इव्हेंटीकरणाच्या सापळ्यात ‘महिला दिन’!
अर्धेजग - महिला दिन विशेष
वैष्णवी जिंतुरकर
  • या लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत
  • Wed , 08 March 2017
  • अर्धे जग women world जागतिक महिला दिन International Women's Day हॅप्पी विमेन्स डे Happy Women's Day

‘मग उद्या काय प्रोगाम?’

‘का? काय आहे उद्या?’

‘काय म्हणजे? महिला दिन ना का उद्या? तुमचा सण (एक छद्मी हास्य)!’

‘ओहो, आमचा सण! म्हणजे वर्षभर राबणाऱ्या बैलासाठी जसा वर्षातून एकदा बैलपोळा असतो, तसा हा आमचा सण!’

कुणी सांगतं, आमच्या ऑफिसमध्ये ना आठ मार्चला ऑफिसमधल्या सगळ्या महिलांना सुट्टी देऊन रिसॉर्टवर पाठवतात. खा. प्या. मजा करा म्हणतात!

कुणी सांगतं, आमच्या ऑफिसमध्ये ना चॉकोलेटस देऊन आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्या दिवशी त्यांच्याकडून फारशा कामाची अपेक्षा ठेवत नाही. तसंही एरवी सणावारी महिलांना लौकर जायची किंवा उशिरा यायची सवलत असते. पण ते त्यांना घरी काम असतं. सणवार महिलांनीच सांभाळायचे असतात म्हणून. हा तर काय त्यांचाच दिवस. इन्जॉय करू दे बिचाऱ्यांना!

कुणी सांगतं, हे तर काहीच नाही. आमच्या जवळच्या एका मिठाईवाल्याकडे ना आठ मार्चला महिलांना पाणीपुरीवर निम्मी सवलत असते!

कुणी सांगतं, त्यात काय बरेच ब्रँडस देतातच आजकाल अशी सवलत. कपडे, महिलांच्या वस्तू आठ मार्चला कमी किमतीत!

कुणी म्हणतं, या दिवशी ‘तुम्ही आयुष्यात आलात, आमचं आयुष्य तुम्ही किती सुंदर केलं आहे,’ असे किती छान छान मॅसेज येतात. किती बरं वाटतं ते वाचून!

कुणी म्हणतं, टीव्हीवर, वर्तमानपत्रांमध्ये महिलांच्या कर्तृत्वाच्या स्टोऱ्या आठ दिवस आधीपासून गाजायला लागतात. महिलासंबंधीचे कार्यक्रम होतात. सत्कार होतात. इव्हेंटस होतात. किती मस्त आहे हे सगळं!

कुणी म्हणतं, आमच्या वेळी असं काहीच नव्हतं हो! नशीबवान आहेत आजच्या बायका. सो हॅप्पी विमेन्स डे!

हो! हॅप्पी विमेन्स डे!!

जसं हॅप्पी दसरा, हॅप्पी दिवाळी, हॅप्पी इंडिपेंडन्स डे, हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी ख्रिसमस, तसं हॅप्पी विमेन्स डे!!!

पण अशा शुभेच्छा देणाऱ्या-घेणाऱ्यांनो नेमकं कशासाठी हॅप्पी व्हायला सांगताहात तुम्ही? आधीच उत्सवी असलेल्या या समाजानं बाजारू अर्थव्यवस्थेच्या आहारी जाऊन स्त्री सक्षमतेचं भान देऊ पाहणारा हा एक दिवसही गिळंकृत केला म्हणून?

आजच्या या साजरीकरणाच्या मुळाशी आपल्याच विचारांचा विरोधाभासी इतिहास आहे हे किती जणांना माहीत असतं? मुळात आठ मार्च महिला दिन म्हणून साजरा करण्याची पद्धत सुरू झाली, बाजारू अर्थव्यवस्था ज्याला कायमच नाक मुरडत, खडा विरोध करत आली आहे, त्या कम्युनिस्ट रशियात. ८ मार्च १९१७ रोजी पेट्रोगार्ड या रशियाच्या शहरात टेक्सटाईल उद्योगात काम करणाऱ्या महिलांनी शहरभर निदर्शनं केली. अन्न हवं, युद्ध नको आणि शांतता हवी, अशी त्यांची मागणी होती. आपापली कामं बंद करून त्यांना इतरही कामगार येऊन मिळाले आणि झारशाहीला विरोध हे आणखी एक उद्दिष्ट त्यात समाविष्ट केलं गेलं. रशियन राज्यक्रांतीची बीजं इथंच पडली असंही काही जण मानतात. रशियात हा दिवस फेब्रुवारी महिन्यात येत असला तरी ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे तो आठ मार्च आहे.

राज्यक्रांतीनंतर कम्युनिस्ट राजवटीने या दिवशी सुट्टी द्यायला सुरुवात केली. त्याआधी न्यू यॉर्कमध्ये, डेन्मार्कमध्ये, जर्मनीमध्ये आणि इतरत्रही स्त्रियांच्या हक्कांसाठी आंदोलनं, चळवळी, परिषदा सुरू होत्या. पण पुढे १९७७मध्ये युनायटेड नेशन्सने आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून मान्यता दिली. आणि जगभर या दिवशी महिलांचे प्रश्न, महिलांचे हक्क यांविषयी सजग चर्चा व्हायला लागल्या. आपल्याकडेही १९७२च्या मथुरा बलात्कार प्रकरणानंतर खऱ्या अर्थानं स्त्रीवादी विचारांना चालना मिळाली. बलात्कारासंबंधीच्या कायद्यात सुधारणा करणं भाग पडलं. आणि तिथून स्त्रीवादी विचारांची पताका अधिक बळकटपणे पुढे जाऊ लागली.

काही कायद्यांमध्ये सुधारणा झाल्या. सरकारी योजनांमध्ये स्त्रियांचा अग्रक्रमाने निदान विचार तरी होऊ लागला. मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे, त्यांचं लहान वयात लग्न लावून देऊ नये, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं पाहिजे, हे हळूहळू लोकांच्या मनावर बिंबलं जायला लागलं. स्त्रीशिक्षणाला, अर्थार्जनाला चालना मिळाली. स्त्रीवादी चळवळींच्या संघर्षांतून स्त्रियांना आत्मविकासाचा पैस उपलब्ध होत गेला. एकूण स्त्रियांच्या तुलनेत हे प्रमाण कमीच असलं तरी ते आहे हेही खूप महत्त्वाचं ठरलं.

त्या सगळ्याची दृश्यं फळं आजच्या शिकल्या-सवरलेल्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम अशा शहरी स्त्रीच्या रूपात दिसत आहेत. आणि बाजारव्यवस्था त्याच रूपाचं इव्हेंटीकरण करून आपली उत्पादनं खपवायचा प्रयत्न करते आहे, हे जास्त दुर्दैवी आहे. कारण एकेकाळच्या स्त्रीवादी चळवळीच्या संघर्षाशी यातल्या कुणालाच काहीही देणंघेणं नाही, नसतं.

या एका दिवशी स्त्रीशक्तीचा गौरव करण्याचा देखावा झाला की, उरलेले ३६४ दिवस असतं ते स्त्रीदेहाचं वस्तूकरण. स्त्रियांवरचे तेच ते निर्बुद्ध विनोद आणि तथाकथित संस्कृतीरक्षणाच्या तिच्यावरच्या जबाबदारीची बाष्कळ बडबड.

आठ मार्च या दिवशी स्त्रियांच्या आशा-आकांक्षा, स्वप्नांची चाड दाखवणारे किती जण ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाच्या पाठीशी उभे राहणार आहेत?

आठ मार्चला आपण उदारमतवादी असल्याचा डांगोरा पिटणारे किती पुरुष ‘घालावेत मुलींनी हवे ते कपडे, घरकाम ही त्यांची एकटीची जबाबदारी नाही,’ ही गोष्ट एरवी प्रत्यक्षात आचरणातून मान्य करणार आहेत?

किती राजकीय पक्ष निवडणुकीत आणि सत्तेत स्त्रियांना नैसर्गिक वाटा देणार आहेत? किती व्यवस्थापनं स्त्रियांना समान वेतन देणार आहेत?

स्त्रीला नोकरी देताना नंतर मग ती लग्न करणार, बाळंतपणाच्या सुट्ट्या मागणार म्हणून तिला नोकरीच नाकारणारे आपली विचारसरणी बदलणार आहेत?

बाळंतपणाची चार-सहा महिन्यांची सुट्टी दिली की, आपली जबाबदारी संपली असं मानणारी आपली व्यवस्था, आपला समाज आणखी किती काळ मुलांचं संगोपन ही जबाबदारी एकट्या स्त्रीचीच असते असं मानणार आहे?

या सगळ्या व्यथा आहेत त्या शहरी मध्यमवर्गीय स्त्रियांच्या. असंघटित, क्षेत्रातल्या कष्टकरी वर्गातल्या, ग्रामीण भागातल्या स्त्रियांचे प्रश्न आणखी वेगळे! सॅनिटरी नॅपकिन्सची जाहिरात करत ‘विमेनहूड सेलेब्रेट’ करण्याची, ‘हॅप्पी विमेन्स डे’ म्हणणाऱ्यांच्या तर ते खिजगणतीतही नसतील.

बलात्कार, लैंगिक शोषण, स्त्रियांचा व्यापार, संस्कृतीच्या नावाखाली त्यांची दडपशाही हे सगळं राजरोस सुरू असताना वर्षातला एक दिवस उठून स्त्रीशक्तीच्या नावाने गळे काढायचे, तेही इव्हेंटीकरणाला सोकावलेल्या बाजारव्यवस्थेनं, हे भयंकर दांभिकपणाचं आहे. या दिवसाची प्रतीकात्मकता मान्य केली तरी उरलेले ३६४ दिवस हीच व्यवस्था स्त्रीला वस्तू म्हणूनच वागवत-वापरत असते. गुरमेहेर कौर नावाच्या मुलीला उघड उघड बलात्काराच्या धमक्या दिल्या जातात, तेव्हा या व्यवस्थेला त्यातल्या गांभीर्याशी काहीच देणंघेणं नसतं. ‘तुम्ही महान आहात, त्यागी आहात. तेव्हा आता गुपचूप देव्हाऱ्यात बसा. हाताची घडी, तोंडावर हसू ठेवा! आम्ही आरत्या करू, झांजा वाजवू, प्रसाद वाटू, उत्सव साजरा करू… त्या एका दिवसाचीच नशा अशी चढेल की, पुढचे ३६४ दिवस सगळे जण सगळं विसरून जातील’, असाच तिचा आविर्भाव आहे. प्रतीकात्मकतेला उदात्ततेची, उत्सवीकरणाची झालर चढ‌वणारी ही खेळी वेळीच ओळखण्याची गरज आहे.

editor@aksharnama.com

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Mon , 13 March 2017

ताई, एक नंबर झालाय लेख!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......