अजूनकाही
वाचकांच्या हाती पडण्याआधीच भाऊ पाध्यांच्या ‘राडा’ या कादंबरीवरून शिवसैनिकांनी ‘राडा’ केला होता. रस्त्यांवर या पुस्तकाची होळी करण्यात आली आणि शिवसैनिकांनी त्याच्या प्रतीही जप्त केल्या.
पाध्यांनी आपल्या या कादंबरीलेखनातून मुंबईवर ‘क्ष-किरण’ टाकला आणि रोग कुठे आहे हे दाखण्याचा प्रयत्न केला, असं म्हटलं जातं. मुंबईच्या वस्त्यांमधील गुन्हेगारी, अस्वस्थचित्त बेकार मराठी तरुण, शिवसैनिक, रस्त्यावरचे टपोरी, गुन्हेगार, हिजडे, वेश्या आणि त्यांचे गिऱ्हाईक या समाजाने दूर लोटलेल्या समूहांची ‘नैतिकता’ आणि ‘सुसंस्कृत’ समाजाचा दुटप्पीपणा भाऊंनी दाखवून दिला, असंही म्हटलं जातं.
‘राडा’मध्ये मंदार या ‘न-नायका’च्या नजरेतून आपल्याला सत्तरच्या दशकातील अस्वस्थता दिसून येते. संवेदनशील मंदार पितृसत्ताकीय कुटुंब व्यवस्थेमध्ये होरपळत असतो. केवळ पैशासाठी परसातील बाग तोडली गेल्यामुळे तो अत्यंत दु:खी आणि कष्टी झालेला असतो.
फक्त आर्थिक विचार करणाऱ्या आणि मुलाचं मन समजून न घेणाऱ्या वडिलांविरुद्ध मंदार बंड करतो. मुळात कोणाचीही अरेरावी वा अधिसत्ता मंदारला सहन होत नाही. शाखाप्रमुखांनी कायदे करावे आणि लोकांनी ते पाळावे, हे चित्र मंदारला अस्वस्थ करत असतं. वडिलांच्या धंद्यासाठी शिवसेनेचा वरदहस्त आवश्यक असतो. त्याची घालमेल ऐकून घेणारं कोणीही नसतं. त्यामुळे कुटुंबव्यवस्थेतील सर्वंकश अधिकाराविरोधात मंदार बंड पुकारतो. मुलांवर सत्ता गाजवणाऱ्या पितृसत्तेविरोधातील ते एक पाऊल असतं.
पालक आपल्या मुलींवर खूप लक्ष ठेवतात, त्यांना नियंत्रित करू पाहतात. पण मुलग्यांकडे मात्र त्यांचं लक्ष नसतं. वाढत्या वयातील मुलांसमोर अनेक प्रश्न असतात. शरीरात होणारे बदल आणि सेक्ससंबंधीचेही प्रश्न असतात. मुलींशी बोलायचं असतं, त्यांच्याबद्दल अपार कुतूहल असतं. तसंच काहीतरी करून दाखवण्याची अपार ऊर्जा असते. पण त्याला वाट मिळत नाही. शिवाय प्रश्नांची उत्तरं देणारंही कोणी सापडत नाही.
आताच्या डिजिटल युगात सर्व माहिती अक्षरश: हातात असतानाही चित्र फारसं बदललेलं नाही. कारण इंटरनेटवरील माहिती आणि व्हिडिओचा प्रवाह एकतर्फी असतो. तुमच्या मनात उमटणारे प्रश्न उनुत्तरीत राहतात. इंटरनेट तुमच्या भावनिक गरजा पुऱ्या करू शकत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष संवादाची जरुरी असते. आपल्या भावनिक वा लैंगिक प्रश्नांची चर्चा पुरुष करत नाहीत. चुकून एखाद्या मुलाने आपले भावनिक प्रश्न मित्रमंडळीत बोलून दाखवले, तर त्याची टवाळी होण्याची शक्यता असते.
वयात येणाऱ्या मुलापासून बाप तुटत जातो. आपल्या मुलासोबत बोलावं कसं? मुळात काय बोलावं हेच बापाला समजेनासं होतं. भावूक असणाऱ्या मंदारसारख्या मुलांना घर आणि समाज ‘रफ-टफ’ बनवण्याच्या कामाला लागतो. मुलगा आणि वडिलांचा संवाद असतोच असं नाही. त्यामुळे मुलगे बाहेरचा अवकाश शोधतात. तिथेही त्यांना मर्दानगी आणि हिंसेचा सामना करावा लागतो. स्त्रियांसंबंधीच्या आणि सेक्ससंबधीच्या भ्रामक कल्पना, स्त्री-दास्य आणि स्त्री-तिरस्काराचं बाळकडू घर आणि बाहेरच्या अवकाशातही मिळतं.
सत्तरच्या दशकांत स्त्री चळवळी उभ्या राहिल्या आणि त्यांनी कुटुंबव्यवस्थेतील असमानतेची मांडणी करायला सुरूवात केली. जागतिक अर्थव्यवस्थेची पुर्नरचना आणि स्त्रीहक्कांच्या धोरणात्मक पातळीवरील स्वीकारामुळे पितृसत्तेच्या पारंपरिक सरंजामी संकल्पनांना सुरूंग लागले. पुरूषत्वाच्या सतत बदलत जाणाऱ्या व्याख्येशी जुळवून घेणं अनेकांना कठीण जातं, त्यामुळे पुरुषांतील काही गट स्त्री-तिरस्कार आणि हिंसेच्या संस्कृतीचा पुरस्कार करताना दिसतात.
कादंबरीला या बदलत्या सामाजिक राजकीय काळाची पार्श्वभूमी आहे. शिवसेनेचा जन्म साठच्या दशकांत झाला तरी पहिली काही वर्षं ही संघटना ‘मार्मिक’ या साप्ताहिकातून व्यक्त होत राहिली. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात शिवसेना रस्त्यावर उतरली. पुढे कम्युनिस्ट कामगार पुढारी कृष्णा देसाई यांचा खून झाला. शिवसेनेने या हत्येची जबाबदारी स्वीकारली.
मंदारला शिवसेनेची ही झुंडशाही मान्य नाही. तो एक प्रकारे मर्दानगीच्या संकल्पनांना आव्हान देतो. पण त्याची बंडखोरी पितृसत्तापुरस्कृत मर्दानगीच्या चौकटीतच पार पडते.
मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना शिवसैनिक चोप देत असतात. त्यांना आव्हान देण्यासाठी मंदार शाखाप्रमुख नाना खारकरच्या बहिणीचा पिच्छा पुरवतो. तिचा पाठलाग करतो. नानाला धडा शिकवण्यासाठी तो शालिनीचा वापर करून घेतो. लग्न न करता एका पुरुषासोबत राहणारी शालिनी बहिष्कृत झालेली असते. त्यामुळे ती ‘सॉफ्ट टार्गेट’ असते. टग्या मंदार जिथे-तिथे तिची छेड काढतो.
नाना खारकर मात्र मंदारला लायनीवर आणण्याचं काम करत नाही. कारण तो ‘मराठी माणूस’ असतो. मंदारसारखा आवेश संसाधनहीन जातवर्गातल्या तरुणाने दाखवला असता तर खारकरांनी आणि एकूण समाजाने त्याला माफ केलं असतं का? मंदारची उच्चवर्णीय पार्श्वभूमी अशी कामी येते.
आपल्या खूबसूरत काकूवर मंदार आसक्त झालेला असतो. नाती न मानणारा मंदार खूबसूरत काकूच्या नव्हे तर शालिनीवर मात्र हात टाकायला मागे पुढे बघत नाही. वरवर पाहता मंदारच्या पालकांच्या ढोंगी मूल्यांपेक्षा मंदारची मूल्यहीनता उच्च दर्जाची आहे असं वाटतं. पण इथेही एक लबाडी आहे. शाखाप्रमुख नाना खारकरची बहीण शालिनी आपल्या कुटुंबाला संकटातून वाचवण्यासाठी लग्नबाह्य संबंधात अडकते. लग्न न करता पुरुषासोबत राहणारी शालिनी ‘आउट कास्ट’ झालेली असते. अशा स्त्रीचं शोषण समाज करतोच. मंदारही त्याला अपवाद ठरत नाही. इतर सर्व कायदेकानून झुगारून देणारा मंदार या ‘कानून’चं मात्र पालन करतो.
आपल्या नवप्राप्त स्वातंत्र्याच्या तत्त्वज्ञानानुसार स्त्रीने रांड असणं गौरवास्पद असतं असं मंदारला वाटत असतं. या पदवीचा शालिनीला अभिमान वाटला पाहिजे असंही त्याला वाटतं. रस्त्यावर चारचौघांसमोर तो तिला ‘ए रांडे’ अशी हाक मारतो. शालिनीला वळ उठेपर्यंत मारणारा तिचा भाऊ नाना आणि मंदारमध्ये फरक राहत नाही. पण मंदारबद्दल सहानूभूती वाटावी अशी सुप्त मांडणी कादंबरीत सतत दिसून येते.
शालिनी आणि परित्यक्ता स्त्रियांनाही समाजाच्या तिरस्काराला आणि हिंसेला तोंड द्यावं लागतं. मंदारसारख्या उच्चवर्णीय पुरुषांना कोणती झळ पोचते? त्याने शिवसेनेला दिलेल्या आव्हानासाठी एक साधन म्हणूनच शालिनीचं पात्र पुढे येतं. रोजच्या जीवनातील तिचा लढा, तिच्यासमोरील आव्हानं आपल्याला दिसत नाहीत.
नाना खारकरला भरपूर धडा शिकवलाय असं मंदारला वाटू लागल्यानंतर शालिनीचं पात्र लुप्त होतं. त्यानंतर नाना खारकर असं सांगायला सुरुवात करतो की, शालिनी त्याची सख्खी बहीणच नाही. होरपळलेल्या शालिनीसारख्या स्त्रियांना मंदारपेक्षा फंटा मनवेलसारखे पुरुष जवळचे वाटू लागतात.
शालिनीनंतर मंदारला दुसरं सावज हवं असतं. ‘पाच वर्षं झाली तरी काकूचं पोट वर काढू न शकणाऱ्या काकाची’ तो निर्भर्त्सना करतो. समाजाच्या पौरुषत्वाच्या चुकीच्या संकल्पनांना हा तथाकथित विद्रोही तरुण मानत असतो. वंध्यत्व असणाऱ्या स्त्री-पुरुषांना, विशेषत: स्त्रियांना सामाजिक छळाला तोंड द्यावं लागतं ते मंदारसारखी मानसिकता असणाऱ्या स्त्री पुरुषांकडूनच.
पुढे मंदारच्या हातून अनवधानाने गुन्हा घडतो, तेव्हा त्यांचं बंड किती तकलादू होतं याचा प्रत्यय येतो. पोलीस स्टेशनवर जबानी देण्याचं धाडस त्याच्यात नसतं. अट्टल गुन्हेगाराप्रमाणे पळून जाणंही त्याला जमत नाही. येता जाता स्त्रियांना छळणाऱ्या, त्यांना भोगवस्तू म्हणूनच पाहणाऱ्या मंदारचे पाय गारठतात.
व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या मंदारकडे सामाजिक भांडवल मात्र असतं. कुटुंबाच्या चांगल्या ओळखीपाळखी असतात, लागेबांधे असतात. त्यामुळे ही उच्चवर्णीय व्यवस्थाच त्याच्या कामी येते. या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी तो मोहितेंच्या घरी जातो. पुढे त्याला सावरायला आई-बाबा, काका-काकू आणि गोरेगावचे तमाम शिवसैनिक तैनात असतात.
पितृसत्तेमुळे भरडलेल्या शालिनीला सावरण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. पुढे तिचं काय होतं हे सांगण्याची गरज कथेला का वाटू नये असा प्रश्न पडतो. कादंबरीतील उत्तरार्धात मंदार आदिमानवाच्या रूपात आपल्या समोर येतो. खूबसूरत काकूवर लाईन मारण्याचं त्याचं काम सुरू होतं. काकूसंबंधीच्या फँन्टसीमधून मंदारमधील आदिमत्वाचा साक्षात्कार इथे घडवलाय. या मांडणीत मंदारच्या आदिचैतन्याला ठेचून टाकणारे त्याच्या आजूबाजूचे लोक गुन्हेगार ठरतात.
मर्दानगीच्या चुकीच्या संकल्पनांमुळे पुरुषांचाही कसा कोंडमारा होतो हे अनेक संशोधन अभ्यासातून पुढे आलेलं आहे. या कोंडमाऱ्यातून सुटण्यासाठी काहीजण दारूच्या आहारी जातात. मंदार मात्र मर्दानगीच्या सर्व चुकीच्या संकल्पनांचा वाहक म्हणूनच समोर येतो. तथाकथित आदिमानवाच्या रूपात नव्हे. आदी मानवाच्या काळात बरीच समानता होती. कारण सत्ता, संपत्ती, दास्य या संकल्पनांचा उगम शेतीच्या शोधानंतर निर्माण झाल्या असं इतिहास सांगतो.
पितृसत्ता आणि शिवसेनेच्या झुंडशाहीविरोधातील मंदारचा हल्लाबोल स्त्रियांवर अत्याचार करूनच साजरा होतो. मंदारची मूल्यहीनता आणि त्याचं बंडं अजिबात ‘कूल’ नाही किंवा त्याला मुक्त करणारंही नाही. बंडाचं त्याचं फॅड तो उच्चवर्गीय आणि उच्चवर्णीय असल्यामुळेच चालू शकतं. त्याला त्याची मोठी किंमतही मोजावी लागत नाही. तो आयुष्यातून उठत नाही. बंडानंतर ‘गृहस्थाश्रमा’तील त्याचा प्रवेश सुकर झाल्याचं दिसतं.
पितृसत्ता आणि त्यातून निघालेल्या मर्दानगी आणि स्त्रीत्वाच्या संकल्पनांना आपण आव्हान करत नाही, त्यासंबंधीची सार्वजनिक चर्चा घडत नाही, तोपर्यंत स्त्रियांवरील हिंसेचं सातत्य टिकून राहतं. रस्त्यावरच्या हिंसक झुंडींमध्ये तरुणांचा प्रवेश होतो तरी कसा, याचं उत्तर मात्र या कादंबरीत मिळतं. कादंबरीतली स्त्रीपात्रं पूर्णपणे झाकोळलेली आहेत, त्यांना काही आवाजच नाही. मंदारच्या नजरेतून ती आपल्यासमोर उभी राहतात. नायकाच्या डावपेचांसाठी ही पात्रं उपयोगी पडतात इतकंच. कादंबरीतील शिवसैनीक आणि त्यांना आव्हान देणारा मंदार स्त्री-दास्य आणि स्त्री-तिरस्काराच्या संस्कृतीची पाठराखण करतात हेच खरं.
.............................................................................................................................................
भाऊ पाध्ये यांच्या ‘राडा’ या कादंबरीच्या खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/2462/Rada
.............................................................................................................................................
लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.
alkagadgil@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vividh Vachak
Sun , 10 March 2019
अलकाताई, लेख आवडला. मूळ पुस्तक वाचायचा कधी योग आला नव्हता पण पाद्ध्यांच्या पुस्तकांबद्दल पुष्कळ ऐकून आहे आणि लेखातून पुस्तकाची सर्वसाधारण कल्पना येते. तुमचे परीक्षण आवडले. परंतु सुरुवातीला लेखाचे शीर्षक वाचून मनात विचार उभा राहिला की, २०१९ साली सत्तरीच्या दशकात लिहिलेल्या कादंबरीवर चर्चा करण्याचे कारण काय? आपल्याकडे पुस्तकांचा इतका दुष्काळ आहे का, की जवळ जवळ पन्नास वर्षांपूर्वीच्या कादंबरीवर अजून चर्चा करावीशी वाटते? किंवा असे आहे काय की, पन्नास वर्षांत सामाजिक परिस्थिती काहीच बदलली नाही असे वाटून ह्या पुस्तकाची आठवण होते? माझ्या मते दोन्हीचे उत्तर बऱ्यापैकी "नाही" असे म्हणावे लागेल. (म्हणजे, बरीच चांगली पुस्तके झाली आणि स्त्रियांचे स्थान अगदी किंचित का होईना, सुधारले आहे पण काही एका वर्गात). असो. लेख उत्तम आहे, आणि अलीकडच्या कादंबरी/लघुकथांतून स्त्रीचे चित्रण बदलले आहे का, ह्यावर आपले परीक्षण वाचायला आवडेल. बाकी, संजय पवार यांच्या खालील मताशी (की हे पुस्तक दस्तऐवज म्हणून पाहावे) -- सहमत.
Gamma Pailvan
Fri , 08 March 2019
लेखिकेच्या प्रतिसादातल्या मताशी सहमत आहे. स्त्रीवर केलेली हिंसा स्वीकारार्ह कधीच नसते. फार काय, बायकांशी भांडत बसू नये असं माझं आहे. विशेषत: तरुण स्त्रियांशी तर आजिबात भांडू नये. भांडणाऱ्याची किंमत कमी होते. त्यामुळे मला एकमेकींशी भांडणाऱ्या सासूसुना एकमेकींच्या स्त्रीत्वाचा तिरस्कार करणाऱ्या वाटतात. पण इथे एक वेगळा आयामही आहे. वैध्यप्राप्तीसाठी स्त्री सतत पुरुषावर अवलंबून असल्याने तिला स्वत:चा तिरस्कार वाटंत असेल काय? इंग्रजीत सांगायचं झालं तर A woman has to constantly valedate herself against men. Could it lead to self loathing? -गामा पैलवान
Alka Gadgil
Fri , 08 March 2019
Stree chitran kase hote yachach vichar sangnyacha prayatna kela ani कोणत्याही काळातील स्त्री वरील हिंसा acceptable nahi hech
Alka Gadgil
Fri , 08 March 2019
Stree chitran kase hote yachach vichar sangnyacha prayatna kela ani कोणत्याही काळातील स्त्री वरील हिंसा acceptable nahi hech
Sanjay Pawar
Fri , 08 March 2019
राडा ज्या काळात लिहिली तो काळ आणि भाऊ पाध्येंसारखे समाजवादी लेखकही त्या काळाची निपज आहे.त्या काळातील सर्वच पुरूष लेखकात असा स्त्री बद्दलचा पुरूषी नजरेतून पाहिलेला आविष्कार दिसतो.माहिमची खाडी,चक्र,बिनधास्त,उभयान्वयी अन्वय,सात सक्कं त्रेचाळीस या सर्वच लेखनात कमी जास्त प्रमाणात तो तसा आहे.हे चित्र 80 च्या दशकापासून बदलत गेले.त्यामुळे त्या त्या काळात स्त्री चे चित्रण कसे होत होते,प्रगत विचारी लेखकांकडून याचा दस्ताऐवज म्हणून पाह्यला हवे. दूसरे म्हणजे कलाकॄती आणि व्यक्ती ही वेगऴी असण्याचा तो (ही)काळ होताच. वेगळ्या अर्थाने त्यांना मर्यादा पुरूषोत्तम म्हणता येईल!