इतिहासलेखनशास्त्रातील प्रवाहांबाबतच्या नागपूर विद्यापीठातील चर्चासत्राच्या निमित्तानं ‘इतिहास, साहित्य आणि स्त्रियांचं जगणं’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी केलेलं हे भाषण...
..................................................................................................................................................................
स्त्रीवादाची सैद्धान्तिक मांडणी करण्यासाठी लागणारी गंभीर सैद्धान्तिक अभ्यासाची बैठक माझ्याजवळ नसल्याचं मी सुरुवातीलाच कबूल करते. तरीही माझ्या पद्धतीशास्त्रीय आणि सैद्धान्तिक मर्यादा मान्य करून असं म्हणता येईल की, वेगवेगळ्या कालखंडातलं साहित्य अभ्यासल्यामुळे एका साच्यामध्ये घातल्यासारखं स्त्रियांचं जे चित्रण अनेकदा केलं जातं, त्याला छेद देणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रिया वाचनामध्ये दिसत गेल्या. त्यांच्याबद्दल बोलावं असं वाटलं. तेच तुमच्यासमोर मांडते.
भारतातल्या उपलब्ध साहित्यामधलं सर्वांत जुनं साहित्य म्हणजे वेदांमधली सूक्तं. साधारणपणे इ.स. पू. दुसऱ्या सहस्त्रकामध्ये (१९०० ते १५००) ‘ऋग्वेद’ या नावानं अनेक कवितांचं म्हणजे सूक्तांचं संकलन केलं गेलं. त्यातील अनेक सूक्तांमध्ये स्त्रियांचं चित्रण आहे. स्त्रिया सूक्तांमध्ये बोलतात आणि किंवा काही सूक्तांच्या त्या रचनाकारसुद्धा आहेत. वेदातली काही सूक्तं स्त्रीदेवतांना उद्देशून रचलेली आहेत. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलामध्ये पणी आणि सरमा यांच्यामधलं संवाद-सूक्त आहे. सरमा ही इंद्र, बृहस्पती, अंगीरस अशा पशुपालक योद्ध्यांच्या समूहामध्ये काम करणारी दूती म्हणजे जासूद-संदेशवाहक आहे. तिला पणी नावाच्या शत्रूंच्या टोळीशी बोलणी करायला पाठवलं गेलं आहे. “तुम्ही आमची गाई-गुरं पळवून नेलेली आहेत, ती ताबडतोब परत करा. नाहीतर युद्धाला तयार व्हा,” असा धमकीवजा निरोप कळवायची मुत्सद्दी स्वरूपाची कामगिरी तिच्यावर सोपवलेली आहे. पणी लोक सरमेला म्हणतात, “अगं, रसा नावाच्या नदीच्या लांब पलीकडे आमची वस्ती आहे आणि तू आलीसच कशी इथं?” सरमा म्हणते “मला इंद्रानं आणि बृहस्पतीनं पाठवलं आहे आणि तुम्ही आमच्या गाई ताबडतोब परत करा.” पणी तिला गर्भित धमकी देत म्हणतात, “आमची शस्त्रं धारदार आहेत बरं का! अस्माकम् आयुधा सन्ति तिग्मा:|” सरमा म्हणते, “असू देत. तुम्ही काहीही सांगितलं तरी तुम्ही जे बोलताय त्याला तुमच्या मागे सैन्याचं काही बळ नाही. त्यामुळे तुमच्या बोलण्याला काही वजन नाही आणि आमचा बृहस्पती तुम्हाला काही दया दाखवणार नाही. असेन्या व: पणयो वचांसि... बृहस्पति: व: उभया न मृळात्|| त्यामुळे ताबडतोब तुम्ही आमच्या गाई परत करा.” मग पणी लोक पवित्रा बदलतात, “तुला आम्ही बहीण मानतो. जाऊ नको. इथेच थांब. स्वसारं त्वा कृणवै मा पुनर्गा... आम्ही तुला या सगळ्या गाईंची मालकीण करतो. तू आमची बहीण म्हणून राहा.” यावर सरमा एकदम थंडपणे म्हणते की, “नाहं वेद भ्रातृत्वं नो स्वसृत्वं| बहीण नि भाऊ- मला काही माहीत नाही. ताबडतोब आमच्या गाई-गुरं परत करा. नाहीतर तुम्हाला बृहस्पती आणि इंद्र इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.”
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
हा धमकीचा संवाद मुद्दामच सुरुवातीला घेऊन मला असं सांगायचं आहे की, साहित्यामधून दिसणारं स्त्रीच्या जगण्याचं चित्रण पूर्वापार एकसाची पद्धतीनं झालेलं नाही. सरमा अत्यंत कार्यकुशल आहे. तिला स्वतःचं कार्यक्षेत्र आहे आणि त्यात पराक्रम गाजवण्यासाठी पूर्णपणे तयारीनिशी ती काम करते आहे. आपल्या मनामध्ये आज एकविसाव्या शतकात प्रामुख्यानं स्त्रीच्या वागण्याबद्दल काही विशिष्ट साचे निर्माण झालेले आहेत, ते कायमचे नाहीत. आपल्याला सांगितलं जातं की, पुरातन काळामध्ये स्त्रियांना मुलंबाळं सांभाळण्यासाठी गुहेमध्ये राहावं लागत होतं आणि पुरुष शिकारीसाठी बाहेर पडत. त्यातून श्रमाची विभागणी झाली. हे अगदी स्पष्टपणे खोटं ठरवणारं हे सूक्त आहे. स्त्रिया वेगवेगळ्या कामानिमित्त घराबाहेर जात होत्या. अत्यंत पराक्रमीपणानं, भावनांच्या ओघामध्ये भांबावून न जाता जबाबदाऱ्या पार पाडत होत्या. हे ऋग्वेदातल्या पणी आणि सरमा यांच्या संवादसूक्तातून स्वच्छपणे दिसतं.
ऋग्वेदानंतर कालांतरानं ‘अथर्ववेदा’तली बहुतांश सूक्तं रचलेली आहेत. त्याच्यामध्ये दुंदुभी-सूक्त नावाचं सूक्त आहे. हे दुंदुभी देवतेलाच अनुलक्षून रचलेलं सूक्त आहे. लढाईच्या सुरुवातीला जे नगारे वाजवले जातात, त्यांना दुंदुभी असं नाव आहे. स्त्रियांबद्दल असणाऱ्या एका घातक दृष्टीकोनाची पाळंमुळं या सूक्तापर्यंत पोचलेली दिसतात, म्हणून हे मला महत्त्वाचं वाटतं. संघर्ष कोणत्याही समूहांमध्ये होऊ देत, संबंधित स्त्रियांना शिक्षा झाली पाहिजे, हा तो घातक दृष्टिकोन आहे. म्हणजे आपल्याला जर शत्रूला काही हानी पोहोचवायची असेल, तर त्यांच्या स्त्रियांना हानी पोहोचवणं हे शत्रूंना हानी पोहोचवण्यासारखंच आहे. युद्ध कोणाही मध्ये झालं तरी युद्धाची रणभूमी बहुधा स्त्रिया असतात, हे वेगवेगळ्या स्त्रीवादी अभ्यासांमधून दिसलेलं तत्त्व आहे. त्याची अभिव्यक्ती दुंदुभी-सूक्तामध्ये आपल्याला स्पष्ट दिसते. त्यात असं म्हटलं आहे -
दुन्दुभेर्वाचं प्रयतां वदन्तीमाशृण्वती नाथिता घोषबुद्धा|
नारी पुत्रं धावतु हस्तगृह्यामित्री भीता समरे वधानाम् ||
दुन्दुभीचा सुस्पष्ट आवाज ऐकून भेदरलेली, युद्धामध्ये मारल्या गेलेल्यांची एकाकी स्त्री मुलाचा हात हातात घेऊन धावायला हवी.
शत्रूबद्दल वाईट इच्छा बाळगणं आपण समजू शकतो. पण त्यांच्या स्त्रिया आणि त्यांच्या लहान मुलांपर्यंत या दुष्ट इच्छेचे आविष्कार पोहोचलेले आपल्याला दिसतात. अर्थात युद्ध म्हटलं की, आपल्याला माहीत असतं, त्याच्यामध्ये काही दयामाया नसते. जसं या बाजूचे लोक शत्रूच्या वाईटाची इच्छा करतात, तसेच तिकडच्याही लोकांनी त्यांच्या वाईटाची इच्छा केलीच असणार.
मुद्दा असा आहे की, संघर्ष होतो तेव्हा स्त्रिया युद्धाची रणभूमी बनत असतात. मग त्यांच्यावर अत्याचार घडत राहतात. आणि साडेतीन हजार वर्षांपूर्वीसुद्धा हा दृष्टीकोन समाजात होता, हे आपल्याला दिसून येतं. ‘अथर्ववेदा’मध्येच इतरत्र आपल्याला स्त्रियांचं स्थान काय होतं याचे विविध पुरावे दिसतात. ‘सपत्नी नाशन-सूक्ता’मध्ये सवतीचा नाश व्हावा यासाठी स्त्रीच प्रयत्न करते. मी अमुक-अमुक वनस्पतीची प्रार्थना करते, जेणेकरून माझ्या सवतीचा नाश होईल आणि पतीचं पूर्णतः लक्ष माझ्याकडे वळेल, अशी प्रार्थना ती करताना दिसते. स्त्रीचं स्थान दुय्यम होण्याच्या प्रवासानं इथं वेग घेतलेला दिसतो.
तसा काही वेळेला तिला ब्रह्मवादिनी म्हणून तिचा गौरवही केलेला आपल्याला दिसतो. जसं की. इ.स.पूर्व ७०० या कालखंडामध्ये रचलेलं ‘बृहदारण्यक’ नावाचं उपनिषद आहे. त्यामध्ये याज्ञवल्क्याच्या मैत्रेयी आणि कात्यायनी या दोन पत्नींची गोष्ट सांगितली आहे. याज्ञवल्क्याच्या या दोन पत्नीमध्ये मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी स्त्री होती, पण ‘स्त्रीप्रज्ञैव तर्हि कात्यायनी|’, कात्यायनीला मात्र बायकांना असते तितपतच बुद्धी होती’. म्हणजेच फार विशेष काही बुद्धी नव्हती असा उल्लेख या कथेत सुरुवातीलाच आहे. जसा ब्रह्मवादिनी मैत्रेयीबद्दल कौतुकाचा भाव आहे, त्याच्यासोबतच या म्हणण्यामध्ये अनुस्यूत असलेला सामान्य स्त्रीबाबतचा तुच्छताभावदेखील मला नोंद घ्यावासा वाटतो.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
याच उपनिषदामध्ये एका स्पर्धेची गोष्ट येते. याज्ञवल्क्यांना अनेक जण आव्हान देतात की, तुमच्यापेक्षा आम्हांला जास्त माहीत आहे. त्यामुळे अनेक गाईंचं हे बक्षीस आम्हाला मिळालं पाहिजे. मात्र याज्ञवल्क्य या आव्हान देणाऱ्यांना वादामध्ये हरवतात अशी गोष्ट या उपनिषदामध्ये सांगितली आहे. अनेकांची आव्हानं संपुष्टात आल्यानंतर गार्गी याज्ञवल्क्यांना आव्हान देते. ती इतके प्रश्न विचारते की, पुढे याज्ञवल्क्य तिला म्हणतात, “गार्गी, जास्त प्रश्न विचारू नकोस. ‘गार्गि माsतिप्राक्षिः, मा ते मूर्धा व्यपप्तत्|’ तुझं डोकं जागेवर राहू दे. ज्या देवतांबद्दल जास्त प्रश्न विचारू नयेत, त्यांच्याबद्दल तू जास्त प्रश्न विचारतेयस. जास्त प्रश्न विचारू नकोस.” तसं पाहिलं तर याज्ञवल्क्य हे सर्वच आव्हान देणाऱ्यांना पराभूत करतात. तसंच गार्गीलादेखील त्यांनी वादात पराभूत केलं आहे. त्यामुळे गार्गी स्त्री असूनही इतरांसारखंच याज्ञवल्क्याला आव्हान देते, यात कुणाला समानता दिसू शकेल. पण याज्ञवल्क्य ती स्पर्धा जिंकले इतकं हे साधं कथानक नाही.
इथे मुद्दा असा की, याज्ञवल्क्य गार्गीचा अपमान करताना दिसून येतात. त्या उपनिषदामध्ये आलेली कथा काळजीपूर्वक पाहिली की, ते एकट्या गार्गीशीच असं बोलत आहेत की, इतरांशी पण ते असंच बोलतात? तर माझ्या असं लक्षात आलं इतर जे-जे पुरुष आव्हानवीर आहेत, याज्ञवल्क्य त्यांच्या बाबतीत अशी भाषा वापरत नाहीत. गार्गीला मात्र जास्त प्रश्न विचारलेस तर डोकं उडवलं जाईल, अशा स्वरूपाची धमकी देऊन ते तिला गप्प करताना आपल्याला दिसतात.
यावरून कुणी असं मानू नये की, प्राचीन भारतात सततच स्त्रियांना असं कोणी वाईट वागवतंय किंवा त्यांच्या क्षमतांचा परिपोष करण्यावर कायमची बंधनं आहेत. उदाहरणार्थ, गार्गीच्या कथेच्या थोड्याशा पुढच्या काळामध्ये गौतम बुद्धांच्या शिष्या असणाऱ्या स्त्रियांनी रचलेल्या ‘थेरीगाथा’मध्ये असा श्लोक येतो-
‘तिस्से सिक्खस्सु सिक्खाय, मा तं योगा उपच्चगुं।
सब्बयोगविसंयुत्ता, चर लोके अनासवा ।।’
(तिस्से, तुला जितकं शिकायचं तेवढ शिकत रहा. तू शिकण्यापासून लांब जाऊ नकोस. इथेच रहा. शिक्षणापाशी जोडलेली राहा. तुला जी काही जखडून ठेवणारी बंधनं आहेत, त्यांच्यापासून तू दूर जा. तुला कोणीही बेड्या घालणार नाही. तुला पाहिजे तसं स्वच्छंदी राहा.)
आजही स्त्रियांना घराबाहेर पडण्यावर बंधनं असतात. त्यांच्या बोलण्यावर वचक असतो. त्यांच्या निवडीवर मर्यादा असतात. असं असताना दोन सव्वादोन हजार वर्षांपूर्वी या थेरीगाथेमध्ये इतकं सुंदर मोकळिकीचं वातावरण देणारा जो गौतम बुद्धांचा विचार आहे, तो मला अगदी लक्षणीय वाटतो. आणि पुढील काळामध्ये भारतीयांच्या आचार-विचारांमध्ये त्याचे पडसादही उमटताना दिसतात.
..................................................................................................................................................................
मिशेल फूको या तत्त्वज्ञानं लिहिलेल्या ‘समाजाला वाचवलंच पाहिजे’ नावाच्या पुस्तकात असं सांगितलंय की, ‘सत्ताधीशांच्या थोरवीवर प्रकाशझोत टाकून जनतेच्या नजरा दिपवणं हा इतिहासाचा एक उद्देश असतो. पण त्यामुळे झोताबाहेर राहणाऱ्यांचं म्हणणं जनतेला दिसत नाही. अशा वेळी ‘काउंटरहिस्टरी’ (प्रतिइतिहास) लिहून जनता दाखवून देते की, ‘डोळे दिपवणारा भूतकाळ आमच्या पाठीशी नसेल, तरीही आम्ही काळोखातून बाहेर येऊन आमची कहाणी आणि आमचा इतिहास सांगत आहोत.’
.................................................................................................................................................................
यानंतर मला विचार करावासा वाटतो, ते उदाहरण म्हणजे इसवी सनाच्या चौथ्या पाचव्या शतकामध्ये रचलेलं कालिदासाचं ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ नावाच्या नाटकाचा. त्याच्या पाचव्या अंकांमध्ये आलेला एक श्लोक मला फार महत्त्वाचा वाटतो. कथा अशी आहे की, शकुंतला वडिलांच्या आश्रमामध्ये राहत असताना तिथं वाट चुकून आलेला दुष्यंत राजा तिच्यासोबत गांधर्वविवाह करतो. काही काळानं राजा आपल्या राजधानीला परततो. तिकडून शकुंतलेला सासरी नेण्यासाठी माणसं पाठवण्याचं वचन त्यानं दिलेलं असतं. गर्भवती शकुंतलेला न्यायला कुणीतरी येईल अशी वाट पाहून शेवटी तिचे वडील आपले दोन शिष्य सोबत देऊन शकुंतलेला सासरी पाठवून देतात. राजानं शकुंतलेला आपली एक अंगठी दिलेली असते, परंतु विरहामुळे कृश झालेल्या शकुंतलेच्या बोटातून ती अंगठी नदीच्या प्रवाहात वाहून जाते. राजाच्या दरबारी आल्यावर एका शापामुळे स्मृतिभ्रंश झालेला राजा शकुंतलेला ओळख द्यायचं साफ नाकारतो. अंगठी नसल्यामुळे राजाला तिचं अभिज्ञान करणं, तिला ओळखणं अशक्य होऊन बसतं. ‘बाई मी तुम्हाला ओळखत नाही’ असं राजा स्पष्टपणे सांगतो. शकुंतला संतापते, पण तिला काही बोलू न देता तिची पाठवणी करण्यासाठी आलेला शिष्य म्हणतो,
तदेषा भवत: कान्ता त्यज वैना गृहाण वा| उपपन्ना हि दारेषु प्रभुता सर्वतोमुखी ||
(राजा, ही तुझी बायको आहे. तिला स्वीकार, नाहीतर तिचा त्याग कर. पत्नीवर हक्क हा पतीचाच असतो, हे सगळ्यांनाच माहीत आहे.)
तेव्हा तुला काय करायचं ते कर, मी चाललो असं म्हणून तो शकुंतलेला दरबारात सोडून निघून जातो. मुद्दा असा की, स्त्रीचं भवितव्य ठरवण्याची, तिच्याबद्दल काही निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा अनेकदा असं होतं की, तिला बोलण्याचं काही बळच राहत नाही, असं अनेकदा आपल्याला साहित्यामध्ये दिसतं. खरं तर तो प्रश्न त्या स्त्रीचा होता, पण तिच्या वतीनं बोलणारे वेगळेच लोक होते. आपले वैयक्तिक निर्णय घेण्याचीसुद्धा शक्यता आणि मुभा स्त्रियांना अनेकदा मिळत नाही. त्यातलं हे उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येईल.
बऱ्याचदा आपल्याला असं सांगितलं जातं की, मध्ययुगीन काळामध्ये स्त्रियांचं सामाजिक स्थान हे ढासळलं होतं. त्यात कितपत तथ्य आहे, हे साहित्यामध्ये शोधता येतं. इसवी सनाच्या आठव्या शतकात मंडन मिश्र आणि शंकराचार्य यांच्यामध्ये वेदान्ताविषयीचा, धर्माबद्दलचा जो वाद झाला, तेव्हा मंडन मिश्रांची पत्नी उभयभारती हिला परीक्षक म्हणून नेमलं होतं, असे आपल्याला उल्लेख आढळतात. सांगायचं कारण असं की, तटस्थ परीक्षक म्हणून आपण जेव्हा कोणाला नेमतो, तेव्हा ती व्यक्ती या विषयामधली तज्ज्ञ आहे हे गृहीत धरलेलं असतं. इथं तिचं स्त्री असणं किंवा तिचं मंडन मिश्राची पत्नी असणं हेसुद्धा आड आलं नाही. शंकराचार्य म्हणू शकले असते की, ही आत्मीयतेमुळे तुमच्या बाजूनं निर्णय देईल. पण तसं न करता तिचं तटस्थत्व आणि तज्ज्ञपणा हे दोन्ही बाजूंनी मान्य केलेलं आपल्याला दिसतं. ही त्या वेदांमधल्या सरमेसोबत नातं सांगणारी कर्तबगार स्त्री असावी असं वाटतं. तिला आपलं स्त्रीत्व आणि आपल्याकडून समाजाच्या असणाऱ्या अपेक्षा, यामुळे काही अटकाव जाणवत नाही. या दोघांमध्ये जो काही वाद होईल, त्या विषयाची मी तज्ज्ञ आहे आणि त्या विषयांमध्ये तुम्हाला योग्य ते प्रश्न विचारणं आणि योग्य तो निकाल देणं करेन असा विश्वास उभय भारतीला आहे.
दुसरं उदाहरण मला द्यावंसं वाटते, ते ‘हुमायूननामा’ नावाचा ग्रंथ लिहिणारी लेखिका गुलबदन बेगमचं. सम्राट अकबरानं केलेल्या विनंतीवरून तिने सतराव्या शतकामध्ये हे सुंदर पुस्तक लिहिलं. यात हुमायूनच्या जीवनाची आणि थोडी अगोदरची व नंतरची थोडी गोष्ट आलेली आहे. मोगलांच्या खानदानामध्ये सारं आयुष्य गेलेलं असतानाही तिला हे गतकाळाबद्दलचं कथन करताना तिचं स्त्रीत्व, तिचा धर्म, तिचं सामाजिक स्थान किंवा जनापवादाची भीती आड आलेली आपल्याला दिसत नाही.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
या दोन उदाहरणांवरून मध्ययुगामध्ये स्त्रियांचं स्थान हे दुय्यम नव्हतं किंवा त्यांना आपल्या क्षमतांचा विकास सहजपणे करता येत होता, असं म्हणता येत नाही. पण म्हणून तोवर सगळं छान होतं आणि याच काळामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जाण्याची सुरुवात झाली असं मला वाटत नाही. तर भारतीय इतिहासाच्या सर्वच कालखंडांमध्ये हा सत्तासंघर्ष असल्याचं दिसतं, असं माझं मत आहे. काही उदाहरणं मोकळिकीची मिळतात, काहींमध्ये शृंखलांनी जखडण्याचे प्रयत्न दिसतात.
महाराष्ट्राच्या इतिहासाकडे पाहिलं तर तेराव्या शतकामध्ये महानुभाव पंथानं जी वैचारिक घुसळण केली, त्यातून निर्माण झालेल्या महानुभाव वाङ्मयामध्ये महदंबा किंवा महदाइसा नावाची अनन्यसाधारण विचारवती आपल्याला भेटते. तिने निर्माण केलेल्या रचना ‘महदंबेचे धवळे’ या नावाने प्रसिद्ध आहेत. आज दुर्दैवानं तिच्या रचना म्हणाव्या तशा काही आपल्याला सापडत नाहीत. परंतु महानुभव वाङ्मयामध्ये तिचा उल्लेख जागोजागी आढळतो. स्वतः स्वामी चक्रधर तिच्याबद्दल म्हणतात, “म्हातारी चर्चक: म्हातारी विसासक: एथ निरंतर काहीतरी पुसतचि असे:”. महदंबा ही सतत वाद घालणारी, प्रश्न विचारणारी, सतत चर्चा करणारी, अशी म्हातारी म्हणजे ज्येष्ठ स्त्री आहे, असं चक्रधर स्वामी म्हणतात.
इथं आपण कदाचित त्या सतत प्रश्न विचारणार्या गार्गीसोबत हिचा काही वैचारिक धागा जुळलेला आहे का, असं पाहू शकतो. गार्गीने प्रश्न विचारले, तेव्हा तिला ‘मा ते मूर्धा व्यपप्तत्|’ अशी धमकी दिली गेली आणि इथं मात्र चक्रधर स्वामींना कौतुक वाटतंय की, ही विचक्षण अशी बाई आहे. प्रश्न विचारण्याची मोकळीक असणं, ही आधुनिकतेच्या पूर्वअटींपैकी एक महत्त्वाची अट आपल्याला इथं काहीशी पूर्ण होताना दिसते.
अशा विशिष्ट उदाहरणांमुळे स्त्रियांसाठी अत्यंत मोकळीकीचं वातावरण होतं असं मुळीच सांगता येणार नाही. ‘स्वात्मसुख’ नावाची संत एकनाथांची एक सोळाव्या शतकामधली रचना आहे. ते म्हणतात,
‘जैशी चोराची माये | प्रगट रडों न लाहे | परी आंतुच्या आंतु होये | उकसबुकशी ||’
चोराच्या आईला आपल्या मुलानं चोरी केली हे कळलं की तिचा जो कोंडमारा होतो, त्यासाठी एकनाथांनी ‘उकसबुकशी’ अशी असा शब्द वापरला आहे. असं वाटतं की, स्त्रीच्या कुचंबणेसाठी अतिशय समर्पक असा हा शब्द आहे आणि त्याचं यथार्थ वर्णन एकनाथांनी इथं दृष्टान्त देताना केलेलं दिसतं. अशी कुचंबणा होत असतानाही चिवटपणे त्यातून वाट काढण्याचे प्रयत्न स्त्रिया करत राहतात. त्याच्या नोंदी आपल्याला साहित्यामधून दिसत राहतात.
उदाहरणार्थ तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई यांनी शिवकाळामध्ये म्हणजे सतराव्या शतकामध्ये वज्रसूची उपनिषदावर स्वतःचं भाष्य मांडलेलं दिसतं. ब्राह्मणत्व नक्की कशावरून ठरते, याची चर्चा करतानाच विवेक वापरला पाहिजे, असा विचार त्या मांडतात. जीव, देह, जाती, वर्ण, कर्म आणि धर्म असे निकष त्या लावून दाखवतात. एखादा देह ब्राह्मणासारखा दिसतोय म्हणून त्याला ब्राह्मण म्हणायचं का? किंवा ठराविक जातीत जन्माला आला आहे म्हणून त्याला ब्राह्मण म्हणायचं का? तो स्नान संध्या करतो म्हणून त्याला ब्राम्हण म्हणावं का? असे सगळे निकष लावत लावत शेवटी त्या सांगतात,
‘ब्राह्मण कोणास म्हणावे निश्चित। पहावा हा अर्थ विवेकेंची।।’
..................................................................................................................................................................
केवळ लिखितच नव्हे तर मौखिक साहित्यातूनही आपल्याला स्त्रियांच्या जगण्याचे वेगवेगळे आयाम समजू शकतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अश्विन महिन्यातलं नवरात्र जेव्हा असतं, तेव्हा मुली, बायका रिंगण करून गाणी म्हणत असत. मध्यात एक हत्तीची प्रतिमा ठेवलेली असे. त्याला हादगा, भोंडला, भुलाबाई अशी वेगवेगळी नावं आहेत. तर त्या गाण्यांपैकी एक गाणं आहे.
.................................................................................................................................................................
चांगलं आणि वाईट; खरं आणि खोटं; योग्य आणि अयोग्य यांत फरक करण्याची जी बुद्धी असते, तिला विवेक असं म्हणतात. विवेकबुद्धीचा वापर करून मग ब्राह्मण कोण हे ठरवायला पाहिजे, असं बहिणाबाई सांगतात. मुद्दा असा की, बहिणाबाईंना सतराव्या शतकामध्ये वज्रसूची नावाच्या उपनिषदांविषयी माहिती होतं. त्याच्यावर त्यावर त्यांनी भाष्य केलं. असे प्राप्त परिस्थितीमधून वाट काढत जगण्याचा अर्थ लावण्याचे प्रयत्न स्त्रिया करताना दिसतात. त्याचे दाखले आपल्याला साहित्यामधून मिळतात.
केवळ लिखितच नव्हे तर मौखिक साहित्यातूनही आपल्याला स्त्रियांच्या जगण्याचे वेगवेगळे आयाम समजू शकतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अश्विन महिन्यातलं नवरात्र जेव्हा असतं, तेव्हा मुली, बायका रिंगण करून गाणी म्हणत असत. मध्यात एक हत्तीची प्रतिमा ठेवलेली असे. त्याला हादगा, भोंडला, भुलाबाई अशी वेगवेगळी नावं आहेत. तर त्या गाण्यांपैकी एक गाणं आहे. सासू म्हणते- ‘कारल्याचा वेल लाव गं सुने, मग जा आपुल्या माहेरा’ सून म्हणते- ‘कारल्याचा वेल लावला हो सासूबाई, आता तरी जाऊ का माहेरा?’ कारल्याला फुलं येऊन, कारली लागून, ती तोडून मग भाजी करून, ती खा आणि उष्टी काढ इथपर्यंत त्या गाण्यामधून सुनेला कामाला लावून माहेराला जाण्यापासून परावृत्त केलं जातं. थोडी वैयक्तिक आठवण अशी की, एकदाची कारल्याची भाजी खाऊन सुनेनं उष्टं काढलं की, गाणाऱ्या मुलींना बरं वाटायचं. मग शेवटची ओळ अशी होती की, “आणा फणी, घाला वेणी, जाऊ द्या राणी माहेरा, आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा||”
तर त्या सासुरवाशिणीला आपल्या माणसांकडे जाण्यापासून परावृत्त करणं जितकं आपण लक्षात घेतलं पाहिजे, तितकंच याबद्दलचा विद्रोह व्यक्त करण्यासाठी असं गाणं रचणं आणि ते गाणं अनेक पिढ्यांनी म्हणत राहणं आणि त्याची स्मृती जागवणं, हेसुद्धा इतिहास नोंदवताना महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्यायला हवं.
एकांगीपणे, स्त्री सतत अबला आहे, अन्यायग्रस्त आहे किंवा दुसऱ्या बाजूनं सतत ती अत्यंत कर्तबगार आणि तिला काहीच त्रास नव्हते, असंही मला म्हणायचं नाही. मला असं सांगायचंय की, साहित्य हे स्त्रीचं जगणं, तिची अभिव्यक्ती, तिनं कुंठित झालेल्या जगण्याच्या प्रवाहाला वाट काढून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा अम्लान, रसरशीत आविष्कार आपल्याला दाखवत राहतं.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
शेवटी उद्धव शेळके यांच्या ‘धग’ नावाच्या अनन्य कादंबरीमधलं हे बाईच्या आत्मबळाचं उदाहरण दिल्याशिवाय राहवत नाही.
“कावा, काय झालं? ...काई दुखतेगिखते का?”
“…मले थ्या कमिन्यानं श्या देल्लाओ!”
“काबा?”
“अओ- माह्याच्यानं डवरा हेकोडा गेला. चार सा रोपं खुडले असंन पऱ्हाटीचे. त लागला भांचोत एकदम मायबहीन काहाडाले! …”
“बsस?” कौतिक धीरानं म्हणाली, “इतल्यासाठी मनाले एवढं घ्याव् काय लाऊन लेक्? चालतेच आये, होतेच आये- जेवले का न्हाई?”
“मले भूक नाई”.
“वाs! असं मनून कुठीसा होते काय! कौतिक त्याचा हात धरून निजत्याचं बसतं करताना म्हणाली, “चाला. उठा. दोन्दोन घास खाऊन घेऊ... मीई सक्कायपासून जेवली नाई.” कौतिक मुद्दाम म्हणाली.
आपल्या भवतालातल्या परिस्थितीला ‘निजत्याचं बसतं’ करण्यासाठी झटणारी ही कौतिक, कुठेही आपल्या बाईपणाचा बाऊ करताना दिसत नाही. परिस्थितीचे चटके बसले तरी ती नवऱ्याला जगण्यासाठी प्रवृत्त करताना दिसते आणि त्याला पुन्हा जगण्याकडे ओढून आणते.
..................................................................................................................................................................
संघर्ष होतो तेव्हा स्त्रिया युद्धाची रणभूमी बनत असतात. मग त्यांच्यावर अत्याचार घडत राहतात. आणि साडेतीन हजार वर्षांपूर्वीसुद्धा हा दृष्टीकोन समाजात होता, हे आपल्याला दिसून येतं. ‘अथर्ववेदा’मध्येच इतरत्र आपल्याला स्त्रियांचं स्थान काय होतं याचे विविध पुरावे दिसतात. ‘सपत्नी नाशन-सूक्ता’मध्ये सवतीचा नाश व्हावा यासाठी स्त्रीच प्रयत्न करते. मी अमुक-अमुक वनस्पतीची प्रार्थना करते, जेणेकरून माझ्या सवतीचा नाश होईल आणि पतीचं पूर्णतः लक्ष माझ्याकडे वळेल, अशी प्रार्थना ती करताना दिसते. स्त्रीचं स्थान दुय्यम होण्याच्या प्रवासानं इथं वेग घेतलेला दिसतो.
.................................................................................................................................................................
या सगळ्या मांडणीतून मला इतिहास शिकणारी बाई म्हणून काय सांगायचंय? तर आमच्याकडे डोळे दिपवणारा भूतकाळ असेल किंवा नसेल, पण तरी आम्ही आमची कहाणी, आमचा इतिहास सांगायला हरकत नाही. बायकांच्या जगण्याचा प्रवाह खळाळत राहिला आहे. त्याची ओल आपल्या साहित्याच्या पानापानांत पोचलेली आहे. तिची दखल इतिहासानं घ्यायला हरकत नाही.
मिशेल फूको या तत्त्वज्ञानं लिहिलेल्या ‘समाजाला वाचवलंच पाहिजे’ नावाच्या पुस्तकात असं सांगितलंय की, ‘सत्ताधीशांच्या थोरवीवर प्रकाशझोत टाकून जनतेच्या नजरा दिपवणं हा इतिहासाचा एक उद्देश असतो. पण त्यामुळे झोताबाहेर राहणाऱ्यांचं म्हणणं जनतेला दिसत नाही. अशा वेळी ‘काउंटरहिस्टरी’ (प्रतिइतिहास) लिहून जनता दाखवून देते की, ‘डोळे दिपवणारा भूतकाळ आमच्या पाठीशी नसेल, तरीही आम्ही काळोखातून बाहेर येऊन आमची कहाणी आणि आमचा इतिहास सांगत आहोत.’
गडीमाणसांचा, बाप्यामाणसांचा जसा इतिहास लिहिला जातो, तसा बाईमाणसांचा इतिहास लिहिला गेला की, एकूणच माणसांच्या इतिहासामध्ये भर पडेल. शिलालेख, सरकारी दस्तऐवजांसारखंच साहित्य हे इतिहासाची रचना करण्यासाठी उपलब्ध असणारं महत्त्वाचं साधन आहे. त्याच्या अभ्यासातून आज जे आपण आहोत, ते कसे घडत गेलो, हे आपल्याला समजेल अशी अपेक्षा आहे.
.................................................................................................................................................................
लेखिका श्रद्धा कुंभोजकर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत.
shraddhakumbhojkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment