अजूनकाही
बाळ जन्मल्यावर तुम्ही सर्वप्रथम दूध कधी पाजले? या प्रश्नाचे वैद्यकीयदृष्ट्या एकच उत्तर हवे. ते म्हणजे पहिल्या अर्ध्या ते एक तासात. पण प्रत्यक्षात उत्तरे भिन्न भिन्न होती.
महकने बाळ जन्मानंतर तिसऱ्या दिवशी स्तनपान दिले. तिला मुलगा झाला. पण सकाळी सिझेरीयन झाल्यामुळे भूल उतरेपर्यंत बाळाला पाजता येणार नाही, असे तिच्या डॉक्टरांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत भूल उतरली, मात्र तिला त्या दिवशी उठूनही बसता आले नाही. म्हणून तिने तिसऱ्या दिवशी बाळाला पाजायला घेतले. बाळ जन्मल्याबरोबर त्याला साखरपाणी दिले आणि मग थोड्या वेळाने दूध पावडर. हे सारे काही डॉक्टरांच्याच निगराणीखाली घडले, हेही सांगायला ती विसरली नाही.
दीपाची गोष्टही निराळी नव्हती. तिचेही सिझेरियन झाले आणि तिनेही तिसऱ्याच दिवशी बाळाला दूध पाजले. बाळाला पहिल्या तासात दूध पाजणे आवश्यक आहे, अशी कुठलीच सूचना तिला डॉक्टरांनी वा नर्सने केलेली नव्हती.
श्रीकांता म्हणते, तिचे नॉर्मल बाळंतपण झाले, मात्र पहिल्या तासात दूध पाजल्याचे स्मरत नाही. रक्तस्त्राव होत होता आणि टाकेही पडल्याने तिच्या वेदनांमुळे कदाचित तासाभराने दूध पाजले असेल असे तिला वाटते.
इंद्रायणीने पहिल्याच तासात बाळाला पाजायला घेतले, पण तिला पुरेसे दूध येत नाहीये असे वाटून लगेचच तिच्या कुटुंबियांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीने दूध पावडर आणून हलके हलके पाजायला घेतले. बाळाला भूकेले तरी कसे ठेवणार असा सवाल तिने केला.
सुश्रृताने मात्र बाळाला पहिल्याच तासात दूध पाजले. तिचे बाळंतपण नॉर्मल झाले होते. करुणाचे सिझेरीयन झाले होते, तरीही पहिल्या तासातील दूध चांगले असते असे डॉक्टरांनी बजावून सांगितले आणि बाळाला पाजायला दिले. ‘सुरुवातीचं दूध चांगलं नसतं म्हणत’ राजश्रीला मात्र घरातल्या बायकांनी बाळाला दूध पाजू दिले नव्हते.
पुण्यातील सुशिक्षित नोकरदार असणाऱ्या या नवमातांकडून मिळालेली ही उत्तरे. साधारण तीस नवमातांना केवळ एकच प्रश्न विचारला की, तुम्ही बाळ जन्माच्या पहिल्या तासात दूध पाजले का? त्यातील २५ जणींनी उत्तरात ‘होय’ किंवा ‘नाही’ असे उत्तर देण्याऐवजी ‘आपलं सी सेक्शन झालं होतं’ असे उत्तर दिले. याचाच दुसरा अर्थ त्यांनी बाळंतपणाच्या पहिल्या तासात दूध पाजलेले नव्हते. या नवमातांमध्ये गृहिणी, नोकरी करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या, भाजीविक्रेत्या महिला आहेत.
बाळंतपणानंतरच्या अगदी सुरुवातीच्या अर्धा ते एक तासातील दूधात भरपूर पोषकतत्त्वे आणि अॅन्टीबॉडीज असतात. हे अॅन्डीबॉडीज आणि पोषकघटक बाळाचे विविध प्रकारच्या संसर्गापासून रक्षण करतात. इतकेच नव्हे तर अर्भक मृत्यू रोखण्याच्या दृष्टीने, तसेच चांगल्या वाढीसाठी पहिल्या तासात दूध पाजणे ही अत्यंत सोपी, साधी परंतु महत्त्वाची कृती आहे. हे दूध इतके पोषक आणि संरक्षक असते की, त्याच्या या गुणधर्मामुळे त्याला बाळाचे ‘पहिली लस’ही म्हटले जाते. बाळासाठी इतके महत्त्वाचे आणि प्रत्येक आईला हे देणे शक्य असतानाही भारतात दहापैकी सहा बालकांना पहिल्या तासाभरात स्तनपान मिळत नाही हे वास्तव आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफच्या वतीने ‘कॅप्चर द मोमेंट’ नावाने ऑगस्टमध्ये स्तनपानासंदर्भात जागतिक धांडोळा घेणारा अहवाल जाहीर झाला. त्या अहवालानुसार भारतात दहापैकी केवळ चार अर्भकांना पहिल्या तासांत स्तनपान दिले जाते. उर्वरित सहा जणांना ते मिळत नाही. केवळ भारतातच नव्हे तर जगात पाच मुलांपैकी तीन मुलांना पहिल्या तासात स्तनपान मिळत नाही. बाळ जन्मानंतरचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. ज्या बाळांना पहिल्या तासात स्तनपान मिळते, त्यांच्या तुलनेत पाहिले तर भलेही जन्माच्या पुढील २३ तासांत स्तनपान झाले तरी मुलांची दगावण्याची शक्यता ३३ टक्के असते. पहिल्या तासातील स्तनपान बाळाचा जीव वाचवण्यासाठीही महत्त्वाचे आहे. कारण या दूधाने जंतूसंसर्गापासून संरक्षण मिळते.
भारतातील स्तनपानाचे चित्र पाहता, २०१८ या वर्षात जगातील ७६ देशांच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक ५६ व्या स्तरावर आहे. या अहवालासोबत ग्लोबल ब्रेस्टफिडिंग स्कोअरबोर्डही प्रसिद्ध करण्यात आला आहे. स्तनपानासंदर्भातील योजना आणि कार्यक्रमांची सद्यस्थिती काय आहे, यावरून आकडेवारी ठरवण्यात आली आहे.
सिझेरियनमध्ये स्तनपानाचे प्रमाण कमी
मुख्यत्वेकरून जी बाळंतपणे योनीमार्गातून (नॉर्मल) होतात, त्या बाळांना पहिल्या एक तासात स्तनपान दिले जाते. सिझेरियन पद्धतीने जन्माला येणाऱ्या अर्भकांना स्तनपानात विलंब होत असल्याचे चित्र जगभर आहे. या अहवालानुसार ५१ देशांमध्ये सिझेरियनच्या तुलनेत नॉर्मल पद्धतीने झालेल्या बाळांना पहिल्या तासात स्तनपान मिळण्याची शक्यता दुप्पट शक्यता आहे.
ज्या स्त्रियांचे सिझेरियन होते, त्यांना भूल, शस्त्रक्रिया यांमुळे बाळाला योग्य रीतीने उचलून घेण्यात अडचणी येतात. म्हणून पहिल्या तासात पाजले जात नसल्याचेही या अहवालाने नोंदवले आहे.
नॉर्मल बाळंतपणात बाळाच्या आईच्या योनीमार्गातील मित्रजंतूशी आधीच गाठ पडते. बाळाच्या आरोग्य आणि प्रतिकारशक्तीसाठी ते महत्त्वाचे असते. म्हणूनच तर पहिल्या तासातील स्तनपान आणि आईच्या त्वचेशी स्पर्श या दोन्ही गोष्टी सिझेरियन पद्धतीतल्या अर्भकांसाठी तर अधिकच महत्त्वाच्या असतात.
थोडे कष्ट घेण्याची गरज
सिझेरियनची अडचण बऱ्याच जणींनी सांगितल्याने याबाबत थेट डॉक्टरांनाच विचारले. बालरोगतज्ज्ञ प्रशांत गांगल यांनी अगदी एका वाक्यात सांगितले की, अडचणींवर मात करण्याची आणि कष्ट घेण्याची वृत्ती आरोग्यसेवक, डॉक्टरांनी बाळगल्यास सिझेरियननंतरही दूध पाजणे शक्य आहे. ते म्हणतात- “बाळंतपणामध्ये काहीतरी गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे सिझेरियन केलेले असते. त्यामुळे सिझेरियनची धास्ती आणि तणाव मातेवर येण्याची शक्यता असते. शिवाय शस्त्रक्रिया, भूलीमुळे शुद्धीवर येण्यासही उशीर होतो. याचा परिणाम म्हणून बाळाला जवळजवळ दुसऱ्या दिवशी पाजले जाते. मात्र सिझेरियन झाले हे कारण पुढे करून स्तनपान नाकारणे, विलंब करणे हे काही योग्य नाही. अडचणी आहेत तर त्यातून मार्ग काढण्याची वृत्ती हवी. प्रसूतीगृहातील आरोग्यसेवक, डॉक्टरांकडे त्यांच्यापुढील मातेच्या अडचणीनुसार मार्ग काढण्याची, थोडे अधिक कष्ट घेऊन बाळाला लवकरात लवकर स्तनपान मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पूर्वी भूल दिल्यानंतर रक्तात किंवा दूधात त्याचा अंश मिसळण्याचा एक धोका असायचा. मात्र आता सरसकट मज्जातंतूत भूल दिली जाते. त्यामुळे दूधावर त्याचा परिणाम होण्याचा काहीच प्रश्न नसतो. आता सिझेरियनमुळे मातेला उठून बसता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र अशा वेळी जर आईच्या खांद्याकडून बाळाला दिले, तर नक्कीच बाळ दूधाचा शोध घेऊन आईच्या स्तनापर्यंत पोहचते. यासाठी प्रसूतीगृहातील डॉक्टर, आरोग्यसेवकांनी हे साधं तंत्र समजून ते अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. ते सहज शक्य आहे. आईच्या पोटाची शस्त्रक्रिया असते. छातीची नव्हे. त्यामुळे ती निश्चितच दूध पाजू शकते. आणि केवळ स्तनपानच नव्हे तर आईच्या त्वचेशी बाळाच्या त्वचेचा संपर्क येणं ही महत्त्वाचं आहे. कारण आईच्या शरीरावर त्यावेळेस भरपूर मित्रजंतू असतात आणि त्याचा फायदा बाळाला आयुष्यभर मिळणार आहे. त्यामुळे प्रसूतिगृहातील डॉक्टरांनी, आरोग्यसेवकांनी, नातेवाईकांनी थोडे कष्ट घेण्याची गरज आहे.”
थोडक्यात, बाळ जगात आल्याबरोबर तातडीने स्तनपान देणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी डॉक्टरांनी मातांना सांगणे क्रमप्राप्त आहे. कारण याबाबत मातांना माहिती असतेच असे नाही. काही वेळा पहिले दूध वाईट असते असे मानून बालरोगांपासून मुक्ती देणाऱ्या महत्त्वाच्या या घटकास वाया घालवले जाते. दूध काढून फेकूनही दिले जाते. २००५ नंतर पहिले स्तनपान देण्यात सुधारणा घडली तरी अद्याप ती पूर्णपणे नाही.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण नुसार अर्भकांना पहिल्या तासातील स्तनपानाचे प्रमाण २००५ मध्ये २३.१ टक्के होते. २०१५-१६ मध्ये मात्र हे प्रमाण ४१.५ टक्के इतके झाले. संपूर्ण देशाचा विचार करता गोव्याचा क्रमांक पहिल्या स्तनपानासाठी अग्रेसर आहे. सर्वेक्षणानुसार मागील दोन वर्षांत ज्या बालकांचा जन्म झाला आणि ज्यांना पहिल्या तासात पाजले गेले अशा बालकांपैकी ७५.४ टक्के बालके गोवा राज्यातील आहेत. त्यानंतर मिझोरममध्ये ७३.४4 टक्के, सिक्कीम ६९.७ टक्के, ओडिसा ६८.९ टक्के असे प्रमाण आहे. सर्वांत कमी प्रमाणात उत्तर प्रदेश (२५.४ टक्के), राजस्थान (२८.४ टक्के) आणि उत्तराखंड (२८.८ टक्के) यांचा क्रमांक लागतो.
स्तनपानात विलंब होतो, तेव्हा त्याचा थेट अर्थ होतो की मुलांना मध, साखरपाणी की दूधाची पावडर दिली जाते. याला ‘प्रीलॅक्टिल फीड’ म्हणतात. यात उत्तर प्रदेशचा क्रमांक अव्वल आहे. तिथे ४१.५ टक्के मुलांना वरचे पाणी, दूध दिले जाते. त्यानंतर उत्तरखंड येथे ३९.१ टक्के, पंजाब ३२.१ टक्के असे प्रमाण आहे. संपूर्ण भारतात आईच्या दूधाशिवाय प्री लॅक्टील फीड होणाऱ्या बालकांचे प्रमाण २१.१ टक्के आहे.
.............................................................................................................................................
बाळाला पहिल्या तासात कसे पाजावे यासंबंधी युनिसेफने पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासन, पोषण विभाग, एकात्मिक बाल विकास केंद्र, एनजीओज एकत्रित मिळून ‘ब्रेस्ट क्रॉल’ हा व्हिडिओ तयार केला आहे. त्याची लिंक -
.............................................................................................................................................
लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.
greenheena@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment