बालपण म्हटलं की बऱ्याच अविस्मरणीय गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. परंतु ज्या मुलांचं लहानपणी लैंगिक शोषण झालं आहे, त्यांना बालपणीच्या आठवणी नकोशा वाटतात. त्याचा परिणाम त्यांच्या मनावर फार खोलवर झालेला असतो. काही लोकांची धारणा आहे की, विभक्त कुटुंबामुळे, आई-वडील कामावर जात असल्यामुळे, मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नसल्यामुळे, अशा घटना घडतात. विभक्त कुटुंबामुळेच शोषण करण्यास संधी मिळते. तसं काही नाही. एकत्रित कुटुंबातदेखील अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. पण सामाजिक दबावामुळे त्या दाबल्या जातात. यात शोषण करणारी नेहमी जवळची व्यक्ती असते.
काही वर्षांपूर्वीची घटना. एका सात वर्षांच्या मुलीला तिच्या काकांनी नशेचं औषध देऊन बेशुद्ध करून अतिप्रसंग केला. नाजूक परिस्थितीत जीव वाचला तरी अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिली. पोलिसांकडे तक्रार केल्यावर त्यांचं म्हणणं असतं की, आईला लक्ष देता येत नाही का? पण एकाच ठिकाणी राहत असताना आपल्या कुटुंबातल्या एखाद्याच्या सवयी आईच्या लक्षात येऊ नयेत किंवा येऊनही तिनं बोलायची हिंमत करू नये, यावरून तिच्यावर असलेला कौटुंबिक दबाव लक्षात येतो. काही वेळा घरच्या महिलांच्या लक्षात असं वागणं येऊनही त्या तक्रारी करत नाहीत. जेव्हा एकदम बलात्कारासारखी घटना घडते, तेव्हा या गोष्टी समोर येतात.
दुसरं उदाहरण एका सात-आठ वर्षाच्या मुलीचं. आई-वडील कामावर जायचे. मुलगी सकाळची शाळा आटपल्यानंतर म्हाताऱ्या आजोबाजवळ राहायची. आजोबा तिला पाय दाबायला लावत असत. पण पाय दाबता दाबता ते तिला आपल्या गुप्तांगांवरही तेल लावून चोळायला लावायचे. शेजारच्या बाईंना हे दिसल्यावर तिनं तिच्या आईच्या लक्षात आणून दिलं. पण ती आई आजही त्या मुलीला आजोबाच्याच भरोशावर सोडून कामावर जाते. काही वेळा वारंवार अशा घटना होऊ लागल्या तर मुलांनाही तो स्पर्श हवाहवासा वाटू लागतो. मग ती तक्रार करणं बंद करतात किंवा करत नाहीत.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4716/RAW---Bharatiya-Guptcharsansthechi-Gudhgatha
.............................................................................................................................................
तिसरं उदाहरण. आठ-दहा वर्षांचा एक मुलगा. त्याच्याच सोसायटीत राहणाऱ्या एका पाच वर्षाच्या मुलाला आडोश्याला नेऊन त्याचं गुप्तांग त्याला तोंडात घ्यायला सांगे. त्या छोट्या मुलानं त्याच्या वडिलांकडे तक्रार केल्यावर ते सुन्न झाले.
मुलांना पालक नेहमी जवळचे आणि महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे मदतीसाठी मुलं नेहमी पालकांकडे बघतात. मुलांची सर्वांत जास्त जपवणूक पालकच करतात. ते मुलांच्या सुरक्षिततेबाबत दक्षही असतात. त्यासाठी मुलांना योग्य उपाय समजावून सांगणं गरजेचं आहे. मुलांची स्व-संरक्षणात सर्वांत महत्त्वाची भूमिका असते. पालकांनी नेहमीच मुलांना जाणीव करून दिली पाहिजे की, त्यांना ती फार आवडतात. मुलांना जेव्हा पालकांशी बोलावसं वाटतं, तेव्हा त्यांना वेळ द्यावा. मुलानं सांगितलेल्या गोष्टींच्या खरेपणाविषयी शंका वाटली तरी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. मुलांशी बाललैंगिक शोषणावर बोलणं पालकांची परीक्षा घेणारं ठरू शकतं. परंतु बोलणं टाळण्यानं होणारे दुष्परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात. तुमची मुलं शोषणाची बळी पडत असतील तर त्यांना मदतीसाठी कुठं जावं हे ठाऊक नसतं.
बाललैंगिक शोषणाचा अर्थ वयानं व शक्तीनं अधिक असणाऱ्या व्यक्तीनं लहान किंवा कमकुवत मुलांशी लैंगिक इच्छा पूर्तीसाठी केलेलं वर्तन होय. यात शोषणकर्ता हा वयस्कर, प्रौढ किंवा वयात आलेली व्यक्ती असू शकते, पण शोषणाचा बळी मात्र नेहमी मुलंच असतात. यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शोषण करणारी व्यक्ती बहुतांश प्रकरणात परिचयाची असते. अश्लील चित्रं दाखवणं किंवा खाजगी अवयवांना स्पर्श करणं, या गोष्टींचा वापर करून मुलांमध्ये लैंगिक भावना किंवा आकर्षण निर्माण करणं, असं अनेक प्रकारचं वर्तन शोषण ठरू शकतं. बालहक्कांसाठी काम करणाऱ्या काही संस्थांच्या मते दर १० पैकी ६ मुली व १० पैकी ४ मुलं लैंगिक अत्याचाराची बळी ठरतात. भारतात सर्वसाधारणपणे ५३.३ मुलं लैंगिक अत्याचाराची बळी ठरतात.
सध्या इंटरनेटमुळे पोर्नोग्राफी सगळीकडे सहज उपलब्ध आहे. इंटरनेटवर १७ टक्के पोर्न साईटस आहेत आणि सर्च इंजिनवर घुमूनफिरून येणारे २५ टक्के पॉपअप्स- लिंक्स पोर्न साईट्सवर घेऊन जातात. त्यामुळे अलगद मुलं त्या जाळ्यात ओढली जातात. मुलं त्यांच्या प्रोजेक्टसाठीचं साहित्य शोधताना सहज लिंक्स-पॉपअपवर क्लिक करतात व पोर्नोग्राफीच्या संपर्कात येतात. ज्यांचे पालक मुलांना बाहेर खेळायला जाऊ देत नाहीत आणि त्यांना गुंतवूनही ठेवत नाहीत किंवा विरंगुळा वा टाइमपास म्हणून मुलांना इंटरनेट चालू असलेला मोबाइल, यूट्यूब, गेम्स किंवा कार्टून पाहायला देतात, त्यांचीदेखील मुलं पोर्नोग्राफीकडे वळू शकतात. आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना किंवा दुसर्यांना पोर्न दाखवण्यामागे ते दाखवणाऱ्याचं उद्दिष्ट बघणार्याच्या मनात लैंगिक संबंधांसाठी उत्तेजन तयार करणं असतं.
मुंबईच्या अंधेरीत कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्रात शिक्षक मुलींशी अशाच प्रकारे गैरवर्तन करत असे. काही प्रकरणांमध्ये सोबत पाहणारी मुलं आपसात समलैंगिक संबंध बनवतात. काही दिवसांपूर्वी डावोस इथं झालेल्या संमेलनात कैलाश सत्यार्थी यांनी कानपूरच्या अशाच एका घटनेचा उल्लेख केला, ज्यात काही शाळकरी मुलं एका मित्राच्या घरी मोबाईलवर अश्लील चित्रफिती बघतात आणि काही वेळानं भावासकट सगळे त्याच्या बहिणीवर बलात्कार करतात. डेहराडून येथील एका उच्चभ्रू शाळेच्या गोदमात लपून पोर्न पाहणार्या मुलांवर एका मुलीची नजर गेल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी तिच्यावर बलात्कार करून हत्या केली.
काही प्रकरणं अशी देखील आहेत, ज्यात वयात आलेली मतिमंद मुलं मोबाईलवर अश्लील चित्रफीत पाहत असताना पालकांनी पकडली आहेत. वेगवेगळ्या सर्वेक्षणांत ७ ते ११ वयोगटातली सुमारे ५५ -७० टक्के मुलं-मुली पोर्न साहित्याच्या संपर्कात आल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे पोर्नचं आव्हान आजच्या पालकांवर आहे.
भारतासह जगातील अनेक अनाथ आश्रम, आश्रमशाळा, वसतिगृहं, प्रार्थनास्थळं आणि सर्वसामान्य शाळा ते मुंबईच्या अगदी लाखो रुपये फी घेणार्या पंचतारांकित आंतराष्ट्रीय म्हणवणाऱ्या शाळांपर्यंत मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना अनेक वेळा प्रकाशात आल्या आहेत. कॅथॉलिक पुजारी, नन आणि धार्मिक अधिकार्यांकडून लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना २०व्या शतकापासून प्रकाशात येऊ लागल्या. कॅनडा, अमेरिका, लॅटिन अमेरिका, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या सर्व खंडांतून अशा हजारो घटना पुढे आल्या आहेत. २००४मध्ये जॉन जे क्रिमिनल जस्टीस कॉलेजच्या देशव्यापी सर्वेक्षणात ४,३९२ ख्रिस्ती पुजार्यांची ओळख करण्यात आली, ज्यांनी १९५० ते २००२ च्या दरम्यान १०,६६७ मुलांचं लैंगिक शोषण केलं. त्यावेळी एकूण १,१०,००० ख्रिस्ती पुजारी काम करत होते आणि त्यांच्यात आरोपी असलेल्या पुजार्यांचं प्रमाण ४ टक्के एवढं होतं. या अहवालाप्रमाणे समलैंगिक संबंध बनवण्यात आलेली ९० टक्के मुलं होती. लैंगिक शोषणाचा शिकार झालेल्या मुलांची खरी संख्या त्याहून कैक पटीनं जास्त असली तरी हा टक्का समाजात आढळणार्या सर्वसामान्य टक्केवारी इतकाच आहे. या प्रकरणात नाव आलेल्या अनेक लोकांना वाचवण्याचे प्रयत्न चर्चकडून करण्यात आले. आयर्लंडमध्ये जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालात स्पष्टपणे म्हटलं आहे की, चर्चला लैंगिक शोषणाची माहिती होती. अधिकार्यांच्या मदतीनं प्रकरणं दाबण्यात यायची. १३ मे २०१७ रोजी पोप फ्रान्सिस यांनी कबुली दिली की, स्वतः व्हॅटिकनकडे अशी २००० प्रकरणं प्रलंबित आहेत. यासाठी चर्चच्या वतीनं वेळोवेळी पॉप जॉन पॉल द्वितीय (२००१), बेनेडिक्ट १६वे आणि पॉप फ्रान्सिस (२०१८) यांनी माफी मागितली.
२००१ ते २०१० या एका दशकात ३००० ख्रिस्ती पुजार्यांची नावं समोर आली. सप्टेंबर २०१८ मध्ये जर्मन कॅथॉलिक चर्चकडे १९४७ ते २०१४ च्या दरम्यान करण्यात आलेल्या ३,६७७ बाललैंगिक शोषणाच्या तक्रारी आल्या. चर्चच्या पुरुषसत्ताक व्यवस्थेत नन्स असल्या की, हा प्रश्न सुटेल असंही नाही. इटलीच्या वेल्लानो इथं १९९६ साली नन्सकडून झालेल्या लैंगिक शोषणाच्या अनेक घटना उघडकीस आल्या होत्या. २०१८मध्ये बाललैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या १००० पुजार्यांची यादी जाहीर करण्यात आली. २०१८च्या ऑगस्ट महिन्यात १००० मुलांच्या शोषणात ३०० पुजार्यांवर पेन्सिल्वेनिया इथं खटले दाखल झाले. १९९५ पासून आजवर १००च्यावर पुजार्यांना या प्रकरणात ऑस्ट्रेलियात शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिथल्या पंतधानांनी २०१७ साली अशा ६० हजार घटना पाहता ही ‘राष्ट्रीय शोकांतिका’ असल्याचं जाहीर केलं.
ती म्हणजे लैंगिक अत्याचाराचे बळी पडलेली ७८ टक्के मुलं आहेत व २२ टक्के मुली आहेत. भारतात केरळमध्ये थईकट्टूसेरीच्या (त्रिशूर) सेन पॉल चर्चच्या राजू कोक्कन या ख्रिस्ती पुजार्याविरुद्धच्या बाललैंगिक शोषणाची घटना गाजली होती. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या सर्व खंडात एक गोष्ट सर्वसामान्यपणे दिसून आली आहे.
अमेरिकन वृत्तपत्र ‘बोस्टन ग्लोब’च्या वतीने २००२ साली त्यांच्या ‘स्पॉटलाइट’ टीमकडून चर्चकडून बालपणी लैंगिक बलात्काराच्या बळी पडलेल्या १३० लोकांच्या कहाण्या प्रकाशित करण्यात आल्या. लहान मुलांच्या बलात्कारामागे ज्या पद्धतीने चर्च उभी होती, त्याचे धक्कादायक खुलासे झाल्यानं संपूर्ण अमेरिका हादरून गेली. त्यानंतर अशा हजारो कहाण्या बाहेर पडू लागल्या. संबंधितांवर फौजदारी खटले दाखल करण्यात आले. ‘बोस्टन ग्लोब’च्या निर्भीड पत्रकारितेमुळे कॅथॉलिक शाळांच्या प्रवेशात सुमारे ६६ टक्यांची घट झाली. इतके दूरगामी व नकारात्मक परिणाम चर्चवर पहिल्यांदा झाले. बहुतांश प्रकरणात ख्रिस्ती धर्मगुरू मुलांना ते प्रभू ख्रिस्ताचा अवतार आहेत आणि शारीरिक संबंधांतून येशू प्रसन्न होऊन त्यांच्या जवळ जाता येईल असं सांगितलं जायचं. कालांतरानं या निर्भीड पत्रकारितेला पुलित्झर पुरस्कार मिळाला. २०१५ साली ‘स्पॉटलाईट’ नावाचा चित्रपटदेखील निघाला, ज्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं ऑस्कर अवार्ड मिळालं. या घटनांवर जागरूकता वाढली, लोक न घाबरता आपल्या पन्नाशी-साठीच्या वयातदेखील कबुली देऊ लागले तरी बाललैंगिक शोषणाच्या घटना घडतच आहेत.
लैंगिक शोषणामुळे छोटी मुलांमध्ये अंगठा चोखणं, अंथरूण ओलं करणं, झोपेत लैंगिक अत्याचाराची स्वप्न पडल्यावर अचानक किंचाळून जागं होणं किंवा शाळेत मन न लागणं आदी लक्षणं दिसून येऊ शकतात. ज्या बालकांचं खूप दिवस लैंगिक शोषण झालं आहे, त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव, स्वतःला कुचकामी समजणं, वाईट संभोग व लैंगिक संबंधांबद्दलबद्दल असामान्य व विकृत समज असणं, अशी लक्षणं दिसतात. अशी मुलं एकलकोंडी होऊ शकतात किंवा आत्महत्येसदेखील प्रवृत्त होऊ शकतात.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4637/Maza-Talamay-Jeevan---Zakir-Hussain
.............................................................................................................................................
काही सर्वेक्षणांमध्ये या मुलांचं पुन्हा इतरांकडून लैंगिक शोषण होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. पीडितांशी त्यांच्या इच्छेविरुद्ध गैरवर्तन केलं असल्याने ते स्वतःला असहाय व शक्तिहीन समजू शकतात. ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच विश्वासघात केल्यानं ते संशयी बनतात.
थोड्या मोठ्या वयाच्या मुलांमध्ये नशेच्या आहारी जाणं, तणावात राहणं, आत्मविघातक वर्तन अशी लक्षणं आढळतात. लैंगिक शोषण करणार्या व्यक्तीशी शारीरिक व नाव साधर्म्य असल्यास तिच्याशी फटकून राहणं यासारखे वर्तन बदल दिसू शकतात. दीर्घकालीन परिणाम त्यांच्या लैंगिक जीवनावरदेखील पडू शकतो, ज्यात काही प्रकरणात एकूण शारीरिक संबंधांबद्द्ल अविश्वास किंवा अरूची निर्माण होते. लहानपणी लैंगिक अत्याचाराला बळी पडलेले पालक आपल्या मुलांबाबत अनेक वेळा अतिरेकी पद्धतीनं वागतात.
बाललैंगिक शोषणाचा प्रश्न प्रामुख्यानं दोन स्तरांवर हाताळला जातो. एक कायदा आणि दुसरा मुलाचा बचाव. दोन्हींचा भर मुलाला लैंगिक अत्याचारापासून वाचवण्याऐवजी न्याय देण्यावर असतो. परंतु बहुतांश घटनांची माहिती उघड होत नसल्यानं या दोन्ही पद्धती निरुपयोगी ठरतात. ज्या मुलाचं लैंगिक शोषण झालं आहे, ती गंभीर आणि दूरगामी मानसिक त्रासातून जातात. मानसिक आरोग्य सेवेचा कक्षेत शोषण करणारा आणि शोषित मुलाला आणलं गेलं पाहिजे. या प्रश्नावर पालक, शाळा व सरकार तिघांनी आपली जबाबदारी उचलली पाहिजे. बाललैंगिक शोषण मुलांचं मानसिक, सामाजिक आणि भावनिक नुकसान करतं. समाज म्हणून या गोष्टी थांबवायची सामूहिक जबाबदारी सर्वांवर आहे. किशोरवयीन व प्रौढ मुलांना, त्यांच्या पालकांना व देखभाल करणाऱ्यांना याचं शिक्षण द्यावं लागेल की, बाललैंगिक शोषणाचा मुलांवर अत्यंत नकारात्मक परिणाम होतो. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत शिकण्याच्या वयातल्या मुलांना चांगल्या आणि वाईट स्पर्शाची ओळख समजावणं गरजेचं आहे. ज्या मुलांसोबत असं काही घडलं असेल त्यांना त्या घटनेची वाच्यता पालक किंवा इतर जबाबदार व्यक्तीशी करण्याचा आत्मविश्वास देण्याची गरज आहे.
पालकांना त्यांच्या घरात सोशल मीडियावर काय बघितलं जातं त्यावर लक्ष ठेवणं आणि मुलांना लहान वयापासून सुरक्षा आणि लैंगिकता याबद्दल शिकवणं हे कर्तव्य आहे, हे समजून घेणं आता गरजेचं बनलं आहे. मुलांच्या लैंगिक शोषणाविषयी त्यांच्याशी चर्चा करणं याविषयी सर्वांचाच गोंधळ आहे. तरीही गोंधळून न जाता आपल्या मुलांसाठी सुरक्षिततेचे नियम तयार करा. या विषयावर चुप्पी तोडण्याचे त्वरित उपाय करणं गरजेचे आहेत. त्यामुळे पालकांनी नेहमी जवळच्या व्यक्तीपासूनदेखील सावध असणं गरजेचं आहे. यात जवळचे नातेवाईक व शेजाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे मुलांच्या वर्तणुकीत अचानक झालेले बदल पालकांना टिपता आले पाहिजेत. औदासीन्य, तणाव, इतर मुलांसोबत खेळात सहभागी न होणं, विचारमग्न राहणं, चिडचिड करणं, फसवणूक झाल्याची समज, शांत राहणं, लक्ष विचलित होणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. ही मुलं लाज, अपराधिक भावना किंवा संभ्रमावस्थेतसुद्धा असू शकतात.
किशोरवयीन मुलांसाठी तज्ज्ञ आणि मनोवैज्ञानिकांची व्याख्यानं पालकशास्त्र, शरीरातील अवयव, पुनरुत्पादन, गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमित आजारांविषयी जागरूकता व शंका निरसन करण्याच्या दृष्टीनं आयजित केली गेली पाहिजेत. मुलांकडून चुका झाल्यास बदडून काढणं किंवा गलिच्छ असल्याची प्रतिक्रिया टाळून मुलं, पालक व शिक्षकांशी संवाद या कार्यक्रमात झाला पाहिजे. सोशल मीडियाद्वारे देशामध्ये प्रक्षेपित होणारी आक्षेपार्ह सामग्री रोखणं तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. परंतु शाळेत, शिक्षकांना त्यांच्या मुलांना मुलींशी आदर व सन्मानानं वागणं शिकवण्याची गरज आहे. काही शाळा मुलांना ‘चांगल्या आणि वाईट स्पर्शा’बद्दल जागरूक करत आहेत. विद्यार्थ्यांमधील वर्तनात्मक बदल टिपण्याचं व ओळखण्याचं शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं सत्र घेतलं पाहिजे. पहिली ते तिसरीच्या लहान मुलांमधील जागरूकता अधिक महत्त्वाची आहे. कारण या मुलांना योग्य आणि अयोग्य स्पर्श यातला फरक कळत नाही.
स्कूल बस, स्वच्छतागृहांमध्ये अशा घटना घडल्याचा बातम्या साधारणपणे आपण वाचत असतो. म्हणून शाळांनी पुरुष कर्मचाऱ्यांसह एकट्या मुलांना सोडू नये, महिला कर्मचारी नेहमीच जवळपास असावी. ज्या शाळांकडे सीसीटीव्ही आहेत त्यांनी त्याचं फुटेज नियमितपणे तपासलं जात असल्याची काळजी घ्यावी. या विषयाशी कसं वागावं यासाठी शिक्षक व शाळेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सल्ला दिला पाहिजे. जर या समस्यांविषयी स्पष्टपणे आणि निःसंकोचपणे चर्चा केली गेली तर पालक मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि चांगल्या-वाईट स्पर्शाबद्दल शिकण्यास तयार असतील. दुर्व्यवहार आणि छळवणुकीची माहिती व तक्रार देण्यासाठी मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यातदेखील मदत होईल. शिक्षक आणि कर्मचारी यांची पार्श्वभूमी काळजीपूर्वक तपासूनच त्यांना कामावर घेतलं पाहिजे आणि शाळांनी सर्व कर्मचाऱ्यांविषयी तपशीलवार माहिती ठेवली पाहिजे.
लघुपट बनवणारे संजय सिंह यांनी ‘चुप्पी तोडो : गो टेल मॉम’ नावाचा चित्रपट बनवून ओळख पटवणं (रिक्ग्नइज), प्रतिरोध (रेसिस्ट) आणि तक्रार (रिपोर्ट) करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. बालहक्क आयोग, महिला आणि मुलांवरील गुन्हेगारीसाठी नेमलेले पोलीस कर्मचारी असंवेदनशील आहेत, अशा अनेक तक्रारी आहेत. महिला कर्मचाऱ्यांना महिला व बालसुरक्षा समस्यांबद्दल व कर्तव्याबद्दल जागरूक करण्यासाठी कार्यशाळेचं नियमित आयोजन करायला हवं. स्वयंसेवी संस्थांनी या मुद्यांवर पोलीस कर्मचारी व नागरिकांसाठी कार्यशाळेचं आयोजन करत केलं पाहिजे. मीडिया प्रचार अभियानांच्या माध्यमातून बाललैंगिक शोषणाची माहिती मिळाल्यावर मुलांशी कसं वागावं, त्याची तक्रार कुठे व कोणत्या पद्धतीनं करावी, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी वगैरे जागृती शासनाकडून केली गेली पाहिजे. बाललैंगिक अत्याचारांच्या तक्रारींच्या बाबतीत शाळांसाठी प्रोटोकॉल तयार केले गेले पाहिजेत. शिक्षण विभागाच्या पुढाकारानं शाळांमध्ये नियमितपणे मुलांसाठी, शिक्षक तसंच पालकांसाठी कार्यशाळा आयोजित करायला हव्यात.
मुलांचं लैंगिक शोषण ही घृणास्पद व भयावह गोष्ट आहे. बऱ्याचदा असं होऊ शकतं याची आपल्याला कल्पनाही नसते. अशा घटनांनी मुलांसोबतच त्यांचे पालकदेखील खचून जातात. परंतु खचून जाण्यापेक्षा किंवा वास्तव्य नाकारण्यापेक्षा त्याविषयी अधिकाधिक जागरूकता बालक व पालकांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे.
.............................................................................................................................................
लेखिका कल्पना पांडे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या सदस्य आहेत.
kalpanasfi@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Parag Patil
Tue , 05 February 2019
आर्टिकल खूप चांगले आणि गरजेचे आहे. पण लहान मुलांनी अंगठा चोखणे, अंथरूण ओले करणे या गोष्टी लैंगिक शोषण झाल्याचे लक्षण आहे याचा संदर्भ असल्यास इथे देणे आवश्यक आहे. अंथरुण ओले करणे , ही तर खूप सामान्य गोष्ट आहे.