‘स्त्रीची पत्रं’ : प्रेमाशिवाय, चैतन्याशिवाय जगणाऱ्या हजारो स्त्रियांची कथा
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘स्त्रीची पत्रं’ या नाटकातील एक प्रसंग
  • Sat , 19 August 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe स्त्रीची पत्रं Her Letters

गुरूदेव रवींद्रनाथ टागोर (१८६१-१९४१) यांना १९१३साली जागतिक पातळीवरील मानाचा समजला जाणारा नोबेल हा पुरस्कार मिळाला. टागोरांना कवी म्हणून ओळखलं जात असलं तरी त्यांनी अनेक नाटकं लिहिली. प्रसंगी नाटकांतून भूमिकाही केल्या. एवढंच नव्हे तर त्यांच्या अनेक कथांवरही नाटकं सादर झाली आहेत. ‘स्त्रीची पत्रं’ (‘हर लेटर्स’) टागोरांची अशीच एक लघुकथा. त्यावर आधारित याच नावाचा सुमारे तासभर चालणारा नाट्यप्रयोग अलिकडेच बघण्याचा योग आला.

‘स्त्रीची पत्रं’ ही कथा टागोरांनी १९१४ साली लिहिली. म्हणजे शंभर वर्षांहून जास्त काळापूर्वी. असं असूनही हा प्रयोग बघताना आपण आजचं वास्तव बघत आहोत, ही भावना निर्माण होते.

‘स्त्रीची पत्रं’चा प्रयोग ‘किस्सा कोठी’ या वेगळ्या नावाच्या नाट्यसंस्थेनं सादर केला. या नाट्यसंस्थेद्वारे सादर करण्यात आलेलं हे पहिलंच नाटक. त्याचं दिग्दर्शन शर्मिष्ठा साहा या तरुण रंगकर्मीनं केलं आहे. शर्मिष्ठानं नाट्यशास्त्राचं अधिकृत प्रशिक्षण दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून घेतलं असून नंतर तिला जर्मनीला जाऊन नाट्यशास्त्राचं शिक्षण घेण्याची संधी मिळाली. ‘स्त्रीची पत्रं’ या नाटकात शर्मिष्ठाची दिग्दर्शक म्हणून शक्तीस्थानं प्रकट झाली आहेत. कथेचं नाट्यरूपांतरही तिनंच केलं आहे. यात हिंदी भाषांतराच्या संदर्भात शर्मिष्ठाला लता एस. सिंग या तरुण रंगकर्मीची मदत झाली आहे.

मृणाल ही विवाहित स्त्री असते. तिचं लग्न होऊन तब्बल १५ वर्षं झालेली असतात. लग्न झालं तेव्हा ती फक्त १२ वर्षांची असते. मृणाल तिच्या नवऱ्याची दुसरी बायको असते. त्या काळच्या प्रथेप्रमाणे हा सर्व राजीखुशीचा मामला असतो. त्यात लपवाछपवी, फसवाफसवी वगैरे काही नसतं. विवाहानंतर मृणालसारखी ग्रामीण भागातील मुलगी कलकत्ता शहरात येते. मृणाल जशी सुंदर असते, तशीच बुद्धिमानही. तिला लहानपणीच जाणवतं की, तिच्या बुद्धिमत्तेचा इतरांना, खास करून पुरुषांना फार त्रास होतो. तिची आई तर उघडपणे म्हणत असे की, बाईच्या जातीला हुशारी असूच नये. मृणाल कोणाला न कळू देता कविताही करत असते. या संदर्भात मृणाल लिहिते की, ‘तुम्हा सर्वांना माहिती नसलेलं एक वेगळं स्वातंत्र्य मी तुम्हा मंडळींच्या नकळत उपभोगत होते आणि ते म्हणजे कवितांच्या जगात रमण्याचं.’ हे सर्व मृणालच्या पत्रांतून प्रेक्षकांना समजतं.

आता २७ वर्षांची मृणाल यात्रा करत असते. ती जगन्नाथपुरीहून नवऱ्याला पत्रं लिहिते. या पत्रांतून ती त्यांच्या १५ वर्षांच्या वैवाहिक जीवनावर प्रकाश टाकते. तो खरा नाटकाचा विषय आहे. एक विवाहित स्त्री स्वतःच्या वैवाहिक जीवनाकडे तटस्थपणे बघते, या विषयावर १९१४ साली कथा लिहिणं, यातून टागोरांचं लेखक म्हणून मोठेपण जाणवतं.

एका पत्रात मृणाल लिहिते की, ती जेव्हा लग्न करून कलकत्त्याच्या मोठया वाड्यात आली, तेव्हा तिला वाडाच्या कोपऱ्यातल्या गोठ्यातील दोन गायी व तीन बछड्यांचं प्रेम मिळालं. तुमच्या घरांत जुनी झाल्यावर मी जेव्हा गायींची खास काळजी घेऊ लागले, त्याबद्दल मला फार जळजळीत टोमणे ऐकावे लागेल. हिची जात कोणती नक्की? आपल्यापैकीच आहे ना? की आहे एखाद्या गवळ्याची? वगैरे.

मृणालच्या पत्रांतून प्रेक्षकांना समजतं की, तिला एक मुलगी झाली होती, पण ती जगली नाही. मृणाल लिहिते, मला देवानं आर्इ केलं, पण आर्इपण उपभोगू दिलं नाही. या संदर्भात मृणाल लिहिते, जो युरोपियन डॉक्टर माझं बाळंतपण करायला बोलावला होता, तो बाळंतिणीची खोली बघून फार चिडला. सर्वत्र अंधार, कुबट वास वगैरे म्हणजे कोणत्याही मोठ्या वाड्यात, त्या काळात असलेली बाळंतिणीची खोली. इथं टागोरांतला जातिवंत लेखक या खोलीला ‘उत्तमपैकी विणलेला गालिचा’ अशी उपमा देतो. अशा वाड्यातील पाहुण्यांची उठबस करण्यासाठी असलेले वाडे म्हणजे गालिचाची दर्शनी बाजू आणि इतर खोल्या म्हणजे गालिचाची मागची बाजू.

मृणालच्या या यात्रेत नवरा तिच्याबरोबर नसतो, हेही एका प्रकारे प्रतीकात्मक ठरतं. कारण ती विवाहित असून एका प्रकारे अविवाहितच असते… त्या काळातील बहुतेक स्त्रियांसारखी. या यात्रेवर असताना तिला तिच्या सर्वच नातेसंबंधांचा पुनर्विचार करण्याची संधी मिळते. मृणाल लिहिते, मुलीच्या मृत्यूनंतर तिचं जीवन थिजलं होतं. काहीही घडत नव्हतं. ती गायी-वासरांच्या सहवासात राहत होती. पण देवानंच एक जीवन तिच्या आयुष्यात पाठवलं. तिच्या मोठ्या जाव्याची बहीण बिंदू त्यांच्याबरोबर राहायला येते. आर्इच्या मृत्युनंतर बिंदूल़ा तिचे भाऊ त्रास द्यायला सुरुवात करतात.

बिंदूचं त्यांच्या घरात राहणं कोणालाच मंजूर नसतं. पण मृणाल ठरवते की, या आधार नसलेल्या तरुण मुलीला आपण आधार द्यायचा. सुमारे १४ वर्षं वय असलेली बिंदू सौंदर्याबाबत यथातथाच होती. मृणाल बिंदूला स्वतःच्या खोलीत घेऊन येते.

यामुळे बिंदूच्या मनात मृणालबद्दल कमालीची कृतज्ञता निर्माण होते. ती जवळजवळ मृणालच्या प्रेमात पडते. मृणाल लिहिते, गेली अनेक वर्षं मी विसरूनच गेले होते की, मी सुंदर आहे. बिंदूमुळे या भावना पुन्हा जागृत झाल्या. तिला माझे केस फार आवडत. मी जर वेणी घातली तर तिला राग येर्इ, कारण तिला मग माझ्या केसांशी खेळायला मिळत नसे. ती रोज मला नटवत, सजवत असे. मात्र मृणाल व बिंदू या दोन निर्जीवपणे जगत असलेल्या स्त्रियांमध्ये लैंगिक संबंध असतात का? कथाकार टागोर याचं ठोस उत्तर देत नाहीत.

या नाटकात शर्मिष्ठानं व्हर्जिनिया वुल्फ व अमृता प्रितम यांच्यासारख्या स्त्रीवादी लेखिकांच्या लेखनाचा भरपीर वापर केला आहे. परिणामी ही फक्त मृणालची कथा न राहता, त्या काळी (व आजही) प्रेमाशिवाय, चैतन्याशिवाय जगणाऱ्या हजारो स्त्रियांची कथा होते.

या नाटकाचा प्रयोग वर्सोवा येथील एका छोट्या हॉलमध्ये झाला. अशा नाटकांसाठी असे छोटे हॉल आदर्श असतात. नाटकात लता एस. सिंग (मृणाल) व भारती फेरवानी (बिंदू) या दोन तरुणींच्या भूमिका आहेत. दोघींनी आपापल्या भूमिका समरसून केल्या आहेत. एकूणात प्रयोग छान झाला. यात दिग्दर्शक शर्मिष्ठा साहाचं मोठं योगदान आहे. त्यांनी सुमारे शंभर वर्षापूर्वीचा बंगाल त्या रंगमंचाच्या चिमुकल्या अवकाशात व्यवस्थित उभा केला होता. रंगमंचाच्या एका कोपऱ्यात तुळशी वृंदावन ठेवलं होतं, वर मोठे दिवे होते. पात्रांचे पोशाख महाग दिसत होते. त्यांच्या अंगावर बंगाली पद्धतीचे महागडे दागिने होते. याचं श्रेय मौलिक पांडे यांचं. या सर्वांमुळे कलकत्ता शहरात राहणाऱ्या श्रीमंत कुटुंबाचं वातावरण सहज उभं राहिलं. दोन्ही स्त्री पात्रांनी लाल रंगाच्या पण महागड्या साड्या परिधान केलेल्या होत्या. नाटकाचा आशय धारदार करण्यासाठी लाल रंगाचा मुक्तपणे वापर केला होता.

 

त्या रंगमंचाच्या छोट्याशा जागेत प्रकाशयोजना शर्मिष्ठा व मोहम्मद फैझल योग्य प्रकारे सांभाळत होते. यामुळे प्रसंग बदलाचं सूचन प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचत होतं. पार्श्वसंगीतासाठी रवींद्र संगीताचा वापर केला होता, ज्याची जबाबदारी ‘स्मरण’ या वादवृंदानं सांभाळली होती.

चांगला नाट्यानुभव येण्यासाठी नाटकातील सर्व घटकं योग्य प्रमाणात वापरले पाहिजेत, असं हे नाटक बघताना जाणवत होतं. नेपथ्यरचना, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, अभिनय आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शन. हे सर्वच घटक योग्य प्रकारे वापरल्यामुळे हा प्रयोग रंगला.

दुसरं आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे नाटकाचा आशय. अगदी आजही स्त्रीच्या संदर्भात विवाह ही मोठी घटना असते. विवाहानंतर तिचा सासरी प्रवेश होतो. आजसुद्धा यात फार फरक पडलेला दिसत नाही. परिणामी मृणालची घुसमट विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वावरत असलेल्या स्त्रीची राहत नसून एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला वावरत असलेल्या स्त्रीचीही होते. त्या अर्थानं ‘स्त्रीची पत्रं’चा आशय कालातीत आहे. हे समाज सुधारकांचं अपयश मानायचं का?                                 

लेखक मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......