‘तीन तलाक’ विरुद्ध पाच महिला (उत्तरार्ध)
अर्धेजग - महिला दिन विशेष
हिनाकौसर खान-पिंजार
  • ‘तीन तलाक’ विरुद्ध लढणाऱ्या पाच महिला
  • Thu , 08 March 2018
  • अर्धे जग Women World जागतिक महिला दिन International Women's Day हॅप्पी विमेन्स डे Happy Women's Day तिहेरी तलाक त्रिवार तलाक Triple talaq मुस्लिम पर्सनल लॉ Muslim Personal Law

अतिया साबरी (सहारनपूर, उत्तर प्रदेश)

सहारनपूरच्या अतिया साबरी या याचिका दाखल करणाऱ्या पाचव्या याचिकाकर्त्या. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं घोषित केलं की- तिहेरी तलाक, हलाला, बहुपत्नीत्व यांच्या बंदीसंबंधी आता अन्य कोणतीही याचिका दाखल करून घेतली जाणार नाही. अतिया साबरी यांनी याचिका दाखल केल्यानंतर मार्च २०१७ मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं की, उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर मुस्लिम महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा बीमोड करू, त्यांच्या सुरक्षेसाठी कायदा करू. तिहेरी तलाकचा नायनाट करू. त्यासाठी भाजपला सत्तेत आणा. मतदानाच्या वेळेस अतियानं जाहीरपणे सांगितलं की, ‘आम्ही भाजपला मतदान करून आमचा वायदा पूर्ण केला आहे; आता वेळ भाजप सरकारची आहे. त्यांनी सत्तेत आल्यानंतर तिहेरी तलाकविरोधी कायदा आणावा आणि फतवे काढणाऱ्या संस्थांवरही अंमल ठेवावा.’ इतकंच नव्हे, तर अतियाकडून प्रेरणा घेऊन शगुफ्ता शहा या महिलेनं तीन तलाकबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून या प्रथेचा नायनाट करण्याचं आवाहन केलं होतं. या घटना माध्यमांत बराच काळ चर्चेत राहिल्या. अशा रीतीनं सहारनपूरची मोहल्ला आळी, तेलीवाला चौक इथं राहणाऱ्या अतियाने़ं सहारनपूरच्या मुस्लिम महिलांना हिंमत आणि धीर देण्यास सुरुवात केलीच होती. देवबंदसारख्या बड्या इस्लामिक संस्थेलाही त्यांनी आव्हान दिलं. यावर त्यांना नातेवाईक, परिसरातून बरंच काही ऐकून घेऊ लागलं; मात्र अशा सगळ्या विरोधातून अतिया स्वत:ची वाट काढत राहिल्या. सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्या.

तीस वर्षांपूर्वी त्यांच्या पालकांना मुलगी हवी होती आणि तीस वर्षांनंतर आता ‘मुलीच’ झाल्या म्हणून अतिया यांचा तलाक झाला आहे – केवढी क्रूर चेष्टा!  

अतिया यांचा जन्म तीन भावांच्या पाठचा. त्यांच्या आई-वडिलांना तीन मुलगे असतानाही वाटत राहिलं की, एक मुलगी असावी. मुलीच्या वावरानं घरात चैतन्य राहतं. मुलीच्या ओढीतून त्यांच्या पालकांनी मन्नते केली आणि अतियाचा जन्म झाला.

अतिया साहजिकच अत्यंत प्रेमात वाढल्या. आईवडिलांबरोबरच भावंडांतही त्या लाडक्या राहिल्या. शिकण्याचीही पूर्ण मोकळीक मिळाली. समाजशास्त्र आणि उर्दू विषयांत त्यांनी एम.ए. केलं. अन्याय सहन न करण्याचा कणखरपणा यायला उच्च शिक्षणानंही मदत केली असणार, असं जाणवत होतं.

अतिया यांचा विवाह तिच्या सख्ख्या मावशीच्या मुलाशी झाला. त्यांची आई सुरुवातीलाच अगदी वैतागून म्हणाली, “हमें तो घर के हि लोगोंने दुख दिया. मेरी सगी बहन ऐसा करेगी, ये कभी ना सोचा था. दिल तो बडा रोता है. कुछ सुकून ना मिला इसे. बहुत बुरा लगता है. आगे जाने क्या होगा? पर इसने एक बूँद आँसू ना निकाले. बडा हिम्मत रखती है.” अतिया यांच्या माँनं सुरुवातीलाच अतिया यांच्या वृत्तीचं केलेलं वर्णन पूर्णवेळ जाणवत राहिलं. अत्यंत धीरगंभीरपणे त्या बोलल्या. बाणेदारपणा, कणखरपणा आणि खंबीर वृत्ती पूर्णवेळ जाणवत राहिली. आईच्या म्हणण्याला त्यांनीही जोड देत उत्तर दिलं, “मेरी कोई गलती नहीं. फिर मैं क्यों रोऊ? मैंने कभी कुछ गलत किया ही नही था. इसलिए तो ना डर लगा, ना कदम लडखडाये, ना हिम्मत डगमगायी. अपनी जगह सही हूँ. ये लढाई मेरे लिए तो थीहि पर अब मेरी दोनों बेटियोंके भविष्य को कुछ हद तक सुरक्षित कर लिया है. वैसेही दुसरी लडकीयों के लिए एक उम्मीद बनना है. फिर क्यों रोना?” अतिया यांचा मानी स्वभाव यातून लक्षात येत होता.

२५ मार्च २०१२ रोजी त्यांचा विवाह वाजिद अली यांच्यासोबत झाला. (वाजिद यांचे वडील सईद अहमद हे समाजवादी पार्टीचे दहा वर्षं नेता राहिले आहेत.) एकुलती एक मुलगी म्हणत त्यांच्या पालकांनी लग्नात सुमारे ३० लाख रुपये खर्च केला. त्यांना २० तोळे सोनं, त्यांचे पती वाजिद अली यांना सात तोळे सोनं, ह्युंडाईची कार आणि घरातलं एकूणएक सामान त्यांच्या लग्नात दिलं होतं. वाजिद अलीचं कुटुंबही रईस होतं. त्यामुळं त्या तोलामोलाचं लग्न अतियाच्या पालकांनी लावून दिलं.

लग्नानंतरच्या महिन्याभरातच वाजिदनं त्यांची कार विकण्यास काढली. वॉशिंग मशीनपासून एलईडी टीव्ही, फ्रीज, फर्निचर असं सारं काही दिलेलं असताना, ही तर काहीच घेऊन आली नाही; फारच छोट्या वस्तू आहेत, म्हणून उठता-बसता त्यांचा अपमान करू लागले. त्यांच्या नवऱ्यानं वस्तूंची विक्रीही हळूहळू सुरू केली. अतिया सांगतात, “लग्न होईपर्यंत आम्हाला कधीही त्यांच्या मनातील लालसा कळली नव्हती. कार विकायला काढली, तेव्हा ‘बाईकची डिलरची एजन्सी सुरू करण्यासाठी मला आत्ता पैशांची गरज आहे’ असं अपराधभावनेनं माझा नवरा सांगायला आला. तेव्हा मी म्हटलं की, माझ्या आई-वडिलांनी ती तुला दिली. आता तू विक, जाळ किंवा ठेव- तो तुझा प्रॉब्लेम. त्यांनी त्यांचं काम केलंय. पुढं तू ती कशी ठेवतोस, ते तुलाच माहीत. मला वाटलं, माझा नवरा तरी किमान चांगला आहे; पण आज विचार करते तेव्हा लक्षात येतं की, तो माझ्याशी एक वागायचा आणि खाला-खालूंसमोर वेगळा वागायचा. त्याने एक-एक करून वस्तू विकायला हळूहळू सुरुवात केली. याविषयी मी माझ्या माहेरी काहीच सांगितलं नाही. लोक म्हणतात, ‘तू बोलायला हवं होतंस.’ पण सांगून होणार काय होतं? तरीही लेखाजोखा करायचं म्हटलं, तर पहिलं वर्ष खूप सुखाचं होतं. आम्हा नवरा-बायकोमध्ये तर खूप प्रेम होतं. त्याच काळात दिवस गेले. पहिली मुलगी सादिया झाली. मुलगी झाल्याची गोष्ट त्यांना आवडली नव्हती. त्यांनी माझ्यासमोरच तोंडं वाकडी केली.''

अतिया यांचं पहिलंच अपत्य असल्यानं त्याबाबत फारशी वाच्यता झाली नाही. मात्र दुसऱ्या वेळेस गर्भवती झाल्या, त्याच वेळेस त्यांच्या कुटुंबीयांनी गर्भपातासाठी त्यांच्यावर जोर टाकला. परंतु अतिया यांनी गर्भपात करण्यास नकार दिला. दुसऱ्या खेपेलाही मुलगी- सनाचा जन्म झाला. त्या वेळेस सासू-सासऱ्यांनी तर तोंडच फिरवलं. अतिया यांची प्रसूती सासरीच झाली होती. त्यांच्यामध्ये माहेरी जाण्याचा प्रघात नाही. मुलगी झाल्याचं कळल्यावर सासू-सासऱ्यांनी तोंड आंबट केलं. पण अशा वेळी स्त्री नवऱ्याकडून अपेक्षा करते. त्याची साथ महत्त्वाची वाटते. अतिया त्यांच्या प्रतिक्रियेविषयी सांगतात, “वाजिदने कहा, ‘तुमने मेरे कंधे झुका दिये’.” मुलगी होणं हा सर्वस्वी अतिया यांचा दोष असल्याप्रमाणे त्यांना कुटुंबातून वागणूक मिळू लागली. अगदी त्या ओल्या बाळंतीण आहेत, त्यांना आराम मिळायला हवा याचाही विसर कुटुंबीयांना पडला. ज्या मावशीला\सासूला तीन मुली होत्या, त्यांनीच अतियाला मुली होण्याचा बाऊ केला होता. याच सुमारास अतिया यांच्या छातीत दुधाची गाठ झाली.

त्या सांगतात, “मला प्रचंड वेदना व्हायच्या. पण कोणीही मला दवाखान्यात न्यायला तयार नव्हते. वेदनेनं विव्हळत राहायचे; तरी घरातल्यांना वाटायचं की, काम नको म्हणून मी नाटक करते. माझा त्रास वाढतच चालला होता. कसाबसा सव्वा महिना झाला आणि माझा भाऊ मला घ्यायला आला. एक वो दिन और एक आज का दिन फिरसे लौटकर उस घर नहीं गयी. ना वाजिदने पलटकर देखा की जिंदा हूँ या मर गयी. बचूँगी नहीं ऐसी हालात हो गयी थी. तन ढकनेके कपडोंपर लौटे थे.” माहेरी आणल्यानंतर प्रथम त्यांचा उपचार सुरू झाला. एकाच वेळी त्यांना दोन-तीन गाठी झाल्या. औषधांचा डोस वाढला. इंजेक्शन्स वाढली. साधारणपणे बाळंतपणानंतर आठवडाभर जी औषधं दिली जातात, ती त्यांना महिनाभर खावी लागली. त्या उठू शकत नव्हत्या की बसू, इतका अशक्तपणा आला होता. सहा महिन्यांच्या काळात वाजिदने त्यांची हालचाल एकदाही विचारली नाही. उलट, सहा महिन्यानंतर त्यांच्या मामांकरवी वाजिद व त्यांच्या कुटुंबीयांनी कळवलं की, ते लोक अतियाला तलाक देणार आहेत.

अतिया सांगतात, यानंतर दीड वर्ष त्या माहेरीच होत्या. या काळात दोघांचे संपर्क पूर्णपणे संपले होते. फोनवरूनही त्यांचं बोलणं नव्हतं. जवळपास दीड वर्षानंतर त्या पुन्हा सासरी गेल्या. सासरी दोन घरं होती. एक गावात मुख्य चौकात. गावात सगळे राहत असत. यांना मुख्य चौकातल्या घरी पाठवलं. त्या वेळी नवरा दोन-तीन दिवस त्यांच्याकडे, दोन-तीन दिवस आई-वडिलांकडे राहत होता. “त्यांच्या मनात काय षडयंत्र सुरू होतं, ठाऊक नाही. मी तर साफ दिलानं आले होते. थोडेच दिवस असे गेले असतील की- एके दिवशी दुपारी माझे सासू-सासरे, नणंदा सर्व जण माझ्या घरी आले. तू आमची फार बदनामी केली असं म्हणत सारं काही आत्ताच मिटवू या म्हणाले आणि त्यांनी मला विष पाजलं. मी कशीबशी घरातून पळून रस्त्यावर धावले आणि शेजाऱ्यांना वाचवण्यासाठी हाक मारली. शेजाऱ्यांनी मला जीपमध्ये टाकलं आणि ताबडतोब दवाखान्यात नेलं. ज्यांचं मरणं आलेलं नसतं, ते मरत नाहीत. मीही वाचले. त्यांनी धोक्यानं बोलावून घेतलं. घरी नेलं, त्यानंतर त्यांना मला मारून टाकून पुन्हा तलाक दिल्याचं घोषित करायचं होतं; पण मी तो तलाक मानलाच नाही. दोन्ही मुलीच आहेत म्हणून ‘तलाक तलाक तलाक’ देतो असं त्यात म्हटलं. इतकंच नव्हे तर, वाजिदनं हा तलाक वैध आहे, असा दारुल उलूम देवबंदकडून फतवाही आणला होता. मग त्या क्षणी ठरवलं की, याविरुद्ध उभं रहायचं. जानेवारी २०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.''

तिहेरी तलाकवर बंदी घालण्याचा सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला, त्या वेळेस अतिया यांना आपल्या मुलींसाठी सर्वाधिक आनंद झाला. निसर्गाचा न्याय पाहा-वाजिदनं दुसरं लग्न केलं, पण ते पंधरा दिवस टिकलं नाही आणि ती मुलगी वाजिदला सोडून गेली. ३१ वर्षीय अतिया मात्र दुसऱ्या लग्नाबाबत उत्सुक नाही. “लग्न हा जगण्याचा हेतू नाही. माझ्या जगण्याचा हेतू कदाचित सफल झाला. मी जे सोसलं, ते इतर बायकांना सोसावं लागू नये म्हणून कदाचित मी याचिकेचा भाग झाले असेन. माझ्यामुळे जर कोणा बाईला हिंमत मिळाली, तिचा घरसंसार टिकला, तर त्याचं फार समाधान आहे. याउपर जर माझ्या कुटुंबीयांना वाटलं आणि तसा योग्य साथी मिळाला तर विचार करेन. पण तूर्तास तरी तशी इच्छा नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकर लागला. कायद्यासाठी हालचाली सुरू झाल्या. महिला पुढे येऊ लागल्या आहेत, हेच मला यश वाटतं. आपला इरादा नेक आणि आपण प्रामाणिक असलो की, जगात कशाला घाबरायचं कारण नाही. बायकांनी आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे- न घाबरता, न डगमगता आणि उभं राहिल्यानंतर माघारही न घेता. पण याचा अर्थ आततायी निर्णयही घेऊ नये. आपला घरसंसार आपण प्रेमानं फुलवण्याचा प्रयत्न करावा. कारण ते विस्कटतं, तेव्हा फार यातना होतात. पतीकडून जर योग्य सन्मान आणि योग्य दाद मिळत नसेल, तर मात्र लक्षात घेतलं पाहिजे की- आपल्यासाठी दुसरं कुणी उभं राहणार नाही, तर आपल्यालाच उभं राहावं लागणार आहे.''

अतिया एकाच वेळी दोन गोष्टी सांगत होत्या. संसारात लहान-मोठ्या भांडणांना, मनभेदांना हत्यार करून एकमेकांवर चिखलफेक करण्यातून काही मिळणार नाही. मीच खरी, माझंच खरं- असं टोकाचं कोणीही वागत असेल, तर चूकच आणि माझ्यावरच अन्याय होतोय, असंही मानणं चूक. त्यामुळं थेट संसार मोडण्याआधी तो वाचवायचा प्रयत्न करा आणि नाहीच शक्य झालं, तर मात्र वेगवेगळे रस्ते – तेही प्रेमानंच स्वीकारा.

इशरत जहाँ (हावडा, प. बंगाल)

हावडा येथील इशरत जहाँ यांच्याशी फोनवरून संपर्क साधत होते. तेव्हा त्यांचा ठसकेबाज आवाज ऐकूनच त्यांच्याविषयी प्रचंड कुतूहल वाटत होतं. ही बाई पाचही याचिकाकर्त्यांमध्ये कमी शिकलेली. आपण याचिका दाखल केली म्हणजे अन्याय, अत्याचाराविषयी बोलावं, बायकांना हिंमत द्यावं हेही आपलं काम आहे, असं काही त्यांना वाटत नाही. म्हणजे कुणाला हिंमत मिळाली तर ठीकच पण आपणहून त्यासाठी प्रयत्न करावा असा काही त्यांचा विचार नाही. तसं पाहता वक्तृत्वाचं असं काही कसब तिच्याकडे नाही. “दुसरों को हिंमत देना वो तो ठीक है. अपनी लढाई यहाँ किसे टली.” असं अगदी साधंसुधं, पण नेमकं बोलून जाते. खूप लहान वयात लग्न झालं आणि दीर्घकाळ अत्याचार सहन करावा लागला. या काळात पैशांची तंगी राहिली, पण अनुभवांचा घडा कायम भरून वाहिला. त्यामुळेच त्या जे बोलतात ते त्या जगण्यातून आलेल्या शहाणपणाने हे जाणवतंच. त्यांचा बोलण्यातला ठसका तर जाणवला होताच, पण तिला भेटण्याआधी तिच्या बोलण्यावरून मला ती जशी वाटली, ती तशीच होती. अगदी सरळ नव्हे, पण साधी, बिनधास्त, बंडखोर!

हावडा या ठिकाणी उतरल्यापासूनच अस्ताव्यस्त, गिचमीड, गर्दीचं शहर वाटलं. ती गल्लीही तशीच होती. फार लागून लागून घरं, इमारती. पाच-सात मिनिटं चालल्यानंतर एक बाहेरून प्लास्टर न झालेली इमारत आली. पाचव्या मजल्यापर्यंत चालत चालत आम्ही इशरत यांच्या घरी पोहचलो. घर तरी कसं म्हणावं असा मला प्रश्न पडला. आम्ही दारातून आत शिरलो तर अगदी छोट्या पॅसेजमधून उजवीकडे वळलो. रेल्वेच्या डब्याप्रमाणे एकाला लागून दोन खोल्या, मग बाथरूम मग पुन्हा एक खोली. त्याशेजारी गॅलरीची केलेली खोली. डबलबेडचा एक दिवाण मावेल इतकी खोली म्हणजे इशरत यांचं घर. तेवढीच जागा त्यांची.

इशरत यांनी बुरखा काढला तेव्हा मी पाहत राहिले. अवघ्या एकतीसच्या इशरत चार मुलांच्या आई आहेत. त्यातली पहिली मुलगी चौदा वर्षांची. इशरत यांच्या निम्म्या वयाची. म्हणजे इशरत स्वत: अठराच्या नव्हत्या झाल्या, तेव्हा त्या पहिलटकरीण झाल्या होत्या.

इशरत आणि त्यांचे पती मूर्तुजा अन्सारी हे दोघंही मूळचे बिहारच्या छोट्या गावातले. इशरत यांचं लग्न झालं, तेव्हा त्यांचं वय चौदा-पंधरा होतं. त्यावेळी त्यांच्या पतीचं मूर्तुजाचे वय तीस होतं. दुप्पट वयाच्या माणसाशी त्यांचं लग्न झालं. इशरत सांगतात, “माहेरी माझं मोठं कुटुंब आहे. आम्ही चार बहिणी, दोन भाऊ, आई-वडील. वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय. खाणारी इतकी तोंडं, पण खाऊन पिऊन सुखी होतो. चौदा-पंधराची असेल तेव्हा स्थळ आलं. मूर्तुजा दुबईमध्ये एका कापड कंपनीत एम्ब्रॉयडरी वर्कर म्हणून काम करायचा. अजूनही तो तिथंच असतो. तर वडिलांनाही वाटलं असेल चला एका मुलीचा भार कमी होईल. जून २००१ मध्ये लग्न करून सासरी आले. मोठा दीर, जाऊ, त्यांची मुलं, सासू अशा परिवारात मीही दाखल झाले. लग्नानंतर दोन अडीच महिने मूर्तूजा राहिला असेल, मग दुबईला गेला. साधारण सतरा-अठरा महिन्यांनीच तो तीन महिन्यांसाठी येत असे.

आमचा संसार हा असा चालायचा. सासू फार मागास विचारांची होती. ‘औरत तो पैरों की जूत्ती होती है’ असं ती नवऱ्याला सांगायची. यावरून समजून घ्या, तिनं आम्हाला कसं ठेवलं असेल. माझा नवरा तर इथं नसायचा. त्यामुळे मी तर पूर्ण वेळ घरकाम करणारी बाई त्यांना मिळाली होती. माझ्या बाजूनं बोलणारं होतंच कोण? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी राबायचे. याबरोबर शिव्याशाप, मारझोड, विनाकारणाची भांडणंही असायचीच. २००४ मध्ये पहिली मुलगी झाली. तेव्हा मुर्तुजांचं म्हणंणं होतं की, माझ्या भावाला पहिला मुलगा झाला मग तुला कसा झाला नाही? आता सांगा यात माझी काय चूक? आपल्याच मुलीला तो ‘मनहूस’ समजायचा. मग इथून आमची भांडणं सुरू झाली.''

२००४ मध्येच त्यांचं कुटुंब पश्चिम बंगालमध्ये आलं. तोपर्यंत सासू राहिली नव्हती. मोठ्या दीराच्या कुटुंबासोबत त्या बंगालमध्ये आल्या. इथंही काम चुकलं नव्हतं. शिवाय स्वत:ची मुलगी होती. इशरत यांचे पती तर वर्षभरानंतर केवळ तीन महिन्यांसाठी यायचे, परंतु त्या काळात पत्नीला समजून घेण्यापेक्षा इतरांच्या बहकाव्यात येऊन तिला मारझोड करत रहायचे. दीड-दीड वर्षांच्या गॅपनं संसार सुरू होता, पण आतून पोखरून निघालेला होता. मुलाच्या हट्टापायी त्यांना एकापोठापाठ तीन मुली झाल्या. या संपूर्ण काळात मोठा दीर त्यांच्याशी सतत या ना त्या कारणावरून भांडायचा. भांडण करून पुन्हा आपल्या भावाला त्यांच्या चुगल्या करत असे. मुली लहान होत्या. घरातली-बाहेरची सारी कामं करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असे. यावर त्यांचा दीर मुर्तुजाचे कान भरत असे की, तासन्तास बाहेर जाते. घराबाहेर जायची कारणं शोधत असते. मग तो फोनवरूनही त्यांच्याशी भांडायचा. त्यांना टॉर्चर करायचा. दिवस असेच चालले होते. २००९ मध्ये त्या पुन्हा गर्भवती होत्या. त्यावेळेस त्यांच्या दीरानं इशरत यांना स्वयंपाकपाणी वेगळं करायला सांगितलं. त्या गर्भवती, तीन लहान मुली होत्या. तरीही त्यांनी ऐकलं नाही. इशरत सांगतात, “२०१३ मे मुर्तूजा दुबई से आया था. मैं अपने पडोसी के घर बात कर रहीं थी. आकर अचानकसे खूब पिटने लगा. दात से मेरे हात में इतनी जोर से काटा की देढ महिना काला पडा था. बस उस वक्त पता नहीं मुझे भी बडा गुस्सा आया, मैं सीधे पोलिस थाना गयी. घर का मामला है निपटालो कहकर पुलिसने भी भगाया. तब तक मेरा गुस्सा भी ठंठा हुआ था. अपनी बच्चोंका सोचकर आयी तो घरपर मुर्तूजा नहीं था, ना बच्चे. बच्चोंको लेकर भाग गया था. फिर थाने जाकर ४९८ की रिपोर्ट लिखायी. पुलीसने जेठा को बताया, वो नहीं आया तो अरेस्ट वॉरंट निकलेगा. फिर गिडगिडाता आया. कुरआन की कसम खाकर कहा कि, फिरसे मारपीट नहीं करेगा. हमने भी केस पिछे ना ली, बस बेल करा दिया. बच्चों का भविष्य सोचकर चूप रहे. पर वो ना सुधरा. फिर घर के बटवारे को लेकर झगडा शुरू किया. कहने का मतलब लढाई के कई कारण थे. वैसेही सब चलाते रहे. दिन में मारपीट करता था, रात में प्यार दिखाता था. हम भी कभी कबार झटकाही देते थे, ‘दिन में मारो और रात में अपनी जरुरत पुरा करने आओगे, नहीं चाहिए हमें तुम्हारा ये प्यार.’ साल-दो साल में आता था तो हमबिस्तरी के लिए बहुत परेसान करता था. फिर भी जिंदगी चलती गयी.''

मुर्तूजानं एप्रिल २०१५ मध्ये दुबईहून फोन करून त्यांना तीन वेळा ‘तलाक’ म्हटलं. पुढे फार काही संवाद न करता त्यानं फोन कट केला. यासंबंधी त्यांनी हावडा येथील कौटुंबिक न्यायालयात केस केली. त्यांची ४९८ ची केससुद्धा सुरूच होती. चारही मुलं नव्हती. इशरत सांगतात, “आधी मला काही कळलंच नाही. पण त्यानं पुन्हा सांगितलं आपलं नातं तुटलंय. मी हतबल. मुलंही सोबत नव्हती. मुलांनाही त्यांनी भडकवून ठेवलं होतं. यानंतर सुट्टीत म्हणून तो ऑक्टोबर २०१५ मध्ये आला. मला बाहेरून कळलं की तो लग्न करतोय. मीदेखील पोलिसांना घेऊन तिथं पोहोचले. पोलिसांसह आल्यानं पहिल्या दिवशी तो आणि त्याचा भाऊ पळून गेले. लग्न कुठं हे आम्हाला काही कळलं नाही. मी माझ्या माहेरी परतले. लग्न दुसऱ्या दिवशी होतं. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा जाऊन शोधाशोध करू लागले. एका माणसानं लग्न कुठं आहे ते सांगितलं, मी तिथं गेले. त्या वेळेस मुर्तूजा म्हणाला की, ‘मी हिला तलाक दिला.’ त्यांनी कागदपत्र दाखव म्हटलं, पण त्याच्याकडे असा कागद कुठं होता. त्यांची फसगत केली म्हणून त्या लोकांनी आपणहूनच लग्न मोडलं. पण दुर्दैव असतंच हात धुवून मागे लागलेलं. नोव्हेंबर २०१५मध्ये कळलं की, त्यानं दुसरं लग्न केलं.''

इशरत इतकं बोलून हसल्या. दु:ख पचवून आलेलं ते हास्य होतं. स्वत:च्याच दु:खावर हसण्यासाठी ही हिंमत कुठून येत असेल? मुलं, संसार सारं काही हिरावल्यानंतरही असा धीरगंभीरपणा कुठून येत असेल. स्वत:ला शांत, सकारात्मक कसं ठेवता येतं असेल मला प्रश्न पडला. इशरत त्यावरही सहज म्हणाल्या, “बस जिंदगी जैसे आते गयी, हम वैसे चलते गये. कुछ समझा ही नहीं कहाँ को जारे... एक के बाद एक चीज होते गयी. जैसे नया कुछ सामने आया. उससे फिर लढ लिये. बहुत कुछ सहा है, बता नहीं सकते. अब तो याद भी नहीं आता. कितना याद करोगे? पहले तो बहुत रोती थी. हर बात पर रोना आता था अब चाहो तब भी आसू नही आते. जिंदगी छोटी रही संघर्ष बडा रहा!” मी यावर काय बोलणार?

मुलगा हवा म्हणून मुर्तूजाचा सतत आग्रह राहिला, तेवढ्याखातर तीन मुली झाल्या. तोच मुलगा मोहम्मद जैद अफजल आज इशरत यांच्याकडे आहे. त्यांची १२ वर्षांची मुलगी बुश्रा आणि अफजल हे दोघेही आपणहून त्यांच्याकडे यायचं म्हणाली. तीन वर्षांनंतर त्यांना त्यांची दोन्ही मुलं मिळाली होती. परंतु त्यांना पुन्हा पळवून नेण्याचा प्रयत्न मुर्तूजानं केला. इशरत यांनीही तातडीनं कमिशनर ऑफिस गाठलं. पोलिसांची चक्रं फिरली आणि मुलांना घेऊन मुर्तूजाला पोलिसांकडे यावंच लागलं. मुलीला तो काय पढवून आला होता ठाऊक नाही. मुलीनं पोलिसांसमोर ‘मला वडिलांकडे जायचं आहे’ असं सांगितलं. मुलगा मात्र त्यांच्याकडे आहे. मुलालाही सतत मोठे दीर भडकवत असतात. आईकडं देण्यासाठी काय आहे? मुर्तूजासुद्धा जाणूनबुजून महागड्या वस्तू त्याला द्यायचा प्रयत्न करतो. शेवटी मुलंच ते. भुलेल केव्हातरी अशी भीती आहेच. त्यामुळे तोही किती काळ राहील याची खात्री नाही. पण त्यांनी हिंमत सोडलेली नाही.

इशरतच्या हिंमतीची दाद आणखी एका गोष्टीसाठी द्यावी लागेल. बहुतांश वेळा घर मोडलं की, बाई घराबाहेर पडते. ती माहेरी जाईन किंवा वेगळं झोपडं करून राहीन, पण इशरत यांनी त्यांचं हावडा येथील घर कधीच सोडलं नाही. आपण कुठं जाणार आहोत, असं म्हणून त्या तिथंच राहतात. याचिका दाखल झाल्यानंतर पोलिस येऊन गेले, माध्यमांच्या फेऱ्या वाढल्या, तेव्हा इमारतीतल्या लोकांनीही त्यांच्याविरुद्ध एक आवाज केला. आमच्या परिसराची बदनामी होते म्हणून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला, पण त्या पुरून उरल्या उलट त्यांच्या एका रूमची लाईटही त्यांच्या दिराने कापून ठेवली होती. आपल्या शेजाऱ्यांनी शेजारधर्म लक्षात ठेवला नाही, तेव्हा त्यांनीही भीडभाड न ठेवता हा सगळा प्रकार माध्यमांना सांगितला. दीड वर्षापासून त्या अंधारात राहत होत्या. बातमीचा परिणाम झाला आणि त्यांना वेगळी वीजजोडणी करून मिळाली.

त्या भेटल्यापासून पूर्ण वेळ हसतमुख होत्या. आपल्यावरच्या संकटांनाही त्यांनी हसत हसत सांगितलं. ‘हां लोग कहते है, हमेशा हसती रहती हो. परेसानी जाहीर होने नही देती. पर हसेंगे नहीं तो क्या करे? परेसानीयाँ तो होती है. पर हसते रहे. हसते-हसते ही जिंदगी कट जायेगी. वरना कहाँ कटती है ये जिंदगी रोते हुवे?’ त्या पुन्हा हसल्या आणि मग मंदस्मित करत म्हणाल्या, ‘हे घर सोडावं म्हणून खूप मागे लागलेत. दिवस-रात्र त्रास देतात. अजून अंगात बळ आहे म्हणून विरोध करतेय. संघर्ष करतेय. मग एक दिवस सारं काही सहनशीलतेच्या पल्याड गेलं की, हे घरही देऊन टाकेन. सारा कुछ लुट गया, जब बच्चे नहीं, शौहर नहीं, कुछ भी नहीं तो तुम्हारा घर लेकर क्या करेंगे? अपना इंतजाम करके वो भी छोड देंगे, जावो तुम लोग खूश रहो. वैसे तो बहुत कुछ कर सकते है. पर मेरे बच्चे उसके पास है, हमने कुछ किया तो बच्चोंको तकलीफ होगी. उनको दर्द होगा तो हमकोभी दर्द होगा ना.’ त्या पुन्हा खळखळून हसल्या.

शायराबानो, आफरिन रेहमान, अतिया साबरी, इशरत जहाँ आणि हो गुलशन परवीन. या सामान्य महिलांच्या संघर्षातून कुणी काय घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण मला सतत-सतत जाणवत राहिलेली गोष्ट म्हणजे सामान्य माणसाला म्हणणं नसतं, किंमत नसते असं वाटणाऱ्या प्रत्येकानं या महिलांकडे पहावं. कोण होत्या त्या? गृहिणी. घर सांभाळण्याची किमया जाणणाऱ्या किमयाकार. घरं वाचली पाहिजेत. बाईवर अन्याय झाला नाही पाहिजे, म्हणून तर त्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचू शकल्या. सामान्य महिला ते याचिकाकर्त्या असा रस्ता कापणं सोपं नव्हतं. काही अल्पबुद्धीची माणसं इतक्या गंभीर प्रश्‍नाबाबतही प्रसिद्धीचा डाव म्हणून या महिलांचा अपमान करू शकतात. पण लक्षात घ्यायला हवं, माध्यमांचं पाठबळ मग त्यातून तयार होणारा जनरेटा ही नंतरची बाब असते. प्रत्यक्षात तो जुगार असतो. लाभला तर लाभला नाही तर नाही. तरीही या महिलांनी हिंमत केली आणि पहिलं यश मिळवलं. पण लढाई अजून संपलेली नाही. उलट ती तर आत्ता सुरू झाली. कायद्याचा लढा सुरू राहील.

हिमनगाचं टोकं आत्ताशी दिसलंय. संपूर्ण शिखर दिसायला अजून काही काळ जावा लागेल, पण ज्यांनी त्यासाठी किंमत मोजली त्यांचा त्याग वाया जाऊ नये. (समाप्त)

(साप्ताहिक साधनाच्या १० मार्च २०१८च्या अंकातून)

.............................................................................................................................................

लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.

greenheena@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......