लैंगिक शिक्षणाचा घरोबा
अर्धेजग - कळीचे प्रश्न
महेंद्र कदम
  • ‘बालक-पालक’ या चित्रपटातील एक दृश्य.
  • Sat , 22 October 2016
  • महेंद्र कदम Mahendra Kadam लैंगिक शिक्षण

आम्ही साधारण नववीत असताना ‘प्यार झुकता नहीं’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यात आपल्या प्रेयसीच्या शोधात निघालेला मिथून चक्रवर्ती प्रत्येक झाडावर बदाम कोरून त्यात तिच्या नावाची आद्याक्षरं काढतो. आम्ही हा सिनेमा पाहिला, तेव्हा अख्ख्या कुर्डुवाडी शहरात एकही झाड रिकामं नव्हतं. मग आम्ही झाडावर चढून बदाम कोरण्याचं आणि त्यात वर्गातल्या मुलीचं नाव टाकण्याचे पराक्रम केले होते! अर्थात ते कुणी पाहणार नव्हतं, हा भाग अलाहिदा. तरीही हे उद्योग करण्यामागे एक सुप्त आकर्षण होतं. ही मानवाची उपजत प्रेरणा आहे.

 तर मुद्दा असा की, प्रेमाच्या या भावना सदा-सर्वकाळ चिरंतन राहणाऱ्या आहेत. प्रश्न आहे तो त्या कशा व्यक्त करायच्या? त्या व्यक्त होण्याची कोंडी झाली की, त्यातून हळूहळू विकृती सुरू होते. ही विकृती वाढत्या वयाबरोबर कमी होण्याऐवजी वाढत जाते. परंतु आमच्या काळी ती कमी होण्याची साधनं अवतीभोवती होती. म्हणजे एकतर सभोवताल ग्रामीण होता. त्यामुळे अवतीभोवती गायी-गुरं, जनावरं, पक्षी, कीटक वगैरे घटक पुष्कळ होते. या सगळ्या विश्वाच्या सानिध्यात वाढताना त्यांच्या लैंगिक क्रिया पाहायला मिळत होत्या. त्यातून एक प्रकारचं विरेचन होत होतं. ते कमी की काय म्हणून गावात काही म्हातारी माणसं बाकीच्या संस्काराबरोबर लैंगिक माहितीही कळत-नकळतपणे देत होते. त्यात चेष्टेचा तर कधी आत्मप्रौढीचा दर्पही असायचा. ही म्हातारी माणसं अभ्यासाच्या आणि जगण्याच्या ज्ञानाबरोबर हे असलंही ज्ञान देवळात, चावडीत बसून हमखास द्यायची. त्यातून काही एक विरेचन घडतच होतं. कारण याची खरी गरज वाढत्या वयाच्या मुलांना असायची. ही मुलं बाहेर असली तरी त्यांच्यावर एक प्रकारची या माणसांची सेन्सॉरशीप असायची. ज्ञानाची ही मजा आणि बदल्यात निसर्गातून मिळणारं प्रत्यक्ष विरेचनात्मक ज्ञान, यांमुळे विकृती वाढत नव्हत्या. त्या अशा झाडांवर, कधी रानातल्या दगडांवर कोरल्या जाऊन नाहीशा होत होत्या.

पूर्वी घरात बरीच मंडळी असायची. विशेषत: म्हाताऱ्या स्त्रियांपासून लहान मुलींपर्यंत अनेक स्त्रिया घरात असायच्या. त्यामुळे लहानपणी नग्न दिसणारी अल्लड मुलगी मोठेपणी कशी असते हेही कळायचं आणि तीच म्हातारी झाल्यावर कोणत्या अवस्थेत जाते, याचंही दर्शन घरातच घडत होतं. या म्हाताऱ्या स्त्रिया घरात सगळ्यांच्या वागण्यावर नियंत्रण ठेवत होत्या. त्यामुळे आपोआप नजर मरत होती. विरेचन होत होतं. नाती आणि त्यातील हळुवारपणा, जबाबदाऱ्या कळत होत्या. जेव्हा आम्ही एम.ए.साठी होस्टेलला गेलो, तेव्हा सायंकाळी तिथून फिरायला जाणाऱ्या चाळिशीच्या स्त्रियांना पाहून शिट्या वाजवायचो. कारण अवतीभोवती फक्त मुलांचा बाजार असायचा, स्त्रियांचं दर्शन दुर्मीळ होतं. त्याचा हा परिणाम होता.

तर या एकत्र कुटुंबाच्या वास्तव्यातून  आणि सामाजिक सेन्सॉरशीपमधून एक भान वाढत्या वयाबरोबर तरुणांना येत होतं.

 हे नोंदवण्याचं कारण असं की, लैंगिक अत्याचार करणारी मंडळी एकतर प्रौढ पुरुष किंवा नुकतीच वयात आलेली मुलं असतात; असं किमान आजचं तरी निरीक्षण आहे. तसंच या विकृतीमागे आजच्या काळाचे काही परिणाम आहेत, ते आपण ध्यानात घ्यायला हवेत. एकतर आपण प्राणीविश्वापासून तुटलो. त्यामुळे सहज उपलब्ध असणारं ज्ञान संपुष्टात आलं. गावं सुटली. माणूस एकटा पडला. कुटुंबं त्रिकोणी किंवा फारतर चौकोनी झाली. त्यामुळे घरातील स्त्रियांच्या वावरामुळे नजरेमार्फत होणारं विरेचन थांबलं. माहिती पुरवणारी मंदिरातील, चौकातील म्हातारी माणसं नाहीशी झाली. हे सगळं संपताना आपल्या हातात अचानक एकदम स्मार्ट मोबाईल आले; आणि एका क्लिकबरोबर सारं सेक्सविषयक ज्ञान विकृत, बिभत्स अणि उघड्यावाघड्या रूपात मुलांच्या हातात आलं. टीव्हीवरील जाहिराती आणि सिनेमांमधून स्त्रियांची उत्तान चित्रं आणि प्रसंग नेहमीच पाहायला मिळू लागले. या सगळ्याबद्दल आता वाईट वाटून घेण्यात अर्थ नाही. पण त्यातून आवश्यक असणाऱ्या माहितीवर सेन्सॉरशीप राहिली नाही. त्यामुळे जे जग आपल्याला भासात्मक रूपात उपलब्ध आहे, ते प्रत्यक्षात मिळायला हवं, या लालसेतून अत्याचाराचे प्रकार वाढत चालले आहेत.

पूर्वी असलं काही घडत नव्हतं अशातला भाग नाही; पण आता ते प्रमाण चिंता करण्याइतपत वाढलं आहे. त्यामुळे लैंगिक शिक्षणाची गरज आज निकडीची बनली आहे. कारण अलीकडे लहान मुलींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. यामागे जी अनेक कारणं आहेत, त्यातलं महत्त्वाचं कारण लैंगिक शिक्षणाचा अभाव हे आहे. मोबाईलमुळे सगळं जग मुठीत आलं तशी लैंगिक विकृतीही मुठीत आली आहे. याबद्दल आपण जो गंभीर विचार करायला हवा; तो केलेला नाही. बाहेरचं राहू द्या, घरात तरी त्यावर मुलांशी नीट बोलायला हवं. यासाठी मी माझ्या घरातली उदाहरणं देतो.

एकदा घरात आम्ही सगळे, म्हणजे बायको आणि मुलं ‘थ्री एडिटस्’ बघत होतो. त्यात अमीर खान आणि त्याचे मित्र रट्टा मारून पहिला नंबर मिळवणाऱ्या चतुरचं गँदरिंगचं भाषण बदलतात. त्या भाषणात तो ‘स्थान’ऐवजी 'स्तन' असा शब्द उच्चारतो, तेव्हा अख्खं सभागृह हसू लागल्यावर आमच्या मोठ्या मुलानं मला विचारलं,

 'बाबा, स्तन म्हणजे काय?' त्यावर त्याची आई म्हणाली,

'तुला काय करायच्यात अशा चौकशा? गप्प बस'. मीही गप्प बसलो. सिनेमा बघितला. मग ती उठून गेल्यावर त्याला म्हणालो, ‘दादो, लहानपणी तुला दात नसताना आईनं जे दूध पाजलं, ते दूध साठवण्याची आईच्या छातीची उंचवट्यांची जी जागा आहे ना, त्याला स्तन म्हणतात.’

त्यावर तो म्हणाला, ‘मग यात हसण्यासारखं कायाय?’ 

मी समजावलं, 'मूळ शब्द जो ‘स्थान’ होता तो नीट न उच्चारल्यामुळे हसले सगळे.'  तर तो खूश झाला, त्याचा गैरसमज पण वाढला नाही. नंतर मी माझ्या बायकोलाही ‘मुलांना असं निरुत्तरीत करणं बरं नाही. तू नाही सांगितलं तर ती ही माहिती बाहेरून कुठूनही मिळवतील आणि ती नीटच असेल कशावरून? तेव्हा असं काही विचारलं तर टाळून चालणार नाही,’ असं समजावून सांगितलं.

नंतर असंच एकदा ते दोघं भावंडं खेळत असताना त्यांचे ओठ एकमेकांना लागल्यावर हसायला लागले. तसं मी म्हणालो, 'पायाला पाय, हाताला हात लागल्यावर तुम्ही हसत नाही, मग आता का हसता? यात वाईट किंवा हसण्यासारखं काही नसतं. सिनेमा फार गंभीरपणे घ्यायचा नसतो. त्यातलं काही सगळंच आता या वयात मनावर घ्यायचं नसतं.’

घरात आपण टीव्ही पाहताना मुलांचा फार विचार करत नाही. जर आपण लैंगिक दर्शन घडवणारं काही पाहत असू तर अचानक चॅनल बदलता कामा नये. एकतर  आपण पाहू नये आणि तसा प्रसंग आला तर तो मुलांना बघू द्यावा. त्यातील लैंगिकता बाजूला सारून नैसर्गिकता त्यांना समजून सांगायला हवी. नाहीतर तुम्ही पाहताय आणि आम्हाला बघू देत नाही म्हणजे काहीतरी दडपण्यासारखं आहे, अशी मुलांची भावना प्रबळ बनते. त्यातून मग ती वाट्टेल तिथून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. एकतर टीव्हीमुळे आणि मोबाईलमुळे वातावरण बिघडू लागलं आहे. परवा परवापर्यंत माझ्याकडे टीव्ही नव्हता. माझा मोठा मुलगा आता इंजिनिअरींगला गेला आहे. त्याला बारावीपर्यंत, तो बाहेर असूनही, मोबाईल घेऊन दिला नव्हता. दुसरा दहावीत आहे. काही अडचण वाटत नव्हती. आता घरातला टीव्ही दिवसभर बिलकूल चालू नसतो. रात्री तासभर बातम्यासांठी लावतो. बऱ्याच वेळेला आम्ही महिना महिना रिचार्ज करत नाही. मुद्दा हा की, आपण मुलांना त्यात गुंतण्यापासून सहजपणे थांबवू शकतो. गरज आहे आपण आपले मोह आवरण्याची. अनेकदा आपणच टीव्हीपुढे बसून मुलांना अभ्यास करावयास सांगतो, हे चुकीचं आहे.  समजा त्यातूनही मुलांनी काही पाहिलं तर त्यावर चर्चा करायची तयारी ठेवली पाहिजे.

मुद्दा हा की, लैंगिक शिक्षणाचा हा मोकळेपणा जो पूर्वी आपल्या कळत-नकळत घरी, गावी होता, तो आता राहिला नाही; किंवा तो फारच चांगला होता आणि आता तो नव्याने रुजवायला हवा असंही नाही. त्याला आता आपण पर्यायही देऊ शकत नाही. अशा वेळी आपणाला सर्वप्रथम हे शिक्षण घरातच सुरू करायला हवं. बाहेरचं औपचारिक शिक्षण तर व्हायलाच हवं. पण घरातलंही शिक्षण गरजेचं आहे. या शिक्षणात आई-वडलांनाच पुढाकार घ्यावा लागेल. हा पुढाकार घेताना आपणाला त्यांचं मित्रत्व स्वीकारायला हवं. मुला-मुलीला समान वाढवायला हवं. सिमॉन दि बोवा म्हणते- ‘मुलगी जन्मत नसते, तिला मुलगी म्हणून घरात वाढवलं जातं.’ ते टाळून घरात मोकळेपणा असायला हवा. बऱ्याचदा घरातच आपण विषमतेची आणि विकृतीची बिजं वाढवत असतो. तीच पुढे रस्त्यावर येतात. ती टाळण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

आणखी एक, स्त्री-पुरुष संबंधाकडे जात, धर्म, मालक, फसवणूक, बदला, उपभोग या अंगाने न पाहता, त्यातील निखळपणा आणि विकृतीकरण याच अंगानं पाहावं. मालकी आणि जात वगैरे आली की, आपण वैचारिक पातळीवरदेखील अधिक पाशवी बनत जातो. स्त्रीकडे माणूस म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन नसतो. आपली अडचण अशी की, आपण तिच्यातल्या आईला फक्त सन्मानित करतो आणि बाकीची बहीण, बायको वगैरे नाती पायदळी तुडवतो. पुन्हा गंभीर पण गंमत अशी की, आम्ही सगळ्या शिव्या आईशी आणि लैंगिकतेशी संबंधितच देत असतो. यातून नकळतपणे मुलांना स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू व विकृती म्हणून पाहायला शिकवलं जातं. मी घरात बायकोलाच मुलांचा पालक म्हणून भूमिका पार पाडायला लावतो. मुलांच्या सगळ्या कागदपत्रांवर पालक म्हणून तिच्याच सह्या असतात. मी कायम ‘बापापेक्षा आई किती अधिक कष्ट करते, ती तुम्हाला अधिक कसं जपते’ हे सांगतो. त्याचा परिणाम असा झाला की, दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरताना मोठ्या मुलानं त्याच्या नावापुढे माझ्या आधी आईचं नाव लावण्याचा हट्ट धरला. त्याला दहावीपर्यंत चालत आलेलं नाव लगेच बदलता येत नाही, हे समजून सांगता सांगता आम्ही थकून गेलो.

थोडक्यात, काय तर स्त्रीकडे माणूस म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वाढीस लागायला हवा. In all means, Charity begins at home & well beginning is half done, हे तत्त्व स्वीकारायला हवं.

 

लेखक विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

mahendrakadam27@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा