अजूनकाही
गेल्या वर्षी विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या ट्रेनमध्ये ॠतुजा नार्इक या इंजिनिअरिंगच्या २० वर्षीय विद्यार्थिनीला काही महिलांनी धमक्या दिल्या आणि मारहाणही केली. तिचा गुन्हा काय होता? ॠतुजा विरारला राहते आणि वसर्इच्या विद्यावर्धिनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेते. तिने नेहमीप्रमाणे ८.४० ची विरार ट्रेन पकडली. ती चढल्याबरोबर सीटवर बसलेल्या काही स्त्रिया शेरेबाजी करू लागल्या- ‘वसर्इ, बोरिवली न् अंधेरीला उतरणाऱ्या चर्चगेट ट्रेन का पकडतात? त्यांना अंधेरी ट्रेन पकडायला काय होतं? हिला उतरू देऊ नका.’ वसर्इ स्टेशन यायच्या आधीच दाराजवळ उभ्या असलेल्या पन्नाशीतल्या स्त्रियांनी तिला मागे खेचलं, तिचे केस ओढले आणि दंडही पिरगळला. वसर्इला उतरलेल्या काही जणींनी तिला ट्रेन सुरू व्हायच्या आत प्लॅटफॉर्मवर ओढलं म्हणून ती अधिक मारापासून वाचली. या धमक्या आणि मारहाणीमुळे ॠतुजाला दम्याची जोरदार उबळ आली. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या स्त्रियांना ताब्यात घेतलं आणि समज देऊन सोडून दिलं.
काही विशिष्ट लोकल आणि आसनांवर प्रवाशांचे गट मालकी हक्क गाजवतात आणि त्यांच्या आड येणाऱ्यांना ते धडाही शिकवतात! लोकलमधल्या झुंडशाहीचं हे एक मासलेवार्इक उदाहरण. रेल्वे प्रवासामध्ये वर्षानुवर्षं उघड आणि छुपी हिंसा होत आली आहे. आवाजी भांडणं होणं हे तर नित्याचंच आहे. त्याची बरीचशी कारणं नेहमी प्रवास करणाऱ्यांच्या माहितीची आहेत. एरवी अध्यातमध्यात नसणारी, वादावादी न करणारी माणसंही कधीकधी आपला तोल गमावतात. ही भांडणं, न आवरणारा संताप कसा समजून घ्यायचा? क्षुल्लक कारणांवरून माणसांचं संतुलन का बिघडतं? गर्दीचा माणसांवर काय परिणाम होतो?
लोकल ट्रेनमध्ये अक्षरश: काही इंच जागा वाटून घ्यावी लागते. त्यात हालचालही करता येत नाही. प्राप्त जागेमध्ये शरीर आणि भावनांचा समन्वय साधायचा असतो. आजूबाजूला चोहीकडे अनोळखी चेहरे. अपरिचितांशी दृष्टीभेट टाळण्यासाठी, गर्दीपासून मानसिकदृष्ट्या दूर जाण्यासाठी खटाटोप सुरू होतो. नजर न भिडवणं, शून्यात बघणं, मोबार्इलमध्ये सतत डोकं घालून बसणं, असं काहीबाही. दोन व्यक्तींमधील अपेक्षित अंतरापेक्षा प्रत्यक्षातील अंतर कमी असल्यामुळे अस्वस्थता येते. विचित्र कोंडलेपणा येतो. आपल्या अवकाशावर अतिक्रमण झाल्याची भावना निर्माण होते. यामुळे काही प्रवाशांमध्ये कटुपणा निर्माण होतो. मग त्या थोड्या थोड्या कारणांनी चिडतात. त्यांना स्पर्श झालेला सहन होत नाही. चौथ्या सीटवरचीला निदान टेकता यावं म्हणून सरकलेलं त्यांना चालत नाही. ‘टेकून उभे राहू नका, खेटून बसू नका, पाय तिकडे करा, किती सरकायला सांगता, जागाच नाहीए’ अशा तक्रारी सुरू होतात. त्यामुळे भांडणं आणि वादावादी सुरू होते.
मुंबर्इतील लोकल ट्रेनच्या गर्दीच्या प्रत्यक्ष वर्णनापलीकडील काही मुद्यांचा शोध घेणं जरूरीचं आहे. गर्दीचे सामाजिक, शारीरिक, आणि सार्वजनिक आरोग्यावर काय परिणाम होतात, याचे जगभर अभ्यास झालेले आहेत. मुंबर्इ लोकलच्या गर्दीच्या परिणामांचा समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय अभ्यास मात्र अजून झालेला नाही.
गर्दीचा माणसांवर काय परिणाम होतो, त्यांच्या दृष्टिकोनावर तसंच प्रवासातील त्यांच्या वर्तनावरही काय परिणाम होतो, या अभ्यासामुळे दाटीवाटीत माणसामाणसांमधील परस्पर क्रिया आणि माणसांचं सार्वजनिक वर्तन समजून घेण्यास मदत होते. नगर नियोजन, नागरी वाहतुकीचं नियोजन आणि वाहनातील आंतररचनेच्या अनुषंगानं असे अभ्यास उपयुक्त ठरतात.
पाश्चिमात्य देशांमध्ये ट्रेनची गर्दी, स्टेडियममधील धक्काबुक्की, सार्वजनिक स्थानांवरची गर्दी यासंबंधींचे अभ्यास झालेले आहेत. परंतु हे अभ्यास मानशास्त्रीय आहेत आणि ते गर्दीच्या नकारात्मक परिणामांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतात.
शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींच्या मुंबर्इ लोकल प्रवासाच्या अनुभवांचा अभ्यास लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तसंच मुंबर्इ लोकलच्या गर्दीचा शारीर अनुभव काय आणि कसा असतो, याचा एक अभ्यास गेल्या वर्षी पार पडला. शरीरावरील नियंत्रण गेल्यासारखं वाटणं, दुसऱ्यांच्या अंगावर कोसळू अशी भीती, तसंच त्यासंबंधीची अस्वस्थता आणि अपरिचितांचे स्पर्श हे गर्दीचे शारीर मुद्दे या अभ्यासातून पुढे आले आहेत.
परंतु गर्दी मूलत: चांगली किंवा वार्इट नसते. रॉक कॉन्सर्ट किंवा नाटक, सिनेमागृहातील गर्दीचा उपद्रव होत नाही. कारण तिथं लोकांना मिळणारा अनुभव किंवा कलेचा आनंद सामायिक असतो. तिथं गर्दीला जोडून ठेवणारा एक दुवा असतो. गर्दीतील काही दर्दी योग्य ठिकाणी दाद देतात आणि त्याला इतरही प्रतिसाद देतात.
लोकल गाडीत मात्र कोणतंही सामायिक मूल्य नसतं. तिथं काही अलिखित नियम मात्र असतात. काही मर्यादांचं पालन करायचं असतं. विरार गाडीत अंधेरी-बोरिवलीला जाणाऱ्यांनी चढायचं नसतं. ‘क्लेम’ केलेल्या सीटवर दुसऱ्या व्यक्तीनं बसायचं नसतं.
काठोकाठ भरलेला डबा काही क्षणानंतर स्थिरस्थावर होतो. बाहेर लटकणाऱ्यांनाही शरीरं आतमध्ये घेता येतात. डब्यात धान्य भरताना तो हलवला की, जागा होत जाते, तसंच काहीसं भरलेल्या डब्यातील प्रवाशांचं होतं.
गर्दी स्थिर झाल्यानंतर आपल्या अॅक्सेसरी-वस्तूंसाठी झटापट करावी लागते. कॉलेज तरुणीचं एका बाजूला घेतलेलं केसांचं पॉनिटेल दुसरीच्या दंडामध्ये अडकतं. कोणाची पर्स खांद्यावरून घसरते, पण गर्दीमुळे तिला ती वर घेता येत नाही. कोणाचा चुकून पाय पडल्यामुळे चप्पल पायातून सुटते, खाली बघण्याची सोय नसल्यामुळे ती पुन्हा पायात घालता येत नाही. केस, दुपट्टे, पर्स, मोबार्इल आणि पायताणांचा गुंता होतो. त्यासोबत माणसांचीही गुंतागुंत होते. पायावर पाय पडतात. कोणाचा सगळा भार अंगावर येतो, हात अडकून पडतात, ते वर घ्यायला जागा नसते. कधी कधी ही बजबजपुरी सोडवणंही कठीण होऊन बसतं. लोकलमध्ये उभं राहिल्यावर आधार मिळण्यासाठी डोक्यावर ‘डी’ आकाराचं हँन्डल बसवलेलं असतं. गर्दी इतकी असते की, पाय स्थिर ठेवण्यासाठी हँडलला धरावं लागतं. पण आपल्याजवळ असलेलं हँडल दोघींनी अगोदरच पकडलेलं असतं. तेच हँडल पकडलं तर नाराजी दाखवली जाते. खूप वेळ हात ताणून धरल्यामुळे दंड, बोटं आणि खांदा दुखू लागतो. ढकलाढकलीमुळे काही वेळा इजाही होते.
धावती गाडी हेलकावते, एका बाजूला झुकते. माणसं एकमेकांवर कोसळतात, आदळतात. गर्दीत पाऊल ठेवायला गेलं तरी ते कोणाच्या पावलावर पडेल की काय असं वाटू लागतं. चोहीकडे पावलंच पावलं, पावलांचे आवाज, पळणारी पावलं, त्यामध्येच भांबावलेले नवखे प्रवासी, पुढची गर्दी हलत नसल्यामुळे वैतागणारे प्रवासी… हे सगळे अनुभव आपल्या भावनांवर, दृष्टिकोनावर आणि आत्मविश्वासावरसुद्धा परिणाम करतात.
काही सामाजिक मानसशास्त्रज्ञांच्या मते ‘गर्दीचं मन’ तयार होतं. अनामिकतेमुळे कळप तयार होतो. कळपात प्रवेश केल्यावर वैयक्तिक जबाबदारीतून मुक्तता होते. विचारांना हद्दपार केलं जातं. कळपामध्ये अबोल संवादही असतो.
हे कळपाचं मन म्हणजे निव्वळ अनेक मनांची बेरीज नसते. या मनाचं स्वतंत्र अस्तित्व असतं. या स्वतंत्र मनाचं गारूड सर्वांवर पडतं. गर्दीमुळे चेतना मिळते. हिंसा, उत्साह आणि निर्भयता या भावना चेतवल्या जातात. पाकिटचोर किंवा स्त्रियांना त्रास देणारा रोमिओ पकडला गेला की, लोक त्याच्यावर अक्षरश: तुटून पडतात. तिथं अपराध्याला गर्दीच्या न्यायाला सामोरं जावं लागतं. या कृतीमुळे सदाचार आणि प्रामाणिकपणाचा आनंद गर्दीला मिळतो. मी ‘त्यातला’ नाही या भावनेमुळे एक प्रकारची किकही मिळते. फ्रॉर्इडच्या म्हणण्यानुसार कळपांमध्ये संवाद असतो. कळपांत सूचनांचे संकेत मिळतात. आपलं विचारी मन जे करू शकणार नाही, ते कळपातील मनामुळे साध्य होतं. कळपातील ‘वास्तव्या’मुळे कोंडलेल्या भावना मुक्त होतात. मनातील सद्सदविवेक बुद्धीवर पडदा पडतो आणि अंत:प्रेरणा जाग्या होतात. हा कळप विवेकी कृत्यं करतो, तशी अविवेकी कृत्यंही करतो. जमावाने गुन्हेगाराला ठार मारल्याच्या घटनाही घडतात.
लोकल ट्रेनच्या गर्दीमुळे बेपर्वाईसुद्धा वाढीला लागते. मध्यंतरी ट्रेनच्या दाराच्या बाहेर लटकलेली एक तरुणी रुळांवर पडून मृत्युमुखी पडली. ‘थोडं आत सरका’ असं ती आणि तिच्या जरा पुढे असलेल्या महिला विनवत होत्या. थोडी अडचण सहन करून जागा करून देता येते, हे लोकलनं नेहमी प्रवास करणाऱ्यांना चांगलंच माहिती आहे, पण काही प्रवासी आडमुठेपणा करतात. आपल्याला चढायला मिळालं तसं इतरांनाही मिळायला हवं, त्यासाठी थोडी तसदी घ्यायला हवी असं त्यांना वाटत नाही. हे प्रवासी दुसऱ्यांचा जराही विचार करत नाहीत. परोपकारासोबत ‘आपण आपल्यासाठी’ ही भावनासुद्धा गर्दीच्या मानसिकतेतून निर्माण होते, याचा अनुभव रोज प्रवास करणाऱ्यांना येतो.
लोकल ट्रेनच्या प्रवासामध्ये कराव्या लागणाऱ्या क्रिया काहींना अनैतिक आणि माणुसकीहीन वाटतात. दुसऱ्यांना ढकलून, मागच्यांचं काय होर्इल याची पर्वा न करता चढायचं. आपण गाडीत चढू शकलो, याचा अर्थ दुसऱ्या कोणाला तरी खाली राहावं लागलेलं असतं. काही जणांना दारातच उभं राहावं लागतं. बसण्याच्या जागेसाठी कडाक्याची भांडणं होतात. उतरतानाही ढकलाढकली करून उतरावं लागतं, हे सारं हिंसेनं भरलेल्यासारखं वाटतं.
गर्दीच्या वेळी एका कोपऱ्यात उभं राहून प्लॅटफॉर्म आणि ब्रिजवरची दृष्यं पाहत राहिलं तर रेल्वे प्रवासामधील चेतना जाणवेल. स्टेशन परिसरात चाललेल्या घडामोडी, तिथं चाललेले उद्योग, बेघर व इतर अनेक जणांचा आसरा आणि उपजीविकेचे व्यवसाय दिसतात. तशीच त्यातील अनुस्युत हिंसाही समोर येते.
कधी कधी मन थाऱ्यावर नसतं, चिंता ग्रासत असतात. अशा वेळी गर्दीचा विलक्षण त्रास होऊ लागतो. सतत आत येणारी गर्दी आणि कोलाहल नकोसा वाटतो. तेव्हा गर्दी नकोशी वाटते, तसंच अनेकदा गर्दीचं अस्तित्व आश्वस्तही वाटू शकतं. गर्दीचं वर्तन अनेकदा सौहार्दपूर्ण असतं. एकजूट होऊन मदत केली जाते. आजारी, वृद्ध, गरोदर स्त्रिया, लहान बाळं असलेल्या स्त्रियांना मदत केली जाते. काही नवख्या प्रवाशांना उतरण्यास मदत केली जाते. आपात्कालात गर्दी अत्यंत परोपकारी होते, परंतु काही वेळा हे गर्दीचं मन विपरीत वागतं. कधी एका ऑफिसातील, तर कधी भाषिक गट तयार होतात. गटाच्या बाहेरील कोणाचीही पर्वा केली जात नाही. विरार ट्रेनमध्ये घडलेली घटना हे त्याचं उदाहरण आहे.
रोज लाखो त्रयस्थ चेहरे, त्यांना सामोरं जाणं आणि प्रत्येक ठिकाणी आपलं स्थान पटकावण्यासाठी करावी लागणारी धडपड चाकोरीबद्ध आणि यंत्रवत झाल्यासाखीही वाटू लागते.
पहिल्या वर्गाच्या डब्यात थेट वर्गसंघर्षाचं प्रत्यंतर मिळतं. स्वत:ला उच्चभ्रू समजणाऱ्या काही व्यक्ती स्वघोषित तिकिट तपासनीसही बनतात. साधारण कपडे घातलेली महिला फर्स्ट क्लासच्या डब्यात चढली की, ‘ये फर्स्टक्लास है, अगले स्टेशन पे उतर जाओ, तुम्हारा तिकीट बताओ’ असा घोषा लावला जातो. एकदा सर्वसाधारण पेहराव केलेल्या स्त्रीला सहप्रवाशांनी इतकं भंडावून सोडलं की, तिने रडकुंडीला येऊन आपला फर्स्ट क्लासचा पास त्यांना दाखवला. खरं तर पास तपासण्याचा अधिकार प्रवाशांना नाही, पण फर्स्ट क्लासमध्ये हे नेहमी घडतं. डब्यात जास्त गर्दी झाली की, ‘सेकंड क्लासच्या बायका डब्यात आल्या आहेत’ अशी चर्चा सुरू होते. रेल्वेलार्इन दुरुस्तीचं काम करणारे कामगार साधरणपणे महिला फर्स्ट क्लासमधून प्रवास करतात, कारण पहारी आणि इतर हत्यारं ठेवायला त्यांना इतर डब्यात जागा नसते. शिवाय रेल्वे अधिकारीच त्यांना फर्स्ट क्लासमध्ये बसवून देतात. त्यांना या स्त्रिया त्रास देतात. रेल्वेलार्इनची देखरेख ही प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच केले जाते, पण एवढा विचार यातील काही स्त्रिया करत नाहीत.
एकंदर फर्स्ट क्लासमधील महिलांना सामान्य, साधारण प्रतीच्या वाटणाऱ्या स्त्रिया, अंध-अपंग व्यक्ती डोळ्यासमोरसुद्धा नको असतात. फर्स्ट क्लासमधील प्रवासी महिलांनी आपला डबा हे जणू काही संस्थानच बनवलेलं असतं.
प्रवासादरम्यान प्रवाशांचं वर्तन कसं असतं, भीषण गर्दीतूनही आपल्या इच्छित स्थळी, तेही वेळवर पोचण्यासाठी लोक काय काय करतात आणि लवकर पोचवणारा मार्ग कसा शोधतात, याचा अभ्यास झाला पाहिजे. लोक वेळेत पोचण्यासाठी कोणती आणि कशी निवड करतात, हे रेल्वे प्रशासनाला समजलं तर त्या प्रकारची सेवा पुरवणं रेल्वेला शक्य होर्इल.
रेल्वेमध्ये केवळ बुद्धी आणि विचार गहाण टाकणाऱ्या झुंडी नाहीयेत. फ्रॉर्इडच्या जमावाच्या वर्तणुकीच्या थिअरीला नंतरच्या पिढीतील समाजशास्त्रज्ञांनी खोडून काढलं आहे. राल्फ टर्नर या अमेरिकन समाजशास्त्रज्ञाच्या मते अत्यंत हिंसक आणि धोकादायक कळपामध्येही संवाद असतो. त्यात प्रसंगाचं विश्लेषण केलं जातं, कोणती कारवार्इ करावी यासंबंधीची मंजुरी घेतली जाते आणि कार्य पार पाडलं जातं.
हे काही अंशी खरं असलं तरी ॠतुजा नार्इकला पद्धतशीरपणे मारणाऱ्या महिला मात्र फ्रॉर्इडची थिअरी तितकीच खरी आहे, हे सिद्ध करतात!
लेखिका मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.
alkagadgil@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment