होतात.

जस्सुबेनचा प्रवास : अधिक वेळा गर्भधारणा, स्वच्छतेचा अभाव आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत

गुजरात कर्करोग संशोधन संस्थेच्या (जीसीआरआय) स्त्री-कर्करोग विभागातील प्राध्यापिका डॉ. चेतना पारेख. छायाचित्र – स्वागता यादवर

पारंपरिक घागरा चोळी आणि त्यावर राखाडी रंगाची शाल ओढून जस्सुबेन बसली होती. खरे तर ती खूप थकलेली होती, पण मी जेव्हा तिच्याशी बोलायला गेले, तेव्हा तिने कसेबसे स्मितहास्य केले.

जस्सुबेन १३-१४ वर्षांची असताना तिचे लग्न झाले. तिला तिच वयही नीट आठवत नाही. तिला तीन मुले असून सर्वांत मोठा मुलगा सध्या १२ वर्षांचा आहे. म्हणजे तिला पहिले मूल १८व्या वर्षी झाले असावे. जस्सुबेनचे कुटुंब चार एकर जमिनीवर कापसाचे उत्पादन घेते. त्यांचे वार्षिक उत्पन्न ६० हजार असून भारतातील सर्वांत कमी उत्पन्न गटामध्ये त्यांचा समावेश होतो.

जस्सुबेनला सुरुवातीला तीन-चार महिने रक्तस्रावाचा त्रास होत होता. जुलै २०२२मध्ये तिचा नवरा भोपटने तिला जवळच्या खासगी दवाखान्यात दाखवले. तेथून तिला जीसीआरआयला पाठवले गेले. सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील गर्भाशय मुखाचा कर्करोग झाल्याचे निदान केले गेले. परंतु कर्करोग हा शरीराच्या रोगप्रतिकारक्षम यंत्रणेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या लसिका ग्रंथींपर्यत (लिम्फ नोड) पसरलेला होता.

केमो आणि रेडिओ थेरपीमुळे तिचा आजार बळावला नाही. योनीतील पांढऱ्या द्रव्याचा स्रावही थांबला. परंतु कर्करोग पसरल्याने तिच्या मूत्रवाहिनेवर परिणाम झाला. त्यामुळे तिला मूत्रपिशवीचा वापर करण्याशिवाय पर्याय नव्हता.

फेब्रुवारी २०२४मध्ये केलेल्या पुढच्या तपासणीमध्ये तिच्या शरीरामध्ये कर्करोगाचा प्रसार वाढून इतर ग्रंथी आणि फुप्फुसापर्यंत पसरल्याचे आढळले. जेव्हा ती मला भेटली, तेव्हा तिला बायोप्सी करण्यासाठी रुग्णालयात दाखल करणार होते आणि लवकरच ‘पॅलिएटिव्ह केमोथेरपी’ सुरू केली जाणार होती. परंतु तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. “अशी स्थिती असलेले रुग्ण जास्तीत जास्त दीड ते दोन वर्षं जगतात. परंतु शेवटचे सहा महिने अत्यंत वेदनादायक असतात,” डॉ. पारेख म्हणाल्या.

निदान चाचण्यांमधील अडथळे

छत्तीसगढमधील नयागावात बालको मेडिकल सेंटरने आयोजित केलेल्या कर्करोग तपासणी शिबिरातून घरी परतताना गावातील महिला. छायाचित्र - अफजल आदिब खान

महिलांमध्ये सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या कर्करोगापैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकावर असूनही याच्या प्राथमिक तपासण्या (तोंडाच्या आणि स्तनाच्या कर्करोगासोबत) राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वामध्ये २०१७मध्ये शिफारस केल्या गेल्या. त्यानुसार ३० वर्षांवरील महिलांनी  गर्भाशय मुखाच्या, स्तनाच्या आणि तोंडाच्या कर्करोगाची तपासणी दर पाच वर्षांनी करणे गरजेचे आहे. उपकेंद्रामध्ये एएनएम, तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये परिचारिकांनी ही तपासणी करणे अपेक्षित आहे. यामध्ये निदान झालेल्या रुग्णांना पुढील तपासण्या आणि सामुदायिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी किंवा स्त्रीरोगतज्ज्ञांकडे उपचारासाठी पाठवावे लागते.

२०१६च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तीन वर्षांमध्ये ८० टक्के लोकसंख्येचे कर्करोगाच्या प्राथमिक तपासण्या होणे अपेक्षित होते. परंतु राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ (२०२०-२१)च्या आकडेवारीनुसार ३० ते ४९ वयोगटातील केवळ १.९ टक्के स्त्रियांची गर्भाशय मुखाची चाचणी केली गेली, तर स्तनाच्या आणि तोंडाच्या कर्करोगासाठी प्रत्येकी ०.९ टक्के महिलांच्या तपासण्या केल्या गेल्या. जागतिक महासाथीचा या तपासणी कार्यक्रमावर परिणाम झाला. परंतु कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी होत्या. सरकारने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले.

चार ते सात हजार अशा तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या ‘आशा’ कर्मचाऱ्यांना गरोदर माता आणि बालकांच्या आरोग्यासह इतर संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजाराच्या कार्यक्रमांमध्येही आता राबवले जाते. उपकेंद्रावर कार्यरत एएनएमच्या खांद्यावर आधीच अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे या दोघींनाही कर्करोगाच्या कार्यक्रमाकडे तितकेसे लक्ष देणे शक्य नाही.

“हजारो महिलांच्या गर्भाशय मुखाच्या आणि स्तनाच्या कर्करोगासाठी प्राथमिक तपासण्या झाल्याचा दावा जर सरकार करत असेल, तर तो चुकीचा असून केवळ कागदोपत्री आहे,” असे हरियाणाची ‘आशा’ (ASHA) २०२२मध्ये ‘Cancer World’मधील गर्भाशय मुखाच्या तपासणी कार्यक्रमाची अंमलबजावणीबाबत आलेल्या लेखामध्ये सांगते. 

मध्य प्रदेशमधील ‘आशा’ लक्ष्मी यांनी सांगितले की, कर्करोगाची तपासणी करण्याचे प्रशिक्षणच त्यांना दिलेले नाही. त्या म्हणतात, “स्त्रियांची स्तनाची किंवा गर्भाशय मुखाची चाचणी केल्यानंतर काही संशयास्पद आढळत आहे का किंवा कोणती लक्षणे दिसल्यास काळजी घ्यायला हवी, हे काहीच तिला आम्ही सांगत नाही. आम्हालाच याबाबत योग्य माहिती नाही, तर आम्ही तिला काय सांगणार?”

केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्वा चंद्रा आणि राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध आणि संशोधन संस्थेच्या संचालिका शालिनी सिंग यांच्याशी Behanboxने २ एप्रिल २०२४ रोजी संपर्क साधून तपासणी कार्यक्रमातील आव्हानांबाबत सांगितले आणि याचा पाठपुरावादेखील केला जात आहे. याबाबत अधिक माहिती मिळाल्यानंतर ती या लेखामध्ये समाविष्ट केली जाईल.

भारतामध्ये आरोग्य ही राज्याची जबाबदारी असून निदान कार्यक्रमाची अंमलबजावणी ही केंद्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाअंतर्गत राज्य सरकारमार्फत राबवली जाते. सरकारी आकडेवारीनुसार २०२१मध्ये २० दशलक्ष महिलांची गर्भाशय मुखाची चाचणी केली गेली, परंतु या चाचण्याची पद्धती आणि नोंदणी योग्य रितीने झालेली नाही.

गर्भाशय मुखाची तपासणीचा कार्यक्रम योग्य पद्धतीने राबवणाऱ्या काही राज्यांपैकी तामिळनाडू हे एक राज्य आहे. २०१७मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सादर केलेल्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०१७ या काळात १४.५ दशलक्ष महिलांची व्हीआयए (व्हिज्युअल इन्सपेक्शन ऑफ सर्व्हिक्स विथ असिटिक असिड) पद्धतीने चाचणी केली गेली आणि यातील ३ टक्के म्हणजेच ४ लाख ३० हजार महिलांना कर्करोगाची लागण झाल्याचे प्राथमिक तपासणीत आढळले. याबाबत मात्र पुढे कोणताही तपशील नमूद केलेला नाही. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये व्हीआयए चाचण्या केल्या गेल्या, परंतु याची ठोस आकडेवारी उपलब्ध नाही.

गर्भाशय मुखाच्या तपासणीबाबत संकोच

छत्तीसगढमधील नयागाव येथे बालको मेडिकल सेंटरने आयोजित केलेल्या कर्करोग तपासणी शिबिरामध्ये परिचारिकेद्वारे तपासणीसाठी रांगेत राहिलेल्या महिला. छायाचित्र - अफजल आदिब खान

कर्करोग तपासणी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीतील अडचणीमधील आणखी एक आव्हान म्हणजे योनीद्वारे केल्या जाणाऱ्या गर्भाशय मुखाच्या तपासणीसाठी महिलांना संकोच किंवा अवघडल्यासारखे वाटणे. “भारतामध्ये गर्भाशय मुखाच्या तपासणीबाबत अजूनही मोठ्या प्रमाणात अढी (स्टिग्मा) आहे. सुशिक्षित महिलादेखील योनीच्या तपासणीसाठी संकोच करतात,” असे जीसीआरआयच्या डॉ. पारेख सांगतात.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी बहुतांश वेळा स्तन, तोंडाच्या कर्करोगासोबतच केली जाते. खरं तर ही चाचणी करण्यामागचा उद्देश्य आणि त्याबाबत अधिक माहिती देणे, यासाठी या तपासणीवर विशेष आणि स्वतंत्रपणे भर देणे गरजेचे असल्याचे सीएपीईडीचे गुप्ता सांगतात.

भारतात ग्रामीण भागामध्ये कर्करोग म्हणजे मृत्यू हेच समीकरण जोडलेले आहे. ग्रामीण भागातील महिलांना उपचारामध्ये मिळण्यात येणाऱ्या अडचणींमध्ये सुविधांची अनुपलब्धता, कुटुंबाबाबतची कर्तव्ये सुविधांपर्यत पोहचण्यात येणाऱ्या अडथळे, स्वत:च्या आरोग्याला फारसे प्राध्यान्य न देणे आणि अशा तपासण्यांबाबतच अवघडलेपण यांचा समावेश आहे.

“समाजाचा विश्वास वाढवण्यासाठी आम्ही पुरुष, समुदायाचे नेते आणि स्त्रिया यांच्याशी संवाद साधण्यावर अधिक भर दिला जातो. यातूनच मग स्त्रिया तपासणीसाठी पुढे येतात,” असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

शहरातील आणि सुशिक्षित महिलांमध्ये ही तपासणीबाबतची भीती असल्याचे गुप्ता यांनी अधोरेखित केले. त्यांचा अनुभव सांगताना ते म्हणाले, “४० ते ४५ कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कर्करोगबाबत जनजागृती आणि तपासणी अभियान मोफत राबवले गेले. यामध्ये केवळ ५ टक्के महिला कर्मचाऱ्यांनी गर्भाशय मुखाची चाचणी करून घेतली.”

स्वदेशी एचपीव्ही लस

छत्तीसगढमधील नयागाव येथे कर्करोग तपासणी शिबिरात आलेल्या महिलांकडे उत्सुकतेने पाहणाऱ्या शाळकरी मुली. भारतामध्ये लवकरच ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. छायाचित्र – अफजल आदिब खान

गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही लसीकरण १००हून अधिक देशांनी दोन दशकांपूर्वीच सुरू केले आहे. भारताच्या बाजूच्याच भूटान, इंडोनेशिया, श्रीलंका, थायलंड, म्यानमार आणि मालदीव या देशांनी तर ही लस सार्वत्रिक लसीकरणामध्येही समाविष्ट केली आहे, तर काही देशांनी मुलींसोबतच मुलांचाही यात समावेश केलेला आहे.

एचपीव्ही  लशीच्या एका मात्रेमध्ये दोन किंवा तीन मात्रे इतकेच मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक संरक्षण मिळते, असे एप्रिल २०२२मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ समितीने जाहीर केले. भारतासारख्या आरोग्यासाठी मर्यादित निधी असलेल्या देशांसाठी ही आनंददायी बाब आहे. भारतातील जैवतंत्रज्ञान विभाग आणि सिरम इन्स्टिट्यूटने निर्मिती केलेली सर्व्हाव्हॅक लस ही चार विविध प्रकारच्या विषाणूंना प्रतिबंध करणारी आहे. तिची किंमत दोन हजार रुपये प्रतिमात्रा अशी आहे. ती बाजारात उपलब्ध असलेल्या इतर लशींच्या तुलनेत (तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिमात्रा) फार कमी आहे.

भारतामध्ये लवकरच या एचपीव्ही लशीचे लसीकरण देशभरात सुरू केले जाण्याची शक्यता आहे. देशातील एचपीव्ही लसीकरणाचा यापूर्वीचा प्रवास जरा अवघडच राहिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दोन आणि चार विषाणूंवर प्रतिबंध करणाऱ्या लशींना देशात २००८ साली मान्यता देण्यात आली. परंतु यानंतर २००९मध्ये सात मुलींचा मृत्यू झाल्याची माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. पुढे आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये केलेल्या एचपीव्ही लशीच्या अभ्यासामध्ये अनेक त्रुटी असल्याचे सरकारने केलेल्या तपासामध्ये निदर्शनास आले आणि सरकारने हा प्रकल्प बंद केला.

दिल्ली, पंजाब आणि सिक्कीम या राज्यांमध्येदेखील प्रायोगिक तत्त्वावर एचपीव्ही लशीचे लसीकरण केले गेले, परंतु केवळ सिक्कीमनेच यावर विशेष भर देत सार्वत्रिक लसीकरणामध्ये या लशीचा समावेश केला.

नवीन आणि योग्य प्रतिबंधात्मक उपाय

आरोग्य कर्मचारी सध्या करत असलेल्या व्हीआयए (व्हिज्युअल इन्सपेक्शन ऑफ सर्व्हिक्स विथ असिटिक अ‍ॅसिड) चाचणीच्या तुलनेच एचपीव्ही डीएनए चाचणी अधिक प्रभावशाली असल्याचे अलीकडेच काही अभ्यासांमध्ये अधोरेखित केले आहे. कमीत कमी संसाधने असलेल्या आरोग्य सेवेमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधात्मक तपासणीमध्ये व्हीआयएऐवजी एचपीव्ही डीएनए तपासणी करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेने २०२१मध्ये दिलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सूचित केले आहे. ३० वर्षांवरील महिलांनी दर पाच ते दहा वर्षांनी एचपीव्ही डीएनए तपासणी करण्याची शिफारसही संघटनेने केली आहे.

एचपीव्ही चाचणीची किंमत (१ हजार रुपये) तुलनेने जास्त असून लोकसंख्या स्तरावरील तपासणीमध्ये हा खर्च जास्त वाटू शकतो, परंतु गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे उच्चाटन करण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. “व्हीआयए तपासणीमधून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे वेळेत निदान केले जाते. परंतु एचपीव्ही चाचणी कर्करोग होण्याच्या आधीची स्थिती म्हणजेच एचपीव्हीचा संसर्ग झाला आहे का, याचे अचूक निदान करण्यासाठी फायदेशीर आहे,” असे सीएपीईडीच्या मृदू गुप्ता सांगतात. त्या पुढे म्हणतात, परंतु यासाठी आधी आपल्याला स्त्रियांच्या आरोग्याला प्राध्यान्य देणे अधिक गरजेचे आहे.

.................................................................................................................................................................

जेंडर आणि कर्करोग या लेखमालिकेमधील हा पहिला लेख यापूर्वी Behanboxमध्ये प्रसिद्ध झाला आहे.  मूळ इंग्रजी लेखासाठी पहा :

https://behanbox.com/2024/06/16/ignorance-and-apathy-why-one-indian-woman-dies-of-cervical-cancer-every-7-mins/

मराठी अनुवादशैलजा  तिवले

.................................................................................................................................................................

लेखिका स्वागता यादवर या अहमदाबादस्थित मुक्त-पत्रकार आहेत.

swagatayadavar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......