अजूनकाही
मागील लेखात ‘पिंक’ सिनेमाच्या निमित्तानं प्रत्येक स्त्रीने कसं वागावं, कसं बोलावं, हसावं, रडावं, उठावं, बसावं, इतकंच काय तिने जन्माला येऊ की नये हे सारं सर्व धर्मातील पुरुषसत्ता ठरवते आणि त्यादृष्टीने काही ‘लक्ष्मणरेषा’ स्त्रियांसाठी आखून दिल्या जातात, हे आपण पाहिलं. त्याचबरोबर पुरुषांची ही सत्ता अबाधित राखण्यासाठी पुरुषत्वाच्या किंवा पुरुषार्थाच्या काही संकल्पना समाजाच्या जडणघडणीत पुरुषप्रधान व्यवस्थेनं प्रस्थापित केलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही जाती-धर्मात-प्रदेशात जन्माला येणारा प्रत्येक पुरुष हा उच्चनीचतेच्या उतरंडीवर कुठेही असला तरीही, किंवा त्याची नैसर्गिक गरज तसंच समज-उमज असो वा नसो, पण ‘मर्दानी संकल्पनांचं’ जाळं स्वत:भोवती विणतविणत घडत जातो. स्वत:च निर्माण केलेल्या त्या जाळ्यात कधी गुरफटत जातो हे त्याचं त्यालाच कळेनासं होतं. ‘पुरुष’ म्हणून जन्माला येण्याचे जे विशेषाधिकार तो उपभोगू लागतो, ते सोडण्याची त्याला अजिबात इच्छा नसते.
या ‘मर्दानी संकल्पनाच्या’ हव्यासापोटी त्याची इच्छा नसतानीही नकळतपणे तो त्याच्या आजूबाजूच्या स्त्रियांवर अन्याय करू लागतो. पण जेव्हा या स्त्रिया त्यांना आखून दिलेल्या ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडू लागतात, माणूस म्हणून आपले हक्क मागू लागतात, स्वायत्तता मागू लागतात तेव्हा मात्र संघर्षाची ठिणगी पडते आणि सगळी कुटुंबव्यवस्था हादरून जाते. स्त्रीचा उपभोग्य वस्तू म्हणून वापर करता करता पुरुष इतका बेभान होतो की, विवेकबुद्धी हरवून जनावराच्या पातळीवर उतरतो. एकवेळ जनावरांना तरी विणीच्या काळाचं (matting period) चं भान असतं, संवेदना असतात, पण पुरुषसत्ताक व्यवस्थेनं दिलेल्या विशेष अधिकारानं पुरुष मात्र इतका आंधळा झालेला असतो की, त्याच्या लैंगिक आक्रमकतेला सीमारेषा उरत नाहीत हे आपल्या आसपास आपण पाहतोच आहोत. या त्याच्या कृत्यांमुळे जसे समाज स्वास्थ्य धोक्यात येतं, तसंच निसर्गाचाही समतोल ढळतो, सामाजिक पर्यावरणाचा समतोल ढळतो. म्हणूनच या प्रकाराला जगभरातल्या स्त्रीवादी स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी ‘विखारी पुरुषत्व’ (Toxic Masculinity) असं संबोधन दिलं आहे. ‘पुरुष कार्यकर्ते’ म्हणजे ते लोक जे गेली काही वर्षं भिन्नलिंगी, समलिंगी स्त्री-पुरुषांसोबत समतेची चळवळ करतायत.
मागील लेखात वाचकांनी चर्चा करावी यासाठी दोन प्रश्नचिन्हांकीत विधानं दिली होती.
१) मी येकदम फ्री माइंडचा मानुस हाय बघा!
२) “छे, छे ते स्त्री-मुक्ती वगैरेचं ‘फॅड’ पाश्चात्य बायकांनी आणलेले खूळ आहे.... आमच्या स्त्रियांना त्या विचाराची गरजच नाही. आमच्या धर्मात स्त्रियांना भरपूर स्वातंत्र्य आहे हो. आमचा धर्मच मुळी समतेवर आधारलेला आहे !”
ही विधानं वरवर पाहता नेहमीची वाटली तरी त्यामागे दडलेले ‘मर्दानी संकल्पनाचे सापळे’ काय आहेत हे ध्यानात यावेत आणि ‘खरोखरंच असं आहे का?’ यावर वाचकांनी प्रामाणिकपणे आपापलं मत मांडावं असा त्यामागे विचार होता.
‘मी एकदम फ्री माइंडचा माणूस आहे’ किंवा ‘आपण स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहोत’ असं म्हणत असताना किंवा आपण समतावादी चळवळीत आहोत आणि त्या विचाराचा धर्म पाळतो असं म्हणत असताना आपण जन्मत:च ती तत्त्व घेऊन जन्माला आलो आहोत का? समता स्वातंत्र्याचं तत्त्व आपण स्विकारलं म्हणजे स्वत:ची व्यवहारातील वागणूक तशी आहे का ते तपासून पाहण्याची गरजच आहे. आपण ‘मर्दानी संकल्पनांचं’ जाळं स्वत:भोवती अजिबातच विणलं नाही असं नसतं. आपल्या नेणीवेत रुजलेल्या मर्दानगीच्या संकल्पनांचा आपण किती जाणीवपूर्वक विचार केलाय आणि त्यातून खरोखरच बाहेर पडलोय, का याचा अगदी प्रामाणिकपणे लेखाजोखा आपण वेळोवेळी मांडायला हवा.
पुरुषसत्ताक जाणीव-नेणीवांचं ऑडिट स्वत:ला उदार मतवादी म्हणवणाऱ्या सर्व पुरुष कार्यकर्त्यांनी केलं, तर भलेभले प्रतिष्ठित विचारवंत, कार्यकर्ते त्यात नापासच होतील यात शंका नाही. त्यांची व्यापक सामाजिक राजकीय प्रश्नांबाबत असलेली उच्चकोटीची प्रगल्भ जाणीव स्वत:च्या घरातील किंवा जवळच्या ‘स्त्री’ नावाच्या प्राण्याबाबत मात्र माती खायला जाते. तत्त्वांची भाषा बोलणं वेगळं, सभा-संमेलनं घेणं वेगळं, तिथं फुले-शाहू-आंबेडकर यांचे समतेचे विचार सांगणं वेगळं आणि स्वत:च्या मनात खोलवर लपून बसलेला ‘पुरुषी अहंकार’ नावाचा हितशत्रू आणि त्याच्याशी संवाद करणं वेगळं. अगदी फेसबुकवरसुद्धा एखाद्या सामाजिक प्रश्नांवरच्या कॉमेंटमध्ये ‘स्त्रियांनी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. गुलामगिरीतून बाहेर पडलं पाहिजे’, ‘यंव-त्यंव केलं पाहिजे’ असे उदात्त विचार सांगणाऱ्या मित्रांना एक-दोन प्रश्न ‘त्यांनी स्वत: काय केलं?’ असं विचारल्याबरोबर तेथून पळ काढतात. सूक्ष्म पातळीवरील या जाणिवांच्या नियोजनाची सुरुवात पितृसत्ताक वर्तनाच्या वारशापासून स्वत:ला अलग करण्यापासून होते. पुरुषसत्ताक सत्ता सबंधांच्या उतरंडीच्या नेमक्या कोणत्या पायरीवर आपण आहोत, हे ओळखून पुरुषांनी आपल्या कृती-उक्ती यातील विसंगतीवर प्रामाणिकपणे काम करणं महत्त्वाचं आहे.
‘मर्दानगी’ ही पुरुष म्हणून जन्माला आल्याबरोबर आपोआप सभोवतालच्या वातावरणात घडवली जाते. त्यासाठी कोणी विशेष प्रयत्न करत नाहीत. ‘पुरुष’ म्हणून जन्माला आलेलं प्रत्येक मूल सभोवतालच्याच्या व्यवस्थेत फिट्ट बसण्यासाठी त्याच्या नकळतपणे ते संकल्पनाविश्व स्वीकारत जातं. त्यात त्याच्या निवडीचा किंवा नाकारण्याचा प्रश्नच येतच नाही. ज्या उभयान्वयी मुलाला स्वत:च्या नैसर्गिक प्रेरणांशी जुळवून घेणं जड जातं, ते या व्यवस्थेच्या बाहेर फेकलं जातं. स्वत:ला एकटं समजू लागतं. नेमक्या अशाच अस्वस्थ तृतीयपंथी पुरुष मुलांचं उदध्वस्त झालेलं भावविश्व दुरुस्त करणारे ‘भिन्नलिंगी’ (ट्रान्सजेन्डर) चळवळीचे पुरुष कार्यकर्ते ८०च्या दशकात पुढे सरसावले आणि त्यांनी ‘पुरुषत्वाच्या’ जडणघडणीचं गूढ उकलण्याचा प्रयत्न केला. त्या प्रक्रियेत त्यांना सामाजिक पर्यावरणाला घातक अशी काही विषारी तत्त्वं सापडली. त्याला त्यांनी नाव दिलं ‘Toxic Masculinity’. या विखारी पुरुषत्वात, भावनिक नसणं म्हणजे कणखर असणं, आपली सत्ता गाजवण्यासाठी सहज हिंसक होणं, लैंगिक सबंधांत खूप आक्रमक असणं, स्त्रियांना वेदना देऊन आपल्या बाहुबलाचा प्रत्यय देणारा संभोग करणं, पराक्रम गाजवण्याची इर्ष्या व्यक्त करणारं व्यक्तिमत्त्व सतत उभं करणं, कमकुवत पुरुषांवर तसंच स्त्रियांवर त्यांचा आवाज दाबण्याची काही विशिष्ट तंत्रं अत्यंत हुशारीनं वापरून त्यांचा आवाज दाबून टाकणं, इत्यादी अनेक लक्षणांचा विचार केला गेला.
‘Toxic Masculinity’ (विखारी पुरुषत्वाच्या) सामाजिक जडणघडण प्रक्रियेचं एखाद्या प्रयोगशाळेत करावं तसं विश्लेषण करत असताना या स्त्रीवादी पुरुष कार्यकर्त्यांनी रोजच्या जीवनातील अनेक समूह निवडले. शाळा, कॉलेज, घरातील आईचा मुलग्यांशी, वडिलांचा आपल्या मुलाशी, शिक्षकांचा मुलांशी, कार्यालयातील सहकाऱ्यांचा एकमेकांशी अशा वेगळ्या ‘पुरुष लिंगी’ मुलांशी झालेल्या संवादाचं सूक्ष्म विश्लेषण केलं. ‘पुरुषत्वाच्या’ प्रतीकांची, संकेतांची उकल केली, ज्याला आपण डी-कोड (De-code) करणं असं म्हणू. त्यात आढळलेली निरीक्षणं स्त्रियांच्या चळवळीला खूपच उद्बोधक ठरली. इंटरनेटवर ‘Geek Masculinity’ या शीर्षकाखाली या विश्लेषणाचे निष्कर्ष उपलब्ध आहेत, पण प्रस्थापितदृष्ट्या ‘कमकुवत’ अशा गीक पुरुषांची खिल्ली उडवली जाऊ नये म्हणून त्या साईटचं स्वरूप बंदिस्त आहे.
जैविक कारणानं ‘मोडकळलेल्या’ या ‘पुरुषत्वाची’ कारणं शोधताना स्त्रीवादी पुरुष कार्यकर्त्यांना Toxic Masculinity किंवा ‘विखारी पुरुषत्व’ म्हणावं असं काय आढळलं? अगदी खूप ढोबळ अशी कारणं जी सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांनाही माहीत असू शकतात आणि स्त्रियांच्या सक्षमीकरण चळवळीत ती नेहमी मांडली जातात ती अशी -
१) वर्चस्ववादी सत्ता-संबंध टिकवण्यासाठी सूक्ष्म पातळीवरचं राजकारण करणं
२) खरा पुरुष हा नेहमीच सेक्स करायला तयार असतो. नव्हे तसा असायला हवा
३) पुरुषाने रडूबाई असता कामा नये. प्रती-आघात करण्यास तयार असलं पाहिजे. वेळप्रसंगी चार हात करून हिंसा करण्यास मागेपुढे पाहू नये.
४) शक्तिमान असणं हेच पुरुषत्व. त्यामुळे पुरुषाने नेहमीच ‘बाहुबळी’ दिसलं पाहिजे. या बाहूबलासोबतच उचित राग हा सोबत असायलाच हवा. कुणाकडूनही मार खाऊ नये. भावनाशील असणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे.
५) बालसुलभ अशा कृतीमध्ये सहभागी होऊ नये. बालबुद्धीने विचार करू नये. बालकांच्या सहवासात जास्त वेळ व्यतीत करू नये.
६) व्यक्तीमत्त्वात जास्तीत जास्त रांगडेपणा दिसावा यासाठी मेकप वगैरे गोष्टी टाळाव्यात.
७) तुम्ही शक्तिमान दिसत नसाल तरी अधूनमधून केलेल्या ‘शक्ती प्रदर्शनामुळे’ तुम्ही शक्तिमान दिसू शकता. या शक्ती प्रदर्शनाचे विविध मार्ग आहेत. पण आपली पकड ढिली पडू देऊ नका.
८) कमकुवत पुरुष आणि स्त्रिया यांच्यावर सतत मेहरबानी करत असल्याचा पगडा ठेवा.
त्यांची स्तुती करून आपल्या कह्यात ठेवा. स्त्रियांना नेहमी संभ्रमात ठेवा. त्या वरचढ होऊ लागल्यास त्यांना अपराधाची जाणीव द्या. त्यांना गप्प करण्याची अनेक सूक्ष्म तंत्रं उपलब्ध आहेत ती वापरा. आपण त्यांच्यापेक्षा नेहमीच श्रेष्ठ आहात यांचा विसर पडू देऊ नका. बिन महत्त्वाच्या, फालतू गोष्टींच्या चर्चेत गुंतू नका. गॉसिप्स हे बायकांचं काम आहे.
९) बदला घेण्याच्या विचाराचा विसर पडू देऊ नका. पराक्रमी पुरुषत्वाचा विसर पडू देऊ नका.
१०) कधीही बाह्य मदतीवर अवलंबून राहू नका. शक्यतो मदतीशिवाय एखाद, काम कराल तरच तुम्ही वीर्यवान पुरुष म्हणून ओळखले जाल.
११) मिळत नसेल ते हिसकावून घ्या. मुळूमुळू रडत बसू नका. वेळ प्रसंगी बलात्कार करून मिळवण्याची तयारी ठेवा.
१२) समलिंगी संबंध शक्यतो टाळावेत. अशा संबंधांत बायकी वागणं टाळावं.
वरील सर्व ‘मर्दानगीच्या’ पुरुषार्थाच्या प्रस्थापनेसाठी कार्यरत असणाऱ्या जाणीवा, या नेणिवेच्या पातळीवर खोलवर रुजून राहत्तात. मर्दानगीच्या या लक्षणाप्रमाणे आपण नाही वागलो, तर आपल्याला बायकी ठरवले जाईल अशी सतत पुरुषांना भीती वाटत राहते. चारचौघांत आपली खिल्ली उडवली जाऊ नये म्हणून मनातला पुरुष सतत एक जागता पहारा देत असतो. म्हणूनच तोंडाने कितीही फुले-शाहू-आंबेडकरांना डोक्यावर घेऊन नाचवलं तरी या पुरुषी अहंकाराच्या आणि ‘मर्दानी’ संकल्पनांच्या तुरुंगातून बाहेर पडल्याशिवाय समता येणं अशक्य आहे.
‘बोले तैसा चाले’ अशा तत्त्वानं वागणाऱ्या महात्मा फुलेंनी आपल्याला अपत्यप्राप्ती होणं शक्य नाही, असं म्हटल्यावर सावित्रीबाईंनी दुसऱ्या विवाहाचा प्रस्ताव दिला होता. तो नाकारताना जोतीरावांनी जो काही युक्तिवाद दिला तो महत्त्वाचा आहे. त्यांनी सावित्रीबाईंना विचारले की, “जर समजा तपासणी केल्यावर माझ्यात दोष आढळला तर तू दुसरं लग्न करशील का?” पुरुषार्थाची, पुरुषत्वाची पारंपरिक संकल्पना नाकारून समपातळीवर विचार करण्याचं यापेक्षा दुसरं कोणतं उदाहरण असू शकतं? ‘मर्दानगीच्या संकल्पनाचे’ सापळे पुरुषांनी स्वत:हून जाणीवपूर्वक तोडल्याशिवाय स्त्री-पुरुष समता येणं शक्य नाही. किमान हे सापळे काय आहेत याचा विचार करणं, आत्मपरीक्षण करणं हीच खरी सुरुवात असू शकते.
मर्दानगीच्या या संकल्पनांचे बळी पुरुषच आहेत असे नव्हे तर स्त्रियांच्या मनावरदेखील पुरुषत्वाचे असेच अनेक साचे बिंबवले गेले आहेत. त्यामुळे त्यांसुद्धा पराक्रमी, मर्दानी पुरुष हवा असतो. या पार्श्वभूमीवर मला ‘लक्ष्य’ या बॉलीवूड सिनेमातले प्रीती झिंटा आणि हृतिक रोशन यांच्या संदर्भातील एक प्रसंग आठवतो. हृतिक रोशनच्या बायकी मृदू स्वभावामुळे आणि त्याच्यातील कर्तृत्वहीन पुरुषत्वामुळे प्रीती झिंटाला तो चांगला मित्र असला तरी सहचर म्हणून, पति म्हणून आपल्या योग्य आहे असं वाटत नाही. त्यामुळे ती ठरवून केलेल्या लग्नासाठी एका मुलाला होकार देते. साखरपुडा होण्यापूर्वी त्याचे स्त्री स्वातंत्र्याविषयीचे विचार ऐकून ती प्रभावित होते. साखरपुडा झाल्यावर मात्र तोच पुरुष आपल्या मालकीची वस्तू असल्यासारखा तिच्यावर हक्क गाजवू लागतो. आपल्या मताप्रमाणेच तिने वागावें असा आग्रह धरू लागतो. तिने पत्रकारिता करण्यासाठी लांब बॉर्डरवर जाऊ नये म्हणून तिच्यावर चिडतो. एकूणच तिच्यावर पुरुषी हुकूमत प्रस्थापित करू लागतो. जे अर्थातच लक्ष्मणरेषा ओलांडून स्वायत्तता उपभोगणाऱ्या प्रिती झिंटाला अमान्य असते आणि ती त्याचा उंबरठा ओलांडून पत्रकारितेसाठी बाहेर पडते. पण शेवटी लष्करी शिक्षण घेऊन परत आलेल्या तिच्या मित्राचाच हात जोडीदार म्हणून ती हातात घेते, कारण तो आता पुरूषासारखा वागत असतो. खरं तर या चित्रपटाचा निष्कर्ष पुन्हा पारंपरिक संकल्पनावरच येऊन थबकला असला तरी आणि तो मला मान्य नसला तरी मधल्या काळात ‘मर्दानगीच्या संकल्पना’ आणि पुरुषाचं ‘संवेदनशील माणूसपण’ यातील धूसर सीमारेषा यांचा जो शोधप्रवास मांडण्याचा प्रयत्न केलाय तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे माणूसपणाच्या वाटेवरचे प्रवासी बनायचे असेल तर या विखारी ‘मर्दानी सापळ्यातून’ बाहेर पडायला हवं.
लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
kundapn@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment