चांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा!
अर्धेजग - कळीचे प्रश्न
हिनाकौसर खान-पिंजार
  • प्रातिनिधिक चित्रं
  • Mon , 14 January 2019
  • अर्धेजग कळीचे प्रश्न बाळकोपरा Balkopra

डिसेंबरच्या थंडीतल्या दुपारची, एकची वेळ होती. भोर तालुक्यातील कांबरे गावच्या अंगणवाडीतून आपल्या चिमुरड्या मुलांना घ्यायला आया, आज्या आणि एक-दोघांचे वडीलही आले होते. अंगणवाडीत तेव्हा साधारण आठ-दहा मुलं होती. मुलांना घरी नेण्याआधी पालकांनी आपल्या मुलांचा पोषण स्तर पहायचं, ही एक छोटीशी कृती करायची होती. मुलांची उंची आणि वजन मापं लिहिलेला एक भला मोठा आलेख अंगणवाडीच्या एका खोलीत अंगणवाडीताईनं अंथरून ठेवला. त्या आलेखावर आडव्या रेषेवर एक ते पाच वर्षांची मार्किंग केलेलं होतं, तर उभ्या रेषेवर वजनाचं मार्किंग केलेलं होतं. याशिवाय त्यावर लाल, पिवळा, हिरवा आणि पांढरा अशा चार रंगाचे पट्टे होते. लाल पट्टा म्हणजे कुपोषित, पिवळा म्हणजे मध्यम पोषित, हिरवा म्हणजे सर्वसामान्य (चांगले) पोषण आणि पांढरा म्हणजे उत्तम. पालकांना या आलेखाची अशी सगळी नीट माहिती सांगितली. त्यातील काहींनी यापूर्वी उंची, वजन पाहिलं होतं. काहींची पहिली वेळ होती.

त्यानंतर अंगणवाडीताईच्या देखरेखीखाली पालकांनी आपल्या मुलांना वजनकाट्यावर उभं करून त्यांची वजनं घेतली. त्यानंतर अंगणवाडीताईच्या सूचनेनुसार पालक स्वत: आपल्या अपत्याला त्यांच्या वयाच्या आकड्यावर उभं करत होते. वय आणि वजन यांचा ताळमेळ त्या आलेखावर पाहिल्यावर मूल पोषणाच्या कुठल्या रंगात आहे हे कळत होतं. अंगणवाडीतील एक मूल कमी पोषणाच्या लाल पट्ट्यात दिसत होतं. दोनेक मुलं पिवळ्यात तर होते, पण लाल पट्ट्याच्या एक रेषेच्या अगदी वर म्हणजे वजन काही ग्रॅमने जरी कमी झालं की, तेही लाल पट्ट्यात- धोक्यात येणार.

पट्ट्यांचे रंग कळले, मूल कुठल्या पट्ट्यात आहे हेही सांगितलं, पण पुढे काय? केवळ एवढीच माहिती मिळून उपयोग नव्हता. इथं रचना संस्थेचे कार्यकर्ते पुढे झाले. लोकाधारित लोकसहभागातून देखरेख समिती लाल, पिवळ्या, हिरव्या पट्ट्यातील मुलांच्या पालकांना त्यांनी माहिती देण्यास सुरुवात केली. लाल म्हणजे अधिक काळजीचं कारण, पिवळा  म्हटल्यावर मध्यम कुपोषण, तेव्हा त्यांनाही हिरव्या पट्ट्यात चांगले पोषण होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मुलांचा आहार रंगीत असावा. स्थानिक भाज्या, कडधान्ये, फळे असा चौरस असावा अशी माहिती त्यांना देण्यात आली.

इथं आवर्जून नमूद करावं असा एक मुद्दा वारंवार मांडण्यात येत होता, तो म्हणजे पै-पैशाला मिळणारे दुकानातील खाऊचे पदार्थ. रचनाच्या मंगल मांजरेताईंनी पुढाकार घेतला आणि त्यांनी हा मुद्दा उलगडला. मूल नीट जेवत नाहीये तर किमान त्याचं पोट तरी भरेल या उद्देशानं पालक मुलांना दोन पाच रुपये देतात. काहीवेळा मुलंच हट्ट करतात, किरकिर करत राहतात किंवा कामात व्यस्त असणाऱ्या आईच्या मागे भूणभूणत राहतात म्हणूनही वैतागून त्यांना काही पैसे दिले जातात आणि मुलांना बाहेरचे पदार्थ खायची सवय लागते. वेफर्स, बिस्किटं, चॉकलेट, गोळ्यांनी मुलांच्या जीभेला तर चटक लागते, पण त्याचा परिणाम असा होतो की, मुलं सकस आहार नको म्हणतात. अनेकदा भूकेच्या वेळेत असा खाऊ दिला जातो आणि त्यांची भूक मरते. काही घरात नाश्ता म्हणून चहाबरोबर बटर, बिस्किटं असतात तेही अंगाला लागणारं नसतंच. या सगळ्याचा परिणाम मुलांच्या भूकेवर तर होतोच, पण ते पोषक आहारापासूनही वंचित राहतात. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

मंगलताई मांडत असलेला हा मुद्दा अगदीच रास्त होता. हातावर पोट असणारं कुटुंब असू दे, की आर्थिक सुबत्ता असणारं घर! मुलांना खाऊ देऊन त्यांची भूक भरकटवण्याचा हा सोपा मार्ग कळत-नकळत सगळेच जण करत राहतात. पाचेक रुपयांच्या बिस्किटांच्या पुड्यावर मुलंही दिवस घालवतात. त्याबाबतच त्या सांगू लागल्या तेव्हा एक-दोघी एकमेकींकडे बघत तोंडाला पदर लावून हसल्या. आपल्या मुलांची भूणभूण आपण असंच बिस्किटं, कुरकरे, बॉब्या देऊन शांत करतो, हे त्यांनाही मान्य होतं. पण मग त्यांना पोषक आहार द्यायचाय आणि शेती-वाडी-वस्तीवर कामालाही जायचयं तर करायचं काय?

...तर मुलांसाठी बाळकोपरा करायचा. रचना संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बायकांच्या मनातलं ओळखून सांगावं तसं सांगितलं. बाळकोपरा! अतिशय सोपी साधी आणि सहज होऊ शकणारी कृती. रचना-सोसायटी फॉर सोशल रिकन्स्ट्रक्शन ही संस्था पंचवीस वर्षांहून अधिक काळ महिला व बाल आरोग्याच्या प्रश्नात काम करत आहे. वर्षानुवर्षांच्या अनुभवातूनच बाळकोपरासारखी एक संकल्पना त्यांच्या पुढ्यात आली. पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यांतील लहान मोठ्या गावांत ही संस्था माताबालक पोषणासाठी काम करत आहे. पैकी काही गावे अगदी दुर्गम आहेत. सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे वाड्या वस्त्यावरील लोकांना झेपेल, परवडेल आणि जमू शकेल या दृष्टिकोनातून बाळकोपरा ही संकल्पना अगदीच सहजशक्य आहे.

बाळकोपरा म्हणजे काय तर? घरातील अशी जागा जी बाळाच्या हाताला येईल. आणि त्या जागीत वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेंगदाणे, गुळ, शेंगदाण्याचे लाडू, चिक्की, राजगिरा लाडू, फुटाणे, मोड आलेली कडधान्ये, बटाटे, खीरी, अंडी, खजूर, स्थानिक फळे, स्थानिक भाज्यांच्या शेंगा इत्यादी पदार्थ भरून ठेवायचे. मुलं येता-जाता भूक लागली किंवा त्यांना खाऊ खायची इच्छा झाल्यास असे पदार्थ खातील. ज्यातून त्यांना पोषणही मिळेल आणि त्यांचे वजनही चांगले वाढेल.

बाळकोपऱ्याची ही संकल्पना कांबरेमधल्या आयांना पुन्हा पुन्हा सांगितली, कारण रचनानं या गावात कुपोषणाच्या प्रश्नावर नव्यानं काम करायला घेतलं. मात्र हाच प्रयोग इतरही काही गावांत झाला होता. म्हणून वेल्ह्यातील रूळे आणि मोरदरी या गाववस्त्यांवर गेले, जिथं या प्रयोगातील लाभार्थी मुलं होती. रूळे आणि मोरदरीत असे काही पालक होते, ज्यांची मुलं तीव्र कुपोषित होती. त्यांनी घरात बाळकोपरा केला. तेथील अंगणवाड्यातही हा प्रयोग करून पाहिला आणि मुलांच्या पोषणाचा एक टप्पा तयार झाला.

रूळ्यातील शोभा सांगते, त्यांची मुलगी जन्मल्यापासूनच थोडी अशक्त होती. शी-शूची समजही नव्हती. त्यावेळी ते पुणे शहरालगत रहायला होते. मात्र तिच्या अशक्तपणामुळे तिला शाळेत घेत नव्हते. शेवटी ते पुन्हा त्यांच्या वाडीत रहायला आले. इथं तिला अंगणवाडी सेविका कांचन नेवसे यांच्या माध्यमातून बाळकोपरा या उपक्रमाची माहिती झाली. त्यानुसार त्यांनी कोपरा तयार करून शेंगदाणे लाडू, भाजलेले शेंगदाणे, बटाटे, अंडी, खोबरं ठेवलं. आहारात पालेभाज्या, कडधान्यांचा वापर वाढवला. यामुळे ती बाहेरचं काही खात होती, ते बंद झालं आणि तिची तब्येत सुधारू लागली. आज ती मुलगी तीव्र कुषोणातून निघून पिवळ्या पट्ट्यात आली आहे.

मंगल निवंगुणे यांचा मुलगाही कुपोषित गटात मोडत होता, मात्र बाळकोपऱ्यानं त्यांचा मुलाचंही चांगलं वजन वाढलं. मंगल सांगते, मुलगा आता मोठा झाल्यानं पूर्वीसारखं खाली बरण्या/डबे भरून ठेवत नाही, मात्र घरात दुकानातील पाकिटबंद खाऊ आहे. मुलांसाठी शेंगदाणे, लाडू, खारका हेच खाऊ म्हणून येतं, फक्त ते आता मोठ्या डब्यांमध्ये ठेवलेलं असतं. दीपाली फाळके यांच्या बाळासाठीही त्यांनी घरात बाळकोपरा केला आहे. त्यांचं मूल कुपोषित नाही, मात्र मुलांना सकस आहार खायला मिळावा हाच उद्देश ठेवून त्यांनी हा उपक्रम केला आहे. मुलांमधील प्रत्यक्ष बदल होत असल्यानं पालकांचा उत्साहही द्विगुणित झाला.

रचना संस्थेनं वेळोवेळी महिलांना मुलांच्या आरोग्याबाबत समुपदेशन केलं. अंगणवाडीत मुलांना सकस आहार मिळेल यासाठी प्रयत्न केले. शिवाय अंगणवाडीत मुलांसाठी येणाऱ्या ‘टेक टू होम’ रेशनचे वाटप व्यवस्थित होत आहे की नाही, यासाठी लोकाधारित देखरेखीची संकल्पना रुजवली.  शिवाय इतर योजनांच्या माध्यमातून मुलांच्या आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. बाळकोपरा हा त्यातीलच एक उपक्रम. या प्रयत्नांची फलनिष्पती सांगतांना रचना संस्थेचे श्रीपाद कोंडे म्हणाले, संस्था वेल्ह्यातील १५ गावांमध्ये पोषण हक्क प्रकल्पच राबवला. यामध्ये आयसीडीएस केंद्र म्हणजेच अंगणवाडीच्या अखत्यारित येणारी पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांवर संस्थेनं लक्षकेंद्रित केलं आहे. अंगणवाडीतील माता बैठकांमध्ये बालकांच्या वजन उंची मोजणीचं तंत्र, त्याचं महत्त्व मातांना पटवून देण्यात आलं. माता बैठका दर महा होतील यासाठी पाठपुरावा केला.  मुलांची उंची, वजनाची नोंदणी रजिस्टरमधून पडताळून पाहण्याच काम माता स्वतः करू लागल्या. आपलं मुल कुठल्या रंगात आहे हे त्यांना कळू लागलं. मुलांनी सटरफटर खाऊ नये म्हणून मातांसाठी अंगणवाडीतच काही रेसिपी शिकवण्यात आल्या.

त्याआधी बाजारातल्या चटपटीत पदार्थांचं निकृष्ट पोषणमूल्य याबाबत चर्चा घडवून बायकांना त्याबाबत बोलतं केलं. त्यांची समज वाढवली, मग त्यांना त्यांच्या भागात पिकणाऱ्या भाज्यांपासून काय काय पदार्थ करता येतील त्याच्या रेसिपीच शिकवल्या. यात शेवग्याच्या कोवळ्या पाल्याचे धपाटे, मेथीचे पराठे, रानभाज्यांच्या काही रेसिपी... यामुळे माताही उत्साहानं सहभागी होऊ लागल्या. मातांनी पोषक आहाराचं मनावर घेतलं की कुटुंबाचा आहार सकस आणि चौरस होऊ लागला. याचबरोबर महिला आणि बालकांच्या कल्याणकारी निधीतील १० टक्के निधी गावपातळीवर मुलांच्या आरोग्य गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जातो. हे सगळं एकत्रितरित्या परिणामकारक ठरू लागले आणि माता-बालकांच्या आहारात बदल होऊन कुषोणाचं प्रमाण ५० टक्क्यापर्यंत घटलं. या प्रकारे सातत्य राखल्यास ते प्रमाण अधिक घटेल हे निश्चित.

थोडक्यात, तुमचं मूल कुपोषित असो अगर नसो, मात्र त्यांना चांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हरकत नाही. पैसे देऊन बाजारातील निकृष्ट पदार्थ खाण्यापेक्षा चुरमुरे-फुटाण्यांची गोडी न्यारीच असणार आहे. ‘आपल्या मुलाचं आरोग्य आपल्या हाती’ या उक्तीची कृती पालक करतील, तेव्हा कुषोषणाचे मुद्दे संपुष्टात येतील हे नक्की. यासाठी लोकाधिरीत देखरेखीचंही महत्त्व तितकंच आहे. आजची बालकं उद्याचं भविष्य आहे. त्यामुळे सदृढ भविष्याची पेरणी बालकांच्या पोषक आहारातून व्हायला हवी. यात रचनासारख्या संस्थान नेटानं प्रयत्नशील आहेत, ही आश्वासक बाब आहे.

.............................................................................................................................................

लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.

greenheena@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 15 January 2019

सुंदर संकल्पना व सुंदर उपक्रम. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......