जिथं सुपारी पिकते, तिथं स्त्रिया उच्चस्थानी असतात!
अर्धेजग - कळीचे प्रश्न
हेमंत गोळे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 03 August 2017
  • अर्धे जग women world कळीचे प्रश्न मातृसत्ता सुपारी शिवराम कारंथ डी.डी. कोसंबी हेमंत गोळे

माझा प्रवास कधी सुरू झाला हे मला आठवत नाही, पण कसा सुरू झाला हे अगदी स्पष्टपणे आठवतं. त्या दिवशी आठवले (ओंकार बुक सेलर्स) यांच्याकडे मला कारंथांची 'तनमनाच्या भोवऱ्यात' ही कादंबरी मिळाली. कारंथ हे माझे आवडते लेखक. शरदचंद्रांसाठी बंगाली शिकावंसं वाटतं, तसं कारंथांसाठी कन्नड शिकावंसं वाटतं. 'तनमनाच्या भोवऱ्यात' वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की, यामधील देवदासी नायिका ही आज रूढ असणाऱ्या अर्थानं वेश्या नव्हती. ती एक स्वतंत्र  स्त्री होती. ती लग्नबंधनात अडकणारी नव्हती. तिच्यात रस असणाऱ्या पुरुषांना तिचं प्रियाराधन करावं लागे आणि त्यांच्या आराधनेचा तिनं स्वीकार केला तरच तिचं प्रेम मिळणं शक्य होई.

पश्चिम कर्नाटकाच्या पार्श्वभूमीवरील ही कादंबरी वाचल्यावर काही दिवस तरी मी तिच्याच धुंदीत होतो. मनात विचार कसे चालतात हे मोठं गूढ  आहे. कदाचित मला रणजित देसाई यांचा रविवर्मा आठवला असेल. ईशान्य भारतामधील मातृसत्ता आठवली असेल. जे घडलं असेल ते असेल, पण मी एका वरवर चमत्कारिक वाटणाऱ्या निष्कर्षापर्यंत  पोहचलो. माझा निष्कर्ष असा होता - जिथं सुपारी पिकते, तिथं स्त्रिया उच्चस्थानी असतात!

आता सुपारीचा आणि समाजामधील स्त्रियांच्या स्थानाचा काय संबंध? पण तसा तो आहे, यासाठी मला अजून काही आधार सापडले. माझी बायको देशस्थ. ती मला म्हणायची की, तुझी आई किंवा आजी जशा बोलतात, तसं माझी आई कधीच बोलत नाही. रोख माझ्या चित्पावनपणावर असायचा. पण चित्पावनांच्या स्त्रिया थेट ओसरीवर येऊन बोलतात असं मीदेखील ऐकलेलं होतं. शकुंतला परांजपे यांच्या एका लेखात त्यांच्या कोकणामधील आजीबद्दल वाचलेलं आठवलं. ओसरीवर येऊन बोलू शकणाऱ्या चित्पावन स्त्रियांचा नमुना म्हणावा अशीच ती आजी होती. माझे एक नातेवाईक होते. मुंबईला ते ज्या सोसायटीत राहत तेथील इतर रहिवाश्यांबरोबर त्यांचे काही वाद होते. त्याबद्दल बोलताना ते सांगत होते, "मी त्यांना म्हणालो बायकांचं ऐकायला मी काही सारस्वत नाही."

मी मनात म्हणालो, "चला सारस्वत स्त्रियादेखील संसारात वरचढ असतात तर!" सारस्वत गोव्याच्या अवतीभोवतीचे आणि चित्पावन मध्य कोकणामधले म्हणजे अजून उत्तरेकडले! म्हणजे मलबारपासून ते चिपळूणपर्यंत स्त्रियांचं स्थान घसरत येतं तर! आणि हा सगळा सुपारीचा प्रदेश! पुढे अजून एक गोष्ट समजली. गुवा म्हणजे ‘सुपारी’ आणि गुवाहाटी म्हणजे ‘सुपारीची  बाजारपेठ’. आता कामरूपात स्त्रीराज्य होतं, हे मच्छिंद्रनाथांच्या गोष्टीमुळे माहिती होतंच. माझ्या सुपारी सिद्धान्ताला अजून आधार मिळाला. 

चिं.  वि.  जोशी यांचा जाहिरातकलेवर एक मोठा गंमतीदार लेख  आहे- ‘पुराणकाली जाहिरात कला असती तर…’ त्यात दुर्योधनानं (पांडवांच्या अज्ञातवासात असण्याच्या काळात) त्या वेळच्या ‘हस्तिनापूर समाचार’ नावाच्या वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत पाच पांडवांचं मार्मिक वर्णन आहे, पण सर्वांत लक्षणीय वर्णन आहे ते द्रौपदीचं… 'काळसर वर्णाची एक जहांबाज स्त्री. ही क्रमांक एक  ते पाच यांना चापीत असते.' माझ्या दृष्टीनं चिंवि हे केवळ टवाळ विनोद करणारे लेखक नाहीत, तर अत्यंत कमी शब्दांत मर्म दाखवू शकणारे अतिशय भेदक नजरेचे लेखक आहेत. त्यांचं द्रौपदीचं वर्णन मला अतिशय वेगळं आणि लक्षणीय वाटलं.

रुडयार्ड किपलिंगची 'किम' नावाची एक प्रसिद्ध कादंबरी आहे. या कादंबरीचा नायक किम तिबेटी लामाबरोबर त्याचा चेला बनून भटकत भटकत शिमल्याच्या उत्तरेकडे पोहोचतो. तिथं धक्काबुक्कीचा एक प्रसंग ओढवतो आणि वृद्ध लामाला चालणं अशक्य होतं. उपचारांसाठी त्याला शिमल्याला नेणं आवश्यक होतं. या पुढील कथा फार लक्षात घेण्यासारखी आहे. जवळ जे गाव असतं, त्याला पाटील नसतो तर पाटलीण असते. लामाला डोलीत घालून नेणं आवश्यक असतं. पाटलीण त्याला मदत करायला तयार होते आणि ती आपल्या आठ नवऱ्यांना तसा हुकूम सोडते. आठ नवरे? आठच काय त्या गावातले सगळे पुरुष तिचे नवरे असतात. पण ती एवढ्या नवऱ्यांची बाईल असते याचा अर्थ मालकीण असते, असा आहे.

हिमालयात ट्रेकिंगाला जाणाऱ्या मित्रांकडून मी मलाना नावाच्या तिकडच्या गावाबद्दल ऐकलं होतं. तेथील लोक म्हणे स्वतःचा कौरवांशी संबंध सांगतात आणि त्यांच्यात बहुपतित्व प्रचलित आहे. किमची गोष्ट वाचल्यावर मला बहुपतित्वाचा खरा अर्थ लक्षात आला. अनेक पतींची स्त्री त्या सर्वांची दासी नसते, तर स्वामिनी असते. हे स्त्रीसत्ताक आहे. द्रौपदी पाच जणांची भोगदासी  नव्हती, तर स्वामिनी होती. कुंतीला मिळालेले वर ही नंतरची सारवासारव आहे. ती ज्या समाजामधील होती, त्या समाजामधील स्त्रियांना हव्या त्या पुरुषाकडून संतान प्राप्त करण्याचा अधिकारच असणार. चिंविंनी द्रौपदीचं सत्यस्वरूप किती अचूकपणे जाणलं!

या आकलनानंतर सुपारीच्या झाडापाशी अडकलेला माझा घोडा मोकळा झाला. भारतात स्त्रीसत्ताक असणारे तीन प्रदेश आता सापडले. पण हिमालयात काही सुपारी पिकत नाही. तेव्हा सुपारीशिवाय स्त्रीसत्ताक असू शकते तर!

या तीनही प्रदेशांमध्ये काय साम्य आहे?

या तीनही ठिकाणी पाऊस चांगला पडतो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे सदाहरित वनांचे डोंगराळ प्रदेश  आहेत. याचा अर्थ तिथं पावसाळी दिवस जास्त आहेत. डोंगर उतारांवर असणाऱ्या पोफळीच्या बागांबद्दल एका पुस्तकात वाचलं होतं. एकतर या बागा आहेत. याचा अर्थ त्यांची दरवर्षी काही नांगरणी, कुळवणी, पेरणी करायची नसते. पण या बागांमधील माती बदलावी लागते. त्यांना जंगलामधील काही झाडांच्या पाल्यांचं खत द्यावं लागतं. पण या दुर्गम प्रदेशात हे कसं करत असतील? बैलगाड्या चालण्यासारखी परिस्थिती नाही. माणसांच्या डोक्यांवर किंवा गाढवं, बैल  यांसारख्या भारवाहक पशूंच्या पाठीवरूनच ही ओझी वाहावी लागत असणार.

मी एकदा मनालीला ट्रेकसाठी गेलो होतो. तिथं जवळपास पातालसू नावाचं एक शिखर आहे. तिथं आम्हाला जायचं होतं. वाट लहान लहान खाचरांमधून, तालींवरून जात होती. आम्ही वर जात  असताना एक शेतकरीण आमच्या बरोबर होती. तिचं शेत वाटेतच होतं. आम्ही परतलो तेव्हा ती शेतकरीण पण डोक्यावर ओल्या गवताचा केवढा तरी मोठा भारा घेऊन परत निघाली होती. सकाळी झालेल्या ओळखीमुळे तिच्याशी थोड्या गप्पा झाल्या. गावापासून दूर डोंगरामधील तिचं  जाणं-येणं, तो भला थोरला गवताचा भारा बघून मला आश्चर्य वाटत होतं. तिच्याशी झालेल्या  गप्पांमधून मला हे  समजलं की, शेतीतली सर्व कामं तिकडे स्त्रियाच करतात. मग पुरुष काय करतात? "वो चरस पीते है और जुआं खेलते है." तिनं हे अगदी नैसर्गिक असल्याप्रमाणे सांगितलं. त्यावेळी मला अगदी धन्य वाटलं! पुरुष असून मी या दोन्ही गोष्टी करत नव्हतो. उलट रोज बँकेत जात होतो, काम करत होतो आणि पगार घरी आणून देत होतो.

पुढे मी खूप उतार असणारं एक माळरान घेतलं. तिथं सलग समपातळी ताली घातल्या. कामावर येणारे मजूर म्हणजे जवळपासचे शेतकरीच होते. त्यांनी आक्षेप घेतला. त्यांचं म्हणणं असं की, मी ताली फारच जवळजवळ घालायला सांगतो आहे. यामधून अरूंद पट्ट्या तयार होणार. मग त्यामध्ये औत कसं चालणार? बैल फिरायला तर जागा पाहिजे! आणि औत चाललं नाही तर सर्व  काही माणसांकडून करावं लागणार. आणि ते कसं परवडणार? मला मनाली जवळची लहान-लहान खाचरं आठवली. तिथंदेखील औत चालत नसणार.

आपल्याकडे औतकाठीची कामं पुरुष करतात. गुरं आली की, पुरुषांना महत्त्व येतं. स्त्रिया काही वेळा गुरं चारायचं काम करतात. धाराही काढतात. पण गुरं हे एकंदरीत पुरुषांचं डिपार्टमेंट. आणि बैल हे तर पुरुषांचंच डिपार्टमेंट. (याला एकच अपवाद मला आढळला. जेराल्ड ड्यूरेलची वन्य पशू पकडण्याच्या (प्राणिसंग्रहालयांसाठी) मोहिमांचं वर्णन करणारी पुस्तकं आहेत. त्यांपैकी एकामध्ये तो एका मुंगीखाऊला जेरबंद करतो, पण तो चांगला मोठा प्राणी आहे. त्याला उचलून न्यायचा कसा? तर एक बैल मागवायचा निर्णय होतो. आणि तो बैल एक पार्वती चौखूर उधळत घेऊन येते. आपल्याकडील शिल्पांमध्ये नंदीवर बसलेल्या पार्वत्या आहेत. पण त्या कशा शालीनपणे स्कूटरवर दोनही पाय एका बाजूला सोडून महादेवामागे बसलेल्या आहेत. ड्यूरेलला भेटलेली पार्वती दोन बाजूंना पाय सोडून नंदीला उधळीत घेऊन येणारी आहे!

सांगायचा मुद्दा असा की, स्त्रिया बैलांच्या वाटेला जात नाहीत. जिथं बैल आवश्यक पडतात तिथं शेतीतली पुरुषांची भूमिका महत्त्वाची ठरते. बैल कुठे आवश्यक पडतात? का आवश्यक पडतात? डोंगराळ भागात जास्त पावसाळी दिवस असणाऱ्या सदाहरित प्रदेशांत त्यांचा फारसा उपयोग  नाही. जरुरी नाही. आणि सदाहरित वनांचा डोंगराळ प्रदेश हा बैल किंवा घोड्यांचा अधिवासही नाही. हे प्राणी गवताळ प्रदेशामधले!

उत्तर आणि दक्षिण अमेरिकेची गोष्ट अजूनच वेगळी. या नव्या जगात खेचकाम करू शकतील असे  प्राणीच नव्हते. या दोनही खंडांमध्ये गवताळ प्रदेश आहेत, पण बैल, घोडे, उंट, हत्ती यांपैकी काहीच नव्हतं. युरोपियन लोकांनी तिथं घोडे आणले. तोपर्यंत नांगराच्या साहाय्यानं होणारी शेती तिथं सुरूच होऊ शकली नाही. मूठभर स्पॅनिश लोकांनी इंकांवर जो विजय मिळवला, त्यामागे त्यांचे घोडेस्वार हे महत्त्वाचं कारण होतं. रमेशचंद्र दत्त यांनी ‘Economic History of India’ या त्यांच्या पुस्तकात छोटा नागपूर पठारावरील म्हणजे रांचीच्या जवळपासच्या प्रदेशामधील आदिवासींच्या शेत तयार न करता करण्याच्या शेतीचं वर्णन दिलं आहे. त्यामध्ये अणकुचीदार हत्यारानं जमिनीत दोनेक इंचांपर्यंत खोल भोकं पाडतात आणि त्यात चार-पाच प्रकारच्या बिया टाकून देतात. पीक येईल तसं येईल. नंतर गोळा करायला जायचं. लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे याही परिसरात पावसाळी दिवस जास्त असतात.

उत्तर अमेरिकेमधील पूर्व किनाऱ्यावरील रेड इंडियन लोकांची पद्धत अजून पुढची म्हणावी लागेल. किनाऱ्याजवळील असल्यानं त्यांना माशांचा कुट्टा उपलब्ध असे. हा कुट्टा पिक जोमानं वाढण्यासाठी उपयुक्त आहे, याची त्यांना जाणीव होती. बुचुक बुचुक मासळी खत ठायी ठायी सोडून त्यांवर ते मातीचे छोटे छोटे ढीग रचत आणि त्यामध्ये मका, विविध प्रकारचे भोपळे, विविध घेवडे यांच्या बिया खोचून देत. त्यांची बिन औताची शेती अशी होती! अमेरिकेचा पूर्व किनारादेखील पाऊस पाण्याच्या दृष्टीनं चांगला आहे. बैल आणि औत का लागतात? मी स्वतः शेती करायला लागल्यावर याचा उलगडा होऊ लागला. शेती म्हणजे आपल्याला आवश्यक वनस्पतींच्या बिया मातीखाली गाडणं. पण तण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आगंतुक वनस्पती आपल्या पिकांना काही सुखानं जगू देत नाहीत.

दुसरी गुंतागुंत होते ती पाण्याच्या आवश्यकतेमुळे. आपली पिकं निवडली गेली आहेत, त्यामागे त्यांचं पोषणमूल्य हा एक निकष आहे. दाणे गोळा करणं सोयीस्कर असणं हा अजून एक महत्त्वाचा  निकष आहे. तणं उत्क्रांत झाली आहेत ती तग धरून राहण्याच्या निकषावर. त्यामुळे होतं काय की, पावसाच्या हेलकाव्यांचा तणांवर फार प्रतिकूल परिणाम होत नाही. पण आपल्या पिकांवर होतो. पाऊस जिथं कमी दिवस पडतो, त्या प्रदेशात मधे मधे मोठे खंड पडतात, त्या वेळी पिकं फारच मार  खाऊ शकतात. यावर इलाज काय? एक म्हणजे खोलवर माती असणाऱ्या जमिनीत शेती करायची. नांगरट करून त्या जमिनीत पाण्याचा साठा करायचा. जमिनीत कुळव चालवून म्हणजे पाळ्या घालून उगवलेल्या तणाचा नाश करायचा.

जमिनीत फार ओल असताना काम करता येत नाही. ओल्या जमिनीत हत्यार घातलं तर गच्च चिखल होतो आणि औत ओढणं फार कठीण जातं. म्हणून जमीन थोडी हडकू द्यावी लागते. पण हडकत असते म्हणजे ओल उडून जात असते. तेदेखील टाळायला पाहिजे. म्हणून जमिनीत औत  घालण्याइतपत जमीन हडकली की, पेरण्याचं काम त्वरेनं करावं लागतं. वरून पडणाऱ्या पावसाचा फायदा घ्यायचा असेल तर वेळ साधणं फार महत्त्वाचं आहे. अल्प वेळात तणाचा नाश आणि पेरणी ही दोनही कामं उरकायची असतात. स्वाभाविकपणे त्यासाठी अतिरिक्त ऊर्जा आवश्यक  ठरते. पाऊस वारंवार पडत असेल तर हलक्या वरकस जमिनीतदेखील पिकं घेता येतील. आणि पेरण्याचा वेग कमी असला तरी जमिनीत ओल टिकल्यानं, पेरलेलं उगवतं. पावसाळी दिवस जास्त असणाऱ्या, हलक्या जमिनी असणाऱ्या, डोंगराळ भागांत बिगर औत शेती शक्य आहे. बैल आणि औतं असली तर फायदा होईल, पण नसले तरी सर्व काही बुडणार नाही.

मला हे सर्व माझ्या शेती करण्याच्या अनुभवाशिवाय उमगलं नसतं. त्यामुळे जिथं बैल, घोडे अत्यावश्यक तिथं (स्त्रिया हे प्राणी परंपरेनं हाताळत नाहीत म्हणून असेल) स्त्रियांचं स्थान दुय्यम  असणं क्रमप्राप्त. या उलट जिथं बैल आणि औतांशिवाय चालू शकतं, तिथं स्त्रियांचं स्थान वरचढ  असू शकतं, नव्हे असतं असं दिसतं.

‘तारास बल्बा’ ही कझाक या रशियन गवताळ प्रदेशामधील लोकांमध्ये घडणारी कादंबरी आहे. या कादंबरीवरून असं दिसतं की, कझाकांमध्ये स्त्रियांना अजिबातच महत्त्व नाही. त्या अगदी कःपदार्थ आहेत. बैल-घोड्यांची जागा ट्रॅक्टरनं घेतली किंवा शेतीमध्ये अजून पुढचं यांत्रिकीकरण  झालं किंवा काळाच्या रेट्याखाली स्त्रियांनी हे खेचकाम करणारे पशू हाताळण्याबद्दलचे निर्बंध झुगारले गेले, तर पुरुषांची मक्तेदारी संपेल. संस्कारांमधून निर्माण होणाऱ्या प्रवृत्ती टिकून राहण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांचे दिवस भरलेले असल्यानं शेवटी नष्ट होतील.

सुपारीपासून सुरू झालेला माझा प्रवास आता इथपर्यंत पोहोचला आहे. या सर्व काळात (हा काही  वर्षांचा प्रवास आहे) मी काही तोंड मिटून बसलो नव्हतो. आपलं कंटाळलेपण चर्येवर न दाखवणाऱ्या सहृदयी मित्रांना मी पकवत होतोच. मग आत्ता मी हे लिहून का काढलं? कारण या प्रवासात माझी नुकतीच डी. डी. कोसंबी यांच्याशी गाठ पडली. कोसंबी यांच्या ‘An Introduction to the Study of Indian History’ या पुस्तकामधील एक उतारा नुकताच वाचनात आला. तो असा – “Matriarchal instititions still survive in those parts of the country that took last to the plough economy, e.g. Travancore- Cochin and among some tribesmen… The change to male dominance came only when the social property of men developed. Generally this meant cattle, which were first herded for meat, later for milk products and skins (soon used in exchange); finally used as a source of power in agriculture and transport. During this process people began to live more and more efficiently at the expence of their environment; man first produced a greater surplus by his labour than was necessary to support the individual producer himself. Thus patriarchy, individual property, class division became possible, though not always inevitable.”

कोसंबी सरळ जिथं पोचले, तिथं मी बरीच भटकंती करून का होईना पोहोचलो, हे माझ्या लक्षात आलं. जेव्हा हे लक्षात आलं, तेव्हा मला खूप आनंद झाला. आपण अगदीच काहीतरी विचार करत नव्हतो, असा दिलासा मिळाला. हुरूप वाढला…आणि त्या भरात हे लिहिलं गेलं!

.............................................................................................................................................

लेखक निवृत्त बँक कर्मचारी आहेत.

gole_hemant@yahoo.co.in

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Pramod Bhawalkar

Fri , 08 September 2017

Dear Hemant ji, Read your article. Excellent journey to a conclusion.. The deja vu at the end us always exhilarating. Thank you Pramod Bhawalkar


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......