जातपंचायतीविरुद्ध माझा लढा : माझ्या समाजासाठी सतत झटत राहावं, हीच माझी इच्छा आहे; नव्हे, ते माझं कर्तव्यच आहे, असं मी मानते.
अर्धेजग - कळीचे प्रश्न
दुर्गा गुडिलू
  • ‘ऋतुरंग’ दिवाळी २०२२चे मुखपृष्ठ आणि दुर्गा गुडिलू
  • Thu , 03 November 2022
  • अर्धेजग कळीचे प्रश्न दुर्गा गुडिलू Durga Gudilu जातपंचायत Jaat Panchayat अंधश्रद्धा निर्मूलन समिती Andhashraddha Nirmoolan Samiti

मराठीत दिवाळी अंक तर खूप प्रकाशित होतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं व्यवच्छेदक वैशिष्ट्य बनलेल्या दिवाळी अंकांनी यंदाची दिवाळी नुकतीच पार पडली. करोनाने वेढून टाकलेल्या जगाने काही महिन्यांपूर्वीच बाहेर पडून मोकळा श्वास घेतला असल्याने ही दिवाळी दिव्यांची रोषणाई, फटाके, रांगोळी, फराळ अशा गोष्टींनी भरून वाहिली. महाराष्ट्रात दिवाळी म्हणजे दिवाळी अंक. या दिवाळी अंकांचं वाचन, त्यावरील चर्चा, त्यांतील लेखनाविषयीची मत-मतांतरं अजून दीड-महिने चालू राहतील… राहायलाही हवीत.

मराठी दिवाळी अंकांमध्ये अरुण शेवते संपादित ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकाने आपलं एक वैशिष्ट्यपूर्ण आणि हटके स्थान निर्माण केलंय. या अंकाचा दरवर्षीचा विषय आगळावेगळा असतो. हा अंक एकाच विषयावर असतो. यंदाचं ‘ऋतुरंग’चं तिसावं वर्ष आहे. आणि या वर्षीचा विषय आहे – ‘उद्या पहाटे दुसऱ्या वाटा’. त्याविषयी शेवते त्यांच्या संपादकियामध्ये म्हणतात - “...आयुष्याचा प्रवास कधी स्थिर नसतो तर तो गतिशील असतो. एका वाटेवर अनेक वाटा खुणावत असतात. मनाला थांबून ठेवता येत नाही. मनाला हजार वाटा असतात. कुठली वाट निवडायची हे आपल्यालाच ठरवावे लागते. आपल्या विचारात, भावनेत अनेक बदल होत असतात. कधी हे बदल स्वीकारावे लागतात तर कधी नाकारून पुढे जावे लागते. वाटा आपल्याला बोलवत असतात. पहाट तर आपल्याला हवीच असते. वाटा बदलण्यासाठी धाडस लागते. माणसे बदलतात; भूमिका बदलतात. परिस्थिती बदलते. यातूनच आपल्या वाटेवरून पुढे जावे लागते आणि आयुष्य सुंदर होते.”

आणि खरोखरच या अंकातले काही लेख जळजळीत आहेत. ते वाचताना जळत्या निखाऱ्याचा चटका बसावा, तसे ‘शॉक’ बसतात. नेहमीच्या खंद्या लेखकांच्या वाचनीय लेखांसोबतच या अंकात अगदीच नवे, अनोळखी लेखक भेटतात आणि नवे लेखनविषयही. मिन्तल मुखिजा, रसिका रेड्डी, लक्ष्मण चव्हाण, संजन मोरे, भास्करराव पेरे पाटील, सुरेखा वसंत कोरडे, शिवराम भंडारी, हे त्यापैकी काही लेखक.

प्रस्तुत लेख त्यापैकीच एक लेख… संपादकांच्या पूर्वपरवानगीसह…

.................................................................................................................................................................

मी दुर्गा. दुर्गा गुडिलू! भटक्या-विमुक्त समाजातील वैदू नावाची जमात आणि मी त्या समाजातील एक मुलगी. आमच्या समाजाला ‘वैदू’ असं नाव पडलं. कारण फार पूर्वी म्हणजे इंग्रज येण्याच्याही आधीच्या काळात भारतात शहरं कमी आणि खेडीपाडी जास्त होती. जरासं खेड्याबाहेर पडलं की, लगेच जंगलच लागायचं. तर त्या काळात आम्ही जंगलात जाऊन जडीबुटी, मुळ्या आणायचो आणि खेड्यातील लोकांना उपचार द्यायचो. पुढे इंग्रजांची नजर भारतातील जंगलसंपत्तीवर गेली आणि जंगलातली बरीच माणसं ‘भटकी विमुक्त’ म्हणून बाहेर भिरकावली गेली. त्यात आम्ही वैदूही होतो.

त्या काळात लिहिता-वाचता तर आमच्याहून उच्च जातींच्या लोकांनाही येत नव्हतं, तर आम्हाला कुठून येणार? त्यामुळे आमच्या वाडवडिलांचं जडीबुटीचं बरंचसं ज्ञान त्यांच्यासोबतच गेलं. आणि मग वैदू समाजाच्या माथी डोक्यावर पाटी घेऊन पोटासाठी दारोदार फिरणं आलं. कधी बिब्बे, सुया वीक; कुठे डब्बा-झाकणं वीक; माकड फिरव, अस्वल फिरव तर कधी साप फिरव आणि कसरत दाखवून पैसे माग, अशा गोष्टी नशिबी आल्या. पण मग सरकारने कायदे केले आणि असे प्राणी घेऊन दारोदार फिरण्यावर बंदी आली. बंदी आली खरी, पण आम्हाला पर्यायी व्यवसाय तर काहीच मिळाला नाही. मग जीव जगवायचा कसा? यातूनच काही लोक गुन्हेगारीकडे वळले, तर काही भीक मागण्याकडे वळले. वाताहत झाली.

मी खरंच सांगते, दारोदार फिरून भीक मागणं, यातही आमच्या समाजाला संकोच वाटत नव्हता. कारण गावकुसावर राहणारे वंचित आम्ही! तसा संकोच वाटला पाहिजे, असं कुणी आम्हाला कधी शिकवलंच नव्हतं. मी स्वतः सातवीपर्यंत भीक मागायला गेलेली आहे. पण सातवीत एकदा वर्गातल्या एका मुलाच्या घरी भीक मागायला गेले होते, तेव्हा त्याला बघून मला संकोचल्यासारखं झालं आणि नंतर मी भीक मागायला जाणं बंद केलं. पण तरी बाकीच्या समाजाचं काय? ‘दे दान सुटे गिराण’ म्हणून ग्रहण काळात ते लोक जथ्याजथ्याने फिरत होतेच ना! पण आमच्या नशिबाचं ‘गिराण’ कधी आणि कसं सुटणार होतं, ते काही आम्हाला कुणाला कळत नव्हतं.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक  : ‘मोदी महाभारत’

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या भटक्या-विमुक्तांतही जातींची उतरंड आहेच. त्यात आमची वैदू ही जमात तशी खालची आणि त्यातही आम्ही गुडिलू म्हणजे आणखी खालचे. आम्ही आमच्या जमातीच्या देवळातली उष्टी भांडी घासायची, असा प्रकार होता.

आता माझी गोष्ट सांगते. अगदी सुरुवातीपासून सांगते. आमचा समाज मूळ सोलापूरच्या बाजूचा. तिथे तेलगू-कानडी मिश्रित अशी आमची बोलीभाषा आहे. पोटासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पालं आणि तंबू ठोकून आम्ही राहतो. आमच्या समाजात शिक्षण कमी म्हणजे अगदीच कमी. आत्ता आत्ता कुठे पाच-दहा टक्के प्रमाण आहे. माझी मोठी बहीण गोविंदी ही २०१२ साली सॉफ्टवेअर इंजिनिअर झाली. ती आमच्या समाजातली उच्चशिक्षित अशी पहिलीच मुलगी, म्हणजे पाहा.

शिक्षण, गरिबी यामुळे पोरवडा भरपूर. त्यात बायको बाळंतपणात दगावल्यामुळे दुसरं लग्न केलं की, मुलांची संख्या आणखीच वाढायची. अशा समाजातल्या आमच्या कुटुंबात आम्ही दोघीच मुली कशा, याचं कुणालाही आश्चर्यच वाटेल. पण त्याचं असं झालं की, माझी आई अकूबाई हिला बराच काळ मूलच होत नव्हतं. तिला वांझ म्हणून खूपच मानसिक त्रास सहन करावा लागला. आई-वडील बऱ्याच देवांना जाऊन नवस बोलले, पण बराच काळ काहीच झालं नाही. शेवटी आईचं वयही अडतीस-चाळीस झालं. आमचा समाज ताडी-माडी पिणारा. त्यामुळे आईही ताडी पीत असे. तर तिला अचानक पोट फुगल्यासारखं वाटू लागलं. तिला काय वाटलं की, आपण ताडी पितो म्हणून आपलं पोट सुजलं की काय? पाळीही बहुतेक गेली आता, असंच वाटलं तिला. पण मग पोटात काहीतरी हलू लागलं म्हणून सरकारी दवाखान्यात गेली. तर तिथली नर्सबाई म्हणाली, ‘अग, दिवस गेलेत तुला. पाच महिने झालेत.’

त्यानंतर यथावकाश माझी मोठी बहीण गोविंदी हिचा जन्म झाला. तिच्यानंतर दोन वर्षांनी मी जन्मले. त्यानंतर मात्र आई-बाबांना मूल झालं नाही. आम्ही मुली जन्मलो याचं त्यांना कधीच वाईट वाटलं नाही. कारण ती दोघं ‘मूल हवं’ यासाठी एवढी आसुसली होती की, मुलगा-मुलगी असा काही फरकच पडत नव्हता. आणखी एक म्हणजे बाबा अगोदर दारू प्यायचे. परंतु गोविंदीचा जन्म झाला आणि त्यांनी स्वतःहूनच दारू सोडली. कदाचित उतारवयात झालेली मुलगी आहे, आपल्यावर जबाबदारी आहे, असं वाटून त्यांनी तसं केलं असावं. त्यानंतर जत्रेत कितीदा तरी जावं लागलं. आमच्या जत्रा म्हणजे दारू, मटण यांची चंगळ असते. पण बाबांनी कुणाचाही आग्रह मानून दारूला स्पर्श म्हणून केला नाही, याचं मला खरंच खूप आश्चर्य वाटतं आणि जे कुणी म्हणतात की, आमची दारू सुटत नाही, त्यांच्यासमोर हे उदाहरण ठेवावंसं वाटतं.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

आमच्या लहानपणीच आम्ही मुंबईला आलो. अगोदर माहीम येथे राहिलो. नंतर बांद्रेकर वाडीत गेलो. त्यानंतर जोगेश्वरी येथे आमचा मुक्काम पडला. जन्मल्यावर बारा-तेरा दिवसांनी मला पोलिओ झाला होता. त्यामुळे आजही मी चालताना थोडी लंगडते. परंतु त्यामुळेही आईला आपल्या पोरी शिकाव्या; त्यांना कुणाच्या तोंडाकडे पाहायला लागू नये, असं वाटत होतं. ती बिब्बे, सुया, कटलरीचा माल घेऊन विकायला जायची, तेव्हा शाळेत जाणारी पोरंपोरी बघायची. पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे; कुणाला भेटलं पाहिजे हे तिला कळत नव्हतं. पण अचानक आमच्या वस्तीजवळच ‘युवा’ नावाच्या संस्थेने बालवाडी सुरू केली. त्या शाळेशी गोविंदी आणि तिच्या बरोबरीची मुलं जाऊन उभी राहायची. तिथे लक्ष्मी कुंभार नावाच्या बाई होत्या. जणू सावित्रीबाई फुलेच त्यांच्या रूपाने आमच्या मदतीला धावून आल्या. त्या म्हणाल्या, “मुलांनो, बाहेर का उभे राहता? आत या.” मग ही चार-पाच वैदूची मुलं शाळेत गेली खरी, पण त्यांच्यासोबत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी त्यास हरकत घेतली. ते लोक म्हणाले, “ही मुलं अंघोळ करत नाहीत. अस्वच्छ राहतात. केसांचं शिप्तर, नखं वाढलेली. आमची मुलं यांच्यासोबत बसणार नाहीत.” मग लक्ष्मीताईंनी त्या पाच मुलांचे बालवाडीचे वेगळे वर्ग आम्हा वैदूंच्या दुर्गामातेच्या मंदिरात घ्यायला सुरुवात केली. सुरुवात म्हणजे स्वच्छ राहा; नखं कापा; केस कापा, अंघोळ करा, हेच शिकवण्यातून झाली. पण काही काळाने त्यांना वाटू लागलं की, या मुलांना म्युनिसिपालिटीच्या शाळेत घातलं पाहिजे. पण आमच्या जन्मदाखल्याचा कुठे ठावठिकाणा होता? पण लक्ष्मीताईंनी प्रत्येकाच्या आई-वडिलांना याचा/हिचा जन्म अंदाजे कधी झाला, असं विचारून जन्मतारीख ठरवली. म्युनिसिपालिटीतल्या लोकांनीही मदत केली. त्यामुळे दाखले मिळाले.

आता ही पाच मुलं पहिलीत जाऊ लागली, पण पुन्हा तोच प्रश्न! त्यांच्या बाजूला कोण बसणार? त्यांना जमिनीवर पटकूर टाकून बसवू लागले. यांच्या डब्यातील भाकरी-पोळीही भीक मागून आणलेली. त्या मुलांना कसं चालणार ते? पण हळूहळू काय झालं की, पहिल्या तिमाहीला गोंविदी वर्गात पहिली आली. आणखी एका मुलाची चित्रकला चांगली आहे, असं शिक्षकांच्या आणि मुलांच्याही लक्षात आलं. मग हळूहळू भेदभावाची वागणूक मावळली. गोविंदीकडे सगळे लोक ‘हुशार मुलगी’ या नजरेने बघू लागले. मग त्या सगळ्या जणांना अन्य मुलांसारखं बाकावर बसवू लागले. आपल्या मुली शाळेला जातात, याचं आमच्या निरक्षर आई-वडिलांना फार कौतुक होतं. त्यांना कुठे कधी पेन, पेन्सिल सापडली की, आमच्यासाठी घेऊन येत. एखादी संस्था विनामूल्य वह्या-पुस्तकं वाटत असे, तिथे जाऊन घेऊन येत.

तिच्यापाठोपाठ दोन वर्षांनी माझीही शाळा सुरू झाली. पोलिओ असल्याने आणि तशी एकूणच मी लहानपणी दुबळी होते. त्यामुळे आईला वाटत होतं की, हिला मुलं त्रास तर देणार नाहीत? त्यापेक्षा हिला घरीच राहू दे. पण ‘युवा’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की, “हिला घरी ठेवलंत तर ती अधिकच दुबळी होईल. शाळेत पाठवलंत तर उलट खंबीर होईल.” आणि तसंच झालं. शाळेत गेल्यावर माझ्यात खूपच आत्मविश्वास आला. अर्थात, मला माहीत नव्हतं ते! पण गोविंदीला जातपंचायत त्रास देऊ लागली, तेव्हा तो आत्मविश्वास माझ्यात आहे, हे मला जाणवलं.

त्याचं असं झालं की, बऱ्याच भटक्या-विमुक्त समाजांत बालविवाह ठरवून ठेवण्याची प्रथा आहे. त्यानुसार गोविंदी झाली, तेव्हाच आई आमच्या मामाला म्हणाली होती की, ‘माझी मुलगी तुझ्या मुलाला दिली’. तर पुढे काय झालं की, गोविंदी शिकली. दहावीत चांगले गुण मिळाले. बारावीतही मिळाले, पण आमच्या मामाचा मुलगा काहीच शिकला नाही. नोकरीही नाही. दारूचंही व्यसन. कशी द्यायची मुलगी त्याला? पण ती बारावीत गेल्यापासून समाजातील लोकांचा, नातेवाइकांचा आणि त्या मामांच्या मुलाचाही तगादा सुरू झाला, ‘लग्न करा’, ‘लग्न करा’. मुळात मुली शिकल्या तर आपण सांगू ते निमूटपणे ऐकणार नाहीत, अशी भीतीही समाजाला असतेच. लग्नाची बेडी पायात लहानवयातच अडकवून दिली की, सगळे मोकळे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

खरं तर, मामा खूप चांगले होते. त्यांचं असं काही म्हणणं नव्हतं, पण त्यांच्या मुलाला धीर नव्हता. शिवाय ‘ही शिकलेली मुलगी नोकरी करील, मला पोसेल’ हाही हिशोब त्यामागे होता. पण गोविंदीने आणि मी स्पष्टच सांगितलं की, ‘या मुलाशी ती लग्न नाही करणार’. मग काय, मुलगा जातपंचायतीकडे गेला. पंचायतीने आम्हाला बोलावून सांगितलं, “मुकाट्याने लग्न करून द्या आणि नाही म्हणत असाल तर लग्न तुम्ही मोडलंय म्हणून तीन लाख रुपये भरपाई द्या.” ते ऐकून मला खूपच राग आला. मी वयाने तेव्हा बावीस-तेविशीची होते. मी म्हटलं, “आमचं काहीच चुकलेलं नाही. आमच्या बहिणीला शिकायचं आहे अजून आणि हा मुलगा कुठल्याही दृष्टीने तिला अनुरूप नाही.”

पंचांसमोर जाताना आई थोडी घाबरली. ती त्यांना म्हणाली, “आपण सामोपचाराने घेऊ. पंचवीस हजार आम्ही देतो. तेवढे घ्या आणि विषय संपवा.” त्यावर हे पंच म्हणाले, “तसं नाही. या संपूर्ण महाराष्ट्रातले पंच येतील आणि मगच निर्णय करतील. त्यांचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल.” तो खर्चाचा आकडा ऐकून मी म्हणाले, “एवढा खर्च का येईल? ते लोक काय विमानाने येत आहेत का? त्यापेक्षा प्रकरण इथंच संपवून टाकलं तर चांगलं नाही का होणार?” या माझ्या बोलण्यामुळे सगळे भडकले. मग जातपंचायतीची बैठक पुन्हा बसणार असं ठरलं. ही २०१३ सालची गोष्ट आहे.

तेव्हा काय झालं की, मुंबईसारख्या ठिकाणी कोर्ट, पोलीस एवढी सगळी यंत्रणा असूनही ‘जातपंचायत’ कशी काय लग्नासारख्या खाजगी गोष्टीत दखल देऊन दंड वगैरे ठोठावू शकते? याचं कुतूहल वाटून ‘जय महाराष्ट्र’ चॅनलचे पत्रकार विलास बडे त्या पंचायतीस हजर राहिले. तेव्हा हा आपल्यापेक्षा वेगळा कुणीतरी बाहेरचा माणूस आहे; दुर्गाचा म्हणजे माझा उपरा मित्र आहे, असं समजून जमातीतल्या लोकांनी त्यांना पकडून खोलीत बंद केलं आणि मारहाण केली. त्यांना बरंच लागलं. पाय फ्रॅक्चर झाला. मलाही त्यांनी ‘तुझा जीव घेऊ, जाळून टाकू, बलात्कार करू,’ अशा धमक्या त्यांच्यासमोरच दिल्या. पण आम्ही तेवढ्यात प्रसंगावधान राखून १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावून घेतलं. चॅनलच्या पत्रकाराला मारल्याने प्रकरण खूप मोठं झालं. सरकारनेही गंभीर दखल घेतली.

तेव्हा आर. आर. आबा गृहमंत्री होते. त्यांच्यासमोर बातमी गेली. तेव्हा ते म्हणाले, “सगळ्यांत पहिलं त्या पोरींना संरक्षण द्या.” मग काय, पुढले दीड-दोन महिने मी आणि गोविंदी पोलीस संरक्षणात होतो. पण त्यामुळे इकडे जमातीत माझं ‘महत्त्व’ फारच वाढलं. सर्वांना वाटू लागलं की, दुर्गाची वरपर्यंत ओळख आहे. माझी कसली ओळख आलीय हो? पण त्याचा मला फायदाच झाला. जे लोक आमच्याविरुद्ध होते, ते सगळे नरमले. एकेकाळी पंचमंडळींना समाजातली बाई समोर आलेली खपत नव्हती, तीच पंचमंडळी माझ्याशी आदराने बोलू लागली. मला मीटिंगला बोलावू लागली. पण ते पुढे.

…पण त्या वेळेस काय झालं की, मारहाणीबद्दल विलास बडे यांनी एफआयआर करायची आणि मी साक्षीदार बनायचं असं आम्ही ठरवलं. कारण मी काही माझ्या समाजाच्या विरुद्ध नव्हते. त्यांच्यातच मी लहानाची मोठी झाले होते. मला त्यांच्यातच राहायचं होतं. त्यांना सुधारायचं होतं. चांगलं करायचं होतं. त्यांच्याविरुद्ध मी तक्रार केली असती, तर ते कसं घडून आलं असतं? त्यामुळे तक्रार मी न करता बडे यांनी केली. त्याचा चांगला परिणाम झाला. पुढे माझ्याकडे सल्लामसलतीसाठी आया-बाया आणि आसपासचे लोक येऊ लागले. मीही त्यांना माझ्या कुवतीनुसार मदत करू लागले. माझी आई पूर्वी सर्वांना आधार द्यायची, ते मी बघितलं होतं. तसंच मी वागू लागले. नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीतल्या कार्यकर्त्यांशी आमची ओळख झाली. पुढे गोविंदीही सॉफ्टवेअर इंजिनियर झाली आणि तिचं आंतरजातीय लग्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीतल्या कार्यकर्त्याशीच झालं. त्या लग्नाला मुक्ता दाभोलकर आल्या होत्या. ती आज तिच्या संसारात सुखी आहे. तिला हल्लीच मुलगाही झाला आहे.

तर आपण परत थोडंसं मागे जाऊ. पुढे २०१० साली ‘जातपंचायती’ कायद्यानेच बंद करण्यात आल्या. हे खूप चांगलंच झालं. परंतु त्यात एक अडचण निर्माण झाली, ती अशी की, बरीच लग्नं लहानपणी ठरवून ठेवली होती. त्यांचं काय करायचं? ती तर पंचायतीसमोर जाऊन मोडली पाहिजेत, अशी प्रथा होती. त्यातूनही आम्ही मार्ग काढत आहोत. आणि ती लग्नं हळूहळू रद्द करत आहोत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

आजही जमातीत कुठे बालविवाह होत असेल तर मी तो पोलिसांत तक्रार करून रोखते. लहानपणी लग्न झाल्यामुळे स्त्रीच्या प्रगतीचे सगळे मार्ग कुंठित होतात. त्याच वेळेस अश्विनी गुडिलू नावाच्या मुलीचा गावी बालविवाह ठरला होता. त्या मुलीला आई-वडील नव्हते, फक्त आजीच होती. तिचा बालविवाह आम्ही थांबवला आणि माझी आई तिला आमच्याकडे जोगेश्वरीला घेऊन आली. अश्विनी सध्या आमच्याकडे जोगेश्वरीला राहते. मी ‘मेरा सपना’ आणि ‘अंकू फाउंडेशन’ या समाजसेवी संस्था काढल्या आहेत. ‘मेरा सपना’द्वारे आम्ही लहान मुलांचे क्लासेस घेतो. सकाळी कॉलेजला जाऊन ही अश्विनी दुपारनंतर या मुलांचे क्लासेस घेते.

शिक्षण असेल तरच पुढे सगळं होईल, हे बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहूमहाराज सांगून गेले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच आम्ही मार्ग चालत आहोत. तसंच ‘व्यसनमुक्ती’चंही काम आम्ही करू लागलो आहोत.

आता आमच्या समाजातील आणखी एक कुप्रथा सांगते. शिक्षण नसल्याने लोक फारसा पुढला विचारही करत नाहीत. जत्रा हा आमच्या समाजाचा खूप मोठा उत्सव. आम्ही दिवाळी मानत नाही. दसरा हा आमचा खरा सण. तर वर्षभर कमवायचं आणि या जत्रेच्या महिन्यात उडवायचं. त्यामुळे पुन्हा खंक ते खंकच. जत्रा म्हणजे प्रत्येक कुटुंबाचा चाळीस-पन्नास हजार खर्च झालाच पाहिजे. पैसे नसतील तर सावकार आहेतच, पाच आणि दहा टक्के दरमहा, अशा अव्वाच्या सव्वा व्याजावर लुटायला, असा प्रकार होता. मी सर्वांना सांगू लागले. प्रत्येकाने देवाचं कसं करायचं, हे जो तो ठरवेल, पण कर्ज काढून सण करायचा नाही. त्या वेळेस सावकार मंडळी माझ्याविरुद्ध उठली. ‘ही देवाधर्मात ढवळाढवळ करतेय’ असे आरोप होऊ लागले.

त्यावर मी लोकांना सांगू लागले की, “देवाधर्माचं करा, ते केलंच पाहिजे. पण आपला देव आपण कर्ज काढून पुजायचा की भक्तीने पुजायचा, ते आपण ठरवू.” तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक मदतीसाठी धावून आले. त्या वेळेस बऱ्याच लोकांनी ऐपतीप्रमाणे खर्च केला. कर्ज काढून सण साजरा केला नाही. त्यानंतर ते लोक इतरांना सांगू लागले, “आम्ही वाचलो. कर्जाचा फास गळ्याभोवती घेतला नाही. आता जे पैसे मिळवू, त्यातून मुलांचं शिक्षण करू.” खरोखरच मला ते ऐकून खूप धन्य वाटलं.

शिक्षणाशिवाय पर्याय नाही. फुले, शाहू आणि आंबेडकर यांनी संविधानाच्या मार्गावर दीप उजळवून ठेवले आहेत; त्या मार्गावरून चालत राहावं आणि यापुढेही माझ्या समाजासाठी सतत झटत राहावं, हीच माझी ईच्छा आहे. नव्हे, ते माझं कर्तव्यच आहे, असं मी मानते.

शब्दांकन : सविता दामले

‘ऋतुरंग’ दिवाळी २०२२मधून साभार

............................

‘ऋतुरंग’ : संपादक - अरुण शेवते

पाने - २००

मूल्य - ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......