आमच्याविषयी…

‘अक्षरनामा’ हे राजकारणापासून समाजकारणापर्यंत, साहित्यापासून संस्कृतीपर्यंत, नाटकांपासून सिनेमांपर्यंत, पुस्तकांपासून ई-बुकपर्यंत, लेखकांपासून अभिनेत्यांपर्यंत, अर्थकारणापासून अनर्थकारणापर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, लोकलपासून ग्लोबलपर्यंत, फटाक्यांपासून धमाक्यांपर्यंत, फॅशनपासून पॅशनपर्यंत… प्रत्येक विषयाची घटना, वास्तव आणि सत्य या निकषांवर मांडणी करणारं मराठीतलं पहिलंवहिलं ऑनलाइन फीचर्स पोर्टल आहे.

प्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या शब्दांचा आधार घेत असं म्हणता येईल की, मतभेदांवर आमचा प्रामाणिक विश्वास आहे. अनेक माणसं नाइलाज म्हणून मतभेद सहन करतात, आमचं तसं नाही. आमच्यापेक्षा भिन्न भूमिकांविषयीही आम्हाला आस्था आहे. कारण वेगवेगळ्या बाजू मिळूनच कोणताही विचार पूर्णत्वाला जात असतो, ही आमची श्रद्धा आहे. त्यामुळे ‘अक्षरनामा’वर नेहमीच मतभेदांचं स्वागत केलं जाईल, फक्त त्यामागे सद्हेतू असावा; व्यक्ती, संस्था, पक्ष, वैयक्तिक आवडीनिवडीपेक्षा व्यापक समाजहित असावं. आधुनिक जगात सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूल्यांवर भारतीय राज्यघटना उभी आहे. या मूल्यांचं आपल्या परीनं रक्षण करणं हे ‘अक्षरनामा’चंही धोरण असेल.

आज आपल्यावर अनेक गोष्टी सातत्यानं येऊन आदळत आहेत. माहितीचा महापूर सतत या ना त्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे. त्यामुळे अनेकदा आपली अवस्था भर कोलाहलाच्या मधोमध उभी असल्यासारखी होते. त्यामुळे या सर्वांकडे कसं पाहावं, त्यातून काय घ्यावं आणि काय नाही, याचा दृष्टिकोन देण्याचं काम हा ‘अक्षरनामा’चा उद्देश आहे.

‘अक्षरनामा’मध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आम्हाला त्यांच्या सूचना आवर्जून कळवाव्यात. प्रत्येक माध्यमाची काही सामर्थ्यं असतात, तशा काही मर्यादाही असतात. परंतु त्या मर्यादांवर मात करत स्वत:ची आणि आपल्या वाचकांची अभिरुची जोपासण्याचा आमचा प्रयत्न असेल. अर्थात, हे आव्हान आमची संपादकीय टीम महाराष्ट्रातल्या, देशातल्या आणि देशाबाहेरच्या मान्यवर लेखकांच्या बळावरच पेलू शकणार आहे. कारण कुठल्याही माध्यमाचा कस हा त्यासाठी लेखन करणाऱ्या लेखकांवरच अवलंबून असतो.

कळावे. लोभ असावा.

- राम जगताप, संपादक, अक्षरनामा
ई-मेल - editor@aksharnama.com

अक्षरनामा च्या न्यूजलेटर चे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख