आपला जीव गेला तर सरकारदरबारी आपली नोंद केवळ एक आकडा अशी असेल… पण आपल्या कुटुंबासाठी…
अर्धेजग - आरोग्य
प्रिया काळे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 15 September 2021
  • अर्धेजग आरोग्य कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona Virus

आवश्यक ती सर्व काळजी घेऊन कोविडच्या पहिल्या लाटेत आम्ही स्वत:ला सुरक्षित ठेवू शकलो. साधी सर्दी-खोकला-तापही होऊ दिला नाही. बाहेरचं खाणं पूर्ण बंद केलं. योगासनं, घरातच चालणं यांसारखे व्यायाम सुरू केले. गारठा जाणवल्यास वाफ घेणं, गरम पाणी पिणं, घरात कापूर जाळणं यांसारखे कानावर पडलेले उपायही केले. त्यामुळे आपण बळकट आहोत आणि आपली प्रतिकारशक्ती चांगली आहे, असं आम्हाला उगाचच वाटायला लागलं होतं. आपल्याला काही होणार नाही, आपण धडधाकटट आहोत, असंही वाटायला लागलं.

अशात शेजारच्या फ्लॅटमध्ये कोविड झालेलं एक जोडपं विलगीकरणासाठी आलं आणि आमच्या मनात शंकेची पहिली पाल चुकचुकली. आपणही पॉझिटिव्ह होऊ की काय असं वाटायला लागलं. आम्ही सॅनिटायझचा वापर वाढवला. संपूर्ण दारावर आणि दारापुढे, वर्तमानपत्रांवर सॅनिटायझर मारणं वाढवलं. आधीपेक्षा जास्त काळजी घेऊ लागतो. बाथरूममध्ये डेटॉल टाकून पाण्याची बादली भरून ठेवायचो आणि बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवून मास्क व इतर कपडे डेटॉलमध्ये भिजवून ठेवायचो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

रोजची कामं नेहमीप्रमाणे सुरू होती. पहिल्या लॉकडाउनचा अनुभव गाठीशी असल्यानं या वेळेस पहिल्यासारखी तारांबळ उडाली नाही. एका संध्याकाळी एकाएकी माझी आठ वर्षांची मुलगी- किट्टू ‘मला खूप थकवा आलाय’ असं म्हणून गुडघ्यात डोकं घालून बसली. ताप वगैरे नव्हता. सर्दी-खोकलाही नव्हता. रात्री तिचं अंग जरा गरम लागलं, म्हणून घरातलं तापाचं औषध दिलं. पहाटे परत तिचा ताप पाहिला, तर तिच्या पायाचे तळवे आणि हाताचे पंजे खूप गरम लागले. परत तिला उठवून औषध दिलं. तेव्हा मात्र जरा भीती वाटायला लागली.

त्यानंतर दोन-तीन तासांनी मला खोकला सुरू झाला. डोकं जड झालं आणि अंगात कसकस जाणवायला लागली. किट्टूला डॉक्टरकडे घेऊन गेलो. आमची लक्षणं पाहून आणि एकंदर अवतारावरून डॉक्टरांनी कोविडची चाचणी करण्याचा सल्ला दिला. तसंच किट्टूसाठी कोविडची ट्रीटमेंट सुरू केली. आता मात्र आम्ही सगळे पुरते हादरून गेलो. घरातल्या सगळ्यांचीच तपासणी केली. किट्टूला आणि मला खूप थकवा आला. डोकं जड होऊन दुखू लागलं.

हे दुखणं नेहमीच्या दुखण्यासारखं नव्हतं. आपल्याला काहीतरी खूप वेगळं होतंय आणि हा कोविडच आहे, असं आतून वाटायला लागलं.

एकदाचे रिपोर्टस आले. मी आणि किट्टू पॉझिटिव्ह निघालो, तर माझी आई आणि नवरा यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तिसऱ्या दिवशी मला एकदम गरगरल्यासारखं व्हायला लागलं. ताप आला आणि सर्दीही झाली. घशात सतत कफ होऊ लागला. त्यामुळे खोकलाही वाढला. आता एकत्र कसं राहायचं हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी मुलीसह विलगीकरणात राहण्यासाठी गेले. आमचे फॅमिली डॉक्टर डॉ. संजय वाघ यांनी कोविडची ट्रीटमेंट सुरू केली होतीच. रिपोर्टस पाहून फॅमिफ्लू, डोलो, व्हिटॅमिन सी व डीच्या गोळ्या सुरू करायला सांगितल्या. आईच्या कित्येक महिने बंद असलेल्या फ्लॅटवर आम्ही दोघी राहायला गेलो. १५-१६ दिवस राहता येईल इतपत आवश्यक गोष्टी सोबत नेल्या. जळमटे असलेल्या त्या फ्लॅटची स्वच्छता केली. तोपर्यंत किट्टू पूर्ण बरी झाली होती. डॉक्टरांनी तिची फक्त मल्टी व्हिटॅमिन्स दोन आठवडे चालू ठेवायला सांगितली. डॉ. महेश गोसावी यांनी वेळेत उपचार सुरू केल्यामुळे पुढचे संभाव्य धोके टळले.

सगळ्यात आधी आम्ही ऑक्सिमीटर खरेदी केला. दर दोन तासांनी SPO2 तपासून नोंदी ठेवायला लागलो. तो ९०पेक्षा कमी असेल तर ताबडतोब अडमिट व्हावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आमच्या सुदैवानं दोघांचाही SPO2 कधी ९०च्या खाली गेला नाही. त्यासाठी वाफ घेणं, प्राणायाम करणं, श्वसनाचे व्यायाम करणं, याची खूपच मदत झाली. पहिले चार दिवस मला सकाळ-संध्याकाळ १०-११ गोळ्या घ्याव्या लागायच्या. हळूहळू त्यांचं प्रमाण कमी होत दिवसाला तीन-चार गोळ्यांवर आलं. सुरुवातीला या गोळ्या घेतल्यानंतर हाता-पायांची खूप आग व्हायची. प्रचंड थकवा यायचा. अर्धी पोळी खाल्ली की, पोट भरायचं, एकदम गच्च व्हायचं. झोपल्यावर कधी जाग यायची ते कळायचं नाही. डोकं इतकं जड पडायचं की, पहाटे तीन-चारपर्यंत झोपच लागायची नाही.

दिवसातून तीन-चार वेळा वाफ घेणं सुरू होतं. सकाळी उठल्यावर काळसर कफ पडायचा.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

एके दिवशी श्वास घ्यायला गेलं की, खोकला यायला लागला. दुपारपर्यंत मी पूर्ण श्वासच घेऊ शकले नाही. एकदा प्रयत्न केला तर पाच-सात मिनिटं खोकल्याची उबळ आली. आता आपला श्वास थांबतो की काय, असं वाटायला लागलं. पाच दिवसांत औषधाची दीड बाटली संपली, पण खोकला काही हटायचं नाव घेत नव्हता. संध्याकाळी तर जेवतानाही खोकला यायला लागला.

मग मात्र माझा धीर सुटायला लागला. आपले दिवस भरले असं वाटायला लागलं. बातम्यांमध्ये ऐकलेले कोविड मृत्युचे आकडे डोळ्यासमोर यायला लागले. आता अडमिट व्हावं लागेल, व्हेंटीलिटर लावावा लागेल, यासारखे विचार मनात येऊ लागले. बोलायला तोंड उघडलं की, खोकला यायचा. नाकानं श्वास घ्यायला जमायचं नाही. मग श्वास घ्यायला तोंड उघडलं की, खोकला यायचा. कोविड किती त्रासदायक आणि जीवघेणा ठरू शकतो, याचा अंदाज यायला लागला.

सहाव्या दिवशी वास येणं, चव लागणं बंद झालं. या इतकी भयानक अवस्था कोणतीच नसेल. चहा, जेवण यापैकी कशाचाच वास येईना आणि चवही लागेना. किमान औषधाचा तरी वास आला पाहिजे, चव लागली पाहिजे असं वाटायला लागलं. खूप साऱ्या गोळ्या घेतल्यामुळे उष्णता प्रचंड वाढली. हातापायातलं त्राण निघून गेलं. आंघोळ केली तरी प्रचंड थकवा यायला लागला. डबा मिळण्याची सोय न झाल्यानं आम्ही हातानं स्वयंपाक करून जेवत होतो. पण भाजी केली की, एक तास पडून राहावं लागायचं. कणिक मळायला, पोळ्या लाटायला मनगटं वळायचीच नाहीत. बोटं अवघडून जायची. एवढं करून जेवण जायचं नाही. भूक लागायची, पण वास-चव नसल्यानं खावंसं वाटायचं नाही.

अशाही अवस्थेत शेजारी राहणारं पवार कुटुंब अगदी देवदुतासारखं मदतीला धावून आलं. डबा पाठवणं, फळं-बिस्किटं पाठवणं, अंडी आणून देणं, फोन करून सतत धीर देणं, यासारख्या कितीतरी गोष्टी ते आमच्यासाठी करत राहिले. त्यांच्या घरात लहान मूल असूनही त्यांनी आमच्याशी सतत संपर्क ठेवला. रात्री झोपण्यापूर्वी मी दोन मास्क लावून आमचा संपूर्ण दरवाजा सॅनिटाइझ करत असे. आपला संसर्ग दुसऱ्याला होऊ नये, यासाठी आम्ही खिडकीतही बसायचो नाही. एक-दोन तासांनी खिडकीही सॅनिटाइझ करत होतो.

असं करत आम्ही १६ दिवस काढले. सर्दी गेली, खोकला कमी झाला. आता तुम्ही घरी जाऊ शकता, पण पुढचे काही दिवस मास्क वापरा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. आता आपल्या आयुष्यातला कोविड-अध्याय संपला या आनंदात आम्ही घरी आलो. पण घरातलं चित्र जास्त भीतीदायक होतं. माझा नवरा आणि आई अगदी खंगले होते, खोकल्यानं दोघंही बेजार झाले होते. आम्ही जायच्या आधीच दोघांची कोविड चाचणी झाली होती. २४ तासांत रिपोर्टस मिळणार होते. पण एकंदरीत वातावरण पाहून परत एकदा कोविड आपल्यासमोर उभा ठाकला आहे, हे समजलं.

आईचं वय ७३ असल्यामुळे तिला जास्त त्रास होऊ शकतो, हेही जाणवलं. डॉक्टरांनी याहीवेळेस ट्रीटमेंट आधीच सुरू केली. दोघांचेही रिपोर्टस पॉझिटिव्ह आले. आईची ऑक्सिजन लेवल ९०-९१-९२ होती. तिला तात्काळ अ‍ॅडमिट करायची गरज आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यासाठी तिचा सिटी स्कॅन स्कोअर लागणार होता. आम्ही ताबडतोब सिटी स्कॅन करून घेतला. सुदैवानं स्कोअर नॉर्मल होता. आता दवाखाना शोधायची कसोटी होती. तीन-चार नंबर मिळाले, पण प्रत्येक ठिकाणी १० दिवसांसाठी आयसीयु आणि व्हेंटीलेटरचा बेड घ्यावा लागेल, असं सांगण्यात आलं.

रात्री आईची SPO2 लेवल ८५ झाली. एकीकडे मान टाकून ती तशीच खोकत, कण्हत होती. सकाळी मात्र तिची ऑक्सिजन लेवल ९८ झाली. तिला कोविड सेंटरमध्ये घेऊन गेलो. पण तिथलं वातावरण पाहूनच ती घाबरली. आम्ही नुकतेच कोविडमधून बाहेर पडलेलो. पूर्ण बरे झालो नव्हतो. घरी नवरा पॉझिटिव्ह. त्यामुळे आईला घरीच विलगीकरणात ठेवून औषधं द्यावीत, असं कोविड सेंटरमधल्या डॉक्टरांनी सांगितलं. विशेष म्हणजे आईला तपासायची गरज नाही, असंही ते म्हणाले. ‘तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार करा’ असंही त्यांनी आम्हाला सांगितलं.

त्यानुसार आम्ही डॉ. वाघांची ट्रीटमेंट आम्ही सुरू केली. पाच-सहा दिवस पूर्ण आराम, वेळेवर जेवण, अंडी, फळं आणि गोळ्या या सर्वांमुळे आई व नवरा, दोघंही बरे झाले. दरम्यान महानगरपालिका तसंच ग्रामपंचायत कार्यालयातून चौकशीसाठी फोन येत होते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अशा प्रकारे वयवर्ष ८ ते ७३पर्यंतच्या आम्ही चार कुटुंबसदस्यांनी ‘कोविड-परिक्रमा’ पूर्ण केली. सुदैवानं यातून आमची मुलगी खूप लवकर बाहेर पडली. पण कोविडनंतरचे दोन महिने आमच्यासाठी जास्त वाईट होते. प्रचंड थकवा येणं, दम लागणं, धाप लागणं, एकाएकी घामाच्या धारा वाहणं, हात-पाय गरम होणं, केस गळणं, सतत झोप येणं, कधी कधी रात्र-रात्र झोप न लागणं, अशा अनेक व्याधींचा आम्हाला सतत सामना करावा लागला. जेवण नकोसं वाटणं, मळमळणं, जुलाब-उलट्या होणं हेदेखील सतत होत होतं. त्याचबरोबर अचानक रक्तदाब वाढणं, शुगर वाढणं किंवा दोन्ही कमी होणं, हेही प्रकार झाले. अर्थात हे सर्व प्रकार ठराविक काळापुरते होते. पण अजूनही जाणवणारे त्रास म्हणजे थकवा येणं, हात-पाय दुखणं, डोळ्यांची जळजळ होणं आणि केस गळणं, असे काही त्रास होतच आहेत.

वेळोवेळी आपल्या डॉक्टरांचा फॉलोअप घेणं आणि औषधं वेळच्या वेळी घेऊन आवश्यक त्या तपासण्या करत राहणं आम्हाला फायद्याचं ठरलं. पण या काळात मनावर प्रचंड दडपण होतं. आजूबाजूला सातत्यानं घडणाऱ्या मृत्युच्या बातम्या मनावरील ताण अजूनच वाढवत होत्या. आपल्याला काय होतंय ते नेमकं कळायचं नाही. होणाऱ्या प्रत्येक बदलाचं किंवा रोजच्या गोष्टीचं निरीक्षण करून नोंदी ठेवाव्या लागायच्या.

वेगवेगळ्या तपासण्या, कोविड, चाचणी, आरटीपीसीआर, डी डायमर, हिमोग्लोबिन, सीआरटी, सिटी स्कॅन या सर्वांसाठी प्रत्येकी जवळपास २३ ते २५ हजार रुपये खर्च आला. तसेच कोविडकाळातील व नंतरच्या औषधांसाठी ४०-४५ हजार रुपये खर्च आला. या सगळ्यासोबतच मानसिक अस्वस्थता, नैराश्य, चिडचिड यामुळे कामावरही परिणाम झाला.

डॉक्टरांच्या मते कोविडमधून पूर्णपणे बरं होण्यासाठी तीन ते सहा महिने, क्वचितप्रसंगी एक वर्षही लागू शकतं. कोविडनंतर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचं प्रमाणही लक्षणीय आहे, हे संशोधनातून सिद्ध झालं आहे. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट ही की, आम्ही घरी राहूनच बरे झालो. त्यासाठी आम्ही डॉ. महेश गोसावी, डॉ. संजय वाघ यांचे शतश: ऋणी आहोत. वेळीच उपचार सुरू करून, धीर देऊन त्यांनी आम्हाला बरं केलं. विशेष म्हणजे कोणतीही अनाठायी भीती न दाखवता वास्तवाची जाणीव करून दिली.

अजूनही आम्ही कोविडच्या छायेतून पूर्णपणे बाहेर आलेलो नाही, असं मला वाटतं. डॉक्टरांनी काही औषधं सहा महिने सुरू ठेवायला सांगितली आहेत. त्यातून पुढे काही गुंतागुंत होईल की नाही, माहीत नाही. ‘prevention is better than cure’चा खरा अर्थ या सगळ्या काळात समजला.

खरं तर आमच्याकडून आम्ही सर्व प्रकारची काळजी घेत होतो. आता तर अजूनच घेतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की, सर्वसामान्यांच्या खिशाला आणि एकूणच तब्येतीला न परवडणाऱ्या कोविडपासून जितकं लांब राहाता येईल, तितकं चांगलं. पर्यटन, हॉटेलिंग, छंद, सण, समारंभ, उत्सव हे सर्व थांबू शकतात, पण त्यासाठी उतावळेपणा केला तर आपण या जगात थांबायची शक्यता मात्र देता येत नाही. तेव्हा घरी राहा, सुरक्षित राहा आणि मुख्य म्हणजे जबाबदारीनं राहा. कारण कोविड हे एक दुष्टचक्र आहे. तो तुमचं आख्खं आयुष्य पणाला लावू शकतो. तुमचं आरोग्य, मानसिक आरोग्य, आर्थिक बाजू, कुटुंब, काम सगळं काही एका क्षणात नष्ट करू शकतो. सावध राहणं याचा अर्थ घाबरणं असा नाही, तर योग्य ती खबरदारी घेणं असा आहे. कारण आपला जीव गेला तर सरकार दरबारी आपली नोंद केवळ एक आकडा अशी असेल, पण आपल्या कुटुंबासाठी ते सगळ्यात मोठं नुकसान असेल. त्यामुळे लसीकरण, मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर पाळणं या गोष्टी पुढची काही वर्षं तरी आपल्या अजेंड्यावर असायला हव्यात.

..................................................................................................................................................................

लेखिका प्रिया काळे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.

kaprish226@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा