अजूनकाही
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना दाखवलेला शिक्षणाचा मार्ग आणि स्वातंत्र्याचा कानमंत्र, यामुळे त्यांचं जगणं बदलेल, शिक्षणामुळे त्या विचार करू लागतील, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील, स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला लागतील, एवढंच नाहीतर या समाजात त्यांना पुरुषांच्या बरोबरीनं स्थान मिळेल अशी स्वप्नं गेली काही वर्षं आपण पाहत आहोत.
...पण तरीही वर्तमानपत्रांतून रोज तिच्यावरच्या वेगवेगळ्या अत्याचाराच्या बातम्या येताहेत. यावरून हेच सिद्ध होतं की, अजूनही स्त्रीला केवळ मादी समजणाऱ्या समाजाची मानसिकता बदललेली नाही. पुरुषाची मानसिकता ज्या प्रमाणात शिक्षणामुळे बदलायला हवी होती, त्या प्रमाणात बदलली नाही, हे सत्य आहेच, पण स्त्रीची मानसिकता तरी कुठे बदलली आहे? स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिला कळला आहे का? परंपरा आणि संस्कृतीचा नेमका काय अर्थ लावताहेत त्या?
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
आज कॉर्पोरेट क्षेत्रात लिलया वावरणारी स्त्री जेव्हा मार्गशीर्षातले गुरुवार भक्तीभावानं करते; आपल्या जगण्यातून खास वेळ काढून हळदी-कुंकू करते वा विज्ञान शिकवणारी शिक्षिका ‘नेमकी पाळी आल्यानं या वेळचा गुरुवार करता आला नाही’ अशी तक्रार करते; महाविद्यालयीन प्राध्यापिका आठवड्याचे रंग व ग्रहाप्रमाणे ठरवून त्या त्या वारी त्या विशिष्ट रंगाचे कपडे घालून येतात, तेव्हा आपण कोणत्या काळात आहोत हेच कळत नाही.
...तर नवश्रीमंत वर्गातील मुली या फॅशन, मुक्तपणे फिरण्याची मुभा व पार्टीज करायला मिळणं म्हणजेच स्वतंत्र होणं, असं समजायला लागल्या आहेत. आणि मध्यमवर्गातील मुली या सगळीकडे जाण्याचा प्रयत्न करताहेत. परंतू त्यांच्या आई-वडिलांनी जे तथाकथित परंपरेचे स्वरूप त्यांना सांगितलं आहे, त्यात अडकून द्विधा मनस्थितीत सापडल्या आहेत. म्हणजे हॉट पँट घालून बीचवर जायचं आणि नऊवारी नेसून, नथ वगैरे घालून मंगळागौर आणि सत्यनारायण करत आपण आधुनिकता आणि परंपरा दोन्हीची छान सांगड घालू शकतो, असा आभास निर्माण करून आत्मानंदात मश्गुल व्हायचं, असं काहीसं झालं आहे.
आजच्या स्त्रियांना स्वत:ची अशी ओळख आहे का? स्वत:ची अस्मिता, स्वत:चा स्वाभिमान आहे का? मी नेहमी स्त्रियांना एक प्रश्न विचारत असतो की, तुम्ही शिकून नवीन काय केलं? सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा तुम्ही उपयोग काय केला? तुम्हाला सावित्रीबाईंनी अंगावर दगड-माती-शेण झेलून शिक्षण दिलं त्यासाठी, त्या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला? फक्त नवऱ्याची सेवा करायला, सत्संगला जायला, पोथीपुराणं वाचता यावीत, उपासतापास करता यावेत, वैभवलक्ष्मीची पारायणं करता यावीत, याच्यासाठी सावित्रीबाईंनी तुमच्यासाठी शिक्षणाची दारं उघडली का?
याच्यासाठी सावित्रीबाईंनी का दगड-माती आणि शेणगोळे खाल्ले! याच्यासाठी वाटेल तसा मान-अपमान सहन केला!! कशासाठी केला त्यांनी हा उपदव्याप? तुम्ही चांगल्या साड्या नेसाव्यात म्हणून? तुम्हाला पार्लरला जाऊन स्वत:ला नटता यावं म्हणून? या शिक्षित स्त्रियांनी नवीन काय केलं? दोनशे वर्षापूर्वीही स्त्री हे सर्व न शिकता, आपल्या, मुलाबाळांना, पतीला, सासू-सासऱ्याला न्याय देत होतीच की! न शिकताच सर्व करत होती, तर मग तुम्ही नवीन काय केलं?
सावित्रीबाई फुले यांच्यामुळे जरी गेल्या काही वर्षात स्त्री शिकू लागली. शिक्षण, अर्थार्जन असे टप्पे घेत तिने चक्क अंतराळात झेप घेतली. सारं कसं तिच्या मनासारखं झालं. पण तिचं जळणं, सोसणं आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार थांबला का? वर्तमानपत्रांतील बलात्काराच्या बातम्या, हुंडाबळी आणि मारहाणीच्या बातम्या ओरडून, किंचाळून सांगताहेत की, स्त्रीचं जळणं अद्याप सुरू आहे. विद्याविभूषित आणि भरमसाठ पगार घेणारी स्त्रीसुद्धा कधीकधी सासुरवासाच्या नरकात अशी पिळवटली जाते की, मानहानी सहन न होऊन आत्महत्येचं पाऊल उचलते. स्वत:ला आधुनिक समजणाऱ्या प्रथितयश अभिनेत्रींनासुद्धा देह-प्रदर्शन आणि कधीकधी शोषण करू दिल्याशिवाय पर्याय उरत नाही. हे सारं पाहिलं की वाटतं, आजही स्त्रीचं सती जाणं सुरूच आहे. फक्त त्याचं स्वरूप, संदर्भ व परिस्थिती बदलली आहे.
स्त्री खरंच मुक्त झाली आहे का?
आम्हाला वाटतं, आजच्या आधुनिक होणाऱ्या मुलींनी परंपरांचे अर्थ समजून घेण्याची गरज आहे. आता त्यांनी या कर्मकांडातून बाहेर यायला हवं, व्रतवैकल्याच्या जंजाळातून स्वत:ला सोडवायला हवं. बाईला येणारी पाळी हा निसर्गधर्म आहे व त्याचा शुद्ध-अशुद्धतेशी, तसंच शुभ-अशुभाशी काही संबंध नाही, हे समजून घ्यायला हवं. बलात्कार करणारा दोषी असतो, जिच्यावर झाला आहे ती नाही, हे लक्षात घ्यायला हवं. बाईसाठी तयार केलेल्या पावित्र्याच्या आणि योनीशुचितेच्या भ्रामक कल्पनांतून तिनं स्वत:ला सोडवायला हवं.
स्त्रीत्वाचा खरा अर्थ जाणून घेतला तर कदाचित स्त्रिया स्वत:ला सापडूही शकतील. पण जर का त्या समाजाच्या पारंपरिक सोनेरी चौकटीत अडकून पडल्या तर, अधिकाधिक आधुनिक अंधश्रद्धा निर्माण करत राहतील. बायकांना या चौकटीत जखडून ठेवण्याचा डाव फार पूर्वीच स्मृर्तिकारांनी खेळला आहेच. पण आता त्यातून बाहेर पडायची वेळ आली आहे. त्यासाठी आता स्त्रियांनी खर्या अर्थानं बहुश्रुत व्हायला हवं. आणि जर वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली नवी पिढी घडवायची असेल, तर त्यांनी प्रथम स्वत: यातून बाहेर पडायला हवं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
मुळात शिक्षण कशाला म्हणतात? जोतीबा फुले म्हणतात, ‘खरे आणि खोटे ओळखण्याची ताकद म्हणजे शिक्षण… सत्य आणि असत्याला वेगळं करून सत्याला छातीठोकपणे स्वीकारण्याची ज्याच्यामध्ये हिंमत निर्माण करतं ते शिक्षण होय.’
मग आजच्या स्त्रियांनी नेमकं कोणतं शिक्षण घेतलं?
खेदानं असं म्हणावं लागतं की, आम्ही ‘सदाशिव पेठे’तलं शिक्षण घेतलं. जर ज्योती-सावित्रीच्या ‘गंज पेठे’तलं शिक्षण घेतलं असतं, तर आम्ही फार चांगल्या प्रकारे सुशिक्षित झालो असतो.
स्त्रिया जोपर्यंत खऱ्या अर्थानं शिक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत, सृर्जनशील बनत नाहीत, तोपर्यंत त्यांची ओळख निर्माण होऊ शकणार नाही, असं मला वाटतं.
..................................................................................................................................................................
जगदीश काबरे
jetjagdish@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment