अजूनकाही
जबाबदारी आणि कर्तव्य याविषयी भारतीय समाज बराच उदासीन आहे. उलटपक्षी बऱ्याचदा असं दिसतं की, कुणी काळजीपूर्वक कर्तव्य करत असेल तर त्याची खिल्ली उडवली जाते. रस्त्यावर कचरा फेकणं, कुठेही थुंकणं, कर चुकवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करणं, पैसे घेऊन मतदान करणं, कुठं रांगेत उभं राहण्याची वेळ आली तर अरेरावी किंवा वशिला वापरत पुढे सरकणं, रस्त्याच्या कडेनं उभं राहणं, राजरोसपणे झाडं तोडणं, स्वतःची जमीन असताना सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणं, वीज चोरून वापरणं, अनावश्यक असा पाण्याचा अपव्यय करणं... असे रोजच्या दैनंदिन जीवनात नको इतके नियम आपण मोडत असतो! तरीही आपल्याला पारदर्शक सरकार हवं असतं, स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, कार्यतत्पर सरकारी अधिकारी हवे असतात. त्यांनी कुठे कुचराई केली तर आपण त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायला मागे-पुढे पाहत नाही. लाचखोर अधिकाऱ्यांची पाठराखण करून कर्तव्यतत्पर अधिकाऱ्यांना वेठीस धरलं जातं. आणि वरून कुणी लाचखोर सापडला की, त्याला ‘भ्रष्ट’ म्हणून हिणवलं जातं. परंतु कधीही आपण हा विचार करत नाही की, मी जर लाच दिली नाही, मी जर नियमांचं पालन केलं तर या अधिकाऱ्यांची, सरकारी कर्मचाऱ्यांची काय बिशाद आहे माझं काम अडवून धरण्याचं किंवा लाच घेण्याची, पण कुणीही स्वतःच्या आत डोकावून पाहत नाही. नियम मोडणारेच नियमांचा आग्रह धरतात. आपला सदसदविवेक कुठं जातो?
काल सकाळी एक बातमी वाचली- ‘क्रूरकर्मा खिद्रपुरेकडून नऊ वर्षं स्त्रीभ्रूणहत्या’. सविस्तर बातमी वाचल्यावर तासगावच्या सौ. स्मिता जमदाडे या उपचारादरम्यान मृत पावलेल्या महिलेच्या नातेवाइकांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला म्हणून त्याच्यावर कारवाई झाली आणि या घटनेचा उलगडा झाल्याचं कळलं. मला ही बातमी वाचून तीन प्रश्न पडले-
१) त्या महिलेला जवळ रुग्णालय असताना मिरजला नेलं, म्हणजे या नातेवाइकांना स्त्रीभ्रूणहत्या करायची होती का? मग त्याच डॉक्टरकडे का गेले? वैद्यकीय सेवा करताना मला अनेकदा हा अनुभव येतो की, नातेवाइकांचा, विशेतः मुलीच्या माहेरच्या आणि खुद्द मुलीचा आग्रह असतो, तपासण्या करून गर्भ खाली करण्याचा. त्या अगदी भावनिक होऊन आग्रह करत राहतात. ‘तुम्ही आमचे फमिली डॉक्टर आहात, तुम्ही आमची सोय करायला हवी...’ अशा एक ना अनेक गोष्टी सांगत राहतात. जर आपण डॉक्टरांनी चांगलं वागावं असा आग्रह आपण धरत असू तर अशा नको त्या अपेक्षा का ठेवाव्यात? आणि असं करताना जर त्या महिलेचा मृत्यू झाला तर एकट्या डॉक्टरला का खुनी ठरवावं? आग्रह करणाऱ्या नातेवाइकांवरही मनुष्यवधाचा खटला का भरू नये? पण प्रत्यक्षात होतं नेमकं उलट. त्या नातेवाइकांना समाजाची सहानुभूती मिळते. समाजानं डॉक्टरवर कारवाई करा म्हणताना स्त्रीभ्रूणहत्येचा आग्रह धरणाऱ्या नातेवाइकांनाही वाळीत टाकायला हवं किंवा त्यांच्यावरही कारवाईचा आग्रह धरायला हवा. परंतु तसं होताना दिसत नाही. उलटपक्षी डॉक्टरपेक्षा त्या स्त्रीची घरातल्या लोकांमध्ये भावनिक गुंतवणूक जास्त असते. उद्या तयार होणाऱ्या मुलाच्या गर्भासाठी आज जिवंत असलेल्या त्या स्त्रीला जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर सोडलं जातं. आणि हे करणारे तिचे जवळचेच असतात. मग अशा नातेवाइकांना डॉक्टरच्या नावे ओरडण्याचा नैतिक अधिकार उरतो का?
२) अशा स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याच्या अधिकार त्या भागातील आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांनाही असतात. मग जवळपास असे गुन्हे करणारे डॉक्टर त्यांना कसे माहीत होत नाहीत? खरं तर इथंच साऱ्या गुन्ह्यांना रोखता येऊ शकतं. आता नवनवीन योजनांद्वारे अनेक स्त्रिया सरकारी सुविधा घेत आहेत. खाजगी रुग्णालयातील प्रसूतीचं प्रमाण ५० टक्के घटलं आहे. इतक्या यशस्वीपणे या सरकारी योजना राबवल्या जात आहेत. माता-बालक तपासणीसाठी घरोघरी ‘आशा’ फिरत असतात. त्यांना घराघरातील गोष्टी ज्ञात असतात. पहिली मुलगी आहे मग त्या स्त्रिला पुन्हा दिवस गेले तर ती कुठे उपचार घेत आहे, हे या आशांच्या माध्यमांतून सरकारी अधिकाऱ्यांना नक्की समजू शकतं. संशयास्पद काही आढळलं तर ते अधिकारी तथाकथित डॉक्टरबद्दल चौकशी करू शकतात. दवाखान्यातील वर्दळीवरूनही या गोष्टीचा अंदाज बांधणं नक्कीच अवघड नाही. असं असूनही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातं. बऱ्याचदा अशा डॉक्टरकडे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून हे डॉक्टर येत असतात. वरील कारवाई झालेल्या डॉक्टरची माहिती नऊ वर्षांत या सरकारी कर्मचाऱ्यांना होऊ नये, हे अविश्वसनीय आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांनी जर ठरवलं तर स्त्रीभ्रूणहत्या रोखणं अशक्य आहे का? ज्या परिसरातील डॉक्टर दोषी असतील तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं नाही का?
३) वरील उल्लेख केलेले लोक गुन्ह्यातील दुय्यम साथीदार होऊ शकतात, परंतु जे गुन्हा करतात ते डॉक्टर नक्कीच शिक्षेस पात्र असतील. बऱ्याचदा नातेवाईक आणि इतर सामाजिक घटक हे अशिक्षित असतात. त्यांच्या मनावर झालेले जन्मापासूनचे स्त्री-पुरुष भेदाचे संस्कार पुसणं थोडं अवघड असतं. परंतु या डॉक्टरांना सर्व माहीत असून फक्त पैसा मिळतो, म्हणून अशा प्रकारे अमानुषपणे गर्भपात करणं योग्य वाटावं यासारखा भारतीय शिक्षणाचा पराभव नाही.
शिक्षणानं संवेदना जागृत होत नसतील तर हे शिक्षण चुकीच्या मार्गानं जात आहे, याचं हे अत्यंत दुर्दैवी उदाहरण म्हणावं लागेल. प्रत्येक डॉक्टरनं जर ठरवलं की, मी स्त्रीभ्रूणहत्या करणार नाही तर हे रोखणं अवघड आहे काय? डॉक्टरांची इच्छाशक्ती नक्कीच हे रोखू शकेल. अशा स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरांना जर संपूर्ण डॉक्टर असोसिएशन्सनी समज दिली तर हे थांबणार नाही का?
या तिन्ही गटात प्रबळ इच्छाशक्ती आणि सामाजिक प्रश्नांबद्दलची संवेदनशीलता आवश्यक आहे. X आणि Y हे घटक मुलगा वा मुलगी होणं ठरवतात, हे आज शिकलेली मुलगी जाणते आणि तरीही या स्त्रीभ्रूणहत्येच्या गुन्ह्यात गोवली जाते, यासारखी शोकांतिका नाही!
लेखिका मुक्ताई ग्रामीण महिला संघ (नागरगाव, शिरूर, जि. पुणे)च्या अध्यक्ष आहेत.
Shelargeetanjali16@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sandhya Shelar
Wed , 08 March 2017
आदित्य तुमच्या भावना अगदी योग्य आहेत . या सुशिक्षित मुली नवरा नाही म्हणत असताना अनेकदा गर्भपात करताना मी पाहिल्या आहेत . खरोखर या मुली शिकल्या का ? हा प्रश्न मलाही त्रास देतो . ती उलटून नाही म्हणत नाही का ? याची अनेक कारणे आहेत . त्याविषयी मी स्वतंत्र लिहीणार आहे . आज कायदा कडक आहे म्हणून लिंगनिदान कमी झाले असे नाही तर लिंगनिदानेचे रेट सर्वसामान्याच्या हाताबाहेर आहेत म्हणून प्रमाण कमी आहे . अजून एक शोकांतिका सांगते ..एका अशा डॉक्टरला मी विचारले तुम्ही का करता अशा गोष्टी ? त्यांंनी तेच उत्तर दिले ...मी घरी जात नाहीत त्यांच्या तेच येतात माझ्याकडे ..मी नाही केले तर दुसरीकडे ते करून घेणारच ..असो . डॉ संध्या शेलार .
Bhagyashree Bhagwat
Wed , 08 March 2017
समोरच्या बाकावरून अप्रतिम!
ADITYA KORDE
Wed , 08 March 2017
सगळी नाटकं चालू आहेत... त्या डॉक्टर ला चेचून मारा पण जे लोक त्याच्या कडे बायकोला घेऊन जात होते त्या हरामखोरांचे काय?... त्यांच्या बायकांचे काय?. डॉक्टर त्यांच्या घरी आला होता का, तुझ्या बायकोच्या पोटात मुलगा आहे कि मुलगी ते बघुयात, चल असे म्हणत?. त्या डॉक्टर चा दवाखाना म्हैसाळ गावात अगदी बाजारपेठेत आहे म्हणे. माझा अजिबात विश्वास नाही कि हे सगळे गलिच्छ धंदे तिथे बिनबोभाट चालले होते आणि कुण्णा कुण्णालाही पत्ता सुद्धा लागला नाही.... खरेतर ह्या सगळ्या जोडप्याना शोधून काढून त्यांची जबरदस्तीने नसबंदी (दोघांची ही) केली पाहिजे... मी लक्ष्मीनगरला राहत असताना आमच्या घरासमोर झोपडपट्टी होती(म्हणजे अजूनही आहे) तिथे कायमच दारुडे नवरे झिंगून आपल्या बायकांना बडवत , अगदी भर चौकात बडवत पण त्या बायका देखील गुमान मार खात नसत, त्याला अत्यंत घाणेरड्या शिव्या देत, उलट मारत,अगदी पायातली चप्पल काढून मारत. आणि काही कारणाने नवऱ्या ने मुलांना हात जरी लावला तरी चवताळून अंगावर जात, माझा काही संबंध नसताना आणि दुरून बघताना हि माझा थरकाप उडत असे, आजही हे लिहिताना ते त्यांचे ते चवताळलेले रूप आठवून अंगावर शहारे उभे राहिले ...हे मी स्वत: एक दोनदा नाही अनेक वर्षे पाहिलेले आहे, मग मला कळत नाही कि माणसात ही कुठली नवीन कणाहीन,बेशरम आयांची प्रजाती निर्माण झाली आहे कि नवरा पोट पाडायला हिला घेऊन जातो आणि हि गुमान जाते? पायातली चप्पल काढून रस्त्यातच सडकवायला काय होत?... ---ADITYA
ANAND SALUNKE
Wed , 08 March 2017