अजूनकाही
कंपनीत तीन-साडेतीन ही वेळ चहाची असते. आम्ही सात-आठ लोक नेहमी चहाला सेक्शनच्या गच्चीवर जमतो. चहा फक्त निमित्त, गप्पा महत्त्वाच्या. १०-१५ मिनिटं मस्त गप्पा मारून होतात. विषय काय तर - राजकारण, क्रिकेट, सिनेमा, साहित्य, काव्यशास्त्रविनोद. कुठल्याही विषयावर गप्पा रंगतात. कालपासून मात्र जरा गंभीर विषयावरच गप्पा झडत आहेत. सोमवारी इन्फोसिसमधल्या रसिला राजू ओपी नावाच्या एका इंजीनिअर मुलीचा सुरक्षा रक्षकाकडूनच खून झाल्याची बातमी आली.
हल्ली अशा बातम्या ऐकून आमच्या सेक्शनच्या लोकांनी प्रतिक्रिया देणंच कमी केलं आहे. एक प्रकारचा कोडगेपणा आलाय. त्यातून कुणीतरी संजय लीला भन्साळीच्या कानफटात मारली, ही एक बातमी आलेला. हा एवढा महत्त्वाचा राष्ट्रीय विषय असताना एका साध्या काम करणाऱ्या मुलीच्या खुनाची चर्चा ती काय करायची!
या वर्षीच्या सुरुवाती पासूनच अशा घटना घडताना सतत पाहतोय, ऐकतोय. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी बेंगलोरमध्ये भररस्त्यात महिलांचा विनयभंग केल्याचा तो किळसवाणा प्रकार घडला, ते आता परवा इन्फोसिसमध्ये घडलेला प्रकार यां दरम्यान अशा अनेक घटना घडल्या आहेत. रसिलाचा खून झाल्यावर पुण्यातच पुन्हा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बलात्कार आणि फसवणूक झाल्याचं वाचलं. या गोष्टीवर माझी माझ्या बायकोशी नेहमी चर्चा होते. तिच्यामुळेच माझ या विषयावर बऱ्यापैकी प्रबोधन होऊ लागलंय. प्रश्न फक्त या किंवा अशा सतत घडणाऱ्या घटनांचा नाही, तर एकंदरीत पुरुषी मानसिकतेचा आहे, हे सांगायला काही कुणा तज्ज्ञाची गरज नाही. काय आहे ही मानसिकता? नक्की कुठे आणि कुणाचं चुकतंय?
माझी पत्नी वसुधा मानसोपचारतज्ज्ञ आहे. ती लहान/ किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन, मार्गदर्शन करण्याचं काम करते. तिचं पदव्युत्तर शिक्षण गुन्हेगारी मानसिकता या विषयातलं आहे. या बरोबरच मी सुझान ब्राऊन मिल्लर हिच्या ‘Against our will- Men Women and Rape’ या पुस्तकाचा तसेच You tube वरील BBCच्या ‘Documentary on Women’s liberation movement.’ चा प्रामुख्याने आधार घेतला आहे. शिवाय इतर अनेक Documentaries, articles, मराठी लेख, फेस बुकवरील बातम्या, पोस्ट आणि त्यांवरच्या प्रतिक्रिया. थोडक्यात इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा उपयोग केलेला आहे.
भारतामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक/शारीरिक अत्याचारांचे प्रमाण पाहिल्यावर एखाद्या महामारी / साथीच्या रोगाची आठवण होते. (आणि कदाचित त्यामुळेच) या विषयाबाबत समाजात एक प्रकारचा कोडगेपणा हल्ली येऊ लागला आहे असं वाटू लागलंय. मागे झालेल्या निर्भया प्रकरणाच्या वेळी किंवा नुकत्याच बेंगलोरमध्ये झालेल्या प्रकाराच्या वेळी अबू आझमीसारख्या काहींनी उधळलेली मुक्ताफळे पहिली/ऐकली की, हा कोडगेपणा वाढत चालला आहे हे जाणवू लागतं. या अबू आझमी आणि त्याच्या मुलासारख्यांच्या निरनिराळ्या विधानांमुळेच मी या प्रकरणाचा जास्त विचार करू लागलो. कारण ही माणसं मूर्ख नसतात. ती अनवधानाने, चुकून असं फारसं काही कधी बोलत नसतात. ती जे बोलतात ते त्यांचा जो मतदार वर्ग असतो, त्यांच्या मानसिकतेला धरून असतं. त्यांच्या मतदात्यांच्या भावनांना फारसा धक्का न लावण्याचं, उलटपक्षी बऱ्याचदा त्यांना गोंजारायचं काम या प्रतिक्रिया करतात. म्हणजे त्यांनी कुठेही विनयभंग किंवा बलात्कार योग्य आहे असं म्हटलेलं नाही, पण त्याची बरीचशी जबाबदारी त्या त्या मुलींवर टाकून ते मोकळे झाले. खरंच असं असतं का? स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात बलात्कार हा सगळ्यात क्रूर, विकृत मनाला जातो. म्हणजे दुजाभाव, गुलामी, मारहाण ते अगदी जीव घेणं, विनयभंग आणि सगळ्यात भयंकर म्हणजे बलात्कार अशी काहीशी महिला अत्याचारांची चढती भाजणी लोक मानतात.
बलात्कार का होतो?
अगदी सर्वसामान्य माणूस ते विचारवंत (बरेचसे, सगळे नाही आणि यात स्त्रियाही येतात) यांच्यामध्ये मला सर्वसाधारणपणे पुढील विचार आढळतात.
- बलात्कार करणारे पुरुष अडाणी, अशिक्षित, विकृत, खेडवळ, असंस्कृत, बुरसटलेल्या विचारांचे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात.
- बलात्काराच्या शिकार झालेल्या स्त्रिया या गरीब ते मध्यमवर्गीय गटातल्या, नोकरी-कामधंदा करणाऱ्या, तोकडे किंवा पाश्चात्य (modern?) पद्धतीचे कपडे घालणाऱ्या रात्री उशिरा घराबाहेर राहणाऱ्या (नोकरी, काम शिक्षण किंवा अगदी मौज मजेसाठीही), fashion(!) करणाऱ्या असतात.
- पुरुषांना बऱ्याचदा त्यांच्या कामोत्तेजना शमवता न आल्यामुळे बलात्कार होतात ( कामाकरता बाहेर राहिल्याने कुटुंब आणि बायकोशी संपर्क न राहिल्यामुळे?)
- सध्याच्या काळात सगळीकडे सिनेमा,मालिका, जाहिरातीमध्ये स्त्रियांना उत्तेजक /उत्तान अश्लील हावभाव/ वर्तन करताना दाखवतात किंवा पोर्नफिल्म्सचा सूळसुळाट झाल्यामुळे.
ही यादी अजून कितीही लांबवता येईल पण ढोबळ मानाने अशा प्रतिक्रियाच येतात. या प्रतिक्रिया तीन विभागात वर्गीकृत करता येतात- १. भूमिका भंग, २. मर्यादा भंग आणि ३. औचित्यभंग किंवा धार्मिक/ सांस्कृतिक सीमांचं उल्लंघन.
१. भूमिका भंग
पुरुषांनी स्त्रियांचं रक्षण करायचं असतं आणि तसं करायच्या ऐवजी तेच त्यांचं शोषण करू लागतात किंवा पुरुष स्त्रियांचं/ त्यांच्या अधिकारांचं, लज्जेचं, अब्रूचं रक्षण करण्यात कमी पडतात. म्हणजे उदा. पोलीस हे कायद्याचे रक्षक, पण जेव्हा तेच कायद्याचे उल्लंघन करतात तेव्हा ते रक्षक न राहता भक्षक बनतात किंवा ते कमी पडतात तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो. अशी काहीशी ही भूमिका/ प्रतिक्रिया आहे.
२. मर्यादा भंग
स्त्रियांच्या चालण्या-बोलण्या-वागण्याच्या काही विशिष्ट मर्यादा असतात. त्यांचं त्या उल्लंघन करतात. त्यामुळे त्या स्वत:ला अशा धोकादायक परिस्थितीत टाकतात. त्यामुळे अशावेळी घडणाऱ्या घटनांना त्याच काही किंवा बऱ्याच अंशी जबाबदार असतात.
३. औचित्यभंग किंवा धार्मिक/ सांस्कृतिक सीमांचं उल्लंघन
भारतासारख्या अध्यात्मिकदृष्ट्या/सांस्कृतिकदृष्ट्या उन्नत देशात पाश्चात्य विचाराचं/ संस्कृतीचं अतिक्रमण झाल्याने आपली मूळ संस्कृती /विचारधारा दूषित होऊन पाश्चात्यांच्या भोगवादी संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे सध्या बलात्कारांचं/ विनयभंगाचं प्रमाण वाढलं आहे.
इथं एक मुद्दा मला स्पष्ट केला पाहिजे. या प्रतिक्रिया पूर्णपणे बरोबर, पूर्णपणे चूक किंवा अंशत: चूक आहेत किंवा मला त्या मान्य आहेत असं सांगण्याचा उद्देश नाहीये. सर्वसामान्य माणूस जो विनयभंग/ बलात्कार हे गंभीर अपराध मानतो, अशा दोषी लोकांना कडक, अगदी कायद्यानं शक्य नसलेल्या शिक्षा द्यायला हव्यात असंही म्हणतो. (उदा. भर चौकात फासावर लटकावणे, हात, पाय ते अगदी लिंग तोडणं अशा) त्यांच्या दृष्टीने या गंभीर गुन्ह्यामागची ही सर्वसाधारण कारणमीमांसा आहे.
सर्वसामान्य माणसं ते अगदी धर्मगुरू मग ते हिंदू असो मुसलमान असो व अन्य कोणत्याही धर्माचे, ‘आपापला किंवा सगळेच धर्म स्त्रियांचा आदर करतात आणि स्त्रियांचे अब्रूहनन करण्याला महापाप मानतात, ’ असंच हिरीरीने सांगतात. स्त्रीशी कसं वागावं / तिला सन्मान कसा द्यावा याचं वर्णन आपापल्या धर्मात कसं व्यवस्थित सांगितलं आहे याचे दाखलेही देतात. म्हणून या गुन्ह्यांबद्दलची धार्मिक भूमिका हीसुद्धा याच सदरात घेतली आहे.
भूमिका
समाजाचा (फक्त भारतीय नाही) स्त्रीविषयक दृष्टीकोन हा सगळ्यात गोंधळाचा आणि वाट चुकलेला दृष्टीकोन आहे. सर्वसामान्य माणूस मग तो स्त्री असो व पुरुष, गरीब असो व श्रीमंत, अशिक्षित असो व अगदी सुशिक्षित विचारवंत, त्याच्या मनात स्त्रीचं सामाजिक स्थान काय आहे या प्रश्नावर एकंदरीत या प्रश्नाच्या उत्तराची फलश्रुती अवलंबून आहे. माणूस सामाजिक प्राणी आहे असं आपण अगदी लहानपणापासून शिकतो. समाज म्हटलं की, त्यातल्या प्रत्येक घटकाचं समाजातलं स्थान, कर्तव्य, जबाबदारी आणि तदनुषंगिक मिळणारे लाभहि आले. मग यात स्त्रीचं स्थान नक्की कुठे आहे? जगातल्या जवळपास सर्व संस्कृतींमध्ये स्त्रीचं स्थान हे माणूस म्हणून नाही तर एक वस्तू किंवा सेवा पुरवणारी व्यवस्था म्हणूनच आहे. हे इतक्या नागडेपणाने कुणी मांडत नसलं तरी सर्व धर्म आणि संस्कृतींचा स्त्रीविषयक दृष्टीकोणाचा तोच गाभा आहे. स्त्री ही माणूस नसून एक वस्तू किंवा सेवा पुरवणारी पद्धती आहे. म्हणजेच ती कुठल्यातरी पुरुषाची खाजगी मालमत्ता आहे, असं मानलं गेल्यामुळे स्त्रीविषयी जाहीरपणे बोलताना, उल्लेख करताना आणि प्रत्यक्ष वागताना अशा विरोधाभासी वाटणाऱ्या गोष्टी घडतात.
तुम्ही जेव्हा स्त्रीला देवी-देवता मानता किंवा तिला सर्व पापाचं मूळ कारण/ आगर मानता, तेव्हा त्यातून तिचा माणूसपणा हिरावून घेता, हे कदाचित कोणाला जाणवत नसावं. पण तसं करताना तिला दुय्यम मनुष्यत्व (sub human status) दिलं जातं. एखाद्याची जशी घर, गाडी, पैसा, इतर कमी अधिक मौल्यवान मालमत्ता असते, तशीच त्याची स्त्री ही मालमत्ताच असते. आपली चीज वस्तू आपण निष्काळजीपणे इकडे तिकडे कुठेही ठेवली, तर जसे ती चोरी होण्याचा, इतरांनी तिचा वापर करण्याचा धोका उत्पन्न होतो, तसंच स्त्रीचंही होतं. आपापली मौल्यवान चीज वस्तू आपण सांभाळली पाहिजे, असाच या सगळ्या विधानांचा अर्थ असतो.
एकंदरीत काय तर भूमिका असे मी जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या भूमिकांचा विसर पडणं किंवा त्यांचं उल्लंघन केलं जाणं (अगदी पुरुषांकडूनही) हे या समस्येचं मूळ कारण नसून मुळात चुकीची भूमिका हेच आहे. ती म्हणजे स्त्री ही कुणाची तरी खाजगी मालमत्ता आहे आणि तिचं ज्याचं त्यानं तसंच समाजाने रक्षण करावं. तिची चोरी किंवा नासधूस करू नये.
(उत्तरार्ध उद्याच्या अंकात)
……………………
लेखक टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
aditya.korde@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment