देवबंदकडून असे फतवे काढणे चालूच राहील, त्याकडे किती लक्ष द्यायचे?
अर्धेजग - कळीचे प्रश्न
बेनझीर एस. तांबोळी
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 09 January 2018
  • अर्धे जग कळीचे प्रश्न फतवा Fatwa डिझायनर बुरखा Designer Burqas स्लिम फिट बुरखा Slim Fit Burqas दारुल उलुम देवबंद Darul Uloom Deoband

मुस्लीम महिलांनी डिझाईनर बुरखे वापरू नयेत, स्लिम फिट बुरखे वापरू नयेत असा फतवा नुकताच दारूल उलुम देवबंदने जारी केला आहे. याचे कारण म्हणजे असे बुरखे घालणाऱ्या स्त्रियांकडे पुरुषांचे लक्ष जाते आणि मग त्यातून वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात, असे देवबंदचे म्हणणे आहे. या फतव्यातून पुन्हा एकदा पुरुषी वर्चस्ववादी मानसिकतेचा प्रत्यय येतो. शालिनतेचा मक्ता कायमस्वरूपी फक्त स्त्रियांच्याच माथी मारला जातो. ती काय घालते, तिने काय घालावे आणि काय घालू नये हे पुरुष ठरवत होते, आणि आजही पुरुषच ठरवत आहेत. हे पुरुषप्रधान वर्चस्ववादी मानसिकतेचे स्वयंघोषित ठेकेदार आजच्या काळातही वेगवेगळ्या पद्धतीने आपले स्त्रियांवरचे नियंत्रण जाऊ द्यायला तयार नाहीत. आजची स्त्री निर्णय घ्यायला सक्षम आहे, हेच यांना पचत नाही.  

असले फतवे काढत बसण्यापेक्षा स्त्रियांना समस्येत टाकणारी मानसिकता बदलण्याचा फतवा दारूल उलुम देवबंद कधी काढणार? स्त्रियांनी घातलेले कपडे आणि त्याचे होणारे परिणाम यापेक्षा पुरुषांनी आपली नजर, वृत्ती आणि मानसिकता बदलावी, असा फतवा दारूल उलुम देवबंदने काढावा आणि पाहावे कितीजण त्याचे पालन करतात. मुळात असे फतवे काढण्याचा अधिकार यांना कुणी दिला, हा अनुत्तरीत प्रश्न आहे.

याची दुसरी बाजू ही मुस्लीम समाजाच्या मानसिकतेत दडलेली आहे. उठसूट दारूल उलुम देवबंदकडे जायचे आणि सल्ला मागायचा. हे आधी बंद केले पाहिजे. म्हणजे आपोआपच असले विचित्र फतवे काढणे बंद होईल. याहीपेक्षा देवबंदने असले फतवे जारी केले तरी त्याकडे दुर्लक्ष करावे, कारण फतवा हा सल्ला आहे आणि तो मानायचा किंवा नाही हे आपल्यावर अवलंबून आहे किंवा तो मानलाच पाहिजे, असे कोणतेही बंधन नाही.

दुसरा असाच एक फतवा म्हणजे आपल्या मुलींचे विवाह अशा घरात करू नयेत, जिथे चरितार्थासाठी बँकेत नोकरी करणारी माणसे आहेत. याचे कारण म्हणजे बँकिंग हे क्षेत्र व्याज कमावण्याशी निगडीत आहे. जे इस्लाममध्ये हराम आहे. म्हणून हरामच्या कमाईशी निगडीत असलेल्या कुटुंबामध्ये आपली मुलगी देऊ नये किंवा असल्या कुटुंबामध्ये मुस्लीम मुलींनी विवाह करू नयेत. यापेक्षा देवबंदने असे सांगावे की, मुस्लिमांनी बँकिंग क्षेत्रातच काम करू नये. जरी गुणवत्ता आणि क्षमता असल्या तरी हराम-हलाल या सद्यस्थितीत अनावश्यक वादामध्ये पडून आपल्या प्रगतीची कवाडे आपणच बंद करून घ्यावीत.

इस्लाममध्ये हलाल सांगितले गेलेले व्यवसाय करताना त्यामध्ये अप्रमाणिकपणा, भ्रष्टाचार, लोकांची फसवणूक करून स्वतः मोठे होण्यापेक्षा चौदाशे वर्षापूर्वी तथाकथित हराम गणले गेलेले जे व्यवसाय आहेत, त्यामध्ये प्रामाणिकपणे कष्ट करून, बांधिलकी दाखवून मिळणारी आपकमाई आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी कशी वापरावी, हे ज्याचे त्याने ठरवावे.

स्त्रियांच्या अस्तित्वावर, त्यांच्या समानतेच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एकतर्फी तलाकचा प्रश्न एवढा गाजत असताना देवबंदचे त्याबाबत सोयीस्कर मौन असते. किंबहुना असे अमानुष पद्धतीने दिले गेलेले तलाक वैध कसे आहेत, हे दाखवण्यासाठी देवबंद फतवे काढत असते. यातून आपण हेच लक्षात घेतले पाहिजे की, असल्या ठेकेदारांना स्त्रियांची काळजी किती आणि पुरुषप्रधानता जपण्याची काळजी किती आहे.  

दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, इस्लाममध्ये बऱ्याच गोष्टी हराम सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ फोटो काढू नयेत. आज फोटो आयडेंटीटीशिवाय कोणी हज यात्रेलाही जाऊ शकत नाही. आधार कार्डशिवाय आज पदोपदी आपले काम अडते आहे. याकडे आपण किती दिवस दुर्लक्ष करणार? यावर काळानुसार बदलणे हाच एकमेव उपाय आहे.

आणखी एक गोष्ट म्हणजे इस्लाममध्ये मद्यप्राशन हराम आहे. यावर देवबंदने स्वतःहून किंवा कुणाच्या मागणीवरून किती वेळा फतवा काढला आहे? मुळात कोणी यावर सल्ला मागायला जाणार नाही आणि देवबंद यावर फतवा काढणार नाही. कारण त्यांना हे माहीत आहे कुणीही असा फतवा मान्य करणार नाही. मद्यप्राशन करणारे अनेक मुस्लीम आहेत आणि मद्याशी निगडीत व्यवसायामाध्येही अनेक जण असतील. उलट असा फतवा जर काढला तर तो समाज हिताचाच होईल, संपूर्ण पिढी विनाशापासून वाचेल, अनेक संसार वाचतील.

देवबंदकडून असे फतवे काढणे चालूच राहील. त्याकडे किती लक्ष द्यायचे, त्याला किती महत्त्व द्यायचे, हे ज्याचे त्यानेच आपली सदसद्विवेकबुद्धी वापरून ठरवावे.

.............................................................................................................................................

लेखिका डॉ. बेनझीर एस. तांबोळी पुणेस्थित सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Ashok Rajwade

Thu , 11 January 2018

बेनझीर, तुमचा लेख उत्तम झाला आहे. यावर विशेषत: मुस्लीम समाजात नीटपणे चर्चा व्हायला हवी.


Gamma Pailvan

Tue , 09 January 2018

बेनझीरताई, देवबंदी फतवे दुर्लक्ष करायच्या योग्यतेचे आहेत यावर दुमत नाही. मात्र एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. ती म्हणजे देवबंदमध्ये जे पिकतं ते अख्ख्या इस्लामी जगतात विकतं. निदान असा समज तरी आहे. याच देवबंद स्कूलने इस्लामी उपासना प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाच्या चौकटीत बसवायचा प्रयत्न करायला हवा. याचं कारण असं की आज मध्यपूर्वेत इस्लामच्या अस्तित्वाचा झगडा चालू आहे. सौदी अरेबिया वगळता तिथला एकूण एक देश युद्धाच्या व/वा चळवळीच्या तावडीत सापडला आहे. सौदी अरेबियाही कधीही युद्धाच्या स्वाधीन होऊ शकतो. अशा प्रसंगी इस्लामचा बचाव करायचा झाला तर त्यासाठी भक्कम तात्त्विक अधिष्ठान हवं. हे तात्विक अधिष्ठान भारतीय दर्शने मिळवून देऊ शकतात. असाच काहीसा प्रकार गौतम बुद्धाच्या बाबतीत झाला होता. पहिले तीनचारशे वर्षं फक्त त्याची वचनं अस्तित्वात होती. आज ज्याला बौद्ध तत्त्वज्ञान म्हणतात ते सगळं बरंच नंतरचं आहे. अशीच काहीशी प्रक्रिया इस्लामसंबंधी आचरावी लागेल. मात्र अट एकंच की, हिंदूंचा दु:स्वास सोडला पाहिजे. माझ्या अंदाजानुसार देवबंदकडे या कामासाठी पुरेसं बौद्धिक बळ आहे. नसेल तर ते तुमच्यासारख्या जागरूक व्यक्तींनी मेळवायला हवं. बघा पटतंय का. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......