अजूनकाही
आपल्याकडच्या बायका स्वतंत्र, मुक्त होण्याची सुरुवात सावित्रीबाई फुलेंच्या काळातच झाली! सावित्रीबाईंनी स्वत: शिक्षण घेऊन इतर बायकांना शिक्षण घेण्यासाठी त्या झटल्या तेव्हापासून या सगळ्या लढ्याला सुरुवात झाली. परंतु दुर्दैवानं हा संघर्ष सुरूच आहे. आपला समाज पुरुषी मानसिकतेतून अद्यापही बाहेर पडलेला नाही. इथं आपल्या घरातच पुरुषाच्या सोबतीनं बाईचा शत्रू तिच्यासोबत नांदत असतो… राहत असतो. त्याचं डोकं फिरलं की, मग तो डंख मारत असतो. त्यामुळे ही लढाई खूप कठीण आहे, पण बाया त्यालाही बऱ्याच पुरून उरू लागल्या आहेत. बहुतांश पुरुष पुरुषी मानसिकतेनं ग्रासलेले असले तरी काही पुरुष असतातच की समता मानणारे. समतावादी समाज निर्माण होण्यास अजून काही काळ जावा लागणार हे निश्चित.
माझ्या कुटुंबावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या मूलभूत विचारांतच शिक्षण घेणं हा भाग आहे. परिणामी मला शिक्षण घेण्यात कोणतीही अडचण आली नाही. माझ्या आईची पहिल्यापासून इच्छा होती की, मी स्वतंत्र असावं. स्वावलंबी असावं. मी नोकरी करून स्वत:च्या पायावर उभी रहायला हवी अशी तिची इच्छा होती आणि तिनं एकहाती पाठबळ देऊन मला अधिक मुक्त होण्याची संधी दिली. त्यातूनच मी घडत गेले. पण हे सर्वांच्याच बाबतीत घडतं असं नाही, आजही. या गोष्टीला खूप पदर आहेत आणि ते सर्व समजून घेऊन आपण आपल्या समाजाचा विचार करायला हवा. स्त्रीचं स्थान दुय्यम आहे, तर ते का कसं हे नीटपणे पाहण्याची गरज आहे. बुद्ध म्हणतो तसा आपल्याला सतत प्रश्न पडायला पाहिजेत. भले त्याची उत्तरं लगेच सापडणार नाहीत, पण प्रश्न तर पडायला हवेत.
आपण आपल्या समाजातल्या स्त्रियांचा विचार एकसारखा करू शकत नाही. कारण आपण मुळातच विभागलेलो आहोत. आर्थिक-सामाजिक स्तरानुसार आपल्या समाजाची विभागणी आहे. म्हटल्यावर त्यापुढे जाऊन आपल्या स्त्रियांची विभागणी. पुन्हा राजस्थानातल्या बायकांचा जो प्रश्न आहे, तोच प्रश्न केरळच्या बायकांचा नसणार. सतत संघर्षमय जीवन जगणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील बायकांचे प्रश्न वेगळे असणार. आपल्या एकूण समाजात तर मुस्लिम स्त्रियांचा प्रश्न तर सर्वांत खालच्या तळापासून सुरू होतो. तर हे सर्व समजून घेऊन त्याचा समग्र विचार होण्याची गरज आहे. या सर्वाच्या मुळाशी पुन्हा आपली आर्थिक सिस्टिम येते. आर्थिक स्तर येतो.
आज नोकऱ्यांमधल्या अपेक्षा वाढल्यात. महागाई वाढलीय. यात तग धरण्यासाठी सर्वांनी धावण्याची गरज वाढलीये. जर तुम्हाला आर्थिक स्थैर्य नसेल, त्याहून महत्त्वाची समता नसेल तर प्रश्न जटील होणारच. मग सगळेच एकमेकांचा शोषण करून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. मजुरांचे शोषण मालक करणार, मालकांचे गुंड किंवा राजकारणी, राजकारण्यांचे शोषण त्यांची अंतर्गत यंत्रणा. हे असं सगळं आतून बाहेरून पोखरलेलं असेल तर कसं होणार? जिथं समाजच एकमेकांच्या शोषणावर आधारित आहे, तिथं बाईच्या शोषणाची काळजी कोण करणार?
आत्ताच्या काळात तर इंटरनेट हा अन्याय अत्याचाराचा मुख्य भाग होऊ लागलाय. कामाचे ताण वाढलेत. एकटेपणा वाढलाय. इंटरनेटचं व्हर्च्युअल जगणं बरं वाटलं तरी आनंद देत नाही. वासनेला खतपाणी मात्र इथं पुरेसं मिळतं. मग एकटेपणातून विकृती वाढत जाते. विकृतीतून हिंसा. हिंसा कोणावर? तर लहान मुले आणि बायका. नैराश्य काढण्याचं तो एक मार्गच झालाय. मग कोणीतरी मोबाईलच्या स्क्रीनवर काहीतरी पाहून ‘एक्साईट’ होतो आणि जवळपासच्या बाईवर बलात्कार करून मोकळा होतो! हे असे प्रकार तुम्ही थोपवणार कसे. त्यासाठी तुम्हाला आतून बाहेरून समाजव्यवस्थाच संवादी करण्याची गरज आहे.
आज बायका नोकरीवर बारा बारा तास काम करून येतात, पण म्हणून घरची कामं चुकलीत का? आज त्यांच्यात ‘रोल कॉफ्लिक्ट’ दिसतो. घरात जर अस्वच्छता असेल तर लगेच नोकरदार बाईला त्याचं टेन्शन येतं की, कुणी घरात आलं तर काय म्हणेल? यात खरं तर फक्त बाईला नाव ठेवण्याचा मुद्दा कुठून येतो. घर तर इतरही माणसांमुळे आहे, मग त्याच्या अस्वच्छतेचा दोष सर्वांच्या माथी का जात नाही? पण आपण खोट्या संस्काराच्या आणि कामाच्या रिजिड वाटणीतून अद्याप बाहेर पडलेलोच नाही. त्यामुळे आजची कमावती स्त्री ही वेगळ्या अर्थानं गुलामच आहे. तिला ऑफिसातल्या कामातही शंभर टक्के द्यायचे असतात आणि घरच्या कामातही. तिला तिच्या दोन्ही रोलला समन्याय द्यायचा असतो. त्यातून तिची परवड ठरलेली.
मी शासकीय नोकरीत आहे. इथं स्त्री-पुरुषांना कामाचा मोबदला समान मिळत असला तरी संधी मिळेलच असं नाही. अनेकदा बायकांना त्यांच्या भूमिकांबाबत गोंधळ असतो. मुळात त्यासाठी कुठलीही सपोर्ट यंत्रणा नसल्यानं, घरातून वा समाजातून त्यांचा हा गोंधळ उडत असतो आणि म्हणूनही कामाची वेळ संपली की, त्यांनाही घरच्या कामांचं चित्र दिसू लागतं. त्यातून मग त्या उशीरा थांबत नाहीत म्हणून काम न देण्याकडे कल असतो. ज्या थांबतात त्यांच्याविषयी गॉसिप करण्याचा भाग असतो. सुरक्षेचा प्रश्न असतो. यातून तिच्या पुढे जाण्याच्या वाटांना खीळ बसते. त्यामुळे यासाठी आपली एकूण कौटुंबिक व्यवस्था बदलण्याची गरज आहे.
लेखिका म्हणून ही समजा एखाद्या व्यासपीठावर गेले तर, तिथं माझ्यासोबत चार पुरुष वक्ते असतात. इथूनच असमानतेला सुरुवात होते. मला बोलण्यास दिलेला वेळही कमी असतो. अनेकदा पुरुष वक्त्यांच्या अग्रेसिव्ह भाषणांपर्यंत आपण पोहचू शकत नाही हे दिसत असतं. तावातावानं बोलण्यानेच सारं काही साधलं जात असेल तर ते मला जमत नाही, मग त्यांना तेवढं पुरतं आपल्याला शांत करायला. काही वेळा लिहिण्याच्या बाबतही लोकं ‘डिक्टेट’ करण्याचा प्रयत्न करतात. आंबेडकरी लेखन करते असं लोकच म्हणतात. मग आंबडेकरीच का लिहिते असं म्हणणारेही भेटतात, तर आंबेडकरी लेखन केलंय तर वेगळं, खुलं लिहू नये. आंबडेकरी लेखनाच्या परंपरेला माझ्यामुळे नावं ठेवली जातील असाही सूर काढतात. आपल्या भूमिका, विचारसरणी तयार करण्याचं, रेडिमेड देण्याचं किंबहुना लादण्याचा प्रयत्नही पुरुषांकडून केला जातो. हे सगळं हाताळत आपल्याला आपल्या भूमिका घासूनपुसून घेत राहावं लागतं.
आजच्या पिढीच्या हाती खरं तर तुलनेनं बऱ्याच गोष्टींचं स्वातंत्र्य आलंय, पण जो एक गोंधळ माझ्या पिढीत होता, तोच याही पिढीत जाणवतो. मुक्त व्हायचं म्हणजे पुरुषी दुर्गुणांना स्वीकारायचं असं एक चित्र दिसतं. दारू पिणं, सिगरेटी ओढणं म्हणजे तुम्ही समता आणणार असा अर्थ होत नाही. ‘रॅडिकल फेमिनिझम’बाबत दुर्गुणांचा चांगल्या प्रकारे स्विकार अशीच काहीतरी सांगड करून ठेवलीय. पुरुषांना नावं ठेवली, बोल्ड आणि बिनधास्त राहिलात म्हणजे तुम्ही मोकळ्या झाला असा अर्थ होत नाही. हे सगळं पुन्हा खूप परिघावरंच असतं. मूलभूत गोष्टी समजून घेण्याची अधिक गरज आहे. वैचारिक समतेसाठी झगडण्याची खूप गरज आहे. समता कशात मानवी याचा मूलभूत आत्मा आकळला पाहिजे.
बायकांच्या मुक्तीसंदर्भात अनेकानेक पदर आहेत. ते सर्व त्या खोलीनं समजण्याची गरज आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून संवाद वाढवायला हवा. शिक्षण आणि घरातूनच स्त्री-पुरुष समतेची बीजं पेरायला हवीत. कुठंतरी तरुणपणी त्याचं इंजेक्शन देण्यानं काहीही हाती लागणार नसतं, हे ओळखून लहानपणापासून त्याबाबतच्या जाणीवा तयार व्हायला हव्यात.
शिल्पा कांबळे यांची ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी प्रसिद्ध आहे.
.............................................................................................................................................
मूल्य - २५० रुपये. सवलत मूल्य - २२५ रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2510
.............................................................................................................................................
शब्दांकन : हिनाकौसर खान-पिंजार
greenheena@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Bhagyashree Bhagwat
Sun , 20 August 2017
छान जमून आलाय, पण मध्येच संपल्यासारखा वाटतो.
Nivedita Deo
Wed , 16 August 2017
खूप छान लेख आहे