सौंदर्य कातडीच्या रंगावर, डोळ्यांच्या मादकतेवर अथवा लैंगिक-आवाहकतेवर अवलंबून नसतं, तर कर्तृत्व, पराक्रम, बुद्धी व मनाचा नितळपणा या चिरंतन गुणांवर अवलंबून असतं!
अर्धेजग - कळीचे प्रश्न
सुचिता खल्लाळ
  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
  • Mon , 03 January 2022
  • अर्धेजग कळीचे प्रश्न सावित्रीबाई फुले जिजाऊ श्यामची आई स्त्री महिला सत्ता पुरुषसत्ता

आज तीन जानेवारी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. हा दिवस महाराष्ट्रात ‘बालिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं हा विशेष लेख…

..................................................................................................................................................................

वसाहतपूर्व भटकंतीच्या काळापासून ‘सत्ताकारण’ ही बाब मानवी प्रजातीसाठी अनेक आदिम नैसर्गिक प्रेरणांपैकी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या समग्र मानवी व्यवहारावर प्रभाव टाकताना दिसते. जैविक व्यवहारापासून ते भौतिक व्यवहारांपर्यंत सत्ताकांक्षा सर्व प्रकारच्या कृती, व्यवहार, विनिमय व धारणांतून सातत्यानं अगदी स्वाभाविकपणे समांतर कार्य करत असते.

राजसत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता या सगळ्या सत्ताक्षेत्रांना ताब्यात ठेवणारा तो तो अभिजनवर्ग आणि ताब्यात राहण्यातच अपरिहार्यता मानणारा बहुजनवर्ग, ही वर्गवारी शोषक आणि शोषित या द्विध्रुवी स्वरूपात प्रत्येक काळात बघायला मिळते.

सत्ताधारी, मग तो कोणत्याही काळातला, कुठल्याही स्थळातला असो, काहीएक समान सूत्र मनात हेरून जनमानसावर आपली पकड पक्की करत नेत असतो. एका यशस्वी सत्ताधीशासाठी हे संबंध भावनिक कमी आणि व्यावहारिक अधिक असतात. संबंधांची देवाणघेवाण विनिमयाच्या पातळीवर गेली की, चीजवस्तूंसोबतच माणसांचंही वस्तूकरण होणं सत्ताकारणाच्या दृष्टीनं अपरिहार्य असतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या अशा निव्वळ आणि निखळ सत्ताव्यवहारात स्त्री-पुरुष संबंधात एक व्यक्ती म्हणून ‘स्त्री’चं अस्तित्व आणि अस्मिता यांचा लेखाजोखा शोषकाच्या वतीनं मांडताना की, शोषितांच्या बाजूनं, ही गोष्ट ‘होय वा नाही’ म्हणण्याएवढी तंतोतंत अशीच किंवा तशीच या पद्धतीनं चीतपट पैलूत ठरवता येणारी नक्कीच नाही, असं मला वाटतं.

मुळातच माणसाचा सत्ताव्यवहार बुडातून समजून घेण्यासाठी मानववंशशास्त्राचा आधार घेत उत्क्रांतीचे कालखंड भौतिक आणि जैविक प्रगतीसह क्रमशः लक्षात घ्यावे लागतील. आणि जर तो समग्रात न बघता सत्ताकारणाची फक्त लिंगभावी मीमांसा करायची झाली, तर स्त्री-पुरुषांच्या संबंधातील ‘राजनय’ हेरावा लागेल. कारण सत्ता ही परिभाषा अचूकपणे मांडायची झाल्यास त्यातील राजकारण वजा करून जमणार नाही. ‘राजकारण’ हे फक्त पक्षीय किंवा राजसत्तेच्या पातळीवरच असतं असं नाही, तर ते कुटुंबात, दोन व्यक्तीतही असू शकतं, किंबहुना असतंच.

सत्ता आणि स्त्रीचं व्यक्ती म्हणून अस्तित्व, हा सहसंबंध लक्षात घेताना त्यातील राजकारणाच्या अनेक पैलूंच्या दृष्टीनं तो लक्षात घ्यावा लागेल. पण दुर्दैवानं आपण स्त्रीवादाच्या चष्म्यापलीकडे न जाता फक्त लिंगभावी दृष्टीनं हा सहसंबंध मांडू गेलो, तर केवळ अमूकतमूक स्त्रीवर अमूकतमूक पुरुसत्ताकांनी अन्याय-अत्याचार-शोषण केले, यापलीकडे त्यामागचे दुसरे अधिक व्यापक आणि डोळस कार्यकारणसंबंध आपल्याला कधीच दिसू शकणार नाहीत.

दोन व्यक्तींमधले सहसंबंध हे त्या एकमेकांना ‘साध्य’ मानतात की, ‘साधन’ यानुसार बदलते असतात, म्हणून ते कायम सापेक्ष स्वरूपात बघणं अधिक न्यायोचित ठरतं. त्याच दृष्टीकोनातून ‘स्त्री’ आणि ‘सत्ता’ या दोन घटकांत परस्परसंबंधावर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा घटक ‘सौंदर्य’ नेमकी काय भूमिका बजावतो, ही गोष्टसुद्धा तो संबंध भावनिक आहे की, विनिमय आहे, यावर अवलंबून असतो. याची भवतालातील अनेक उदाहरणं घेताना मला थेट निसर्गातली स्त्रीतत्त्वं प्राधान्यक्रमानं टिपावीशी वाटतात.

आकर्षक रंगांची फुलं आणि त्यातील मोहक स्त्रीकेसर; त्यांची फलनानुकूल रचना आणि वेधकता. विविधरंगी पिसारा फुलवून नाचणारा आणि मादी लांडोराला आकर्षित करणारा मोर. रंगीबेरंगी तुर्रे असलेले, तारस्वरातल्या आवाजांचे पुकारे करून मादीचं आवाहन करणारे वेगवेगळे पक्षी, पाखरं. शक्तीच्या जोरावर जंगलाच्या माद्यांना अंकित ठेवणारा वाघ आणि बलवान वाघालाच समर्पित होण्यात आपमर्जी मानणारी जंगलची वाघीण.

ही आणि अशी कित्येक उदाहरणं निसर्गानं आपल्या रोजच्या जैवव्यवहारातून दाखवून दिली आहेत. यातल्या सहजवर्तनातून काही आदिम प्रेरणा अधोरेखित होतात, त्या तशाच्या तशा मानवी वर्तनालाही लागू होताना दिसतात. पण सौंदर्यापुढे सत्ता आणि सत्तेपुढे सौंदर्य नमतं होताना, दरवेळी त्यात विनिमयच असतो, असं मात्र नसतं. म्हणून या संबंधाचा ‘मालक-गुलाम’ असाच एकमेव तर्क काढला जावा, असंही नसावं.

अनेकदा ती एक नैसर्गिक आवेगी कृती असू शकते. कधीकधी ती समर्पणाची निखळ प्रेमभावना असू शकते, तर कधी तो परस्पर समजुतीनं केलेला सशुद्ध तर्कसंमत राजनयिक व्यवहार असू शकतो. किंवा कधी कावेबाजपणे जाळ्यात पकडण्यासाठी रचून ठेवलेला मोह-सापळाही असू शकतो.

मात्र वरील सगळ्या कृती पुरुषामार्फत घडवून आणल्या जातात आणि बिचारी भाबडी अबला नारी दरवेळी त्यात सावज म्हणून अडकते व शोषणाला बळी पडते, अशी बाळबोध एकतर्फी भूमिका घेणं टाळून या सत्ताव्यवहाराकडे पाहता आलं तर हे स्पष्टपणे दिसून येईल, दरवेळी असंच असतं हा ठाम एकसमान निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. आपल्या पौराणिक परंपरा आणि ऐतिहासिक कथानकं यांचे दाखले घेतले तर हे समजून घेता येईल.

‘रामायण’-‘महाभारता’तील महत्त्वाची स्त्रीपात्रं, ज्यांनी सत्ताकारणावर आपल्या सौंदर्याचा प्रभाव टाकून मर्जीनुसार सगळा इतिहास अगदी एकशे ऐंशी अंशातूनच वळवून घेतला. ‘रामायणा’तली दशरथ पत्नी कैकयी किंवा ‘महाभारता’तली भीष्मप्रतिज्ञेला कारणीभूत ठरून अवघं महानाट्य घडायला निमित्त ठरलेली, आपल्या सौंदर्याच्या बळावर राजा शंतनूला वेडापिसा निर्णय घ्यायला भाग पाडणारी सत्यवती.

याखेरीज ययाती-देवयानी, दुष्यंत-शकुंतला, कृष्ण-रुक्मिणी अशी कितीतरी पौराणिक मिथकं सत्ता-सौंदर्याच्या परस्पर प्रभावाची उदाहरणं म्हणून घेता येतील. त्यातील बव्हंशी निरीक्षणातून असंच दिसतं की, दरवेळी स्त्रीचं अस्तित्व आणि अस्मिता बळी गेली असं नसून उलटपक्षी, बहुतांश वेळा स्त्रीनंच स्वतःच्या सत्ताकांक्षा वा काहीएक महत्त्वाकांक्षेपायी आपल्या सौंदर्याला एक आवाहककारक म्हणून प्रभाव टाकण्यासाठी कुटिलपणे वापरून घेतलं. तिच्या निर्णयाला आणि त्या निर्णयाच्या झालेल्या परिणामांना ती स्वतः जबाबदार होती.

प्राचीन व नजीकच्या इतिहासातील अनेक उदाहरणांत सत्ताविस्तारासाठी राज्याराज्यात सलोखा व मैत्रभाव वृद्धिंगत व्हावा म्हणूनही स्त्रीच्या सौंदर्याचा वापर राजनयिक धोरणाचाच एक भाग म्हणून वापरला गेला आहे. महत्त्वाच्या बलवान राजांनी आपसांत हेतूपूर्वक घडवून आणलेले लग्नसंबंध, हे उत्तम उदाहरण स्त्रीचा राजनैतिक धोरणातील वापर म्हणून देता येईल. अनेक धोरणी राजांनी मोठ्या मुत्सद्दीपणे या व्यवहाराला अंगिकारलं. मुस्लीम सम्राट अकबर आणि राजपूत कन्या जोधाबाई यांचा लग्नसंबंध केवळ स्त्री-पुरुष संबध नव्हता, तर तो इतिहासातील दोन परस्परभिन्न धर्म, संस्कृती, चालीरीती यांचाही लग्नसंबंध होता. शून्यातून स्वराज्य निर्माण करणारा हिंदवी साम्राज्याचा निर्माता राजा शिवछत्रपती यांचे एकाहून अधिक विवाह हेदेखील एका दूरदृष्टी राजनैतिक आराखड्याचाच भाग होते.

मग इतिहासातल्या या ठळक उदाहरणातील सत्तासंबंधातले स्त्रीचं स्थान ‘साध्य’ मानायचं की ‘साधन’?

भारतीय राजनीतीचा महागुरू मानल्या जाणाऱ्या कौटिल्याचं राजकारण सत्ता-स्त्री-सौंदर्य या पैलूंबाबत कसं समजून घ्यायचं? कारण कौटिल्याच्या राजनैतिक सिद्धान्तात इंद्रजाल, माया यांचा सर्रास पुरस्कार दिसून येतो. शत्रूच्या राजाला मोहजाळात अडकवण्यासाठी प्रसंगी स्त्रीच्या सौंदर्याचे मादक शस्त्र वापरावं, असं सांगणारा व त्यासाठी अनेक तरबेज सौंदर्यवती विषकन्यांची सैन्यफळी निर्माण करणारा आर्य चाणक्य सत्तासंपादनासाठी स्त्रीच्या सौंदर्याचा चपलख वापर ‘मीठी छुरी’ म्हणून करून घेतो. मग कौटिल्याच्या राजनयातल्या या मायाजालाला ‘राष्ट्रवाद’ म्हणायचं की, सत्ताकारणातलं स्त्रीचं शोषण म्हणायचं, पुन्हा हा मुद्दा सापेक्षतेकडे झुकणारा होतो.

अलीकडे ‘हनीट्रॅप’ या गोंडस नावानं प्रचलित झालेला मोहजालाचा प्रकारही इथं अनुषंग म्हणून लक्षात घ्यावा लागेल. उच्चपदस्थ अधिकारी, राजकारणी आणि महत्त्वाचे राष्ट्रप्रमुख यांच्याकडील गुप्त वार्ता काढून घेणं व त्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणात वापर करणं, यासाठी शत्रूराष्टाकडून विशिष्ट पद्धतीनं प्रशिक्षित केलेल्या सुंदर व आधुनिक स्त्रियांचा बेमालूम वापर केल्या गेल्याच्या काही घटना उघडकीला आल्या आहेत. उच्च तंत्रज्ञान, समाजमाध्यमांचा अतिरेकी वापर, वेगवान एकाकी जीवनातलं जीवघेणं वैफल्य आणि पैसा फेकून सुखं मिळवण्याची बेदरकार लालसा, यांमुळे असे ‘हनीट्रॅप’ आंतरराष्ट्रीय राजकारणातच नव्हे, तर सामान्य माणसाच्या उंबरठ्यापर्यंतही येऊन ठेपलेले दिसतात.

माणसाची उपभोक्ता वृत्ती स्त्रीच्या सौंदर्याकडे एक बाजारपेठ म्हणून बघत असेल आणि स्त्रीची स्वतःचीही यासाठी सहर्ष प्रस्तुतता असेल, तर या मानसिकतेला हेरून क्रय-विक्रयाचं एक नवं दालन आपल्याही नकळत आपल्यासमोर अजस्र रूपात उभं ठाकतंय, याची आत्मघातकी जाणीव होण्याची ही योग्य वेळ आहे.

‘दिसणं’ ही कच्ची सामग्री घेऊन बाईच्या सौंदर्याच्या भांडवलावर अर्थसत्तेची एक अवाढव्य बाजारपेठ पोसली जात आहे. ती जागतिक पटलावर कार्यरत असते, पण तिच्या उलाढाली ग्लोबल असूनही प्रभाव लोकलपर्यंत पाडतात. अजस्र गतीत भोवंडून गेलेल्या आणि प्रचंड भौतिकतेचे उच्चशिखर गाठलेल्या आजच्या आधुनिक माणसाच्या ‘वैफल्य आणि एकाकीपण’ या वैशिष्ट्यांची दुखरी नस या अर्थसत्तेनं हेरली आहे. जोडीला डिजिटल समाजमाध्यमांची बजबज गर्दी हाताशी घेऊन ही बाजारपेठ वरचेवर गलेलठ्ठ होत आहे.

हातातल्या मोबाईलच्या डबड्यावर रिकाम्या वेळेत मिनिटामिनिटाला कोट्यवधींची उलाढाल करणारे कितीतरी उद्योग निव्वळ स्त्रीचं दिसणं, चालणं, बोलणं, हसणं या कच्च्या सामग्रीवर चालवले जातात. कॉल-सेंटर्सवरून लोभस बोलणाऱ्या व लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या मुली, अनेक पॉर्न-साईट्स, आक्षेपार्ह वाटावेत, असे विकृत व्हिडिओज, कुठल्याच सेन्सॉरचा बडगा नसलेली अनिर्बंध ओटीटी माध्यमं, अशी केवळ हातभर स्क्रीनवर चालणारी ही अब्जावधींची इंडस्ट्री, आधुनिक अर्थसत्तेला उजळ माथ्यानं पोसणारी काळी बाजू म्हणता येईल. ही सगळी दुनियाच मोहाची आणि निसरड्या वाटेची, तिचा मार्ग स्त्रीच्या रंगा-कातडीवरून जाणाऱ्या मोहजालाचा!

स्वातंत्र्य, समता, न्यायासाठी शतकानुशतकं भांडणाऱ्या स्त्रीनं आज ती संवैधानिक मूल्यं कायद्यानं मिळवली आहेत, पण झगमगत्या बाजारपेठेच्या या गणितात तिचा फायदा होतोय की तोटा, हे समीकरण तिने एक व्यापारी म्हणून सोडवायचं की, स्वतंत्र बाण्याची व्यक्ती म्हणून, हे तिचं तिला आधी सुनिश्चित करावं लागेल.

आत्यंतिक व्यक्तिवादाकडे सातत्यानं जात राहणाऱ्या समाजासाठी सगळ्याच गोष्टी उपभोगाच्या पातळीवर गेल्यानं चीजवस्तूंप्रमाणेच सेवांचीही दुकानं आणि पेठा तयार झाल्या. वरूनवरून माणूस ग्लोबल दिसत असला तरी आतून तो अत्यंत व्यक्तिवादी आणि व्यक्तिनिष्ठ होत चालला आहे. प्राचीन आध्यात्मिक शिकवणीचा विसर पडून स्त्री व तिचं सौंदर्य या बाबींकडे मूल्यात्मक पातळीवरून पाहणं न घडता भांडवल म्हणून बघितलं जातंय.

बाईच्या सौंदर्याचा आणि नटण्यामुरडण्याचा गोड हेतू सांगणारं एक जुनं गाणं आठवतंय, ‘सजना हैं मुझे सजना के लिए...’ पण आताच्या सौंदर्याच्या बाजारपेठेतलं हे सजणं केवळ प्रियकरासाठी नसून नवे भांडवली ट्रेंड निर्माण करणं, त्यावर प्रभाव टाकणं, असे कॅलक्युलेटेड हेतू मनात धरून आखले जातायत. म्हणूनच सत्ता आणि सौंदर्याचा हा सहसंबंध फक्त लिंगभावी दृष्टिकोनातून न बघता आधुनिक अर्थकारणाचे सिद्धान्त लावून बघणं जास्त योग्य व वास्तववादी ठरेल.

राक्षसी अर्थसत्तेला भरभक्कम बनवणारा ‘सेक्स-सेल’चा एक नवाच व्यापारउदिम दबक्या पावलानं अत्यंत सोज्ज्वळ रूपड्यात आपल्यासमोर रोजच्या व्यवहारात पेश केला जातोय आणि आपल्या ते गावीही नाहीय. बाई स्वतःहून ‘सेक्स-ऑब्जेक्ट’च्या रूपानं या भुलाव्यात भक्ष्य म्हणून बळी पडतेय आणि त्याची तिला कल्पनाही नाहीय, किंवा असली तरी त्याबाबत तिची हरकत नाहीय. टीव्हीवर सर्रास दाखवल्या जाणाऱ्या साबणा, परफ्यूम, अंतर्वस्त्रं, गर्भनिरोधक साधनं यांच्या जाहिरातीत दाखवली जाणारी स्त्री या सेक्स-सेलच्या हायटेक आणि आधुनिक पेठेत स्वतःला ऑब्जेक्ट म्हणून प्रक्षेपित करताना वेडेवाकडे बीभत्स अंगविक्षेप करते, तेव्हा ती स्वतःच्या देहाचा बाजारपेठेत जाहिरातदार म्हणून उघडउघड वापर करत असते. बाजारपेठेची ही खेळी बाईच्या वस्तूकरणात केव्हाच यशस्वी ठरली आहे आणि बाईची याला तथाकथित स्त्रीचं अस्तित्व-अस्मिता वगैरे म्हणून कुठेच हरकत दिसत नाही, हे अधिक खेदजनक आहे.

‘स्कीन-करन्सी’सारखे फॅक्टर्स कार्पोरेट जगतात अनेक वरचे लाभ पदरात पाडून घेताना गुणवत्तेला पूरक पर्याय म्हणून प्रभाव टाकताना दिसतात. हॉलिवुड-बॉलिवुडच्या चंदेरी दूनियेपासून ते छोट्या पडद्यावरच्या हंगामी रिॲलिटी शोपर्यंत दबक्या आवाजात चर्चिली जाणारी ‘कास्टिंग-काऊच’सारखी ओंगळ परिभाषा जेव्हा परवलीची व्हायला लागते, तेव्हा सत्तेच्या पायघड्या सौंदर्याच्या बाजारपेठेतून किंमत वसूल करूनच जातात, असं नाइलाजानं म्हणावं लागणारं लाजीरवाणं वास्तव समोर दिसतं. स्त्री स्वतःही स्वतःचं सामर्थ्यस्थळ म्हणून आपल्या सौंदर्याला बाजारपेठेत मांडत असेल, तर या आधुनिक ट्रेंडला कोणता सिद्धान्त लागू करायचा हा प्रश्न पडतो? 

स्त्रीवादी चळवळींच्या चष्म्यातून हा प्रश्न हाताळायचा झाला, तर परस्पर-विसंगती आणि उपरोधच दिसून येण्याची शक्यता जास्त आहे. कारण पाश्चात्य फेमिनिझमचं वारं हेरून भारतीय स्त्रीच्या प्रश्नांची सोडवणूक करू म्हटलं, तर ते शक्य नाही, मागील अनेक दशकांपासून याचा प्रत्यय दिसतोच. आत्यंतिक व्यक्तिवादी आणि भौतिकवादी असणारा पाश्चात्य स्त्रीवाद जेव्हा ‘माय बॉडी, माय चॉईस’सारखे लोभस अजेंडे पुढ्यात मांडून स्त्री-देहाचं विनिमयमूल्य मोबदला म्हणून घेणं काहीच गैर नाही, अशी मागणी करतो, तेव्हा आपल्या भारतीय स्त्रीसमोरचे प्रश्न वेगळे असतात. किंवा बाईच्या श्रमाचे चलनी मूल्य लागू करण्याची मागणी करणारा ‘मार्किस्ट-फेमिनिझम’ इथल्या अहोरात्र कष्टणाऱ्या सेवाभावी आईला वा गृहिणीला लागू करू म्हणलं, तरी त्या आपल्या समर्पणाचं विक्रयमूल्य स्वीकारतील का हाही प्रश्नचंय.

याउलट ‘मार्क्सवादी फेमिनिझम’चा आणि ‘माय बॉडी, माय चॉईस’चा प्रभाव डोक्यात घेऊन जर आधुनिक स्त्रिया आपलं ‘सौंदर्य’ केवळ एक विनिमयाचं साधन मानत असतील किंवा आधुनिक बाजारपेठ त्यांना तसं करण्याची प्रलोभनं देत असेल व हा सत्तेचा राजमार्ग हेरण्याचा मूख्य प्रघात ठरू पाहत असेल तर तेव्हा, स्त्री स्वतःला ‘साध्य’ नाही, तर ‘साधन’ मानत आहे, असं मानून लिंगभावी विषमतेविरुद्ध लढा देणाऱ्या आणि स्वातंत्र्य, समता, बंधूता व स्त्रीची तथाकथित अस्मिता व अस्तित्व वगैरे सगळेच मुद्दे इथं गैरलागू होण्याची अवमानजन्य परिस्थिती उद्भवली आहे, असंच म्हणावं लागेल.

मुळात आपल्या मातीतल्या, गावगाड्यातल्या बाईचे प्रश्न आणि तिच्या जगण्याची निकड खूप वेगळी आहे, तिच्यापुढे असणारा भुकेचा प्रश्नच आजच्या स्वातंत्र्योत्तर भारतातही एवढा मोठा आहे की, तिला तिचं सौंदर्य आरशात बघायला फुरसत नाही. सत्ताकारणाची सगळी गणितं तिच्या दुरडीतल्या गोल भाकरीपुढं तिला दिसेनाशी होतात.

वीज, रस्ते आणि पाण्याचे मूलभूत प्रश्न आजही तिच्या नाकी नऊ आणतात. अशा स्थितीत गावगाड्यातल्या बाईच्या उन्हात रापलेल्या कातडीचं सौंदर्य तिला सत्तेच्या शिड्या चढायला कसं पूरक अथवा मारक ठरेल, हा प्रश्नच मला बिनमहत्त्वाचा वाटतो.

सौंदर्य कातडीच्या रंगावर, डोळ्यांच्या मादकतेवर अथवा लैंगिक-आवाहकतेवर अवलंबून नसतं, तर कालातीत सौंदर्य कर्तृत्व, पराक्रम, बुद्धी व मनाचा नितळपणा या चिरंतन गुणांवर अवलंबून असतं. हे विधान केवळ आदर्शवादी सुभाषित नाही, तर ते सार्वभौम मानवीय सत्य आहे.

जिजाऊसारखी एखादी युग-स्त्री आपल्या बाणेदारपणानं स्वराज्याची जननी होत शिवबा घडवते, तेव्हा निश्चितच ती सत्तेला केवळ प्रभावितच नव्हे, तर सत्तेचं निर्माण करणारी महान सौंदर्यवती असते. तेव्हा स्त्री म्हणून तिचं सौंदर्य तिच्या परिपूर्ण सक्षम आईपणात असतं. साने गुरुजींना घडवणारी ‘श्यामची आई’ सत्तेला एक सुकोमल वैचारिक अधिष्ठान देणारी स्त्री बनते. सावित्रीबाई फुलेंचं काम तर परंपरागत आंधळ्या सत्तेला उधळून लावून अनेक डोळस पिढ्या घडवणारं सामर्थ्य असणारं आहे. तेव्हा या स्त्रियांचं सौंदर्य त्यांच्या रंगात वा कातडीत पहायचं नसतं, तर ते त्यांच्या अचाट धाडसात, परिवर्तनवादी विचारात आणि काळाच्या कितीतरी पुढं बघण्याच्या दूरदर्शीपणात बघायचं असतं. ते खरं वंदनीय सामर्थ्य. सत्ता झुकवणारं, सत्तेला सुयोग्य वळण देणारं आणि सत्तानिर्माण करणारं अतुलनीय स्त्री-सौंदर्य!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

शिवाय या सगळ्या चर्चेला ओलांडून ‘सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं’ हाही मुद्दा आहेच.(‘दिल आ गया गधी पे, तो परी क्या चीज है?’ अशी विनोदी कोटी त्याचा प्रत्यय देतेच.) तसंच बघायला गेलं तर सौंदर्य आणि सत्ता या दोन्ही बाबी व्यक्तीच्या मनाच्या स्थिती आहेत. व्यक्तीच्या मनाच्या धारणा पुरेशा प्रशिक्षित व संस्कारक्षम असणं ही त्याची पूर्वअट असते. ‘समर्पण’ ही एकच गोष्ट सत्तेला व सौंदर्याला शस्त्राविना अंकित करायला भाग पाडू शकते. आंतरिक प्रेमाची ती गहन स्थिती सगळे भौतिक व्यवहार ओलांडून जाणारी निरपेक्ष आहे, खरं तर ती एकाच वेळी आत्म्याची एकात्मता आहे आणि मुक्तताही आहे... आणि त्या टप्प्यावर कुठलीच सत्ता चालत नाही!

(‘आकांक्षा’ दिवाळी २०२१मधून साभार)

.................................................................................................................................................................

सुचिता खल्लाळ, नांदेड

suchitakhallal@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......