‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ नावाचा एक हिंदी चित्रपट नेमका करोनाकाळात प्रदर्शित झाला. काही काळाने तो ओटीटी मंचावर सरकला आणि बऱ्यापैकी गाजला. अलंकृता श्रीवास्तव (‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’च्या दिग्दर्शिका) यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दोन चुलत बहिणी स्वसुख आणि स्वातंत्र्य यांचा शोध आपल्या परीने घेतात. चित्रपटाच्या शेवटी स्त्रीमुक्तीच्या अनुषंगाने असा एक प्रसंग आहे, जो आजवरच्या एकाही हिंदी चित्रपटात आलेला नाही. एका जत्रेसम आनंदोत्सवात एक महिला कलावंत स्त्री सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून एक चित्ररचना (इन्स्टॉलेशन) सादर करते. सुमारे २० फूट उंचीची योनी तिच्यावरील पडदा बाजूला काढला जाताच दिसू लागते. ती दिसताच अनेकांच्या चेहऱ्यांवरचे आश्चर्य, चीड, हसू आणि अवघडलेपण पडद्यावर उमटते. मग ती कलावंत महिला भाषण सुरू करते. या चित्राचे महत्त्व काय ते सांगत असतानाच एक झुंड येते आणि ते चित्र उदध्वस्त करते. त्या वेळी सारे लोक घाबरून पळत सुटतात. टोळक्याचा नेता पिस्तुलातून गोळ्या सोडतो. एक मुस्लीम तरुण व मुस्लीम तरुणी त्यात ठार होतात.
एरवी ज्याच्या त्याच्या तोंडी ज्या अवयवाच्या नावाने शिवीगाळ असते, तो असा जाहीर कलाकृतीतून मांडण्यालाही जिथे मनाई आहे; तिथे स्त्रीच्या मागण्या, अपेक्षा, समाधान, सुख आदी विषयांवर साधी चर्चाही होणार नाही, असा काहीसा संदेश या प्रसंगामाधून द्यायचा प्रयत्न असावा. तो फार धाडसी आणि धक्कादायक मानला पाहिजे. धक्कादायक यासाठी की, त्या जत्रेसम आनंदोत्सवात काही लहान मुलेही असतात. ती गंमत पाहून निरागस हसतात.
आता याच्या उलट एक प्रसंग ‘गुड न्यूज’ या विनोदी आणि आचरट हिंदी चित्रपटात दाखवण्यात आला आहे. कृत्रिम गर्भधारणेचे कथानक असलेला हा चित्रपट सारख्याच आडनावांच्या जोडप्यांत गर्भधारणेची कशी अदलाबदल होते, त्यावरच्या विनोदांवर बेतलेला आहे. करीना कपूर डॉक्टरांच्या समोर पाय फाकलेल्या स्थितीत असून डॉक्टर तिच्या नवऱ्याचे वीर्य योनीमार्गात इंजेक्शनद्वारे सोडण्याच्या तयारीत असल्याचा हा प्रसंग. डॉक्टरांच्या डाव्या-उजव्या बाजूला त्यांचे साहाय्यक आहेत. त्यांचे काम ही प्रक्रिया कशी चालते, ते समजावून घेण्याचे. पण त्यांचे लक्ष हळूच योनी कशी आहे, ते बघण्याकडेच. असे दोनदा होते, तेव्हा डॉक्टर त्यांना दटावतोही. पण प्रत्येक वेळी (लैंगिक) विनोद निर्माण कसा होईल, अशा तऱ्हेने प्रसंग रंगवलेला. चावट आणि अपमानास्पदही!
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
या दोन प्रसंगांतून काय सांगितले जाते? एक, योनी उघड करायची गोष्ट नाही. ती उघड्यावर दिसल्यास भयंकर काही घडेल! दोन, योनी गुप्तेंद्रिय असल्याने ती बघायला दोन पुरुष डॉक्टर फारच उतावीळ झालेले. इतके की, ती एका रुग्ण महिलेची असून आपण डॉक्टर म्हणून भावनाशून्य असावे, याचेही भान त्यांना नाही. शिवाय ती हास्यनिर्मितीचा एक विषयही झालेली…
‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे उदात्तीकरण खूप झाले. तरीसुद्धा त्याविरुद्ध नाके मुरडणाऱ्यांची संख्या केवढी, विरोध करणाऱ्यांची केवढी! चित्रपटाचा विषय थेट योनीशी जोडलेला. त्याची चर्चा मात्र अवयवाचे उल्लेख वगळून केलेली. ती योग्यच होती. कारण मासिक पाळी नैसर्गिक आहे. नैसर्गिक बाबींची थट्टा नाही करता येत.
याचा अर्थ, अवयव एकच, पण तिन्ही चित्रपटांत दिग्दर्शकांनी त्याला ट्रीटमेंट वेगळी दिली. त्याची मांडणी व हाताळणी वेगवेगळी केली. ‘मसान’ या चित्रपटातली नायिका कामोत्तेजक, लैंगिक चित्रपट पाहत असल्याचा एक प्रसंग आहे. नंतर ती तिच्या मित्रासह एका लॉजमध्ये जाते. पोलीस तिला ‘इनडिसेंट बिव्हेअर’खाली अटक करतात. ‘मसान’चे दिग्दर्शक म्हणजे हे आपले ‘गीली पुच्ची’चे दिग्दर्शक नीरज घेवान. ते दलित असून त्यांनी ‘मसान’ सवर्ण-दलित अशा कथानकातून सादर केला. अश्लीलता अथवा बीभत्सपणा कोणत्या प्रसंगात होती आणि कोणत्या नाही, हे काय इथे स्पष्ट करायची गरज आहे?
‘बेस’, ‘बूटी’, ‘बम’ या शब्दांचे अर्थ स्लँग भाषेत अवयवसूचक आहेत. त्यांची हिंदी-पंजाबी गाणी खूप लोकप्रिय झाली. ‘बेस’ व ‘बम’ म्हणजे नितंब आणि ‘बूटी’ म्हणजे उरोज. पंजाबी गीतांमध्ये उत्तानपणा खूप असतो. भोजपुरीतही. द्वयर्थी शब्दांची कित्येक चावट व बीभत्स मराठी गाणी यु-ट्युबवर अजूनही असावीत. पंजाबच्या सुप्रसिद्ध रॅप गायकांनी चक्क एक लैंगिक गाणे गायले आहे. मराठीमधले द्वयर्थी व वाह्यात गाणी गाणारे एक गायक सध्या प्रतिष्ठित होऊ पाहत आहेत. ठीक आहे, उपरती झाली असेल तर चांगलेच आहे. पण अशा गाण्यांचा एवढा महापूर येऊनदेखील त्याची ना दखल, ना त्यांचा धिक्कार आणि साधा हिंदीमधला एक शब्द मराठीतल्या गुप्तेंद्रियाशी साधर्म्य दाखवतो म्हणून वगळायचा, हा दांभिकपणा नाही का? हा तर खास मराठी मध्यमवर्गीय आणि शहरी व सवर्ण दांभिकपणा!
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
या देशात योनीपूजा केली जाते. योनीतंत्र व योनतत्व यांचा विकास होतो. योनीदेवता असतात. तिथे इतकी अनास्था, अज्ञान आणि अवघडलेपणा का असावा? ‘कामाख्या मंदिर’ कशाचे आहे, हे माहीत नाही की काय लोकांना? नाओमी वूल्फ या विदूषीने ‘व्हजायना’नामक पुस्तक लिहिले आहे. त्याच्या परिचयात त्या म्हणतात की, ‘मला योनीचा सांस्कृतिक आणि बौद्धिक इतिहास तर सांगायचाच आहे. पण अलीकडे मज्जाविज्ञान आणि योनी यांचे नाते उलगडले असून त्याचीही माहिती मला सांगायची आहे.’ ‘व्हजायना : अ न्यू बायोग्रफी’ असे नेमके शीर्षक त्यांनी ३७२ पानांच्या या पुस्तकाला दिले आहे. त्यांना कुठेही लाज, भय, गंड अथवा कुचंबणा जाणवलेली दिसत नाही.
आज जगभरच योनी, योनीपटल, बलात्कार, कौमार्य, मातृत्व या विषयांवर अतिशय महत्त्वाची व अभ्यासपूर्ण पुस्तके प्रकाशित होत आहेत. स्त्रीस्वातंत्र्य आणि स्त्रीसौख्य असा गाभा असणारी ही पुस्तके प्रामुख्याने स्त्रिया लिहीत आहेत. आपल्या अवयवाची हेटाळणी व निंदा पुरुष का करतात आणि त्या अवयवावरूनच स्त्रीचे चारित्र्य व बुद्धिमत्ता कशी ठरवतात, याचा जागतिक आढावा, या पुस्तकात घेतलेला असतो.
महत्त्वाचे म्हणजे मुस्लीम राष्ट्रांतल्या अनेक लेखिका कौमार्य, फिमेल जेनिटल म्युटिलेशन अर्थात एफजीएम (योनीसुंता), लैंगिक सुख इत्यादी विषयांवर खुलेआम निर्धास्त लिहू-बोलू लागल्या आहेत. आफ्रिकन इस्लामी देशांत सुंताविरोधी चळवळ सुरू झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक आरोग्य संघटना यांचा तिला पाठिंबा आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य परतू लागले आहे. आता तिथे तालिबान्यांची सत्ता पुन्हा स्थापन झाली की, मुली व महिला यांच्यावर प्रचंड जुलूम होण्याची भीती तिथल्या स्त्रिया व्यक्त करू लागल्या आहेत. बालविवाह, बलात्कार, गर्भधारणा, कुमारीमाता असे प्रश्न पुन्हा तिथे ‘आ’ वासून उभे राहणार आहेत.
हे तालिबानी अवघडभाई, अवघडुद्दिन किंवा अवघडखान आपल्याकडच्या संस्कृतीरक्षकांचे सख्खे भाऊच नाहीत का? आपले देशी संस्कृतीरक्षक मवाळ अन सौम्य असतात आणि अफगाणी तालिबानी उग्र व हिंसक असतात, असा भेद करणे व्यर्थ आहे. ते एकजात स्त्रीनिंदक, स्त्रीद्वेष्टे अन तरीही बलात्कारी आहेत. उपभोग व मनोरंजन, संततीवाढ आणि सेवा एवढ्यासाठीच त्यांना स्त्री हवी असते. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती उघडपणे स्त्रीनिंदक होते. त्यांची तशी वक्तव्ये प्रसिद्ध आहेत. नेते असे असतात, तेव्हा त्यांचे अनुयायी म्हणवणारे आणि राजकीय तत्त्वज्ञानाचा आधार घेणारे विकृत स्त्रीद्वेष जाहीर करत सुटतात. त्यातून अत्याचार वाढतात.
शिवाय विषमता, अन्याय, दूजाभाव पसरतो. बालमनांवर तो परिणाम करतो आणि मोठी होता होता ही मुले स्त्रीला हीन, हिणकस ठरवू लागतात. अशा पिढीचे व त्या देशाचे अध:पतन झपाट्याने होत असते. हिटलरने तसे जर्मनीचे केले आणि अनेक मुस्लीम हुकूमशहांनी त्यांच्या देशांचे. मोदी व भाजप त्यांच्या काळात तसेच करत आहेत. ममता बॅनर्जींविरुद्धच्या प्रचाराचा दर्जा सर्वांनी पाहिला. त्या एकमेव मुख्यमंत्री महिलेला सळो की पळो करणारी विचारधारा पुरषवर्चस्ववादीच आहे. त्यांना सोनिया गांधी नकोत, ममता नकोत नि मायावतीही नकोत. सुषमा स्वराज, उमा भारती, स्मृती इराणी, मीनाक्षी लेखी यांची ‘जागा’ त्यांना दाखवण्यात आली!
या विकृत व वेड्या पुरुष वर्चस्ववादी वृत्तीमुळे थोर पंजाबी संत व सूफी कवी बाबा बुल्ले शाह यांचे काव्य मराठीत ना कुणी उच्चारते, ना अनुवादते. पंजाबीत ‘बुल्ला’ या शब्दाचा अर्थ ईश्वर असा आहे. ‘अब्दुल्लाह’ असे पूर्ण नाव असणाऱ्या बाबांना लोकांनी लाडाने ‘बुल्लाशाह’ असे पंजाबीत संबोधायला सुरुवात केली. पण मराठीत त्यांची संतवाणी कोणीही गायली नाही. का? एवढा मोठा सूफी संत मराठीत केवळ त्या नामसाध्यर्म्यामुळे अवतरत नाही, हा विकृत्तीचा कळस झाला! पंजाबातल्या नामवंत गायकांनी त्यांची भजने व दोहे फार सुंदर म्हटले आहेत. महाराष्ट्राला कबीर, सूरदास, तुलसीदास माहीत होतात अन् बुल्लेशाह होत नाहीत, याचे कारण हे असे येडपट!
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
लिंगपूजक करोडोच्या संख्येने असणाऱ्या भारतात या नावाने अवघडलेपणा यावा, ही खरोखर नादानी आहे. ‘शिवलिंग’, ‘महालिंग’, ‘गुरूलिंग’, ‘लिंगप्पा’ वगैरे नावांचे कित्येक नागरिक आहेत. त्यांना काय लिंग व पिंड यांचे वास्तव ठाऊक नाही? भक्तीभावपूर्वक स्वीकारलेले नाव अश्लील का वाटावे?
महाराष्ट्र अश्लीलतेचे खटले अन कज्जे करण्यात मात्र भलता आघाडीवर. गांधीजींवर वसंत दत्तात्रय गुर्जर यांनी लिहिलेली एक पोस्टर कविता चक्क संघवाल्यांना अश्लील वाटली… म्हणून त्यांनी सुमारे ३५ वर्षांपूर्वी आमचे मित्र कॉ. देविदास तुळजापूरकर यांना (त्यांनी ती बँक कर्मचाऱ्यांच्या बुलेटिनमध्ये छापली म्हणून) थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत खेचले. आश्चर्य असे की, अश्लीलतेवर भरपूर वाद झाल्यावर न्या. दीपक मिश्रा यांनी सारे प्रकरण परत लातूरच्या न्यायालयात पाठवून दिले.
रघुनाथ धोंडो कर्वे हे लैंगिक विषयांवर ‘समाजस्वास्थ्य’ नावाचे प्रबोधक मासिक २०, ३०, ४०, ५०च्या दशकात चालवत. त्यांनाही पुणेरी संस्कृतीरक्षकांनी न्यायालयात खेचले. एका खटल्याचे कर्व्यांचे वकील खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहिले होते. अशा कर्व्यांचे म्हणणे बघू व समारोप करू :
“माझ्या मते अश्लीलता असे काही नसतेच. तसे काही असते असे ज्यांस वाटत असेल, त्यांनी पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत – १. अश्लीलतेची समर्पक व्याख्या आजपर्यंत कोणासही करता आलेली नाही, ती का?” २. इतर सर्व प्राणी रस्त्यातदेखील नागवे हिंडलेले चालतात, त्यांना कोणीही अश्लील म्हणत नाही, मग मनुष्याचे शरीर तेवढे अश्लील कसे? हे मनुष्याच्या श्रेष्ठतेचे द्योतक आहे काय? ३. सामान्यत: शरीराचे जे भाग दिसू देण्याची पद्धत नाही, त्यांना लोक ‘अश्लील’ समजतात. उत्तर हिंदुस्थानातल्या एका बाईने हल्ली बायका नागव्या डोक्याने हिंडू लागल्या आहेत, असे लिहिले आहे. देशकालमानाने शरीराचा कमीअधिक भाग उघडा ठेवण्याची पद्धत दिसते आणि काही ठिकाणी पूर्ण नग्नताही दिसते. मग शरीराचे अमूकच भाग अश्लील कसे? ४. तरीदेखील लोक स्त्री-पुरुषाची जननेंद्रिये, स्त्रियांचे स्तन आणि जननेंद्रियांची चालू नावे आणि रतिक्रिडा इतक्या गोष्टी अश्लील समजतात, असे दिसते. ज्या क्रियेमुळे आपली सर्वांची उत्पत्ती झाली ती क्रिया, ज्यामुळे शक्य होते ती इंद्रिये आणि मुलाचे ज्यामुळे पोषण होते ते स्तन ‘अश्लील’ का म्हणायचे? ५. काही लोक ‘ग्राम्य’ म्हणजे ‘अश्लील’ असे समजतात. याचा अर्थ इतकाच होतो की, सामान्य, अशिक्षित माणसांना जे शब्द समजतात ते अश्लील. आणि जे केवळ सुशिक्षित लोकांस समजतात ते अश्लील नाहीत, असे का? ६. मतांसंबंधी विचार केल्यास व्यभिचार करावा हे मत जर अश्लील असते, तर तो करू नये हेदेखील अश्लीलच होईल; कारण दोहोंत ही कल्पना एकच आहे. ७. असे नसेल तर कोणते मत अश्लील आणि कोणते नाही? सनातन्यांना किंवा मॅजिस्ट्रेटला पसंत नसलेले मत अश्लील समजायचे काय?” (रधों - ‘समाजस्वास्थ्यकार’ – अनंत देशमुख, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१०, पान – १३४-३५)
..................................................................................................................................................................
हेही पहा\वाचा : अवघड जागेतले दु:ख आणि दुखणाईत समीक्षा - जयदेव डोळे
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment