अजूनकाही
काही दिवसांपूर्वी अलीगढमध्ये दीड वर्षाच्या एका मुलीची हत्या झाली. हत्यारा आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाच्या गुन्ह्यात आरोपी होता. दुर्गंध येऊ नये म्हणून त्याने मुलीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. अहवालानुसार मुलीच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर आणि डोळ्यांवर मारहाणीच्या खुणा होत्या. डोक्याला जखम होती. तिचा डावा हात शरीरापासून अलग झालेला होता. पोलिसांनी सांगितलं की, मुलीचा मृत्यु गळा दाबल्यामुळे झालाय.
देशातल्या कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्रात एखाद्या मुलीवरील हिंसेची किंवा लैंगिक शोषणाची बातमी नाही, असा एकही दिवस नसतो. अनेक वेळा बलात्काराची शिकार नवजात मुलीही असतात. पण त्या राष्ट्रीय हेडलाइन्समध्ये येत नाहीत, कारण त्यात पुरेसा मसाला नसतो.
बलात्कारामध्ये मीठ-मसाल्याचा शोध
हे वाचायला खूपच अधमपणाचं वाटू शकतं. पण बातम्यांच्या जगात बलात्काराची भूमिका अशीच आहे. आपल्याकडे टीव्हीवरील बातम्या सर्वांत लोकप्रिय आहेत, कारण ते सर्वांत सहज उपलब्ध असलेलं माध्यम आहे. तिथं आपल्याला बातमी वाचावी लागत नाही. आपण टीव्हीसमोर बसून घरातली इतर कामं करत करत ती ग्रहण करू शकतो.
त्यामुळे यात आपल्याला काही अनैतिक वाटण्याचं कारण नाही की, इतर विविध बातम्यांसोबत आपण बलात्काराच्या बातम्या वाचतो आहोत.
ज्याची बातमी होऊ शकेल, अशी देशभरात होत असलेल्या बलात्कारांपैकी एक घटना तुम्ही कशी निवडाल? बातम्यांचा जगाचा इतिहास याला साक्षी आहे की, बलात्काराची बातमी टीव्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरांत पोहचण्यासाठी कमीत कमी या अट पूर्ण व्हाव्या लागतात -
१. मुलगी वा बलात्कारी यांपैकी कुणी एक दलित असायला हवा
२. मुलगी वा बलात्कारी यांपैकी कुणी एक मुसलमान असायला हवा
३. माध्यमांच्या स्टँडर्डनुसार बलात्कार पुरेसा निंदनीय असायला हवा.
४. बलात्कार देशात वा त्या राज्यात होणाऱ्या निवडणुकीच्या किती जवळपासचा आहे?
बलात्कारी पत्रकारितेची पुरुषप्रधान भाषा
नेहमी नेते आणि पत्रकार असं म्हणताना दिसतात की, बलात्कारावरून राजकारण केलं जाऊ नये. यासाठी ते असा तर्क देतात की, बलात्कारामुळे कुणाच्या तरी स्वाभिमानाचा बळी जातो, कुणाचा तरी जीव जातो, कुणाचं तर कुटुंब उदध्वस्त होतं.
हे हास्यास्पद आहे. कारण ज्या पीडित व्यक्तीच्या दु:खावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला जातो, ती तर वर्तमानपत्रामध्ये किंवा वृत्तवाहिन्यावर बलात्काराची पहिली बातमी येते तेव्हाच गौण झालेली असते.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
पत्रकारितेत बलात्काराची पीडिता गौण
आपल्या देशात बलात्काराचा बळी ठरलेल्या व्यक्तीचं नाव, चेहरा वा तिची ओळख उघड करणं हा सार्वजनिक गुन्हा आहे. त्यामुळे बलात्काराच्या बातम्यांमध्ये ना मुलीचं नाव असतं, ना तिचं छायाचित्र, ना तिचा बाईट. आपण मुलींचं वय आणि शहर यांतून तिची ओळख करून घेतो.
आपल्या सामाजिक गृहितकांमधून बलात्काराचं वर्णन मिसिंग आहे. आपण बलात्काराची तेवढीच कल्पना करू शकतो, जेवढं बातम्यांमध्ये सांगितलेलं असतं. नैतिकतेच्या किड्यांनी आपली भाषा इतकी खाऊन टाकली आहे की, आपण कधी बलात्कार उभाच करू शकत नाही.
आणि जेव्हा करतो, तेव्हा तो ‘प्रथम पुरुषी’ वचनामध्ये नसतो. म्हणजे तो स्वत: पीडितेच्या तोंडून येत नाही. अशा परिस्थितीत बलात्कार आपल्या कल्पनेत तसेच असतात, जसे सिनेमांमध्ये दाखवले जातात. किंवा निर्भयासारख्या एखाद-दुसऱ्या प्रकरणात मीडियामधून समोर आलेले.
बलात्काराच्या भयावहतेची कल्पना करता न येणं, आपल्याला त्याविषयी इम्यन बना देता है. त्यामुळे जेव्हा आपण बलात्काराच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये वाचतो, तेव्हा फार विचलित होत नाही. क्षणभर आपल्या मनात घृणा निर्माण होते आणि आपण पुढे जातो. वृत्तवाहिन्यांमध्ये बलात्काराच्या बातम्यांना १०० किंवा ५० ‘फटाफट बातम्यां’मध्ये टाकलं जातं. जिथं त्यांचा उल्लेख एका ओळीत संपवला जातो.
बलात्कार तृतीय पुरुषी वचनामध्ये लिहिणारा पत्रकार स्वत: बलात्काराची कल्पना करू शकत नाही. कारण जो तुम्ही पाहिलेला नाही, अनुभवलेला नाही, तो तुम्ही लिहिणार कसा? ज्या वेळी पत्रकारितेची भाषा आणि व्याकरण ठरवलं गेलं, त्या वेळी महिला पत्रकारच नव्हत्या. त्यामुळे पत्रकारांच्या कल्पनेमध्ये बलात्काराच्या भयावहतेला कसं स्थान मिळणार? आता न्यूजरूममध्ये महिला असतात. पण पत्रकारितेची आधीपासून ठरलेली भाषा बदलली गेलेली नाही.
बलात्कार आणि लैंगिक शोषण सांगण्याची भाषा
‘छेडछाड’ हा शब्द पहा. कुणी तुमच्या फोनची सेटिंग बदलली तर त्याला ‘फोनशी छेडछाड’ करणं म्हणतात. ‘छेडणे’ याचा अर्थ आहे, कुठल्याही वस्तूला कौशल्याशिवाय हात लावणं, ज्यामुळे ती बिघडू शकते.
आता ‘छेडछाड’ आणि ‘लैंगिक शोषण’ या शब्दांना आजूबाजूला ठेवून पहा. ‘लैंगिक शोषण’ हा शब्द भयानक वाटतो. त्या तुलनेत ‘छेडछाड’ सामान्य वाटतो. ज्या टक लावून पाहण्याला, कमेंट पास करण्याला, हात लावण्याला, स्पर्श करण्याला, चिमटे काढण्याला आपण पत्रकारितेच्या भाषेत ‘छेडछाड’ म्हणतो, ते कायद्याच्या भाषेत ‘लैंगिक शोषण’ असतं. पण पत्रकारितेची भाषा त्याला ‘लैंगिक शोषण’ म्हणण्याआधी ते प्रकरण अजून गंभीर किंवा निंदनीय होण्याची वाट पाहते.
आपल्या बातम्या आपल्याला सांगतात - ‘अमूक मुलीसमोर एका माणसानं अश्लील चाळा केला.’ कारण जर बातमीत असं सांगितलं की, एका तरुण मुलीसमोर एका प्रौढ पुरुषानं आपल्या पँटची चैन काढून हस्तमैथुन केलं, तर तुमच्या कल्पनेला चरे पडू शकतात.
बलात्काराच्या पुरुषी भाषेत महिलांवरील मानसिक आघात कधीच केंद्रभागी राहिलेला नाही. त्यामुळे बलात्काराला आजही सहजपणे ‘दुष्कर्म’ म्हटलं जातं. ‘दुष्कर्म’चा शब्दश: अर्थ आहे, वाईट कृत्य. नैतिक दृष्टिकोनातून चोरी आणि गुंडगिरी हीसुद्धा वाईट कृत्यंच आहेत. पण त्यांना ‘दुष्कर्म’ मानलं जातं नाही, कारण या बातम्यांना प्रेक्षकांच्या कल्पनेत पातळ करून सांगण्याची गरज पडत नाही.
धर्म आणि जातीची नग्नता
हे सांगायची गरज नाही की, कठुआमधील आठ वर्षांची काश्मिरी मुलगी मुस्लीम नसती, तर बलात्कार आणि हत्या हे राष्ट्रीय मुद्दे झाले नसते. हे सत्य आहे की, मुस्लीम, दलित वा गरीब असणं हे कुठल्याही मुलीसाठी वा बाईसाठी दुहेरी मागासलेपण असतं. ते तिला इतर महिलांच्या तुलनेत जास्त असुरक्षित करतं. त्यामुळे यावर प्रश्न उपस्थित केला जाऊ नये की, अशा मुलीच्या बलात्काराची बातमी का केली गेली.
पण बलात्कारानंतर तयार केलं गेलेलं कथन निराशाजनक आहे. देशातला उदारमतवादी गट फलक घेऊन बलात्काराचा विरोध करतो. बलात्काराच्या विरोधाचं राजकारण स्वत:चं प्रश्नांच्या चक्रव्यूहात उभं आहे. कारण सोशल मीडियावर मोठ-मोठे संदेश घेऊन उभं राहणं प्रत्यक्षात तर जाऊच द्या, पण प्रतीकात्मक स्वरूपातही कुठलाही बदल घडवू शकत नाही.
एक बलात्काराची केस इतर अनेक बलात्कारांच्या केसेससारखी विसरली जाऊ शकते. पण तिला माध्यमांमध्ये स्थान हवा मिळतं. मात्र ज्यांना मिळत नाही, त्या बायका, मुली न्यायाला पात्र नसतात? सेलिब्रिटिजचं वागणं ‘निवडक’ स्वरूपाचं असतं. आणि ज्या वेळी आपण एक बलात्कार दुसऱ्या बलात्कारापेक्षा अधिक आकर्षक, फलकावर छायाचित्र लावण्याच्या योग्यतेचा मानतो, त्या वेळी आपण बलात्काराला पुरुषवादी कथन देतो. कारण त्या वेळी बलात्काराची बळी ठरलेल्या पीडितेचं मुलगी असणं गौण ठरून तिचं मुसलमान असणं अधिक महत्त्वाचं ठरतं.
यापेक्षाही हे घृणास्पद असतं की, बलात्काऱ्याच्या समर्थनार्थ उभं राहणं, त्यासाठी रॅली काढणं. कारण त्यावर आरोप करणं नेत्यांना त्यांच्या धर्मावरील हल्ला वाटतो.
अशा प्रकारे देशातले उजवे आणि डावे, दोन्ही गट बलात्काराचं कथन धर्माच्या कथनामध्ये बदलून टाकतात. बलात्काराची शिकार झालेली मुलगी प्यादा होते, ज्याला आळीपाळीनं दोन्ही गटांकडून खेळवलं जातं.
अलीगढमध्ये झालेली मुलीच्या हत्येला सुरुवातीला बलात्काराच्या खोट्या माहितीसह पोस्ट केलं गेलं होतं. कारण? कठुआ केसच्या बरोबरीत उजव्या गटाचं कथन तयार व्हावं म्हणून. हे उजव्या गटांसाठी दु:खद झालं असेल की, मुलीचा बलात्कार झाला नाही. पोस्टमॉर्टेमच्या अहवालातून ते सिद्ध झालं.
कटुआ आणि अलिगढ या दोन्ही प्रकरणांच्या कथनामध्ये पुन्हा पुन्हा मुस्लीम नावंच लिहिली गेली. मग तो बलात्कार पीडितेचा असो की, बलात्काऱ्याचा. पत्रकारितेच्या भाषेची प्राथमिकता हे पाहत नाही की, मुलीला न्याय मिळाला पाहिजे. फक्त एवढंच पाहते की, मुस्लिम नावांचा उल्लेख पुन्हा पुन्हा कसा येईल.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
सामूहिक प्रतिक्रिया
जंगली, हिंसक, क्रूर. टीव्हीवरील बातम्या बलात्काऱ्याला याच विशेषणानं संबोधतात. आपणही बलात्काऱ्याला टीव्हीवर पाहून त्याची निर्भर्त्सना करतो, शिव्याशाप देतो. फाशीची मागणी करतो. सोशल मीडियावर लिहितो की, यांचं लिंग कापलं पाहिजे. ही आपली स्वाभाविक प्रतिक्रिया असते.
पण जेव्हा एखादी मुलगी तिच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाविषयी लिहिते, तेव्हा सर्वांत आधी तिच्याविषयीच प्रश्न उपस्थित केले जातात. सामाजिक पातळीवर आपण लैंगिक शोषणाचा विरोध करतो. पण त्याची कथा प्रथम पुरुषी एकवचनीमध्ये येताच, विश्वासाऐवजी सवाल करू लागतो.
भारताने ‘मी टू’ चळवळ पाहिली. त्या वेळी प्रश्न उपस्थित करणाऱ्या अभिनेत्री, महिला पत्रकार, विद्यार्थिनी सर्वांविषयी असं म्हटलं गेलं की, त्या पब्लिसिटीसाठी हे करत आहेत. किंवा मग एका मोठ्या नावाला बदनाम करू इच्छितात. बदला घेत आहेत. मुलीनं आपल्या बलात्काराची बातमी स्वत:च सार्वजनिक केली तर ज्याच्यावर आरोप आहेत, त्याच्याकडे निर्दोषपणाचा पुराव्या मागण्याऐवजी मुलीकडेच पुरावे मागितले जातात.
ती मुलगी जोपर्यंत हिंसेची शिकार होत नाही, मरत नाही, तिची आतडी बाहेर काढून जमीनीवर फेकली जात नाहीत, तोपर्यंत तिच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही.
बलात्काराच्या कहाण्या आपण पीडितेच्या तोंडून नाही, तिच्या पोस्टमार्टेम रिपोर्टवरून ऐकू-वाचू इच्छितो.
अनुवाद - टीम अक्षरनामा
.............................................................................................................................................
हा मूळ हिंदी लेख www.thelallantop.com या पोर्टलवर ९ जून २०१९ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखाच्या लिंकसाठी पहा -
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment