अजूनकाही
‘आय अॅम अ ट्रोल’ या स्वाती चतुर्वेदी यांनी मूळ इंग्रजीत लिहिलेल्या बहुचर्चित पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. हा अनुवाद मुग्धा कर्णिक यांनी केला असून हे पुस्तक मधुश्री प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला स्वाती चतुर्वेदी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. यातून या पुस्तकाचे आणि इंटरनेट ट्रोल्सचे अंतरंग समजून घ्यायला मदत होईल.
.............................................................................................................................................
मी शोधपत्रकारिता करत आलेय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही माझी रोजीरोटी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत सरकारने माझ्याविरुद्ध आणि माझ्यासारख्या इतर अनेक भारतीय पत्रकारांवर शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल खटले भरले आहेत. मी त्याविरुद्ध व्यवस्थित लढा दिला आणि मी ज्या प्रकाशनांमध्ये काम करत होते त्यांनी माझी साथही दिली.
१० जून २०१५मध्ये मी दिल्लीच्या वसंत विहार पोलीस ठाण्यात एका निनावी ट्वीटर हँडलविरुद्ध (@Lyutensinsider) एफआयआर नोंदवला. ‘ल्यूटेन्सइनसाइडर’चे चाळीस हजार फॉलोअर्स होते आणि त्यांनी मला त्याआधीच्या सहा महिन्यांपासून पद्धतशीरपणे लक्ष्य केले होते. अत्यंत गलिच्छ, विखारी बदनामीची मोहीम चालवून माझे एका राजकीय नेत्याशी लैंगिक संबंध असल्याचे पसरवले जात होते.
रोज सकाळी उठल्यानंतर मला शंभर-एक नोटिफिकेशन्स येत असत. माझा ‘दर’ काय आहे, ‘काल रात्री मी काय मस्त, धमाल सेक्स केला’ आणि मग काल्पनिक प्रसंग रचून ‘किशोरांशी सेक्स करण्याचे वेड असलेली मी’ कशी ‘आणखी, आणखी हवं’ म्हणून सेक्स मागत राहिले याची वर्णनं घातली जात होती. होय, सार्वजनिक व्यासपीठावर माझ्या चारित्र्याची वर्णने पुढल्या पिढ्यांसाठी केली जात होती. मला अतिशय अभिमानास्पद असलेल्या माझ्या एकवीस वर्षांच्या कामगिरीची पूर्ण बदनामी केली जात होती.
आय अॅम अ ट्रोल - स्वाती चतुर्वेदी, मराठी अनुवाद – मुग्धा कर्णिक
मधुश्री प्रकाशन, पुणे
पाने - १४०, मूल्य – २०० रुपये.
पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3506
.............................................................................................................................................
या साऱ्या हल्ल्याचे स्वरूप इतके गलिच्छ होते, इतके द्वेषपूर्ण लैंगिकतेने भरलेले होते- असा अनुभव मला पत्रकारितेत पाऊल ठेवल्यापासून आजवर कधीही आला नव्हता. माझी प्रत्येक सकाळ संतापसंताप घेऊन उगवायची. ओकारी होईल इतकी घृणा मनात भरून जायची. सारे हल्ले अगदी वैयक्तिक स्वरूपाचे होते. आणि अखेर सहा महिन्यांनंतरही हे सुरूच राहिले, तेव्हा म्हटले आता बस्स!
मी केलेली ही फौजदारी गुन्ह्याची तक्रार एखाद्या पत्रकाराने केलेली भारतीय दंडसंहितेच्या अनेक कलमांनुसार पहिल्याच प्रकारची होती. पिच्छा पुरवणे, लैंगिक छळ करणे, इंटरनेटवरून ओंगळ, बीभत्स मजकूर पाठवणे, आणि स्त्रीचा विनयभंग करणे यासंबंधी असलेली सर्व कलमे त्यात नोंदली होती. याला ताबडतोब प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांतून याला प्रसिद्धी तर मिळालीच, आणि ट्वीटरने ते हॅन्डल बदनामी आणि छळ या दोन मुद्द्यांवरून बंद करून टाकले. ट्वीटरने दिल्ली पोलिसांना या निनावी हॅन्डलचा आयपी अड्रेस आणि इमेलही दिले. दुर्दैवाने याबाबत अजूनही कुणालाही अटक झाली नाही, कारण गुन्हेगाराला शासनातील कुणाकुणाचे भलेदांडगे समर्थन आहे.
‘ल्युटेन्सइनसाइडर’ हा काही माझा एकमेव हल्लेखोर नाही. काश्मिरी युवकांचा आक्रमक नेता बुऱ्हाण वाणी याच्या हत्येनंतर जुलै २०१६मध्ये रबरी गोळ्यांच्या वर्षावात अंधत्व आलेल्यांबद्दल लिहिले तेव्हा, माझ्यावर ‘निर्भया टाइप’ बलात्कार केला जाईल किंवा ‘एके फॉर्टीसेवनच्या बुलेटने उडवले जाईल’ असल्या धमक्या ट्वीटरवर मला रोज मिळत होत्या. आणि मी यात एकटी नाही. अनेक पत्रकारांना, विशेषतः उदारमतवादी विचारसरणीच्या महिला पत्रकारांना, सरकारला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना या असल्या हिंसक, लैंगिक घाणीने भरलेली शिवीगाळ उजव्या विचारसरणीचे ट्रोल्स करतच असतात.
मुग्धा कर्णिक मराठी अनुवादासह
इंटरनेट ट्रोल्स म्हणून वावरणाऱ्या या व्यक्ती नेटवरील वातावरण कलुषित करत असतात. ते वादावादी सुरू करतात, विचित्र हिंसक शेरेबाजी करून, चित्रे टाकून लोकांना भडकवतात. ऑनलाइन जगातले गुंडच ते! भारताच्या बाबतीत, असले ऑनलाइन ट्रोल्स बहुतेक वेळा उजव्या विचारसरणीचे आणि अतिराष्ट्रवादी असतात. सरकार, भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मते असलेले राष्ट्र यांना आव्हान देणाऱ्या कुणावरही ते हल्ले करतात. काहींना फार मोठ्या संख्येने फॉलोअर्स असतात. बहुतेकांचे स्वतःचे डीपी म्हणून हिंदू देवदेवता असतात किंवा मग ट्वीटरचे अंडे. अनेकजण सुंदर स्त्रियांची चित्रे लावून आपले फॉलोअर्स वाढवतात. मग एखादी बिकिनी घातलेली ‘सोनम’ मुस्लिमद्वेषी ट्वीट करत राहते. बरेचसे ट्रोल्स निनावी असतात. काहीजण मात्र नावासकट हजर होतात- आणि असल्यांचे हॅन्डल्स पंतप्रधानांसकट भाजपचे थोरथोर सदस्य फॉलो करीत असतात.
मुग्धा कर्णिक यांची ‘अॅटलास श्रग्ड’, ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ इत्यादी अनुवादित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
mugdhadkarnik@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment