अजूनकाही
‘गर्ल्स काउंट’ संस्थेतर्फे युएन वूमनच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या भेटीअंतर्गत आम्ही ‘ब्रेकथ्रू’ या संस्थेचं काम बघायला गुढाण गावातल्या ‘राजकीय विद्यालया’त पोचलो. तिथल्या ‘तारों की टोली’ला भेटायचं होतं. ‘ब्रेकथ्रू’ या संस्थेनं ‘तारों की टोली’ हे २०१४ पासून हरियाणातल्या दीडशे शासकीय शाळांमध्ये तयार केलेलं मुला-मुलींचं नेटवर्क. नव्या पिढीच्या मना-मेंदूत लिंगभावविषयक संवेदनशीलता रुजवणं हा या मोहिमेचा मुख्य हेतू. लहान-मोठे खेळ, गाणी, गप्पा, चित्रं अशा माध्यमांतून समानतेचा विचार पोचवला जातो. हरयाणापासून सुरुवात करून आता हा प्रकल्प उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार या राज्यांमध्येही विस्तारलाय.
सगळा आल्हाददायक मोसम, नजर जाईल तिथपर्यंत बसंती चुनरी लपेटून पसरलेली सरसोंची शेतं आणि सुजलाम सुफलाम हरियाणा राज्याचं दृश्य रूप असं मनभावन असलं तरी तिथलं सामाजिक-सांस्कृतिक वास्तव मात्र तितकंच भयान आहे. महिला-दलितांबाबत कायम घडणाऱ्या गुन्ह्यांची चढती आकडेवारी, खाप पंचायतींची दहशत आणि घसरत्या लिंग गुणोत्तराचे आकडे. ‘दंगल’सिनेमात पाहिलेली गीता-बबिता फोगाटची कथा दंतकथा वाटावी असं वास्तव.
‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६’ची नुकतीच प्रसिद्ध झालेली आकडेवारी हरियाणा राज्याबद्दल सांगते, ६ ते १४ या वयोगटात शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींचं गुणोत्तर ९७:९४ असं आहे. मात्र १५ ते १७ या वयोगटात ते थेट ८४:७७ इतकं विषम होतं. ९० टक्के मुलींचे विवाह १८ वर्षं पूर्ण होण्याच्या आधी होतात. १५ ते ४९ वयोगटातल्या नोकरदार महिलांचं प्रमाण आहे केवळ २२ टक्के. आणि याच वयोगटात पुरुषांचं प्रमाण आहे ७७ टक्के. एकट्यानं किंवा भागीदारीत घराची आणि जमिनीची मालकी असणाऱ्या मुलींचं प्रमाण आहे अनुक्रमे ३५ आणि २७ टक्के.
‘ऑल इंडिया डेमोक्रेटिक वूमन्स असोसिएशन’च्या लढाऊ कार्यकर्ता जगमती संगवान मूळच्या हरियाणाच्या. त्यांची निरीक्षणं कमालीची मार्मिक आहेत. ‘यहां खाप और शासन दोनोंका वैचारिक दर्शन ऐकजैसा है’ अशी स्पष्टोक्तीनं सुरवात करत त्यांनी सांगितलं, ‘हरियाणातली स्त्री आता हिंसेची बळी व्हायला नकार देते आहे. पण अशा बंडखोर महिलांना हवी असणारी सपोर्ट सिस्टम मात्र शासन उभी करत नाही. सगळ्या व्यवस्थेतच एक ‘जेंडर ब्लाइंडनेस’ दिसतो. झज्जर, सोनीपत, पानिपत या जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तराच्या बाबतीत अतिशय वाईट परिस्थिती आहे. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अंतर्गत शासन जरी ही परिस्थिती सुधारल्याचा दावा करत असलं तरी चित्र फारसं समाधानकारक नाही.’
दिल्ली ओलांडून हरियाणातल्या रोहतक जिल्ह्यात पोचताना हा विरोधाभास मनात तीव्र होत राहिला. मात्र ‘राजकीय विद्यालय’ हा काय प्रकार आहे काही कळेना. मग ‘ब्रेकथ्रू’चा एक कार्यकर्ता म्हणाला, ‘इथं राजकीय म्हणजे शासकीय’. या विद्यालयात सरपंच अशोकजी, मुख्याध्यापक करमबीरसिंगजी, गणिताचे शिक्षक हरभगवान आणि मुलांचे काही पालक असे सगळे आमच्या स्वागताला तयार होते.
‘ब्रेकथ्रू’चा कार्यकर्ता नरेश कुमार म्हणाला, ‘ये लडकियाँ है तो बडी हुनरवाली. पर उनको खेलकुद के लिये गाँव से बाहर भेजने को कोई तैयार नहीं था. ‘तारों की टोली’ने समझाया तो उनके माँ-बाप मान गये.’ मी म्हणाले, ‘वाह, और क्या-क्या किया इस ‘तारों की टोली’ने?’ त्यावर नरेश बोलला, ‘वो आप ‘तारों’ से ही पुछिये ना!’
आम्ही एका वर्गात गेलो. सगळ्या भिंती या ताऱ्यांच्या कलाकारीनं सजलेल्या. ‘हमको अपने अधिकार पता है’, ‘लडका-लडकी एक समान’ अशा संदेशांसोबत काढलेली अर्थपूर्ण चित्रं लक्ष वेधून घेत होती.
मुलांच्या आधी मुलीच उत्स्फूर्तपणे बोलत्या झाल्या, ‘हम लडकियाँ पहले सबके सामने बात करना तो क्या, खुलकर हँसने से भी डरती थी. पर अब हम में एक विश्वास जगा है. अब हम अपनी बात बिना किसी झिझक के सबके सामने रखते है. ‘तारोंकी टोली’वाले लोग स्कूल में आये और उन्होने लडके-लडकियोंको सबसे पहले एकसाथ खेलने लगाया. थोडा अजीब लगा. पर मजाभी आया. हमें बहोत सारी नयी बातें बतायी. घर जाकर वो बातें बोलनेपर मम्मी-पापा बोलते, ‘ये कहाँ से सिखा? लडकियाँ भले इतना बोला करती है? आजकल तुम सवालभी बहोत करने लगी हो. खेल-कूदसे क्या होगा? जरा पढनेमें मन लगाओ.’’
कनिका म्हणाली, ‘भेदभाव तो हमेशा से ही अनुभव किया. पर उसको पहचानना आता नहीं था. जैसे हमारे यहाँ लडका पैदा होनेपर थाली बजाते है. और लडकी बस बिना किसी जश्न के पैदा होती थी. टोली में आनेपर ये बात महसूस हुई. फिर हमने एक अभियान चलाया के लडकी होनेपर भी थाली बजाई जानी चाहिये. अब वो बजती है, खुशी भी मनती है.’ सोनाली सांगू लागली, ‘लडकों का खाना होता है चुरमा-घी, दूध, फल. लडकीयों के हिस्से सिर्फ रोटी-सब्जी आती है.’
या मुलींच्या व्यक्त होण्यातली स्पष्टता आणि सफाई अजिबात कृत्रिम वाटत नव्हती. ‘लडकियों की पहचान सिर्फ पिता के नामसे क्यूं हो? माता का नाम भी उसके नाम में शामिल होना चाहिये. या फिर सिर्फ खुदका नाम.’ या सगळ्या जणी नाव विचारल्यावर अगदी ठामपणे फक्त स्वत:चंच नाव सांगायला लागल्या. या पोरसवदा वयात त्यांना आलेली ही समज हरखून टाकणारी होती.
राजवती, कांता या दहावीतल्या मुलींच्या आयाही तिथं आल्या होत्या. डोक्यावर अगदी हनुवटीपर्यंत घुंघट. सलवार कमीज. पायात मात्र शूज. बराच आग्रह केल्यावर घुंघट कपाळावर नेत बोलत्या झाल्या.
कांता म्हणाली, ‘मला एक अकरावीत शिकणारा मुलगा आहे. मी पुढं बहिणीच्याच मुलीला दत्तक घेतलं. तिचं नाव ठेवलं ज्योती. आता दहावीत शिकते. खूप हुशार आहे. आता परवाचीच गोष्ट, गावातल्याच एका मुलानं ज्योतीची छेड काढली. तिनं लगेच त्याला रस्त्यातच चोपून काढलं. पूर्वी इतकी हिंमत नव्हती तिच्यात. किंवा तिनं तसं बनावं म्हणून मीही कधी प्रयत्न केले नव्हते. मलाही वाटायचं, मुलींनी आपलं खाल मानेनं राहावं, म्हणजे कुणी काही करणार नाही. पर ज्योती ‘तारों की टोली’ में दाखील हुई. तब से घर आकर अलग-अलग बातें बताने लगी. ऐसी बातें, जो पहले कभी देखी, सुनी ना थी! मैं बस दसवी तक पढ़ पायी. जल्दी शादी हो गई. मैं खेलकुद में भी आगे थी. पर शादी के बाद सब खत्म हो गया. ज्योती ‘टोली’ में शामिल होने के बाद कबड्डी खेलने लगी. लगता है, मेरे अधुरे सपने अब वो पुरे करेगी.’
राजवंती सांगू लागली, ‘माझी मुलगी भावना क्रीडास्पर्धांमध्ये भाग घ्यायला गावाबाहेर जिल्ह्याच्या ठिकाणी जाते. पूर्वी भीती वाटायची. आता तिच मला विश्वास देते. मी निर्धास्त आहे.’
पण एक गोष्ट आहे, बहुतेक घरातल्या मुलींसारख्याच या दोघी ‘राजकीय’ शाळेत जातात आणि यांचे भाऊ खासगी शाळेत.
दीप्ती म्हणाली, ‘काही मुलींचे पालक त्यांना कबड्डी स्पर्धेसाठी बाहेरगावी पाठवायला तयार नव्हते. मग ‘तारों की टोली’नं जाऊन त्यांचं मन वळवलं आणि आम्ही बाहेरगावी खेळायला गेलो. गाँव का भरोसा जीतना हमारे लिये बहोत बडी बात थी.’
सगळ्या मुलींची अशी जोरदार मनोगतं सुरू असतानाच एक मुलगी हमसून-हमसून रडू लागली. बऱ्याच प्रयत्नांनी तिला शांत करून बोलतं केल्यावर ही मधू म्हणाली, ‘आमचे पालक मुलांना सगळी मुभा लगेच देतात. अगदी बाहेर शिकायला, खेळायला जाणं, कुठल्याही गोष्टीसाठी लगेच पैसे-प्रोत्साहन मिळणं त्यांच्यासाठी सहज होतं. आम्ही मुली मात्र लहान-लहान गोष्टींसाठी झगडतो. बहुतेकदा या झगड्यात हरतो. मग नकोच वाटतं सगळं. घरचे लोकही परके वाटायला लागतात.’
याहून सुखद काय असेल, तर मुलींसोबतच मुलांनीही समानतावादाची भाषा न अडखळता बोलणं.
संजीत म्हणतो, ‘आमचे सगळे विचारच बदलून गेलेत. पूर्वी वाटायचं, आम्ही मुलंच श्रेष्ठ आहोत. मुली कमजोर असतात. आता कळलं, असं काही नसतं.’
रोहित एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवतो, ‘बघा ना, मुला-मुलींना खेळणीही वेगवेगळी दिली जातात. लहानपणी हे काही कळायचं नाही, पण आता मी हे असं काही होत असेल तर त्याबाबत बोलतो, बदल करायला भाग पाडतो.’
सगळ्या मुलांच्या बोलण्यात एक महत्त्वाचं वाटलं, की ही अजून मिसरुडही न फुटलेली पोरं म्हणत होती, ‘आमचं काय? आम्हाला सगळं सहज मिळतं. आमचं स्वातंत्र्य जन्मापासूनच आमच्याजवळ आहे. पण या आमच्या मैत्रिणींचं काय? त्यांना त्यांचं स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढाईत आम्हाला सोबत उभं रहायचंय.’
राज म्हणाला, ‘मुलींच्या सगळ्याच अधिकारांवर गदा येते, तेव्हा कुणालाच काही वावगं वाटत नाही. आता हे कळतं तेव्हा वाटतं हे बदललं पाहिजे. और हां, लडके लडकियोंवाले और लडकियां लडकोवाले काम कर सकती है. उसमें कोई गलत बात नहीं है.’
मुलींच्या, स्त्रियांच्या जगात प्रश्न आहेत. पुढेही असणार आहेत. मात्र प्रश्नांविरुद्ध लढताना आता ही लढाई ‘मुलं विरुद्ध मुली’ किंवा ‘स्त्री विरुद्ध पुरुष’ अशी असणार नाही. ती आता पितृसत्तेविरुद्ध असणार आहे. स्त्री आणि पुरुषालाही माणूस बनण्यापासून वंचित ठेवणाऱ्या सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध असणार आहे याची सुखद ग्वाही ‘तारोंकी टोली’ देत राहते. निघताना सरपंच अशोक कुमार म्हणाले, ‘हमें अपने बच्चों पे विश्वास है. जमाना बदल गया है तो हम बुढों को भी बदलना चाहिए. अब आप देखो, औरत होकर भी बतौर पत्रकार इतने दूर से हमारे गाँव आयी है, तो हमारी लडकीयाँ भी बाहरगाँव क्यू ना जाये? आजकल नोकरी सिर्फ पढ़ाई से थोडे मिलती है, दुनियादारी का हुनर और कॉन्फिडन्स भी तो चाहिये ना!’
नवी पिढी स्वत: बदलतानाच जुन्या खोडांवरही बदलाची पालवी उगवताना पाहतेय...
याहून अधिक सुंदर काय असेल?
.............................................................................................................................................
लेखिका शर्मिष्ठा भोसले मुक्त पत्रकार आहेत.
sharmishtha.2011@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment