पुतिन नावाच्या हुकूमशहाची (कु)कर्मकथा!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
संकल्प गुर्जर
  • ‘पुतिन : महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि रशियाचे सध्याचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन
  • Fri , 30 June 2017
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस Shifaras व्लादिमिर पुतिन Vladimir Putin पुतिन Putin गिरीश कुबेर Girish Kuber राजहंस प्रकाशन Rajhans Prakashan संकल्प गुर्जर Sankalp Gurjar

दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांची तेल आणि पश्चिम आशियाचे राजकारण या विषयावरील पुस्तकं मराठी वाचकांना माहीत आहेतच. याच रांगेत बसू शकेल असं नवं पुस्तक कुबेर यांनी लिहिलं आहे. रशियाचे सध्याचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा उदय आणि त्यांचं कर्तृत्व हा या पुस्तकाचा विषय आहे. कुबेर यांच्या या २६० पानी पुस्तकात एकूण १६ प्रकरणं आहेत. पुस्तकातील मजकुराचे तीन विभाग स्पष्ट दिसतात. पहिल्या साठेक पानांत कुबेर रशियन इतिहासाचं समालोचन करतात. त्यात मुख्यतः शीतयुद्धावर आणि साम्यवादी रशियावर थोडा अधिक भर दिलेला आहे. त्यानंतरची शंभरेक पानं ही सोव्हिएत रशियाचा अस्त आणि पुतिन यांचा उदय या विषयावर आहेत. तर शेवटची शंभर पानं थेट पुतिन यांची गेल्या सतरा वर्षांची कारकीर्द आणि एकूण कर्तबगारी यावर आहेत.       

हे पुस्तक पाहून असा कोणालाही प्रश्न पडू शकतो की, मुळात पुतिन यांच्यासारख्या व्यक्तीवर पुस्तक लिहावं असं त्यांचं नेमकं कर्तृत्व तरी काय आहे? किंवा क्रूरपणा आणि हुकूमशाही यासाठीच ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीमध्ये असं वेगळं काय आहे, ज्यामुळे ते जगभरात चर्चेचा विषय बनतात? जर विशेष आकर्षक असं नाही, फार वेगळं असं कर्तृत्व नाही आणि लोकशाही मूल्यांवर ज्याची श्रद्धा नाही, अशा व्यक्तीला आपण का समजून घ्यावं? आजच्या राजकीय संदर्भात पुतिन का महत्त्वाचे आहेत? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं पुस्तकात मिळू शकतात.

पुतिन हे गेली सतरा वर्षं रशियावर निरंकुश सत्ता गाजवत आहेत. आधी ते आठ वर्षं देशाचे अध्यक्ष होते. त्यानंतर चार वर्षं पंतप्रधान राहिले आणि त्यांनी आपल्या एका सहकाऱ्याला अध्यक्ष केलं. त्यानंतर घटना दुरुस्ती करून ते पुन्हा अध्यक्ष झाले आहेत आणि अशी एक शक्यता आहे की, ते २०२४ पर्यंत अध्यक्षपदी राहतील. सलग चोवीस वर्षं रशियासारख्या अवाढव्य देशावर सत्ता गाजवायला मिळणं याचा अर्थ असा की, स्टालिन (सत्तेचा काळ : १९२३-५३) वगळता आधुनिक इतिहासात कोणीही राज्यकर्ता इतक्या दीर्घ काळ त्या सामर्थ्यवान देशावर सत्ता गाजवू शकलेला नाही. सोव्हिएत रशियाला मुक्तपणा आणि पुनर्रचना यांच्या वाटेनं नेणारे शेवटचे अध्यक्ष गोर्बाचेव्ह (सत्तेचा काळ : १९८५ ते १९९१) यांच्या पाठोपाठ आंतरराष्ट्रीय राजकारणावर इतका प्रभाव कोणत्याही रशियन नेत्याला टाकता आलेला नाही.

पुतिन हे लोकशाही मार्गानं निवडून आलेले असले तरी त्यांचा लोकशाहीवर अजिबात विश्वास नाही. पुस्तकात कुबेर दाखवून देतात की, पुतिन यांनी कसं आपल्या विरोधी पक्षीय नेत्यांना सभा घेता येणार नाहीत, मतं मिळणार नाहीत यासाठी प्रयत्न केले. तसेच पुतिन यांचं दमनचक्र केवळ विरोधी पक्षीय राजकीय नेत्यांवरच फिरलं असं नव्हे. प्रभावशाली उद्योगपती, धाडसी पत्रकार, स्वयंसेवी संस्था, सत्ताधारी वर्तुळातील विरोधक अशा सर्व स्तरांत पुतिन यांनी आपली दहशत प्रस्थापित केली. आपल्या विरोधातला आवाज बंद पडेल अशी व्यवस्था केली, सत्तेचं केंद्रीकरण केलं आणि आपली सत्ता निर्धोक राहील याची काळजी घेतली आहे.     

मध्ययुगातील राजेशाही आणि विसाव्या शतकातील कम्युनिस्ट सत्ता (१९१७ ते १९९१) अशा दोन्ही राजवटींत म्हणजे रशियाच्या हजार वर्षांच्या इतिहासात लोकशाही, स्वातंत्र्य आणि मानवी मूल्यांना फारसं महत्त्व कधीच नव्हतं. असा हा रशिया सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर जेव्हा लोकशाहीची वाटचाल करू लागला, तेव्हा साहजिकच अडचणी निर्माण झाल्या. संस्थात्मक जाळं नसणं, उच्चपदस्थ व्यक्ती आणि राजकीय नेते यांचा अफाट भ्रष्टाचार आणि खालावलेली आर्थिक –राजकीय स्थिती यांच्या वेदना नव्वदीच्या दशकात रशियाने अनुभवल्या. याच काळात पुतिन यांनी ऐतिहासिक सेण्ट पीटर्सबर्ग शहराचे उपमहापौर ते भावी अध्यक्ष असा प्रवास अवघ्या दहा वर्षांत केला.

पुतिन यांची कार्यशैली, पडद्याआड राहून कामं करण्याचं कौशल्य, सामर्थ्यवान मित्र, स्वभावातील थंडपणा आणि गुप्तहेर खात्याचा अनुभव अशा गोष्टी त्यांच्या बाजूनं होत्या. पुतिन यांनी सत्तेच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी काय खटपटी केल्या, कसं त्यांनी स्वतःला मोक्याच्या जागी व्यवस्थितपणे नेऊन ठेवलं, आपल्याला असलेला विरोध कसा संपवला आणि तत्कालीन अध्यक्ष येल्त्सिन यांच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण केला, याची रोचक कहाणी या पुस्तकात आलेली आहे.

पुतिन यांच्या कर्तबगारीविषयी लिहायचं तर ती देशांतर्गत आणि परराष्ट्रीय अशा दोन पातळ्यांवर पाहावी लागते. कुबेर नोंदवतात की, जरी पुतिन यांनी देशातील लोकशाही, माध्यमं आणि विरोधी पक्ष यांचा गळा घोटलेला असला तरी देशातील सर्वसामान्य जनतेत त्यांची लोकप्रियता शिल्लक आहे. सुरुवातीच्या काळात तर ती सतत वाढतच गेली होती. रशिया हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे. पुतिन यांचा उदय झाला त्याच काळात तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत वाढ होत गेली. त्याचा फायदा रशियन जनतेला झाला. पुतिन यांनी कररचना सोपी केली, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन दिलं आणि एकूण देशाची आर्थिक स्थिती सुधारली. एका बाजूला आर्थिक परिस्थिती सुधारत नेतानाच पुतिन यांनी देशातील संघराज्यात्मक पद्धतीत आपलं पूर्ण वर्चस्व निर्माण केलं. स्वतःच्या हाती जास्तीत जास्त अधिकार केंद्रित केले, इतरांचे अधिकार कमी केले आणि व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही निर्माण केली. जिथं कुठे विरोध तयार होत आहे, असं वाटलं तिथं तो वाढू देण्याआधी नष्ट होईल अशी व्यवस्था केली. 

कुबेर लिहितात, पुतिन यांचं हे सत्तेचं केंद्रीकरण इतकं जास्त आहे की, पूर्वीच्या कम्युनिस्ट पद्धतीतील सत्ता विकेंद्रित होती असं म्हणावं लागतं. कारण तिथं पॉलिट ब्युरोकडे सत्ता होती. इथं सत्ता पुतिन या एका व्यक्तीकडे आहे. पुतिन यांना सत्तेची रचना उभी असायला हवी असं वाटतं, ज्यामध्ये खालून वर जाऊ तसे अधिकार वाढत जातील. तसेच सत्ता विविध केंद्रांमध्ये आणि भौगोलिक घटकांत विभागली न जाता केंद्राकडे एकवटली जाईल, अशी व्यवस्था पुतिन यांनी रशियात तयार केली आहे.    

परराष्ट्रीय आघाडीवर पुतिन यांनी रशियाची प्रतिमा सुधारली. त्यांना असं वाटतं की, सोव्हिएत रशियाचं विघटन ही विसाव्या शतकातील सर्वांत अनर्थकारी घटना होती. पुतिन सत्तेत आले तेव्हा इतिहासातील महासत्ता असलेला हा देश वर्तमान आंतरारष्ट्रीय राजकारणात स्वतःची ओळख हरवून बसलेला होता. अमेरिकेच्या वर्चस्वाखाली असलेल्या जगात रशियाला काही स्थानच उरलं नाही असा समज जगाचा झाला होता. पुतिन यांनी ती हरवलेली ओळख रशियाला परत मिळवून दिली. कुबेर दाखवून देतात की, अमेरिका विरोधी राजकारण करणाऱ्या नेत्यांशी पुतिन यांनी जुळवून घेतलं. त्यामध्ये इराण, ब्राझील, व्हेनेझुएला अशा देशांचा समावेश होता. 

तसंच पुतिन यांनी शेजारीच असलेल्या जॉर्जिया (२००८) आणि युक्रेन (२०१४) मध्ये लष्करी हस्तक्षेप करून या पूर्वीच्या सोव्हिएत प्रभावाखाली असलेल्या प्रदेशावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. पश्चिम आशियात गेली सहा वर्षं रशिया सिरियाच्या बाजूनं ठामपणे उभा आहे. गेल्या दीड वर्षांपासून तर रशिया तिथं थेट लष्करी हस्तक्षेप करत आहे. परराष्ट्र आणि संरक्षण यांच्या बाबतीत रशियन लष्कर आणि राजकीय नेते कायम आक्रमक का असतात, याचं उत्तर देताना कुबेर रशियाच्या भूगोलाकडे लक्ष वेधतात. रशियाच्या पश्चिमेला आणि दक्षिणेला नैसर्गिक सीमा नसल्यानं जर सतत विस्तार नाही झाला, तर परकीय हल्ल्यांमुळे देश आकुंचन पावू शकतो, अशी मानसिकता रशियाची तयार झालेली आहे. त्याचा परिणाम रशियन धोरणांवर पडतो. पुतिन हेही त्याला अपवाद नाहीतच. 

पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशियाने गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप केला. आता सहा महिने झाले तरी नव्या अमेरिकी सरकारला हा रशियन हस्तक्षेप आणि अध्यक्ष ट्रम्प यांचं रशियाप्रेम यांचे कोडं अजून उलगडत नाही. कुबेर लिहितात की, अमेरिकी प्रशासनाने रशियाच्या या हस्तक्षेपाकडे सुरुवातीला फार गांभीर्यानं पाहिलं नाही. ते असंही दाखवून देतात की, बदलत्या आंतरराष्ट्रीय वातावरणात रशियावर हेरगिरी करण्यासाठी अमेरिका पूर्वीइतका खर्च करत नाही. त्याचाही फटका अमेरिकेला बसला. रशियाचा हा हस्तक्षेप केवळ अमेरिकेपुरता मर्यादित नाही. त्यांनी जर्मनीत (आणि युरोपातील इतर देशांत) सुद्धा असंच करण्याचा प्रयत्न केला आहे. कुबेर लिहितात की, रशिया टीव्ही नावाची रशियन सरकारची वृत्तवाहिनी जगभर प्रसारित होते. त्यातूनही अमेरिकाद्वेष पेरला जातो आणि रशियाच्या भूमिकेचा प्रचार केला जातो. त्यामुळे आंतराराष्ट्रीय राजकारणात एका बाजूला अमेरिकेचा प्रभाव कमी करणं आणि रशियाचा प्रभाव वाढवणं, या दिशेनं पुतिन कायमच पावलं टाकत असताना दिसतात. 

कुबेर हाडाचे पत्रकार आहेत आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय पत्रकारितेच्या जगाशी संबंध आलेला आहे. त्यामुळे पुतिन यांच्या रशियाने धडाडीच्या पत्रकारांना दिलेली वागणूक यावर त्यांनी आस्थेनं लिहिलं आहे. रशियाने चेचेन्या या फुटीरतावादी प्रदेशात लष्करी कारवाया केल्या. देशभरात इतरत्र काही हल्ले, काही कारवाया झाल्या होत्या. जिथं एका शाळेतील मुलांना ओलीस ठेवलेलं होतं, तिथं रशियन लष्करानं अतिशय अमानुषपणे हल्ला करून अडकलेल्यांची सुटका केली. या कारवाईत अनेक लहान मुलंही मारली गेली. अशा सर्व खऱ्या-खोट्या कारवायांचा थेट राजकीय फायदा पुतिन यांना झाला होता. पुतिन यांच्याशी संबंध असलेली अशी अनेक प्रकरणं होती. एक महिला पत्रकार जी रशियात राहूनच पुतिन विरोधी पत्रकारिता करत होती. अनेकदा धमक्या देऊनही ती शांत राहत नाही, हे पाहून तिची हत्या घडवून आणली गेली, तर अलेक्झांडर लिटविनेन्को नावाचा एक पूर्वाश्रमीचा हेरखात्यातील वरिष्ठ अधिकारी जीवाच्या भीतीनं ब्रिटनमध्ये आश्रयास गेला होता. तोही पुतिन विरोधी लिहीत असे, काम करत असे. त्याची लंडनमध्ये किरणोत्सर्गी पदार्थाची बाधा करवून हत्या केली गेली. ही दोन्ही प्रकरणं पाश्चात्य जगात बरीच गाजली. त्या दोन्हीवर कुबेरांनी लिहिलं आहे.

पुस्तकात कुबेर लिहितात की, पुतिन यांनी आपल्या बाजूनं जनमत तयार व्हावं म्हणून कसे संशयास्पद वाटतील असे दहशतवादी हल्ले घडवून आणले. जनतेच्या राष्ट्रवादी भावनांना खतपाणी घातलं. तिला गतइतिहासाची स्वप्नं दाखवली, रशियन भाषेचा –संस्कृतीचा आदर वाटेल असं वर्तन सातत्यानं केलं. (इथं सध्याच्या भारताची आठवण होऊ शकते!) एका बाजूला असं करत असतानाच देशात अमेरिकेविरोधी वातावरण तयार केलं. थोडंफार आर्थिक स्थैर्य, सुधारलेली आंतरराष्ट्रीय प्रतिमा आणि राष्ट्रवादी भावना यांच्या जोरावर पुतिन जनतेत आपली लोकप्रियता बऱ्यापैकी टिकवून आहेत. 

असे हे पुतिन गेली सतरा वर्षं सर्व प्रकारच्या राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय विरोधाला न जुमानता उभे आहेत. रशियावर निरंकुश सत्ता गाजवत आहेत. कुबेर पुस्तकाच्या शेवट असा प्रश्न विचारतात की, पुतिन यांचा शेवट कसा होईल? ते दोन शक्यता वर्तवतात – एक, पुतिन स्वतःच इतर कोणाकडे सत्ता सोपवतील किंवा त्यांच्या विरोधी वातावरण तयार होऊन उठाव होईल आणि दोन, पुतिन यांच्या राजवटीचा हिंसक शेवट होईल. कुबेरांच्या मते, पुतिन यांचं व्यक्तिमत्त्व आणि एकूण राजकारण पाहता हिंसक शेवट होण्याची शक्यताच जास्त आहे.   

पुतिन यांचे आज महत्त्व अशासाठी आहे की, आता जगभरात लोकानुयायी, आक्रमक राष्ट्रवादी आणि लोकशाही मूल्यांना बाजूला ठेवणारे नेते उदयास येत आहेत. अमेरिका, फ्रान्स, युरोपातील इतर देश, तुर्की, भारत अशा देशांमध्ये ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडत आहे. सगळीकडे असे जनतेच्या भावनांशी खेळणारे, आक्रमक राष्ट्रवादाची भाषा करणारे, आक्रस्ताळे नेते सत्तेत येत आहेत. त्या सर्वांच्या आधीपासून पुतिन रशियात याच स्वरूपाचं राजकारण करत आहेत आणि सर्व मार्गांचा वापर करून टिकून आहेत. नव्यानं सत्तेच्या जवळपास पोचणाऱ्या अशा सर्व नेत्यांना पुतिन आपले आदर्श वाटू शकतात. त्यामुळे जगभरातील विचारी जनांनी पुतिन यांचे राजकारण आणि त्यांची कार्यशैली समजून घ्यायला हवी.

पुस्तक वाचताना असं वाटत राहतं की, पहिल्या साठ पानांमध्ये जे ऐतिहासिक समालोचन केलेलं आहे ते थोडं कमी करता आलं असतं. थेट शीतयुद्ध संपलं त्या टप्प्यावर पुस्तकाची सुरुवात करता आली असती. तसंच पुस्तकात काही तपशिलातल्या चुका झाल्या आहेत. पुस्तकाच्या संपादकांनी आपलं काम अधिक नीट केलं असतं तर हे झालं नसतं. ‘लोकसत्ता’सारख्या दैनिकाचं संपादक पद सांभाळून कुबेरांनी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात विषय मराठी वाचकांसाठी तसा अपरिचित आहे आणि खूपच समकालीनसुद्धा आहे. त्यामुळे असं पुस्तक लिहिणं हे एक आव्हान असतं. ते कुबेरांनी पेलले आहे.

जाता जाता एका योगायोगाची नोंद करायला हवी. ‘महाराष्ट्र टाईम्स’चे दिवंगत संपादक गोविंद तळवलकर यांनी 'सोव्हिएत साम्राज्यचा उदय आणि अस्त' या विषयावर चार खंड लिहिले होते. कुबेर आता रशियाचे सर्वेसर्वा पुतिन यांच्यावर पुस्तक लिहून (जरी दोघांची शैली आणि विवेचनाची दिशा वेगळी असली तरी) तीच परंपरा पुढे चालवत आहेत, असं म्हणायला हरकत नसावी!

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3482

.............................................................................................................................................

लेखक दिल्लीस्थित साउथ एशियन विद्यापीठामध्ये पीएच.डी. करत आहेत.

sankalp.gurjar@gmail.com                                           

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......