अजूनकाही
आठ वर्षांची प्रे उकिरड्यावर टाकलेल्या वस्तू वेचत होती. कचऱ्यातून फुटके कप, टीनचे डबे उचलताना तिला अक्षरशः रडू कोसळले. ज्या वयात तिने खेळायचे, शाळेत जायचे, त्या वयात तिला काहीही काम करून जगण्याची वेळ आली. नाहीतर तिला आणि तिच्या भाऊ-बहिणींना जेवण कसे मिळणार? स्वतःपेक्षाही तिला तिच्या लहान बहिणीची खूप काळजी वाटते. तिचा मोठा भाऊ आणि ती दिवसभर काम शोधतात. किमान दोन वेळचे काहीतरी खायला मिळेल, या आशेवर वणवण फिरतात. मिळेल ते काम करतात. या दरम्यान तिची बहीण एकटीच असते. पाच-सहा वर्षांची आपली बहीण सुरक्षित असेलच याची खात्री प्रेला नाही. तिलाही कदाचित अपप्रसंगातून जावे लागले असेल. म्हणूनच प्रेच्या बहिणीला एकटी राहण्याची प्रचंड भीती वाटते. तरी तिला तसेच सोडून ते दोघे कामाला जातात. मानवी तस्करी, शारीरिक शोषणाची टांगती तलवार या भावंडांवर असली तरी दररोज जगण्याचा संघर्ष करत ती कशीबशी जगतात.
प्रे कंबोडियाची. जागतिक हवामान बदलांमुळे प्रेसारख्या शेकडो मुलींना आपले घर सोडून विस्थापित होण्याची वेळ आली आहे. हवामान बदलातून कंबोडियातील शेकडो कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. तुमचे घर, व्यवसाय, जीवनमान सोडणे खरोखरच अशक्यप्राय घटना असते. कधी परिस्थिती संधी देते, कधी परिस्थितीशी जुळवून घेताना धक्कादायक वास्तव पुढे येते. कंबोडियातील जीवनमानावर थेट परिणाम झाला आणि हवामान बदलातून विस्थापितांचे प्रमाण वाढले. परिस्थितीने मुला-मुलींचे बालपण हिरावले आणि अशा शेकडो प्रे कसेबसे दिवस काढतात. विश्वास बसणार नाही, पण हवामान बदलाने मुलांचे बालपण धोक्यात आणले आहे.
‘प्लान इंटरनॅशनल’ ही आंतरराष्ट्रीय संस्था बालकांचे हक्क आणि मुलींना समान अधिकार या विषयावर स्वतंत्र अभ्यास करते. विकसनशील देशांमध्ये सातत्याने केलेला अभ्यास आणि ‘जागतिक हवामान बदल’ याचा मुलांवर होणारा परिणाम, याचा अहवाल या संस्थेने नुकताच प्रकाशित केला आहे. त्यातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
इतिहासात डोकावले तर लक्षात येईल की, युद्ध, अशांतता, वैमनस्य, दुष्काळ, अवर्षण, मंदीचे सर्वाधिक आणि थेट परिणाम फक्त आणि फक्त महिला आणि मुलांना सहन करावे लागले. दोन देशांतील अंतर्गत वाद असो की, महायुद्ध, यात महिलांचे शोषण झाले आणि मुलांनी आपले बालपण गमावले.
‘हवामान बदल’ अशीच आणीबाणी आहे. फक्त या आणीबाणीकडे गांभीर्याने बघण्याची आणि त्यावर आपणहून काम करण्याची मानसिकता नसल्याने हवामान बदल केवळ चर्चेपुरता उरला आहे. याच औपचारिकतेमुळे हवामान बदलाची परिणामकारकता इतकी घातक झाली आहे की, गरीब देशांचे कंबरडे मोडले. जागतिक हवामान बदलाने नुसते प्रदूषण वाढले नाही, तर पावसाचे चक्र बिघडले. दुष्काळ, अवर्षण, महापूर, चक्रीवादळासह समुद्र पातळीतील वाढ झाली. अंटार्क्टिका खंडावरील वेगाने वितळणारे विशाल हिमनग यावर सातत्याने चर्चा होतात. तज्ज्ञ जगाचा अंत जवळ आला असे ओरडून ओरडून सांगतात.
हिमालयातील हिमशिखरे वितळत आहेत. बेकायदेशीर बांधकामांनी जमीन आणि पर्वत दोघांनाही वेढले. समुद्र पातळीत वाढ झाल्याने कोलकाता, मुंबईसह बांग्लादेशचे अस्तित्व असेल का असे वेगवेगळे निष्कर्ष पुढे आले आहेत. जलप्रदूषणाने जगातील प्रवाळ (कोरल्स) नष्ट होतील असा धोका वर्तवण्यात आला. समुद्राची इको सिस्टीम प्रवाळावर अवलंबून आहे. जंगलतोडीने प्राण्यांचे अधिवास हिरावले. नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतोनात नुकसान झाले. दुष्काळ, नापिकीतून शेती उत्पादनात घट झाली आणि धान्याचा किमती वाढल्या. भारतही भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. पाण्यावर देशाचे ‘अर्थकारण’ चालते.
कार्बन उत्सर्जनातून निसर्गावरच्या मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वी मरणपंथाला पोचली. तरीही पॉलिसी मेकिंगमध्ये ठोस उपाय, प्रतिबंध आणि गरज पडल्यास निर्बंध घालावे असे निर्णय हाती येत नाहीत. जागतिक हवामान बदलातून भारतच नव्हे तर शेकडो गरीब आणि छोटे देश संघर्ष करताना दिसतात. इथे जीवन-मरणाचा संघर्ष इतका टोकाला पोचला की, बालपण संपले. शाळा असून मुलं जात नाहीत. त्यांच्यावर खेळण्याच्या वयात कुटुंबाची जबाबदारी आली आहे.
भलेही या देशांशी आपला थेट संबंध नाही, पण ‘हवामान बदला’ला भौगोलिक सीमाची पर्वा नाही. उपासमार, भूकबळी, आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष यातून होणारे कुपोषण, आजार, मातामृत्यू याला हवामान बदल तितकाच कारणीभूत ठरला आहे. हवामान बदलाचे दूरगामी परिणाम इथे दिसून येतात.
विकसनशील देशांमध्ये याचा थेट संबंध असून मुलींचे आयुष्य दावणीला बांधले गेले आहे. शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत प्रत्येक स्तरावर मुलींना तडजोड करावी लागतेय. झिम्बाब्वेच्या १३ वर्षांच्या ब्युटीला दोन वेळ पोटभर जेवणाची चिंता असते. सातत्याने पडणारा दुष्काळामुळे इथले जलस्त्रोत आटले. ब्युटीवरही पाणी वाहून आणण्याची जबाबदारी असते. दररोज सकाळी चार वाजता उठून ती अगोदर कसेबसे पाणी आणते. नंतर नऊ तास पायपीट करून शाळेत जाते. उपाशीपोटी कसली आली शाळा? कधी कधी रात्री कसेबसे जेवण मिळते. पण दररोजच्या शारीरिक श्रमातून ब्युटी इतकी थकलेली असते की, दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्याचे त्राण उरले नसते. ‘कधी कधी शाळेत जाणे खूप अवघड होते. भूकेने, तहानेने एक पाऊल उचलणे अवघड असते. पोटात भूकेचा गोळा उठतो. एक एक हाड दुखत असत.’ ब्युटी सांगत होती.
इथोओपिया हा देश गरिबीमुळे चर्चेत असतो. तिथे तर जलसंकट अधिक गहरे झाले. शालेय गळती वाढली. इथोओपियाची डिवेल ही १४ वर्षांची मुलगी. दुष्काळामुळे तिला आपली शाळा सोडावी लागली. ‘आम्ही जिथे राहतो तिथे दूरदूरपर्यंत पाणी नाही. आम्ही दररोज आठ तास चालतो. तेव्हा कुठे पाणी मिळत. नाईलाजाने मला शाळेत जाता येत नाही. कुटुंबासाठी पाणी आणण्याची जबाबदारी माझी आहे. मला गणित खूप आवडते. शिकून शिक्षक होण्याची माझी इच्छा आहे. पण शिकण्याचे वय पाणी आणण्यात जाते. माहीत नाही माझे भविष्य काय आहे.’ असे ती सांगते. ज्या वयात तिच्या खांद्यावर दप्तर हवे, त्या वयात पाठीला पाण्याची कॅन असते. फक्त भारत, पाकिस्तान, बांग्लादेशामध्येच बालविवाह होतात असे नाही, तर गरीब देशांमध्ये हे प्रमाण कमालीचे वाढले आहे.
जगातील एक तरुणांचा देश म्हणून दक्षिण सुदान ओळखला जातो. यारीचे अवघ्या १६व्या वर्षी लग्न झाले होते. ती आता १८ वर्षांची आहे. विश्वास बसणार नाही, पण हवामान बदलाचा परिणामाची वास्तविकता या घटनेतही दिसून येते. नवऱ्यासाठी जेवण बनवता बनवता यारी म्हणाली, ‘मी लग्नासाठी अजिबात तयार नव्हते. माझ्या आईने मला समजावले. तू लग्न केलेस तर तू सगळ्या कुटुंबाला उपासमारीपासून वाचवू शकतेस. तुझ्यासारखे तुझ्या भावांनाही लग्न करता येईल.’ यारीचे लग्न झाल्यावर त्यातून मिळालेल्या मोबदल्यात तिच्या कुटुंबाची उपासमार थांबली.
सुदैवाने तिचे किमान लग्न झाले. तिच्या वयाच्या लाखो मुलींना अक्षरशः वेश्याव्यवसायात ढकलले जाते. कमी वयातच मुलींना सर्व शारीरिक-मानसिक आघात सहन करावे लागतात. कमी वयातील गर्भधारणा आणि मातामृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
नैसर्गिक साधनसंपत्तीवर जीवन अवलंबून असलेल्या महिलांना हवामान बदलाचा फटका बसला. न्यू जिनिव्हाची शेतकरी फ्लोरा कुटुंबप्रमुख आहे. नारळाची शेती करणाऱ्या फ्लोराच्या समस्या वाढल्या. हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढली. हवामान बदलाचा पिकांवर होणारा परिणाम फ्लोरा सातत्याने पाहते. पण न्यू जिनिव्हामध्ये असे घडल्याने हे तिच्यासाठी आश्चर्य आहे.
जागतिक हवामान बदल मानवी आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर सविस्तर माहिती येत असली तरी सर्वसामान्य व्यक्तीला परिस्थितीपासून अलिप्त ठेवले जाते. अनेक यंत्रणा यावरच काम करतात. चीन, अमेरिकेनंतर भारत जगातील सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणारा देश आहे. जगातील सर्वाधिक २० प्रदूषित शहरांमध्ये भारतातील १५ शहरे आहेत. राजधानी दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसर (एनसीआर) मध्ये हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोकादायक पातळीवर पोचल्याने दखल सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने दिल्लीत सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. प्रदूषण नियंत्रणासाठी पाच नोव्हेंबरपर्यंत दिल्ली बांधकामावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. दिल्लीतील सर्व शाळा पाच नोव्हेंबरपर्यंत बंद होत्या. देशाच्या राजधानीत परदेशी पाहुण्यांना मास्क लावून फिरावे लागते आणि आपण फक्त प्रदूषण कोणत्या राज्याने केले, यावर चर्चा करत असू तर एक दिवस मुलांना ‘स्वच्छ हवा’ महागडे गिफ्ट म्हणून द्यावी लागेल.
तरीही स्विडनच्या ग्रेटा थनबर्गने जागतिक महासत्तांना केलेले आव्हान नव्या पिढीच्या सुज्ञ विचारांचे प्रतीक आहे. ग्रेटाने संयुक्त राष्टांच्या सभेत जागतिक नेत्यांना ‘हाऊ डेअर यू’ म्हणून सुनावले, तेव्हा संपूर्ण जग अवाक झाले. तिचे कौतुक झाले आणि टीकाही झाली. पण तिचे प्रश्न, राग आणि भूमिका स्पष्ट व खरी होती. संपूर्ण पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात आले असूनही जर महासत्ता आपल्या ‘व्यापारी’ दृष्टिकोन बाजूला ठेवत नसतील तर नवी पिढी हे प्रश्न विचारणारच. अजूनही महासत्तांनी शाश्वत विकासाकडे दुर्लक्ष केले तर शेकडो मुलांचे बालपण असेच हिरावले जाईल.
.............................................................................................................................................
‘प्लॉन इंटरनॅशनल’चा ‘CLIMATE CHANGE: FOCUS ON GIRLS AND YOUNG WOMEN’ हा अहवाल पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखिका पृथा वीर दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या औरंगाबाद कार्यालयात वार्ताहर आहेत.
manuprutha@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment