हेन्रिएटा लॅक्स : मृत्यूनंतरही पेशीपेशींत जगणारी तुम्हाआम्हाआपणासगळ्यांची आई!
अर्धेजग - आरोग्य
भक्ती चपळगावकर
  • हेन्रिएटा लॅक्स आणि तिच्या पेशींचे एक छायाचित्र
  • Mon , 10 May 2021
  • अर्धेजग आरोग्य हेन्रिएटा लॅक्स Henrietta Lacks हेला HeLa कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona Virus

काल, ९ मे रोजी जगभरात ‘मातृदिन’ साजरा झाला. धार्मिक उत्सवांऐवजी कौटुंबिक उत्सव अनेक जणांना आवडतात. यातलाच हा दिवस. आईची महती सांगणारे संदेश असोत किंवा घरच्या लहानग्यांनी केलेली छोटी शुभेच्छापत्रे असोत, काल जगभरात आईची आठवण काढली गेली. मला या दिवशी आठवण आली अशा एका आईची, जिने स्वतःच्या मृत्यूनंतर कॅन्सर संशोधनासाठी अनमोल अशा स्वतःच्या पेशी दिल्या. तिच्या पेशींच्या साहाय्याने झालेले संशोधन कॅन्सर आणि इतर अनेक क्षेत्रांत महत्त्वाचे ठरले आहे. विशेष म्हणजे तिच्या या अनमोल कार्याची जाणीव तिला मरेपर्यंत नव्हती. आणि तिच्या मुलाबाळांनासुद्धा याची जाणीव फार नंतर झाली. ही मृत्यूनंतरही पेशीपेशींत जगणारी आई म्हणजे ‘हेन्रिएटा लॅक्स’.

हेनरिएटा जगली असती तर या वर्षी १०१ वर्षांची झाली असती! पण ७० वर्षांपूर्वी ३१व्या वर्षी हेनरिएटाला अतिशय आक्रमक सर्वायकल कॅन्सर झाला. अमेरिकेतल्या बाल्टीमोर इथल्या एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. त्याचा भाग म्हणून तिच्या कॅन्सरग्रस्त पेशी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी तपासायला काढल्या. त्यातील काही भाग त्यांनी तिला न कळवता एका संशोधकाला दिला.

हेनरिएटाच्या पेशी जेव्हा प्रयोगशाळेत तपासण्यात आल्या, तेव्हा संशोधक अवाक झाले. त्या पेशी अमर होत्या. त्यांची वाढ अदभुत वेगात होत होती. संशोधकांनी मग या पेशी इतर संशोधकांकडे पाठवण्याचा सपाटा लावला. या पेशींची कार्यक्षमता एवढी प्रचंड आहे की, गेल्या ७० वर्षांत जीवशास्त्रात झालेल्या अनेक महत्त्वाच्या आणि मानवजातीला उपयोगी पडलेल्या संशोधनाचे मूळ हेनरिएटाच्या पेशी आहेत.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळा

नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरा -

https://forms.gle/HaYhWs7Wy8Dvwbfo6

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९८८१९०१८२१

..................................................................................................................................................................

‘हेनरिएटा लॅक्स’ या तिच्या नावाचे संक्षिप्त रूप म्हणून या पेशींना ‘हिला’ (HeLa) म्हणतात. कॅन्सर, रोगप्रतिकारशास्त्र, संसंर्गजन्य रोग अशा अनेक क्षेत्रांतल्या संशोधनात त्यांचा वापर होतो. हेनरिएटाच्या पेशी अगणित आहेत, आणि जगात सगळीकडे आहेत. कृत्रिम गर्भधारणेसाठी ‘हिला’ पेशी वापरल्या जातात. एक अंदाज आहे की, HeLa सेललाईन वापरून प्रकाशित झालेल्या संशोधनांची संख्या लाखावर आहे. आजपर्यंत या पेशी वापरून संशोधन केलेल्या तीन जीवशास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. या पेशींचा सध्या करोना लसींच्या संशोधनात वापर केला जात असल्याची माहिती जगप्रसिद्ध ‘नेचर’ मासिकाने गेल्या वर्षी दिली आहे. नोव्हल करोना विषाणूबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती मिळवून देण्याचे काम या पेशी करत आहेत.

मानवी पेशी शरीराबाहेर फार थोडा काळ टिकतात. त्यांच्यासह संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी हा फार मोठा अडथळा आहे. अती वेगात वाढणाऱ्या कॅन्सर पेशी मात्र वेगळ्या असतात. मानवी शरीराबाहेर टेस्ट ट्यूबमध्ये टिकणाऱ्या पहिल्या पेशी माणसाला सापडल्या त्या हेनरिएटाच्याच. या पेशींनी जीववैद्यकशास्त्राच्या संशोधनात क्रांती केली आहे.

आपण सगळे हेनरिएटाचीच लेकरे आहोत, असे म्हणायला हरकत नाही. तिच्या पेशी आपल्याला जीवनदान देत आहेत. पण ही आपली आई फार कमनशिबी. तिचे हक्क तिला जिवंतपणी मिळाले नाहीत. आणि मृत्यूनंतर कित्येक वर्षे तिच्या मुलाबाळांना आपल्या आईच्या पेशींची किंवा त्यांच्या वापराबद्दल काहीच माहिती नव्हती. ती कृष्णवर्णीय होती. जगावर राज्य करणाऱ्या अमेरिकेत कृष्णवर्णीयांची स्थिती आजही खूप चांगली नाही. ७० वर्षांपूर्वी तर त्यांच्यावर उघड अन्याय होत होता. अनेक ठिकाणी त्यांच्यासह उपचार होऊ शकत नव्हते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

हेनरिएटावर एक रुग्णालय उपचार करत होते, हे तिचे जणू नशीब. त्यांनी अतिशय बेजबाबदारपणे तिला न विचारता किंवा तिच्या मृत्यूनंतर तिच्या घरच्यांना न विचारता, कळवता तिच्या पेशी संशोधनासाठी दिल्या. ज्या ज्या औषध कंपन्यांना या पेशींचा वापर करून बनलेल्या औषधांनी अमाप पैसा मिळवून दिला, त्या त्यांनी तिच्या घरच्यांना यातला कोणताही वाटा दिला नाही. तिचे नाव उघड झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी कोर्टकचेऱ्या केल्या. त्यालाही सुरुवातीला दाद मिळाली नाही, पण नंतर हेनरिएटाचे कुटुंबीय आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेत सामोपचार झाला.

‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ ही चळवळ सुरू झाल्यानंतर ‘हिला’ पेशी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. तिच्या मंजुरीशिवाय तिच्या शरीरातल्या पेशी वापरण्यात आल्या, म्हणून या पेशींचा संशोधनात वापरच होऊ नये, अशी एक मागणी होत आहे. पण हेनरिएटाचे अनेक कुटुंब-सदस्य जण म्हणतात की, असे करण्याची गरज नाही. तिच्या पेशींतून तिचे अस्तित्व टिकून आहे. तिच्या पेशींमधून तिचे अस्तित्व राहू देत, पण तिची आठवण पण असू देत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

लहानपणी गरिबीचा सामना करताना हेनरिएटाने तंबाखूच्या शेतात काम केले. पुढे ती बाल्टीमोरला आली, तिने लग्न केले. ती एक प्रेमळ आई होती, तिला तिची मुले फार प्रिय होती. तिला गाण्याची, नाचण्याची आवड होती. पण तिचे आयुष्य कॅन्सरने अवघ्या ३१ वर्षी संपवले. तिच्या मृत्यूनंतर तिने अगणित जणींचे आयुष्य कॅन्सरला पराभूत करून वाचवले आहे, आजही वाचवत आहे.

आज जगाला करोनाने ग्रासले आहे, पण हेनरिएटा तयार आहे, तिच्या अब्जावधी लेकरांना वाचवण्यासाठी. HeLaच्या मदतीने करोनाला हरवू शकू हा विश्वास शास्त्रज्ञांना आहे. माझ्या अस्तित्वाला कुठे ना कुठे तरी मदत करणाऱ्या माझ्या या आईला सलाम.

(लेखातले काही संदर्भ आंतरजालावरून साभार)

.............................................................................................................................................

लेखिका भक्ती चपळगावकर मुक्त पत्रकार आहेत.

bhalwankarb@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा