खरं तर कंगणा रनौटने आपला ‘दुसरा गाल’ही पुढे करायला हवा होता… ते अधिक न्याय्य झालं असतं!
अर्धेजग - कळीचे प्रश्न
राम जगताप
  • डावीकडे प्रसिद्ध अभिनेत्री व नवनिर्वाचित भाजप खासदार कंगना रनौट आणि उजवीकडे शेतकऱ्याची मुलगी कुलविंदर कौर
  • Fri , 07 June 2024
  • अर्धेजग कळीचे प्रश्न कंगना रनौट Kangana Ranaut कुलविंदर कौर Kulvinder Kaur

१.

४ जून रोजी संध्याकाळपर्यंत १८व्या लोकसभेचे निकाल आणि कौल जाहीर झाले. त्यात भाजपला बहुमत मिळालं नसलं, तरी एनडीए आघाडीने तीनेशेच्या आसपास जागा मिळवल्या असल्याचं स्पष्ट झालं. त्याच वेळी हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदासंघातून भाजपच्या उमेदवार आणि प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौट या विजयी झाल्या असल्याचंही जाहीर झालं होतं. मात्र स्मृती इराणी या केंद्रीय मंत्रीणबाईंचा अमेठीत दणकून पराभव झाल्याची बातमीही देशभर पसरली होती. एका विखारी बाईचा पराभव होत असतानाच दुसऱ्या एका विखारी बाईला संसदेत स्थान मिळालं होतं, यावरून काही लोक सोशल मीडियावर हास्यविनोद करत होते.

साधारण त्याच संध्याकाळी कंगना मंडीहून दिल्लीला जाण्यासाठी चंडीगड विमानतळावर आली. तेव्हा तिथल्या सुरक्षा यंत्रणेतील (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीआयएसएफ) कनिष्ठ सुरक्षा अधिकारी कुलविंदर कौरची कंगनाशी बाचाबाची झाली. त्यानंतर तिने कंगनाच्या गालावर एक चपराक लगावली. तेव्हा कंगनासोबतच्या मयंक मधुर यांनीही कुलविंदरला चपराक लगावण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारानंतर कुलविंदरला नोकरीतून निलंबित करण्यात आलं आहे आणि तिच्या विरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. सध्या ती अटकेत असल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना ४ जूनची. हा निकालाचा दिवस. त्यानंतरचा ५ जून निकालाच्या चर्चेचा. त्यामुळे ही बातमी देशभर आणि सोशल मीडियावर पसरायला ६ जून उजाडावा लागला.

कंगना खासदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर काही तासांतच ही घटना घडली. त्यात ती भाजपची खासदार. शिवाय प्रसिद्ध अभिनेत्री. आणि आपल्या वादग्रस्त व बेताल विधानांमुळे सतत चर्चेत असलेलं व्यक्तिमत्त्व. त्यामुळे कालपासून ही घटना सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाली असून त्यावर अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत. त्यात नेहमीप्रमाणे निषेधापासून समर्थनापर्यंत आणि विनोदापासून विडंबनापर्यंत अनेक प्रकार पाहायला मिळत आहेत.

दरम्यान थेट कंगनाला चपराक लगावणारी ही कोण बुवा कुलविंदर कौर याचा शोध राष्ट्रीय पातळीवरील काही माध्यमांनी घेतला. त्यातून पुढे आलेली माहिती अशी की, कुलविंदर पंजाबच्या सुल्तानपूर लोधीची रहिवासी आहे. (तिचा नवराही ‘औद्योगिक सुरक्षा दला’मध्ये असून चंडीगड विमानतळावरच कार्यरत आहे.) कुलविंदर किसान मजदूर संघर्ष समितीचे संघटन सचिव शेर सिंग यांची बहीण आहे.

दरम्यान कुलविंदरची प्रतिक्रियाही पुढे आली असून तिने म्हटलं आहे की, ‘इसने कहा था की १००-१०० रुपये के लिये बैठे हैं आंदोलन में! ये बेठी थी वहाँ पे? मेरी माँ बैठी थी उस टाइम जब इसने ये बयान दिया था!’

म्हणजे २०२०मध्ये दिल्लीच्या सीमेवर पंजाब-हरयाणातील शेतकरी आंदोलन करत होते, त्याची पार्श्वभूमी या घटनेला आहे. हे आंदोलन मोदी सरकारने मोडून काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यात यश येत नाही म्हटल्यानंतर या आंदोलनाला बदनाम करण्याची मोहीम ‘गोदी मीडिया’ आणि सोशल मीडियामधून राबवली होती. त्यात अर्थात मोदीही होतेच. त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची खिल्ली उडवताना त्यांना ‘आंदोलनजीवी’ म्हटलं होतं.

.................................................................................................................................................................

कंगना ‘आत्मभान’ जागृत झालेली ‘स्वाभिमानी’ भारतीय महिला नक्कीच आहे. फक्त अजून तिच्याअंगी भारतीय संस्कृतीतला मनाचा मोठेपणा आणि भारतीय लोकशाही परंपरेतला उदारमतवाद पुरेसा मुरलेला नाही. या दोन्ही संधी येत्या काळात एक संसदीय सदस्य म्हणून कंगनाला पुरेपूर मिळणार आहेत. त्याचा कंगनाने लाभ घ्यावा. म्हणजे मग या देशातल्या प्रत्येक महिलेला इतर कुणाच्याही आईचा आपल्याकडून कळत-नकळत, जाणीवपूर्वक अवमान\अपमान झाल्यास आणि त्याची तिच्या लेकीकडून तीव्र प्रतिक्रिया आल्यास, कसं वागावं, कसं बोलावं, याचं एक आदर्श उदाहरण म्हणून कंगनाचं नाव अभिमानानं घेता येईल. ते जर कंगनाने केलं, तर एक भारतीय महिला म्हणून कंगनाकडून एक ‘ऐतिहासिक’ कामगिरी घडेल.

.................................................................................................................................................................

बाकी भाजपनेते, भाजपसमर्थक आणि मोदीअंधभक्त यांच्या बेताल, असभ्य आणि असुसंस्कृत प्रतिक्रियांबद्दल तर बोलायलाच नको. कंगनाबाईही मोदीभक्त असल्यामुळे त्यांनीही परेश रावल, अनुपम खेर या भंपक अभिनेत्यांप्रमाणे या आंदोलनाची खिल्ली एकनिष्ठेनं उडवली होती.

मोहिंदर कौर ही वृद्ध महिला कमरेत वाकलेल्या स्थितीत शेतकरी आंदोलनाचा झेंडा हातात धरून चालत असतानाचं एक छायाचित्र सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झालं होतं. त्याची खिल्ली उडवताना कंगनाने ट्विट केलं होतं की, “हा हा. ये वही दादी हैं जिन्हें टाइम मैगज़ीन की 100 सबसे प्रभावशाली व्यक्तियों की लिस्ट में शामिल किया गया था.... और ये 100 रुपये में उपलब्ध हैं.”

कंगना तशीही परेश रावल, अनुपम खेर या नीतीमत्ताशून्य आणि विचारशून्य अभिनेत्यांच्याच पंथातली असल्यामुळे तिची भाषा यापेक्षा वेगळी नसणार, हे ओघानंच आलं. त्यात कंगना तशी सुरुवातीपासूनच वादग्रस्त अभिनेत्री. सतत काहीतरी वावदूक बोलून प्रसिद्धीत राहण्याचा तिला भारी सोस असल्याचं दिसतं. असे लोक मोदीसमर्थक असतील, तर त्यांना गेल्या ‘गोदी मीडिया’ डोक्यावर घेतो, हे गेल्या दहा वर्षांत अनेकदा दिसलेलं आहे.

त्यामुळे कंगनाची ‘न्यूसन्स व्हॅल्यू’ हाच तिचा यूएसपी झाला आणि ‘गोदी मीडिया’ने हुकुमाबर हुकूम तिचे प्रतिमासं‌वर्धन केलं. मग काय, ‘मिया मूठभर आणि दाढी हातभर’ असं कंगनाचं व्यक्तिमत्त्व बनत गेलं. या सगळ्याच्या परिणामी तिचं हे वादग्रस्त ट्विट प्रचंड ‘व्हायरल’ झालं होतं. त्यावरून चौफेर टीका सुरू झाल्यावर कंगनाने ते डिलीटही केलं, पण तोवर त्याचा व्हायचा तो परिणाम होऊन गेला होता.

कंगनाच्या प्रतिक्रियेने कुलविंदर दुखावली गेली, कारण तिचा भाऊ आणि आई दोघंही शेतकरी आंदोलनात सहभागी होते. कंगनाची प्रतिक्रिया फारच वावदूक, आक्रस्ताळी, बेताल आणि मूर्खपणाची होती. त्यामुळे कुलविंदरला आपल्या आईचा अपमान झाला असल्याची भावना होणं आणि कंगनाचा मनस्वी राग येणं, अगदीच स्वाभाविक आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

२.

या देशातला शेतकरी काबाडकष्ट करून धान्य पिकवतो. त्यासाठी ढोर-मेहनत घेतो. पण ते बाजारात मात्र मातीमोल भावानं विकावं लागतं. ज्यांच्या अन्नावर आपण जगतो, त्या अन्नदात्या शेतकऱ्यांविषयी या देशातला मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग आणि उच्चभ्रू सतत अपमानास्पद आणि अवहेलनात्मक बोलत असतो. हे शेतकरी जेव्हा आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आंदोलन करतात, तेव्हा त्यांची या तिन्ही वर्गातले लोक खिल्ली उडवतात, त्यांना शिव्याशाप देतात.

‘आम्ही नाही केला पेरा, तर तुम्ही काय खाल, धतुरा?’ अशी काहीशी वरकरणी उर्मट वाटणारी, पण पोटतिडिकेतून आलेली घोषणा फार पूर्वी ‘शेतकरी आंदोलना’तले शेतकरी देत असत. हल्ली ही घोषणा दिली जात नाही, पण ती द्यावी, या स्थितीला तो आलेला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांतल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांतून या राज्यातल्या शेतकऱ्यांची विदारक स्थिती जगजाहीर झालेली आहे.

पण असं होऊनही सरकार शेतकऱ्यांची सातत्यानं उपेक्षाच करताना दिसतं. आश्वासनं देऊन ती पाळत नाही, मागण्या करून त्यांची दखल घेत नाही, आणि आंदोलन केल्यावर ती दडण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करतं.

आपल्या कष्टाची योग्य किंमत केली जावी, हीच मागणी घेऊन २०२०मध्ये दिल्लीच्या सीमेवर पंजाब-हरयाणातील शेतकरी आंदोलन करत होते. इतर राज्यांतीलही शेतकरी त्यात सामील झाले होते. या आंदोलनाला ‘खलिस्तानी’ ठरवण्यापासून त्याला बदनाम करण्यापर्यंत, त्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या मार्गात खिळे ठोकण्यापर्यंत मोदी सरकारने हरप्रकारे प्रयत्न केले.

त्यात कंगनासारख्या भंपक आणि बेताल सेलिब्रेटींनी आपल्या लोकप्रियतेचा फायदा उठवत, या आंदोलनकर्त्यांची खिल्ली उडवली, त्यांचा अपमान केला, तर एका शेतकऱ्याच्या मुलीला राग येणार नाही का? विशेषत: तिची आई त्या आंदोलनात असताना इतका मूर्खपणाचा आरोप कंगनाने केल्यावर तिला तो आपल्या कष्टकरी आईचा अपमान वाटून राग आला आणि त्यातून तिच्या हातून आगळीक घडली, तर ते अगदी स्वाभाविक आणि साहजिक म्हणावं लागेल.

इथं एक गोष्ट नमूद करायला हवी की, २०२२च्या ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळ्यात सूत्रसंचालक क्रिस रॉक यांने विल स्मिथ या अभिनेत्याची घटस्फोटीत पत्नी जेडा पिंकेटची चेष्टा केली, तेव्हा अभिनेता विल स्मिथने व्यासपीठावर जाऊन क्रिस रॉकच्या कानफडात लगावली होती. त्यावरून जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये मोठं वादंग माजलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने ही आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिलं होतं,  “अगर कुछ बेवकूफ मेरी मां और बहन का मज़ाक उड़ाएंगे, कुछ बेवकूफ लोगों को हंसाने के लिए, तो भी वही करूंगी जे विल स्मिथ ने किया.” त्यामुळे आपल्या आईचा अपमान केल्याबद्दल कुलविंदरने कंगनाच्या कानफडात लगावली असेल, तर त्यातून कंगनाच्याच विचाराचं समर्थन होतं, असंच म्हणावं लागेल. त्यामुळे कुलविंदरविरोधात बोलण्याचा कंगनाला कुठलाही नैतिक अधिकार नाही. उलट आपल्याला आपल्याच विचाराचा विसर पडल्याबद्दल कंगनाने कुलविंदरची माफी मागायला हवी होती आणि आपला दुसरा गालही पुढे करायला हवा होता.

कंगना मोदीभक्त असल्यामुळे प्रथेप्रमाणे काही शहाजोग मोदीभक्त असा प्रश्न उपस्थित करत आहेत की, हा हिंसाचार आहे, हिंसेचं समर्थन केलं जाऊ शकत नाही, वगैरे वगैरे. मोदीभक्तांचा ‘आयक्यू’ साधारणपणे शाळकरी पातळीवरचा असल्याने त्यांचा हा युक्तिवाद फारसा आश्चर्याचा नाही. हिंसा कशाला म्हणायचं आणि कशाला नाही, कुलविंदरचं कृत्य घटनात्मकदृष्ट्या योग की अयोग्य, शाब्दिक अवहेलनेवर शारीरिक कृतीचा उपाय समर्थनीय ठरतो, की ठरत नाही, लोकशाहीत आपला संताप व्यक्त करण्याचा योग्य मार्ग कुठला, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करता येईलही. ती मोदीभक्तींनी जरूर करावी आणि ‘कॉमनसेन्स कॉमनली अब्सेंटच असतो’, याचे पुरावे पुन्हा दाखवून द्यावेत.

.................................................................................................................................................................

केंद्र सरकारची एक प्रतिनिधी म्हणून कंगनाला या देशातल्या शेतकऱ्यांविषयी, शेतकरी महिलांविषयी काही करता येईल, न येईल, पण या देशातल्या महिलांचा अवमान तरी आपल्या संसदीय कारकिर्दीत होणार नाही, असं वर्तन तरी नक्की करता येईल. अन् समजा, झालाच आणि त्यावर समोरून जरा तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया आलीच, तर त्याकडे मन मोठं करून, उदारपणे पाहता येईल. कंगना ‘आत्मभान’ जागृत झालेली ‘स्वाभिमानी’ भारतीय महिला नक्कीच आहे. फक्त अजून तिच्याअंगी भारतीय संस्कृतीतला मनाचा मोठेपणा आणि भारतीय लोकशाही परंपरेतला उदारमतवाद पुरेसा मुरलेला नाही. या दोन्ही संधी येत्या काळात एक संसदीय सदस्य म्हणून कंगनाला पुरेपूर मिळणार आहेत. त्याचा कंगनाने लाभ घ्यावा.

.................................................................................................................................................................

ते करताना त्यांनी खालील काही गोष्टी ठेवाव्यात इतकंच. त्या अशा -  

२ ऑक्टोबर २०१४ रोजी तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केलं. तेव्हा ते म्हणाले होते, ‘राष्ट्रपिता महात्मा गांधींनी देशाला गुलामीतून मुक्त केलं, पण त्यांचं ‘स्वच्छ भारता’चं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.’ ते पूर्ण करण्यासाठी मोदींनी सुरू केलेल्या या अभियानात सुरुवातीला भाजपच्या अनेक नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. हळूहळू त्यांनी त्यातून अंग काढून घेतलं. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत भारत काही पूर्णपणे ‘स्वच्छ’ होऊ शकला नाही.

पण या दहा वर्षांत भाजपच्या अगोचर, आक्रमक, हिंसक आणि तिरस्कारग्रस्त नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षातले नेते, पत्रकार आणि मोदी-भाजपविरोधक यांच्याविषयी इतकी असभ्य, असंसदीय आणि माणुसकीला काळिमा फासणारी भाषा वापरलेली आहे की, विचारता सोय नाही. त्याबाबत मात्र असं कुठलं ‘स्वच्छता अभियान’ राबवावं, असं मोदींना काही वाटलं नाही.

इतकंच नव्हे तर आपल्या या बेताल आणि भंपक नेत्या-कार्यकर्त्यांना किमान समज देण्याचंही काम मोदींनी फारसं केलेलं नाही. त्यामुळे भाजपची ‘भाषिक घाण’ मात्र देशातील कचऱ्याच्या घाणीइतकीच वाढली. आणि प्रत्येक मोठ्या शहरातले कचरा डेपो जितके दुर्गंधीयुक्त असतात, तितकीच दुर्गंधी या बेताल आणि भंपक भाजप नेत्या-कार्यकर्त्यांमुळे ‘भारतीय संस्कृती’त पसरली आहे.

मोदींच्या मागील दहा वर्षांच्या सत्ताकाळात तर महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या कितीतरी निंदनीय, हिंसक आणि क्रूर घटना घडल्या आहेत. उदा., कठुआ, उन्नाव, हाथरस येथील बलात्कार, बिल्किस बानोवर बलात्कार करणाऱ्या आरोपींची तुरुंगातून सुटका करून त्यांचा गुजरातच्या भाजप नेत्यांनी केलेला जाहीर सत्कार, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांच्या हसण्याला दिलेली ‘हिंडिबा’ची उपमा...

निखिल दधिच या भाजप अंधभक्ताने पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ‘एक कुतिया कुत्ते की मौत क्या मरी सारे पिल्ले एक सुर में बिलबिला रहै हैं’ असं अतिशय विकृत स्वरूपाचं ट्विट केलं होतं. या विकृत इसमाला साक्षात नरेंद्र मोदी यांचं ट्विटर हँडल फॉलो करत होतं. त्यावरून देशभरात तेव्हा मोठा वादंग माजला होता. तरीही मोदींनी त्यावर कुठलाही खुलासा केला नाही वा स्पष्टीकरणही दिलं नाही.

मणिपूरमधल्या हिंसाचाराला नुकतंच एक वर्षं पूर्ण झालं. या राज्यात सुरू असलेला हिंसाचार इंटरनेट सेवा बंद करून मोदी सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला. तीनेक महिन्यानंतर तेथील एका महिलेला नग्न करून तिची विटंबना काही गुंड करत असल्याचा व्हिडिओ जाहीर झाल्यानंतर देशाला आणि मणिपूरमधल्या भयानक हिंसाचाराची कल्पना आली. त्यावरून देशपातळीवर वादंग माजल्यानंतर ‘दोषींवर कडक कारवाई केली जाईल’ अशा स्वरूपाची दहा-बारा सेकंदाची प्रतिक्रिया दिली. तीही नाईलाजाने दिली असं वाटावं, अशा स्वरात. गेल्या वर्षभरात या राज्याला पंतप्रधान मोदी यांनी एकदा भेटही दिली नाही आणि त्याबाबत देशाला आश्वस्त करणारं एक साधं निवेदनही केलेलं नाही.

.................................................................................................................................................................

भाजपची महिला खासदार म्हणून कंगनाकडे एक संधी चालून आलेली आहे. तिने संसदेत भारतीय महिलांचं प्रतिनिधित्व करावं आणि ‘नारी शक्ती वंदन’ हे विधेयक लवकरात लवकर अमलात येईल, यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी संसदेतल्या इतर सर्व पक्षांतल्या महिला खासदारांची एक समिती वा गट बनवावा आणि त्याचं प्रतिनिधत्व करावं. तसे कंगनाने केले आणि या विधेयकासाठी प्रयत्न केले, तर तिला भारतातील तमाम महिला ‘वंदन’ करतील आणि त्यांचा न्याय्य हक्क त्यांना मिळवून दिला, याबद्दल तिच्या ऋणीही राहतील. शिवाय सिनेमात जशी कंगना स्वत:ला झोकून देऊन, भूमिकेत शिरून काम करते, तसेच तिने संसदेतही महिला खासदार म्हणून काम केले, तर तो तिच्या संसदीय कारकिर्दीतला गौरवाचा आणि प्रतिष्ठेचा काळ असेल.

.................................................................................................................................................................

३.

असो. मूळ मुद्द्यावर येऊया. समंजसपणाचा, विचारीपणाचा आणि उदार मानसिकतेचा कंगनाकडे तसाही अभाव आहे. म्हणूनच तिने या घटनेनंतर एक व्हिडिओ जारी करत म्हटलं आहे की, ‘पंजाब में जो आतंकवाद और उग्रवाद बढ़ रहा हैं, उसे हम कैसे हैंडल करेंगे?’ कंगना म्हणते ती समस्या पंजाबमध्ये असेलही, पण तिचा आपल्याला लगावलेल्या चपराकीशी संबंध लावण्याचा हा प्रकार हास्यास्पद आणि पोरकटपणाचाच म्हणावा लागेल.

अर्थात असा पोरकटपणा आणि उथळपणा हा कंगनाचा स्वभावधर्मच आहे, हे तिने आजवरच्या आपल्या अनेक बेताल व भंपक वक्तव्यातून दाखवून दिलेलं आहे. पण हा प्रकार आता तिने थांबवायला हवा. कारण कालपर्यंत ती केवळ एक अभिनेत्री होती. आता ती जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाहीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेची नवनिर्वाचित खासदार आहे. तुम्ही कुठल्याही राज्यातून वा मतदारसंघातून संसदेवर निवडून गेलात, तरी तुम्ही आपल्या राज्या-मतदारसंघाच्या बरोबरीने देशाचंही प्रतिनिधित्व करावं, अशी अपेक्षा असते. तसा घटनात्मक संकेतही आहे.

अजून नवं सरकार स्थापन व्हायचंय, त्याचा शपथविधी व्हायचाय, भाजपसह एनडीए आघाडीतील घटक पक्षांमध्ये खातेवाटप जाहीर व्हायचंय. त्यात समजा कंगनाबाईंचा नंबर नाही लागला, तरी तिला एक खासदार म्हणून संसदेत देशातल्या महिलांचं प्रतिनिधित्व नक्कीच करता येईल.

२१ सप्टेंबर २०२३ रोजी भाजपने संसदेत ‘नारी शक्ती वंदन घटनादुरुस्ती विधेयक २०२३’ हे विधेयक मंजूर केलं. लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्याबाबतचं हे विधेयक आहे. हे विधेयक लोकसभेत ४५४ सदस्यांनी एकमतानं मंजूर केले. दुसऱ्या दिवशी ११ तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक राज्यसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. मात्र प्रथम जनगणना आणि नंतर त्या आधारावर मतदारसंघ पुनर्रचना-संख्याविस्तार, या घटनात्मक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हे विधेयक प्रत्यक्षात लागू होईल. म्हणजे हे विधेयक प्रत्यक्षात यायला अजून पाच-सात वर्षं लागतील.

आजघडीला या देशातील महिला आपल्या कर्तृत्वाच्या, बुद्धिमत्तेच्या आणि कष्टाच्या जोरावर अनेक क्षेत्रांत आघाडीवर आहेत, आपला ठसा उमटवत आहेत. तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, उद्योग, राजकारण, शिक्षण, अर्थकारण, परराष्ट्र नीती, सामाजिक कार्य, पत्रकारिता, वैद्यकीय व्यवसाय, वकिली, लष्कर… तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या… त्यातील महिलांचं प्रमाण कमी-अधिक असेल, पण ज्या महिला त्यात काम करतात, त्या त्यात आपल्या कर्तृत्वाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर पायावर रोवून उभ्या असलेल्या आणि पुढे जात असलेल्या दिसतील.

.................................................................................................................................................................

‘क्वीन’ या सिनेमात कंगनाने ‘आत्मभान’ जागृत झालेल्या एका ‘स्वाभिमानी’ मुलीची उत्कृष्ट भूमिका केली आहे. तशीच संसदेत एक जबाबदार खासदार म्हणून भूमिका निभावण्याची ऐतिहासिक संधी कंगनाला भारतीय जनतेनं दिलेली आहे. तिचं तिने सोनं करून, कुलविंदर कौरच्या चपराकीची संसदीय लोकशाहीत घटनात्मक मार्गानं सव्याज परतफेड करावी. कंगना एक उत्तम अभिनेत्री आहे, हे तिचे सिनेमे पाहणारा कुणीही नाकबूल करू शकणार नाही. फिल्मी घराण्याची कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही कंगनाने बॉलिवुडमध्ये गुणवत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. हा प्रवास एका  ‘आत्मभान’ जागृत झालेल्या ‘स्वाभिमानी’ भारतीय महिलेचाच आहे.

.................................................................................................................................................................

पण आपल्या संसदेत मात्र महिलांचं प्रतिनिधित्व अतिशय कमी असल्याचं दिसतं. महिला सदस्यांबाबत कमी-अधिक फरकाने सर्वच राजकीय पक्ष दुजाभाव करत असले तरी, भाजपमध्ये महिलांना सर्वाधिक कमी प्रमाणात स्थान दिलं जातं, हे जाहीर सत्य आहे. यंदाच्या निवडून आलेल्या सर्वपक्षीय खासदारांमध्ये महिलांची सर्वाधिक संख्या तृणमूल काँग्रेसमध्ये असल्याचे दिसते. त्यानंतर काँग्रेसचा नंबर लागतो. भाजप यात तिसऱ्या क्रमांकावरही नाही.

त्यामुळे भाजपची महिला खासदार म्हणून कंगनाकडे एक संधी चालून आलेली आहे. तिने संसदेत भारतीय महिलांचं प्रतिनिधित्व करावं आणि ‘नारी शक्ती वंदन’ हे विधेयक लवकरात लवकर अमलात येईल, यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी संसदेतल्या इतर सर्व पक्षांतल्या महिला खासदारांची एक समिती वा गट बनवावा आणि त्याचं प्रतिनिधत्व करावं. तसे कंगनाने केले आणि या विधेयकासाठी प्रयत्न केले, तर तिला भारतातील तमाम महिला ‘वंदन’ करतील आणि त्यांचा न्याय्य हक्क त्यांना मिळवून दिला, याबद्दल तिच्या ऋणीही राहतील.

शिवाय सिनेमात जशी कंगना स्वत:ला झोकून देऊन, भूमिकेत शिरून काम करते, तसेच तिने संसदेतही महिला खासदार म्हणून काम केले, तर तो तिच्या संसदीय कारकिर्दीतला गौरवाचा आणि प्रतिष्ठेचा काळ असेल. ‘क्वीन’ या सिनेमात कंगनाने ‘आत्मभान’ जागृत झालेल्या एका ‘स्वाभिमानी’ मुलीची उत्कृष्ट भूमिका केली आहे. तशीच संसदेत एक जबाबदार खासदार म्हणून भूमिका निभावण्याची ऐतिहासिक संधी कंगनाला भारतीय जनतेनं दिलेली आहे. तिचं तिने सोनं करून, कुलविंदर कौरच्या चपराकीची संसदीय लोकशाहीत घटनात्मक मार्गानं सव्याज परतफेड करावी. 

कंगना एक उत्तम अभिनेत्री आहे, हे तिचे सिनेमे पाहणारा कुणीही नाकबूल करू शकणार नाही. फिल्मी घराण्याची कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही कंगनाने बॉलिवुडमध्ये गुणवत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. हा प्रवास एका ‘आत्मभान’ जागृत झालेल्या ‘स्वाभिमानी’ भारतीय महिलेचाच आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

४.

केंद्र सरकारची एक प्रतिनिधी म्हणून कंगनाला या देशातल्या शेतकऱ्यांविषयी, शेतकरी महिलांविषयी काही करता येईल, न येईल, पण या देशातल्या महिलांचा अवमान तरी आपल्या संसदीय कारकिर्दीत होणार नाही, असं वर्तन तरी नक्की करता येईल. अन् समजा, झालाच आणि त्यावर समोरून जरा तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया आलीच, तर त्याकडे मन मोठं करून, उदारपणे पाहता येईल. कंगना ‘आत्मभान’ जागृत झालेली ‘स्वाभिमानी’ भारतीय महिला नक्कीच आहे. फक्त अजून तिच्या अंगी भारतीय संस्कृतीतला मनाचा मोठेपणा आणि भारतीय लोकशाही परंपरेतला उदारमतवाद पुरेसा मुरलेला नाही. या दोन्ही संधी येत्या काळात एक संसदीय सदस्य म्हणून कंगनाला पुरेपूर मिळणार आहेत. त्याचा कंगनाने लाभ घ्यावा.

म्हणजे मग या देशातल्या प्रत्येक महिलेला इतर कुणाच्याही आईचा आपल्याकडून कळत-नकळत, जाणीवपूर्वक अवमान\अपमान झाल्यास आणि त्याची तिच्या लेकीकडून तीव्र प्रतिक्रिया आल्यास, कसं वागावं, कसं बोलावं, याचं एक आदर्श उदाहरण म्हणून कंगनाचं नाव अभिमानानं घेता येईल.

ते जर कंगनाने केलं, तर एक भारतीय महिला म्हणून कंगनाकडून एक ‘ऐतिहासिक’ कामगिरी घडेल. तेव्हा कदाचित कुलविंदरलाही आपल्या आईसारखाच कंगनाचाही अभिमान वाटेल. ‘वावदूकपणा’कडून ‘लोकशाही उदारमतवादा’कडे प्रवास करणाऱ्या कंगनाकडे पाहून कुलविंदरच्याही ‘स्वाभिमानी’ वृत्तीला ‘लोकशाही उदारमतवादा’ची जोड मिळेल. परिस्थिती बदलली की, माणूसही बदलतो, यावर कंगनाचा विश्वास असेलच. कारण तिचा स्वत:चा प्रवासच त्याची साक्ष देतो.

त्यामुळे कंगनाने आक्रस्ताळेपणा न करता, या घटनेकडे एक ‘बोध’ म्हणून पाहावं. कारण हा देश जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या आणि ‘कुणी तुमच्या एका गालावर मारलं, तर तुम्ही तुमचा दुसरा गाल पुढे करा’, असं सांगणाऱ्या गांधींचा आहे. ही धारणाही कंगनाला पुन्हा एकदा अधोरेखित करता येईल.

.................................................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......