‘ताम्रपट’ आणि मराठा स्त्रिया
अर्धेजग - कळीचे प्रश्न
डॉ. संध्या शेलार
  • कादंबरीकार रंगनाथ पठारे आणि ‘ताम्रपट’चे मुखपृष्ठ
  • Sat , 22 October 2016
  • संध्या शेलार रंगनाथ पठारे ताम्रपट Sandhya Shelar Rangnatha Pathare Tamrapat मराठा स्त्रिया

“सीताबाईचे वय ऐंशीच्या आसपास पोहचले होते. डोक्याचे सारे केस, पापण्या, भुवया सारे पांढरे झाले होते. चेहऱ्यावर असंख्य सुरकुत्या आणि हसली की राहिलेले उरलेसुरलेले निळसर पिवळे दात दिसत. ओठावर स्पष्ट जाणवण्याइतपत केस होते. तेही पांढरे झाले होते. केवढे प्रदीर्घ आयुष्य पाहिले, सोसले या स्त्रीने! दादासाहेबांच्या मनात आले, अगदी तरुण वयात ही विधवा झाली. पुढे सारे आयुष्य तिने असे एकाकी काढले. जवळचे कोणी राहिले नाही तरी ती राहिली. कुळीसाठी गंधर्व लावला नाही. नात्यातल्या साऱ्या मुलांना भाकरी बडवून घातल्या. हिने आयुष्याकडे काय मागितले असेल? कोणत्या आकांक्षा बाळगल्या असतील? कोणते श्रेय तिला मिळाले?”

 ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांच्या ‘ताम्रपट’ या साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या कादंबरीमध्ये जेमतेम चार ते पाच ठिकाणी सीताआजी या पात्राचा उल्लेख येतो. या एका पात्रातून पठारे यांनी मराठा समाजाच्या एका धगधगत्या आणि तितक्याच दुर्लक्षिलेल्या प्रश्नाला समोर आणलं आहे. कुळीच्या सन्मानासाठी सीताआजी बालविधवा असून गंधर्व लावत नाही. महात्मा जोतीबा फुले यांनी बालविधवांचा प्रश्न समोर आणून त्यासंबंधी समाजजागरण केल्यानंतरचा साधारण शंभर वर्षानंतरचा काळ, तरीही स्वतःला कुलीन समजल्या जाणाऱ्या मराठ्यांमध्ये हे महात्मा फुलेंचं कार्य पोहचलेलं दिसत नाही किंवा ते इतक्या गांभीर्यानं कुणी हाताळलेलंही दिसत नाही!

कादंबरीच्या सुरुवातीला ‘सीताबाईच्या पडळी’चा उल्लेख येतो. ही पडळी शहरपासून लांब एकटी वस्ती आहे, शहरात शाळा-कॉलेज शिकणाऱ्या मुलांना ही आजी सांभाळते आहे. ही पडळी  म्हणजे त्यांच्या राहण्यासाठी मोफत वसतिगृहच आहे! मुलांच्या आई-बापांनी फक्त धान्य आणून टाकायचं आणि या सीताआजीनं ते करून या मुलांना घालायचं, इतका साधा हिशोब! पण त्यामागे आजीचा वेळ जाणं, त्यामुळे उदरनिर्वाहाचं साधन  आणि सर्वांत महत्त्वाचं समाजातील गलिच्छ प्रवृत्तीपासून संरक्षण मिळणं. ही म्हातारी कुणाचाही आधार नसताना हिमतीनं उभी आहे. फक्त उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ती या मुलांकडे पाहत नाही, तिचे लांबून नातेवाईक असलेली ही मुलं ती कर्तव्यभावनेनं आणि मायेनं सांभाळते आहे. अगदी निरपेक्षपणे! तिच्याकडे राहणारा तुकाराम जेव्हा स्वातंत्र्यचळवळीतला त्याचा सहभाग लपवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सीताआजी वडिलकीच्या नात्यानं त्याला समजावतेच, परंतु कर्तव्याचा विसर पडू नये म्हणून त्याला घरच्या परिस्थितीची जाणीव करून देते. शेवटी भावनिक आवाहनसुद्धा करते. या म्हातारीची कर्तव्यभावना फक्त शब्दात नाही. जेव्हा तुकाराम जखमी होऊन तिच्या शहरापासून लांब कुठल्या तरी दवाखान्यात असतो, तरीही ती कुठलीही माहिती नसताना तिथे जाते. विशेष म्हणजे ती माहितीही एका पोलिसाकडूनच मिळवते, तेही त्याला नातेसंबंध सांगून भावनिक आवाहन करत!

बुद्धिमत्तेच्या बाबतीत या आजीबाई नंबर काढतात. पंधरा-सोळा वर्षानंतर ही आजी बापूसाहेब देशमुख यांना पाहून, एका भेटीच्या आधारावर संपूर्ण कुटुंबाचा लेखाजोखा सांगून जाते! अशा या आजीला कर्तव्यभावनेतून म्हणा किंवा तिच्या प्रेमळ वागण्यामुळे म्हणा, पण दादासाहेब (आधीचा तुकाराम जो नंतर सहकाराच्या माध्यमातून आधी साखर कारखान्याचा चेअरमन होतो आणि नंतर खासदार!) स्वतःच्या घरी कायमचे ठेवून घेतात. तिच्या मृत्यूनंतर ती ज्या झाडाखाली दिवसरात्र बसून राहत असते, त्या झाडालापण सीताआजीच्या नावानंच ओळखलं जातं. अशी ही लांबची नातेवाईक आजी दादासाहेबांच्या घराचा अविभाज्य भाग बनून जाते.

दादासाहेब जेव्हा या आजीला आराम करायचा, पडून राहायचा सल्ला देतात तेव्हाचे तिचे शब्द तिनं आयुष्याचा केलेला स्वीकार सांगून जातात. ‘‘ झोपायचं? म्हातारपणी आता कह्याची झोप? काम नायी, धंदा नायी मला म्हातारीला. खायाप्यायाचं आणि बसून राहायचं– रातंदेही कव्हायबी बसून राहायचं.’’

मराठा विधवा, सर्वांत जास्त शोषित आणि वंचित स्त्री. त्यात ती जर उच्चकुलीन असेल तर जास्तच शोषित. यात पुन्हा निसंतान असेल तर तिची परवड न बघण्याजोगीच म्हणावी लागेल. ती कुलाचाराच्या नावाखाली गंधर्व लावू शकत नाही, परंतु अवतीभवती जे समाजमान्य रक्षक असतात तेच तिची शारीरिक, मानसिक पातळीवर सर्वांत जास्त विटंबना करतात. घराच्या चार भिंतीत तिचा आक्रोश चिणून टाकला जातो. त्यात एखादी धाडसी असेल तर ती याविरुद्ध बंड करते. मग तिचे अलिप्त राहणं अपरिहार्य होतं. समाजाच्या या विकृतीवर रंगनाथ पठारे यांनी सीताआजी या पात्राच्या रूपानं बोट ठेवलं आहे.

याच प्रकारे निराधार झालेली कदमबांडे ही बाई मात्र वेगळा पर्याय निवडताना दिसते. सीताआजी जिथं नकळतपणे मुलांचं वसतिगृह चालवून एकप्रकारे समाजकार्य करत स्वतःचं शील जपण्यात धन्यता मानते, तिथं कदमबांडे बाई समाजकार्याच्या बुरख्याखाली व्यभिचार दडवण्याचा अट्टाहास करताना दिसते. इथं सीताआजीचं वेगळेपण प्रकर्षानं जाणवतं.

विधवा स्त्रियांचा प्रश्न अशा दोन्ही अंगानं पठारे यांनी यशस्वीपणे चित्रित केला आहे. हे चित्रण आहे १९७९ च्या आधीचं, मात्र आज २०१६ मध्येही यापेक्षा वेगळी परिस्थिती आढळत नाही. एखाद्या मराठा कुटुंबातील स्त्री भर तारुण्यात विधवा झाल्यावर होणारी तिची अवहेलना, विटंबना आजही तशीच आहे. स्त्री शिक्षित झाली परंतु ती सरंजामशाहीच्या बेड्या तोडू शकली नाही. त्या अधिक घट्टच होत गेल्या आहेत. त्यासाठी जागतिकीकरण खरंतर वरदान ठरायला हवं होतं, पण ते या स्त्रियांच्या बाबतीत शाप ठरलं आहे. आधी कुणबी हा विधवेला कुणी अपत्य नसेल तर गंधर्व लावू देत होता. शिक्षण, भांडवलीकरण यामुळे बागायती कुणबी श्रीमंत झाला. इथंच त्याची उच्चकुलीन होण्याची लालसा गहिरी होत गेली. मग ‘उच्चकुलीन मराठा’ ही ओळख दाखवणं म्हणजेच कुटुंबातील गंधर्वाची परंपरा खंडित करणं. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत १९९१ नंतर झालेल्या या बदलामुळे सर्वच मराठा समाज ‘आम्ही छत्रपतींचे वारस म्हणून आम्ही गंधर्व लावत नाही’ असं म्हणू लागला. परिणामी मराठा विधवा स्त्रीची कुचंबना जी ठराविक वर्गात मर्यादित होती, ती सर्वच समाजात अनिवार्य झाली! हा प्रश्न इतकाच मर्यादित राहिला नाही तर अशा स्त्रीच्या वारसाहक्कानं येणाऱ्या संपत्तीच्या लालसेनं त्यातच वाढच झाली आहे. सामाजिक दबाव आणून अशा स्त्रियांना कुटुंबाला हवा तो वारसदार निवडण्यासाठी भाग पाडलं जाऊ लागलं. त्यासाठीही तिच्यावर अत्याचार होतात. याला जबाबदार फक्त त्या महिलेचं सासरच नाही तर माहेरच्या लोकांचा कुलीनतेचा अट्टाहासही तिला सासरी खितपत पडण्यास भाग पाडू लागला. म्हणजे जोतीबांच्या स्त्रीशिक्षणानंसुद्धा अगदी नगण्य प्रमाणात या स्त्रीला मुक्त होता आलं आहे !

‘ताम्रपट’मध्ये रेखाटलेली सीताआजी आणि कदमबांडेबाई आणखी जास्तच तयार होताना दिसत आहेत. उलट त्यात अनेक प्रकारे शोषणाची भरच पडली आहे असं मी म्हणेन. माझ्या या म्हणण्याला शहरी भाग थोडाफार अपवाद ठरत असेल, परंतु ग्रामीण भाग आजही याच रूढीखाली दबलेला आहे. सोशल मीडियामुळे जग जवळ येत आहे. आता या स्त्रीला तिची कुचंबना दिसावी असं वाटतं. मूलतः अशा अनेक शोषित महिला आपण शोषित आहोत हेच मान्य करत नाहीत. त्यांनी हे प्राक्तन म्हणून स्वीकारलेलं दिसतं. नवीन शिक्षित आणि सोशल झालेल्या मुली मात्र स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक होताना दिसत आहेत. याची प्रचीती सध्या महाराष्ट्रभर होत असलेल्या मराठा क्रांती मोर्च्यात स्त्रियांच्या लक्षणीय सहभागावरून लक्षात येते आहे!

 

लेखिका मुक्ताई ग्रामीण महिला संघ (नागरगाव, शिरूर, जि. पुणे)च्या अध्यक्ष आहेत.

Shelargeetanjali16@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......