‘द मराठाज’ या इतिहासकार डॉ. स्टुअर्ट गार्डन यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीने प्रकाशित झाला आहे. हा अनुवाद र. कृ. कुलकर्णी यांनी केला असून गार्डन यांनी पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…
........................................................................
महाराष्ट्र आणि मराठ्यांविषयीच्या इतिहासाच्या लेखनाची सुरुवातही समकालीनच आहे. या इतिहासाविषयीचे पहिले लेखन म्हणजे बखर वाङ्मय. ब्राह्मण प्रशंसकांनी लिहिलेल्या या बखरी सतराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि अठराव्या शतकाचा मध्य या कालखंडात लिहिल्या गेल्या. या बखरी एखाद्या व्यक्तीचे महात्म्य वर्णन करणार्या असून, बर्याचदा घटनाक्रम आणि तारखांविषयी संभ्रम असलेल्या आहेत असे अभ्यासकांचे मत आहे. असे असूनही बखर वाङ्मयातील सर्वोत्तम समजल्या जाणार्या ‘सभासद बखर’ आणि ‘९१ कलमी बखर’ या बखरी सत्यता आणि शौर्यात्मक आणि शोकात्मक घटनांच्या माहितीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्राचा लोकप्रिय इतिहास अशाच शौर्यात्मक आणि शोकात्मक घटनांवर आधारित आहे.
इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी महाराष्ट्र जिंकल्यानंतर पुढील दहा वर्षांतील दोन घटनांमुळे मराठ्यांच्या इतिहासाविषयी वैयक्तिक जिज्ञासा जागृत झाली. पहिली घटना म्हणजे जिंकलेल्या प्रदेशाविषयीचे ब्रिटिश अधिकार्यांनी प्रकाशित केलेले विविध अहवाल. हे अहवाल मराठा सरकारातील कागदपत्रांच्या अभ्यासावर आणि त्या वेळच्या कारकुनांच्या आणि इतर संबंधितांच्या (मुख्यत्वे ब्राह्मण) जबान्यांवर अवलंबून होते. मराठ्यांचा बराचसा ‘इतिहास’ हा या ब्रिटिश अधिकार्यांनी विचारलेल्या प्रश्नांना जी उत्तरे मिळत गेली त्यावर आधारित होता आणि त्यात दोघांमधील सामंजस्याचा अभावही दिसून येतो.
याच सुमारास ख्रिश्चन धर्मप्रसारक आणि ब्राह्मण पंडितांमध्ये विस्तृत आणि सखोल चर्चा होऊ लागल्या. यात हिंदुस्थानी समाजाचे स्वरूप, हिंदुत्व आणि ब्राह्मणांचे या समाजातील स्थान या विषयांचा अंतर्भाव होता. इ.स. १८४० आणि इ.स. १८५० च्या दोन दशकांमध्ये या चर्चांमधून जाणिवा अधिक व्यापक व्हाव्या, अशी गरज भासू लागली आणि त्यातून स्थानिक धनवानांच्या मदतीने मराठी भाषेतील छापखाना सुरू झाला. यातून तत्त्वज्ञानपर आणि सामाजिक प्रश्नांबद्दलचे लिखाण प्रसिद्ध होऊ लागले. त्याच वेळी ब्रिटिश वसाहतवादी सरकारकडून जनगणना आणि न्यायव्यवस्थेच्या गरजेपोटी जाती आणि पोटजाती निश्चित करण्यावर अधिक दबाव टाकण्यात येऊ लागला. या दबावामुळे ब्राह्मण आणि मराठ्यांमध्ये व्यक्तिश: आणि सामूहिकरीत्या आपल्या आणि महाराष्ट्राच्या एकूणच इतिहासाविषयी पुनर्विचार करण्याची जाणीव निर्माण झाली. काही साध्या नियतकालिकांमधून लोककथा आणि घराण्यांचे इतिहास प्रकाशित होऊ लागले आणि इ.स. १८४९-५० मध्ये इतिहासास वाहून घेतलेले ‘बोधसागर’ या नावाचे नियतकालिक मुंबईहून प्रकाशित होऊ लागले.
इ.स. १८६३ मध्ये ग्रॅट डफने इंग्रजीत लिहिलेल्या मराठ्यांच्या इतिहासावरील पुस्तकाची दुसरी आणि सर्वदूर वितरित झालेली आवृत्ती प्रकाशित झाली आणि वादविवाद अधिक तीव्र झाले. कारकिर्दीच्या सुरुवातीस मुंबई सरकारात अधिकारी असलेल्या ग्रँट डफने, सतराव्या शतकाच्या मध्यास झालेल्या शिवाजीराजांच्या उदयापासून, इ.स. १८१८ मधील इंग्रजांच्या विजयापर्यंतचा मराठ्यांचा विस्तृत इतिहास तीन खंडांमध्ये लिहिला. या अभ्यासपूर्ण लिखाणामुळे मराठा राज्यव्यवस्था काय स्वरूपाची होती, कारभाराची मूलतत्त्वे काय होती आणि यातील मराठा आणि ब्राह्मण व्यक्तिमत्त्वांचे स्थान काय होते; या विषयांच्या भविष्यातील वादविवादांना एक प्रकारची दिशा मिळाली. येथे आपण ग्रँट डफचे काही दृष्टिकोन विचारात घेऊ. काही दृष्टिकोन पुढील प्रकरणांमध्ये चर्चेस येतील. प्रथमत: असे दिसते की, ग्रँट डफने शिवाजीराजांच्या उदयाच्या कालखंडाचा केवळ धावता आढावा घेतला आहे आणि महाराष्ट्रातील पूर्वीच्या राज्यव्यवस्थांशी शिवरायांनी राखलेले सातत्य, हे फारसे अधोरेखित केले नाही. दुसरे असे की, ग्रँट डफच्या दृष्टीने इतिहास म्हणजे ‘राजकीय इतिहास’ होय. त्याला लढाया, युद्धे, दरबारांतील गटबाजी आणि व्यक्तींचे जय-पराजय यांत अधिक रुची होती. त्या काळातील अर्थव्यवस्था किंवा सामाजिक स्थिती अशा विषयांना आपल्या इतिहासात त्याने गौण स्थान दिल्याचे दिसते. तिसरे म्हणजे ग्रँट डफने मुख्य राज्यकर्त्यावर आणि त्याच्या प्रबळ सेनानींवरच लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. त्याच्या लिखाणात दरबाराबाहेरच्या घटनांविषयी किंवा दरबाराशी संबंधित नसलेल्या राजकारणाविषयी फारसे भाष्य दिसत नाही. चौथी गोष्ट म्हणजे, त्याचे लिखाण काटेकोरपणे कालक्रमानुसार लिहिलेले आहे. यात पूर्वापार चालत आलेल्या प्रथा अथवा त्यांतील बदलांविषयी लिहिताना भूत-भविष्याशी त्यांची सांगड घातलेली दिसत नाही. सरते शेवटी ग्रँट डफला ब्रिटिश विजयाचा अभिमान होता आणि ब्रिटिश सैन्याने दाखवलेल्या शौर्याचे त्याला अपार कौतुक होते. त्याने मराठ्यांचे पराभव आणि मराठा राज्यकारभारातील प्रमुख व्यक्तींचा नाकर्तेपणा अधिक ठळकपणे दाखवला. यामुळेच ब्रिटिशांना विजय मिळाला असे त्याचे मत त्याने व्यक्त केले आहे.
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/320
.............................................................................................................................................
यानंतरच्या काळातील बरेचसे ऐतिहासिक लिखाण हे ग्रँट डफच्या लिखाणाचा परिपाक असल्याचे दिसते. इतिहासकारांच्या पुढील पिढ्यांना ग्रँट डफ कसा चुकीचा होता हे दाखवणे गरजेचे होते, कारण मराठा राज्याचे महत्त्व अधोरेखित करणे हे तत्कालीन राजकारणाच्या दृष्टीने गरजेचे होते. इ.स. १८९० च्या दशकात मा. गो. रानड्यांसारख्या सुरुवातीच्या नेमस्त नेत्यांनी सतराव्या शतकातील मराठ्यांचा उदय हा राजकीय, सामाजिक आणि धार्मिक पुनरुज्जीवनाचे फलित होते असे दाखवण्याचा प्रयत्न केला. मराठ्यांचा उदय हा राष्ट्रीयत्वाचा आरंभ होता आणि शिवाजीराजांचा मोगल साम्राज्याविरुद्धचा संघर्ष हा एका नवनिर्माण होत असलेल्या राष्ट्राने परकीयांच्या गुलामगिरीविरुद्ध दिलेला लढा होता असे सूचित करण्यात आले. रानड्यांच्या काळात ब्रिटिशांविरुद्ध जो संघर्ष नावारूपास येत होता, त्यामागील विचारसरणीनुसार शिवाजीराजे हे सतराव्या शतकातील धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय चळवळीचा नेता होते.
इ.स. १९ व्या शतकातील शिवरायांच्या आणि मराठ्यांच्या अभ्यासकांच्या आणखी वेगळ्या विचारप्रणालीनुसार शिवराय युद्धनीतीत वाकबगार होते. ब्रिटिश लेखकांना शिवराय हे मोगलांच्या बलाढ्य फौजेविरुद्ध यशस्वी लढा देणारा एक देदीप्यमान बंडखोर वाटत होते. त्यांनी हुशारीने वापरलेल्या जलद घोडदळाविषयी आणि एकूण भौगोलिक स्थितीच्या उठवलेल्या फायद्याविषयी, ब्रिटिशांच्या भारतातील सैनिकी धोरणात दखल घेतलेली दिसते.
ग्रँट डफच्या लिखाणावरील टीकेतून एक चांगली गोष्ट निष्पन्न झाली, ती म्हणजे मराठा राजवटीसंबंधीच्या कागदपत्रांचा शोध. याचा मुख्य स्रोत म्हणजे मराठ्यांचे केंद्रीय दप्तर. परंतु ही अगणित कागदपत्रे इ.स. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी जप्त केली होती आणि ऐतिहासिक संशोधनासाठी ती उपलब्ध नव्हती. (ही कागदपत्रे राष्ट्रियत्वाचा स्फुलिंग चेतवतील आणि त्यामुळे आपल्याविरुद्ध बंड उभे राहील, अशी भीती ब्रिटिशांना वाटत होती. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे पुराभिलेखागार बंदच राहिले.) यानंतरचा मुख्य स्रोत म्हणजे संस्थानिकांच्या दप्तरांमधील कागदपत्रे आणि मोठ्या घराण्यांकडील कागदपत्रे. त्यामुळे इ.स. १९०० पूर्वी महाराष्ट्रातील शिंदे, होळकर, सातार्याचे राजे, प्रतिनिधी घराणे, आंग्रे आणि दाभाडे यांसारख्या महत्त्वाच्या घराण्यांचे इतिहास प्रकाशित झाले. इ.स. १९०० नंतरच्या दशकांमध्ये कैक निष्ठावंत संग्राहकांनी मराठ्यांच्या असंग्रहीत कागदपत्रांचा शोध घेताना, अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. यात कारभारी घराण्यांकडील कागदपत्रे, जमिनीच्या सनदा आणि दुय्यम मराठा घराण्यांकडील कागदपत्रे हाती लागली. अशी कागदपत्रे शोधून, ती छापून, प्रकाशात आणणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य समजले जाऊ लागले. यातूनच नवीन आणि अधिक बिनचूक असा मराठ्यांचा इतिहास लिहिला जाऊ लागला. या संग्राहकांपैकी सर्वांत प्रसिद्ध संग्राहक म्हणजे विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ऊर्फ इतिहासाचार्य राजवाडे. त्यांनी आपल्या दीर्घ प्रस्तावनांसह हजारो कागदपत्रे प्रकाशित केली.
या खाजगी प्रकाशनांमुळे प्रेरित होऊन मुंबई सरकारने प्रचंड अशा केंद्रीय पुराभिलेखागारातील निवडक कागदपत्रे प्रकाशित करायला परवानगी दिली. यांतील पहिले प्रकाशन म्हणजे इ.स. १९१७ ते १९२५ या काळात प्रकाशित झालेले तेरा खंड. या कागदपत्रांची निवड करून त्यांना प्रकाशित करण्याचे काम रावबहादूर वाड यांनी केले. त्यानंतरच्या कागदपत्रांची निवड करण्याचे काम गो. स. सरदेसाई यांनी इ.स. १९२८ मध्ये सुरू केले. आता या मालिकेचे ४५ खंड प्रकाशित झाले असून, पुढील काम चालू आहे. हे खंड वाचण्यास अवघड अशा मोडी लिपीऐवजी देवनागरीत असल्यामुळे आणि त्यांच्या सहज उपलब्धतेमुळे महाराष्ट्रातील इतिहासाच्या अभ्यासकांसाठी ते आधारस्तंभ ठरले आहेत. असे असले, तरी या खंडांमध्ये दोन उणिवा आहेत. एक म्हणजे, बहुतेक खंड ब्रिटिश राजवटीत प्रकाशित झाले असल्यामुळे आणि त्यांच्यात कोणताही विवादास्पद मजकूर प्रकाशित होऊ देण्याचे तत्कालीन सरकारने टाळल्यामुळे, बरीच महत्त्वाची कागदपत्रे आणि अडचणींचे विषय प्रकाशित झालेले नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे, जरी आजपर्यंत ५०००० पेक्षा जास्त कागदपत्रे प्रकाशित झाली असली, तरी निवडण्याच्या प्रक्रियेत बरेच विषय दुर्लक्षित राहिले आहेत. उदाहरणार्थ यांत आर्थिक इतिहासासंबंधी काही उदाहरणे दिलेली असून, दीर्घकालीन आकडेवारीचा अभाव दिसतो. त्यामुळे व्यापार, लष्करी अर्थपुरवठा किंवा जमिनींच्या हक्कांबाबत मराठा व्यवस्था न बदललेली दिसते; जे अयोग्य आहे. सामाजिक बाबतीतही संपूर्ण चित्र उभे राहत नाही.
इ.स. १९३० आणि १९४० च्या दशकांमध्ये अशा कागदपत्रांच्या प्रकाशनांचा वेग वाढला. या काळात इतिहास लेखनाच्या पद्धतीतही फरक पडला. हिंदू आणि मुसलमानांमधील संबंध खालावत गेल्यामुळे, नवीन इतिहासकारांच्या दृष्टीने शिवराय आणि मराठा राज्य यांना वेगळे महत्त्व प्राप्त झाले. मोगलांच्या जुलमी मुसलमानी राजवटीविरुद्ध हिंदूंनी उभारलेला लढा, असे स्वरूप मराठा राजवटीला देण्यात येऊ लागले. त्यामुळे शिवराय हे परकीय मुसलमानी सत्तेविरुद्ध संघर्ष करणारे आदर्श हिंदू राजे असे चित्र उभे राहिले. इ.स. १९४० च्या सुमारास भारतात जी राजकीय स्थिती होती, तिला ही विचारधारा अनुकूल होती. मुसलमान परकीय असून, भारतात हिंदूंचे सरकारच यायला हवे असे बुहसंख्य लोकांचे मत होते. शिवरायांच्या ‘हिंदू’ राजवटीत मुसलमानांना जशी वागणूक मिळत होती, तशीच सहिष्णुतेची आणि सौम्य वागणूक मिळण्याची अपेक्षा मुसलमानांनी बाळगावी असे सुचवण्यात येऊ लागले.
स्वातंत्र्यानंतरच्या दशकांमध्ये मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासात विविध प्रवाह निर्माण झाले. एक प्रवाह म्हणजे मराठ्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या इंगज, फ्रेंच, पोर्तुगीज आणि मोगलांच्या संग्रहातील मराठ्यांच्या संदर्भातील कागदपत्रांचे प्रकाशन आणि त्यांचा अभ्यास. महाराष्ट्रातील संशोधकांनी स्थानिक पातळीवरील इतिहास आणि व्यक्तिचित्रे यांची उपयुक्त माहिती प्रकाशित केली. एकंदरित विचार करता शिवराय आणि मराठा राजवट हे राष्ट्रीय प्रतीक न राहता, त्यांना प्रादेशिक स्वरूप आले. यामागील कारण समजून घेणे सोपे आहे. ऐतिहासिक दृष्ट्या मराठ्यांनी अठराव्या शतकात उत्तर आणि मध्य भारताच्या बर्याच मोठ्या भागावर राज्य केले असले, तरी पूर्वीच्या राजवटीसारखी फारशी कार्यक्षम नसणारी आणि तितकीच त्रासदायक असलेली राजवट, असेच सर्वसाधारण मत मराठ्यांच्या राजवटीविषयी बनले होते.
मागील वीस वर्षांत शिवराय आणि मराठा राजवटीला एका वेगळ्याच राजकीय संघर्षात महत्त्व आले आहे. महाराष्ट्रातील ब्राह्मण, ब्राह्मणेतर आणि इतर दलितांमधील वादांत शिवरायांच्या सामाजिक सुधारणांकडे लक्ष केंद्रित झालेले आहे. व्यक्तिश: शिवाजीराजे मराठा असल्यामुळे ते ब्राह्मणेतर शक्तीचे प्रतीक बनले आहेत. याहीपेक्षा विशेष म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने उच्चभ्रू जमीनदारांची ताकद कमी केली, त्यात मार्क्सवादी आणि दलित लेखकांना कर्तव्यकठोरता आणि जातीजातींमधील भेद कमी करण्याचे प्रयत्न दिसून आले आणि त्यांनी त्या दृष्टीने लेखन केले.
शिवराय आणि मराठा राज्यव्यवस्थेवर महाराष्ट्रात अलीकडे लिहिले जाणारे लिखाण तीन प्रमुख सूत्रांच्या आधारावर बेतलेले दिसते. (१) ‘मराठा राज्य’ म्हणजे महाराष्ट्राच्या प्रादेशिक अस्मितेची जागृती, (२) जुलमी मुसलमानी राजवटीविरुद्धचे हिंदू प्रत्युत्तर म्हणजे ‘मराठा राज्य’ अथवा (३) हिंदू समाजात आमूलाग्र बदल घडवून, तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी केलेला एक धाडसी प्रयत्न म्हणजे ‘मराठा राज्य.’ आजचे इतिहासकार काही मूलभूत, मुख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. उदाहरणार्थ शिवराय आदर्श हिंदू राजा होते का? ते सामाजिक परिवर्तन घडवणारा राजा होते का? ते किती धर्मनिरपेक्ष होते? मराठा राज्य हे खरेच हिंदू राज्य होते का? मोगलांना परकीय मानून त्यांच्याविरुद्ध मराठ्यांनी संघर्ष उभा केला होता का? मराठ्यांच्या यशाचे श्रेय जागृत झालेल्या महाराष्ट्राच्या अस्मितेला किती देता येईल? मराठ्यांच्या कोणत्या अपयशांमुळे अथवा त्यांच्यापुढील कोणत्या समस्यांमुळे ब्रिटिशांना विजय मिळवणे सुकर झाले? वगैरे.
आता स्वातंत्र्य मिळून इतका काळ उलटून गेल्यानंतर, ब्रिटिशांविरुद्धच्या मराठ्यांच्या अपयशाचा जो इतिहास ग्रँट डफने लिहिला, त्याचा आधार सोडून; नव्याने संशोधन करण्याची आवश्यकता आहे आणि तसे प्रयत्न गेल्या वीस वर्षांत इतिहासकारांकडून होताना दिसतात. या इतिहासकारांनी वेगळे विषय हाताळलेले दिसतात. या विचारवंतांनी पुणे दप्तर किंवा भारत इतिहास संशोधक मंडळातील मूलभूत साधनांचा वापर करून आणि इतर तज्ज्ञांशी आणि लेखकांशी चर्चा करून हे संशोधन केल्याचे दिसते. सर्वसाधारणपणे दरबारातील घटना किंवा मोहिमांवर लक्ष केंद्रित न करता, ग्रामीण भाग आणि विशेषत: आर्थिक आणि राजकीय प्रकियांमधील संबंधांवर त्यांचे संशोधन अधिक केंद्रित झालेले दिसते. यांतील काही संशोधनांमध्ये सरकार आणि जातीवर्गामधील बदलत्या समीकरणांविषयी आणि ग्रामीण भागातील कष्टकर्यांच्या स्थितीविषयी अभ्यास केलेला दिसतो.
प्रस्तुत लेखकाच्या संशोधनात विजयांचे स्वरूप, सरकार आणि प्रादेशिक ताकदीमधील संबंध आणि लष्करी पद्धतीतील बदल अशा विषयांचा समावेश आहे. इतर काही संशोधकांनी मराठ्यांच्या इतिहासावर आपली छाप पाडणार्या काही घराण्यांच्या इतिहासावर लक्ष केंद्रित केले, तर काहींनी चलनव्यवस्था आणि पतपेढ्यांच्या व्यवहारांवर संशोधन केले. काही संशोधकांनी मराठेशाहीतील अंतर्गत बेबनाव आणि जहागिरी हक्कांच्या स्वरूपाविषयी संशोधन केले आहे, तर काहींनी धार्मिक आणि वाङ्मयीन इतिहासाविषयी संशोधन केले.
या पुस्तकाचे लेखन करताना या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील संशोधनाचा उपयोग झाला, असे कृतज्ञतापूर्वक म्हणायला हवे. मराठा राज्य हे भारताच्या इतिहासातील एक स्वतंत्र आणि महत्त्वाचे पान आहे. या लेखनात आर्थिक आणि लष्करी प्रश्नांवर आणि दीर्घकालीन प्रथा आणि घटनाचक्रांवर चर्चा केली आहे. यात ग्रँट डफ आणि इतरांनी महत्त्व दिलेल्या राजकीय घटनांना कमी महत्त्व दिले आहे. प्रथमत: या लेखनात तत्कालीन विविध राजवटींमधील मराठ्यांचे स्थान, मराठी सत्तेचा उदय आणि त्याचे विकेंद्रीकरण यांचा ऊहापोह केलेला आहे. ह्या विषयाकडे केवळ दरबारी दृष्टिकोनातून न पाहता, ज्या घराण्यांनी आपली निष्ठा मराठी राज्याला वाहिली किंवा कारणपरत्वे काढून घेतली, अशांच्या दृष्टिकोनातूनही पाहिले आहे. या लेखनातील ऐतिहासिक कालखंड केवळ मराठा कालखंडापुरता मर्यादित नाही, तर खूप आधीच्या कालखंडाशी त्याची सूत्रबद्धता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ मराठे आणि ब्राह्मणांना पूर्वीच्या सलतनतींमधून अनुभव मिळालेला असल्यामुळे; त्यांनी जेव्हा तीच कार्यपद्धती मराठा राज्यकारभारात वापरली तेव्हा मराठा राज्य हे या सलतनतींचाच वारसा पुढे चालवत असल्याचे प्रतिपादन या लेखनात केले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, मराठा राज्यातील सामाजिक स्तरांमधील बदल हा एक विषयही आपल्याला चर्चिला गेलेला दिसेल. यात जसा काहींचा सामाजिक उत्कर्ष झालेला दिसतो, तसेच काहींची राजकीय गणिते चुकल्यामुळे म्हणजे त्यांनी वारसा संघर्षात चुकीच्या पक्षाला साथ दिल्यामुळे, त्यांचा झालेला र्हास दिसतो. तिसरी चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे या राज्यव्यवस्थेचे अर्थकारण. विशेषत: करप्रणाली आणि पतपुरावठा यांत खंडणीपासून रीतसर करवसुली हे परिवर्तन कसे झाले हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. चौथा विषय म्हणजे निष्ठा आणि कायदेशीर वारसाहक्क, यांतील सततचे उपस्थित होणारे आणि बर्याचदा अनुत्तरित राहणारे प्रश्न. पाचवा विषय म्हणजे लष्कराच्या स्वरूपातील आणि तंत्रज्ञानातील बदल आणि त्याचे केंद्रावरील आणि प्रादेशिक स्तरावरील सामाजिक आणि आर्थिक परिणाम. सरते शेवटी मराठा राजवटीने भारतावर केलेले दूरगामी परिणाम. आपल्याला मराठा राजवटीने महसुली कारभार, कायदे, शिक्षणक्षेत्र, व्यापारव्यवस्था, स्थलांतर यांत केलेले बदल आणि मध्य भारत, गुजराथ आणि महाराष्ट्राचा सामाजिक आणि आर्थिक कायापालट या गोष्टींची चर्चाही वाचायला मिळेल.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ram Jagtap
Thu , 22 June 2017
कोरडे यांस, हे पुस्तक Booksnama वर उपलब्ध आहे. त्याची लिंक लेखात दिली आहे. पुस्तकाची किंमत 295 असून सवलतीत 236 रुपये इतकी आहे.
ADITYA KORDE
Thu , 22 June 2017
IS IT AVAILABLE ON BOOKSNAMA ?, IF YES WHATS THE PRICE AND HOW TO PAY AND WILL IT BE SENT BY MAIL....