‘तीन तलाक’ विरुद्ध पाच महिला (पूर्वार्ध)
अर्धेजग - महिला दिन विशेष
हिनाकौसर खान-पिंजार
  • ‘तीन तलाक’ विरुद्ध लढणाऱ्या पाच महिला
  • Thu , 08 March 2018
  • अर्धे जग Women World जागतिक महिला दिन International Women's Day हॅप्पी विमेन्स डे Happy Women's Day तिहेरी तलाक त्रिवार तलाक Triple talaq मुस्लिम पर्सनल लॉ Muslim Personal Law

काशीपूर (उत्तराखंड)च्या शायराबानो, जयपूर (राजस्थान)च्या आफरिन रेहमान, सहारनपूर (उत्तर प्रदेश)च्या आतिया साबरी, गाझियाबाद (दिल्ली)च्या गुलशन आणि हावडा (प. बंगाल)च्या इशरत जहाँ या पाच महिलांनी तिहेरी तलाकविरोधात लढा दिला. केंद्र सरकारला त्याविषयी कायदा करायला भाग पाडलं. त्या पाच महिलांना भेटून लिहिलेला हा रिपोर्ताज संपादित स्वरूपात...

.............................................................................................................................................

शायराबानो (काशीपूर, उत्तराखंड)

शायराबानो या त्यांच्या भावंडांमध्ये थोरल्या. एकूण तीन बहिणी, एक भाऊ. चौघांची लग्नं झालीत. इतर दोन्ही मुलींची कुटुंबं चांगली लाभली, पण आपल्या मोठ्या मुलीच्या शायराबानोच्या नवऱ्याची- रिझवान अहमदची पहिल्यापासूनच तक्रार राहिली. कधीही तो सुज्ञपणे वागला नाही, की माहेरच्या लोकांसोबत मिळून-मिसळून राहिला नाही. त्याचा वावर सतत दहशतीचा आणि नकारात्मक असायचा.

शायराबानो यांचं साधेपणं, काहीसं बुजरेपणही त्यांना या कुटुंबीयांकडून मिळाल्याचं स्पष्ट दिसत होतं. शायराबानो अत्यंत शांत धीरगंभीर आवाजात बोलू लागल्या, “२००२ में शादी हो गयी. वो लोग इलाहाबाद के रहनेवाले थे. माँ का पीहर इलाहाबाद का है. उन्ही के जानपहचानसे यह रिश्ता आया था. इलाहाबाद और काशीपूर काफी दूर रहने के कारण सही रूपसे जान नहीं पाये और शादी हो गयी. पर सुरूसेही उनके घर का और हमारे घर माहौल अलग रहा. सास जो थी वह बडे पुराने विचारोंकी थी. हर छोटी चीज को नाम रखती थी. दहेज के लिए परेसान करती ती. उनका बडा दबाव रहता था और पती भी बस उनकीही बात सुनते थे. भले वो गलतही क्यों ना बोल रही हो. पर हम लोग पहले पता नहीं कर पाये थे.” मुलाकडच्या कुटुंबीयांविषयी अधिक माहिती न काढताच लग्न झाल्याची खंत त्यांच्या बोलण्यात वारंवार येत होती.

एम.ए. झालेल्या शायराबानो यांच्या पतीनं त्यांच्या कुटुंबीयांना ते तर बारावी झाल्याचं सांगितलं होतं. प्रत्यक्षात तर ते हायस्कूल फेल होते. लग्नाच्या वेळेस त्यांची एक पेप्सीची एजन्सी होती. यावरही शायराबानो समंजसपणे म्हणतात, “माझ्या नवऱ्याच्या बाबतीत असं होतं की, त्याचे विचारही आधुनिक, चांगले नव्हते. सोच अच्छीही नहींथी. आणि आम्हाला आधी ते कुटुंब कसं आहे, हे कळलंच नाही. सासूसुद्धा मागास विचारांची होती. सुनेनं काही बोलू नये, सतत कामाला जुंपून घ्यावं- असं तिला वाटत राहायचं. शिवाय हुंडा आणावा म्हणून छळायची. माझ्या कुटुंबीयांनी कर्ज काढूनच माझं लग्न लावून दिलं होतं, अधिकचा हुंडा कुठून आणणार होते? त्यामुळे निमूट सहन करत राहायचे. माझ्या नवऱ्याचा स्वभावही भांडकुदळ. स्वत:च्या कुटुंबीयांबरोबरही त्याचं कधी जमलं नाही. त्यांच्या घरगुती वादातून तो त्याच्या कुटुंबीयांवर नाराज झाला आणि आम्ही वेगळे राहू लागलो. त्या वेळेस मी पहिल्या मुलासाठी गर्भवती होते. सुरुवातीला मलाही वाटलं- चला, वेगळं राहिल्यानंतर तरी काही सुधार येईल. पण तसं काही झालं नाही. माणूस मुळातच ज्या वातावरणात वाढलेला असतो, जे संस्कार झालेले असतात, ते सोबत येतातच, तो कुठेही गेला तरी. ते आधी मारझोड करायचे, शिव्याशाप द्यायचे. मग पुन्हा येऊन गोड बोलायचे. माझी काळजी करतायेत, माझ्याविषयी प्रेम वाटतं, असं दाखवायचे. मग मीही म्हणायचे, झालं-गेलं गंगेला मिळालं. याच वातावरणात दुसरी मुलगी ही झाली. अगदी टिपिकल गृहिणी झाले. घरसंसार, मुलं सांभाळणं. कधी कुठं जाणं-येणं नाही, की कशानिमित्त घराबाहेर पडणं नाही. पण या दरम्यान मी आजारी पडू लागले.''

शायराबानोही सांगू लागल्या- “दरअसल उन्होंने मेरे सात अबॉर्शन किये. घरपरही कुछ दवाईयाँ ला कर देते थे. उसका साईड इफेक्ट हो कर मेरी किडनी और लिव्हर में प्रोब्लेम्स हुई. पता नही कौनसी दवाईयाँ देते थे कि मुझे चक्कर भी आता था.” मी अवाक्. गर्भपात? तेही एक दोन नव्हे, तर सात वेळा. तेही डॉक्टरांच्या देखरेखीत नव्हे, तर कुठल्या तरी गोळ्यांनी. ‘सर्दी जुकाम’ झाल्यावर त्यानं कधी शायराबानो यांना दवाखान्यात नेलं नाही, तिथं गर्भपातासाठी नेण्याची अपेक्षाच दुरापास्त होती. न राहून मी विचारलंही, “तुम्ही कधी त्यांना सुरक्षित संबंध ठेवण्याविषयी सुचवलं नाही का? त्यासाठी कंडोम, कॉपर-टी, गर्भनिरोधक गोळ्या असे पर्याय सुचवले नाहीत किंवा थेट मूल न होण्याची शस्त्रक्रिया का केली नाही?” शायराबानो यांचं उत्तर होतं, “निरोध किंवा तत्सम सुरक्षासाधनांविषयी सांगितल्यावर ते मला घाबरवत असत. एक तर अशी साधनं लैंगिक सुखात अडथळा ठरतात. दुसरं त्यामुळे तुलाच गुप्तरोग किंवा काही तरी आजार होईल. आजारांविषयी फार वाढवून-चढवून सांगत. मीही घाबरून जात असे. मला गर्भपाताच्या गोळ्यांचीही भीती वाटायची, पण नाइलाज होता. बरं, मी गर्भनिरोधक गोळ्या घ्याव्यात, तर तेही मला कोण आणून देणार? पती-पत्नीतला हा खासगी मामला असतो. मी असं कुणाला सांगणार होते? त्यामुळे गर्भ राहिला की निमूट तो घरच्या घरी पाडून घ्यावा लागत होता. त्यासाठीची औषधंसुद्धा तोच आणायचा. नंतर नंतर कुठली तरी औषधं सतत देऊ लागला. त्यामुळं तर सतत कुठल्या ती धुंदीत असल्यासारखीच अवस्था झाली होती. या गर्भपातांविषयीदेखील मी कधीच कोणाला सांगितलं नाही. माहेर तर दूर होतं. सासरच्या लोकांशी तर माझ्या नवऱ्याचंच जमायचं नाही, तर माझी कोणाला काळजी असणार? औषधांच्या दुष्परिणामांनी मात्र आपलं काम सुरू केलं होतं.''

शायराबानो पुढं सांगू लागल्या, “एकीकडं शारीरिक त्रास होता, दुसरीकडं मानसिक त्रासही होता. माझ्या पतीचे मामा-मामी आणि त्यांचा एक मित्र हे नेहमी म्हणायचे, सोडून दे तिला. आपल्यात काय तलाकही होतात आणि दुसरं लग्नही. सतत आजारी असते. ती बिनकामाची झाली आहे. काही गुण नाहीत तिच्यात. जाणीवपूर्वक माझ्यासमोर म्हणायचे. मला घाबरवायचे. २०१५ मध्येही असाच एक गर्भपात झाला आणि खूप आजारी पडले. सतत ग्लानी. डोक भणाणून गेलं होतं. उठताबसता येत नव्हतं, की काही करता. आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे नेण्याची जबाबदारी तर नवऱ्याची आहे ना? परंतु तो मला सरळ माहेरी घेऊन आला. त्या वेळेस सोबत मुलंही होती. मुरादाबादलाच सोडलं. माझ्या वडिलांनी माझी अवस्था पाहिली आणि घरी आणण्याआधी हॉस्पिटलमध्येच नेलं. वेळेत आले नसते तर माझं वाचणं अशक्य होतं, असं डॉक्टर सांगू लागले. उपचार सुरू झाले. जरा जरा तब्येत बरी होऊ लागली. तीन महिने झाले होते. जून सुरू होणार होता. मुलांनाही वडिलांची आठवण येऊ लागली होती. त्यांच्याकडून तर काही प्रतिसाद येत नव्हता, मीच फोन करून त्यांना म्हणाले, ‘मैं आ जाती हूँ. आपके भी तो खाने के लिए परेशान होना पडता.’ तर, तिकडून त्यानं साफ मना केलं. ‘येण्याची जरुर नाही. मी तुला सोबत ठेवणार नाही’ असं म्हणाले. मी गळाठून गेले. ‘का नाही ठेवणार? काय झालं?’ मी विचारत राहिले, पण त्यांनी फोन कट केला होता. दुसऱ्या लग्नासाठी मुलगी शोधत असल्याचं माहीत झालंच होतं. त्याच वेळी मुलंही तिथं राहायला तयार नव्हती. त्यांचे शालेय प्रवेशही झाले नव्हते. सतत वडिलांविषयी विचारणा करू लागले. मग मुलांमुळे तरी दुसऱ्या लग्नाचा विचार सोडेल, असा विचार करून त्यांना पाठवलं, तर त्यानंतर आजतागायत मुलांचं तोंड पाहिलं नाही की आवाज ऐकला नाही!” त्या हळुवार झाल्या. मुलांच्या आठवणीनं व्याकूळ झालेलं त्यांचं मन स्पष्ट कळत होतं. काही सेकंद गप्पच राहिल्या.

“१० ऑक्टोबर २०१५ ला स्पीड पोस्टानं तलाकनामा पाठवला. त्याचबरोबर मी घरातील पैसे-दागिने घेऊन गेले, अशी केस केली. ती स्पीड पोस्ट पाहून मी तर हादरून गेले. कितीही भांडणं झाली तरी आपला ‘तलाक’ होईल, असं कधीही वाटलं नव्हतं. सुरुवातीला मुफ्तीमौलानांकडे गेले. सगळ्यांनी सांगितलं, तलाक तर झालाच. शरियतमध्ये असंच असतं. पण त्यानं दुसरी केस जी दागिने-पैशांची केली होती, त्यासाठी इलाहाबादला वारंवार जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग ती केस काशीपूरला ट्रान्सफर करून घ्यायची होती. राज्यांतर्गत केस ट्रान्सफर करायची असेल, तर उच्च न्यायालयात जावं लागतं; पण आंतरराज्य असेल, तर सर्वोच्च न्यायालयात. माझे बंधू अर्सदअली यांना इथल्या लोकल वकिलांनी सर्वोच्च न्यायालयातील वकील बालाजी श्रीनिवासन यांच्याविषयी सांगितले. स्त्रियांच्या केसेस लढण्यासाठी ते एकही पैसा घेत नाहीत, अशीही त्यांनी माहिती दिली. माझे बंधू त्यांच्याकडे कागदपत्रं घेऊन गेले. बालाजी श्रीनिवासन यांनी केस ट्रान्सफर करून घेण्यासाठी तर अर्ज केला; पण त्यांच्या लक्षात आलं की, फारच अन्यायकारक प्रथा आहे आणि हे सारं अघटनात्मकही आहे. त्यांनी भावाला सांगितलं की, ‘तुम्ही या विषयावर आवाज उठवू शकता. कायदेशीर लढा देऊ शकता. तुम्ही तयार असाल, तर मी तुमची बाजू लढवेन. यासाठी तुम्हाला समाजाकडून खूप निंदानालस्ती सहन करावी लागेल. तुमच्यावर फार दबाव येतील, कदाचित समाजातून वाळीत टाकतील. मस्जिदमध्ये प्रवेश नाकारतील. हे सोपं नसेल. घरी जा. दोन-तीन महिने विचार करा आणि मग ठरवा...”

त्यांच्या वडिलांनी अवघ्या पंधरा दिवसांत बालाजी श्रीनिवासन यांना कळवलं की, ‘आम्ही तिहेरी तलाक बंद करण्यासंदर्भात याचिका करायला तयार आहोत. माझ्या मुलीवर आली तशी वेळ इतर कुणावर येऊ नये.’ तरीही वकील म्हणून ते पुन:पुन्हा समजावत होते की, ‘पाहा, तुम्ही उद्या मागे हटलात, तर फार अवघड होईल. नीट विचार करून निर्णय घ्या. तुम्ही तयार झालात तर मी पूर्णत: लढेन. लोक घाबरवायला येतीलच, पण तुम्ही हटू नका. आपल्या म्हणण्यावर कायम राहा. हे शक्य असल्यासच याचिका करू.’ शायराबानो सांगतात, “आपल्यावर अन्याय झाल्यानं तलाक म्हणजे काय, हे कळतंय. जर याचिकेनं इतर मुलीं/बायकांना न्याय मिळणार असेल, तर आपण निश्‍चितच करू. मनात या सगळ्याविषयी चीड होती. मग म्हटलं, कुणाला आणि का घाबरायचं? साऱ्या कुटुंबीयांचं एकमत झालं आणि देशातून तिहेरी तलाकचं उच्चाटन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात फेब्रुवारी २०१६मध्ये पहिली याचिका दाखल झाली.''

केसच्या काळात वर्ष-दीड वर्ष त्यांना अशा अनेक प्रकारच्या दबावांचा सामाना करावा लागला, परंतु त्यांनी कधीही पीछेहाट केली नाही. शायराबानो यांनी लग्नाच्या तेरा वर्षांतही खूप सहन केलं आणि लग्न मोडल्यानंतरही. आता मात्र त्या स्वत:ला त्यातून सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यांनी एमबीएसाठी प्रवेश घेतला आहे. त्यानंतर नोकरी करण्याचाही त्यांचा मानस आहे.

आफरिन रेहमान (जयपूर, राजस्थान)

शायराबानो यांच्यानंतर दुसरी याचिका जयपूरच्या आफरिन रेहमान या अठ्ठावीस वर्षीय तरुणीनं केली. आफरिन एमबीए (फायनान्स) झाली आहे. पाचही याचिकाकर्त्यांमध्ये आफरिनचं वय कमी आहे. लग्नानंतर वर्षभरातच तिचा तलाक झाला. एकोणीस-वीसची असेल, तेव्हा तिच्या वडिलांचा हार्टअ‍ॅटॅकनं मृत्यू झाला होता आणि लग्नानंतरच्या वर्षभरातच एका अपघातात आईचं निधन झालं. त्या अपघातातून ती स्वत: कशीबशी वाचलेली होती. पण आई गेल्याची जखमच तर ठसठशीत होती. तिचं मन आईच्या नसण्याचा स्वीकार करायला धजावत नव्हतं. त्या दु:खाचा कढ ओसरला नव्हता, त्याच सुमारास तिच्यावर ‘तिहेरी तलाक’चा आघात झाला. आई-बापाविना पोरक्या झालेल्या आफरिनला जेव्हा तिच्या पतीची सर्वाधिक गरज होती. ज्याच्या प्रेम आणि काळजीनं ती आपल्या जखमांवर आणि दु:खावर फुंकर मारणार होती. नेमका त्याच वेळेस तिच्यावर अवघड प्रसंग ओढवला. त्या दु:खद काळातून बाहेर पडायला तिला वेळ लागला खरा, पण त्यातून तिची एक सशक्य व्यक्ती म्हणून घडवणूक झाली.

आफरिन व तिचे कुटुंबीय आदल्या रात्री जोधपूरहून प्रवास करून सकाळी अकराला पोहोचले होते. त्यामुळे त्यांना काही भेटता आलं नाही, परंतु आफरिनशी मोकळा संवाद झाला. तिच्या रूममध्ये शिरता-शिरताच ती म्हणाली, ‘यु नो, मुस्लिम वुमन प्रोग्रेस्ड इन देअर थिंकिंग, देअर आऊटलुक बट मेन आर स्टील रिग्रेसिव्ह. जस्ट लुक अ‍ॅट यू, यू केम अलोन टू मीट. पर आज भी हमारी सोसायटी के मर्दोंको ये किसी अजूबेसे कम नहीं लगता. दे स्टिल लिव्हज इन फोर्टीन्थ सेंच्युरी. आय रिअली फील, मेन नीड टू चेंज देअर आऊटलुक. इट्स मोअर हेल्पफुल टू देम रादर दॅन वुमन.” आफरिनची कळकळ बरोबर होती.

पारंपरिक पद्धतीनं पाहून जरी आफरिनचं लग्न ठरलं तरीही लग्नाचा प्रस्ताव पारंपरिक पद्धतीनं नातेवाइकांकडून आलेला नव्हता. ‘शादी डॉट कॉम’ या विवाहेच्छुकांच्या संकेतस्थळावरून त्यांचे प्रस्ताव एकमेकांकडून मंजूर झाले होते. आफरिन सांगते, “जानेवारी २०१४ में शादी.कॉम से इंदौर के अशहर वारसी इनका प्रोफाईल मुझे आया. जनरली लडका क्या करता है, कैसा है, फैमिली में कौन है इस तरह की मालुमात ले ली. फिर उसके बाद वे लोग घर आये. देखना दिखाना हुवा. अशहर लॉयर है. उनके पापा भी डीवायएसपी रह चुके है. मम्मी भी वेल एज्युकेटेड रही. काफी रेप्युटेड फॅमिली लगी. काफी प्रॉपर्टी और पैसा भी था उनके पास. अशहरके भी पापा नहीं थे. बस, एक छोटा भाई था. वो भी मुंबई में फिल्मलाईनमें करिअर कर रहा है. किसीभी प्रपोजलके बारे में जितना जानना-समझना होता है, हमने भी सब मालुमात ले ली. उपरसे तो सभी ठीक ही था. उनके फैमिलीने भी मुझे पसंद किया तो अप्रैलमें फिर एंगेजमेंट हुई. रोका होता है बस वैसा, छोटासाही. जनवरीसे तो हमने कभी एक दुसरे को कोई बातचित नहीं की थी पर अप्रैल के बाद थोडा थोडा बात करना शुरू किया. उस वक्त अशहर एक नाईस डिसेंट गाय लगते रहे. शादी के लिए उन्होंने कहा था की फाइव्ह स्टार में शादी हो. दहेज और जेवरात भी देना था. अब मेरे भी पापा नहीं है. भाईंयों पर इसका बोझ आना था. पर मेरे भाईने भी दस लाख का कर्जा ले कर फोर स्टार रिसॉर्टमें शादी काम इंतजाम किया और २४ ऑगस्ट २०१४ को शादी हो गयी.''

आफरीन सांगते, “सुरुवातीचे दिवस नव्या नवरा-नवरीसारखे सुंदर होते. सारं काही छान आलबेल सुरू होतं. दोन-तीन महिन्यांनंतर सासूच्या थोड्याफार तक्रारी सुरू झाल्या. घरगुती पद्धतीच्या. परंतु माझं आणि अशहरचं चांगलं सूत जुळलं होतं. नवरा-बायकोमध्ये प्रेम असतं, थोडी लुटूपुटीची भांडणं असतात, कधी काळजी असते, कधी तक्रार असते. असं सारं काही आमच्या नात्यात होतं. माझं राहणीमान आधुनिक होतं. अशहरबरोबर फिरायला जातानाही जीन्स-टॉप घालायचे, तर कॉलनीतल्या लोकांना फार हेवा वाटायचा. आम्हाला ‘मेड फॉर इच अदर कपल’ असंही लोक नावाजायचे. इतकं सगळं सुरळीत होतं. माझे सासरे नाहीत, दीर मुंबईला असतो. राहता राहिले अशहर. त्यामुळे त्यांना आपला मुलगा आपल्यापासून दुरावेल का, अशी असुरक्षितता वाटत असणार. ते जाणवायचं अधूनमधून. खरं तर मी अगदी लहानातली लहान गोष्ट सासूलाच विचारून करायचे. तरीही त्यांना कुठं तरी ते वाटायचं की, ही आधुनिक आहे. स्वतंत्र आहे. नोकरी करते. म्हटल्यावर काही प्रमाणात तरी माझ्याही मतांना महत्त्व आहे. काही निर्णय माझेही चालतात. याच गोष्टी त्यांना खटकायच्या. पण त्यांनी तेही कधी स्पष्टपणे सांगितले नाही. पण त्यांच्याकडून तलाक यावा, असं टोकाचं तर काहीच घडलेलं नव्हतं.” आफरिनला स्पीडपोस्टनंच तलाक आला होता. तलाकनामा येण्याआधी तर ती माहेरी होती.

२७ जानेवारी २०१६ रोजी तिला तलाक पाठवण्यात आला. तिच्या भावांनी सुरुवातीला तलाकच्या पत्राविषयी माहिती दिली नाही. दोघांमध्ये बातचित घडवू या, म्हणून ते तिला थेट इंदोरला घेऊन गेले. परंतु तिथं ना कोर्टात, ना घरात- कुठंच त्यांची माहिती मिळाली नाही. तो आधीच पसार होता. शेवटी भावांनी आफरिनला वस्तुस्थिती सांगितली. त्या क्षणी आपण लहान मुलांसारखे रडत राहिल्याचं आफरिन सांगते. “अगदी बेसहारा, बेचारे झाल्यासारखं वाटलं. आईच्या गळ्यात पडून रडावंसं वाटत होतं, पण ती कुठं होती? पाण्याविना मासा तडफेल तशीच मीही तडफडत होते. तलाकनामा त्यानं स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेला होता. ‘मैंने तुम्हे तलाक दिया’ हे वाक्य, तो परिच्छेद तर मी एकदा नव्हे दहादा वाचत होते. पहिल्यांदा तर काही कळलंच नव्हतं, काय म्हणतोय? काय झालंय? विश्वासच बसत नव्हता. वेडीपिशी झाले होते.” आफरिनसाठी तो काळ फार कठीण होता. ती म्हणते, “आजपर्यंत मला तलाक का दिला, हेच कळलेलं नाही. असं नाही की दोन माणसं वेगळी होत नाहीत, पण त्याची किमान एक पद्धत असायला हवी. आपण सुशिक्षित माणसं आहोत. बसून, बोलून, सांगून समज-गैरसमज दूर करता आले असते. ज्याला तलाक दिला जातोय, त्याला किमान कारण तर सांगितलं पाहिजे. दोन्ही बाजू मांडल्या पाहिजेत. माझ्या तलाकनामात म्हटलं की, मी फार खर्च करायचे; पण मी तर स्वत:च कमवत होते. त्यांचा पैसा तर कधी वापरलाही नव्हता. मग? ‘सुख में कमी है’ असंही नमूद केलं. त्याचा तर रागच आला. या सुखाची तर स्पष्टताच नाही. नवराबायकोतलं सुख? घरकामाचं सुख? की आणखी काही म्हणायचंय? किमान त्यात तरी स्पष्ट असावं.''

या सगळ्यातून तिला प्रचंड डिप्रेशन आलं. डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू झाली. दरम्यान, जयपूरमधील मोठमोठ्या उलेमांनी त्यांचा तलाक वैध ठरवला होता. त्यातील एक-दोघा मौलानांनी असा तलाक अवैध आहे, तीन महिन्यांचा इद्दतचा काळ न घेता तलाक होऊ शकत नाही- असं म्हणून अशहरशी संपर्क साधला. बैठक करू या. आई-बापाविना पोर आहे, लग्न वाचवा, असं सांगितलं. समेट घडवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मी स्वत: अनेकदा ‘आपण पुन्हा सुरुवात करू’ म्हटलं. पण त्यांनी कशालाच दाद दिली नाही. सगळी नकारात्मकता घेरून होती. जगणंच नकोसं वाटून तिनं आत्महत्येचा प्रयत्नही केला, पण बचावली.

त्या सुमारास तिनं एक बातमी वाचली, ज्यात यूपीच्या एका न्यायाधीशांनी आपल्या पत्नीला तलाक दिला होता. “मी चकित राहिले. कुणाला काही भिडभाडच नाही. बिद्दत तर शब्दातच गलत, गुन्हा असं आहे. मग कुणीही असं तलाक-ए-बिद्दत कसं देतं? शायराबानोंच्या केसविषयी दरम्यान वाचण्यात आलं आणि ठरवलं की, आपणही याचिका दाखल करू या. आपण सुशिक्षित आहोत, तर आपल्या हक्कासाठी लढणं हे तर आपलं काम आहे.”

तलाक झाल्यानंतर ‘ऑल इंडिया पसर्नल लॉ बोर्डा’कडे का आला नाहीत, अशीही तिला अनेकदा विचारणा झाली. दबाव टाकण्यात आला. पण ती म्हणते, “मी भारतीय नागरिक आहे. संविधानाच्या चौकटीत राहताना जर माझ्या मूलभूत हक्कांवर गदा आली, तर मी त्यासाठी न्यायालयाकडेच धाव घेणार. आमच्या आयुष्याचा फैसला करणारी ही इतर मंडळी कोण आहेत? आणि त्यांना अधिकार कुणी दिलाय? आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास टाकला आणि न्यायालयानंही तातडीने केस चालवून निकाल दिला.”

या वेळी आफरिननं एक खंत व्यक्त केली. “तिहेरी तलाक असांविधानिक ठरून त्याच्यावर बंदी आली. कायद्यासाठी लोकसभेतलं बिल पारित झालं. हा निकाल ऐतिहासिक आहे, असं बोललं जातं. परंतु या सगळ्याला आम्ही पाच जणी कारणीभूत ठरलो, तर त्यासाठी आम्हाला कुणी साधी एखादी नोकरीची विचारणा केली नाही. मला फार आश्चर्य वाटतं याचं. उलट, तलाक झाल्यावर मी नोकरी शोधू लागले, तर घटस्फोटित म्हणून मला नोकरी मिळत नव्हती. एके ठिकाणी मी घटस्फोटाची बाब सांगितली नाही, तिथं नोकरी मिळाली, परंतु बातम्यांमधून जेव्हा नाव येऊ लागलं, तेव्हा कंपनीला कळणं स्वाभाविक होतं. अशा वेळेस कंपनीला आपल्या सहकाऱ्याविषयी अभिमान वाटण्याऐवजी त्यांनी मला नोकरीवर न येण्याची विनंती केली. लोक फक्त शाब्दिक सहानुभूती दाखवतात, पाठबळ देतात; पण आजपर्यंत कोणीच नोकरीची विचारणा केली नाही. मी तर सिंगलच आहे, परंतु ज्यांना मुलं-बाळं असतील, त्यांनी काय करायचं?” आफरिनचा मुद्दा अगदी रास्त आणि आश्चर्यजनकही होता. तिलाच नव्हे, तर इतरही जणींना नोकरीच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर कुठल्याही प्रकारे कुणी मदत केलेली नाही.

निरनिराळ्या प्रकारच्या मानसिक-शारीरिक त्रासातून गेलेल्या आफरिनच्या डोळ्यांत ‘सुखी संसारा’चं स्वप्नही कायम आहे. ती स्वत:च्या लग्नाविषयी अगदी बेफिकरीनं, सहज बोलली. अवघड गोष्टींविषयीची सहजता सहज येत नसतं. परिस्थितीनंच शिकवलेला हा बेडरपणा, सहजता तिच्या जगण्याची ऊर्जा असणार. तिची ती बेफिकिरी खरं तर मलाही आनंद देऊन गेली. जणू ती देव आनंदसाहेबांच्या धर्तीवर म्हणतीये – ‘हर ग़म को नजरअंदाज करते गये, मैं जिंदगी का साथ बेफिकर हो कर निभाती राही..!'

गुलशन परवीन (गाझियाबाद, दिल्ली), (न झालेली भेट)

उत्तर प्रदेश येथील रामपूरच्या गुलशन परवीन या तिसऱ्या याचिकाकर्त्या. तिशीतल्या गुलशन यांना अडीच वर्षांचा एक मुलगा आहे. गुलशन परवीन या सध्या आपल्या भावाकडे गाझियाबादमध्ये राहतात. गुलशन यांच्याशी कुठलाच संवाद झाला नाही. त्यांच्या भावाचा-रईसभाईंचा संपर्क क्रमांक मिळाला होता. त्यावर संपर्क करून त्यांना गुलशन यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा ते अगदी पहिल्याच फोनमध्ये फारसे सकारात्मक नसल्याचं जाणवलं. रईसभाई म्हणाले, “डॉक्युमेंटेशन होणं वगैरे ठीक आहे, पण त्यानं तिला न्याय मिळणार आहे का? तिचं घर-संसार उभा राहणार आहे का? हे सारं करण्यातून हशील काय असणार? मीडियाची काय, एखाद-दोन दिवसांची स्टोरी असते. त्यातही सनसनाटीपणा अधिक असतो. माध्यमं स्टोरी करून मोकळी होतात. पण ज्यांच्यावर करतात, त्यांच्या आयुष्यात काडीमात्र फरक पडत नाही. तिचं ती आयुष्य कंठत राहणार! अ‍ॅट द एंड, तिच्या हाती जर काही लागणारच नसेल तर काय? त्यामुळे नकोच.” रईसभाईंनी सुरुवातीलाच त्यांची अशी भूमिका सांगितल्यावर मीही जरा गोंधळले. तरीही त्यांना विनवणी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. “निश्चितच, गुलशन यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होणार नाही. मात्र त्यांच्या संघर्षामुळे, त्यांच्या धाडसामुळे एखाद्या जरी स्त्रीला उभारी मिळाली, तिलाही अन्यायाचा विरोध करण्याची प्रेरणा मिळाली; तर त्याची मोजदाद कशात करणार? गुलशन यांनी गमावलेलं मिळवून देता येणार नाहीच; परंतु आयुष्य कमावण्याच्या नव्या वाटा, नवी संधी तर शोधता येतीलच. चांगल्या भविष्यासाठी कुणाला तरी खस्ता खाव्या लागतात. कुणी तरी त्याची किंमत चुकवावी लागते. ती किंमत जर तुमच्या बहिणीनं चुकवली आहेच, तर त्याची नोंद योग्य व्हावी. त्या जर कुणासाठी मार्गदर्शक ठरल्या, तर हरकत काय? भेट तुमच्या घरी, तुमच्या कम्फर्टच्या ठिकाणी करू.” माझ्या बोलण्याचा किमानपक्षी सकारात्मक परिणाम झाला, असं मला वाटलं आणि त्यांनी बहिणीला विचारून कळवतो म्हणून सांगितलं. नंतरच्या फोनमध्ये त्यांनी, ‘माझ्या बहिणीला फारसं मीडिया इंटरअ‍ॅक्शन आवडत नाही. तिला नको आहे.’ असं सांगितलं. तरीही मी प्रयत्न करत राहिले. कालांतरानं त्यांनी माझे फोन उचलणं बंद केलं. दरम्यान, शायराबानो यांचे बंधू अरसदअली यांनी सांगितलं की, ‘ते पहिल्यापासूनच मीडिया टाळत आले आहेत. दुसरं असं की, बहुधा ते पुन्हा तिचं आताचं मोडलेलं लग्न जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनही त्यांना मीडिया नको असेल.’ उलट, मला तर ही सकारात्मक बाजू वाटली. त्यानंतर पुन्हा फोन करून मी रईसभाईंना कळवलं की- जर हे सत्य असेल, तर आम्ही त्याचीही नोंद घेऊ. त्या वेळेस ते म्हणाले, “मी माझ्या बहिणीला मनवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही दिल्लीत आल्यावर कळवा.” त्यानुसार मी दिल्लीत गेल्यावर त्यांना कळवलं, पण त्यांची सुरुवातीची नकारघंटा कायम राहिली. ‘गुलशन इज नॉट इंटरेस्टेड, आय अॅम अनेबल टू कन्व्हिन्स हर.’ त्यांनी विषय संपवून टाकला.

या संपूर्ण संवादाच्या काळात गुलशनची इच्छा आणि रस किती होता, हे केवळ मला रईसभाईंकडून कळत होतं. त्यामुळे खुद्द रईसभाईच भेट नाकारत होते की, खरोखर गुलशननं नकार कळवला याची स्पष्टता नाही. मी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलत होते, म्हणून जर मला त्या बोलण्यातून काय जाणवलं हे विचारात घ्यायचं ठरवलं; तर मला कुठं तरी असं वाटतंय की, नंतरच्या टप्प्यात गुलशनचे बंधू राजी झाले होते, मात्र गुलशनच झाल्या नाहीत. अरसदअली यांनी सांगितल्याप्रमाणे जर त्यांच्या लग्नाला पुन्हा एक संधी मिळणार असेल... त्यांच्या पतीला चुकीची जाणीव झाली असेल आणि त्यांचा संसार पुन्हा फुलणार असेल, तर ती खूपच चांगली बाब आहे. चुका प्रत्येकाकडूनच घडतात; परंतु झालेल्या चुकीची जाणीव होणं आणि ती सुधारण्याचा मार्ग स्वीकारणं, ही खरी माणुसकी. याच कारणासाठी गुलशन यांना पतीच्या चुकांची उजळणी करायची नसावी, असा अंदाज आहे. अर्थात हा अंदाज आहे. सत्य हेच की, गुलशन यांच्याशी संवाद झाला नाही. तरीही सर्वोच्च न्यायालयात याचिका करणाऱ्या पाच जणींपैकी त्या एक आहेत आणि तिहेरी तलाकचा जेव्हा जेव्हा इतिहास मांडला जाईल, तेव्हा तेव्हा गुलशन परवीन हे नावही घेतलं जाणार.

तर, गुलशन या सहा भावंडांत सर्वांत लहान. त्यांनी इंग्रजी साहित्यातून एम.ए. केलं आहे आणि एका खासगी शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून नोकरीही केली आहे. त्यांच्या गावात सर्वांत जास्त शिकलेली मुलगी अशीच त्यांची ओळख आहे. २० एप्रिल २०१३ रोजी गुलशन यांचा विवाह झाला. त्यांचे पती बी.कॉम. असून नोएडा येथील एका फर्ममध्ये नोकरीला होते. मात्र गुलशन यांना त्यांनी कधीही खूश ठेवलं नाही. लग्नाच्या वेळेस त्यांना अडीच लाख रुपये हुंडा देण्यात आला होता. तरीही ते हुंड्याची मागणी सतत करून त्यांना मारहाण करत असत. अधूनमधून तलाक देण्याचीसुद्धा धमकी देत असत. इतकंच नव्हे, तर भांडणं काढून, मारझोड करून ते तिला माहेरी पाठवत असत. त्याच दरम्यान तिला एक मुलगा झाला. त्या मुलाला कुटुंबाचं प्रेम मिळावं, या हेतूनं ती पुन्हा पतीकडे जात असे. मात्र एकदा त्यानं तिला लोखंडी रॉडनं मारहाण करण्यास सुरुवात केली आणि घरातून हाकलून दिलं, त्या वेळेस ती रामपूर येथील पोलिसांकडे गेली. हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी त्याला पोलिसांनी अटकही केली. यानंतर समाजातील प्रतिष्ठित वयस्क माणसांच्या मदतीनं त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. त्या वेळी गुलशन यांच्या पतीनं दहा रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर आपण गुलशन यांना तलाक दिल्याचं पत्र दिलं. गुलशननं ते पत्र स्वीकारलं नाही, तेव्हा त्यानं रामपूर कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली आणि तलाकनामाच्या आधारे लग्नाचं नातं संपुष्टात यावं म्हणून अर्ज केला. यानंतर मात्र तिनं सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाकविरुद्ध याचिका दाखल केली. याचिका दाखल केल्यानंतरही तिच्या मनात पुन्हा सासरी जाण्याची इच्छा दिसत होती. आपल्या मुलाला आई व वडील दोघांचं प्रेम मिळावं, तो एका कुटुंबात वाढावा, या एका कारणासाठी आपण हे लग्न टिकविण्याचा पुन्हा प्रयत्न करू- असं तिनं ३० जून २०१६ रोजी प्रसिद्ध झालेल्या इंडियन एक्स्प्रेसच्या दिल्ली आवृत्तीत म्हटलं आहे. याचा अर्थ, अरसद अली यांनी दिलेल्या माहितीत तथ्य आहे, असं म्हणायला हरकत नाही.

.............................................................................................................................................

लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.

greenheena@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......