अजूनकाही
‘Partners for Law in Development’ (पीएलडी) आणि चरखा डेव्हलपमेन्ट कम्युनिकेशन नेटवर्क या दिल्लीस्थित संघटनांतर्फे २० आणि २१ डिसेंबर दरम्यान ‘कार्यस्थळावरील लैंगिक अत्याचार’ कायद्याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. (याविषयीची अधिक माहिती http://pldindia.org या संकेतस्थळावर मिळू शकते.) कायदा आणि त्याच्या सर्व आयामांबद्दलची कार्यशाळेतील सखोल चर्चा प्रबोधन करणारी होती. त्यानिमित्तानं लिहिलेला पहिला लेख ८ जानेवारी रोजी ‘अक्षरनामा’वर प्रकाशित झाला. त्यातील हा दुसरा आणि अंतिम लेख
.............................................................................................................................................
विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात वावरणाऱ्या स्त्रिया असोत की, असंघटित क्षेत्रात मजुरी करणारी स्त्रिया, सर्वांनाच कामाच्या ठिकाणी अपमानकारक टीका वा बलात्काराच्या धमक्यांना तोंड द्यावं लागतं.
बहुभाषी उच्चारण शब्दकोषाचं वेबबेस्ड टूल तयार करणाऱ्या गुगलच्या तंत्रज्ञांच्या गटांमधील समान्ता आईन्स्लीला आलेला अनुभव हादरवून टाकणारा होता. समान्ता आईन्स्ली एमआयटी या प्रतिष्ठित संस्थेमध्ये डॉक्टरेट करत होती. एमआयटीनं आयोजित केलेल्या कॉन्फरन्समध्ये ती काही मांडणी करत असताना एमआयटीमच्याच एका अग्रगण्य प्राध्यापकांनी तिचा अपमान केला, तिला धमकी दिली. समान्ता प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करू लागताच त्यांनी तिला अक्षरश: धरलं आणि ती आपल्या ग्रेड वाढवण्यासाठी इतर प्राध्यापकांशी शरीरसंबंध ठेवते असा आरोपही केला. या हल्ल्यामुळे समान्ता पूर्णपणे हादरून गेली. पुढे काही बोलण्याचं बळ तिच्यामध्ये राहिलं नाही. ‘हा मला लैंगिक मसेजेस पाठवायचा, मला घरी येण्याचा आग्रह करायचा. मी बधले नाही. हाच माणूस माझे पेपर तपासणार होता, मी पूर्णपणे कोलमडून गेले होते’, समान्ताला भीती वाटू लागली. थोड्याच दिवसांनंतर तिनं एमआयटीतला पीएच.डी.चा प्रोग्राम अर्धवट सोडला आणि ती गूगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून रुजू झाली. ‘त्या अनुभवामुळे अगदी साधी करिअर मला निवडावी लागली, तंत्रज्ञानातलं मूलगामी संशोधन करण्याचं माझं स्वप्न अपूर्ण राहीलं’, असं एका मुलाखतीत तिने म्हटलं आहे. तिच्यावर शारीरिक हल्ला करणाऱ्या प्राध्यापकाला अजून शिक्षा झालेली नाही.
गेल्या वर्षी एका मल्याळी अभिनेत्रीचं अपहरण करण्यात आलं आणि तिच्यावर बलात्कारही करण्यात आला. घटना कोच्चीमध्ये घडली. ही अभिनेत्री चित्रीकरण संपवून आपल्या कारमध्ये बसली आणि थोड्याच वेळात तिच्या लक्षात आलं की गाडी भलत्याच दिशेनं जातेय. अपहरण आणि बलात्काराच्या कटात मल्याळम सिनेमाचा सुपरस्टार दिलीप सामील होता. या संपूर्ण हिडीस नाट्याचं व्हिडियो शूटिंगही करण्यात आलं होतं. साधारणपणे भारतीय चित्रपटसृष्टीतील नट्या लैंगिक शोषणाबद्दल बोलत नाहीत. पण या मल्याळी अभिनेत्रीनं धाडस दाखवलं, तिनं पोलीस स्टेशला फोन करून आपली तक्रार नोदवली.
आता या अभिनेत्रीच्या मागे मल्याळी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी ‘विमेन इन सिनेमा कलेक्टिव्ह’ हा गट स्थापन केला आहे. स्त्रियांचा सन्मान राखला जाईल, असं अवकाश फिल्म इंडस्ट्मध्ये तयार करणं असा या गटाचा उद्देश असल्याचं संजिथा एम. या अभिनेत्रीनं एका मुलाखतीत सांगितलं.
पोलिस तपासानंतर दिलीपला अटक करण्यात आली. हा सुपरस्टार ८० दिवस गजाआड होता. अलीकडेच त्याची जामीनावर सुटका झाली, तेव्हा तुरुंगाच्या गेटजवळ त्याचे लक्षावधी चाहते स्वागतासाठी सज्ज झाले होते. तो बाहेर येताच त्यांनी त्याचा जयघोष केला. एका स्त्रीचं अपहरण आणि तिच्यावरला बलात्कार या घटना कवडीमोल असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. स्त्रियांवरले अत्याचार ‘डन थिंग’- सामाजिकदृष्टया स्वीकारार्ह अशीच सार्वजनिक धारणा आहे.
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘टॉयलेट - एक प्रेमकथा’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या दोन लोकप्रिय चित्रपटांत हिरो नायिकेचा पाठलाग करतो, तिला रस्त्यावर हैराण करतो, तिच्या नकळत तिचे फोटो घेतो. पाठलाग करणं आणि स्त्रीला सार्वजनिक स्थळी हैराण करणं याचे वस्तूपाठ सिनेमातनं मिळतात. हे सारे ‘वस्तूपाठ’ आता बलात्काराच्या परिघात येतात. स्त्रीवर सार्वजनिक स्थळावर होणारे अत्याचार आणि कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
‘द इंडियन नॅशनल बार असोसियेशन’नं एक पाहणी अभ्यास हाती घेतला होता. त्यामध्ये ७० टक्के महिलांनी असं मत व्यक्त केलं की, कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक अत्याचारांची त्या तक्रार करणार नाहीत, कारण त्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळेल. तक्रार केल्यानंतर त्याच कार्यालयात काम करण्याची त्यांना लाज वाटेल. लैंगिक अत्याचारांबद्दल पीडितेलाच लाज वाटायला लावणारी ही संस्कृती आहे. त्यामुळे अत्याचारांचं सातत्य सुरू राहतं.
‘मी असं म्हणत नाही की पुरुष शोषण करत नाहीत. शतकानुशतकं हे चाललंय. पण आजची स्त्रीही भोळसट राहिलेली नाही. पुरुषांमध्ये काही वाईट तर काही चांगले पुरुष असतात. त्याचप्रमाणे काही स्त्रिया अत्यंत कावेबाज आणि षडयंत्री असतात. त्या स्वत:च स्वत:चं शरीर देऊ करतात. त्याला कोण काय करणार?’ असं महेश भट म्हणतात. असा निष्कर्ष त्यांनी कोणत्या आधारावर काढला हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.
२०१७ चं ‘पेग्विन अॅन्युअल लेक्चर’ देण्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा दिल्लीत आली होती. सध्या प्रियांका ‘क्वाँन्टिको’ या अमेरिकन चॅनेलवरच्या लोकप्रिय मालिकेत चमकते आहे. हेन्री वार्इन्स्टीन प्रकरणांनतर ‘बॉलिवूडमध्येही लैंगिक अत्याचार होतात’ असं ट्विट तिनं केलं होतं. पण अत्याचारी पुरुषांची नावं मात्र तिनं उघड केली नाहीत.
बॉलिवुडमधल्या कास्टिंग काउचबदद्दल बराच धुरळा उडतो. सेक्सच्या बदल्यात सिनेमात काम हे समीकरण फार जुनं आहे. जुन्या काळातल्या हंसा वाडकर आणि इतर अभिनेत्रींनीही याबद्दल लिहून ठेवलंय. अभिनेत्री कंगना रानावतही या विषयी वेळोवेळी बोलत असते. पण तीही नेमकी नावं सांगत नाही. अशा मोघम बोलण्यानं काही परिणाम होत नाही.
‘जादवपुर विद्यापीठातले राज्यशास्त्राचे दोन प्राध्यापक विद्यार्थीनींचा लैंगिक छळ करतात, तुम्हालाही असा अनुभ आलाय का? शैक्षणिक संस्थांत लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्राध्यापकांची नावं पाठवा’, अमेरिकन विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या राया सरकार या विद्यार्थिनीनं फेसबूकवरून हाळी दिली होती. अनेक महिलांनी तिला प्रतिसाद दिला. महाविद्यालयातील पंचवीस-तीस वर्षांपूर्वींचीही लैंगिक छळाची प्रकरणं या ‘क्राउड सोर्स्ड’ लिस्टमुळे पुढे आली.
मिळालेल्या नावांची यादी राया सरकारनं फेसबुकवर टाकल्यामुळे अनेक स्त्रीवादी कार्यकर्त्यांना चिंता वाटू लागली. अनेकांना हे कृत्य बेजबाबदारपणचं वाटलं. वृंदा ग्रोव्हर या सर्वोच्च न्यायालयातील वकील, बृंदा बोस, निवेदिता मेनन आणि आयेशा किडवाई या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील व्याख्यात्या, आणि सामाजिक कार्यकर्त्या कविता कृष्णन यांनी एका पत्रकाद्वारे चिंता व्यक्त केली- “आम्हाला फेसबुकवरच्या या यादीमुळे काळजी वाटू लागली आहे. मागचा पुढचा संदर्भ किंवा स्पष्टीकरण न देता काही प्राध्यापकांची नावं लैंगिक अत्याचारी म्हणून दिली गेली आहेत. अनामिकतेच्या पडद्याआड नैतिक जबाबदारी न घेता एखाद्यावर आरोप करणं चिंतनीय आहे. ”
त्या आधी हार्वे वाईन्स्टीन या तथाकथित पुरोगामी हॉलिवुड चित्रपट निर्मात्यावरोधात ‘#metoo’ अभियान सुरू झालं. वाईन्स्टीन ‘पल्प फिक्श्न’, ‘गॅन्ग्स ऑफ न्यूयॉर्क’सारख्या हटके चित्रपटाचे निर्माते. वंशभेदविरोधी आणि इतर पुरोगामी मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे वाईन्स्टीन विद्यानीठांनाही आर्थिक मदत करायचे. पण या पुरोगामी चेहऱ्यामागे एक कुरूप चेहरा होता, लैंगिक शोषणाचा. हॉलिवुडच्या एका अभिनेत्रीनं तोंड उघडलं आणि अलिसा मिलानो, नाओमी वॉटस्, सलमा हायेक, एमा थॉम्सन, केट बेकिन्सेल आणि इतर अनेक अभिनेत्रींना बळ मिळालं. वाईन्स्टीनना आपल्या प्रॉडक्शन कंपनीच्या निर्देशक पदावरून पायउतार व्हावं लागलं.
आता लैंगिक छळासोबत हॉलिवुडमधील वंशभेंद, वर्णभेद, मुस्लिमाचं विकृत चित्रण या विरोधातही चर्चा होऊ लागली आहे. अभिनेत्रींनी समान कामासाठी समान मानधनाचाही मुद्दा लावून धरला आहे. बॉलिवुड असो की हॉलिवुड स्त्री कलाकारांना श्रेयासाठी आणि मानधनासाठी झगडावं लागतं.
‘हॉलिवुडमध्ये सध्या पुरुषांच्या नावांची पुकारणी होतेय, तशी भारतीय चित्रपटसृष्टीत होईल की नाही या बद्दल मी साशंक आहे’ असं मत ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाची लेखिका आणि दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तव यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं.
गेल्या सप्टेंबरमध्ये बनारस हिंदू विद्यापीठाचा परिसर अनेक धरणी आणि आंदोलनांनी दणाणला होता. कलाशाखेतील तृतीय वर्षाच्या एका विद्यार्थिनीचा मोटरसायकल वरून आलेल्या दोन तरूणानी लैंगिक छळ केला. लैंगिक छळाची ही एकमेव घटना नव्हती. गेली काही वर्षं हे विद्यापीठ लैंगिक अत्याचारासाठी बदनाम झालं आहे. ही तरुणी तक्रार नोंदवायला गेली, तेव्हा ‘संध्याकाळ उलटून गेली तरी तू हॉस्टेलबाहेर काय करत होतीस?’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी वरकडी केली. विद्यार्थिंनींनी सातच्याआधी हॉस्टेलमध्ये परतलं पाहिजे असा फतवाही काढला. संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या लंका गेटपाशी १३ तास ठिय्या आंदोलन केलं तरी कुलगुरूंवर काही परिणाम झाला नाही. अखेरीस राज्यपालांनी त्यांची उचलबांगडी केली. लैंगिक अत्याचारांबद्दल स्त्रीलाच दोषी ठरवण्याची वृत्ती खोलवर रुजली आहे.
या संदर्भात पत्रकार तरुण तेजपाल यांच्यावर झालेल्या आरोपानंतर उमटलेल्या प्रतिक्रिया तपासण्यासारख्या आहेत. तेजपाल यांनी अनिरुद्ध बहल यांच्यासोबत सुरू केलेलं ‘तहलका’ हे वेब मॅगझिन स्टिंग ऑपरेशनसाठी प्रसिद्ध झालं. २००० साली शस्त्रास्त्र खरेदीतील सौदेबाजीचा व्हिडियो या वेब पोर्टलनं प्रसिद्ध केला. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलींतील बजरंग दलाच्या भूमिकेचा एक विस्तृत रिपोर्ट तहलकानं ‘द ट्रूथ : गुजरात २००२’ प्रसिद्ध केला. अन्यायविरोधी विरोधी आणि स्त्रीवादी भूमिका घेणाऱ्या माध्यम समूहामध्ये ‘तहलका’चं आणि तेजपालांचं नाव घेतलं जायचं. तेजपालांवर २०१३च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये एका तरुण पत्रकर्तीनं लैंगिक अत्याचारांचा आरोप केला, तेव्हा दिल्लीतील काही सेक्युलर, फेमिनिस्ट महिला पत्रकारांनी तेजपालांचं समर्थन केलं आणि तक्रार करणाऱ्या महिलेनं तेजपालांच्या वागण्याचा चुकीचा अर्थ लावला असं विधान केलं होतं.
राया सरकारनं आपली यादी प्रकाशित केली तेव्हा अनेकांना धक्का बसला. स्त्रीवादी अभ्यासिका आणि कार्यकर्त्या ज्यांना पुरोगामी विचारवंत आणि सहप्रवासी समजायच्या, ज्यांनी अन्यायविरोधी लढयात भाग घेतला होता, अशा काही विद्वान प्राध्यापकांची नावंही त्या यादीत होती. पण विद्यापीठीय वर्तुळात शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातेसंबंधांमध्ये अधिकारांचा समतोल कुठे असतो?
कार्यस्थळावरील अत्याचाराविरोधात कायदा झाला. पण स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यमत्वाचा एकूणात विचार केल्याशिवाय, त्या मुद्यांना भिडल्याशिवाय स्त्रीवर होणाऱ्या हिंसेच्या प्रश्नांची अशा सुट्या सुट्या कायद्यांच्या आधारे उकल होणार नाही.
.............................................................................................................................................
लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.
alkagadgil@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sunanadan Z
Wed , 10 January 2018
अहो अलकाताई, ज्या महिलांनी हार्वे वार्इन्स्टीनवर आरोप केले त्या महिला काही सतीसावित्री असतील असे तुम्हाला वाटते काय. ? त्यांनी तेव्हा वार्इन्स्टीन बरोबर संबंध ठेवले कारण त्यात त्यांचा फायदा होता., त्यांना काम मिळणार होते त्याच्याकडून..आता त्या वार्इन्स्टीनविरूद्ध बोलत आहेत कारण त्यांच्या बोलण्याने त्यांना पुन्हा प्रसिद्धी मिळणार आहे...लोकांची सहानुभूती मिळणार आहे..मी असे नाही म्हणत की वार्इन्स्टीनने जे केले ते बरोबर होते, पण त्या महिलांना एवढी चाड होती न्यायाची, तर त्यांनी तेव्हाच तक्रार का केली नाही वार्इन्स्टीनविरूद्ध ?...आणि यांतील किती महिलांचे आरोप खरे असतील व कितीजणी फक्त प्रसिद्धीसाठी खोटे आरोप करतात ते कोणास ठावूक....तेव्हा एवढीच विनंती की माहित नसलेल्या अमेरिकातील विषयावर इथे भारतात उगाच गळे काढू नये....