अजूनकाही
आज माझ्या मुलाच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन होतं. मी खूप घाईत होते. माझ्या घरसखीला संगीताला (नाव बदललं आहे) मी पटापट आवरायला सांगितलं. रोजच्या सूचना रोजच्यासारख्या परत दिल्या. भाजीत शेंगदाणे घाल, गाजर किसून ठेव, दाळीत तूप घाल. पण नेहमीप्रमाणे तिनं सगळं उलटंपालटं केलं. भाजीत तूप घातलं. दाळीत शेंगदाणे ओतले नि गाजर तर तिला सापडलंच नाहीत. मी खूप वैतागले, पण आज तिला ओरडायलाही मला वेळ नव्हता. मुलानं सांगितलं होतं, मला बरोबर बारा वाजता हॉलवर पोहचायचं होतं. स्नेहसंमेलनात एक नाटकुलं होणार होतं, त्यात माझ्या मुलानं भाग घेतला होता. त्याचं काम जर मी बघितलं नाही तर माझा मुलगा फार रागावला असता. मी झपाझप हॉलमध्ये पोहचले. काउंटरवर तिकीट काढायला गेले, तर तिथला बुकिंग क्लार्क खूप मंद मुलगा वाटला. त्याच्या सगळ्या हालचाली यांत्रिक होत्या. त्याच्या चेहऱ्यावर काहीच उत्साह नव्हता. त्याचा हिशेबही चुकत होता. ‘या माणसाचा पगार कधीच दहा हजारापेक्षा जास्त होऊ शकत नाही. युजलेस वर्कर, मी मनात म्हटलं. त्याच्या या वेळखाऊपणामुळे १२ वाजून गेले तरी मला हॉलमध्ये प्रवेश घेता आला नव्हता. शेवटी कशीतरी जागेवर जाऊन बसले. नाट्यप्रयोग चालू झालेला होता.
या नाटकातील गोष्ट होती एका अनाथआश्रमात वाढलेल्या मुलाची. या मुलाला त्याच्या पालकांनी तो एक दिवसाचा असतानाच अनाथाश्रमात सोडलं होतं. या बाळाला त्याच्या पहिल्या १००० दिवसांत योग्य मानसिक, भावनिक व शारिरीक पोषण मिळालेलं नसतं. त्याला पावडरचं दूध दिलं जातं. दिवसा त्यानं शी-शू केली की, पॅड बदलून त्याला परत पाळण्यात टाकलं जायचं. दुपारी एकटं असलेलं ते बाळ भूक-तहानेनं रडून रडून अर्धमेलं व्हायचं. मग कधीतरी त्याला दुधाची बाटली दिली जायची. त्याच्या डोक्यावर हात फिरवणारं, त्याच्याशी बोबडं बोलणारं, त्याचं कौडकौतुक करणारं असं कुणीही त्याच्या जवळ नव्हतं. हळूहळू ते बाळ मोठं होतं, रांगू लागतं, चालू लागतं. पण त्याची प्रेमाची व पोषणाची गरज मात्र भागली जात नाही. ओसाड जागी उगवलेल्या रानटी गवतासारखं ते मूल होतं. मोठं झाल्यावर त्या मुलाची सगळी प्रगती खुंटलेलीच राहते. या हृदयस्पर्शी नाटुकल्याचं नाव होतं - ‘पहिले १००० दिवस’.
नाटक पाहून घरी आल्यानंतर मला स्वस्थ बसवेना, बाळाच्या आयुष्यात पहिले १००० दिवस इतके महत्त्वाचे असतात याची मला याआधी माहितीच नव्हती. मग मी झपाटल्यासारखी या विषयाची जास्तीत जास्त माहिती काढू लागले. जी माहिती हाती आली, ती मला चकित करणारी होती. जन्माला आल्यानंतर पहिल्या १००० दिवसांत मुलाच्या मेंदूची वाढ सुमारे ७५ टक्के इतकी झालेली असते. या वाढीचा वेग सुमारे ३०० टक्के इतका असतो. बाळाचा मेंदू या काळात प्रत्येक सेकंदाला एक लाख न्युरॉन इतका तयार करण्याची क्षमता बाळगून असतो. इतक्या अफाट क्षमतेचा वापर भारतात जन्माला येणाऱ्या बाळाकडून होत असेल का? माझ्या १० वर्षाच्या मुलाचं भरगच्च लाडाकोडात वाढलेलं बालपण आठवत आठवत हाती येणारी ही आकडेवारी लिहून काढू लागले.
१) भारतात दरवर्षी सुमारे २.५ कोटी बाळांचा जन्म होतो. म्हणजे जगातील १८ टक्के मुलं भारतात जन्म घेतात.
२) एसडीजी (SDG) मानकानुसार भारतातला २०३० पर्यंत पाच वर्षांखालील बालकांचा मृत्युदर २५ करायचा आहे. सध्या हा दर सरासरी ३४, ग्रामीण भाग ५६, नागरी भाग ५० (NHFS-4, २०१५-१६) इतका आहे.
३) एसडीजी (SDG) मानकानुसार भारतातलं २०३० पर्यंत मातामृत्यूचं प्रमाण ७० करायचं आहे. २०१४-१६ मध्ये हा दर १३० इतका भयानक होता. (इकनाँमिक सर्व्हे ऑफ इंडिया)
४) अर्भक मृत्यूचं महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यातील प्रमाण ग्रामीण भागात १७ तर नागरी भाग ९ इतकं आहे. (२०१७)
५) आहारातून पूर्ण पोषण मिळणाऱ्या, तसंच दूधावर असणाऱ्या ६ ते २३ महिन्यापर्यंतच्या मुलांचं प्रमाण भारतात अवघं ८.७ टक्के आहे. (NHFS-4, २०१५-१६)
या सर्व टक्केवारीचा अर्थ असा आहे की, भारतातील १० टक्क्यांपेक्षाही कमी मुलांना पहिल्या १००० दिवसांत पूर्ण पोषण मिळतं. याचाच अर्थ असा आहे की, भारतातील अनेक लहान मुलं ही डायरिया, इतर संसर्गजन्य आजार, यामुळे पाच वर्षं पूर्ण व्हायच्या आधीच दगावतात. याचा दुसरा अर्थ असाही आहे की, कित्येक कुपोषित मुलांच्या आयाच बाळंतपणात दुर्दैवीरीत्या मृत्यूमुखी पडतात. आई नसलेल्या मुलांची मातेच्या अंगावरचं दूध मिळण्याची शक्यता संपते.
जरी आई व मूल दोघंही दगावली नाहीत तरी गरिबीमुळे व अज्ञानामुळे बाळाचं कुटुंब मुलाची पहिल्या १००० दिवसांतील पोषणाची गरज पूर्ण करू शकत नाही. ग्रामीण भागातली स्थिती नागरी भागापेक्षा अतिशय वाईट आहे.
तर आकडेवारीच्या अशा जंजाळात अडकलेली असतानाच मी दुपारी भाजी आणायला खाली उतरले. आमच्या बिल्डिंगची काही दिवसांपासून दुरुस्ती चालू आहे. दुरुस्ती करणारे बांधकाम मजूर कुटुंबासहित बिल्डिंगच्या जवळच आडोसा करून काही दिवसांपासून राहत आहेत. त्या कुटुंबाकडे आज मी काळजीपूर्वक पाहिलं. स्थलांतर करून धोकादायक ठिकाणी कमी मजुरीत काम करणारी ही मंडळी. त्यांच्याबरोबर त्यांच्या बायका व मुलंही होती. बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होत्या, तर त्यांची लहानगी मुलं कुठेही खेळत होती. त्यांच्यावर लक्ष ठेवायलाही त्यांची मोठी भांवंडं होती. एक छोटासा मुलगा, अंदाजे सव्वा वर्षाचा एका पिशवीतून एक शर्ट घेऊन आला. त्याला तो घालायचा होता. त्याच्या भावानं त्याचा हट्ट पुरवला. मग थोड्या वेळात त्या मुलाची आई आली. माती व धुराळ्यामुळे तो शर्ट घाण होत होता. तिनं मोठ्या मुलाला एक फटका मारला आणि छोट्या मुलाचा शर्ट काढून घेतला. ते मूल रडू लागलं. तिला रडणाऱ्या मुलाला जवळ घ्यायलाही वेळ नव्हता. तिला कामाची घाई होती. ती मुलाला तसंच सोडून निघून गेली.
पालकांच्या स्पर्शालाही पारखं झालेल्या त्या रडणाऱ्या मुलाच्या मेंदूत त्या वेळी नेमके कोणते न्यूरॉन्स तयार झाले असतील? या मुलासाठी त्याच्या आयुष्यातील १००० दिवस धोक्याचे आहेत की संधीचे? बालसंगोपनाची रजा या बाळाच्या आईला का मिळू शकत नव्हती? मी जसजशी या विषयाच्या खोलात जात होते, तसतसे मला अनेक प्रश्न पडत होते, ज्यांची उत्तरं माझ्यापाशी नव्हती.
दुसऱ्या दिवशी माझी घरसखी संगीता कामाला आली. तिला जवळ बसवून मी विचारलं, तुझ्या पहिल्या दोन वर्षांची एखादी आठवण सांग ना. तिला कळेनाच मी हे का विचारतेय. तरी ती आठवून सांगू लागली- ‘माझे वडील वारले होते. आई मला माहेरी घेऊन आली. तिथं आम्ही खूप उपवासतापास काढून मोठे झालो. शाळेत मी जायचे, पण तिथं काय शिकवतात हे माझ्या डोक्यात बसायचं नाही.’
मला संगीताची एकदम सहानुभूती वाटली. बालपणी प्रोटीनयुक्त आहार मिळाला नाही तर बाळाची वाढ खुंटते, हे सर्वज्ञात आहे. तर या अभावग्रस्त मुलीला तिच्या जन्माच्या पहिल्या १००० दिवसांत अंडी, डाळी, दूध, तूप, मासे, सुका मेवा हे पदार्थ खायला मिळालेले नाहीत. एकल माता असल्यानं तिच्या पोषणाकडे आईला योग्य ते लक्ष देता आलं नाही. या वयात तिचं भावनिक, शारिरीक कुपोषण झालं. त्याचे परिणाम तिच्या प्रौढवयातही दिसून येत आहेत. कार्यक्षमता, विसराळूपणा, स्वभावातील चिडचिडेपणा या गोष्टींचा संबंध बालपणातील पोषणाशी आहे, हे सरळ सरळ दिसत होतं.
संगीताला आता स्वतःचं एक वर्षाचं बाळ आहे. मला जे कळालं होतं, मी ते तिला सोप्या शब्दांत समजावून सांगितलं. संगीता हे ऐकून जरा चिंतीत झाली की, आता माझ्या मुलीला मी कशी वाढवू? खेळ, खाणं आणि प्रेम (EPL) ही त्रिसूत्री सांगितली. तिच्या मुलीच्या जेवणासाठी माझ्याकडून रोज शिजवलेलं अंडी, शेंगदाणे-गूळ, खिमटी, दूधाची पावडर असा आहार देण्याचंही कबूल केलं. संगीता खूप खूश झाली.
संगीतापुरता व माझ्यापुरता मी हा प्रश्न सोडवला खरा, पण भारतात दरवर्षी जन्म घेणाऱ्या २.५ करोड मुलांचा प्रश्न कोण सोडवणार? या मुलांसाठी पहिले १००० दिवस हे संधीचे असणार आहेत की धोक्याचे? मी लगबगीनं बिल्डिंगच्या खाली पाहिलं. कालपर्यंत आमच्या इथं बांधकाम करणारं ते कुटुंब आज तिथं नव्हतं. त्यांच्यासाठी बांधलेली कच्ची घरं तोडून टाकली होती. सिव्हिल कॉन्ट्रक्टरनं ट्रकमध्ये भरून त्या लोकांना कामासाठी दुसऱ्या ठिकाणी नेलं असणार. घरातील मोठ्या माणसांबरोबर ते नाकातून शेंबूड गळणारं, पोट फुगलेलं नागडे सव्वादीड वर्षाचं पोरही निघून गेलं होतं.
त्या मुलाच्या भविष्याचा रस्ता त्याला कधी दिसणार आहे का? त्याच्यासाठी पहिले १००० दिवस संधीचे कधी होणार?
हे असे प्रश्न माझ्या डोक्यात हजार घणांचे घाव घालत होते…
.............................................................................................................................................
रवीश कुमारच्या ‘द फ्री व्हॉइस’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4527/The-free-voice
............................................................................................................................................................
लेखिका शिल्पा कांबळे यांची ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी आणि ‘नऊ चाळीसची लोकल’ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे.
shilpasahirpravin@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Alka Gadgil
Thu , 08 August 2019
व्वा शिल्पा creativity आणि तथ्यांची सुरेल मिसळण तुलाच जमू शकते