“मी विजया बनून घरी आले, तेव्हा घरातील सर्वजणी माझी खूप कुतूहलाने वाट पाहत होत्या आणि त्यांनी माझे प्रेमाने स्वागत केले, पण...”
अर्धेजग - कळीचे प्रश्न
अनुराधा मोहनी
  • विजया
  • Wed , 23 August 2023
  • अर्धेजग कळीचे प्रश्न तृतीयपंथी एलजीबीटीक्यू पारलिंगी LGBT MARRIAGE RIGHTS

तृतीयपंथी अर्थात एलजीबीटीक्यू समुदायाबद्दल आजकाल आपण बरेच काही ऐकत आहोत. गेल्या दहा-पंधरा वर्षांत त्यांच्याबद्दल जनजागृती होऊन, त्यांना काही प्रमाणात एक स्वीकारार्हता प्राप्त झाली आहे. त्यांच्यातील वैविध्य समजू लागले आहे. त्यांच्या हक्कांची जाणीव (त्यांना आणि त्यानंतर आपल्याला) होऊ लागली आहे. मुख्य म्हणजे विविध प्रकारच्या लैंगिकतांचे लोक जगभर सर्वत्र स्वाभाविकपणेच जन्म घेतात, वाढतात, आपल्या लैंगिकतांनुसार संधी मिळाल्यास जगतात आणि बहुतेक वेळा त्यांना आपल्या इच्छांचे दमन करून जगावे लागते, हेही आपल्याला माहीत झाले.

भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७नुसार स्त्री-पुरुषांचा संभोग हा नैसर्गिक आणि बाकी सर्व प्रकारचा संभोग अनैसर्गिक व गुन्हा मानला जात होता. जानेवारी २०१८मध्ये हे कलम रद्द करण्यात आले. त्यामुळे समलिंगी व पारलिंगी जोडप्यांना एकत्र राहण्याची सोय झाली. आता ते विवाहाची व मुले दत्तक घेण्याची परवानगी मागत आहेत. त्याबद्दलच्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठासमोर सुरू आहे. एलजीबीटीक्यू+ समुदायाची यापुढची वाटचाल कितपत सुकर होते, हे त्यावरून ठरणार आहे.

या समुदायाच्या इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर हा प्रश्न आता कुठे आपल्या वाचनाच्या कक्षेत आला आहे. त्यानंतर आपल्याला तो समजणे/आकळणे आणि मग तो आपल्या भावविश्वाचा भाग बनून आपल्या त्याबद्दल समभाव (Empathy) वाटणे, हे आणखी पुढचे टप्पे झाले. ‘सर्वंकष’ने या विषयाला पहिल्यापासून स्थान दिले आहे. जानेवारी-मार्च २०२२च्या अंकातील ‘बधाई दो’ या चित्रपटाचा समीक्षात्मक परिचय, तसेच जानेवारी-मार्च २०२३च्या ‘भारताची संकल्पना’ या विशेषांकातील ‘क्विअर भारताचा अदृश्य इतिहास’ हा लेख त्याचेच द्योतक आहेत. आपण आता त्यापुढे जाऊन सातपुड्यातील एका पारलिंगी भिल्ल तरुणीची कहाणी सांगणार आहोत. त्यापूर्वी समस्येची पार्श्वभूमी आणि त्याविषयक काही वैज्ञानिक माहिती आपण समजून घेऊ या.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

एरवीही स्त्रियांना बाईपणाच्या आणि पुरुषांना पौरुषाच्या साच्यात कोंबण्याचा आपण इतका आग्रह धरतो की, थोड्या वेगळ्या प्रवृत्तीचे, वेगळा लिंगभाव जपणारे, किंवा ज्यांचे वर्तन समाजाने घालून दिलेल्या नियमांपेक्षा थोडे वेगळे असेल असे स्त्री-पुरुषही आपल्याला ‘चालत’ नाहीत. मग ज्यांचा लैंगिक कलच (sexual orientation) त्यांच्या शारीरिक लिंगापेक्षा वेगळा असेल त्यांचे काय? आपण त्यांना समजून न घेतल्यामुळे त्यांची किती कुचंबणा होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी.

प्रथम आपण त्याची कारणे समजून घेऊ या. पूंबीज आणि स्त्रीबीज यांच्या संयोगातून स्त्रीबीजाची फलधारणा (Fertilization) होते, तेव्हाच होणाऱ्या गर्भाचे जीनी लिंग (genetic sex) ठरत असते. गर्भाच्या केंद्रकात XY गुणसूत्रे असतील तर पुल्लिंग, आणि XX असल्यास स्त्रीलिंग. गर्भाची वाढ होत असते, तेव्हा पहिल्या दोन महिन्यांत जननेंद्रिये तयार होतात. त्यावरून शारीरिक लिंग ठरते. मात्र मेंदूची लैंगिक संरचना साडेचार महिन्यांनंतर आकाराला येते. त्यावर संप्रेरके, औषधे, शारीर रसायने वेगवेगळ्या वेळी प्रभाव टाकतात. गुणसूत्रांचाही परिणाम होतो. त्यातून कधी कधी शारिरीक लिंग एका तऱ्हेचे, तर लैंगिक प्रकृती दुसऱ्या तऱ्हेची असे घडते, किंवा असे म्हणू की, शरीरावर दिसणारी जननेंद्रिये ही कधी कधी फसवी असतात.

पारलिंगी म्हणजे काय ते आणखी थोडे समजून घेऊ या. हिजडा म्हणजेच पारलिंगी हा समज तेवढा बरोबर नाही. ९८-९९ टक्के हिजडे हे पुरुष म्हणून जन्माला येतात. त्यांचे राहणीमान मात्र स्त्रीसारखे असते. आपण पूर्णपणे पुरुष नाही आणि स्त्रीही नाही, या गोष्टीचा त्यांनी स्वीकार केलेला असतो. त्यांची जीवशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय रचना गुंतागुंतीची असते. काही हिजडे ‘ट्रान्सजेंडर’ म्हणजे पारलिंगी असतात, तर काही नसतात. पारलिंगी म्हणजे लिंगाच्या पलीकडले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आणखी स्पष्ट सांगायचे, तर जन्मतः असलेल्या जीवशास्त्रीय लिंगाच्या पलीकडले. पारलिंगी स्त्री जन्मतः शरीराने पुरुष असून तिचा लिंगभाव स्त्रीचा असतो, तर पारलिंगी पुरुष हा जन्मतः शरीराने स्त्री असून तिचा लिंगभाव पुरुषाचा असतो. हिजडा व्यक्ती ही स्वतःला तृतीयपंथी मानते, म्हणजे ना स्त्री, ना पुरुष. पारलिंगी व्यक्ती मात्र स्वतःला स्त्री किंवा पुरुष मानते. तिचे शरीर एका लिंगाचे, तर लिंगभाव विरुद्ध लिंगाचा असतो.

आता जिची मुलाखत घेऊन हा लेख लिहिला आहे त्या विजयाबद्दल. वर सांगितल्याप्रमाणे ही विजया पूर्वी विजय म्हणजे मुलगा होती. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा हे तालुक्याचे गाव, हे विजयचे मूळ गाव. तेथे एका भिल्ल कुटुंबात समुदायात त्याचा जन्म झाला. अगदी लहान असतानाच त्याला आपण मुलगी आहोत, हे ध्यानात आले होते. पण किशोरवयात आल्यानंतर मात्र त्याला ते तीव्रपणे जाणवले. आजूबाजूच्या लोकांनी त्याला मुलासारखे वागवणे, त्याने मुलाचे कपडे घालावे, हा साऱ्यांचा आग्रह, या बाबी त्याला खूप खटकायच्या. एखाद्या चित्रपट अभिनेत्रीचा फोटो पाहिल्यावर आपण तसे दिसावे, असे वाटायचे. मग तो मुलीसारखा मेकअप वगैरे करायचा.

घरात एकूण मुलींची संख्या जास्त असल्यामुळे खेळ तर मुलींचेच खेळले जायचे. बालपण कसे गेले म्हणून विचारले, तर शाळा नव्हती गावात. मग एवीतेवी मुलगा म्हणूनच वाढवल्यावर गावापासून १२-१३ किमी अंतरावरील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत त्याचे नाव टाकण्यात आले. घरी वडील खूप दारू प्यायचे. विजयची जन्मदात्री आई असतानाच दुसरी आई आणि ती असताना तिसरी आई त्याच्या घरात आली. परंतु लहान वयामुळे त्याला त्याची जाणीव झाली नाही आणि कमी-अधिक प्रमाणात बरे बालपण त्याच्या वाट्याला आले. चौथी पास झाल्यावर पाचवीत एका जिल्ह्याच्या ठिकाणी बोर्डिंग स्कूलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. विजयला आणि त्याच्या भावंडांना त्या शाळेत दाखल करून झाल्यावर वडील निघून गेले आणि तेथून त्याची खरी लढाई सुरू झाली.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

त्यांची वेगळी ओळख आपण सन्मानानं जपायला हवी. (पूर्वार्ध)

त्यांची वेगळी ‘ओळख’ आपण सन्मानानं जपायला हवी! (उत्तरार्ध)

कलम ३७७ : सुखावलेलं इंद्रधनुष्य आणि त्यांच्यापुढील ७ आव्हानं!

..................................................................................................................................................................

विजय मुलीसारखा दिसायचा आणि त्याची राहणीही तशीच होती. त्यावरून मुले त्याला चिडवायची, पण तोही त्याला गंमतीचा, खेळाचा भाग वाटला. एक मुलगा मात्र त्याला ‘तू माझी गर्लफ्रेंड’ म्हणून चिडवायला लागला. एकीकडे थोडे वाईट वाटून घेत असताना, त्याला तो खेळ आवडूही लागायचा. कारण तोही स्वतःला मुलीच्या रूपातच बघत असायचा. पण त्याचे बघून इतर सर्व मुलेही चिडवायची. बारावीपर्यंत हा खेळ चालला. तेव्हा विजयला कळलेच नाही की, तो मुलगा विजयवरून स्वतःची करमणूक करून घेत आहे.

जेव्हा हे खूप वाढले, तेव्हा मात्र त्याला त्याचा त्रास वाटू लागला. एकाच खोलीमध्ये सगळी मुले भरलेली असायची. शरीर मुलाचे असले तरी मन मुलीचे असल्यामुळे तेथे सर्वांसोबत कपडे बदलणे, आंघोळ करणे, यासाठी त्याला विलक्षण त्रास सोसावा लागायचा. कित्येकदा तो सर्वजण झोपल्यानंतर रात्री आंघोळ करत असे. सकाळी नुसते हातपाय धुवून शाळेत जावे लागे.

विजय आगळावेगळा असल्यामुळे कुणी त्याच्याशी मैत्री करत नसे, उलट ते त्याची टरच उडवत. एकदा तर पेटती प्लास्टिक पिशवी त्याच्या तळहातावर टाकून देण्याचा विलक्षण क्रूर प्रकार घडला. हे सुरू झाल्यावर, आपल्याच बाबतीत असे का व्हावे, याचा तो सतत विचार करू लागला. आदिवासी समाजातून आल्यामुळे एकतर आधीच सर्व, मूलभूत गोष्टींचाही - अभाव आणि त्यातून शिक्षणातील हे अडथळे! तो खोखो खेळत असे, तेव्हा मुलांच्या बरोबरीने खेळत असताना चांगला सराव असूनही तो त्यांच्या तुलनेत लवकर दमत असे.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

‘समलैंगिकता’ पुरातन काळापासून आपल्या संस्कृतीत आहे!

समलैंगिकता – मिथकं आणि सत्य; निमित्त कोलकात्याच्या शाळेतील घटना

‘तुझे याद कर लिया है...’ : समलिंगी नात्याचा उत्कट कलाविष्कार

..................................................................................................................................................................

त्यातूनही आपल्या वेगळेपणाची त्याला पुन्हा जाणीव झाली. पण हे वेगळेपण म्हणजे काय, त्याला ‘ट्रान्सजेण्डर’ म्हणतात, हे काही त्याला माहीत नव्हते. तेव्हा त्याला मानसिक पातळीवर खूप संघर्ष करावा लागला. जंग जंग पछाडले तरी आपल्या व्यक्तिमत्त्वाची जाणीव त्याला नीटशी होत नसे. या काळात त्याने अनेकदा आत्महत्येचाही प्रयत्न केला.

उच्चशिक्षणासाठी तो नाशिकला गेला. तेथे त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले, पण सोपे तर काही नव्हतेच. तिथेही खूप रॅगिंग झाले. जन्मापासून कुठेतरी आपण विलक्षण पाप केले आहे आणि त्याची शिक्षा भोगत आहोत, असे वाटायचे. मुलाच्या शरीरात आपल्याला कैद करून ठेवले आहे, अशी जाणीव व्हायची. कारण मुलासारखे जगणे आवडत नव्हते आणि मुलीसारखे जगता यायचे नाही. आपल्या जगण्यात काही ‘राम’ नाही, असे सदैव वाटायचे.

त्याची आई तो पहिलीत असतानाच वारली. मग चार सख्ख्या भावंडांमधली मोठी बहीणच त्याची आई झाली. ती त्याला नाना परीने मुलगा म्हणून कसे वागायचे, कसे राहायचे हे सांगायची. आईचे प्रेमच काय, तिचे काहीच त्याला आठवत नाही. लोक सांगायचे की, ती खूप प्रेमळ होती, तुझ्यासारखीच, तेव्हा तेवढेच कळायचे. आता त्याची तीनपैकी शेवटची आई आणि वडील आहेत. आई नव्हती आणि वडील दारू पिऊन असायचे, घरातले सगळे त्यांना घाबरत. त्यामुळे त्याच्या मनातले हे मुलगा-मुलगीचे रहस्य घरात सांगणे, त्याला शक्यच झाले नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

विजयचे शिक्षण जास्तीत जास्त बोर्डिंग स्कूलमध्येच झाले. घर म्हणजे फक्त सुट्ट्यांपुरते. बी.ए.ला असताना तो पुण्याला आला, तेव्हा पुरुषांनाही कधी कधी पुरुषांचे आकर्षण वाटते, हे कुठेतरी त्याच्या वाचण्यात आले. तेव्हा तो वयात आला होता. आकर्षण वगैरे समजू लागले होते. तेव्हा पुन्हा एकदा हे आव्हान त्याच्यासमोर उभे ठाकले. त्या वेळची मनस्थिती सांगताना आजची विजया म्हणते,

“खरे तर मी एवढे शिकेन असेही वाटले नव्हते. मला कोणतेही स्वप्न नव्हते. माझ्या मनात फक्त एकच विचार असायचा की, मी कधी एकदाची मरेन आणि या मुलाच्या शरीरातून मुक्त होईन. मी विषाची बाटली कायम जवळ बाळगायची. कोणी समोर नसताना चुपचाप विष पिऊन किंवा गावी गेले असताना तर कुठे घाटावरून, उंचावरून उडी मारायची आणि एकदाचे आयुष्य संपवायचे हाच विचार असायचा.

“एकदा हिम्मत करून मी बहिणीला सांगितले की, मला मुलांविषयी आकर्षण वाटत आहे. तेव्हा ती चपापलीच. ‘मुलगे आवडतात म्हणजे काय? म्हणजे तू काय मुलगी आहेस का? वेड्यासारखा विचार करू नको.’ तिला काहीच कळले नाही. पण शेवटी तिनेच वडिलांसमोर हा विषय मांडला. आश्चर्य म्हणजे त्यांनी मला फोन केला! (तसे माझे पप्पा सहसा मला फोन वगैरे करत नाहीत.) फोनवर माझी मम्मी बोलली आणि बहीण असे म्हणत आहे, तर तू एखाद्या दवाखान्यात दाखवून ये, असे पप्पांच्या वतीने तिने सुचवले. पण कोणत्या डॉक्टरकडे जायचे तेच समजेना.

“आपल्याला ज्या अवयवाला इजा झाली असेल, त्या डॉक्टरकडे आपण जातो. आता मला काय झाले आहे तेच माहीत नाही, तर काय करायचे? कधी काही डॉक्टरांच्या नावाखाली लैंगिक समस्या वगैरे लिहिलेले पाहिले की वाटायचे, हेच झाले असेल आपल्याला.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

“या गोंधळात मी एका समुपदेशकांना भेटले, तेव्हा ते म्हणाले की होय. ही गोष्ट औषधाने बरी होईल. ते ऐकून खूप आनंद झाला. आता प्रश्न मिटला म्हणायचा! सात-आठ महिने त्यांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या. माझ्या अपरोक्ष ते घरच्या लोकांनाही भेटले, पण नंतर घरी येऊन वडील जे बोलू लागले, ते वेगळेच, म्हणाले, ‘तू फार काळजी करतोस, म्हणून हे होत आहे. जास्त विचार करणे बंद कर.’

“आता आणखी परिस्थिती चिघळली. म्हणजे जो विषय माझ्या एकटीपुरता होता, तो आता पूर्ण कुटुंबाचा झाला. मला काही कळेना. गावातील विधी करणाऱ्या भगत लोकांकडेही घरचे लोक घेऊन जात. मग तेथे शेंदूर फासून, उदबत्त्या लावून करायचे कर्मकांड. हा प्रकार तीन-चार महिने चालला आणि तो सगळ्या नातेवाईकांकडे पोहोचला. मी डॉ. आंबेडकरांची अनुयायी. अंधश्रद्धांना मानत नव्हते. त्यामुळे तो प्रकार फार भयावह वाटायचा. अंगावर काटा यायचा. कुजबुज सुरू झाली. काहीच उपाय सापडत नव्हता. मग आता एकदाचे येथून बाहेर पडू या, असा विचार केला.

“माझा चुलत भाऊ एमएसडब्यूसाठी पुण्याला येत होता, त्याच्या मागोमाग मीही येथे येऊन दाखल झाले. कॉलेजात प्रवेश घेतला. तेथे पहिल्याच वर्षी बिंदुमाधव खिरे यांनी लैंगिकतेवर कार्यशाळा घेतली. त्यामध्ये तृतीयपंथीयांविषयी सर्व माहिती सांगितली. त्यामध्ये जेव्हा त्यांनी ‘ट्रान्सजेंडर’ या संकल्पनेविषयी सांगितले, तेव्हा एकाएकी माझ्या डोक्यात प्रकाश पडला. ट्रान्स-ट्रान्स म्हणतात तेच आपण आहोत, हे कळले आणि आतापर्यंतच्या कोड्याचा शास्त्रीय उलगडा झाला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

“त्या दिवशी मी खूप रडले. नंतर मी मानसोपचार तज्ज्ञाकडे गेले. त्याने अनेक प्रश्न विचारून, समुपदेशन करून विजय हा ‘ट्रान्सजेंडर’ असल्याचे प्रमाणित केले. एका मुलाचे मुलीत रूपांतर होऊ शकते, हे तर माझ्या कल्पनेपलीकडे होते. पण तेही हळूहळू पचनी पडले. आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’चा ह्या विषयावरील व्हिडिओ मी पाहिला, समजून घेतला, व तो घरातल्या इतरांना, विशेषतः महिला वर्गाला दाखवला. त्यांना अचंबाच वाटला. कारण यापूर्वी त्यांना असे काही माहितीच नव्हते. परंतु त्यामुळे तो मुद्दा शास्त्रीयदृष्ट्या समजून घेणे त्यांना शक्य झाले. त्यातून त्यांचे प्रबोधन झाले. ‘मी मुलगीच आहे आणि यानंतर मला मुलगा म्हणून नाही जगायचे’ हे मी त्यांना निक्षून सांगितले.

२४-२५ वर्षांच्या आयुष्यात क्षणोक्षणी मी मरणाला शिवत, मरणाचाच विचार करत आणि कशीबशी त्याला चुकवत काढली होती, पण तेव्हापासून मात्र खऱ्या अर्थाने माझ्या जगण्याला सुरुवात झाली. त्यानंतर मी एम. एस. डब्ल्यू. केले. नोकरी धरली आणि आता मी नोकरीतून माझा सगळा खर्च चालवत आहे.

“एम.एस.डब्ल्यू.. केल्यावर मी लिंगबदल शस्त्रक्रिया केली. ही एक मोठी प्रक्रिया आहे. त्यामध्ये सर्वप्रथम अनेक प्रकारच्या मानसशास्त्रीय चाचण्या केल्या जातात. त्यानंतर ते आपल्याला पारलिंगी असल्याचे प्रमाणपत्र देतात. त्यानंतर मला एक वर्षपर्यंत स्त्रियांची संप्रेरके घ्यावी लागली. मानसशास्त्राच्या दृष्टीनेही एवढा वेळ घेणे आवश्यक असते, कारण स्वतःमधला कोणताही बदल हा हळूहळू करावा लागतो, तेव्हाच तो आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्या पचनी पडतो. दुसरे असे की, एचआरटी (Hormone Replacement Therapy) करण्यापूर्वीच एकदम लिंगबदल करून घेतला आणि नंतर काही कारणाने तुमचा निर्णय बदलला तर... म्हणून आधी संप्रेरके व नंतर शस्त्रक्रिया असा क्रम आहे.”

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

एवढी महागडी शस्त्रक्रिया करणे तुला कसे परवडले, असे विचारल्यावर ती म्हणाली, “त्याची आर्थिक बाजू कुटुंबाने उचलल्यामुळे मला हे सारे शक्य झाले.”

विजयचा प्रश्न हा त्याचा एकट्याचा नसून पूर्ण कुटुंबाचा आहे, याबाबत त्यांचे ठाम मत होते. पैशाची सोय करण्याबाबत त्यांनी बराच विचारविनिमय केला. घरात बैठका घेतल्या. त्यातून निर्णय घेऊन त्यांनी हे साध्य केले. प्रत्येक वेळी पैसे गोळा करून माझ्याकडे देऊनच ते मला रुग्णालयात पाठवायचे. त्यामुळे त्याचा भार मला कधी जाणवलाच नाही. अशा प्रकारे पुण्यात माझी शस्त्रक्रिया पार पडली.

“काही पारलिंगी व्यक्ती गट करून एकत्र राहतात. त्यांच्यामध्ये गुरू-शिष्य अशी परंपरा असते. परंतु मी त्यामध्ये कधी सामील झाले नाही आणि घरात, कुटुंबातच राहिले. माझ्या २३-२४ वर्षांच्या आयुष्यात मला चांगले राहायला खूप आवडायचे. वेगवेगळे कपडे घालून पाहणे, कधी हलकासा मेकअप करणे, आरशात स्वतःला निरखून पाहणे, असे माझे चालायचे. परंतु ते एका बंद खोलीत. मला मोकळेपणाने कधी जगताच आले नाही. इतका बंदिस्तपणा की, असे वाटायचे, काय पाप आपण केले आहे गेल्या जन्मी, की असे आयुष्य वाट्याला आले! त्यामुळे मी स्वतःतच रमण्याची स्वतःला सवय लावली. लोकांकडे मी लक्षच द्यायची नाही.

“लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर मी प्रथमच माझ्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी मुलीचे कपडे घालून गावात आले. लोकांना खूप आश्चर्य वाटले. त्यांना तर मी ओळखूच आले नाही. त्यांना इतके कुतूहल वाटले की, नवरा-नवरीकडे पाहण्यापेक्षा ते माझ्याकडेच जास्त पाहू लागले. मी शिक्षणाच्या निमित्ताने जास्त काळ बाहेर राहिल्यामुळे गावातले अगदी मोजकेच लोक – ज्यांच्याशी माझा जवळून संबंध आला - मला ओळखायचे. बाकी अनेक लोक मला ओळखू शकले नाहीत, आधी मी एक मुलगा होते आणि आता मुलगी झाले म्हणून..

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

“मी विजया बनून घरी आले, तेव्हा घरातील सर्वजण - विशेषतः महिला म्हणजे माझ्या काकू, आत्या, मावशा, त्यांच्या मुली वगैरे सर्वजणी माझी खूप कुतूहलाने वाट पाहत होत्या आणि त्यांनी माझे प्रेमाने स्वागत केले. आतापर्यंत विजय हा आपला मुलगा होता, परंतु आता तो नवीन जन्म घेऊन मुलगी बनून येतो आहे, याचा आनंद त्यांना वाटत होता आणि नव्या नवरीप्रमाणे त्यांनी माझे आगमन साजरे केले. महिलांच्या विश्वात मला जागा मिळाली. मी सुखाने स्थानापन्न झाले.

“मात्र अनेक पारलिंगी लोकांच्या बाबतीत असे होते की, मुळात त्यांचे कुटुंबच त्यांना स्वीकारत नाही. मग बाहेरचा समाज स्वीकारणार कसा? त्यांना कुटुंबापासून तुटल्याची भावना बाळगत जन्मभर एकाकी जगावे लागते. ते दुर्भाग्य माझ्या वाटेला आले नाही. माझ्या बहिणीने मला खूप सांभाळून घेतले. त्यामुळे मी सामान्य जीवन जगत आहे. मला शस्त्रक्रियेबद्दल शास्त्रीय माहिती मिळाली, कळले आणि मी सुरुवातीपासून मनाने स्त्री असल्यामुळे शस्त्रक्रिया करून शरीरानेही स्त्री बनले.

“परंतु इतरांचे काय? त्यांना जगण्याचा, रूपांतराचा कुठलाच आधार नाही. पैशाचे पाठबळ नाही आणि माहिती म्हणाल, तर सामान्य लोकांनाच नव्हे, तर डॉक्टरांनाही नाही. पारलिंगींच्या विषयाची जाण आणि त्यांच्याबद्दल संवेदनशीलता असलेले चांगले डॉक्टर निर्माण होणे खूप गरजेचे आहे.

“माझ्याबद्दल विचार करताना मला पुन्हा पुन्हा जाणवते की, काहीही असो, मी चांगल्या लोकांपर्यंत पोहोचले, चांगल्या लोकांच्या हातात पडले, म्हणून वाचले. नाहीतर माझ्या अवतीभवती इतके सुशिक्षित पारलिंगी आहेत, परंतु ते दुर्लक्षित, एकाकी जीवन जगत आहेत. वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना खूप वणवण करावी लागत आहे. कितीही चांगले, सुशिक्षित असले, तरी समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन काही केल्या बदलत नाही. मग त्यांना गुरू-शिष्य म्हणून वेगळा समाज करून राहणे भाग पडते.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

“एकूण समाजातच या विषयाबाबत बरेच गैरसमज आहेत. साधे भाड्याचे घरसुद्धा आम्हाला सहजपणे मिळत नाही. मी पुण्याला आल्यावर जेव्हा घर शोधत होते, तेव्हा अनेकांनी मला घर देण्याचे केवळ या एका कारणासाठी नाकारले, आणि त्यामध्ये महिला वर्गाचा हात जास्त होता. पुरुष निदान सभ्यपणे बोलायचे तरी, परंतु महिला अजिबात दारातसुद्धा उभ्या करायच्या नाहीत.

“पारलिंगी व्यक्तींच्या समस्या फार भयानक आहेत. त्यांना घरात राहू देत नाहीत. त्यांचा छळ करतात. मग ते नाइलाजाने बाहेर पडून गुरू-शिष्य परंपरेच्या त्यांच्या समुदायात सामील होता. गुरू व समुदाय यांच्याशी जर त्यांचे पटले नाही, तर तेथून बाहेर पडून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गुरूकडे जातात. पण अशा रितीने घरदार, आपली मुलेमाणसे सोडून, आपल्या गावातून, परिचितांमधून बाहेर पडून कुठेतरी दूरवर, कानाकोपऱ्यात अशा एका समुदायात येऊन राहणे, तेथे त्यांच्या नियमांचे कडक पालन करणे, समाजातून बहिष्कृत होणे, वेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेणे, हे खूप कठीण असते.

“कधीकधी तर भयावहही. कधी लहान वयातही त्यांना घरातून काढलेले असते, आईचे प्रेम मिळालेले नसते, तरुण वयात कधी जोडीदार भेटतात व जोड्या जमतात, पण विशेषतः मुलींना तरी त्यांच्या जोडीदारांकडून वापरून फेकून देण्याचाच अनुभव येतो. पारलिंगांना मुख्य प्रवाहात आणणे फार कठीण आहे. ते कधी मुख्य प्रवाहात येतच नाहीत. लहान गावातून घरी खोटेनाटे सांगून ते शहरात येऊन मुलींसारखे राहतात. घरच्यांना हे माहीतही नसते, कारण घरी जाताना ते पुरुषाचे कपडे घालून जातात. आपण कोण आहोत, आपल्य आयुष्याचे ध्येय काय, हे न समजल्यामुळे त्यांना भावनिकदृष्ट्या स्वतःला सांभाळता येत नाही आणि आत्महत्येचे विचार येत राहतात. कधी ते अंमलातही येतात. कधी कधी तर लोकांच्या नजरा झेलूनच पारलिंगी व्यक्ती मनाने मरून जाते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

“सरकारचा दृष्टीकोनही वेगळा नाही. मला या गोष्टीची अत्यंत लाज वाटते की, स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी आणि तेही पुरोगामी महाराष्ट्रात आपण पारलिंगी व्यक्तींना आपले नागरिक म्हणून स्वीकारू शकलो नाही आणि त्यांना मूलभूत सुविधा देऊ शकलो नाही. मला खूप संताप येतो. ते काही मानव नाहीत काय? त्यांना बुद्धी आणि भावभावना नाहीत काय? आज मला शिक्षण घ्यायची कितीही इच्छा असली, तरी साधे शाळेत जाताना कशाकशाला म्हणून तोंड द्यावे लागते? शासनाचे कोणतेही कल्याणकारी धोरण असे नाही की, ज्याने आमच्यासारख्यांना थोडी सुविधा, स्वस्थता किंवा शांती लाभेल.

“आता हेच पहा ना! अलीकडे पुण्यात पोलीस भरती झाली, तर त्यासाठी अर्ज करायला शासनाने मला परवानगी दिली नाही. मी पोलीस महासंचालकांकडे, आम्हाला अर्ज करण्याची परवानगी द्यावी म्हणून विनंती केली. ती त्यांनी अक्षरशः धुडकावून लावली. मग आमच्या अनेक पारलिंगी मित्र-मैत्रिणींनी मिळून त्यांना फोन केला की, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, तर आम्हाला पोलीस भरतीमध्ये स्थान का नाही?

“आम्ही जनहितयाचिका दाखल केली की, पारलिंगी असा विकल्प अर्जामध्ये समाविष्ट करून द्या. तसा विकल्प तर मिळाला. केवळ तीन महिन्यांहून कमी कालावधीमध्ये तयारी करूनही ७२ पारलिंगी व्यक्तींनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. पण एवढा संघर्ष करून, एवढी गुणवत्ता दाखवूनही शेवटी सरकारने जे करायचे, तेच केले. त्यांनी आमचे स्वतंत्र मूल्यमापन न करता आम्हाला मुलग्यांच्या प्रवर्गात टाकले. त्यांच्या तुलनेत आम्ही पुरेशी गुणवत्ता दाखवू शकलो नाही. शेवटी एकाही पारलिंगी व्यक्तीला पोलीस सेवेत प्रवेश मिळाला नाही.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

“अत्यंत मेहनतीने अभ्यास करून अशा प्रकारचे दारुण अपयश आल्यावर त्याचा गंभीर परिणाम होणारच! आमच्यातले अनेक लोक निराशेत गेले. याउलट छत्तीसगढमध्ये मात्र पोलीस सेवेत पारलिंगींची भरती करण्यात आली आहे. आज आपल्या राज्यात पुरुषांना पकडण्यासाठी पुरुष पोलीस आहेत, महिलांना पकडण्यासाठी महिला पोलीस आहेत. पण पारलिंगींना पकडण्यासाठी पारलिंगी पोलीस का नाहीत? जिथे धर्मनिरपेक्षता आहे, संविधानाने सांगितलेली लिंग समानता आहे, तिथे असा अन्याय? आम्ही या व्यवस्थेचा भाग नाही, असेच हे दाखवून देतात. आज पारलिंगी लोक त्यांच्या अत्यंत मूलभूत हक्कांसाठी लढत आहेत. जर समाजात कोणताच रोजगार मिळणार नसेल, तर आम्हाला भीक मागण्याची, नपेक्षा इच्छामरणाची तरी परवानगी द्या असे ते म्हणत आहेत.

“माझ्या आयसीएमआर (Indian Council of Medical Research) या संस्थेत काम करायला आलेली मी पहिलीच पारलिंगी व्यक्ती आहे. ही मोठी संस्था आहे. यामध्ये खूप संशोधन प्रकल्प चालू असतात. त्यांपैकी समलैंगिक स्त्रिया आणि पुरुष यांच्याबद्दलच्या एका प्रकल्पावर मी कंत्राटावर काम करते. येथे खूप शिकलेले, मोठे लोक आहेत. मी तर एक सामान्य मुलगी. त्यातून पारलिंगी. त्यामुळे इकडे आल्यावर पहिल्यांदा थोडे दडपण आले होते. माझ्यासारखीला ते कशा प्रकारे सामावून घेतील, याची काळजी वाटली होती. परंतु पहिल्या दिवसापासून त्यांनी मला खूप चांगले वागवले, आणि आजही तसेच वागवतात.

“कामाला जुंपून घेणे, तेथे भेट देणाऱ्यांशी बोलणे, मधल्या सुटीत डबा खाणे सगळ्यामध्ये ते मला सोबत घेतात. वास्तविक जे काही एखादी स्त्री किंवा पुरुष जे काही साध्य करू शकतो, ते एक पारलिंगी व्यक्तीदेखील साध्य करू शकते, आणि हे मी तेथे सिद्ध केलेच आहे. त्याचा चांगला परिणामही त्यांच्यावर झाला आहे. इथे तात्कालिक नोकरी करून मी लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत आहे. अर्थात पारलिंगींना आरक्षण नसल्यामुळे ते कठीण तर आहेच.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

“आता सरकारच्याच एका वेगळ्या विभागाचा चांगला अनुभव सांगते. आतापर्यंत मी पुरुष म्हणून मतदान करत होते, पण आता एक स्त्री म्हणून मतदान करते. पारलिंगी व्यक्तींना जर त्यांच्या घरच्या आधारावर कार्ड द्यायचे ठरले, तर त्यांना कधीच मतदान करता येणार नाही, कारण ते मुळात घर सोडूनच आलेले असतात. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे आपल्या घरातला माणूस, एखादा प्रेमळ मामा असावा, तसे आमच्याशी वागले, हा खूप छान अनुभव होता. त्यांनी सप्टेंबर २०२२मध्ये पुण्यात आमच्यासारख्या अपत्यांना स्वीकारणाऱ्या पालकांचा मेळावा घेतला. त्याला माझी बहीण आली होती. अशा कार्यक्रमांनी फार सहजपणे जनजागरण होते. आता तर ‘पारलिंगी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम’ हा कायदाही २०१९पासून लागू झाला आहे. त्यामुळे वातावरण बदलास सुरुवात झाली आहे.”

इतका संघर्ष करून व्यक्तिमत्त्व प्रस्थापित केल्यावर आता पुढच्या आयुष्यासंबंधी कल्पना काय, असे विचारल्यावर विजया म्हणते की, कुठल्याही सामान्य पुरुष वा स्त्रीप्रमाणे, तिच्याही भावी आयुष्याच्या कल्पना, स्वप्ने आहेत. ती सध्या कंत्राटी नोकरीवर काम करत आहे. तिला सरकारी नोकरी मिळवून स्थिरावायचे आहे. जन्माचा सोबती म्हणून कोणी चांगली व्यक्ती भेटली, तर आनंदच आहे. पण काही झाले तरी, पारलिंगी व्यक्तींसाठी काम मात्र करायचेच आहे. त्यांना समाजात त्यांची ओळख मिळवून द्यायची आहे. जशा स्त्रिया, पुरुष असतात तसेच हेदेखील आहेत, याची जाणीव रुजवायची आहे. त्यांच्या मनातली जी त्यांची लैंगिक ओळख आहे, तीच प्रत्यक्षात त्यांना मिळावी आणि मोकळेपणाने, आनंदाने जगता यावे, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. या सर्व गोष्टींसाठी ती आपले उदाहरण त्यांच्यापुढे ठेवत आहे. विशेषतः सातपुड्यातील आदिवासी समाजापुढे. त्यांना याबद्दल माहिती नसल्यामुळे तिला ती ओळख द्यायची आहे.

नंदुरबारच्या शहादा गावात तिची जाहीर मुलाखत घेऊन सत्कार करण्यात आला, तेव्हा दुसऱ्या दिवशी तिने अशा तरुणी-महिलांचा मेळावा घेतला. त्यांना तिच्याकडे पाहून आपले खरे व्यक्तिमत्त्व उघड करण्याची, ते स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या आईवडिलांनीही ते स्वीकारले.... आपणही ते समजून घेऊ या.

‘सर्वंकष’ त्रैमासिकाच्या एप्रिल-मे-जून २०२३च्या अंकातून साभार.

.................................................................................................................................................................

लेखिका अनुराधा मोहनी या अनुवादक, समुपदेशक आणि भाषातज्ज्ञ आहेत.

anumohoni@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......